बंधपत्राचे
उल्लंघन आणि कारावास
बंधपत्राचा भंग झाला म्हणून सामनेवाला याला तुरूंगात ठेवणे
ही वाटते तितकी सोपी बाब नाही. घटनेने नागरिकांना दिलेले स्वातंत्र्य काही
काळासाठी हिरावून घेणे ही गंभीर बाब आहे. अनेक वरिष्ठ अधिकार्यांसमोर याबाबत
खुलासे सादर करावे लागतात. राजकीय दबावाला सामारे जाण्याची शक्यता नाकारता येत
नाही. सदर आदेश अभ्यासपूर्ण नसेल तर न्यायालयीन कारवाईलाही सामोरे जावे लागते.
त्यामुळे उक्त आदेश अभ्यासपूर्वक आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून
पारित करणे अनिवार्य ठरते.
∙ कलम १२६ - शांतता राखण्यासाठी बंधपत्र का घेऊ नये अशी
नोटीस/आदेश
∙ कलम १३५ - खबरीच्या सत्यतेची चौकशी
∙ कलम १३६ - जामीन देण्याचा आदेश व बंधपत्र निष्पादित करणे
∙ कलम १३९ - बंधपत्रातील मजकूर
∙ कलम १४१(१)(ब) - शांतता
राखण्याच्या बंधपत्राचे उल्लंघन केल्यास कारावास
∙ कलम ४९१ बंधपत्र दंडपात्र झाल्यास दंड वसुलीची प्रक्रिया
∙ या तरतुदीनुसार, प्रथम उल्लंघनाची
माहिती प्राप्त करावी, पोलीस ठाण्याकडून लेखी अहवाल प्राप्त करून घ्यावा, उल्लंघनाची
तारीख, वेळ व ठिकाण तपासावे, कोणत्या कृतीमुळे शांततेचा भंग
झाला हे निश्चित करावे, बंधपत्राच्या नेमक्या कोणत्या अटीचा भंग कसा झाला हे तपासावे.
बंधपत्राची वैधता व समाप्तीची तारीख, बंधपत्राच्या
उल्लंघनाबाबतचा पोलीस अहवाल, पंचनामे, साक्षीदारांचे
जबाब, CCTV फुटेज, FIR किंवा इतर
उपलब्ध पुरावे तपासावे.
तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तालुका....., जिल्हा..... यांचे न्यायालय
प्रकरण क्रमांक : फौजदारी/ कावि....
/ २०२६ दिनांक:
प्रति,
१. ............. .....सामनेवाला
वाचा:
१. या न्यायालयाचा भा.ना.सु.सं. २०२३, कलम १३६ अन्वये दिनांक.........रोजीचा
आदेश.
२. आपण निष्पादित केलेले शांतता राखण्याचे बंधपत्र दिनांक.....
३. पोलीस ठाणे, ता...... जि.... यांचा अहवाल दिनांक........
महाशय,
आपणाविरुद्ध या कार्यालयात भा.ना.सु.सं. २०२३, कलम १२६
अन्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. सदर कार्यवाहीअंती दिनांक ........रोजी
भा.ना.सु.सं. २०२३, कलम १३६ अन्वये आदेश पारित करून आपणास रुपये .......रकमेचे व ..........
या कालावधीचे शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित करण्याचे निर्देश देण्यात आले
होते. त्यानुसार आपण दिनांक........रोजी सदर बंधपत्र निष्पादित केले आहे.
श्री. ........यांच्याशी भांडण करून मारहाण केल्याची बाब
पोलीस स्टेशन, ता....., जि.... यांच्या दिनांक ....... रोजीच्या अहवालातून
निदर्शनास आली आहे.
त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १४१(१)(ब)
अन्वये आपल्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये आणि बंधपत्राची उर्वरित मुदत
संपेपर्यंत आपणास कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश का पारित करण्यात येऊ नये,
याबाबत आपले लेखी स्पष्टीकरण आपण दिनांक......रोजी वेळ ....... वाजता
या कार्यालयात स्वतः उपस्थित राहून सादर करावे.
दिनांक: तहसिलदार
तथा कार्यकारी दंडाधिकारी
सुनावणीत, सामनेवाला याने खरोखरच बंधपत्र निष्पादित केले
आहे काय?
बंधपत्राची मुदत सुरू होती काय? उल्लंघनाची घटना बंधपत्राच्या मुदतीत घडली काय?
सामनेवालाच्या कृतीमुळे बंधपत्रातील शांतता राखण्याच्या अटीचा भंग झाला काय? उल्लंघन सिद्ध करणारे विश्वासार्ह पुरावे आहेत काय?
हे मुद्दे विशेषत: निश्चित करावेत.
उल्लंघन सिद्ध झाल्याचे समाधान झाल्यास BNSS
कलम १४१(१)(ब) अन्वये उल्लंघन सिद्ध झाल्याची कारणे लेखी नोंदवावीत.
संबंधित व्यक्तीस अटक करण्याचा आदेश द्यावा. बंधपत्राची उर्वरित मुदत संपेपर्यंत
कारागृहात ठेवण्याचा आदेश देता येतो.
कलम १४१(१)(ब) अन्वये कारावासाचा आदेश देण्यासाठी उल्लंघन
सिद्ध झाल्याबाबत दंडाधिकाऱ्याने कारणे लेखी नोंदविणे आवश्यक आहे. केवळ पोलीस
अहवाल प्राप्त झाला म्हणून यांत्रिकपणे कारावासाचा आदेश देता येणार नाही.
प्रकरण क्रमांक : फौजदारी/ कावि....
/ २०२६ दिनांक:
पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, तालुका....., जिल्हा..... .....अर्जदार
विरुद्ध
१. ............. .....सामनेवाला
भारतीय
नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १४१(१)(ब) अन्वये कामकाज
आदेश
प्रस्तुत प्रकरणात दिनांक रोजी अर्जदारांनी सादर केलेल्या
अहवालाची पडताळणीकरून, सामनेवाला याला याला त्याचे म्हणणे मांडण्याची पुरेशी
संधी देऊन, दिनांक .... रोजी अंतिम आदेश पारित करून सामनेवाला यांच्याविरुद्ध
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १२६ अन्वये कार्यवाही करण्यात आली होती.
सदर कार्यवाहीअंती या न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा
संहिता २०२३, कलम १३६ अन्वये सामनेवाला यांच्याकडून दिनांक .......रोजी रक्कम रूपये ....... (शब्दात रक्कम
रुपये......) इतक्या रकमेचे व .......... इतक्या कालावधीचे शांतता राखण्याचे
बंधपत्र निष्पादित करून घेतले होते.
सदर अहवालासोबत सादर केलेले दस्तऐवज, साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध पुरावे तसेच सामनेवाला यांचे म्हणणे विचारात घेण्यात आले आहे.
मुद्देनिहाय विचार व निष्कर्ष
मुद्दा क्रमांक १ : सामनेवाला यांनी शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित केले होते काय?
निष्कर्ष : होय. अभिलेखावरील दिनांक.....रोजीचे बंधपत्र आणि कलम १३६ अन्वये पारित आदेश तपासता सामनेवाला
यांनी रुपये .......रकमेचे व ..... कालावधीचे शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित
केल्याचे सिद्ध होते.
निष्कर्ष : होय. बंधपत्राची मुदत दिनांक .... ते दिनांक ..... अशी आहे. पोलीस अहवालानुसार
संबंधित घटना दिनांक ..... रोजी घडली आहे. त्यामुळे संबंधित घटना बंधपत्राच्या वैध
कालावधीत घडल्याचे सिद्ध होते.
निष्कर्ष : होय. सादर पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय
कागदपत्रे व इतर उपलब्ध अभिलेख यांचे परीक्षण केले असता ........(घटनेचा नेमका तपशील व सामनेवालाचा सहभाग नमूद करावा).
यावरून सामनेवाला यांचा संबंधित घटनेतील सहभाग सिद्ध होत
आहे.
आदेश
१. सामनेवाला यांनी निष्पादित केलेल्या शांतता राखण्याच्या
बंधपत्राचा भंग केल्याचे निर्विवाद सिद्ध झाले आहे.
२. सामनेवाला यांना अटक करून बंधपत्राची
उर्वरित मुदत (....महिने, ... दिवस) संपेपर्यंत त्यांना तालुका कारागृहात
ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
३. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस
निरीक्षक, पोलीस ठाणे, तालुका....., जिल्हा.....
यांना आदेश देण्यात येत आहेत.
४. सदर कारवाई अन्य लागू कायद्यानुसार
होणाऱ्या स्वतंत्र कार्यवाहीस बाधा आणणार नाही.
हे आदेश माझ्या सही आणि शिक्क्यासह निर्गमित केले आहेत.
ठिकाण : दिनांक
:
शिक्का (स्वाक्षरी)
तहसिलदार तथा
कार्यकारी दंडाधिकारी, तालुका....., जिल्हा.....
कलम १४१(१)(ब) चा अंतिम आदेश पारित झाल्यानंतर
अंमलबजावणीसाठी स्वतंत्र लेखी आदेशात खालील तपशील स्पष्ट असावा:
∙ सामनेवालाचे पूर्ण नाव व पत्ता.
∙ मूळ कलम १३६ आदेशाचा क्रमांक व दिनांक.
∙ बंधपत्र निष्पादित केल्याची तारीख व त्याचा कालावधी.
∙ बंधपत्रभंग सिद्ध झाल्याचा अंतिम आदेश क्रमांक व दिनांक.
∙ कलम १४१(१)(ब) अंतर्गत अटक व स्थानबद्धतेचा स्पष्ट
निर्देश.
∙ बंधपत्राची उर्वरित मुदत संपण्याची तारीख.
∙ आदेशाची प्रत व आवश्यक कागदपत्रे कारागृह अधिकाऱ्यांना
देण्याचा निर्देश.
∙ विशेषतः सामनेवाला याला किती काळ स्थानबद्ध ठेवायचे हे
स्पष्ट असावे.
∙ बंधपत्राची उर्वरित मुदत विचारात घ्यावी.
तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तालुका....., जिल्हा..... यांचे न्यायालय
जा.क्र. : .....
दिनांक : .......
प्रति,
पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, तालुका....., जिल्हा.....विषय : भारतीय
नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १४१(१)(ब) अन्वये पारित आदेशाची अंमलबजावणी
करण्याबाबत.
संदर्भ : या
न्यायालयाचा आदेश क्रमांक...... दिनांक.......मधील अंतिम आदेश.
महोदय,
उपरोक्त संदर्भीय प्रकरणात सामनेवाला श्री.........यांनी भारतीय
नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १३६ अन्वये निष्पादित केलेल्या शांतता
राखण्याच्या बंधपत्राचा भंग केल्याचे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे समाधानकारकरित्या
सिद्ध झाले आहे.
त्यामुळे या न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३,
कलम १४१(१)(ब) अन्वये दिनांक .........रोजी अंतिम आदेश पारित केलेला आहे.
त्यानुसार संबंधित आदेशाची अंमलबजावणी करून सामनेवाला यांना
अटक करावी व बंधपत्राची उर्वरित मुदत ......... महिने, ......... दिवस संपेपर्यंत त्याला
तालुका कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी कायद्यानुसार कार्यवाही करावी.
सदर आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल या न्यायालयास सादर
करावा.
तहसिलदार
तथा कार्यकारी दंडाधिकारी
∙ बंधपत्र न देणे किंवा जामीन सादर न करणे - कलम १४१(१)(अ)
∙ शांतता राखण्याच्या बंधपत्राचा प्रत्यक्ष भंग - कलम
१४१(१)(ब)
∙ बंधपत्रातील आर्थिक दंडाची रक्कम जप्त करून वसूल करणे - कलम
४९१
∙ कलम १४१(१)(ब) अन्वये व्यक्तीला कारागृहात ठेवण्याचा आदेश
हा बंधपत्राची उर्वरित मुदत संपेपर्यंतच असतो. ही मारहाणीच्या गुन्ह्यातील शिक्षा
नाही.
∙ कलम ४९१ अन्वये बंधपत्राची रक्कम जप्त करण्याची कार्यवाही
स्वतंत्रपणे करता येते.
त्यासाठी सामनेवाला व जामीनदार यांना लागू तरतुदीनुसार
नोटीस व संधी द्यावी.
उदा. १. बंधपत्र कालावधीत सामनेवाला
याने पुन्हा भांडण करणे:
मूळ प्रतिबंधक कार्यवाही तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी
यांनी केली आहे. त्याच अधिकाऱ्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, कलम १३६ अन्वये
शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित करून घेतले आहे. त्यानंतर सामनेवाला याने पुन्हा
भांडण करून मारहाण केली आहे.
∙ अशा प्रकरणात तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी-
उदाहाणार्थ: समोरच्या व्यक्तीस धमकी दिली असेल तर धमकीचे
स्वरूप व संदर्भ तपासावा, सार्वजनिक ठिकाणी वाद घालून जमाव गोळा केला असेल तर, प्रत्यक्ष
शांतता भंगाची परिस्थिती तपासावी, दोन गटांमध्ये वाद निर्माण केला असेल तर,
सामनेवालाची त्यातील भूमिका तपासावी, शस्त्र किंवा घातक वस्तू घेऊन फिरला असेल
तर, त्याचा वापर, धमकी किंवा दहशत निर्माण करण्याचा हेतू
तपासावा, पुन्हा वाद उकरून काढला असेल तर बंधपत्रातील अटींचा प्रत्यक्ष भंग झाला
का हे तपासावे, सार्वजनिक ठिकाणी अशांतता निर्माण केला असेल तर, साक्षीदार व
प्रत्यक्ष घटनाक्रम तपासावा.
वरील प्रत्येक कृती आपोआप कलम १४१(१)(ब) चा भंग ठरत नाही.
संबंधित कृतीमुळे बंधपत्रातील शांतता राखण्याच्या बंधनाचा प्रत्यक्ष भंग झाला आहे,
हे पुराव्यांवरून सिद्ध करावे लागेल.
केवळ भविष्यात शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे एवढ्याच
आधारावर कलम १४१(१)(ब) लागू होत नाही. आधी निष्पादित केलेल्या बंधपत्राचा
प्रत्यक्ष भंग झाल्याचे सिद्ध होणे आवश्यक आहे.
नवीन प्रतिबंधक परिस्थिती निर्माण झाल्यास कलम १२६ अन्वये
स्वतंत्र कार्यवाही करण्याचाही विचार करता येईल.
∙ बंधपत्र दिल्यानंतर दुसरा फौजदारी गुन्हा दाखल झाला,
एवढ्याच कारणावरून कलम १४१(१)(ब) अन्वये सामनेवाला यास आपोआप अटक
करून कारागृहात पाठविता येत नाही.
सामनेवाला याने कलम १३६ अन्वये शांतता राखण्यासाठी दिलेल्या
आदेशानुसार निष्पादित केलेल्या बंधपत्राचा प्रत्यक्ष भंग केला आहे,
हे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समाधानापर्यंत
पुराव्याने सिद्ध होणे आवश्यक आहे.
त्यामुळे नवीन गुन्हा दाखल झाल्याची बाब ही चौकशी सुरू
करण्यासाठी महत्त्वाची असली, तरी ती स्वतःहून
बंधपत्रभंगाचा अंतिम पुरावा नाही. मूळ बंधपत्रातील अटी, नव्या
घटनेचे स्वरूप, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तीचे म्हणणे
यांचा विचार करून कारणयुक्त निष्कर्ष नोंदवावा.
∙ मूळ बंधपत्र शांतता राखण्यासाठी (For
keeping the peace) असेल, तर कलम १४१(१)(ब)
विचारात घेता येईल.
∙ मूळ बंधपत्र चांगल्या वर्तणुकीसाठी (For
good behaviour) असेल, तर कलम १४१(१)(ब) सरसकट
लागू करू नये. कलम १४१(१)(ब) च्या शब्दरचनेत कलम १३६ अंतर्गत शांतता राखण्याच्या
बंधपत्राचा स्पष्ट उल्लेख आहे.
∙ कलम १३९ मध्ये चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राच्या बाबतीत
कारावासपात्र गुन्हा करणे/ करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यास साहाय्य करणे हा भंग
असल्याचे नमूद आहे. मात्र त्यावरून कलम १४१(१)(ब) चा विस्तार आपोआप करता येत नाही.
जा.क्र. : .....
दिनांक : .......
प्रति,
पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, तालुका....., जिल्हा.....विषय : सामनेवाला
.... याने शांतता राखण्याच्या बंधपत्राचे उल्लंघन केल्याबाबत सविस्तर अहवाल सादर
करण्याबाबत.
संदर्भ : प्रकरण
क्रमांक........../ २०.....
महाशय,
तथापि, बंधपत्र निष्पादित
केल्यानंतर सामनेवाला याने दिनांक ...... रोजी .....येथे .......... असे कृत्य
करून पुन्हा शांततेचा भंग होण्यास कारणीभूत परिस्थिती निर्माण केल्याची माहिती
प्राप्त झाली आहे.
१. घटनेची तारीख, वेळ व
ठिकाण.
२. सामनेवालाने केलेल्या कृत्याचे नेमके स्वरूप.
३. सदर घटनेमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे.
४. घटनेमुळे प्रत्यक्ष शांततेचा भंग झाला काय किंवा त्याचे
स्वरूप काय होते?
५. घटनास्थळावरील साक्षीदारांचे जबाब.
६. उपलब्ध CCTV / ऑडिओ
/ व्हिडिओ पुरावे.
७. यापूर्वीच्या बंधपत्रातील अटींचा संदर्भ.
८. संबंधित घटनेबाबत दाखल गुन्ह्याची माहिती,
असल्यास.
९ सामनेवालाच्या कृत्यामुळे बंधपत्रातील शांतता राखण्याच्या
अटीचा भंग झाल्याबाबत उपलब्ध पुराव्यांचा तपशील.
सदर अहवालासोबत संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती सादर
कराव्यात.
तहसिलदार
तथा कार्यकारी दंडाधिकारी
w कलम १४१ की कलम १२६?
|
आधीचे बंधपत्र निष्पादित केले असून त्यातील शांतता राखण्याच्या अटीचा भंग झाला
आहे. |
कलम १४१(१)(ब) - बंधपत्राचा प्रत्यक्ष भंग |
|
केवळ नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली
आहे; परंतु आधीच्या बंधपत्राचा
भंग सिद्ध नाही. |
कलम १२६ अन्वये नवीन प्रतिबंधक कार्यवाही |
|
नवीन धमकी, जमाव किंवा अशांतताकारक कृत्यामुळे नवीन प्रतिबंधक परिस्थिती निर्माण झाली आहे |
कलम १२६ चा स्वतंत्र विचार |
|
बंधपत्राचा भंग सिद्ध झाला आणि स्वतंत्र
गुन्हाही घडला आहे |
कलम १४१(१)(ब) आणि स्वतंत्र फौजदारी
कार्यवाही |
|
कलम १३९ मध्ये बंधपत्रातील अटींचे स्वरूप
स्पष्ट केले आहे. चांगले वर्तन राखण्याच्या बंधपत्राच्या (कलम १२७,१२८, १२९) बाबतीत
कारावासपात्र गुन्हा करणे, करण्याचा
प्रयत्न करणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे हे उल्लंघन ठरते. तथापि, शांतता राखण्याच्या (कलम १२६) बंधपत्राच्या बाबतीत बंधपत्रातील नेमकी अट आणि तिचा भंग
सिद्ध करणे आवश्यक आहे. |
|
wअंतिम आदेशापूर्वी तपासण्याच्या बाबी:
∙ मूळ कलम १३६ चा (जामीन देण्याचा आदेश) आदेश अभिलेखावर आहे.
∙ सामनेवालाकडून बंधपत्र
प्रत्यक्ष निष्पादित झालेले आहे.
∙ बंधपत्राची मुदत अद्याप सुरू
आहे.
∙ कथित कृतीचा स्पष्ट तपशील उपलब्ध आहे.
∙ कृतीमुळे शांतता राखण्याच्या बंधनाचा प्रत्यक्ष भंग
झाल्याचे पुरावे आहेत.
∙ सामनेवाला यास अहवाल व पुराव्यांवर उत्तर देण्याची संधी
दिली आहे.
∙ सामनेवालाच्या बचावाचे परीक्षण केले आहे.
∙ उल्लंघन सिद्ध झाल्याची कारणे स्वतंत्रपणे नोंदवली आहेत.
∙ कारागृहात स्थानबद्धतेची उर्वरित मुदत निश्चित केली आहे.
या बाबींचा सखोल आणि समाधानकारक विचार केल्याशिवाय कलम
१४१(१)(ब) चा अंतिम आदेश पारित करू नये. केवळ शांतताभंगाची शक्यता आणि आधी
निष्पादित केलेल्या बंधपत्राचा सिद्ध झालेला भंग या दोन भिन्न कायदेशीर बाबी
आहेत.
∙ बंधपत्रातील “अन्य अटी” म्हणजे नेमक्या कोणत्या अटी आहेत,
हे तपासल्याशिवाय कलम १४१(१)(ब) लागू करता येणार नाही.
कलम १४१(१)(ब) हे विशेषतः कलम १३६ अन्वये दिलेल्या
आदेशानुसार शांतता राखण्यासाठी निष्पादित केलेल्या बंधपत्राचा भंग झाल्यास लागू
होते. त्यामुळे बंधपत्रातील अट ही शांतता राखण्याच्या मुख्य बंधनाशी संबंधित आहे
काय की ती केवळ प्रशासकीय/प्रक्रियात्मक स्वरूपाची आहे,
हे तपासणे निर्णायक ठरते.
उदाहरणार्थ, बंधपत्रात
पुन्हा भांडण न करणे, धमकी न देणे, मारामारी
न करणे किंवा सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे कृत्य न करणे अशी अट असल्यास तिचे
उल्लंघन कलम १४१(१)(ब) च्या चौकटीत येऊ शकते. मात्र, केवळ
कार्यालयात हजेरी लावण्याची अट, पत्ता कळविण्याची अट किंवा
अन्य प्रक्रियात्मक अट मोडली म्हणून त्याच कलमाखाली कारागृहात स्थानबद्धतेचा आदेश
देता येईल, असे गृहीत धरू नये.
∙ बंधपत्रातच “वाद घालणार नाही,
धमकी देणार नाही, मारहाण करणार नाही, शांततेचा भंग करणार नाही” अशी विशिष्ट अट असेल आणि तिचे उल्लंघन झाले असेल,
तर कलम १४१(१)(ब) विचारात घेता येईल.
बंधपत्रात केवळ “दर महिन्याला पोलीस ठाण्यात हजेरी लावणे”,
“पत्ता बदलल्यास कळविणे” किंवा तत्सम प्रक्रियात्मक अट असेल,
तर तिचे उल्लंघन म्हणजे शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंगच आहे असे
सरसकट म्हणता येणार नाही.
∙ इनाला मनोज विरुद्ध तेलंगणा राज्य (२५मे २०१७) या प्रकरणात फौ.प्र.सं. कलम १२२ (भा.ना.सु.सं कलम १४१) अन्वये
बंधपत्रभंगाच्या कार्यवाहीच्या संदर्भात केवळ गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव असणे आणि
बंधपत्राचा भंग सिद्ध होणे या भिन्न बाबी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रवीण विजयकुमार तावरे विरुद्ध विशेष कार्यकारी दंडाधिकारी, दिनांक १८
जून, २००९
बेंच: मा. न्यायमूर्ती श्री. बिलाल नाझकी आणि मा. न्यायमूर्ती श्री. एफ. एम. रेईस
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदींचा गैरवापर
आणि दुरुपयोग केला जात आहे, कधीकधी हेतुपुरस्सर, तर अनेकदा कायद्याच्या अज्ञानामुळे
नकळतपणे.
कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी २४ मार्च, २००८ रोजी पारित केलेल्या आदेशांवर
एक नजर टाकणे आवश्यक आहे. त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १११ (भा.ना.सु.सं.
कलम १३०) अन्वये एक आदेश पारित केला, त्यात दोन प्रकरणांचा
संदर्भ दिला आणि पुढे म्हटले, "मी याची खात्री केली आहे की भविष्यात प्रतिवादींच्या
(येथील याचिकाकर्त्यांच्या) वर्तनात कोणतीही सुधारणा होणार नाही".
पुढे ते म्हणतात, "म्हणून, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ११०(इ)(ग) नुसार तुमच्याविरुद्ध कारवाई करणे योग्य आहे, तर तुमच्याकडून
चांगल्या वर्तनासाठी १ वर्षाकरिता रु. १,००,०००/- च्या आर्थिक सुस्थिती प्रमाणपत्रासह
एक जामीनदार आणि या वादात सामील नसलेल्या दुसऱ्या म्हणजेच प्रतिवादी राहत असलेल्या
भागातून दोन जामीनदार का घेऊ नयेत? याची कारणे तोंडी किंवा लेखी द्यावीत. तुम्हाला
या कामासाठी ६ एप्रिल २००८ ही तारीख देण्यात आली आहे."
(१) प्रतिवादी राहत असलेल्या क्षेत्रातील
ऐपत प्रमाणपत्र असलेला एक जामीनदार.
(२) एक जामीनदार जो प्रतिवादी राहत असलेल्या
क्षेत्रातील जो या विवादात सामील नाही.
मग त्याच दिवशी त्यांनी याचिकाकर्त्यांना अंतरिम जामीनाबद्दल काही सांगायचे आहे का, असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर 'नाही'
असे नोंदवले गेले आणि त्यानंतर एक आदेश पारित करण्यात आला.
याचिकाकर्त्यांना बंधपत्र सादर करण्याविरोधात कारण दाखवण्याची संधी कोणत्याही
टप्प्यावर देण्यात आली नाही आणि त्यांना बंधपत्राची व्यवस्था करण्याची संधीही कोणत्याही
टप्प्यावर देण्यात आली नाही.
कलम ११६ नुसार चौकशी करणे आवश्यक आहे आणि जर त्या टप्प्यावर दंडाधिकाऱ्यांना असे
वाटले की चौकशी दरम्यान एखाद्या व्यक्तीला जामीन देण्यास सांगावे आणि त्याने जामीन
देण्यास नकार दिला तर चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या व्यक्तीला कोठडीत पाठवले जाऊ शकते
आणि फौजदारी प्रक्रिया संहितेअन्वये अंतिम आदेश पारित केला जाऊ शकतो.
माहितीच्या सत्यतेबाबत काही प्रकारची चौकशी केल्याशिवाय, एखाद्या व्यक्तीला
जामीन देण्याचे निर्देश देणे आणि तसे न केल्यास त्याला तुरुंगात पाठवणे, हे अंतरिम
टप्प्यावरसुद्धा करता येत नाही.
४३. आमच्या मते, कलमातील शब्द अगदी स्पष्ट आहेत. एम्प्रेस विरुद्ध बबुआ
, (१८८३) आयएलआर ६ अलाहाबाद १३२ या खटल्यात न्यायमूर्ती स्ट्रेट यांनी म्हटल्याप्रमाणे,
कलम ११२ अन्वये दिलेला आदेश हा ऐकीव माहितीवर
आधारित असतो, परंतु कलम ११७ अन्वये होणारी चौकशी ही आवश्यक
माहितीचे सत्यत्व पडताळण्यासाठी असते. पोट-कलम (१) मध्ये माहितीच्या सत्यत्वाविषयी तात्काळ चौकशीची तरतूद आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत, जर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असेल, तर अंतरिम जामीन मागितला
जाऊ शकतो आणि जामीन न दिल्यास त्या व्यक्तीला ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, जेव्हा
एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असतो आणि त्या व्यक्तीवर माहिती व संशयाच्या
आधारावर कारवाई केली जात असते, तेव्हा दंडाधिकाऱ्यांच्या अधिकारांचा कठोर अर्थ लावणे
आवश्यक आहे. तथ्ये निश्चित स्वरूपाची असली पाहिजेत.
(२) आम्हाला समजले
आहे की राज्यात एक पोलीस अकादमी आहे. सर्व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी एक जलद प्रशिक्षण
अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. शक्यतो सत्र
न्यायाधीशांना आमंत्रित करून या दंडाधिकाऱ्यांना कायद्यातील बारकावे शिकवावेत, जेणेकरून
कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून अधिकारांचा गैरवापर किंवा दुरुपयोग होणार नाही.
वरील निरीक्षणे आणि मार्गदर्शक तत्त्वांसह, दोन्ही रिट याचिका निकाली
काढण्यात येत आहेत.
या आदेशाची प्रत महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रधान सत्र न्यायाधीशांना
तसेच राज्य, कायदा व न्यायपालिका आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात यावी.
l
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला बंधपत्राचे उल्लंघन आणि कारावास - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !