आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

बेनामी व्यवहार

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

बेनामी व्यवहार

बेनामी व्यवहारांना प्रतिबंध करण्‍यासाठी पूर्वी "बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) कायदा १९८८" अस्‍तित्‍वात होता. या कायद्‍यात एकूण नऊ कलमांचा समावेश होता. या कायद्‍याची प्रभावी अंमलबजावणी व्‍हावी या हेतूने शासनाने त्यामध्ये सुधारणा करून नवीन कायदा "बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) सुधारित कायदा २०१६" दिनांक एक नोव्हेंबर २०१६ पासून अंमलात आणला आहे.

w बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) अधिनियम, १९८८ (The Prohibition of Benami Property Transactions Act, 1988 -PBPT Act)

∙ अधिनियम क्रमांक ४५/१९८८

∙ प्रशासकीय विभाग - केंद्र शासन – वित्त मंत्रालय, महसूल विभाग

∙ प्रमुख अंमलबजावणी- आयकर विभागातील अधिसूचित अधिकारी

 w बेनामी मालमत्ता म्हणजे काय ?

बेनामी मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता ज्याचे पैसे एक जण भरतो परंतु ती दुसऱ्याच्‍या नावे नोंदणीकृत  असते. ज्या व्यक्तीच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते त्याला 'बेनामदार' असे म्हणतात आणि त्या मालमत्तेला 'बेनामी मालमत्ता' म्हणतात. ज्या व्यक्तीने ती मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे खर्च केलेले असतात तो खरा या मालमत्तेचा मालक असतो आणि ज्याच्या नावे संपत्ती असते तो नामधारी मालक असतो. जो खरा मालक असतो तोच अशा संपत्तीचा वापर करत असतो अथवा त्या मालमत्तेवर मिळणारे उत्‍पन्‍न स्वतःकडे ठेवत असतो.

 w बेनामी व्यवहार म्हणजे काय?

उक्‍त कायद्‍याच्‍या कलम २(९) अन्‍वये, सामान्यतः खालील परिस्थितीत व्यवहार बेनामी ठरू शकतो.

∙ एखादी मालमत्ता एका व्यक्तीच्या नावावर खरेदी किंवा हस्तांतरित केलेली असते. त्या मालमत्तेची खरेदी करण्यासाठी मोबदला दुसऱ्या व्यक्तीने दिलेला असतो. मालमत्ता ज्याच्या नावावर आहे त्याऐवजी मोबदला देणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा भविष्यातील फायद्यासाठी मालमत्ता धारण केली जाते.

असा व्यवहार बेनामी असण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, व्यवहाराचे स्वरूप, पैशाचा स्रोत, पक्षकारांचा हेतू आणि कायद्यातील अपवाद तपासल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही.

 महसूल अधिकाऱ्यांच्या दृष्टीने या कायद्याचे विशेष महत्त्व आहे. कारण जमिनीचे खरेदीखत, सातबारा उतारा, फेरफार नोंद, प्रत्यक्ष ताबा, खरेदीसाठी दिलेला पैसा आणि मालमत्तेचा प्रत्यक्ष लाभ घेणारी व्यक्ती या बाबी बेनामी व्यवहाराच्या चौकशीत महत्त्वाच्या ठरू शकतात.

 सर्वप्रथम एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा, केवळ दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन खरेदी केली आहे म्हणून प्रत्येक व्यवहार बेनामी ठरत नाही. सदर कायद्याच्या कलम २ मधील व्याख्या आणि त्यातील अपवाद तपासणे आवश्यक आहे.

w बेनामी व्यवहाराचे प्रकार:

∙ कलम २(९) (ए) अन्‍वये, एका व्यक्तीच्या नावावर मालमत्ता; मोबदला दुसऱ्याने दिलेला आणि मालमत्ता मोबदला देणाऱ्याच्या फायद्यासाठी धारण केलेली

∙ कलम २(९) (बी) अन्‍वये, काल्पनिक नावाने केलेला व्यवहार.

∙ कलम २(९) (सी) अन्‍वये, मालमत्तेचा मालक असल्याची संबंधित व्यक्तीला जाणीव नसते किंवा ती मालकी नाकारते.

∙ कलम २(९) (डी) अन्‍वये, मोबदला देणारी व्यक्ती शोधता येत नाही किंवा ती काल्पनिक असते.

 w कलम २(९) मधील महत्त्वाचे अपवाद:

∙ हिंदू अविभक्त कुटुंब (HUF): कर्ता किंवा सदस्याच्या नावावर मालमत्ता असते, HUF च्या ज्ञात उत्पन्नातून मोबदला दिलेला असतो.

∙ विश्वस्त किंवा विश्वस्तीय संबंध: Fiduciary Capacity मध्ये दुसऱ्याच्या फायद्यासाठी मालमत्ता धारण करणे.

∙ पती किंवा पत्नी: व्यक्तीने स्वतःच्या ज्ञात उत्पन्नातून पती किंवा पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करणे.

∙ मुलाच्या नावावर मालमत्ता: व्यक्तीने स्वतःच्या ज्ञात उत्पन्नातून मुलाच्या नावावर मालमत्ता खरेदी करणे.

∙ भाऊ किंवा बहीण: खरेदी करणारी व्यक्ती व भाऊ/बहीण हे संबंधित दस्तऐवजात संयुक्त मालक असणे आणि मोबदला ज्ञात स्रोतांतून दिलेला असणे.

∙ सरळ वंशातील नातेवाईक: आई-वडील, आजी-आजोबा, मुलगा, मुलगी इत्यादींसोबत संयुक्त मालकी दस्तऐवजात नमूद असणे आणि मोबदला ज्ञात स्रोतांतून दिलेला असणे.

 w महत्‍वाचे:

∙ केवळ नातेवाईकाच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्याने अपवाद लागू होत नाही.

∙ संयुक्त मालकीची अट महत्त्वाची आहे.

∙ मोबदला देणाऱ्या व्यक्तीचे ज्ञात उत्पन्नाचे स्रोत सिद्ध होणे आवश्यक आहे.

∙ पती/पत्नी किंवा मुलाच्या नावावरील मालमत्तेसाठी संयुक्त मालकीची अट वरीलप्रमाणे नाही.

∙ मालमत्ता हस्‍तांतरण कायदा (Transfer of Property Act, 1882) कलम ५३-अ अंतर्गत विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या नोंदणीकृत व्यवहाराला अपवाद दिलेला आहे.

 w उक्‍त कायद्यातील महत्‍वाची कलमे:

∙ कलम ३ – बेनामी व्यवहारास प्रतिबंध: कोणत्याही व्यक्तीने बेनामी व्यवहार करू नये, अशी स्पष्ट मनाई आहे.

∙ कलम ४ – बेनामी मालमत्तेवरील हक्क वसूल करण्यास प्रतिबंध: मालमत्तेचा खरा मालक असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला बेनामीदाराविरुद्ध मालमत्तेवरील हक्क अंमलात आणण्यासाठी दावा किंवा कार्यवाही करता येत नाही. तसेच अशा हक्कावर आधारित बचावालाही प्रतिबंध आहे.

 ∙ कलम ५ – बेनामी मालमत्ता जप्तीस पात्र: बेनामी व्यवहाराचा विषय असलेली मालमत्ता केंद्र शासनाकडून जप्त केली जाऊ शकते.

∙ कलम ६ – मालमत्तेचे पुनर्हस्तांतरण करण्यास प्रतिबंध: बेनामीदाराने बेनामी मालमत्ता मूळ लाभार्थी किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीकडे पुन्हा हस्तांतरित करू नये. असे उल्लंघन करणारे हस्तांतरण शून्य (Null and Void) ठरते.

 ∙ कलम १८- सक्षम प्राधिकारी: या कायद्याखाली चार प्रमुख प्राधिकारी आहेत. साधारणतः संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती आयकर विभागाच्या अधिसूचनांनुसार होते.

aप्रारंभिक कार्यवाही अधिकारी- Initiating Officer: चौकशी, कारणे नोंदवून नोटीस व तात्पुरती जप्ती करू शकतात. Assistant Commissioner of Income Tax (ACIT) किंवा Deputy Commissioner of Income Tax (DCIT)

aमंजुरी प्राधिकारी- Approving Authority: आवश्यक पूर्वमंजुरी देतात. Additional Commissioner of Income Tax (Addl. CIT) किंवा Joint Commissioner of Income Tax (JCIT)

aप्रशासक -Administrator: जप्त मालमत्तेचे व्यवस्थापन करतात. Income Tax Officer (ITO)

aन्यायनिर्णायक प्राधिकारी -Adjudicating Authority: मालमत्ता बेनामी आहे किंवा नाही यावर न्यायनिर्णय करतात. केंद्र शासनाने नियुक्त केलेले अधिकारी.

 ∙ उक्‍त प्राधिकरणे ही कलम १८ अन्‍वये स्वतंत्र वैधानिक यंत्रणा आहे. तहसिलदार, मंडळ अधिकारी किंवा जिल्हाधिकारी हे केवळ महसूल पदावर असल्यामुळे या कायद्याखाली Initiating Officer किंवा Adjudicating Authority ठरत नाहीत.

 ∙ कलम २४ – नोटीस व मालमत्ता तात्पुरती जप्त करणे (Provisional Attachment): या अन्‍वये, प्रारंभिक कार्यवाही अधिकार्‍याकडे बेनामी व्यवहारासंबंधी काही ठोस माहिती असणे आवश्यक आहे.

संबंधित व्यक्ती बेनामीदार असल्याचा Reason to Believe असणे आवश्यक आहे,

संबंधित व्यक्तीला कारणे दाखवा नोटीस देण्यात येते. लाभार्थी व्यक्तीची ओळख ज्ञात असल्यास तिलाही नोटीसची प्रत देण्यात येते. संबंधित व्यक्तीला आपले म्हणणे व पुरावे सादर करण्याची संधी दिली जाते.

मालमत्ता विकली जाण्याची किंवा हस्तांतरित होण्याची शक्यता असल्यास मंजुरी प्राधिकारी यांची पूर्वमंजुरी घेऊन तात्पुरती जप्ती करता येते.  पुढील चौकशीनंतर प्रकरण न्यायनिर्णायक प्राधिकारीकडे पाठविले जाते.

कलम २४(२-अ) अन्‍वये नोटीस मिळाल्यानंतर स्पष्टीकरणासाठी मुदत नोटीसमध्ये नमूद केली जाते. ती प्रारंभिक कार्यवाही अधिकारी वाढवू शकतो; मात्र कायद्यातील कमाल मर्यादा संबंधित नोटीस ज्या महिन्यात काढली त्या महिन्याच्या अखेरपासून तीन महिन्यांपर्यंत आहे.

कलम २४(३) अन्‍वये तात्पुरती जप्ती चार महिन्यांपेक्षा जास्त नसलेल्या कालावधीसाठी करता येते.

कलम २४(४) अन्‍वये पुढील आदेशासाठीही चार महिन्यांची वैधानिक मर्यादा आहे.

कलम २४(५) अन्‍वये प्रकरणाचा संदर्भ न्यायनिर्णायक प्राधिकारीकडे पाठविण्याची मुदत आदेश ज्या महिन्यात झाला त्या महिन्याच्या समाप्तीपासून एक महिना आहे.

या कालमर्यादांमध्ये न्यायालयीन स्थगितीचा कालावधी व कायद्यातील इतर अपवाद विचारात घ्यावे लागतात.

 ∙ कलम २५– नोटीस बजावणे

कलम २५ अन्‍वये नोटीस बजावण्याची पद्धत नमूद आहे. दिवाणी प्रक्रिया संहिता (CPC) अन्‍वये  न्यायालयीन समन्स बजावण्याच्या पद्धतीप्रमाणे किंवा टपालाद्वारे नोटीस बजावता येते.

 ∙ कलम २६ – न्यायनिर्णायक प्राधिकारी मार्फत न्यायनिर्णय

संबंधित प्राधिकरण, बेनामीदार, लाभार्थी मालक (Beneficial Owner), बँक किंवा अन्य हितसंबंधित व्यक्ती आणि मालमत्तेवर दावा करणारी व्यक्ती यांना नोटीस देते, संबंधित व्यक्तींचे म्हणणे, पुरावे आणि कागदपत्रे तपासून निर्णय देते.

कलम २६(३) अन्‍वये, मालमत्ता बेनामी नाही, असा निष्कर्ष देऊन जप्तीचा आदेश रद्द करणे किंवा मालमत्ता बेनामी आहे, असा निष्कर्ष देऊन जप्तीचा आदेश कायम करणे अशा दोन प्रकारचे आदेश देऊ शकतात:

कलम २६(७) अन्‍वये संदर्भ प्राप्त झालेल्या महिन्याच्या अखेरपासून एका वर्षाच्या आत निर्णय देणे अपेक्षित आहे. न्यायालयीन स्थगितीच्या कालावधीबाबत कायद्यात स्वतंत्र तरतूद आहे.

 ∙ कलम २७ – मालमत्तेची कायमस्वरूपी जप्ती (Confiscation)

न्यायनिर्णायक प्राधिकारी यांनी कलम २६(३) अन्वये मालमत्ता बेनामी असल्याचा निर्णय दिल्यानंतर कलम २७ नुसार संबंधित व्यक्तीस सुनावणीची संधी देऊन मालमत्ता केंद्र शासनाकडे जप्त करण्याचा आदेश देण्यात येऊ शकतो. त्‍याचा परिणाम म्‍हणून संबंधित मालमत्तेवरील खाजगी हक्क संपुष्टात येण्याची वैधानिक प्रक्रिया सुरू होते आणि मालमत्ता केंद्र शासनाकडे निहित होते.

मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकाची भूमिका महत्त्वाची असते.

मालमत्तेचा ताबा घेण्याची तरतूद कलम २९ अन्‍वये आहे.

 कलम २४ मधील Provisional Attachment आणि कलम २७ मधील Confiscation या दोन स्वतंत्र टप्प्यांच्या कार्यवाही आहेत. केवळ तात्पुरती जप्ती म्हणजे मालमत्तेचे अंतिम सरकारी जप्तीकरण नव्हे.

 ∙ कलम ५३-शिक्षेच्या तरतुदी: बेनामी व्यवहारासाठी शिक्षा-

या कलमान्‍वये, कायद्याच्या तरतुदी निष्प्रभ करण्यासाठी, वैधानिक देणी टाळण्यासाठी किंवा कर्जदारांना पैसे देणे टाळण्यासाठी बेनामी व्यवहार केला असल्यास, लाभार्थी मालक (Beneficial Owner),

ज्याच्या नावावर मालमत्ता आहे ता (Benamidar), व्यवहार करण्यास मदत करणारी किंवा प्रवृत्त करणारी व्यक्ती या दोषी ठरू शकतात.

याअन्‍वये किमान शिक्षा १ वर्ष कारावास तर कमाल शिक्षा ७ वर्षे कारावास अशी आहे आणि  मालमत्तेच्या चालू बाजारभावाच्‍या कमाल २५% दंडाची तरतूद आहे.

 ∙ कलम ५४ – खोटी माहिती देणे: या कायद्यान्‍वये माहिती देण्याची जबाबदारी असताना जाणूनबुजून खोटी माहिती देणे किंवा खोटे दस्तऐवज सादर करणे यासाठी किमान ६ महिने कारावास तर कमाल ५ वर्षे कारावास तसेच मालमत्तेच्या चालू बाजारभावाच्‍या कमाल १०% दंड अशी तरतूद आहे.

 ∙ कलम ६१ – गुन्हे अदखलपात्र: या कायद्‍यान्‍वये दाखल होणारे गुन्हे अदखलपात्र (non-cognizable) आहेत.

 w अपील:

∙ कलम ४५ अन्‍वये, या कायद्याखाली सक्षम प्राधिकरणास निर्णय देण्याचा अधिकार असलेल्या विषयात दिवाणी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रावर प्रतिबंध आहे.

 ∙ कलम ४६ अन्‍वये, न्यायनिर्णायक प्राधिकारी (Adjudicating Authority) यांच्या आदेशाविरुद्ध अपील न्यायाधिकरण (Appellate Tribunal) कडे ४५ दिवसाच्‍या मुदतीत अपील दाखल करता येते.

कलम ४६(२) अन्‍वये पुरेसे कारण असल्यास विलंब माफ करण्याचा अधिकार आहे.

अपील न्यायाधिकरणाला पुरावे तपासणे, अतिरिक्त पुरावे मागवणे आणि आदेश कायम ठेवणे, बदलणे किंवा रद्द करण्याचे अधिकार आहेत.

 ∙ कलम ४९ अन्‍वये, अपील न्यायाधिकरण (Appellate Tribunal) च्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात, ६० दिवसाच्‍या मुदतीत दाद मागता येते. कलम ४९(२) अन्‍वये, पुरेसे कारण असल्यास विलंब माफ होऊ शकतो. उच्च न्यायालयात अपील हे कायद्याच्या प्रश्नावर (Question of Law) करता येते.

b›b

 

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला बेनामी व्यवहार. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.