देवस्थान
इनाम - वर्ग ३
व्याख्या:
• 'इनाम' म्हणजे जमीन महसूल वसूल करण्याचा राज्य सरकारचा हक्क,
पूर्णत: किंवा अंशत:, अन्य व्यक्तीकडे स्वाधीन केलेला असणे.
• 'इनामदार' म्हणजे असा पूर्णत: किंवा अंशत: जमीन महसूल वसूल करण्याचा
हक्क प्राप्त झालेल्या व्यक्तीला इनामदार म्हणतात.
• 'जुडी' म्हणजे इनामदाराकडून वसूल केलेल्या जमीन महसूलापैकी जो
भाग सरकार जमा केला जातो त्या भागाला जुडी म्हणतात.
• 'नुकसान' म्हणजे इनामदाराकडून वसूल केलेल्या जमीन महसूलापैकी जो
भाग इनामदार स्वत:कडे ठेवतो त्या भागाला नुकसान म्हणतात.
• पूर्वीच्या काळात काही जमीनी मंदिर/मशिदीसाठी बक्षीस म्हणून दिल्या
गेल्या आहेत. देवस्थानाचे दोन प्रकार आहेत.
(१) सरकारी देवस्थान: यांची नोंद गाव नमुना
नं. ३ मध्ये असते.
(२) खाजगी देवस्थान: यांचा महसूल दप्तराशी संबंध
नसल्याने त्यांची नोंद गाव नमुना नं. ३ मध्ये नसते.
P देवस्थान इनाम
हे वर्ग ३ चे इनाम म्हणून गाव दप्तरी दाखल असते. अशा जमीनीतून येणार्या उत्पन्नातून,
संबंधित मंदिर/मशिदीसाठी पुजा, दिवाबत्ती, साफसफाई, उत्सव यांचा खर्च भागवला
जातो. या जमीनी देवाच्या नावे दिलेल्या असतात त्यामुळे यांच्या सात-बारा सदरी
कब्जेदार म्हणून देवाचे नाव असते.
P इनाम जमीनींची
नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ७५ अन्वये जिल्हा
किंवा तालुका रजिस्टरला ठेवली जाते, या रजिस्टरला "ॲलिनेशन रजिस्टर" असे म्हणतात. यावरुन गाव
नमुना नं. ३ ची पडताळणी करता येते.
P देवस्थान इनाम
जमीनीचे हस्तांतरण, विक्री किंवा वाटप करता येत नाही. असे झाल्यास अशी जमीन
सरकार जमा केली जाऊ शकते. असा अनधिकृत प्रकार तलाठी यांना आढळल्यास त्यांनी तात्काळ
तहसिलदारला कळवावे.
P अत्यंत अपवादात्मक
परिस्थितीत शासनाची पूर्व परवानगी आणि धर्मदाय आयुक्तांच्या मान्यतेने असे हस्तांतरण
किंवा विक्री करता येते.
P देवस्थान इनाम जमीनीत
कुळाचे नाव दाखल होऊ शकते परंतू जर देवस्थानच्या ट्रस्टने कुळ वहिवाट अधिनियम
कलम ८८ ची सुट घेतली असेल तर अशा कुळास कुळ वहिवाट अधिनियम ३२ ग प्रमाणे जमीन विकत
घेण्याचा अधिकार नसतो.
P देवस्थान इनाम
जमीनीच्या सात-बारा सदरी भोगवटादार (मालक) म्हणून देवाचे/देवस्थानचे नाव
लिहावे. त्याखाली रेष ओढून वहिवाटदार/व्यवस्थापकाचे नाव लिहिण्याची प्रथा आहे.
परंतू या प्रथेमुळे कालांतराने, सात-बारा पुनर्लेखन करतांना, चुकून देवाचे नाव
लिहिणे राहून जाते किंवा मुद्दाम लिहिले जात नाही. त्यामुळे पुढे अनेक वाद
निर्माण होतात. त्यामुळे सात-बारा सदरी भोगवटादार (मालक) म्हणून देवाचे/देवस्थानचे
नाव लिहावे, त्याखाली व्यवस्थापक असे लिहून वहिवाटदार/व्यवस्थापकाचे नाव इतर
हक्कात ठेवावे.
P पिक पहाणीत वहिवाट
'खुद्द ........ (वहिवाटदार/व्यवस्थापकाचे नाव) यांचे मार्फत' अशी लिहावी.
P देवस्थान इनाम
जमीनीच्या सात-बारा सदरी पुजारी, महंत, मठाधिपती, ट्रस्टी, मुतावली, काझी यांची
नावे कुळ म्हणून दाखल करु नये. नाहीतर ते लोक ताब्यासाठी न्यायालयात खटला दाखल
करु शकतात.
P देवस्थान इनाम
जमीनीला वारस लावले जाऊ शकतात. जन्माने वारस ठरण्या ऐवजी मयतानंतर प्रत्यक्ष
पुजाअर्चा करणारा वारस ठरतो. म्हणजेच पदामुळे मिळणारा उत्तराधिकार हे तत्व येथे
लागू होते. एखाद्या मयत पुजार्याला चार मुले वारस असतील तर पुजाअर्चा व
वहिवाटीसाठी पाळी पध्दत ठरवून द्यावी असे अनेक न्यायालयीन निर्णयात म्हटले
आहे. मठाचा प्रमुख/पुजारी, अविवाहीत असला किंवा त्याला वारस नसल्यास तो त्याच्या
मृत्यूआधी शिष्य निवडून त्याला उत्तराधिकार देऊन जातो. परंतू देवस्थान जमीनीचे
वारसांमध्ये वाटप होत नाही तसेच एका कुटुंबाकडून दुसर्या कुटुंबाकडे हस्तांतरण
होत नाही.
P देवस्थान इनाम
जमीनीच्याबाबत तलाठींनी सदैव दक्ष असावे. याची पिक पहाणी समक्ष हजर राहूनच करावी.
P देवस्थान इनाम
अथवा अनुदान आणि धर्मादाय इनाम ही इनामवर्ग 3 मध्ये समाविष्ट होतात. यांना दिल्या
जाणार्या शासकीय अनुदानाचा एकमेव उद्देश, धार्मिक संस्थांना साहाय्य करणे हा
असतो. प्राचिन काळी राजे लोक देवळे, मठ, धर्मशाळा, मशिदी, इत्यादी
संस्थांना मदत करण्यासाठी मदत करत असत. अशा देवस्थान इनामाच्या सनदा देण्यात आल्या
व त्यावरील हस्तांतराला कायमस्वरूपी मनाई करण्यात आली.
P देवस्थान जमिनीची
पेरणी/ नफा आळीपाळीने घेता येत असला तरीही जमिनीची विभागणी कोणत्याही परिस्थितीत
करता येत नाही. परंतु काही ठराविक परिस्थितीत मिळकतीचा फायदा होणार असेल किंवा
कायदेशीर आवश्यकता असेल तर साधारणतः देवस्थान जमिनीचे हस्तांतरण स्वीकारले जात
होते. मात्र नियम म्हणून ही इनाम वारसा हक्काने हस्तांतरित होत नाहीत किंवा
विभागणीही होत नाही. मात्र या जमिनींचा भोगवटा, पीक पाहणी/ व्यवस्थापन वारसा
हक्काने होऊ शकते.
P सदर देवस्थान इनाम
जमिनी देताना सनदेत संबंधित संस्थेला जमीन मालमत्ता दिल्याचे जोपर्यंत स्पष्ट नमूद
केलेले नसेल तोपर्यंत धार्मिक इनामे ही जमीन महसूल अनुदाने आहेत असेच कायदा समजतो.
याचाच अर्थ देवस्थान वर्ग-३ इनामे ही हस्तांतरणीय नाहीत. या इनामाच्या जमिनी विकता
येत नाहीत. याचाच अर्थ इनाम जमिनीतील कुळांना मुंबई कुळकायदा व शेतजमीन कायदा
प्रमाणे जमीन विकण्याचा अधिकारी प्राप्त होत नाही. मात्र त्यांचा कुळ हक्क या
जमिनीवर वंशपरंपरागत राहतो. त्यांना त्या जमिनी विकता येत नाही किंवा गहाण ठेवता
येत नाही. तसेच कुळांना या जमिनी विकत घेण्याचा हक्क प्राप्त होत नाही. मात्र
वहिवाटधारकांचा हक्क वारसाहक्काने कायम राहतो. मात्र या जमिनी वारसाहक्कानेच धारण
केल्या पाहिजेत असे नाही. या जमिनी वहिवाटीचा हक्क लिलावाने देऊनही त्या
कालावधीसाठी प्राप्त होऊ शकतात. वहिवाटदार वारस असो किंवा नसो त्यास ही जमीन धारण
करता येते. म्हणजेच देवस्थान इनाम जमीन वहिवाटदाराव्यतिरिक्त इतर कोणाचे नावे नावे
होणार नाही. यात मालक म्हणून देवस्थान व वहिवाटदाराचे नाव वहिवाटदार म्हणून स्पष्ट
लिहिले जाईल.
b|b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला देवस्थान इनाम - वर्ग ३. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !