आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!

"महसूल प्रश्‍नोत्तरे" 26 to 50

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

"महसूल प्रश्‍नोत्तरे" 26 to 50


· प्रश्‍न २६: गाव नमुना सहा-ड (नवीन उपभाग (पोट हिस्‍से) नोंदवही) मध्‍ये केवळ वाटण्‍या झाल्‍यामुळे होणारे भूमापन क्रमांकातील नवीन हिस्‍स्‍यांचाच समावेश होतो हे म्‍हणणे योग्‍य आहे काय?  
F उत्तर: नाही, गाव नमुना सहा-ड नवीन उपभाग (पोट हिस्‍से) नोंदवही मध्‍ये केवळ वाटण्‍या झाल्‍यामुळे होणारे भूमापन क्रमांकातील नवीन हिस्‍स्‍यांचाच समावेश होत नाही तर संपादन, एकत्रीकरण, मळईची जमीन, पाण्‍याने वाहून गेलेली जमीन, अकृषिक जमीन यांसारख्‍या अनेक कारणांमुळे सीमांमध्‍ये होणारे सर्व बदलसुध्‍दा दर्शवले जातात. यासाठी तलाठी यांनी असे पोटहिस्‍से झालेल्‍या जागेला प्रत्‍यक्ष भेट देणे आणि झालेले बदल नोंदविणे आवश्‍यक असते. या बदलांप्रमाणे मोजणी करुन नवीन सीमाचिन्‍हे व हद्‍दी भूमी अभिलेख विभागामार्फत निश्‍चित करण्‍यात येतात.

· प्रश्‍न २७: भोगवटादार-१ प्रकारच्‍या जमिनी म्‍हणजे काय?
F उत्तर: भोगवटादार वर्ग १ ची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २९(२) मध्‍ये नमूद आहे. ज्‍या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्‍वत: असतो अशा जमिनीस भोगवटादार-१ ची जमीन म्‍हणतात. अशा जमिनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्‍याही परवानगीची आवश्‍यकता नसते. अशा शेतजमिनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीनही म्‍हणतात.

· प्रश्‍न २८: भोगवटादार-२ प्रकारच्‍या जमिनी म्‍हणजे काय?
F उत्तर: भोगवटादार वर्ग २ ची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम कलम २९(३) मध्‍ये नमूद आहे. ज्‍या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्‍वत: नसतो, ज्‍या जमिनीचे हस्‍तांतरण करण्‍याच्‍या हक्‍कावर शासनाचे निर्बंध असतात तसेच ज्‍या जमिनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर काही बंधने/अटी असतात आणि त्‍यासाठी सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगी आणि काही शासकीय सोपस्‍कार पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता असते. अशा शेत जमिनीला भोगवटादार २ च्‍या अथवा दुमाला किंवा नियंत्रीत सत्ता प्रकारची, शर्तीची जमीन असे म्‍हणतात. भोगवटादार २ ची नोंद गाव नमुना क्रमांक एक-क मध्‍येही केली जाते.

· प्रश्‍न २९: शासकीय पट्‍टेदार म्‍हणजे कोण?
F उत्तर: शासकीय पट्‍टेदारची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २(११) मध्‍ये नमूद आहे. ज्‍या शेतकर्‍यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्‍यासाठी भाडेतत्‍वावर जमीन देण्‍यात आली आहे अशा शेतकर्‍यास शासकीय पट्‍टेदार म्‍हणतात.  

· प्रश्‍न ३०: 'पोटखराब' क्षेत्र म्‍हणजे काय आणि त्‍याचे किती प्रकार आहेत?
F उत्तर: 'पोट-खराब' क्षेत्राबाबत कायदेशीर तरतुद "महाराष्‍ट्र जमीन महसूल (जमिनीच्‍या वापरावरील निर्बंध) नियम १९६८, कलम २ अन्‍वये" आहे.
'पोटखराब' क्षेत्र म्‍हणजे खडकाळ, खंदक, खाणी, नाले, इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र ज्‍यात पिक लागवड करता येणे शक्‍य होत नाही असे लागवडीयोग्‍य नसलेले क्षेत्र.
या 'पोटखराब' क्षेत्राचे ''पोटखराब' वर्ग अ' आणि ''पोटखराब' वर्ग ब' असे दोन प्रकार आहेत.  
ñ 'पोटखराब-वर्ग अ' म्‍हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र.
वर्ग अ अंतर्गत येणार्‍या पोटखराब क्षेत्रावर महसूलाची आकारणी करण्‍यात येत नाही. जरी अशी जमीन शेतकर्‍याने कोणत्याही लागवडीखाली आणली तरीही अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या क्षेत्राची आकारणी करायची असेल तेव्‍हा त्‍याबाबतचा प्रस्‍ताव तहसिलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या क्षेत्रावर आकारणी करता येते. तथापि, 'पोटखराब-वर्ग अ' क्षेत्राखाली येणार्‍या जमिनीत जर शेतकर्‍याने काही पीके घेतली असतील तर पीक पाहणीच्‍या वेळेस अशा पीकांची नोंद घेता येते.
ñ 'पोटखराब वर्ग ब' म्‍हणजे रस्‍ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव अशा सार्वजनिक प्रयोजनार्थ किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरणेत येणारे तलाव किवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती-जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्‍याची टाकी, रहिवास वापर अशा काही विशिष्‍ठ प्रयोजनार्थ राखून ठेवलेली,  आणि त्‍यामुळे लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेले क्षेत्र. 'पोट-खराब' वर्ग 'ब' क्षेत्रावर लागवड करण्‍यास 'महाराष्‍ट्र जमीन महसूल (जमिनीच्‍या वापरावरील निर्बंध) नियम १९६८' कलम २(३) च्‍य’ उपबंधानूसार म.ज.म.अ. १९६६, कलम ४३ अन्‍वये प्रतिबंध करण्‍यात आलेला आहे.
'पोटखराब वर्ग ब' क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्‍यात येत नाही.
'पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' याची क्षेत्र पडताळणी जिल्‍हा भूमापन कार्यालयातील माहीतीशी तसेच उपलब्‍ध अभिलेखातील लागवडीयोग्‍य नसलेल्‍या (गाव नमुना एकचा गोषवारा) क्षेत्राशी करावी.
पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' चे क्षेत्र स्‍वतंत्रपणे लिहून त्‍याखाली एकूण पोटखराब क्षेत्र लिहीले जाते.

· प्रश्‍न ३१: कोणकोणत्‍या शेतजमिनींना जमीन महसुलात सूट दिलेली असते?
F उत्तर: ज्‍या गावाची पैसेवारी पन्‍नास पैश्‍यापेक्षा कमी असते तेथील जिरायत शेत जमिनींवरील शेतसारा माफ असतो परंतू स्‍थानिक उपकर अदा करावे लागतात. 
महसूल व वन विभाग, अधिसूचना क्र. आर.ई.व्‍ही. १०७७-१६४४७-ल-२ दिनांक- २९/१२/१९७७ आणि आर. ई.व्‍ही. १०७८-३३३३८-ल-२ दिनांक- ०८/०५/१९७९ अन्‍वये खालील खातेदारांना जमीन महसुलात सूट देण्‍यात आली आहे.
ñ ज्‍या खातेदारांचे संपूर्ण राज्‍यातील एकूण जिरायत (कोरडवाहू) जमीन धारण क्षेत्र ३ हेक्‍टर पेक्षा जास्‍त नाही आणि त्‍यांच्‍या कोणत्‍याही जमिनीचा, कोणताही भाग, कोणत्‍याही प्रकारे, सिंचनाखाली येत नाही. अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसूलीतुन सूट दिलेली आहे परंतु त्‍यांना जि.प. तसेच ग्रा. प. हे स्‍थानिक उपकर माफ नाहीत.
ñ ज्‍या खातेदारांच्‍या संपूर्ण राज्‍यातील एकूण शेत जमीन धारणेवर वार्षिक जमीन महसुलाची आकारणी रुपये ५/- पर्यंत आहे अशा खातेदारांना जमीन महसूल तसेच जि.प. आणि ग्रा. प. या स्‍थानिक उपकरांच्‍या वसूलीतून सूट दिलेली आहे.
ñ ज्‍या खातेदारांच्‍या संपूर्ण राज्‍यातील एकूण शेत जमीन धारणेवर वार्षिक जमीन महसुलाची आकारणी रुपये ५/- ते रुपये १०/- दरम्‍यान आहे तसेच त्‍यांच्‍या कोणत्‍याही जमिनीचा, कोणताही भाग, कोणत्‍याही प्रकारे, सिंचनाखाली येत नाही अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसूलीतून सूट दिलेली आहे परंतु जि.प. तसेच ग्रा. प. हे स्‍थानिक उपकर माफ नाहीत.

· प्रश्‍न ३२: पीक पहाणी कशी करावी?
F उत्तर: शेतात पिकणारे पीक आणि देशाची अर्थव्‍यवस्‍था यांचा जवळचा संबंध आहे. शेती उत्‍पादन आणि अर्थव्‍यवस्‍था यांचा परस्परसंबंध प्रस्‍थापित करण्‍यासाठी शेती पासून मिळणार्‍या उत्‍पन्‍नाचा योग्य अभ्यास आणि विश्लेषण असणे आवश्यक आहे. यासाठी विविध पिकांखाली असलेल्‍या जमिनीचे अचूक क्षेत्र, घेण्‍यात आलेल्‍या पिकांचे विविध प्रकार याची योग्‍य, खरी अणि अचूक नोंद असणे अत्‍यावश्‍यक आहे. त्‍यासाठी गाव नमुना नंबर १२ अचूक असणे महत्‍वाचे आहे आणि हे काम फक्‍त आणि फक्‍त तलाठीच करु शकतात. येथे लक्षात घ्‍यावे की देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेतही तलाठी किती महत्‍वाची भूमिका बजावतो.
पीक पाहणी समजन घेण्‍यापूर्वी जमीन कसणेयाबाबतची कळ कायद्यातील व्याख्‍या लक्षात घ्यावी. 
महाराष्ट्र कळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम २ (६) मध्येव्यक्ति: जमीन कसणेयाचा अर्थ ‘‘स्वत:साठी (एक) स्वत:च्या महेनतीने, अथवा (दोन) स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या कष्टाने अथवा (तीन) स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली, मजुरीने कामावर लावलेल्या मजुरांकडून, त्यांना रोख रक्कम अथवा वस्तूंच्या रूपात वेतन/मोबदला देऊन, परंतू पिकाच्या हिश्श्याच्या स्वरूपात नव्हे, जमीन कसून घेणे’’ असा आहे. याला अपवाद म्‍हणजे विधवा स्त्रीअवयस्क किंवा शारीरिक अथवा मानसिक दौर्बल्य जडलेला इसमसशस्त्रफौजेत नोकरीत असणारा इसम हे नोकरांमार्फतमजुरांमार्फत शेत कसून घेत असले तरीही ते स्वत:च जमीन कसतात असे कायद्‍याने मानले जाते. याचाच अर्थ अधिकृत अधिकाराशिवाय कोणालाही कोणाचीही जमीन वहिवाटता येणार नाही.
महाराष्‍ट्र जमीन महसूल नियम पुस्‍तिका- खंड ४ मधील प्रकरण दोन, परिच्‍छेद ४ आणि ५ मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे पीक पाहणीच काम वर्षात दोन वेळा करायची असतात.
१. खरीप हंगामात (०१ ऑगस्‍ट ते १५ ऑक्‍टोबर)
२. रब्‍बी हंगामात (१५ नोव्‍हेंबर ते ३१ जानेवारी)
तथापि, सध्‍या संकरीत बियाणे लागवड पध्‍दतीमुळे कापणी लवकर केली जात असल्यामुळे. खरीप हंगामात पीक पाहणी हंगामातील सप्टेंबर पर्यंत तर रब्बी पाहणी ३१ डिसेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे.
काही ठिकाणी उन्‍हाळी भुईमुग, उन्‍हाळी कांदा इत्‍यादी पिकांची लागवड जानेवारी/फेब्रुवारी महिन्‍यात केली जाते. त्‍यांचीही पीक पाहणी होणे आवश्‍यक आहे.  
æ महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३० (१) नुसार, जेव्‍हा पिके  शेतात उभी असतील त्‍याच काळात तलाठी यांनी व्‍यक्‍तीश: शेतावर जाऊनच पीक पाहणी करणे आवश्‍यक आहे.
æ महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३० (२) नुसार, तलाठी यांनी पीक पाहणीसाठी जाण्‍यापूर्वी संबंधीत शेत मालक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य आणि गावकरी यांना पीक पाहणीच्‍या वेळेस हजर रहाण्‍याची सूचना/नोटीस लेखी स्‍वरूपात, किमान सात दिवस आधी दिनांक व वेळ दवंडीने अथवा समुचित पध्‍दतीने कळवली पाहीजे. तशी नोंद दवंडी रजिस्‍टरला घ्‍यावी.
æ महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३० (३) नुसार, ठरवलेल्‍या दिनांक आणि वेळेवर, उपस्‍थित लोकांसह तलाठी यांनी पीक पाहणी करावी आणि त्‍याची नोंद नमुना ११ ला घ्‍यावी. 
æ पीक पाहणी करतांना तलाठी यांनी जे पीक खरोखरच शेतात उगवले गेले आहे त्‍याची आणि जितक्‍या क्षेत्रावर ते पीक उगवले गेले आहे त्‍या क्षेत्राची अचूक नोंद घेणे आवश्‍यक आहे. आजकाल संगणीकरण आणि माहितीचा अधिकार यामुळे तलाठी यांनी याबाबत दक्ष रहाणे आवश्‍यकच आहे. चुकीच्‍या नोंदीचा खुलासा देण्‍याची वेळ न आणणे कधीही चांगले.
æ पीक पाहणी करतांना तलाठी यांनी शेतात उभ्‍या पिकासह, त्‍या जमीनीतील कुळ हक्‍क, वहिवाटदार, सीमा चिन्‍हे, मिश्र पिके, झाडे, फळझाडे, दुबार पिके, जल सिंचनाची साधने नवीन विहीर, बोअरवेल त्‍यादींची तपासावी करावी व दप्‍तरातील नोंदी अद्‍ययावत कराव्‍या. शेत जमिनीत असणारी फळझाडे, वन झाडे, विहीर, घरपड इत्‍यादी नोंदी पीकपहाणीच्‍या वेळीच अद्‍ययावत कराव्‍यात आणि त्‍यांची नोंद गाव नमुना १२ च्‍या शेरा सदरी घ्‍यावी.
æ अनेकदा तलाठी मागील वर्षीच्या पीक पाहणीची खात्री न करता, चालू वर्षीही मागील प्रमाणेच पीक पहाणी लिहितात. कधी कधी तो वहिवाटदार मयत असतो परंतू त्याची नोंद गाव दप्तरी झालेली नसते. त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत मयताचे नाव दरवर्षी या सदरी तसेच लिहिले जाते. अशा प्रकारांबाबत दक्ष रहावे.
æ पीक पाहणी करतांना काही ठिकाणी असे निदर्शनास येते की, अनेक शेतकरी त्यांचे क्षेत्र वहिवाटतांना, पिके घेतांना, रस्ता तयार करतांना हद्दीच्या निशाणीचे नुकसान करतात, हद्दीच्या निशाणीचे दगड, खुणा, निशाण्या जाणून-बुजून नाहीशा करतात किंवा बुजवन टाकतात. जर कोणाही शेतकर्‍याने त्याचे क्षेत्र वहिवाटतांना, पिके घेतांना, रस्ता तयार करतांना हद्दीच्या निशाणीचे नुकसान केल्याचे, निशाणीचे दगड, खुणा, निशाण्या जाणून-बुजून नाहीशा केल्याचे  किंवा बुजवून टाकल्याचे आढळल्यास त्याचे विरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४०/१४५ अन्वये कारवाई करण्यात यावी.
æ महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३०(४) नुसार, तलाठी यांनी पीक पाहणी केल्‍यानंतर, जमेल तितक्‍या लवकर, मंडलअधिकारी किंवा त्‍याच्‍या दर्जापेक्षा कमी नाही असा अधिकारी त्‍या गावाला, पूर्व सूचना देऊन भेट देईल आणि तलाठी यांनी केलेल्‍या पीक पाहणीची पडताळणी करेल. पीक पाहणीतील ज्‍या नोंदी चुकीच्‍या आढळतील त्‍यात तलाठी यांच्‍याकडून दुरूस्‍ती करवून घेईल.
æ तलाठी व मंडलअधिकारी यांनी वरील प्रमाणे पीक पाहणी संपविल्‍यानंतर गाव नमुना नंबर ११ मध्‍ये सर्व पिकांची नोंद घेऊन तो अद्‍ययावत करावा आणि अद्‍ययावत गाव नमुना नंबर ११ तहसीलदारकडे ३१ मे पूर्वी सादर करावा.
æ शेतजमीन जर नगरपंचायत/नगरपालिका/मनपा वगैरे शहरी भागात असेल तरीही अशाच प्रकारे पीक पहाणी करता येते.  

· प्रश्‍न ३३: पिक पाहणी शेतजमीन कब्ज्यात असल्याचे मानण्यात येणार्‍या व्यक्ती व्यतिरिक्त इतर इसमाचा सदर शेतजमिनीवर कब्जा/वहिवाट असल्‍याचे तलाठी यांना निदर्शनास आल्‍यास काय कार्यवाही करावी?
F उत्तर: उपरोक्‍त बाब निदर्शनास आल्‍यास, तलाठी यांनी गाव नमुना सात-ब मध्ये या गोष्‍टीची पेन्सिलने नोंद घ्‍यावी आणि त्‍या शेतजमिनीबाबत नमुना १४ चा फॉर्म भरून शक्य असेल तितक्या लवकर (कमाल दहा दिवसांत) तहसिलदारकडे पाठववा. शेतजमीन मालकाशिवाय दुसर्‍या व्यक्तीचे नाव सात-बारावर पिक पाहणी सदरी थेट लावण्याचे अधिकार तलाठी यांना नाहीत. शेतजमीन मालकाच्या एकत्र कुटुंबातील अन्य सदस्य शेत जमिनीत वहिवाट करीत असतील तर नमुना १४ चा फॉर्म भरू नये.

· प्रश्‍न ३४: पिक पाहणी करतांना प्रमुख्‍याने काय चुका होतात?
F उत्तर: महाराष्‍ट्र जमीन महसूल नियम पुस्‍तिका- खंड ४ मधील प्रकरण दोन, परिच्‍छेद ४ आणि ५ मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे पीक पाहणीच काम वर्षात दोन वेळा करायची असतात.
१. खरीप हंगामात (०१ ऑगस्‍ट ते १५ ऑक्‍टोबर) २. रब्‍बी हंगामात (१५ नोव्‍हेंबर ते ३१ जानेवारी)
æ पिके जेव्‍हा शेतात उभी असतात त्‍या काळात पिक पाहणी न करता नंतर तोंडी माहितीनुसार नोंदी घेतल्‍या जातात.
æ तलाठी व्‍यक्‍तीश: शेतावर जाऊन पिक पाहणी करत नाहीत.
æ पिक पाहणी ठरलेल्‍या कालावधीत सुरू होत नाही आणि ठरलेल्‍या कालावधीत संपवली जात नाही.
æ पिक पाहणी भेटीची गावी दवंडी देणे, दवंडी रजिस्‍टरला नोंद घेणे, गावकर्‍यांना आणि संबंधितांना सूचना देणे या गोष्‍टी केल्‍या जात नाही.
æ शेत मालक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य आणि गावकरी यांच्‍या अनुपस्‍थितीतच पिक पाहणी करण्‍यात येते.
æ पिक पाहणी प्रथम नमुना ११ भरणे आवश्‍यक असतांनाही तो न भरताच गाव नमुना क्रमांक १२ लिहिला जातो.
æ तलाठी यांनी केलेली पिक पाहणी, मंडलअधिकारी तपासत नाहीत.
æ सध्‍याच्‍या संकरीत बियाणे लागवड पध्‍दतीमुळे कापणी लवकर केली जात असल्यामुळे. खरीप हंगामात पिक पाहणी सप्टेंबर पर्यंत तर रब्बी पाहणी ३१ डिसेंबरपर्यंत संपविली जात नाही.  
æ काही ठिकाणी उन्‍हाळी भुईमुग, उन्‍हाळी कांदा इत्‍यादी पिकांची लागवड जानेवारी/फेब्रुवारी महिन्‍यात केली जाते. त्‍यांची पिक पाहणी केली जात नाही.        
æ जे पीक खरोखरच शेतात उगवले गेले आहे त्‍याची आणि जितक्‍या क्षेत्रावर ते पीक उगवले गेले आहे त्‍या क्षेत्राची अचूक नोंद घेतली जात नाही.
æ शेतात उभ्‍या पिकासह त्‍या जमीनीतील कुळ हक्‍क, वहिवाटदार, सीमा चिन्‍हे, मिश्र पिके, झाडे, फळझाडे, दुबार पिके, जल सिंचनाची साधने, नवीन विहीर, बोअरवेल, पोटखराब क्षेत्रात केलेली लागवड. तपासन दप्‍तरातील नोंदी अद्‍ययावत केल्‍या जात नाहीत.
æ पिक पाहणी करतांना ज्‍या शेतकर्‍यांनी त्यांचे क्षेत्र वहिवाटतांना, पिके घेतांना, रस्ता तयार करतांना हद्दीच्या निशाणीचे नुकसान केलेले असते, हद्दीच्या निशाणीचे दगड, खुणा, निशाण्या जाणून-बुजून नाहीशा केलेल्‍या असतात किंवा बुजवुन टाकलेल्‍या असतात, त्याचे विरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४०/१४५ अन्वये कारवाई करण्यात येत नाही यामुळे महसूल खात्‍याचा वचक रहात नाही.
æ मागील वर्षीच्‍याच वहिवाटदाराचे नाव खात्री न करता चालू वर्षीही लिहिले जाते. वहिवाटदार जिवंत आहे किंवा मयत याची खात्री केली जात नाही. त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत मयताचे नाव वहिवाटदार सदरी तसेच लिहिले जाते.
æ नमुना १४ चा फॉर्म तहसिलदारकडे मुदतीत पाठवला जात नाही.
æ कुळ मयत असल्‍यास, त्‍याच्‍या वारसांची नोंद गाव दप्‍तरी न करताच, कुळाच्‍या वारसांची नावे वहिवाटदार सदरी लिहिली जातात.
æ बागायती पिके कोणत्‍या पाण्‍यावर घेतली याची खात्री केली जात नाही.

· प्रश्‍न ३५: नगर भूमापन झालेल्‍या क्षेत्रात सात-बारा वर किंवा पिक पहाणीची नोंद करावी काय?
F उत्तर: महाराष्‍ट्र शासन, महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक एस-१४९७/प्र.क्र-५१३/ल-६, दिनांक २४/११/१९९७ अन्‍वये खालील सूचना दिलेल्‍या आहेत.
æ ज्‍या क्षेत्रात भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे आणि त्‍या क्षेत्रातील मिळकतींची मिळकत पत्रे तयार झालेली आहेत अशा जमिनींबाबत सात-बाराचा वापर करण्‍यात येऊ नये. मिळकत पत्र हेच अशा जमिनीचे कायदेशीर कागदपत्र समजावे.
æ ज्‍या क्षेत्रात भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे परंतू त्‍या क्षेत्रातील मिळकतींची मिळकत पत्रे तयार करण्‍याचे काम पूर्ण झाले नाही अशा क्षेत्रातील ज्‍या जमिनी बिनशेतीकडे वर्ग झालेल्‍या आहेत त्‍या जमिनींवर पिक पहाणीची नोंद करू नये.
  · प्रश्‍न ३६: तलाठी यांनी फॉर्म नंबर १४ भरून पाठविल्‍यानंतर तहसिलदार स्‍तरावर काय कार्यवाही करण्‍यात येते?
F उत्तर: तलाठीकडून फॉर्म नंबर १४ प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर, तहसिलदार यांनी, किमान सात दिवस आधी पूर्वसूचना देऊन त्या गावी भेट द्यावी. तलाठी यांनी उपरोक्त जमिनीच्या सर्व हितसंबंधीत लोकांना चौकशीच्या वेळी हजर ठेवावे. यावेळी तहसिलदार यांनी दोन लायक पंचासह सदर जमिनीवर जाऊन वहिवाटदाराकडे चौकशी करावी. कुळ कायद्यातीलजमीन कसणेयाबाबतची व्याख्‍या लक्षात ठेऊन लगतच्या जमीनधारकांचे जबाब घ्यावे. सदर वहिवाटदाराकडे, तो कोणत्या अधिकाराने किंवा कोणत्या नोंदणीकृत कायदेशीर कागदपत्राच्या आधारे सदर जमीन वहिवाटत आहे याची चौकशी करावी. त्‍याच्‍या ताब्यात जमीन कोणत्या नोंदणीकृत दस्ताने आणि केव्हा आली याबाबत त्याचा जबाब आणि पुरावा घ्यावा. जमिनीत आत्तापर्यंत कोणकोणती पिके घेतली, आज रोजी कोणते पीक आहे याबाबत पंचनामा करावा. अनेक वेळा खरेदी-विक्रीचा व्यवहार कायद्यानुसार पूर्ण होऊ शकला नाही तरपिक पाहणीद्‍वारे, गाव दप्‍तरी नाव दाखल करुन आडमार्गाने व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. वास्तविक "जमिनीचा ताबा हा मालकी पाठोपाठ आला पाहिजे" हे कायद्याचे सर्वमान्य तत्व आहे. म्‍हणून मालकी कशी आली आणि ताबा कसा आला याबाबत पुरावा दिला गेला पाहिजे.
सदर वहिवाटदार नोंदणीकृत कायदेशीर कागदपत्राच्या आधारे (नोंदणीकृत दस्त, ताब्यासह नोंदणीकृत साठेखत, न्यायालयीन आदेश, सक्षम अधिकार्‍याचा आदेश, वारसा हक्क, बक्षिसपत्र, मृत्युपत्र इत्‍यादी) अधिकृतपणे जमिनीत वहिवाट करीत असेल अशी तहसिलदाराची खात्री झाल्‍यास, तसा स्‍पष्‍ट उल्‍लेख निकालपत्रात करुन, त्या वर्षासाठी अशा वहिवाटदाराचे नाव गाव नमुना ७-ब ला वहिवाटदार म्‍हणून नोंदविण्याचा आदेश पारित करावा. केवळ जबाब व पंचानामाच्या आधारे कोणाचीही वहिवाट लावणे अवैध ठरेल हे लक्षात ठेवावे.
मागील अनेक वर्षाची वहिवाट दाखल करता येत नाही. मागील अनेक वर्षाची वहिवाट लावण्याचा आदेश बेकायदेशीर ठरेल. वहिवाटदाराकडे असणारा भाडेपट्‍टा किंवा इतर दस्त नोंदणीकृतच असावा असा आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेला आहे तसेच मा. विभागीय आयुक्तांनीही अशा प्रकारचे आदेश पारीत केलेले आहेत.
जर चौकशीच्यावेळी तहसिलदार यांच्या असे निदर्शनास आले की, कोणत्याही नोंदणीकृत दस्ताशिवाय किंवा कायदेशीर कागदपत्राशिवाय, अनाधिकाराने किंवा दंडेलशाहीने अशी वहिवाट सुरू आहे तर तत्काळ अशी वहिवाट करणार्‍याविरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ५९ व २४२ अन्वये कारवाई करावी.

· प्रश्‍न ३७: वहिवाटीबाबत तहसिलदार यांचा आदेश प्राप्‍त झाल्‍यावर तलाठी यांनी काय कार्यवाही करावी?
F उत्तर: तहसिलदार यांनी 'नमुना १४ च्‍या फॉर्ममध्ये नाव असणारी व्‍यक्‍ती कायदेशीररित्‍या जमीन कसत आहे' असा निकाल दिला तर गाव नमुना ७-ब मध्‍ये शेरा स्‍तंभात तहसिलदार यांनी सदर बाबत दिलेल्‍या निकालाचा क्रमांक व दिनांक लिहून तशी नोंद करावी.
जर तहसिलदार यांनी 'नमुना १४ च्‍या फॉर्ममध्‍ये नाव असणारी व्‍यक्‍ती अनाधिकाराने जमीन कसत आहे' असा निकाल दिला तर गाव नमुना ७-ब मधील पेन्‍सिलची नोंद खोडन टाकावी.

· प्रश्‍३८: पिक पहाणीबाबत फॉर्म नंबर १४ भरतांना, तलाठी यांनी पंचनामा, चौकशी इत्‍यादी कार्यवाही करणे अपेक्षीत आहे काय?
F उत्तर: नाही, महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे व सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३०(१), ३०(२), ३०(३) चे वाचन करतांना, तलाठी यांनी, पूर्वसूचना देऊन, गावातील प्रतिष्‍ठीत लोकांसह पिक पहाणीला जावे इतकेच नमूद आहे.
नियम ३१(१) अन्‍वये, मालकाशिवाय अन्‍य व्‍यक्‍तीची वहिवाट आढळली तर फॉर्म नंबर १४ भरून तहसिलदारांकडे लवकरात लवकर सादर करणे आवश्‍यक आहे.
नियम ३१(२) व ३१(३) अन्‍वयेची कार्यवाही तहसिलदारांनी करणे अपेक्षित आहे.
महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे व सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ चे वाचन करतांना, तलाठी यांनी स्‍वत:हून (Suo-moto) पंचनामा करणे, जबाब घेणे अपेक्षीत नाही. ही सर्व कार्यवाही तहसिलदारांनी करावयाची आहे. पिक पहाणी चौकशी ही म.ज.म १९६६ चे कलम २३६ नुसार संक्षिप्‍त चौकशी आहे. आणि भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५ ) कलमे १९३,२१९,२२८ च्‍या अर्थानुसार, संक्षिप्‍त चौकशी, न्‍यायिक कार्यवाही समजली जाते आणि चौकशी करणार्‍या कोणत्‍याही प्राधिकार्‍याचे कार्यालय चौकशी कारणासाठी दिवाणी न्‍यायालय समजणेत येते. तलाठ्‍यांना हे अधिकार नाहीत.
पिक पहाणीच्‍या वेळी मालकाशिवाय अन्‍य व्‍यक्‍तीची वहिवाट आढळली तर तलाठी यांनी फॉर्म नंबर १४ भरून तहसिलदारांकडे लवकरात लवकर सादर करणे आणि सदर अन्‍य व्‍यक्‍तीने जर स्‍वत:, त्‍याच्‍या वहिवाटीबाबत एखादा   पुरावा सादर केला तर तो अहवाला सोबत पाठविणे योग्‍य ठरेल. अहवालात फक्‍त, जमीनमालकाशिवाय अन्‍य व्‍यक्‍तीची वहिवाट आढळली आहे इतकाच उल्‍लेख असावा.

· प्रश्‍न ३९: महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदी नुसार चौकशी तीन प्रकार आहेत. यापैकी कोणती चौकशी तलाठी करू शकतो?
F उत्तर:  म.ज.म.अ. १९६६, कलम २२७ अन्‍वये, महसूल विभागात कोणतीही चौकशी करण्याचे "अव्वल कारकून" यांच्याहून कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याने करावी अशी तरतूद आहे, म्हणून आपल्या विभागात कोणतीही गृहचौकशी / चौकशी ही मंडलअधिकारी यांनाच करण्यास सांगितले जाते, अशी कोणतीही चौकशी तलाठी यांनी  करणे कायदेशीरदृष्ट्या उचित नाही.  

· प्रश्‍न ४०: छापील गाव नमुना बारा आणि संगणीकृत गाव नमुना बारा याच्‍यात नमुद स्‍तंभांच्‍या (Columns) संख्‍येत फरक असण्‍याचे कारण काय?
F उत्तर:  दिनांक ०१/०१/१९७६ पासून 'महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्‍तिका-खंड ४' मध्‍ये विहीत करण्‍यात आलेले गाव नमुने अंमलात आले आहेत. खंड ४ अन्‍वये, गाव नमुना बारामध्‍ये पंधरा स्‍तंभ असावे असे निर्देश दिलेले होते. यातील पंधरावा स्‍तंभ 'शेरा' हा होता. याप्रमाणे पंधरा स्‍तंभ असलेले गाव नमुना बारा उपलब्‍ध होते. काही ठिकाणी 'रीत' हा स्‍तंभ असलेले गाव नमुना बारा उपलब्‍ध होते.    
दिनांक १० मे १९७६ रोजीच्‍या शासन परिपत्रकानुसार, गाव नमुना बारामध्‍ये एक स्‍तंभ वाढवण्‍यात यावा आणि स्‍तंभ पंधरामध्‍ये 'प्रत्‍यक्ष लागवड करणार्‍याचे नाव' लिहावे आणि नवीन सोळावा स्‍तंभ शेर्‍यासाठी ठेवावा असा आदेश पारित झाला होता. या आदेशान्‍वये सोळा स्‍तंभ असलेले गाव नमुना बारा उपलब्‍ध करून घेण्‍यात आले.  तथापि, महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीतीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम २९, ३० व ३१ यांचे एकत्रित वाचन केल्‍यास, फक्‍त ज्‍या व्‍यक्‍तींना अधिकार अभिलेखातील नोंदींप्रमाणे जमीन कसण्‍याचा वैध अधिकार आहे अशाच व्‍यक्‍तींची नावे स्‍तंभ पंधरामध्‍ये लिहीणे योग्‍य ठरते. त्‍यामुळे काही ठिकाणी पुन्‍हा खंड ४ नूसार गाव नमुना बारा वापरण्‍यात सुरूवात झाली.      
संगणीकृत गाव नमुना बारा तयार करतांना, शासनाचे पत्र क्र. सी.एल.आर-२००१/प्र.क्र.४/भाग-१, दिनांक १३/११/२००२ खंड ४ अन्वये 'वहिवाटदारांची नावे' आणि 'रीत' हे स्‍तंभ काढून टाकण्‍याचे निर्देश दिले. संगणीकृत गाव नमुना बारा तयार करतांना, खंड ४ नूसार, स्‍तंभ क्रमांक ३ नुसार स्वतंत्र उभ्या स्‍तंभामध्‍ये दर्शविण्‍यात आलेला "मिश्र पिकाचा संकेतांक" हा स्‍तंभ, संगणीकृत गाव नमुना बारा मध्ये आडव्‍या ओळीत घेतल्याने एक स्‍तंभ कमी होऊन १४ स्‍तंभ झाले आहेत. मिश्र पिकाच्या या आडव्या स्‍तंभामुळे भविष्यात एकाच जमिनीत भिन्न मिश्र पिकांच्या नोंदी घेताना मोठी अडचण येण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

· प्रश्‍न ४१: गावात प्रथमच गाव नमुना आठ-अ तयार करतांना खातेदारांच्‍या नावाची निश्‍चिती कशी केली जाते?
F उत्तर: प्रथम जमीन महसुलाचे प्रदान करण्‍यास जबाबदार असणार्‍या व्‍यक्‍तींची नावे, गाव नमुना सात मधुन निश्‍चित केली जातात. अशा व्‍यक्‍तींची नावे कागदाच्‍या चिठ्‍यांवर लिहून नंतर त्‍यांना मराठी अक्षरांच्या वर्णानूक्रमे लावून स्‍वाभाविक क्रमानुसार अनुक्रमांक दिले जातात. हा अनुक्रमांक जमीन महसुलाचे प्रदान करण्‍यास जबाबदार असणार्‍या व्‍यक्‍तीचा आठ-अ मधील खाते क्रमांक बनतो. अशा रितीने सर्व खाती उघडल्‍यानंतर गावात काही 'मक्‍ता खाती' शिल्‍लक रहातात. त्‍यांची नोंद गाव नमुना आठ-ब मध्‍ये केली जाते. 
(मक्‍ता खाते: ज्‍या व्‍यक्‍ती जमीन धारण करीत नसल्‍यामुळे त्‍यांना गाव नमुना आठ-अ मध्‍ये कोणतेही खाते देण्‍यात आलेले नाही.)

· प्रश्‍न ४२: भूमापन क्रमांक व हिस्‍सा क्रमांक लिहिण्‍याची योग्‍य पध्‍दत काय आहे?
F उत्तर: प्रचलित पध्‍दतीनुसार विविध प्रकारे भूमापन क्रमांक व हिस्‍सा क्रमांक लिहिला जातो. उदा. ५अ/१/ब किंवा ४/१+२+३/२ इत्‍यादी. मोजणी खात्‍यामार्फत उपविभाग पाडतांना पूर्वेकडून पश्‍चिमेकडे आणि घडाळ्‍याच्‍या काट्‍याच्‍या दिशेप्रमाणे उपविभाग पाडले जातात. त्‍यानुसार प्रथम उपविभागास १,२,३ असे तर व्‍दितीय उपविभागास अ,ब,क असे संबोधण्‍यात येते. त्‍यामुळे भूमापन क्रमांक व हिस्‍सा क्रमांक अल्‍फा न्‍युमरिकल पध्‍दतीने, उदा. ४/१/अ/२ याप्रकारे लिहिणे आवश्‍यक आहे.

· प्रश्‍न ४३: गाव नमुना आठ-अ लिहिण्‍याची पध्‍दत कशी असते?
F उत्तर: गाव नमुना आठ-अ मध्‍ये गावातील प्रत्येक खातेदारासाठी स्वतंत्र पान विहीत केलेले असते. जास्त जमीन असलेल्या खातेदारासाठी एकापेक्षा जास्त पाने विहीत करता येतात. प्रत्येक खातेदाराला अनुक्रमांक दिले जातात. हे अनुक्रमांक दहा वर्षात कधीच बदलु नये. तथापि, गावात बरेच व्‍यवहार झाले असतील किंवा फेरजमाबंदी किंवा एकत्रीकरणाच्‍या झाले असेल तर किंवा दर दहा वर्षांनी गाव नमुना आठ-अ पुनर्लेखनाच्‍यावेळी या अनुक्रमांकात बदल होऊ शकतो.
गाव नमुना आठ-अ मध्ये खातेदारांची नावे लिहितांना ती मराठी अक्षरांच्या वर्णाक्षरांनुक्रमे लिहावी. दर दहा वर्षांनी गाव नमुना आठ-अ चे पुनर्लेखन करायचे असते. दहा वर्षाच्या काळात नवीन निर्माण होणार्‍या खात्याला या नोंदवहीतील शेवटचा क्रमांक देऊन नवीन खातेदाराचे नाव शेवटी लिहावे. अशा नवीन खातेदाराच्‍या नावाला मराठी वर्णाक्षरांनुसार अनुक्रम देणे शक्य नसते. दर दहा वर्षांनी, साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात गाव नमुना आठ-अ चे पुनर्लेखन करतांना अशा नवीन खात्यांना दिलेल्या अनुक्रमांची पुनर्रचना करून सर्व नवीन खाती पुन्हा मराठी अक्षरांच्या वर्णाक्षरांनुक्रमे लिहावी लागतात.    

· प्रश्‍न ४४: गाव नमुना आठ-अ मध्ये बदल करावयाची पध्दत कशी असते?
F उत्तर: एखाद्या खातेदाराने जमिनीची विक्री किंवा खरेदी केल्यास त्याच्या धारण क्षेत्रात आणि जमीन महसूल व स्थानिक उपकरात बदल होतो. त्यासाठी गाव नमुना आठ-अ मध्ये खाडाखोड करता येत नाही. खातेदाराच्या जमिनीत झालेले बदल अधिक (+) किंवा उणे (-) या चिन्हांनी दर्शवावा.  
खातेदार नसलेल्या व्यक्तीने जमीन संपादन केल्यास अशा खातेदारास शेवटचा खाता क्रमांक देऊन त्याची नोंद या नोंदवहीत शेवटी करावी. एखादे खाते पूर्णत: बंद झाल्यास त्या खात्यावरखाते रद्दअसा शेरा लिहावा.
खातेदार नसलेल्या व्यक्तीने एखाद्या खातेदाराच्या खात्यावरील संपूर्ण जमीन खरेदी केल्यास त्या नवीन खातेदारास या नोंदवहीतील शेवटचा क्रमांक न देता ज्या खातेदाराकडून संपूर्ण जमीन विकत घेतली आहे त्या खातेदाराच्या पानावरच जुन्या खातेदाच्या नावाला कंस ( ) करून नवीन खातेदाराचे नाव लिहावे.
गाव नमुना आठ-अ मध्ये ताबडतोब दुरुस्ती करण्याची आवश्यकता नसते. जमीन महसूल वसुलीचा कालावधी साधारणत: ऑक्टोबर महिन्यात सुरू  होतो, त्यापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात गाव नमुना आठ-अ अद्ययावत करावा. गाव नमुना आठ-अ अद्ययावत करतांना सर्व प्रलंबित फेरफारांचा निपटारा झाल्याची खात्री करावी, फेरफार नुसार गाव नमुना सात-बारा अद्ययावत असल्याची खात्री करावी तसेच गाव नमुना सात-बारा नुसार सर्व नोंदी गाव गाव नमुना आठ-अ मध्ये अद्ययावत असल्याची खात्री करावी.

· प्रश्‍न ४५: अधिकृत थकबाकी, अनधिकृत थकबाकी, एकूण मागणी आणि एकत्रीत जमीन महसूल म्‍हणजे काय? 
F उत्तर: संकीर्ण जमीन महसूलाच्‍या नियत तारखेला येणे असलेली तसेच उपविभागीय अधिकार्‍याने पुढील वर्षी वसूलीसाठी पुढे आणण्‍यास संमती दिलेल्‍या थकबाकी रकमा म्‍हणजे अधिकृत थकबाकी.
उपरोक्‍त रकमा वगळून इतर सर्व थकबाकी अनधिकृत थकबाकी असतात. तहकुब रकमांचा जमीन महसुलाच्‍या थकबाकीत समावेश होत नाही.
एकूण मागणी म्‍हणजे नियत महसूल + संकीर्ण महसूल (येणे असलेला नियत महसूल माहित असतो म्‍हणून तो गाव नमुना आठ-अ मधून घेण्‍यात येतो, संकीर्ण (चढउतारी) महसूल  गाव नमुना चार मधून घेतला जातो. आणि एकत्रीत जमीन महसूल म्‍हणजे नियत महसूल + संकीर्ण महसूल + स्‍थानिक उपकर (जि.प.; ग्रा.पं).

· प्रश्‍न ४६: थकीत जमीन महसूलाची थकबाकी वसूल करण्याची कार्यपध्दती कशी असते?
F उत्तर: थकीत जमीन महसूलाची थकबाकी वसूल करण्याची कार्यपध्दती खालील प्रमाणे असते:
æ जमीन महसूलाची थकबाकी ज्या दिनांकास देणे होईल त्याच्या दुसर्‍या दिवशी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम १७८ अन्वये नमुना नं. १ ची नोटीस बजावता येते.
æ अशी थकबाकी नमुना नं. १ ची नोटीस बजावूनही थकबाकी वसूल न झाल्यास म.ज.म.अ., १९६६ चे कलम १७९ अन्वये, कलम १९२, १९३ च्या अधीन राहून, नमुना नं. २ ची नोटीस बजावून सदर जमीन सरकार जमा करता येते.
æ अशी थकबाकी तरीही वसूल न झाल्यास महाराष्ट्र जमीन म.ज.म.अ., १९६६ चे कलम १८० अन्वये नमुना नं. २ ची नोटीस बजावून, जमीन अटकवून तिची विक्री करता येते.
æ स्थावर मालमत्तेची जप्ती व विक्री म.ज.म.अ., १९६६ चे कलम १८१, १८२ व १८५ ते १९० अन्वये नमुना नं. ४ ची नोटीस बजावून करता येते.
æ म.ज.म.अ., १९६६ चे कलम १८३ व १८४ अन्वये थकबाकीदारास अटक करून कैदेत ठेवता येते. तथापि, अशा अटक करून कैदेत ठेवण्यात आलेल्या थकबाकीदाराने अनुसूचीमधील नमुन्यात तारण दिल्यास त्याला म.ज.म.अ., १९६६ चे कलम १९१ अन्वये सोडुन देता येते.
æ थकबाकीदाराच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव म.ज.म.अ., १९६६ चे कलम १७९ अन्वये, कलम १९३,१९४ च्या अधीन राहून करता येतो.
æ थकबाकीदाराकडील नाशवंत वस्तूंचा लिलाव म.ज.म.अ., १९६६ चे कलम १९६ अन्वये करता येतो.

· प्रश्‍न ४७: चाचणी ताळेबंद म्‍हणजे काय?
F उत्तर: मागणीची बाजू वगळून उरलेला लेखा म्‍हणजे चाचणी ताळेबंद.

· प्रश्‍न ४८: लागवडीस अयोग्‍य, पडीक जमिनी आणि लागवडीस योग्‍य, पडीक जमिनी म्‍हणजे काय?
F उत्तर: लागवडीस अयोग्‍य, पडीक जमिनी म्‍हणजे (१) गावातील सरकारी तसेच खाजगी वनांखालील जमीनीचे क्षेत्र, (२) डोंगराळ, खडकाळ भाग, वाळवंट, नद्‍यांखालील क्षेत्र, (३) इमारती, रेल्‍वे, रस्‍ते, दफनभूमी, सैनिकी छावण्‍या, पाणीपुवठा साधने इत्‍यादी. आणि लागवडीस योग्‍य, पडीक जमिनी म्‍हणजे (१) काही विशिष्‍ठ कालावधीसाठी (५ वर्षे किंवा अधिक काळासाठी) पडीक ठेवलेल्‍या जमीनी, (२) गवताळ आणि गुरे चारण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या जमीनी, (३) वनांव्‍यतिरिक्‍त उपयुक्‍त झाडे असलेल्‍या जमीनी, (४) इतर पडीक (एक ते पाच वर्षे काळासाठी) जमीनी, (५) चालू पडीक (वर्षामध्‍ये फक्‍त एकाच हंगामात (खरीप किंवा रब्‍बी)) पडीक ठेवलेल्‍या जमिनी.

· प्रश्‍न ४९: सात-बारा वरील आणेवारी म्‍हणजे काय?
F उत्तर: सात-बारा उतार्‍यावर, प्रत्‍येक सहधारकाचे धारण क्षेत्र 'आणे-पै' या पध्दतीने दर्शविणे म्‍हणजे आणेवारी. जमिनीच्या सात-बारा उतार्‍यावर 'आणेवारी' दाखल करण्‍याची पध्दत ब्रिटीश काळात अँडरसनच्या कारकिर्दीत रुढ झाली असे म्हटले जाते. प्राचीन अर्थक्षेत्रातील व्यवहारात प्रचलीत 'आणे-पै' पध्दतीचा यावर प्रभाव आहे. महसूल खात्यात प्रचलीत या पध्दतीनुसार एक आणा म्हणजे बारा पैसे; सोळा आणे म्हणजे एक रुपया; १९२ पैसे म्हणजे १६ आणे; म्हणजेच एक रुपया.
'आणे'या चिन्हाने (एक उलटा स्‍वलपविराम) दर्शविले जातात आणि 'पै' ‘‘ या चिन्हाने (दोन उलटे स्‍वलपविराम) दर्शविले जातात.
æ 'आणेवारी' काढण्‍याचे सुत्र:
 जमिनीचे एकुण क्षेत्रफळ x दर्शविलेली आणेवारी (आण्‍याचे पै मध्‍ये रुपांतरण करून पै. मध्ये) ÷ १९२  
या सुत्राने क्षेत्र काढले जाते. आणे-पैसे पध्दतीनुसार जमिनीचे क्षेत्र कितीही असले तरी ते १९२ पैसे म्हणजे १६ आणे म्हणजेच एक रुपया मानले जाते.
æ आणेवारी चिन्‍हांची उदाहरणे:
F ४ = चार आणे; F १२ = बारा आणे; F ६ = दोन आणे सहा पै. [चिन्‍ह, त्‍यानंतर अंक, पुन्‍हा चिन्‍ह आणि पुन्‍हा अंक असे लिहिले असेल तर पहिले चिन्‍ह आणे आणि नंतरचे चिन्‍ह पै दर्शविते.]
F ‘‘ ४ = चार पै.
æ आणेवारी नुसार सात-बारा वरील खातेदाराचे क्षेत्र काढतांना खालील सूत्र वापरण्‍यात येते.
जमिनीचे एकुण क्षेत्रफळ x खातेदाराची दर्शविलेली आणेवारी (आण्‍याचे पै मध्‍ये रुपांतरण करून पै. मध्ये) ÷ १९२
उदा. पाच आणे चार पै आणेवारीचे क्षेत्र काढायचे असल्‍यास पाचला १२ (एक आणाचे पै रुपांतर) ने गुणावे म्‍हणजे पाच आण्‍याचे पै मध्‍ये रुपातर मिळेल. नंतर यात पाच आणे चार पै आणेवारीतील उर्वरीत चार पै. मिळवावेत. ५ x १२ = ६० + ४ = ६४ पै. वरील सुत्रानूसार येथे
जमिनीचे एकुण क्षेत्रफळ x ६४ ÷ १९२  असे गणित येईल. याचे उत्तर म्‍हणजे पाच आणे चार पै क्षेत्र.

· प्रश्‍न ५०: सात-बारा नुसार क्षेत्राचा आकार कसा काढावा?
F उत्तर: अनेकदा खरेदी क्षेत्राची नोंद करतांना, म...अ. कलम ८५ अन्‍वयेच्‍या आदेशाचा अंमल देतांना अथवा न्‍यायालयीन आदेशान्‍वये शेत जमीनीच्‍या सहधारकांमध्‍ये झालेल्‍या वाटपाची नोंद घेतांना संबंधित व्‍यक्‍तीपुरता आकार वेगळा दर्शविणे व सदर आकाराची नोंद गाव नमुना आठ-अ ला नोंदविणे यात अडचणी येतात.  
प्रत्‍येक सात-बारा सदरी एकूण आकार नमुद असतो. सदर आकार, आकारबंधानूसार ठरलेला असतो. या आकारात बदल करण्‍याचा अधिकार तलाठी यांना नसतो तथापि, जर एखाद्‍या खातेदाराचे क्षेत्र अन्‍य खातेदारांमध्‍ये विभागले गेल्‍यास हा आकार सर्व खातेदार निहाय वेगळा करावा लागतो. असा आकार खालील सुत्रानुसार काढावा.
सात-बारा वरील एकुण आकार भागिले सात-बाराचे एकुण क्षेत्र गुणिले ज्‍या क्षेत्राचा आकार काढायचा आहे ते क्षेत्र
उदाहरण : रामभाऊ, गणपत आणि मारुती या तिघांच्‍या नावावर गट नं. १९२ आहे ज्‍याचे एकुण क्षेत्र ७ हे. २० आर आणि एकुण आकार रु.१२.३५ आहे. रामभाऊच्‍या नावे ३ हे. ८० आर क्षेत्र आहे, गणपतच्‍या नावे १ हे.५३ आर आणि मारुतीच्‍या नावे १ हे. ८७ आर क्षेत्र आहे.
अशावेळेस प्रथम रामभाऊच्‍या नावे असणार्‍या ३ हे. ८० आर क्षेत्राचा आकार वरील सुत्रानूसार काढावा.
F ७/१२ चा एकुण आकार रु. १२.३५ भागिले ७/१२ चे एकुण क्षेत्र ७ हे. २० आर गुणिले रामभाऊच्‍या नावे असणारे क्षेत्र ३ हे. ८० आर = आकार रु. ६.५१
F आता गणपतच्‍या नावे असणार्‍या १ हे. ५३ आर क्षेत्राचा आकार वरील सुत्रानुसार काढावा.
७/१२ चा एकुण आकार रु. १२.३५ भागिले ७/१२ चे एकुण क्षेत्र ७ हे. २० आर गुणिले गणपतच्‍या नावे असणारे  क्षेत्र १ हे. ५३ आर = आकार रु. २.६२
F आता मारुतीच्‍या नावे असणार्‍या १ हे. ८७ आर क्षेत्राचा आकार वरील सुत्रानुसार काढावा.
७/१२ चा एकुण आकार रु. १२.३५ भागिले ७/१२ चे एकुण क्षेत्र ७ हे. २० आर गुणिले मारुतीच्‍या नावे असणारे क्षेत्र १ हे. ८७ आर = आकार रु. ३.२०
म्‍हणजेच रामभाऊच्‍या नावे असणार्‍या ३ हे. ८० आर क्षेत्राचा आकार रु. ६.५१; गणपतच्‍या नावे असणार्‍या १ हे. ५३ आर क्षेत्राचा आकार रु. २.६२ आणि मारुतीच्‍या नावे असणार्‍या १ हे. ८७ आर क्षेत्राचा आकार रु. ३.२०
सात-बारा वरील एकुण आकार रु. १२.३३ (पुर्णांकात रु. १२.३५)
(सात-बारा वरील क्षेत्र जर आणे-पै. मध्‍ये दर्शविले असेल तर त्‍याचे रुपांतर हे. आर मध्‍ये करुन घ्‍यावे.) 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला "महसूल प्रश्‍नोत्तरे" 26 to 50. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

22 تعليقًا

  1. भोगवटा वर्ग३ बदलण्याचे अधिकार कोणाला असतात
  2. भोगवटा वर्ग३ बदलण्याचे अधिकार कोणाला असतात
  3. भोगवट वर्ग 2 ची जमीन मॉरगेज करता येते का?
  4. वाद असल्याने शेती सरकार जमा करुन मोबदला पाहिजे आहे काय प्रक्रिया आहे
  5. गाळ पेरा करण्याचा हक्क कुणाला असतो लगतच्या शेतकर्‍याला की मूळ मालकाला
  6. सत्ता प्रकार ब काढण्यासाठी काय करावे लागते
  7. inam sheti ahe ajobala milali.5 mula ahet.pan 4ni jamin ghetali.amchya ajobacha 7/12 war naw nahi.r ti sheti kashi milel?
  8. नवीन अविभाज्य शर्तीवर जमीन खरेदी विक्री करणे साठी परवानगी घेणे साठी काय करावे? मार्गदर्शन द्या
  9. एफ क्लास जमीन म्हणजे काय कृपया मार्गदर्शन करा
  10. नवीन शर्थीच्या जमिनी संदर्भात नवीन GR मध्ये काय सुधारणा आहे.
  11. नजराणा जमीन खरेदी करायला चालते का
  12. कुळ कायदा कलम 70 ब अन्वये कूळ घोषित केले आहे. त्या कूळाला मूळ मालकाकडून परस्पर खरेदीपत्र रजिस्टर करून घेता येईल काय. अशा खरेदीपत्रामुळे कु.का.क. 43 ची अट लागते काय.
  13. भोगवटादार वर्ग 2 ची जमीन फक्त शेती साठीच वापरता येती का??? व्यवसाय करता येईल का??? कृपया मार्गदर्शन करावे???
  14. रीतसर शेतसार वषैचा किमान किती असतो
    गावठाण चा कस माहीती पडणार
    तलाठी 2000 सागालाय
  15. भोगवटादार वर्ग 2 ची जमीन फक्त त्याला किव्हा त्याच्या वरसदाराला..असते की तो आपल्या चुलत भावाना देऊ शकतो???
  16. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असणाऱ्या जमीनीसाठी सामाईक क्षेत्र 33 फुट असते काय?
  17. आठ ब मध्ये नेमकी कशाची नोंद ठेवतात
  18. २०१७ सळी मी गावातील एकाकडून ४ गुंठे शेती ची जागा खरेदी केली खरेदी करताना त्याचा १७ गुंथेचा खरेदी खत केले ज्यात माझे ४ गुंठे सोडून इथर ४ जणांनी उर्वरित जमीन घेतली...म्हणजे ५ जनात मिळून १७ गुंठे खरेदी केली...नोंदणी कृत दस्त्त करून.
    ..Pn ata २०२० paryant ajun ७/१२ nond keli nahi Ani ata to देणारा म्हणतोय मी तुला जागा देणार नाही...काय करावे
  19. २०१७ सळी मी गावातील एकाकडून ४ गुंठे शेती ची जागा खरेदी केली खरेदी करताना त्याचा १७ गुंथेचा खरेदी खत केले ज्यात माझे ४ गुंठे सोडून इथर ४ जणांनी उर्वरित जमीन घेतली...म्हणजे ५ जनात मिळून १७ गुंठे खरेदी केली...नोंदणी कृत दस्त्त करून... Pn ata २०२० paryant ajun ७/१२ nond keli nahi Ani ata to देणारा म्हणतोय मी तुला जागा देणार नाही...
  20. 7/12 उताऱ्यात लागवडीसाठी जीरायती, तरी इत्यादी क्षेत्र म्हणजे काय
  21. सर आणेवारी असलेल्या शेत जमिनीची क्षेत्र निश्चिती कशी व कोणाकडून करुन घ्यावी
  22. कलेक्टर एन ए किंवा तहसीलदार एन ए जागा/जमीन यामध्ये नेमका काय फरक असतो? जर तहसीलदार यांनी जागा/जमीन एन ए केली असेल तर भविष्यात काही आरक्षणविषयक किंवा कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात का? कृपया, मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.