आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

हैद्राबाद इनाम व वतन कायदे - मदतमाश-खिदमतमाश इनाम

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

हैद्राबाद इनाम व वतन कायदे - मदतमाश-खिदमतमाश इनाम

 मराठवाडा विभागात काम करतांना हैद्राबाद इनाम व वतन कायद्‍यान्‍वये काम करतांना मदतमाश-खिदमतमाश इनाम हे शब्‍द वाचण्‍यात येतात.

मराठवाडा विभागात ब्रिटीश राजवट नव्‍हती. या विभागावर निजामाचे राज्‍य होते. त्‍यामुळे येथील इनाम-वतन कायद्‍यांबाबत हैद्राबाद अतियात चौकशी कायदा १९५२, हैद्राबाद अतियात चौकशी नियम १९५४, हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, हैद्राबाद इनामे नष्‍ट करणे (दुरुस्‍ती) कायदा १९६०, हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे (सुधारणा) कायदा २०१५ इत्‍यादी कायद्‍यान्‍वये कामकाज केले जाते.

 उपरोक्‍त कायद्‍यात वारंवार वाचनात येणारे काही शब्‍द आणि त्‍यांचा अर्थ खालीलप्रमाणे:

Ü ‘अतियात’ या शब्‍दाचा अर्थ इनाम जमिनीचे वारस असा आहे. 

Ü ‘फसली’ या शब्‍दाचा अर्थ इसवी सन (वर्ष). "फसली" इसवी सनच्‍या अंदाजे ५५० ते   

     ६०० वर्ष मागे आहे.

Ü ‘बलदिया सरकार’ या शब्‍दाचा अर्थ राजाने स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेला बहाल केलेली

      जमीन.

Ü ‘मुंतखब’ या शब्‍दाचा अर्थ इनामाची "सनद" असा आहे.

Ü ‘काबीज-ए-कदीम’ (Kabiz-e-kadim) या शब्‍दाचा अर्थ इनामदाराव्‍यतिरिक्‍त इनाम जमीन धारण करणारी अशी व्‍यक्‍ती, ज्‍याच्‍या ताब्यात इनाम मंजूर करतेवेळी अशा जमिनीचा ताबा होता किंवा मालकी हक्क निहित होण्याच्या तारखेपूर्वी किमान बारा वर्षे अशी जमीन त्‍याच्‍या सतत ताब्यात होती आणि जो इनामदाराला केवळ जमीन महसूल देतो.

 Ü ‘कुळ’ (tenant) म्हणजे हैदराबाद कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९५० मध्ये परिभाषित केल्यानुसार कुळ, आणि त्यात संरक्षित कुळाचा समावेश होतो परंतु कायम कुळाचा समावेश होत नाही.

Ü ‘कायम कुळ’ (permanent tenant) या शब्‍दाचा अर्थ इनामदाराची जमीन भाडेपट्‍ट्‍यावर कसणारी व्‍यक्‍ती. १० जुन, १९५० पूर्वीपासून, इनामदाराकडून कायमस्वरूपी भाडेपट्ट्यावर, मग तो दस्तऐवजानुसार असो वा तोंडी करारानुसार, इनाम जमिनीची मशागत करत आहे आणि यामध्ये शिकमीदाराचा समावेश आहे. 

Ü शिकमीदार (Shikmidar) म्हणजे जमिनीचा उप-भाडेकरू किंवा कुळ (Sub-tenant). ज्या व्यक्तीने जमींदाराकडून जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे आणि जो ती जमीन प्रत्यक्षात कसत आहे, त्याला 'शिकमीदार' किंवा 'शिकमी रयत' म्हटले जाते. कायद्याच्या भाषेत, शिकमीदार म्हणजे ज्याला जमिनीवर जमिनीच्या पट्टेदाराप्रमाणे (Pattadar) हक्क असतो, किंवा जो सुरुवातीपासूनच जमिनीवर संयुक्त ताबा (Joint Possession) बाळगून असतो.

Ü ‘जुडी’ किंवा ‘भाडे-सोड’ (quit-rent) इनाम जमिनीवर आकारलेल्या जमीन महसुलातून इनामदाराने सरकारला देय असलेली आणि निश्चित केलेली रक्कम/ महसूल.

Ü ‘रोख अनुदान’ (cash grant) म्हणजे शासनाकडून, भूतकाळातील किंवा वर्तमानातील विशिष्ट कर्तव्ये पार पाडण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव दिलेले पैशाचे अनुदान किंवा जमीन महसुलाचे हस्तांतरण, परंतु त्यात खालील गोष्टींचा समावेश नाही – 

 (i) धर्मादाय किंवा धार्मिक संस्थेकडे असलेले किंवा त्यांच्या फायद्यासाठी असलेले रोख अनुदान.

(ii) देसाई यांच्या कार्यालयाशी किंवा सामान्यतः कुलकमी किंवा पटवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्राम लेखापालाच्या कार्यालयाशी संबंधित सेवेव्यतिरिक्त, शासनासाठी उपयुक्त सेवा प्रदान केल्याबद्दल देय असलेले रोख अनुदान.

(iii) शासनाच्या माजी कर्मचाऱ्याला त्याने शासनाला दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात मंजूर केलेले कोणतेही निवृत्तीवेतन, किंवा

(iv) असे रोख अनुदान जे हैदराबाद (रोख अनुदान रद्द करणे) अधिनियम, १९५२ अन्वये बंद करण्यात आले आहे, आणि ज्याला त्या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात, किंवा

(v) हैदराबाद जहागीर (एक फेरफार) विनियम, १३५९ फसली अन्वये जहागीरदाराला देय असलेली एक फेरफार रक्कम.

Ü ‘सामुदायिक सेवा इनाम’ म्हणजे(community service inam) ग्राम समुदायाच्या उपयोगी सेवा करण्यासाठी धारण केलेले इनाम आणि त्यात अशा सेवेची मागणी बंद झाली असली तरीही, त्या सेवेसाठी धारण केलेल्या इनामाचा समावेश होतो.

Ü 'इनाम' (Inam) म्हणजे अशी जमीन, जी निझाम किंवा कोणताही जहागीरदार, संस्थानचा प्रमुख अथवा इतर कोणत्याही सक्षम दानदात्याने [तो कोणीही असो—मग तो निझामच्या अधिसत्तेखाली असो वा नसो] दिलेल्या भेटवस्तूच्या किंवा अनुदानाच्या आधारे धारण केली गेली आहे; आणि जी एखाद्या 'मुंतखब' (muntakhab) किंवा इतर हक्कपत्राच्या आधारे पुढे चालू ठेवण्यात आली आहे किंवा जिची पुष्टी करण्यात आली आहे; मग ती जमीन सेवेच्या अटीसह धारण केलेली असो वा त्याशिवाय; आणि मग त्या जमिनीवरील संपूर्ण किंवा अंशतः जमीन महसुलाची माफी त्यासोबत जोडलेली असो वा नसो; आणि जी जमीन गावाच्या अभिलेखांमध्ये (records) तशा प्रकारे नोंदवलेली आहे.

Ü 'इनामदार' (inamdar) म्हणजे अशी व्यक्ती, जी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा विश्वस्त म्हणून एखादे इनाम अथवा त्यातील हिस्सा धारण करते; आणि यामध्ये इनामदाराच्या हितसंबंधांचा वारसदार, तसेच—

(i) जिथे इनामदार हा अल्पवयीन, किंवा वेडसर किंवा मतिमंद असेल, किंवा मतिमंद असेल, तिथे त्याचा कायदेशीर पालक;

(ii) जिथे इनामदार हे संयुक्त हिंदू कुटुंब आह. असे संयुक्त हिंदू कुटुंब.

Ü ‘व्याप्त जमीन’ (occupied land) म्हणजे अशी इनाम जमीन, जी लागवडीखाली नसलेली जमीन, पडीक जमीन, चराऊ जमीन किंवा वनजमीन नाही; तसेच जिच्यामध्ये खाण, दगडी खाण (क्वारी), तलाव, सिंचन कामे, ओढा किंवा नदी यांचा समावेश नाही; आणि जी एखाद्या इनामदाराच्या प्रत्यक्ष किंवा विधीग्राह्य (constructive) कब्ज्यात आहे.

स्पष्टीकरण - या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, एखादी जमीन 'लागवडीखाली नसलेली' मानली जाईल, जर ती जमीन निहितीकरणाच्या (vesting) दिनांकाच्या लगतपूर्वीच्या तीन वर्षांच्या कालावधीत लागवडीखाली आणली गेली नसेल.

Ü ‘विहित’ (prescribed) म्हणजे या अधिनियमांतर्गत केलेल्या नियमांनुसार विहित केलेले.

Ü ‘वतन’ (Watan) म्हणजे, सामान्यतः कुलकर्णी किंवा पटवारी किंवा अशाच इतर कोणत्याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या ग्राम लेखापालाच्या कार्यालयाशी संबंधित सेवेसाठी किंवा सामान्यतः सरदेशमुख, देशमुख, देशपांडे किंवा देसाई किंवा अशाच इतर कोणत्याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा (परगणा) अधिकाऱ्याच्या कार्यालयाशी संबंधित सेवेसाठी वतन म्हणून धारण केलेले ईनाम, मग अशा वतनाच्या संबंधात कोणताही विनिमय समझोता झाला असो वा नसो. 

 4हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४ अन्‍वये, इनाम आणि अपिलांसंबंधी काही प्रश्न ठरवण्याचा राज्य सरकार किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याचा अधिकार खालील प्रमाणे आहे. 

() जर काही प्रश्न उद्भवल्यास, जसे की,

(i) कोणतीही जमीन इनाम आहे की नाही,

(ii) कोणतेही इनाम सेवाशर्तींसह किंवा त्याशिवाय धारण केलेले असो आणि त्यासोबत संपूर्ण किंवा अंशतः जमीन महसुलाची माफी असो वा नसो,

(iii) कोणतेही इनाम हे सामुदायिक सेवेचे इनाम आहे वा वतन,

(iv) कोणत्याही वतनाच्या बाबतीत मूल्यबदलाचा समझोता झाला आहे किंवा नाही,

(v) इनाम म्हणून धारण केलेली कोणतीही जमीन सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय हस्तांतरणीय आहे की नाही, किंवा

(vi) कोणतीही व्यक्ती काबिज-ए-कादिम, कायम कुळ किंवा कुळ आहे की नाही, या प्रश्नाचा निर्णय राज्य सरकार किंवा त्या सरकारने प्राधिकृत केलेला अधिकारी घेईल.

() राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने कोणत्याही प्रश्नावर निर्णय दिल्यास, अशा निर्णयामुळे व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती अशा निर्णयाच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करू शकते.

() जेव्हा अशा अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले जात नाही, तेव्हा राज्य सरकार, अपील करण्याची मुदत संपल्यानंतर, परंतु अशा निर्णयापासून एक वर्षाच्या आत, अशा कार्यवाहीची किंवा निर्णयाची कायदेशीरता, औचित्य किंवा नियमितता याबद्दल स्वतःची खात्री करण्यासाठी अशा अधिकाऱ्याच्या कार्यवाहीचा अभिलेख मागवू शकते आणि त्यावर योग्य वाटेल असा आदेश पारित करू शकते.

 4हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, कलम ३ अन्‍वये सर्व प्रकारची हैद्राबाद इनामे नष्‍ट झाली आहेत तसेच सर्व रोख अनुदाने थांबविण्‍यात येऊन इनाम जमिनींना जमीन महसूल आकारणी लागू करण्‍यात आली आहे.

 4हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, कलम ६ अन्‍वये इनामदार किंवा काबीज-ए-कदीम यांच्‍याकडून जमिनीच्‍या मुल्‍यांकनाच्‍या सहापट, कायम कुळाकडून जमिनीच्‍या मुल्‍यांकनाच्‍या आठपट आणि कुळाकडून जमिनीच्‍या मुल्‍यांकनाच्‍या बारापट भोगवटा रक्‍कम वसूल करण्‍यात आली आणि त्‍यांना नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणून जमीन पुर्नप्रदान करण्‍यात आली.

 4जिल्हाधिकाऱ्यांच्या निवाड्याविरुद्ध अपील.

उक्त अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निवाडा मुंबई महसूल न्यायाधिकरणाकडे अपील करण्याच्या अधीन असेल. जिल्हाधिकार्‍यांच्या निवाड्याविरुद्ध मुंबई महसूल न्यायाधिकरण अधिनियम, १९५७ अन्वये गठीत केलेल्या महसूल न्यायाधिकरणाकडे, जिल्हाधिकाऱ्यांच्या निवाड्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या कालावधीत अपील दाखल करता येईल. असे अपील दाखल करण्यासाठी भारतीय मर्यादा अधिनियम, १९०८, कलम ४, , १२ आणि १४ च्या तरतुदी लागू होतील.

अपीलावरील मुंबई महसूल न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम व निर्णायक असेल आणि कोणत्याही न्यायालयातील कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार नाही.

4हैद्राबाद इनाम-वतन कायद्‍यात इनामाचे दोन प्रकार नमूद आहेत.

१) खिदमतमाश इनाम

२) मदतमाश इनाम

 १) खिदमतमाश (Service) किंवा सेवाधारी इनाम: म्‍हणजे देवस्‍थान, मंदिर, मस्‍जिद, स्‍मशान भूमि इत्‍यादिंना प्रदान करण्‍यात आलेली जमीन. अशी जमीन फक्‍त पुजा-अर्चा व देवाची किंवा संबंधित जागेची सेवा करण्‍यासाठी मुंतखबच्‍या आधारे प्रदान करण्‍यात आली आहे. खिदमतमाश इनाम जमीन कोणत्‍याही परिस्‍थितीत खालसा करता येत नाही किंवा अशा जमिनीची विक्री, हस्‍तांतरण करता येत नाही.

 २) मदतमाश (Community) इनाम: म्‍हणजे सहाय्‍य म्‍हणून किंवा उपजिविकेसाठी प्रदान केलेली जमीन. हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, कलम २-ए अन्‍वये मदतमाश जमीन खालसा करण्‍यात येऊ शकते. कलम ६(१) अन्‍वये सक्षम अधिकार्‍याकडून चौकशी होऊन आणि वरील प्रमाणे भोगवटा रक्‍कम वसूल केल्‍याची खात्री करून मदतमाश इनाम जमीन, नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणून पुर्नप्रदान करण्‍यात येऊ शकते. हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, कलम ६(३) अन्‍वये अशा जमिनीच्‍या हस्‍तांतरणास सक्षम अधिकार्‍याची संमती आवश्‍यक होती.

 उक्‍त तरतुदीत खालील सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत:

 4 दिनांक १७ ऑगस्ट २०१५: शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ४५

महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २५/२०१५. - हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५४ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम

 २. हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५४ याच्या कलम ६ मध्ये, पोट-कलम (३) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :-

 (३) (अ) हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५ याच्या प्रारंभाच्या दिनांकास (१७.८.२०१५) किंवा त्यानंतर, भोगवटादारास, नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग दोन) धारण केलेल्या मदतमाश इनाम जमिनींचा भोगवटा, कृषीसंबंधी प्रयोजनासाठी हस्तांतरित करता येईल आणि अशा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी किंवा इतर कोणताही सक्षम प्राधिकारी याच्याकडून कोणतीही पूर्वमंजुरी किंवा कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता असणार नाही,

अशा हस्तांतरणानंतर असा हस्तांतरिती भोगवटादार अशा जमिनीचा भोगवटा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदींनुसार नवीन व अविभाज्य शतींवर (भोगवटादार वर्ग दोन ) धारण करणे चालू ठेवील.

 परंतु, प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यानंतर, भोगवटादारास, नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार- वर्ग दोन ) धारण केलेला असा कोणताही भोगवटा, अशा जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या पन्नास टक्के इतकी रक्कम नजराणा म्हणून शासनाला प्रदान करून, भोगवटादार वर्ग एक मध्ये रुपांतरित करता येईल, आणि अशा रुपांतरणानंतर भोगवटादार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदींनुसार अशी जमीन, भोगवटादार वर्ग एक म्हणून धारण करील.

 परंतु आणखी असे की, प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यानंतर, जर भोगवटादाराकडून, नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग दोन ) धारण केलेला कोणताही भोगवटा, जिल्हाधिकार्‍यांच्या किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि अशा जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या पन्नास टक्के इतकी रक्कम प्रदान करण्यात आल्याशिवाय कृषीतर उपयोगासाठी हस्तांतरित करण्यात आला असेल तर अशा जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या पन्नास टक्के इतकी रक्कम नजराणा म्हणून आणि अशा रकमेच्या पन्नास टक्के इतकी रक्कम दंड म्हणून प्रदान करण्यात आल्यावर असे हस्तांतरण नियमानुकुल करता येईल आणि अशी रक्कम प्रदान करण्यात आल्यावर भोगवटादार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदींनुसार ती जमीन भोगवटादार वर्ग एक म्हणून धारण करील.

 (ब) प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, जर भोगवटादाराने, नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग दोन ) धारण केलेल्या मदतमाश इनाम जमिनींच्या कोणत्याही भोगवट्याचे जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकार्‍याच्या पूर्वमंजुरीशिवाय किंवा ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय कृषीसंबंधी प्रयोजनासाठी, आधीच हस्तांतरण केले असेल तर अशा हस्तांतरणाचा पुरावा म्हणून, त्याचे विक्री खत, बक्षीसपत्र, इत्यादींसारखे नोंदणीकृत संलेख सादर केल्यानंतर, नजराणा म्हणून कोणतीही रक्कम प्रदान न करता, असे हस्तांतरण नियमानुकुल करता येईल. असे हस्तांतरण नियमानुकुल करण्यात आल्यानंतर, अशा जमिनीचा भोगवटा अशा हस्तांतरिती भोगवटादाराने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग दोन म्हणून धारण केला असल्याचे मानण्यात येईल.

 परंतु, प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, जर भोगवटादाराकडून, नवीन आणि अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार- वर्ग दोन ) धारण केलेल्या मदतमाश इनाम जमिनींचा असा कोणताही भोगवटा, जिल्हाधिकार्‍यांच्या किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकार्‍याच्या पूर्वमंजुरीशिवाय कृषीतर उपयोगासाठी आधीच हस्तांतरित करण्यात आला असेल तर अशा नियमितीकरणाच्या आदेशाच्या दिनांकास अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पन्नास टक्के इतकी रक्कम नजराणा म्हणून आणि अशा रकमेच्या दहा टक्के इतकी रक्कम दंड म्हणून प्रदान केल्यानंतर असे हस्तांतरण नियमानुकुल करता येईल आणि अशी रक्कम प्रदान करण्यात आल्यावर, भोगवटादाराने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदींनुसार ती जमीन अशा आदेशाच्या दिनांकापासून भोगवटादार- वर्ग एक म्हणून धारण केली असल्याचे मानण्यात येईल.

 वरील तरतुदी खालील जमिनींना लागू होणार नाहीत.

(एक) वक्फ अधिनियम, १९९५ याच्या तरतुदींखाली जी प्रशासित केली जाते अशी वक्फ म्हणून कायमस्वरूपी समर्पित केलेली मालमत्ता.

(दोन) खिदमतमाश (सेवा इनाम) जमिनी.

(तीन) ज्यांचा काही भाग हा मुंतखब (सनद) याच्या अटी व शर्तीस अधीन राहून देवस्थानाच्या खिदमतीकरिता (सेवेकरिता) दिलेला असेल अशा मदतमाश इनाम जमिनी.

(चार) त्या वेळेच्या शासनाने दिलेल्या मूळ सरकारी जमिनी.

परंतु, मदतमाश इनाम जमिनींचा मुंतखब (सनद) हा, उपखंड (एक) ते (चार) मध्ये मोडत नाही, याची जिल्हाधिकारी यांनी पडताळणी करावी.

 4दिनांक २४.९.२०२४ रोजीच्‍या राजपत्र, असाधारण क्रमांक ४३

महाराष्ट्र अध्‍यादेश क्रमांक ८/२०२४ अन्‍वये, हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे (सुधारणा) कायदा १९५४ च्‍या कायद्‍यातील कलम ६ मध्ये, पोट-कलम (३) मधील, -

(१) खंड (अ) मध्ये,

(अ) पहिल्या परंतुकामधील, पन्नास टक्केया मजकुराऐवजी, “पाच टक्के" हा मजकूर दाखल करण्यात आला;

 (ब) दुसऱ्या परंतुकामधील, अशा जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या पन्नास टक्के हा मजकूर, ज्या दोन ठिकाणी आला आहे त्या दोन्ही ठिकाणी त्याऐवजी, “अशा जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या पाच टक्केहा मजकूर दाखल करण्यात आला;

(२) खंड (ब) मध्ये, परंतुकामधील, “पन्नास टक्केया मजकुराऐवजी, “पाच टक्के" हा मजकूर दाखल करण्यात आला.

4दिनांक ८ ऑक्टोबर, २०२४:

महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक: बैठक- २०२४/प्र.क्र. ९५/ज-७ अन्‍वये,

हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) अध्यादेश, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ८, दिनांक २४.९.२०२४) अध्यादेशाव्दारे करण्यात आलेल्या सुधारणेची अंमलबजावणी सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी करावी. यापुढे हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५४ अंतर्गत येणाऱ्या मदतमाश जमीनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करण्यासाठी / कृषीतर प्रयोजनासाठी करण्यात आलेली हस्तांतरणे नियमित करणेसाठी ५०% ऐवजी ५% इतकी नजराणा रक्कम आकारण्यात यावी.  दंडाच्या रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 २. हैद्राबाद इनाम जमीन व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५४ चे कलम २ (ए) नुसार सक्षम न्यायालयाच्या निर्णयामुळे कोणत्याही जमीनीबाबतचा वाद वरीष्ठ न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे बंधन संबंधीत यंत्रणेवर राहील. विशेषत: इनाम जमीन मदतमाश आहे किंवा खिदमतमाश आहे याबाबतचा वाद मा. उच्च न्यायालयात अथवा मा. सर्वोच्च न्यायालयात गेल्यास व मा. उच्च न्यायालयाने अथवा मा. सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय दिल्यास त्या निर्णयानुसार संबंधीत जिल्हाधिकारी यांनी अंमलबजावणी करावी.

 ३. हैद्राबाद इनाम जमिन व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५४ चे कलम ६(१) नुसार तसेच जोडतक्ता २-अ, लेजर अकाउंट नुसार मदतमाश म्हणून जाहीर करण्यात आलेली जमीन जर वक्फ बोर्डाने वक्फ अधिनियम, १९५४ च्या कलम ५ ( २ ) अन्वये वक्फ मालमत्ता म्हणून जाहिर केली असेल तर, वक्फ बोर्ड जोपर्यंत जाहिर केलेल्या जमीनीच्या यादीमधून जाहिर करण्यात आलेल्या या जमीनीचा तपशील वगळत नाही तोपर्यंत महसूल अभिलेखानुसार ही जमीन मदतमाश म्हणून नोंद घ्यावयाची कार्यवाही करण्यात येऊ नये. मात्र वर २ येथे नमूद केल्यानुसार वरिष्ठ न्यायालयाने निर्णय दिला असल्यास त्याप्रमाणे महसूल अभिलेखात नोंद घेण्याची कार्यवाही करता येईल.

 ४. शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक- जमीन-२०१८ / प्र. क्र. ९०/ज-१ दिनांक ८.३.२०१९ व दिनांक २७.३.२०२३ मधील तरतुदीनुसार या मदतमाश जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरण करताना / कृषीतर प्रयोजनासाठी करण्यात आलेली हस्तांतरणे नियमित करताना रुपांतरण अधिमूल्याची रक्कम १ कोटी पेक्षा अधिक आहे, अशा प्रकरणी रुपांतरण करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी.

4दिनांक ३ मार्च, २०२५

महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक बैठक-२०२४/प्र.क्र. ९५/ज-७ अन्‍वये,

मदतमाश जमीनीच्या प्रकरणी परवानगी शिवाय हस्तांतरण / वापरात बदल केला असल्यास शेवटचा शर्तभंग हाच एकमेव शर्तभंग समजून अशी प्रकरणे शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक जमीन-२०२२/प्र.क्र.१०६/१, दिनांक ५ जुलै २०२३ मधील तरतूदीनुसार नियमानुकुल करण्यासाठी शासनास सादर करण्यात यावीत.

 4दिनांक ३१ डिसेंबर, २०२५

शासन राजपत्र असाधारण क्रमांक ७५

महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६१/२०२५. - हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५४ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

१. या अधिनियमास, हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्यावावत (सुधारणा) अधिनियम, २०२५, असे म्हणावे.

 २. हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५४ याच्या कलम ६ मध्ये, पोट-कलम (३) मधील, खंड (ब) मधील, विद्यमान परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल.

'परंतु आणखी असे की, प्रारंभाच्या दिनांकापूर्वी (३१.१२.२०२५) भोगवटादाराकडून, नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग-दोन) धारण केलेल्या मदतमाश इनाम जमिनींच्या अशा कोणत्याही भोगवट्याचे, जिल्हाधिकार्‍यांच्या किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वमंजुरीशिवाय, निवास प्रयोजनासाठी, आधीच हस्तांतरण करण्यात आलेले असेल तर, अशा हस्तांतरणाचा पुरावा म्हणून, विक्री खत, बक्षीसपत्र, भाडेपट्टा करार, इत्यादींसारखे, नोंदणीकृत संलेख किंवा जर असे नोंदणीकृत संलेख उपलब्ध नसतील तर अशा हस्तांतरणाचा पुरावा म्हणुन स्थानिक स्वराज्य संस्थेकडील मालमत्ता कर अकारणी नोंदवहीची प्रमाणित प्रत सादर केल्यानंतर, नजराणा म्हणून कोणतीही रक्कम प्रदान न करता, असे हस्तांतरण, आदेशाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना नियमित करता येईल; आणि त्यानंतर, अशी जमीन, अशा आदेशाच्या दिनांकापासून, हस्तांतरिती भोगवटादाराने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या तरतुदींनुसार, भोगवटादार वर्ग-एक म्हणून धारण केलेली असल्याचे मानण्यात येईल.

       

bžb

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला हैद्राबाद इनाम व वतन कायदे - मदतमाश-खिदमतमाश इनाम. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.