आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

सर्वेक्षण व जमाबंदी

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

सर्वेक्षण व जमाबंदी

(Survey and Settlement)

 मराठ्यांची जमीन महसुलाची पद्धत मुख्यत्वेकरून रयतवारी पद्धत होती, म्हणजे जमीन महसूल जमिनीच्या धारण करणाऱ्याकडून सरळ वसूल केला जात होता. काही अपवाद सोडल्यास (म्हणजे इनाम जमिनी इ.चे) जमीन धारण करणारे व सरकार यांचेमध्ये कोणीही मध्यस्थ नव्हते. मुंबई राज्यात इंग्रजांनी हीच पद्धत अंमलात आणली.

 इंग्रजांना आपले आसन या देशात स्थिर करावयाचे होते. रयतेत असंतोष असणे म्हणजे आपल्या आसनास सुरूंग लावून घेणे, हे त्यांनी ओळखले म्हणून कायदेशीर रास्त व न्याय अशी जमीन महसुलाची स्थिर स्वरूपाची महसूल आकारणी जरूर आहे असे त्यांना दिसून आले.

 या उद्देशाने त्यांनी श्री. प्रिंगल या इंग्रज अधिकाऱ्याची १८२७ मध्ये नेमणूक केली. त्याने जमिनीची १. उत्तम, २. मध्यम, ३. कनिष्ठ अशा तीन प्रतीत विभागणी केली. मशागतीच्‍या खर्चाचा विचार केला. उत्पन्नातून मशागतीचा खर्च वजा जाऊन जे उत्पन्न राहील त्या मानाने आकारणी ठरविली. परंतु ही पद्धत टिकू शकली नाही.

कारण (१) उत्पन्न व खर्च याचा अंदाज बरोबर काढता येणे कठीण होते

(२) जमीन महसुलाची आकारणी कमी व्हावयास पाहिजे होती ती झाली नाही.

त्यानंतर आकारणी ठरविण्याचे बरेच प्रयोग करण्यात आले.

शेवटी १८६८ साली 'मूळ पहिली रिव्हिजन सेटलमेंट' (जमाबंदी) अंमलात आणण्यात आली.

या सेटलमेंटच्या (जमाबंदीच्या) पद्धतीत, सेटलमेंटच्या कामकाजात ज्या अडचणी आल्या त्याचा विचार करून वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. ही मुंबई राज्याची सुरुवातीची (ओरिजिनल) व वेळोवेळी सुधारणा केलेली (रिव्हिजन सर्व्हे) सर्व्हे १९०१ मध्ये पुरी झाली. (ओरिजनल सर्व्हे = प्राथमिक जमाबंदी, रिव्हिजन सर्व्हे फेरतपासणी केलेली जमाबंदी)

भूमापनाचे कागदपत्र सुव्यवस्थित ठेवण्यासाठी ‘भूमी अभिलेख’ (Land Records) खात्याची स्थापना करण्यात आली.

 l जमीन महसूल आकारणीच्या पद्धतीचे वैशिष्ट्य:

 (१) जमीन महसूल ही जमिनीवरील आकारणी आहे. जमीन कसणाऱ्यावरील कर नाही.

(२) जमिनीच्‍या क्षेत्रानुसार आकारणी होते, मग त्या जमिनीच्या मालकाकडे दोन एकर जमीन असो किंवा दोन हजार जमीन असो. दोन एकरावर दोन एकराचीच आकारणी होते; दोन हजार एकरावर दोन हजार एकराचीच आकारणी होते.

(३) जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर आकारणी होते; जमीन मालकाच्या आर्थिक स्थितीनुसार, नाही; किंवा त्याच्या कसण्याच्या कौशल्यावरही नाही. त्याने जास्त कौशल्याने शेती केल्यास जे अधिक उत्पादन येईल त्यामुळे आकारणीत वाढ होत नाही.

 (४) महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता, कलम ९४ मध्ये नमूद केलेल्या विविध बाबींचा विचार करून आकारणी ठरविण्यात येते.

 (५) आकारणीत अन्याय झाला असे वाटल्यास वरिष्ठाकडे दाद मागता येते.

 w 'वर्गवारीची किंमत' या संज्ञेचा अर्थ जमिनीचा प्रकार, तिचे स्थान, पाणी व इतर फायदे लक्षात घेऊन भूमापन अभिलेखात नोंद केल्याप्रमाणेची जमिनीची सापेक्ष किंमत असा आहे.

 w 'जमिनीचा वर्ग' म्हणजे म.ज.म.अ. कलम ९०-ब अन्‍वये जमिनीचा पुढीलपैकी कोणताही वर्ग, उदा. कोरडवाहू जमीन, भाताची जमीन, बागायत जमीन, वरकस जमीन. 

सर्वसाधारणपणे वरकस जमीन ही कोरडवाहू जमीन म्हणून मानण्यात येत असे. जमीन महसुलाची आकारणी व जमाबंदी करण्याच्या प्रयोजनासाठी वरकस जमिनीची वेगळी वर्गवारी लावणे आवश्यक आहे. कारण ती जमीन राब खते वगैरेच्या उपयोगासाठी सामान्यतः वापरण्यात येते व त्यात नेहमीची पिके काढण्यात येत नाहीत आणि म्हणून वरकस जमिनीचा समावेश करण्यासाठी जमिनीच्या वर्गामध्ये 'वरकस' जमिनीचा समावेश केला आहे.

वरकस जमीन, केवळ तेथील गवत जाळून, राब व खते वगैरेसाठी उपयोगात आण्यात येते. त्यात नेहमीची पिके काढता येत नाहीत.

  बागायती जमिनीमध्ये भाताची व इतर बागायती असे आणखी दोन पोट भाग आहेत.

'इतर बागायतीमध्ये (अ) विहिरीचे पाणी मिळणारी व (ब) नदीचे ओढ्याचे किंवा सरकारी पाटाचे पाणी मिळणारी असे दोन प्रकार आहेत.

  भाताच्या शेतीमध्ये (अ) खार जमीन व (ब) गोड्या पाण्याची जमीन असे दोन प्रकार.

विहिरीचे पाण्याखालील जमिनीस मोटस्थळ व पाटाचे पाणी मिळणाऱ्या जमिनीस पाटस्थळ असे म्हणतात.

 w 'घटक साधन प्रमाण' म्हणजे जमिनीच्या वर्गवारीच्या मंजूर योजनेत समाविष्ट केलेल्या जमिनीच्या प्रकाराचे तत्सम मूल्य.

 w 'गट' या संज्ञेचा अर्थ जमीन महसुलाच्या आकारणीच्या कारणासाठी तेच प्रमाण दर लागू करण्यासाठी म.ज.म.अ. कलम ९४ (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या गोष्टीच्या संबंधाने ज्या जमिनी राज्य सरकारच्या मते किंवा या बाबतीत त्याने अधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या मते पुरेशा एकसारख्या असतील अशा एखाद्या प्रदेशातील सर्व जमिनी असा होतो.

जमिनीचा बाह्य आकार, हवामान व पर्जन्यमान, बाजाराचे सानिध्य, दळणवळणाची साधने, दर्जा, लोकसंख्या व मजुरांचा पुरवठा, शेतीची उपयोगासाठी जरूर लागणारी साधने, मंजुरी, किंमती, पिके इ. बाबीत सर्वसाधारण एकसारखेपणा असलेल्या जमिनीचा गट.

 w 'जमाबंदी' या संज्ञेचा अर्थ जमीन महसुलाची आकारणी ठरविण्यासाठी एखाद्या प्रदेशात चालवलेल्या कामकाजातून निष्पन्न झालेली व्यवस्था असा आहे.

 जमाबंदीमध्ये खालील बाबींचा समावेश होतो.

१. अंदाज घेणे २. चौकशी करणे ३. माहिती गोळा करणे व त्या माहितीच्या व चौकशीच्या आधारे आकारणीचे दर ठरविणे.

w गटातील एखाद्या विशिष्ट जमिनीच्या बाबतीत 'प्रमाण दर' (कृषि विषयक) म्हणजे त्या वर्गाच्या सोळा आणे किंमतीच्या वर्गवारीच्या जमिनीवरील दर एकरी पिकांच्या सरासरी उत्पन्नाच्या एक पंचविसांशापेक्षा अधिक नाही अशी किंमत आणि वर उल्लेखिलेल्या क्षेत्रातील घटक प्रमाणाच्या बाबतीत राज्य सरकारने विहित केलेल्या सोळा आणे किंमतीच्या जुळत्या असलेल्या जमिनीच्या प्रकाराची संख्या.

जमिनीचे वरकस, कोरडवाहू, जिराईत, बागाईत, भाताची... इ. वर्ग केले आहेत. त्या वर्गवारीवरून दर एकरी पिकांचा अंदाज बांधण्यात येतो. पिकांची आणेवारी करून सोळा आणे पीक येईल असे गृहित धरून त्याच्या उत्पन्नाचा एक पंचवीसांश हिस्सा हा त्या जमिनीचा 'प्रमाण दर' मानण्यात आला आहे.

 wजमाबंदीची मुदत' या संज्ञेचा अर्थ राज्य सरकारने, ज्या मुदतीसाठी जमाबंदी अंमलात राहण्याबद्दल जाहीर केले असेल ती मुदत असा आहे. जमाबंदीची मुदत सामान्यपणे ३० वर्षे  असते. ( म.ज.म.अ. कलम ९३ )

 w  'प्रदेश' या संज्ञेचा अर्थ एका किवा त्याहून अधिक जिल्ह्यातील तालुक्याच्या किंवा तालुक्यांच्या गट किंवा त्यांचे भाग यांचा बनलेला जो स्थानिक प्रदेश राज्य किंवा तालुक्यांचा गट किंवा त्यांचे भाग यांचा बनलेला जो स्थानिक प्रदेश राज्य सरकारच्या किंवा या बाबतीत अधिकार दिलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या मते, (१) जमिनीचा बाह्य आकार, (२) हवामान व पर्जन्यमान,          (३) सदरहू स्थानिक क्षेत्रात उत्पन्न करण्यात येणारी मुख्य पिके, आणि (४) जमिनीची वैशिष्ट्ये याच्या संबंधात संलग्न आणि एकसारखा असेल तो प्रदेश असा आहे.

 l जमाबंदीसंबंधी अंदाज :

(१) म.ज.म.अ. कलम ९३ अन्वये कोणत्याही जमिनीच्या जमाबंदीसंबंदी किंवा नवीन जमाबंदीसंबंधी निर्देश देण्यापूर्वी राज्य सरकारने, जमाबंदीचे संभवनीय निष्कर्ष काय होतील याचा अंदाज तयार करण्याची व्यवस्था, या कारणासाठी देण्यात येतील त्या आदेशानुसार करविली पाहिजे.

 (२) जमीन महसुलाची निश्चिती किंवा पुर्ननिरीक्षण आणि ज्या कालावधीसाठी जमाबंदी करावयाची असेल तो कालावधी यासंबंधीच्या अंदाजावर आधारलेल्या योजनेसह जमाबंदी करण्याचा राज्य सरकारचा इरादा असल्याची नोटीस, हरकती मागविण्यासाठी राज्य सरकार ठरवील अशा रीतीने प्रसिद्ध करण्यात आली पाहिजे.

 (३) असा अंदाज व योजना राज्य विधानमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एकवीस दिवसांहून कमी नाही इतक्या मुदतीत त्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या प्रत्येक सदस्याकडे पाठविल्या पाहिजेत.

(४) योजनेमध्ये फेरफार करू इच्छिणाऱ्या राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सदस्याने याबाबतच्या प्रस्तावाची सूचना अधिवेशन सुरू होण्याच्या दिवसापर्यंत दिली पाहिजे आणि अशा प्रस्तावावर प्रत्येक सभागृहाची चर्चा करण्यासंबंधीची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे.

 (५) जमाबंदीसंबंधीचे निर्देश देण्यापूर्वी राज्य सरकार, उक्त अंदाजाशी आणि दोन्ही सभागृहाचे ज्यावर एकमत झाले असेल अशा योजनांशी संबंधित असा कोणताही ठराव स्वीकारील आणि संबंधित इसमाकडून येतील अशा कोणत्याही हरकती विचारात घेईल.

 l कोणत्याही जमिनीच्या जमीन महसुलाची प्राथमिक जमाबंदी करण्याबद्दल किंवा जमाबंदीत फेरफार करण्याबद्दल किंवा जमाबंदीत फेरफार करण्याबद्दल निदेश देण्याचा राज्य सरकारचा अधिकार :- म.ज.म.अ. कलम ९१ च्या उपखंडाच्‍या अधीन राहून, राज्य सरकारास ज्या जमिनीचे म.ज.म.अ. कलम ७९ मध्ये महसुली मोजणी करण्यात आली असेल किंवा नसेल अशा कोणत्याही जमिनींच्या जमीन महसुलाची जमाबंदी ('प्राथमिक जमाबंदी') किंवा अशा जमिनीची नव्याने जमाबंदी ('फेरतपासणी केलेली जमाबंदी')  करण्याबद्दल कोणत्याही वेळी निर्देश देण्याचा अधिकार आहे;

परंतु, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या जमाबंदीचा मुदत संपण्यापूर्वी आकारणीत केलेली कोणतीही वाढ अंमलात येणार नाही.

 w प्राथमिक जमाबंदी (Original Survey) किंवा फेरतपासणी केलेली जमाबंदी (Revision Survey) कोणत्याही ठिकाणी सुरू करण्यापूर्वी सरकारने जमाबंदीचे अंदाजपत्रक तयार केले पाहिजे.

जमाबंदीच्या अंदाजपत्रकात खालील बाबी समाविष्‍ठ असतील:

(१) ही जमाबंदी केल्यामुळे येणाऱ्या महसुलाची उत्पन्नाची शक्यता;

(२) सध्याची आकारणी व जमाबंदीनुसार नवीन अंदाजलेली आकारणी याच्यातील तफावत; (३) जमाबंदी किती वेळेपर्यंत चालेल ती मुदत.

हा जमिनीसंबंधी अंदाज विधानमंडळाच्या बैठकीमध्ये कलमात सांगितलेल्या पद्धतीने मांडण्यात येईल व विधानमंडळाने मंजूर केलेल्या ठरावाच्या अनुरोधाने जमाबंदीचे पुढील कामकाज त्यानंतर चालावयाचे आहे.

 जमाबंदीची मुदत : जमाबंदी ही तीस वर्षे किंवा राज्य सरकार कोणत्याही बाबतीत, लेखी नमूद करण्याच्या कारणासाठी त्या बाबतीत निर्देश देईल अशा त्याहून कमी असलेल्या मुदतीपर्यंत अंमलात रादे आणि अशी मुदत संपल्यानंतर ही जमाबंदी नव्या जमाबंदीची मुदत सुरू होईपर्यंत अंमलात असण्याचे चालू राहील.

 l आकारणी कशी ठरवावयाची:

 (१) ज्या जमिनीच्या संबंधात म.ज.म.अ. कलम ९२ अन्वये जमाबंदी करण्याबद्दल निर्देश देण्यात आला आहे आणि ज्यांना नवीन महसूल देण्याच्या बाबतीत संपूर्णत: माफी देण्यात आलेली नाही अशा सर्व जमिनीवरील जमीन महसुलाची आकारणी ही कलम म.ज.म.अ. ६८ (१) च्या पहिल्या परंतुकामध्ये अंतर्भूत असलेल्या मर्यादेस अधीन राहून, ज्या जमिनीची जमाबंदी करावयाची आहे त्या जमिनीचे राज्य शासनाकडून या बाबतीत करण्यात येतील अशा नियमानुसार गट पाडून आणि प्रत्येक गटासाठी प्रमाण दर ठरवून ठरविण्यात आली पाहिजे.

 (२) गट बनविताना ह्या पोटकलमाच्या खंड (अ) मध्ये निर्दिष्ट केलेल्या गोष्टी सामान्यतः विचारात घेण्यात आल्या पाहिजेत. परंतु आवश्यक असेल तेव्हा खंड (ब) मध्ये निर्दिष्ट केलेल्या गोष्टीही त्या कारणासाठी विचारात घेण्यात आल्या पाहिजेत:-

(अ) (१) जमिनीचा बाह्य आकार; (२) हवामान व पर्जन्यमान; (३) किंमती आणि; (४) मुख्य पिकांची पैदास;

 (ब) (१) बाजार (२) दळणवळण (३) मशागतीचा दर्जा (४) लोकंसख्या व मजुरांचा पुरवठा (५) शेतीविषयक उत्पन्नाची साधने (६) गेल्या वीस वर्षातील भोगवट्यात असलेल्या व लागवड केलेल्या जमिनीच्या क्षेत्रफळातील फेरफार (७) मजुरी (८) जमिनीची लागवड करण्याकरिता वेतनाच्या स्वरूपात आलेला मजुरीचा खर्च धरून मुख्य पिकांच्या लागवडीसाठी येणारा साधारण खर्च.

 (३) प्रत्येक भूमापन क्रमांक व पोटविभाग यावरील जमीन महसुलाची आकारणी ही त्यांच्या प्रतबंधीच्या किंमतीवर विहित केलेल्या रीतीने ठरविली पाहिजे.

 w धारकाच्या खचनि केलेल्या सुधारणामुळे सरासरी उत्पन्नात झालेली वाढ ही विचारात घेता कामा नये :- कोणत्याही जमिनीत ती धारण करणाराने किंवा त्याच्या खर्चाने कोणत्याही सुधारणा केलेल्या असतील तर, उक्त सुधारणांमुळे अशा जमिनीच्या पिकांच्या सरासरी उत्पन्नातील वाढ ही त्या जमिनीची फेरतपासणी केलेली आकारणी ठरविताना विचारात घेता कामा नये. मालकाने केलेल्या सुधारणेत ढोबळ मानाने कशाकशाचा समावेश होऊ शकेल. १) विहिरी, तळी, बांध, कालवे खोदणे इत्यादी पाण्याच्या साधनांची शेती सुधारणेसाठी सोय करणे २) जमिनीतील पाण्याचा निचरा करण्यासाठी सोय करणे ३) बांधबंधारे

घालून जमिनी दुरुस्त करणे ४) जमीन अधिक किफायतशीर रीतीने लागवडीखाली आणण्यासाठी तीवर इमारत बांधणे. म्हणजे नोकरचाकरांनी राहण्याची सोय किंवा स्वत:ची राहण्याची सोय इ.

या सर्व मालकाने केलेल्या मेहनतीमुळे व सुधारणांमुळे जमिनीच्या उत्पन्नात वाढ झाली तर ती जमाबंदीच्या कामाकरिता विचारात घ्यावयाची नाही.

 l जमाबंदी अधिकाऱ्याने जमाबंदीचे काम कसे सुरू करावे :

 जमाबंदी करताना जमाबंदी अधिकाऱ्याने पुढीलप्रमाणे काम चालविले पाहिजे:

(१) त्याने जमाबंदी करावयाच्या जमिनीची म.ज.म.अ. कलम ९४ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे विभागणी केली पाहिजे.

 (२) त्याने जमाबंदीच्या कारणासाठी जमिनीच्या पिकांचे सरासरी उत्पन्न विहित केलेल्या रीतीने निश्चित केले पाहिजे. सरकारी नियमांनी ठरविलेल्या रीतीने उत्पन्न निश्चित करावयाचे आहे.

 (३) त्यानंतर त्याने म.ज.म.अ. कलम ९४ पोटकलम (२) मध्ये तरतूद केलेल्या संबंधित गोष्टींचा विचार करून प्रत्येक गटातील जमिनीच्या प्रत्येक वर्गासाठी प्रमाण दर ठरविले पाहिजेत.

 (४) म.ज.म. अधिनियमान्वये केलेल्या नियमांनी विहित केलेल्या रीतीने त्याने या कलमाच्या प्रयोजनाकरिता चौकशी केली पाहिजे

 (५) त्याने, जमाबंदी बाबतच्या त्याच्या योजना असलेली प्रतिवृत्त ('जमाबंदीचे प्रतिवृत्त') विहित केलेल्या रितीने जिल्हाधिकाऱ्याकडे सादर केले पाहिजे.

 w प्रसिध्‍द करणे: जमाबंदी प्रतिवृत्त सादर केल्‍यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी असे प्रतिवृत्त विहित केलेल्या रितीने प्रसिद्ध करण्याची व्यवस्था केली पाहिजे. प्रत्येक गावात एक नोटीसही मराठी भाषेत प्रसिद्ध केली पाहिजे व अशा नोटिशीत उक्त गावातील जमिनीच्या प्रत्येक वर्गासाठी चालू असलेला प्रमाण दर आणि जमाबंदी अधिकाऱ्याने त्यात सुचविलेली वाढ किंवा घट नमूद केली पाहिजे. तसेच उक्त नोटिशीत कोणत्याही इसमास अशा नोटिशीच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत, जमाबंदीच्या प्रतिवृत्तात दिलेल्या योजनासंबंधी त्याच्या ज्या कोणत्याही हरकती असतील त्या जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी सादर करता येतील असे नमूद केले पाहिजे.

जमाबंदीसंबंधी रिपोर्ट कोणत्या रीतीने प्रसिद्ध करावयाचे इ. संबंधी रीत राज्यसरकारने नियमांनी ठरवावयाची आहे.

 w हरकती, निवेदने: जिल्हाधिकार्‍यांनी, त्‍यांच्याकडे ज्या हरकती आल्या असतील त्या विचारात घेतल्यानंतर राज्य सरकार निर्देश देईल अशा अधिकाऱ्यामार्फत, उक्त जमाबंदीचे प्रतिवृत्त त्यावरील त्याच्या शेऱ्यासह राज्य सरकारकडे पाठविले पाहिजे.

 w महसूल न्यायाधिकरणाकडे निर्णयासाठी बाब पाठविणे : जिल्हाधिकार्‍यांनी म.ज.म.अ. कलम ९७ अन्वये प्रसिद्ध केलेल्या प्रतिवृत्तामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटत असणाऱ्या इसमास म.ज.म.अ. कलम ९७(२) अन्वयेच्या नोटिशीच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकडे बाब निर्णयासाठी पाठवावी म्हणून राज्य शासनाकडे अर्ज करता येईल. अशा इसमाने विहित करण्यात येईल अशी खर्चाची बाब अनामत ठेवल्यानंतर राज्य शासनाने, महसूल न्यायाधिकरणाकडे चौकशीसाठी प्रतिवृत्त पाठविण्यासंबंधी शासनाने, महसूल न्यायाधिकरणाने विहित केलेल्या रितीने चौकशीत न उपस्थित केलेल्या हरकतीवर आणि राज्य शासन विचारार्थ पाठवील अशा इतर बाबीवर आपले स्वतःचे मत सादर केले पाहिजे. राज्य शासनास, त्यास योग्य वाटेल अशा प्रकरणामध्ये सर्व खर्च किंवा त्याचा कोणताही भाग परत करण्यासठी नियम करता येतील.

 w जमाबंदीच्या प्रतिवृत्तावरील आदेश :

(१) जमाबंदीच्या प्रतिवृत्तावर कोणत्याही हरकती आल्या असल्यास त्या हरकतीसह प्रतिवृत्तावर आणि म.ज.म.अ. कलम ९९ अन्वये महसूल न्यायाधिकरणाकडे निर्णयार्थ पाठविलेल्या बाबीवर न्यायाधिकरणाचे कोणतेही मत असल्यास त्यावर राज्य शासनाकडून विचार करण्यात येईल. राज्य शासनास अशा प्रतिवृत्तावर त्यास योग्य वाटेल असा आदेश देता येईल;

परंतु, अशा दराचा परिणाम ज्या गावावर झाला असेल अशो प्रत्येक गावात म.ज.म.अ. कलम ९७ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे नवीन नोटीस लावल्याशिवाय आणि कोणत्याही हरकती आल्या असल्यास त्यावर राज्य शासनाकडून विचार करण्यात आल्याशिवाय राज्य शासनाने, जमाबंदीच्या प्रतिवृत्तात सुचविलेल्या प्रमाण दरात कोणतीही वाढ करता कामा नये. ह्या कलमाचे उपबंध शक्य होईल तेथवर अशा वाढीच्या देण्यात येतील अशा आदेशास लागू होतील.

 (२) जमाबंदीच्या प्रतिवृत्तावर कोणत्याही हरकती आल्या असल्यास त्या हरकतीसह असे प्रतिवृत्त म.ज.म.अ. कलम ९९ अन्वये महसूल न्यायाधिकरणाकडे निर्णयार्थ पाठविलेल्या बाबीवर न्यायाधिकरणाचे कोणतेही मत असल्यास, ते मत आणि राज्य शासनाने पोट-कलम (१) अन्वये दिलेले आदेश विधान मंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येतील.

 (३) राज्य शासनाने दिलेले आदेश अंतिम असतील आणि कोणत्याही न्यायालयाकडून हरकत घेण्यात येणार नाही.

 w पाण्याच्या फायद्याबद्दल आकारणीची माफी देण्याचा राज्य सरकारचा अधिकार:

 (१) राज्य सरकारास, कलम १०० अन्वये आदेश देतेवेळी पाण्यापासून होणाऱ्या कोणत्या फायद्याबद्दल किंवा निर्दिष्ट केलेल्या प्रकारच्या फायद्याबद्दल, ह्या प्रकरणान्वयेच्या आकारणीपासून कोणत्याही जमिनीस सूट देण्याचा अधिकार आहे.

 (२) राज्य सरकारास, संबंधित गावामध्ये मराठी भाषेत नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर आणि अशी नोटीस प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासून सहा महिन्याची मुदत संपल्यानंतर, जमाबंदीच्या मुदतीत कोणत्याही वेळी पोटकलम (१) अन्वये त्यांनी मंजूर केलेली कोणतीही सूट काढून घेण्याचा आणि अशा जमिनीवर अशा कायद्याबद्दल आकारणी बसविली पाहिजे असा निर्देश देण्याचा अधिकार आहे.

 w जमाबंदीची सुरुवात : राज्य सरकारने कलम १०० अन्वये आदेश दिल्यानंतर आणि त्याबद्दलची नोटीस विहित केलेल्या रीतीने दिल्यानंतर जमाबंदीचे काम सुरू करण्यात आल्याचे समजण्यात आले पाहिजे आणि अशा जमाबंदीस अनुसरून राज्य सरकार निर्देश देईल त्या तारखेपासून जमीन महसूल बसविण्यात आला पाहदे.

परंतु, ह्या कलमान्वये ज्या वर्षी प्राथमिक जमाबंदी किंवा फेरतपासणी केलेली जमाबंदी सुरू करण्यात येईल त्यावेळी ज्या जमिनीवरील नवीन आकारणी ही पूर्वीच्या आकारणीपेक्षा अधिक असेल अशा सर्व जुन्या व नवीन आकारणीत जो फरक असेल त्याची रक्कम परत देण्यात आली पाहिजे आणि फेरतपासणी केलेली आकारणी ही लगतपुढील वर्षापासून बसविण्यात आली पाहिजे.

तसेच, ज्या वर्षी फेरतपासणी झालेली जमाबंदी सुरू केली असेल अशा वर्षाच्या लगत पुढील वर्षी जो खातेदार धारण केलेल्या भूमापन क्रमांकापैकी कोणत्याही भूमापन क्रमांकावर किंवा त्याच्या पोट विभागावर अशा नवीन आकारणीमुळे दरात झालेल्या वाढीमुळे नाखूष झाला आहे अशा इसमास त्याने म.ज.म.अ. कलम ५५ मध्ये तरतूद केलेल्या रीतीने असा क्रमांक किंवा पोट विभाग सोडून दिल्यावर, अशा रीतीने बसविलल्या दरात वाढीची सूट मिळेल.

 w जमाबंदीचा अंदाज केला, कायदेमंडळापुढे तो ठेवला व त्यातील ठरावाचा समावेश केला गेल्यानंतर व इतरांच्या तक्रारीची जरूर ती दखल घेतल्यानंतर जमाबंदीसंबंधी हुकूम देण्यात येईल. या हुकूमानंतर यासंबंधीची नोटीस सरकारी नियमांनी ठरविलेल्या रीतीने द्यावयाची व त्यानंतर जमाबंदीचे काम सुरू झाले असे समजावे.

 l मोजणी: प्रथमतः जमिनीची पाहणी व भूमापन मोजणी सर्व्हे मोगलांच्या काळात करण्यात आली. त्याकाळी मोजणी करणाऱ्या नोकरवर्गास मिरडाहा, त्यांच्या अधिकाऱ्यास कानुंगी म्हणत.

मोगलकालीन जमीन मोजणीचे उत्तर भागातील परिणाम 'गज' या नावाने ओळखले जात असे. दक्षिण भागात 'काठी' हे परिमाण होते.

 w 'सर्व्हे' (Survey): या इंग्रची शब्दाचा स्थूल मानाने अर्थ 'पाहणी' असा आहे.

परंतु पाहणी याचा अर्थ व्यापक अर्थाने स्पष्ट होत नाही.

तांत्रिकदृष्ट्या 'सर्व्हे' या शब्दाचा अर्थ, जमिनीची पाहणी करून व तिची मोजणी करून जमिनीचा बाह्य आकार कसा आहे ते पाहणे व तो पृष्ठभाग आणि त्यावरील वस्तूचे स्थान सपाट पृष्ठभागावर ज्याप्रमाणे दिसेल त्याप्रमाणे त्याचे रेखा (चित्रण) करणे. या रेखनात जमिनीच्या पृष्ठभागात केवळ वर दिसणाऱ्या वस्तुंचाच समावेश होतो असे नाही तर त्यात तलावाचे तळ, नद्या, खाणीचे अंतर्भाग  वगैरेंचाही समावेश होतो.

 w मोजणीची साधने:

पूर्वी, (१) चेन (साखळी) (२) ॲरोज (बाणाकृती टोक असलेले हत्यार) (३) क्रॉस स्टाफ

 (४) टेप (५) प्लेन टेबल (६) थिओडोलाईट (७) फ्लॅग (निशाणे) अशी साधने मोजणीसाठी वापाली जायची.

चेन किंवा साखळी, अँरो व टेप ही जमिनीची लांबी रुंदी मोजण्यात म्हणजे रेषात्मक अंतर मोजण्याची साधने आहेत.

∙ चेन किंवा साखळी: ही लोखंडी असते; तिला सोळा दुवे असतात. सर्व साखळी रुपाया लांबीची मानली तर प्रत्येक दुवा एक सोळांश म्हणजे १ आणा इतका होतो. साखळीची एकूण लांबी ३३ फूट असते.

 ∙ अँरो (बाण): हा लोखंडाचा, १५ इंच लांब असतो. त्‍याचे एक टोक किंचितसे बाणाकृती असते म्हणून त्याला अँरो म्हणतात. साखळीने मोजमाप करणाऱ्याकडे असे १० ॲरो असतात. ज्यावेळी हे लोखंडी ॲरो उपलब्ध होत नाहीत त्यावेळी लाकडाच्या जाड काठ्या वापरता येतात.

 ∙ क्रॉस स्टाफ : हे साधन दिलेल्या साखळीच्या रेषेस काटकोनाकृती बसविण्यात येणारा गोल किंवा चौकोनी लाकडाच ठोकळा असतो, त्याची जाडी एकपूर्णांक एक द्वितीयांश इंच असते. ठोकळा गोल असल्यास त्याचा व्यास डायमीटर सहा इंच असतो व चौकोनी असल्यास रुंदी सहा इंच असते. त्याला पाव इंच जाडीचे काटकोनात असलेल्या दोन भेगा असतात.

जमिनीत जाण्यास सोपे व्हावे म्हणून टोक असलेली 'स्टाफ' काटकोनात जमिनीत पुरण्यात येतो. या 'स्टाफला' पाच फूट उंचीवर वर वर्णन केलेला क्रॉस आडवा बसविण्यात येतो. सुरुवातीस सर्व्हेच्या कामात चेन किंवा साखळी व क्रॉस स्टाफ (रॉक) हीच वापरण्यात येत असे.

नंतर प्लेन टेबलाचा वापर सुरू झाल्यापासून यांचा वापर कमी होत गेला.

 ∙ प्लेन टेबल : देवदार किंवा ओक झाडाच्या फळीचा वापर केलेला हा ड्राईंग काढण्याचा बोर्ड फळा आहे. त्रिकोणी लाकडी स्टँडवर बसविलेला असतो. आपल्याकडील सर्व्हेमध्ये वापरण्यात येणारा बोर्ड ३० इंच लांब, चोवीस इंच रुंद व एक इंच जाड असतो. या टेबलाला एक 'साईटिंग कल' असतो. याशिवाय डिव्हायडर, प्लॉटिंग स्केल, पेन्सिल, पिना, ड्राईंग पिना, रबर इ. गरज असते.

 ∙ थिओडोलाईट : उभे व आडवे कोन ठरविण्यासाठी वापरण्यात येणारे साधन.

 ∙ टेप:  मोजणीची टेप ३३ फुटी, ५० फुटी, ६६ फुटी किंवा १०० फुटी असते.

ही टेप बहुधा कापडी किंवा पातळ धातूच्या पट्टीची असते.

 'ओरिजिनल सर्व्हे: कॅडेस्ट्रल सर्व्हे १८३६ साली पहिल्या प्रथम पुणे जिल्ह्यात करण्यात आली. त्यानंतर ती सर्व जुन्या मुंबई प्रांतात झाली, ही पहिली 'ओरिजिनल सर्व्हे. १८५४ साली पहिल्या मूळ सर्व्हेतील (पाहणीतील) चुका दुरुस्त करण्याकरिता सर्व्हे करण्यात आला, त्याला 'रिव्हिजनल सर्व्हे म्हणतात.

 ∙ सर्व्हे नंबर व त्याची ऐतिहासिक उत्‍पत्ती:

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सुरुवातीस त्यावेळच्या जमीन महसूल कायद्यानुसार जमीन महसूल वसूल करून देणारा मध्यस्थ हा नोंदलेला धारण कर्ता म्हणून त्याची नोंद केली. प्रत्यक्षात ज्याच्या ताब्यात जमीन होती तो मात्र नोंदला गेलेला नव्हता.

 सन १९०८ सालापासून यात बदल करण्यात आला व ज्याच्या प्रत्यक्ष कबज्यात जमीन आहे त्याचे नाव धारण करणारा म्हणून नोंदण्यात आले. हा रयतवारी पद्धतीचा पाया होय.

 यावेळी ‘बिघा’ हे मोगलकालीन जमीन मोजणीचे परिणाम होते, ते रद्द करून ‘एकर’ हे इंग्रजी परिमाण उपयोगात आणले.

सामान्यतः एक बैलजोडी जेवढ्या क्षेत्रात काम करू शकेल तेवढे क्षेत्र एका सर्व्हे नंबरमध्‍ये धरण्यात आले. सामान्यपणे एक सर्व्हे नंबरमध्‍ये २० ते २५ एकर साधारण कोरडवाहू जमीन किंवा १५ एकर मध्यम दर्जाची कोरडवाहू जमीन, १२ एकर उत्तम दर्जाची कोरडवाहू जमीन किंवा ४ एकर भात शेती असते. परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो. आता एकर- गुंठा ऐवजी हेक्टर आर हे मेट्रिकमध्ये मापे उपयोगात आली आहेत.

 l जमीन महसूल प्रशासनाची ब्रिटिशकालीन कार्यपद्धती:

दख्खनचे पहिले कमिशनर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हे होते. त्यांनी शेवटच्या बाजीरावांच्या काळात जी जमीन महसुलाची वसुली लिलाव पद्धतीने होती ती सोडून, जमिनीचे क्षेत्रफळ वर्गवारी इत्यादीसंबंधी जेवढी जेवढे बाबी होत्य त्या तशाच ठेवून जमीन महसुलाची वसुली चालू ठेवली.

पण त्यात अनेक गुंतागुंती निर्माण होवू लागल्या म्हणून श्री. प्रिंगल यांनी प्रत्येक गावात जावून त्या गावाच्या हद्दी ठरवून प्रत्येक मालकाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची मोजणी केली. त्यासाठी ३३ फूट लांबीची साखळी उपयोगात आणली आणि एक क्रॉस स्टाफ याच्या आधारे जमिनीची मोजणी करून त्या त्या मालकाचे जमिनीची क्षेत्रफळ ठरविले आणि इंग्रजी क्षेत्रफळाचे माप एक एकर असे ठरविले व त्याहून कमी माप गुंठ्यांचे होते. एक गुंठा ३३ X म्हणजे १०८९ चौ. फुटाचा होता. ४० गुठे म्हणजे एक एकर.

 प्रत्येक मालकाकडे असलेले जमिनीचे क्षेत्रफळ काढले. एक सर्व्हे नंबर (भूमापन क्रमांक) साधारणपणे १०० एकराहून कमी असावयाचा व त्या भूमापन क्रमांकांचे पोट हिस्से करून ते त्या त्या मालकाचे नावाने नोंदवले गेले.

 त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे जमिनीची प्रत (quality). ही प्रत त्या त्या क्षेत्र जे उत्पन्न घेण्यात येत होते त्यानुसार ठरविण्यात आली. त्यानंतर ते उत्पन्न काढण्याचा खर्च हिशोबात घेण्यात आला व सर्व हिशेबावरून सर्व शेवटी त्या जमीन मालकाला निव्वळ उत्पन्न विचारात घेवून जमीन महसूल ठरविण्यात येत असे. प्रत्येक गावाचे नकाशे, तालुक्याचे नकाशे, जिल्ह्याचे नकाशे काढून प्रत्येक गावाचे जमीन तिचे क्षेत्रफळ इत्यादीचा विचार न आल्यामुळे ती पद्धत फार काळ चालू शकली नाही.

 त्यानंतर आकारणीसाठी पहिल्या प्रथम जमिनीचे वर्गीकरण करण्यात आले. वर्गीकरण तीन प्रकारचे होते. (१) काळी माती (२) तांबडी माती (३) मुरमाड माती त्या त्या मातीच्या उत्पादकतेनुसार हे वर्गीकरण करण्यात आले.

परत त्याचे वर्गीकरण करण्यात आले. प्रत्येक मातीच्या खोलीनुसार ३ वर्ग करण्यात आले. त्या वर्गानुसार किती आणे उत्पन्न येईल ते ठरविण्यात आले.

∙ पहिल्या वर्गाची - काळी माती, १२ आणे, ∙ दुसरी ९ आणे, ∙ तिसरी - ६ आणे.

∙ तांबडी माती पहिल्या वर्गाची ५ आणे, ∙ दुसरी ३ आणे, ∙ तिसरी २ आणे. ∙ मुरमाड पहिला ४ आणे., ∙ दुसरा २, आणे. ∙ तिसरा १ आणा.

हे वर्गीकरण करण्यासाठी खड्डे घेवून माती किती खोल आहे. त्यानुसार तिचे वरीलप्रमाणे वर्ग करण्यात आले आणि त्‍यावरून आकारणी ठरवली गेली.

 त्यानंतर सर्वेक्षणाची म्हणजे सर्व्हे म्हणजे सर्व क्षेत्राच्या भूमापनाच्या पद्धतीची सुरुवात झाली.

भूमापन करताना हद्दीच्या खुणा ठरविण्यात आल्या. यानंतर जमिनीचा कस ठरविण्याबाबत

पद्धतीत बदल होत गेला. पावणेदोन हात खोलीची म्हणजे सर्वसाधारण २॥ एकर खोलीची काळी आणि पहिल्या वर्गाची समजण्यात आली. त्यानंतर ९ इंचानी खोली कमी होत गेली तर दुसरा वर्ग त्याहून ९ इंच खोली कमी झाली तर तिसरा वर्ग असे वर्गीकरण करण्यात आले.

बागायत जमिनीचे वर्गीकरण दोन प्रकारात केले गेले. मोटस्थळ म्हणजे मोटेचे पाणी मिळणाऱ्या जमिनी व पाटस्‍थळ म्‍हणजे पाटाच्या पाण्याने भिजणाऱ्या जमिनी.

 l नवीन पद्धतीची सुरुवात:

गोल्डस्मिथ व मेविनगेट या इंग्रज अधिकाऱ्यांनी नव्या प्रकारची पद्धतीची सुरुवात इंदापूर (पुणे जिल्हा) येथे केली. या पद्धतीमुळे शेतीच्या लागवडीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढले. महसुलाची वाढ झाली. मात्र महसुलाचे दर वैयक्तिक आकारणीच्या संदर्भात विचारपूर्वक कमी करण्यात आले. वरील अधिकाऱ्याच्या हे लक्षात आले की, जमीन महसुलाची आकारणी माफक असेल व जो जमीन कसतो, त्यावर कष्ट करतो त्याला अधिक नफा झाला तर तो अधिक जमीन कसेल व जमीन महसुलाची त्या प्रमाणात वाढ होईल. जमिनीची चांगली मशागत केली तर तिची किंमत वाढून अधिकाधिक उत्पादन वाढेल.

 सुरुवातीची पद्धत जमीन महसूल आकारणी ठरविण्यापुरतीच मर्यादित होती. पण यात गावाच्या जमिनीच्या हद्दी ठरविणे, जमिनीची प्रत तिच्यापासून मिळणारे उत्पन्न यासंबंधी बारकाईने विचार झालेला नव्हता. त्यानुसार नव्या पद्धतीने कामास सुरुवात झाली.

 इंदापूर तालुक्यात जी सुधारणा झाली तेथे विहिरीचे पाणी जेथे आहे (म्हणजे मोटस्थळ जमीन) तेथे एकरी रु. २/- ठरविण्यात आले.. त्यामुळे इंग्रज सत्तेखाली शेतकऱ्यावरील बोजा मोठ्या प्रमाणावर कमी झाला. या तत्त्वावर एकदा आकारणी केली की त्यात ३० वर्षापर्यंत बदल करावयाचा नाही हे धोरण ठरले व स्वीकारले गेले यालाच ‘मुंबईची जमाबंदी’ असे समजण्यात येते. आणि हे तत्त्व मुंबई राज्यात कमी अधिक फरकाने लागू झाले.

 w वर्गीकरण करण्याची पद्धत:

हे वर्गीकरण एक बंदा रुपया म्हणजे १६ आणे व त्यादृष्टीने १६ आणे उत्तम प्रतीच्या व त्याच्या दर्जानुसार जी कमी असेल त्यावेळी सर्व घटकांचा बाबींचा विचार करून आणेवारी ठरविण्यात येते. वर्गीकरणात जिराईत जमिनीच्या वर्गीकरणाची पद्धत वेगळी व बागायत मोटस्थळ पाटस्थळ जमिनीचे वर्गीकरणाची पद्धत वेगळी.

 जमीन मुख्य गावापासून किती लांब आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे किंवा कसे यावरून आकारणीचे दर ठरविले जात. गावापासून अर्धा पाऊण मैल असेल तर अधिक आकारणी व त्यापेक्षाही जास्त असल्यास कमी आकारणी हे तत्‍व ठरले.

 l सुधारित जमाबंदी ( Revisional Settlement):

सन १८६८ साली मूळ सर्वेक्षण जमाबंदीला (Original Survey Settlement) ३० वर्षे झाली व ३० वर्षापर्यंत फेरबदल होणार नाही असे जाहीर केले होते. त्यानुसार सुधारित जमाबंदीची सुरुवात झाली. त्या जमाबंदी, सुधारित जमाबंदी असे नाव न देता मूळ जमाबंदी असेच नाव देणे योग्य आहे. कारण त्या वेळेपर्यंत इंग्रज राज्यकर्ते भारतात स्थिरावले होते व भारत हा इंग्रजी साम्राज्याचा एक भाग झाला होता. व्हिक्टोरिया राणीचे राज्य होते.

मूळच्या जमाबंदीत किरकोळ फेरबदल करण्याचाच प्रश्न नव्हता तर सर्व प्रश्नांचा नव्याने विचार करण्याचा प्रश्न होता. शासनाने काही सुधारणा केल्यामुळे शेती उत्पन्नावर जो परिणाम झाला होता. त्याचाही विचार या प्रकरणात करणे आवश्यक होते.

 परंतु जमिनीची जी मूळ जमाबंदीच्या कारणासाठी जी मोजणी करण्यात आली ती काही उदाहरणे पडताळून पाहण्यासाठी अगदी बरोबर होती. केवळ काही ठिकाणे न पाहता सर्व ठिकाणे मोजणीच्या दृष्टीने पाहिल्यावर ती बिनचूक होती. त्यामुळे पहिला प्रश्न तो जमीन महसूल आकारणीचा म्हणून मोजणीसाठी जो जादा तांत्रिक नोकरवर्ग नेमला होता. ज्याचेकडे जमिनीची मोजणी व वर्गीकरण सोपविले होते. तो इतरत्र सामावून घेवून आणि सन १८९२ साली जे वेगळे सर्वेक्षण (सर्व्हे) आस्थापना खाते सुरू केले होते ते बंद केले होते ते बंद करून जमाबंदीचे काम महसूल खात्याकडे सोपविण्यात आले. जी फेरमोजणी जमाबंदी करण्यात आली त्यामध्ये पुढील बाबींचा विचार करण्यात आला.

(१) जमिनीचे जे चुकीचे वर्गीकरण करण्यात आले ते दुरुस्त करणे.

(२) नवीन घटक ज्यामुळे जमिनीची सुधारणा झाली असेल ते विचारात घेणे.

(३) जमिनीची जी श्रेणी होती त्यात झालेल्या सुधारणा.

(४) ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्यानुसार महसूल आकारणी.

(५) गावापासून संबंधित जमिनीचे अंतर.

 w कोकणातील जमिनी:

(१) रब्बी पिकाच्या जमिनी: कोकणात काही जमिनी रब्बी पिकाच्या जमिनी म्हणून जमिनीचे वर्गीकरण करणारा अधिकारी यांनी समाविष्ट केला होत्या व काही रब्बी पीक देणाऱ्या जमिनी वरकस जमिनीत समाविष्ट केल्या कारण त्यावेळी त्याप्रसंगी काही पिकत नव्हते. परंतु त्या जमिनी रब्‍बी पिकास उपयुक्त होत्या.

 (२) ‘पुलन’ जमिनी या जमिनी वाळू मिश्रित जमिनी आहेत. त्यांचे रुपांतर बागायतीत करता येण्याजोगे आहे. मूळ सर्वेक्षणात त्या वरकस जमिनीत समाविष्ट केल्या होत्या.

मूळ इतर जमिनी सर्वेक्षणात (ओरिजनल सर्व्हे) चांगल्या जमिनी निकृष्ट जमिनीत समाविष्ट केल्या होत्या व हलक्या जमिनी चांगल्या जमिनीत समाविष्ट होत्या. त्यामुळे त्या धारकावर अन्याय होत होता. यासंबंधीच्या सर्व दुरुस्त्या करण्यात आल्या व त्यानुसार जमिनीचे पुनर्वर्गीकरण करण्यात आले.

 l जमिनीचा सत्ताप्रकार (जमिनीच्या मालकीहक्काचे प्रकार) :

१. जुना सत्ता प्रकार. यात जमीनधारकाला जमिनीचे हस्तांतरण करण्याचा अधिकार वगैरे अनिर्बंध होते.

२. इनाम सत्ता प्रकार.

३. इतर सत्ता प्रकार.

 ‘सत्ता प्रकार’ म्हणजे जो जमिनी धारण करतो त्याच्या त्या जमिनीवरील हक्क कोणत्या प्रकारचा आहे? त्याला ती जमीन विकणे गहाण ठेवणे इत्यादी प्रकार करता येतात का? इत्यादी जमीन म्हणजे कोणत्या प्रकारची, इनाम जमीन कशाकरिता दिली?.

कुलकर्णी, देशपांडे, देशमुख, पाटील इत्यादींना कामे करण्याकरिता दिलेले इनाम किंवा गावचे संरक्षण करण्याकरिता करता दिलेले इनाम, देवाची पूजा-अर्चा करण्याकरिता दिलेले देवस्थान इनाम  इत्यादी प्रकारची इनामे. या इनाम जमिनींना जमीन महसूल कायद्यात ‘दुमाला जमीन’ असे म्हणतात.

 आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती याच्या जमिनी नव्या शर्तीखाली येतात. त्यांच्या दुर्बलतेच्या फायदा घेवून कोणी जमीन घेवून त्यांना जमिनीपासून वंचित करू नये म्हणून त्याच्या जमिनी विकत घ्यावयाचा असतील, त्यासंबंधीत त्या व्यक्तींना जिल्हाधिकार्‍यांची लेखी परवानगी असल्याखेरीज त्या जमिनी घेता येत नाही.

 l जमीन धारण करणाऱ्याच्या संदर्भातील इतिहास:

जमीन महसुलाच्या बाबतीत इंग्रज राज्यकर्त्यांनी एक वटहुकूम काढला होता. त्यानुसार जी व्यक्ती जमीन महसूल देते तिला ‘भोगवटादार’ असे म्हणतात.

 बिनदुमाला जमिनीच्या भोगवटदाराचे वर्गीकरण ‘मिरासदार’‘उपरी’ असे करण्यात आले. मिरासदाराच्या जमिनी वारसा हक्काने वारसाला मिळत असत. हस्तांतरणीय असतात, त्याची वाटणी करता येत असे. ‘मिरास‘ व ‘उपरी’ हे दोन्‍ही शब्द अरेबिक भाषेमधील आहेत.

 ∙ ‘मिरासदार’ म्हणजे एखाद्या जमिनीवर, वतनावर किंवा मालमत्तेवर वंशपरंपरागत (पिढ्यान् पिढ्या चालत आलेला) हक्क असलेली व्यक्ती. हा शब्द ‘मिरास’ या अरबी/फारसी मूळच्या शब्दापासून आला आहे. "मिरास" म्हणजे वारसा किंवा वंशपरंपरेने मिळालेला हक्क.

पूर्वी महाराष्ट्रात काही कुटुंबांना गावातील शेती किंवा महसुलाशी संबंधित वंशपरंपरागत हक्क असत, अशा हक्कधारकांना ‘मिरासदार’ म्हणत. ‘मिरास’ सत्ता प्रकाराने जी व्यक्ती शेतजमीन धारण करते तिला त्याच जमिनीची संपूर्ण मालकी असते. ती त्या मिरासदाराची खाजगी मालकीची असते व वारसा हक्काने ती त्याच्या वारसाला मिळू शकते. मिरासदारांना गावात मान असे. पानसुपारी वगैरे प्रसंगी त्यांना मानाने वागविले जात असे.

 ∙ ‘उपरी’ किंवा ‘उपरी कुळे’: ‘उपरी’ या शब्दाचा सामान्यतः अर्थ म्‍हणजे बाहेरून आलेला किंवा स्थानिक नसलेला किंवा एखाद्या गावात किंवा प्रदेशात नंतर येऊन राहणाऱ्या व्यक्तीस ‘उपरी’ म्हणतात.

उपरी कुळे म्‍हणजे अशी शेतकरी कुळे (भाडेकरू/कसणारे) ज्यांना त्या गावात किंवा त्या जमिनीवर वंशपरंपरागत हक्क नसे. ते मिरासदाराकडून जमीन घेऊन शेती करत, पण त्यांना कायमस्वरूपी मालकी किंवा मिरास हक्क नसत.

‘मिरासदाराची उपरी कुळे’ म्हणजे मिरासदाराच्या मालकीच्या किंवा मिरास हक्काच्या जमिनीवर शेती करणारे, परंतु स्वतःला त्या जमिनीवर मिरास किंवा कायमस्वरूपी हक्क नसलेले शेतकरी.

उपरी जमिनी दरवर्षी पट्ट्याने म्हणजे भाड्याने त्यात्या वेळेच्या शासनाकडून संबंधित व्यक्ती धारण करून कसत असत. त्या उत्पन्नावर आपला निर्वाह करत असत. 'उपरी' जमीन धारण करणारा ती सालोसाल पट्ट्याने भाड्याने घेतो. त्याला कायमची भाड्याने मिळत नाही. त्यांच्या वारसाला त्या जमिनीवर कोणताही हक्क नसतो. समाजात उपरी जमीन धारण करणाऱ्याला दुय्यम स्थान असे. त्यांना सालोसाल भाड्याने ती जमीन घ्यावयाची असल्यामुळे ती जमीन जेवढे काळ त्याच्या ताब्यात असेल त्यामधून जास्तीत जास्त उत्पन्न काढावयाचा प्रयत्न करीत असल्यामुळे ती जमीन काळजीपूर्वक जोपासना करत नसे.

 उपरी’ या वर्गाची स्थिती बिकट होती ते केवळ जमिनीचे कूळ म्हणून असत. कुळाला केव्हाही काढून टाकता येत असल्यामुळे त्यांना शेतीची लागवड करण्यात उत्साह नसे.

 त्यानंतर जमिनीचा हिशेब ठेवणे, जमिनीच्या हक्काच्या संदर्भात फेरफाराचे नोंदणी पुस्तक ठेवणे, सातबाराचा उताऱ्यात हक्काच्या तपशील इतर हक्क पीकपाणी याची नोंद या बाबी असाव्यात अशी योजना केली गेली.

 l महत्‍वाची प्रश्नोत्तरे:

8 इंग्रजांच्या अंमल येण्यापूर्वी जमीन कशारितीने धारण केली जात होती?

 4मिरास व उपरी या दोन पद्धतीने शेतीच्या जमिनी संबंधीत व्यक्तीकडून धारण केली जात होती. या पद्धती दख्खन म्हणजे महाराष्ट्रात बहुतांशाने चालू होत्या.

 8मराठाकालीन राज्यव्यवस्थेत जमीन महसूल कशारितीने आकारला जात होता. त्यासंबंधी प्रशासन पद्धती कशी होती?

 4हा शाहु महाराजांचे पेशवे म्हणून काम करतं असतानाचा काळ व पेशवाई संपण्याच्या पूर्वीचा काळ आहे. सुरुवातीच्या काळात नाना फडणीवसाच्या संपूर्ण कारकिर्दीपर्यंत जमीन महसुलाची प्रशासन व्यवस्था बरीच शिस्तपूर्ण होती. त्याकाळी मिरासदार व उपरी हे जमीन धारण करण्याचे दोन प्रकार होतेच. त्याखेरीज इनामदार होते. राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कारणासाठी इनामे दिली होती. त्यानाच सध्याच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात 'दुमाला' जमिनी असे म्हणतात.

मिरास जमिनीच्या सत्ताप्रकार मिरासदार हा जमिनीचा मालक असे व शासनाला ठरवून देण्यात आलेला जमीन महसूल देत असे. मिरासदाराची ती खाजगी मालमत्ता असे, मिरास जमिनीचा जमीन महसूल जास्त असे. त्यामुळे मिरासदारांना जमीन कधी कधी विकावी लागे. पण त्याची किंमत जमीन महसुलाच्या रकमेच्या १० पटीहून अधिक नसे.

उपरी पद्धतीने धारण करणारा सरकारी जमिनीचे भाडे देत असे व थोडासा जमीन महसूल त्याची मुदत वर्षापुरतीच असे. पुढच्या वर्षी परत मिळाली तर भाडेपट्ट्याने घ्यावयाची अशी रीत होती.

वार्षिक जमाबंदी या प्रकारात प्रत्येक गावात मामलेदार त्या गावी जावून पाटील व देशमुख हे गावकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या गावाने किती जमीन महसूल घ्यावयाचा हे ठरवीत असत.

पेशवाईच्या शेवटी, शेवटच्या बाजीरावाच्या काळात भरमसाट चैन करण्याच्या प्रवृत्तीमुळे गावच्या जमीन महसुलाच्या वसुलाचे लिलाव होत असत. जो जास्त रक्कम लिलावात बोलेल त्याला जमीन महसुलाच्या वसुलीचा मक्ता मिळत असे.

वर दिलेल्या पद्धतीनेच जरी जमिनीचा जमीन महसूल वसूल होत असे सर्व वसुली देशमुख, देशपांडे व कुलकर्णी यांच्‍याकडे एकवटलेली असे व ते कुठल्याही नियमाचे पालन न करता जमीन महसुलाची वसुली करत असत. कारण लिलावात कबूल केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम मिळविणे हे त्याचे ध्येय असे. त्यामुळे रयतेवर अन्याय होत असे. हे देशमुख हे जिल्हा गर्व्हनरप्रमाणे वागत असत व देशपांडे हा जिल्हा लेखापाल व कुलकर्णी हे गावचे हिशोबनीस म्हणून काम करत असत.

 8 जमिनी धारण करण्याचे विविध सत्ताप्रकार कोणते होते?

 4'सत्ताप्रकार' हे टेन्युअर या इंग्रज शब्दाचे भाषांतर आहे. जमिनी ज्यांच्‍या ताब्यात आहेत, त्या ताब्याचा प्रकार कोणत्या अधिकार मर्यादिपर्यंत आहे यालाच सत्ताप्रकार म्हणजे जमिनी धारण करण्याच्या अधिकाराचा प्रकार असे म्हणतात.

∙ जुनी शर्त: कोणताही निर्बंध नसलेला प्रकार अनिर्बंध सत्ताप्रकाराने जमीन धारण करण्याचा अधिकार. याला जुन्या शर्तीवर धारण करण्याचा सत्ताप्रकार असे म्हणतात. ज्याप्रमाणे इंग्रज पूर्व काळात 'मिरासदार' होते त्याचप्रमाणे हा प्रकार आहे. यात जमीन वारसा हक्काने मिळते, जमिनीची विक्री करता येते, बक्षिस देता येते, दान देता येते वगैरे.

 ∙ नवीन शर्त: 'नवीन शर्तीचा' प्रकार म्‍हणजे जमीन धारण करण्यावर निर्बंध आहेत. या सत्ताप्रकारात जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने ती विकता येते व त्यासाठी शासनाला त्यासाठी काही रक्कम नजराणा म्हणून द्यावी लागते. हा सत्ताप्रकार विशेषत: आदिवासी, अनुसूचित जाती, जमाती यांच्यासाठी जास्त उपयोगी आहे. त्‍यांच्या दुर्बलतेचा अशिक्षितपणाचा फायदा घेवून जमिनी लुबाडल्या जातात त्यावर आळा घालण्यासाठी या प्रकारची योजना आहे. वरील सत्ताप्रकार हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार बिनदुला जमिनीच्या सत्ता प्रकारात मोडतात. या खेरीज दुमाला जमिनीत म्हणजे इनामी जमिनीचा अधिकार हा प्रकार आहे.

कोकणात खोती हा प्रकार होता तो आता रद्द करण्यात आला आहे.

इतर इनामे ही बहुतांशाने इंग्रज येण्यापूर्वी जे राजे होते त्यांनी दिलेले इनामे आहेत व इंग्रजांनी कारभारात फार ढवळाढवळ करून कोणाला दुखवावयाचे नाही म्हणून ती तशीच चालू ठेवली.

 इनामाचे प्रकार (१) वैयक्तिक नामे (काही बहादुरी साठी) (२) राजकीय कारणासाठी दिलेले इनाम (३) देवस्थान इनाम (३) काही सेवा करण्यासाठी दिलेले इनाम उदा. कुलकर्णी, देशपांडे (४) आनुवंशिक सेवेसाठीचे उदा. गावच्या रामोशी इनाम वगैरे.

ही सर्व इनामे शासनाला भरपाई भरून रद्द झाली आहेत. मात्र देवस्थाने इनामे अद्याप चालू आहेत. ही इनामे शासनाला किंवा समाजाला उपयुक्त म्हणून दिली गेली होती. शिवशाहीमध्ये मात्र इनाम देण्याची पद्धत नव्हती.

 8 इंग्रजांच्या अंमलापूर्वी महाराष्ट्रातील दख्खन प्रदेशातील गावगाड्याचे किंवा गावकीचे स्वरूप कसे होते?

 4दख्खन प्रदेशातील गावाच्‍या सरहद्दी सध्याच्या पद्धतीप्रमाणे निश्चित नव्हत्या. पण हळुहळू जसा शेतीचा विस्तार होवू लागला तसतशा मनुस्मृतीत नमूद केल्याप्रमाणे गावच्या हद्दी निश्चित होवू लागल्या. ते गाव आणि त्या सभोवतालचा प्रदेश 'थालकरी' या संज्ञेच्या व्यक्तीकडून त्याचे प्रशासन चालत असे. त्या व्यक्ती सरदार घराण्यातील असत हे सरदार सर्वसाधारण कुणबी समाजापासून वेगळे होते. गावातील जमीन गावकऱ्यांमध्ये हिश्श्याने वाटली गेलेली असे.

गावचे प्रशासक म्हणजे सरदार घराण्यातील मंडळी जे साधारणपणे रजपूत वंशाचे होते. ते शेतीकडे लक्ष देत नसत. ते काम गावातील सर्वसाधारण जनता ज्यांना कुणबी म्हणून ओळखले जात होते ते करत असत आणि ही शेती करणारी मंडळी शेतात जे पिकेल त्याचा काही हिस्सा मळणीच्यावेळी राजाचा भाग म्हणून या थाळकऱ्यांना जे स्थानिक राजे त्याना देत असत.

 राजा ज्याप्रमाणे प्रजेचे संरक्षण करतो त्याप्रमाणे हे गावचे राजे आपल्या गावातील रयतेचे रक्षण करत. हे राजे रयतेकडून सोन्याच्या स्वरूपात किंवा गुराढोरांच्या स्वरूपात मोबदला घेत असत.

 8'भूमापन' म्हणजे काय?

 4जमिनीची मापे घेणे म्हणजे भूमापन. जमिनीवरील जमीन महसुलाचा आकार ठरविताना तिचे क्षेत्रफळ किती आहे, तिची प्रत काय आहे, वस्तीपासून ती किती दूर आहे, जवळ आहे का लांब आहे यावर जमिनीच्या महसुलाची आकारणी ठरविली जाते. ओरिजिनल सर्व्हे येण्यापूर्वी गावचा कुलकर्णी त्याच्या पुस्तकात जी जुनी नोद होती त्यानुसार जमीन महसुलाची आकारणी करत असे. कधी कधी ते क्षेत्रफळ फार मोठे असे व जमीन महसुलाची आकारणी त्यानुसार होत असे. त्यात कोणतेही निश्चित तत्त्व नव्हते. प्रत्येक व्यक्तीने धारण केलेल्या जमिनीपुरते क्षेत्रफळ काढण्यात येवून त्यानुसार जमीन महसुलाची आकारणी होत असे. म्हणजे वैयक्तिक प्रकरणाचा सर्व गावाच्या जमिनीचा निश्चित हिशोब मिळत नव्हता.

म्हणून पुढील तत्त्वे निश्चित करून गावाच्या जमिनीच्या मोजणीसंबंधी लावण्यात आली.

 (१) जमिनीचे क्षेत्रफळाचा घटक म्हणजे माप एका व्यक्तीने शेती करण्यायोग्य इतक्या मर्यादेपर्यंत असावा.

(२) तो अगदी लहान नसावा. त्यामुळे भूमापन करणे गैरसोयीचे होईल, तसेच प्रशासनाच्या दृष्टीने ते अडचणीचे होईल.

(३) एका बैलजोडीने ती नांगरता येईल एवढ्या मर्यादिपर्यंत ती असावी ही तत्त्वे विचारात घेवून भूमापन क्रमांकाची मर्यादा ठरविण्यात आली.

(अ) सर्वसाधारणपणे हलक्या जिराईत जमिनीसाठी २० एकर, मध्यम जिराईत जमिनीसाठी १५ एकर, चांगल्या जिराईत जमिनीसाठी १२ एकर, भातशेतीसाठी ४ एकर इतकी मर्यादा ठरविण्यात आली. अशा रीतीने ठरविलेला सर्वेक्षण करून त्याच्या हद्दीच्या निशाण्या निश्चित करण्यात आल्या. हद्दीची वरील सर्वसाधारण मर्यादिनुसार ज्या क्षेत्राचे मोजमाप झालेले त्या क्षेत्राचा घटक हा भूमापन क्रमांक होय.

 8 टिपण पुस्तक (टिपण बुक) कशाला म्हणतात?

 4 टिपण बुकात गावाच्या जमिनीची भूमापन क्रमाकांचे नकाशे असतात व पण निश्चित असे स्केल प्रमाणे नसतात. केवळ रेखाटन असते. मोजमापाच्या रेषा असतात व त्या रेषांची लांबी-रुंदीचे आकडे घातलेले असतात. त्यास लागवडीच्या क्षेत्राचा क्षेत्रफळाचा संपूर्ण तपशील असतो. लांबी रुंदीसह त्या भूमापन क्रमांकात जे असते ते व त्या भूमापन क्रमांकाच्या सरहद्दीवर जे असते त्याची नोंद केली जाते. शेताचे क्रमांक अनुक्रमांकानुसार ज्याला चलता सिरीज असे म्हणतात त्याप्रमाणे असतात.

 8फिल्ड बुक' किंवा 'क्षेत्र पुस्तक' म्हणजे काय?

 4या नोंदवहीत, (१) भूमापन कमाकांचे रेखांकन स्केलनुसार काढण्यात येते. (उदा. १० फुटाला १ इंच वगैरे) (२) क्षेत्रफळाचा संपूर्ण हिशेब. (३) भूमापन क्रमांकाची आतील मापे दाखविली जात नाहीत. (४) बाहेरच्या सीमा दाखविल्या जातात. (५) पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण दिशा रेखाटन नमूद केल्या असतात. (६) स्केल दिलेले असते म्हणजे वर नमूद केलेल्या १० फुटाला १ इंच वगैरे याप्रमाणे. हे दस्तऐवज नोंदवह्या सर्व शासकीय पत्र व्यवहारात उपयोगात आणले जातात.

 8'प्रती बुक’ मध्‍ये कोणती माहिती असते?

4 'प्रती बुक’ मध्‍ये (१) भूमापन क्रमांकाचे रेखाटन व तो भूमापन क्रमांक जमीन वर्गीकरणासाठी किती पोटहिश्यात विभागला असेल ती नोंद आणि जमिनीच्या मातीवर व त्यात असलेल्या पाण्याचे वर्गीकरण. (२) लागवडयोग्य व खराब क्षेत्राचा तपशील आणि त्या भूमापन क्रमांकातील एकूण लागवड योग्य जमिनीचा तपशील ही माहिती नमूद असते.

 8 'जंत्री' म्हणजे काय? त्याचा वापर कोठे करतात?

 4 'जंत्री' जमिनीच्या आकारणीच्या संदर्भात केलेले तयार कोष्टक.

प्रत्येक विभागासाठी आणेवारी व त्याची आकारणी दिलेली असते व त्या कोष्टकावरून अमुक इतक्या क्षेत्रफळाला अमुक इतकी आकारणी सहज काढता येते. त्या त्या विभागाचे आकारणीचे दर शासनाकडे पाठवून त्याची मंजुरी घेतली जाते.

 8 जिरायत जमिनीचे वर्गीकरण कसे असते ?

 4 कोल्हापूर नियमाप्रमाणे 'जिरायत' कोरवडवाहू जमीन ती विहिरी बागायत किंवा पाट बागायत नाही किंवा भातशेतीची जमीन निव्वळ पावसावर अवलंबून असलेली जमीन. या जमिनीत नाचणी, वरई पिके घेता येतात.

 8 ‘निस्तारपत्रक’ म्हणजे काय?

 4 निस्तारपत्रक म्हणजे जमिनीवरील समाजाच्या हक्क नोंदणीचे पत्रक.

(पहा म.ज.म.अ. कलम १६१)

निस्तारपत्रकात पुढील बाबींची तरतूद करण्यात येतात.

(अ) गावातील गुरे चारण्यास ज्या अटीवर आणि शर्तीवर परवानगी देण्यात येईल त्या अटी व शर्ती

(ब) गावातील कोणाही रहिवाशास ज्या अटीवर आणि शर्तीवर आणि ज्या मर्यादिपर्यंत,

(एक) लाकूड, इमारती लाकूड, सरपण किंवा इतर कोणतेही जंगलातील उत्पन्न,

(दोन) मुरुम, कंकर, वाळू, माती, चिकणमाती, दगड किंवा कोणतेही इतर दुय्यम खनिज, मिळेल त्या अटी, शर्ती व मर्यादा;

(क) गुरे चारण्याबाबत आणि उक्‍त (ब) मध्ये नमूद केलेल्या वस्तू हलविण्याबाबत सामान्यतः नियमन करणाऱ्या सूचना.

(ड) निस्तारपत्रकात नोंद करणे आवश्यक असेल अशी कोणतीही इतर बाब

 निस्तारपत्रक तयार करताना जिल्हाधिकार्‍यांनी शक्य असेल तेथवर, खालील गोष्टींची तरतूद केली पाहिजे:-

(अ) शेतीसाठी उपयोग केला जाणाऱ्या गुरांना मोफत चराई.

(ब) गावातील रहिवाशांना आपल्या खरोखरच्या घरगुती उपयोगासाठी खालील वस्तू मोफत मिळणे

(एक) जंगलातील उत्पन्न,

(दोन) दुय्यम खनिजे;

(क) खंड (ब) मध्ये निर्दिष्ट केलेल्या वस्तू गावातील कारागिरांना त्यांच्या धंद्याकरता घेऊन जाण्यासाठी द्यावयाच्या सवलती.

 8वाजिब उल अर्ज’ म्हणजे काय?

 4 खाजगी मालकाचे जमिनीवरील हक्कसंबंध वगैरे ज्या पत्रकात नोंदविले जातात

ते हक्क नोंदणी पत्रक म्‍हणजे ‘वाजिब उल अर्ज’

सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मालकाचे खेरीज इतर जमिनवतील समाजाचे हक्क जे रिवाजाने, रूढीने, दिवाणी न्यायालयाचे हुकूमनाम्याने प्रस्थापित झाले आहेत असे हक्क सरकारी जमिनीवरील समाजाचे जे हक्क मान्य केले आहेत, त्या हक्काची नोंदणी या पत्रकात केली जाते.

वाजिब उल अर्ज पत्रकात समाजाचे खाजगी जमिनीतील जाण्यायेण्याचे हक्क, पाटबंधारे व पाण्यासंबंधीचे हक्क, मच्छीमारीसंबंधीचे हक्क यांचा समावेश होतो. निस्तारपत्रकात समाजाच्या सरकारी जमिनीवरील हक्कसंबंधाची नोंद होते.

समाजाच्या खाजगी जमिनीवरील हक्कसंबंधाचा समावेश बाजिब-उल-अर्ज मध्ये होतो.

समाज व व्यक्ती यामधील फरक लक्षात ठेवणे जरूरीचे आहे. समाज व्यक्तीसमूहाचा बनतो, एकट्या दुकट्या व्यक्तीच्या हक्काचा येथे प्रश्न येत नाही. खाजगी तलावातील मच्छीमारीसंबंधी, समाजाच्या हक्कासंबंधी नोंदणी वाजिब उल अर्ज पत्रकात होते. परंतु सरकारी तलवातील मच्छीमारी सरकारी नियमानुसार करावयाची आहे.

 8 आकारणी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो?

 4 एखाद्या शेती क्षेत्राची आकारणी ठरविताना पुढीलप्रमाणे घटक विचारात घेतले

(१) तालुक्यातील सर्व गावाचे एकसारखे किंवा जवळपास एकसारखे हवामान पाऊस पाणी इत्यादी बाबींचे साम्य असलेल्या भागाचे एक एक गट केले जातात.

(२) जमाबंदीच्या तपासणीसाठी त्या क्षेत्रातून किती जमीन महसूल मिळू शकेल याचा प्राथमिक अंदाज घेतला जातो.

(३) सर्व गटांची सरासरी काढून त्या सरासरीनुसार जो जास्तीत जास्त आकारणी दर प्रत्येक वर्गासाठी असेल त्याप्रमाणे त्या वर्गाच्या जमिनीवर आकारणी केली जाते.

 8 पाटस्थळ जमीन म्‍हणजे काय?

 4 पाटस्थळ जमीन म्हणजे पाटाचे पाणी मिळणारी जमीन. हे पाट एखाद्या ओढ्यावर बंधरा बांधून किंवा नदीला धरण बांधून कालवे काढून मिळणारे पाणी. अशा क्षेत्रात काही जमिनीला पाणी काही कारणामुळे मिळू शकत नाही कदाचित तो भाग उंचवट्यावर असल्यामुळे पाणी देता येत नसेल अशी जमीन पाटस्थळ क्षेत्रात असली तरी जी पाटस्थळ म्हणून समजली जाणार नाही.

अशा जमिनीची आकारणी करताना जमिनीची मातीची प्रत व मिळणारे पाणी किती काळ उपलब्ध असते या दोन्ही बाबींचा विचार करून दर ठरविले जातात.

 8 रयतवारी पद्धती म्‍हणजे काय?

 4रयतवारी पद्धतीमध्ये जमीन महसूल प्रश्नासंबंधी थेट असतात. कोणीही मध्यस्थ नसतो. कारण रयतवारी पद्धतीत रयत प्रत्यक्ष शेतकरी जमीन धारणा करतो, कसतो व त्यातून उत्पन्न काढतो. मग जमीन महसूल म्हणून जो काही उत्पन्नाचा जमाबंदीनुसार ठरतो तो थेट शासनाला दिला जातो. रयतेशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे शासनाला एकंदर पीकपाण्याची स्थिती, रयतेची स्थिती इत्यादी विविध प्रश्नांची माहिती मिळते व रयतेच्या सौख्याकरता अशा तऱ्हेने प्रशासन करता येते.

 8 जमीन महसूल देण्यास प्रथमत: जबाबदार कोण आहेत?

 4पुढीलप्रमाणे इसम जमीन महसूल देण्यास प्रथमत: जबाबदार आहेत.

(१) बिनदुमाला जमिनीचा खातेदार

(२) राज्य शासनाचा पट्टेदार

(३) दुमाला जमिनीचा वरिष्ठ धारक

(४) कूळ अधिनियमाखालील कूळ

(५) संयुक्त भोगवटादार आणि संयुक्त धारक (संयुक्तपणे अगर पृथकपणे)

वरीलपैकी कोणीही कसूर केल्‍यास, जमीन ताब्यात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून जमीन महसूल वसूल केला जातो. (म.ज.म.अ. कलम १६८)

 8 जमीन महसूल केव्हा द्यायचा?

 4जमीन महसूल देण्यासाठी जिल्ह्यातील गावाची दोन वर्गात वर्गवारी केली जाते.

(१) वर्ग १ - खरीप गावे.

(२) वर्ग २ - रब्बी गावे.

म.ज.म. अ. कलम १७० मधील तरतुदीस पात्र राहून जमीन महसूल एकाच हप्त्यात खालील तारखेला दिला पाहिजे.

(१) वर्ग १ - खरीप गावे - १५ जानेवारी

(२) वर्ग २ - रब्बी गावे - १५ एप्रिल

उक्‍त तारखा सोयीच्या नसतील तर जिल्हाधिकारी, आयुक्तांची मंजुरी घेऊन दुसऱ्या सोईस्कर तारखा ठरवू कतात.

 8 जमीन महसूल कोठे भरावयाचा?

4 (१) ज्या गावी संबंधित जमीन आहे त्या गावच्या ग्राम महसूल अधिकार्‍याकडे.

 (२) विशेष परिस्थितीत जिल्हाधिकार्‍यांच्‍या मंजुरीने जिल्ह्यातील सरकारी खजिन्यात,

(३) जमीन महसूल देण्याकरिता एखादे गाव केंद्र म्हणून जाहीर केले असेल व त्या गावाला काही गावे यासाठी जोडली असतील तर जमीन महसूल अशा केंद्रातच दिला पाहिजे. 

lœ

 

 

 

 

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला सर्वेक्षण व जमाबंदी. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.