आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

जादूटोणा विरोधी अधिनियम, २०१३

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

महाराष्ट्र जादूटोणा विरोधी अधिनियम, २०१३

महाराष्ट्रात जादूटोणा, अघोरी प्रथा, नरबळी, अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण, अमानुष कृत्ये व फसवणूक रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात आला आहे.

या कायद्याचे अधिकृत नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ (The Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifice and other Inhuman, Evil and Aghori Practices and Black Magic Act, 2013) असे आहे. हा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३०/२०१३  अधिनियमाचा अधिकृत मजकूर २० डिसेंबर २०१३ रोजी राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाला. अधिनियमाची अंमलबजावणी २६ ऑगस्ट २०१३ पासून लागू मानण्यात आली आहे.

 w कायद्याचा मुख्य उद्देश:

∙ नरबळी व मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या प्रथा रोखणे.

∙ जादूटोणा, भानामती व अघोरी कृत्यांना प्रतिबंध करणे.

∙ चमत्कारांच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक रोखणे.

∙ भूतबाधा, करणी, जादूटोणा यांच्या नावाखाली महिलांचे व दुर्बल व्यक्तींचे शोषण रोखणे.

∙ अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अमानुष व अपमानास्पद कृत्यांना आळा घालणे.

या अधियिमात कलम १ ते १३ अशी एकूण १३ कलमे आहेत. त्यापैकी कलम १३ हे २०१३ चा अध्यादेश रद्द करणे व त्याअंतर्गत झालेल्या कार्यवाहीचे संरक्षण याबाबत आहे. यातील अनुसूची ही स्वतंत्रपणे १२ क्रमांकित प्रतिबंधित कृत्यांची यादी आहे.

 कलम १ – संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ:  

(१) या कायद्याचे नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ असे आहे.

(२) हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू आहे.

(३) हा कायदा २६ ऑगस्ट २०१३ पासून लागू झाल्याचे मानण्यात येते.

 कलम २ – व्याख्या:

∙ २(१)(अ): अधिनियम (Code): याचा अर्थ फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (CrPC) असा आहे.

मात्र १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या अनुषंगाने कार्यवाही करताना सध्याच्या प्रक्रियात्मक कायद्याचा विचार करणे आवश्यक आहे.

∙ २(१)(ब):  नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा: या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही कृत्याची अंमलबजावणी स्वतः करणे किंवा दुसऱ्या व्यक्तीमार्फत करवून घेणे अथवा त्यास प्रवृत्त करणे याचा समावेश होतो.

∙ २(१)(क): विहित (Prescribed): या अधिनियमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित केलेली बाब.

 ∙ २(१)(ड): प्रसार (Propagate) : जाहिरात, साहित्य, लेख, पुस्तक इत्यादी प्रसिद्ध करणे किंवा प्रसारित करणे. तसेच अशा कृत्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत, प्रोत्साहन, सहभाग अथवा सहकार्य करणे.

∙ २(१)(इ): नियम (Rules): या अधिनियमानुसार शासनाने तयार केलेले नियम.

 ∙ कलम २(२): या अधिनियमात व्याख्या न केलेल्या शब्दांना औषधे आणि जादुई उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, १९५४ (Drugs and Magic Remedies (Objectionable Advertisements) Act, 1954) व फौजदारी प्रक्रिया संहितेतील आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील अर्थ लागू होतात.

 महत्त्व: अनुसूचीतील कृत्ये केवळ स्वतः करणेच नव्हे, तर दुसऱ्याकडून करवून घेणे किंवा त्यासाठी प्रवृत्त करणे याचाही कायद्यात समावेश आहे.

 ∙ कलम ३ – प्रतिबंध व शिक्षा: (Prevention and Eradication) हे या अधिनियमातील सर्वांत महत्त्वाचे दंडात्मक कलम आहे.

 ∙ कलम ३(१): प्रतिबंध: कोणतीही व्यक्ती स्वतः किंवा अन्य व्यक्तीच्या माध्यमातून अनुसूचीमध्ये नमूद केलेली अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्ये किंवा जादूटोणा करू शकत नाही, त्यांचा प्रचार करू शकत नाही किंवा त्यांना प्रोत्साहन देऊ शकत नाही.

 ∙ कलम ३(२): शिक्षा: या कलमाचे उल्लंघन करून गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस दोषसिद्धीनंतर:

aकिमान ६ महिने, कमाल ७ वर्षे कारावास.

aकिमान ₹ ५,०००, कमाल ₹ ५०,००० दंड.

 ∙ कलम ३(३): अपप्रेरणा व प्रयत्न: गुन्हा करण्यास अपप्रेरणा देणारी किंवा गुन्हा करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तीही त्याच शिक्षेस पात्र ठरते.

 ∙ कलम ३(४): गुन्ह्याचे स्वरूप: दखलपात्र (Cognizable); अजामीनपात्र (Non-bailable).

म्हणजेच या कायद्याखालील गुन्ह्याची दखल पोलीस कायद्यानुसार घेऊ शकतात आणि जामिनाचा निर्णय न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतो.

 ∙ कलम ४ – गुन्ह्यांची सुनावणी करण्याचे न्यायालय (Jurisdiction to Try Offences):

या कलमानुसार कलम ३ अंतर्गत गुन्ह्यांची सुनावणी:

aमहानगर दंडाधिकारी (Metropolitan Magistrate), किंवा

aप्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी (Judicial Magistrate First Class) यांच्यापेक्षा कनिष्ठ न्यायालय करू शकत नाही.

महत्त्व: हा विशेष अधिनियम असला तरी त्यातील गुन्ह्यांची सुनावणी सक्षम फौजदारी न्यायालयाकडेच होते. तहसिलदार किंवा उपविभागीय दंडाधिकारी हे या कलमाखाली गुन्ह्याची सुनावणी करणारे न्यायालय नाहीत.

 ∙ कलम ५ – दक्षता अधिकारी (Vigilance Officer): या कलमानुसार राज्य शासनाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे दक्षता अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार आहे.

 ∙ कलम ५(१): नियुक्ती:

aएका किंवा अधिक पोलीस ठाण्यांसाठी नियुक्ती करता येते.

aनियुक्त अधिकारी पोलीस अधिकारी असावा.

aत्याचा दर्जा पोलीस निरीक्षकापेक्षा कमी नसावा.

aनियुक्ती शासनाच्या अधिसूचनेद्वारे केली जाते.

 ∙ कलम ५(२): दक्षता अधिकाऱ्याची कर्तव्ये:

a या अधिनियमाचे उल्लंघन शोधणे व ते रोखणे.

a आपल्या कार्यक्षेत्रातील उल्लंघनाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास देणे.

a पीडित व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तातडीने कार्यवाही होण्यासाठी मदत करणे.

a संबंधित पोलीस ठाण्यास आवश्यक सल्ला, मार्गदर्शन व मदत करणे.

a गुन्ह्याच्या प्रभावी अभियोजनासाठी पुरावे गोळा करणे.

a गुन्ह्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यास अहवाल देणे.

a शासनाने वेळोवेळी दिलेली इतर कामे पार पाडणे.

 ∙ कलम ५(३): कर्तव्यात अडथळा आणल्यास शिक्षा:

दक्षता अधिकाऱ्याच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीस:

a३ महिन्यांपर्यंत कारावास, किंवा

a₹ ५,००० पर्यंत दंड, किंवा

aदोन्ही शिक्षा होऊ शकतात.

 ∙ कलम ५(४): लोक सेवक: दक्षता अधिकारी हा भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३, कलम २(२८) च्या अर्थाने लोकसेवक मानला जातो.

 ∙ कलम ६ – प्रवेश, झडती व जप्तीचे अधिकार (Powers of Entry, Search, etc.):

हे कलम दक्षता अधिकाऱ्याला विशेष तपासणीचे अधिकार प्रदान करते.

शासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांच्या अधीन राहून, दक्षता अधिकारी आपल्या अधिकारक्षेत्रात स्थानिक पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने पुढील कार्यवाही करू शकतो.

aकलम ६(१)(i): प्रवेश व झडती:ज्या ठिकाणी या अधिनियमाखाली गुन्हा झाला आहे किंवा होत आहे असा वाजवी विश्वास असल्यास त्या ठिकाणी योग्य वेळी प्रवेश करून झडती घेता येते.

aकलम ६(१)(ii): जप्ती: गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्य, साधने किंवा जाहिराती जप्त करता येतात.

a कलम ६(१)(iii): अभिलेख व कागदपत्रे: गुन्ह्याच्या पुराव्याशी संबंधित नोंदी, कागदपत्रे किंवा वस्तू तपासता येतात व आवश्यक असल्यास जप्त करता येतात.

aकलम ६(२): झडती व जप्तीच्या कार्यवाहीस फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३, कलम ९७ अन्‍वये वॉरंटद्वारे करण्यात येणाऱ्या झडती व जप्तीच्या तरतुदी, शक्य तितक्या लागू होतात.

aकलम ६(३): जप्त केलेल्या वस्तूंच्या बाबतीत दक्षता अधिकाऱ्याने शक्य तितक्या लवकर दंडाधिकाऱ्याला कळवून त्या वस्तूंच्या अभिरक्षेबाबत आदेश घ्यावेत.

 ∙ कलम ७ – महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १५९ व १६० लागू करणे:

या कलमानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १५९ व १६० [सद्भावनापूर्वक (Good Faith) केलेल्या कृत्यांसाठी कायदेशीर संरक्षण] मधील तरतुदी दक्षता अधिकाऱ्याने सद्भावनेने केलेल्या कार्यवाहीस लागू होतात. दक्षता अधिकारी या अधिनियमाखाली कार्यवाही करताना पोलीस अधिकारी असल्याप्रमाणे या तरतुदींचे संरक्षण त्याला मिळते.

 ∙ कलम ८ – फौजदारी प्रक्रियेच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्‍या तरतुदी लागू करणे: या कलमानुसार या अधिनियमाखालील गुन्ह्यांचा तपास व खटल्याची सुनावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रियेच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्‍या तरतुदी लागू होतात.

यामध्ये प्रामुख्याने:

aगुन्ह्याची नोंद.

aतपास.

aसाक्षीदारांचे जबाब.

aपुरावे गोळा करणे.

aजप्ती व पंचनामा.

aआरोपपत्र दाखल करणे.

aन्यायालयीन सुनावणी.

या तरतुदी लागू होतात.

 ∙ कलम ९ – इतर कायद्यांव्यतिरिक्त अधिनियमाची अंमलबजावणी: या कलमानुसार या अधिनियमातील तरतुदी इतर लागू कायद्यांव्यतिरिक्त असतील. म्हणजेच, एखाद्या कृत्यामुळे या अधिनियमाबरोबरच इतर फौजदारी कायद्यांचेही उल्लंघन होत असल्यास संबंधित इतर कायद्यांनुसारही कार्यवाही होऊ शकते.

उदाहरणार्थ:

aभारतीय न्याय संहिता, २०२३ मधील मारहाणीसंबंधी तरतुदी.

aसदोष मनुष्यवध किंवा खुनासंबंधी तरतुदी.

aदुखापत, धमकी किंवा फसवणुकीसंबंधी तरतुदी.

aअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ (लागू असल्यास).

महत्त्व: या कायद्याखाली गुन्हा दाखल झाला म्हणून इतर लागू फौजदारी कायद्यांखालील कार्यवाहीला प्रतिबंध येत नाही.

∙ कलम १० – दोषसिद्धीची माहिती प्रसिद्ध करणे (Publication of Fact of Conviction):

या कलमानुसार एखाद्या व्यक्तीला या अधिनियमाखालील गुन्ह्यात दोषी ठरविल्यास संबंधित न्यायालयाला त्या व्यक्तीची माहिती प्रसिद्ध करण्याचे अधिकार आहेत.

∙ कलम १०(१): दोषसिद्धी करणारे न्यायालय पुढील माहिती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे निर्देश देऊ शकते:

aदोषी व्यक्तीचे नाव.

aत्‍याचे राहण्याचे ठिकाण.

aसंबंधित व्यक्ती या अधिनियमाखाली दोषी ठरल्याची माहिती.

aन्यायालयाला योग्य वाटणारी इतर माहिती.

ही माहिती पोलिसांमार्फत त्या ठिकाणच्या स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाऊ शकते.

 ∙ कलम १०(२): संबंधित दोषसिद्धीच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले असल्यास त्या अपिलाचा अंतिम निकाल लागेपर्यंत अशी प्रसिद्धी करता येणार नाही.

 ∙ कलम ११ – नियम करण्याचा अधिकार: या कलमानुसार राज्य शासनाला अधिनियमाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियम तयार करण्याचा अधिकार आहे.

 ∙ कलम ११(१): शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून नियम तयार करू शकते. परंतु नियम तयार करण्यापूर्वी पूर्वप्रसिद्धी (Previous Publication) आवश्यक आहे.

 ∙ कलम ११(२): तयार केलेले नियम विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवणे आवश्यक आहे.

एकूण ३० दिवसांचा कालावधी यासाठी दिला आहे. दोन्ही सभागृहांनी नियमांमध्ये बदल करण्याचे ठरविल्यास किंवा नियम रद्द करण्याचे ठरविल्यास त्यानुसार कार्यवाही करता येते.

अशा बदलामुळे पूर्वी नियमांनुसार वैधरीत्या केलेल्या कार्यवाहीवर परिणाम होत नाही.

 ∙ कलम १२ – अपवादात्मक बाबी (Savings): या अधिनियमातील प्रतिबंध धार्मिक व पारंपरिक बाबींवर सरसकट लागू होऊ नयेत, यासाठी विशिष्ट अपवाद दिले आहेत.

 ∙ कलम १२(१): अपवाद:  पुढील बाबींना या अधिनियमातून अपवाद देण्यात आलेला आहे.

aधार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळांवरील प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा तसेच वारकरी संप्रदायाच्या व इतर वाऱ्या.

a हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भजन, प्राचीन व पारंपरिक ज्ञान आणि कलांचे शिक्षण, आचरण व प्रसार.

a दिवंगत संतांच्या चमत्कारांविषयी सांगणे, त्यांचा प्रचार व प्रसिद्धी करणे आणि धार्मिक उपदेशकांच्या चमत्कारांविषयी साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे; मात्र त्यामुळे शारीरिक इजा किंवा आर्थिक नुकसान होता कामा नये.

a घर, मंदिर, दर्गा, गुरुद्वारा, पॅगोडा, चर्च किंवा इतर धार्मिक स्थळांवर प्रार्थना, उपासना व धार्मिक विधी करणे; मात्र त्यामुळे शारीरिक इजा किंवा आर्थिक नुकसान होता कामा नये.

aधार्मिक उत्सव, सण, प्रार्थना, मिरवणुका, आत्म्याचे आवाहन, कडक लक्ष्मी, व्रतवैकल्ये, उपवास, नवस बोलणे, मन्नत मागणे, मोहरमच्या मिरवणुका व इतर धार्मिक विधी.

aधार्मिक विधीनुसार मुलांची कान टोचणे, नाक टोचणे आणि जैन धर्मातील केशलोचनासारखे धार्मिक विधी.

aवास्तुशास्त्रासंबंधी सल्ला, जोशी-ज्योतिषी, नंदीबैलवाले ज्योतिषी व इतर ज्योतिषी यांचा सल्ला तसेच भूजलस्रोतांसंबंधी सल्ला.

aवरील बाबींव्यतिरिक्त इतर पारंपरिक धार्मिक विधी किंवा कृत्ये, ज्यांना राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अपवाद घोषित करेल.

∙ कलम १२ मधील अपवाद म्हणजे कोणत्याही कृत्याला अमर्यादित कायदेशीर संरक्षण नाही. उदाहरणार्थ, धार्मिक विधीच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, शारीरिक इजा करणे, आर्थिक फसवणूक करणे किंवा वैद्यकीय उपचारांपासून रोखणे यासारख्या कृत्यांना केवळ धार्मिक विधी असे नाव दिल्यामुळे संरक्षण मिळणार नाही.

 ∙ कलम १३ – अध्यादेश रद्द करणे व बचत (Repeal and Saving):

∙ कलम १३(१): महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश, २०१३ (Maharashtra Ordinance XIV of 2013) रद्द करण्यात आला आहे.

∙ कलम १३(२): अध्यादेश रद्द झाला असला तरी त्या अध्यादेशातील संबंधित तरतुदींनुसार यापूर्वी करण्यात आलेली कोणतीही कार्यवाही, जारी केलेली अधिसूचना किंवा आदेश हे या अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार केलेले असल्याचे मानले जाईल.

 भाग २ – अधिनियमाची स्वतंत्र अनुसूची (SCHEDULE)

अनुसूची – कलम २(१)(ब) पहा

अनुसूचीमध्ये एकूण १२ प्रकारची कृत्ये प्रतिबंधित करण्यात आली आहेत. कलम ३ अन्‍वये गुन्हा निश्चित करताना संबंधित कृत्य अनुसूचीतील कोणत्या क्रमांकात येते, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अनुसूचीतील १२ प्रतिबंधित कृत्यांचे स्पष्टीकरण

4अनुसूची क्रमांक १ – भूतबाधा काढण्याच्या नावाखाली अमानुष कृत्ये

भूतबाधा किंवा भूत काढण्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीवर पुढील प्रकारचे अत्याचार करणे:

aदोरीने किंवा साखळीने बांधून मारहाण करणे.

aकाठी किंवा चाबकाने मारणे.

aपादत्राणे भिजवलेले पाणी पिण्यास भाग पाडणे.

aमिरचीचा धूर देणे.

aछताला टांगणे किंवा केसांना धरून लटकवणे.

aकेस उपटणे.

aशरीराच्या अवयवांना गरम वस्तूंचे चटके देणे.

aउघड्यावर लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडणे.

aजबरदस्तीने मूत्र किंवा मानवी विष्ठा तोंडात घालणे.

aअशा स्वरूपाची इतर अमानुष कृत्ये करणे.

 4अनुसूची क्रमांक २ – चमत्कार दाखवून आर्थिक फसवणूक

aतथाकथित चमत्कार दाखवून पैसे मिळविणे.

aचमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांची फसवणूक करणे.

aअशा चमत्कारांच्या नावाखाली लोकांना घाबरविणे किंवा त्यांची दिशाभूल करणे.

 4अनुसूची क्रमांक ३ – अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी अघोरी कृत्ये

aअलौकिक शक्ती किंवा आशीर्वाद मिळविण्यासाठी अमानुष व अघोरी प्रथा करणे.

aज्यामुळे जीवितास धोका निर्माण होतो किंवा गंभीर दुखापत होऊ शकते अशा प्रथा करणे.

aइतरांना अशा प्रथा करण्यास प्रवृत्त करणे, प्रोत्साहित करणे किंवा भाग पाडणे.

 4अनुसूची क्रमांक ४ – करणी, भानामती व नरबळी

aमौल्यवान वस्तू, गुप्तधन किंवा पाण्याचे स्रोत शोधण्याच्या नावाखाली अमानुष कृत्ये करणे.

aकरणी किंवा भानामतीच्या नावाखाली जादूटोणा करणे.

aजारण-मारणाच्या नावाखाली नरबळी देणे किंवा त्याचा प्रयत्न करणे.

aअशा कृत्यांना सल्ला देणे, प्रवृत्त करणे किंवा प्रोत्साहन देणे.

 4अनुसूची क्रमांक ५ – अलौकिक शक्ती असल्याचा आभास निर्माण करणे

aआपल्या शरीरात इंद्रियांना न समजणारी अलौकिक शक्ती असल्याचे सांगणे.

aस्वतःमध्ये अशी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून लोकांच्या मनात भीती निर्माण करणे.

aआपल्या सांगण्याप्रमाणे वागले नाही तर अनिष्ट परिणाम होतील, अशी धमकी देणे.

aअशा प्रकारे लोकांची फसवणूक करणे किंवा त्यांना दहशतीखाली ठेवणे.

 4अनुसूची क्रमांक ६ – एखाद्या व्यक्तीला करणी करणारी किंवा सैतान ठरविणे

aएखादी व्यक्ती करणी किंवा जादूटोणा करते असे सांगणे.

aएखाद्या व्यक्तीवर भूतबाधा असल्याचा आरोप करणे.

aमंत्रतंत्राने जनावरांचे दूध कमी केले असे सांगणे.

aएखाद्या व्यक्तीमुळे इतरांचे नुकसान किंवा रोगराई पसरते असे सांगणे.

aत्या व्यक्तीचे जीवन त्रासदायक किंवा असह्य करणे.

aएखाद्या व्यक्तीला सैतान किंवा सैतानाचा अवतार घोषित करणे.

 4अनुसूची क्रमांक ७ – जारण-मारण किंवा करणीच्या नावाखाली छळ

aकरणी, जारण-मारण किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे.

aसंबंधित व्यक्तीची नग्न धिंड काढणे.

aत्या व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारांवर बंदी घालणे.

4अनुसूची क्रमांक ८ – भूतबाधेच्या नावाखाली दहशत निर्माण करणे

aभूत किंवा मंत्रतंत्राच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत निर्माण करणे.

aअलौकिक शक्तीचा कोप होईल अशी भीती दाखविणे.

aशारीरिक इजा होईल अशी धमकी देणे.

aवैद्यकीय उपचार घेण्यापासून व्यक्तीला रोखणे.

aत्याऐवजी अमानुष किंवा अघोरी उपचार करण्यास भाग पाडणे.

aमृत्यूची धमकी देणे किंवा शारीरिक वेदना देणे.

aजादूटोणा किंवा अमानुष कृत्यांद्वारे आर्थिक नुकसान करणे.

 4अनुसूची क्रमांक ९ – वैद्यकीय उपचारांपासून परावृत्त करणे

aकुत्रा चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यास प्रतिबंध करणे.

aसाप चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यास प्रतिबंध करणे.

aविंचू चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यास प्रतिबंध करणे.

aत्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा तत्सम उपाय करण्यास भाग पाडणे.

 4अनुसूची क्रमांक १० – बोटांनी शस्त्रक्रिया किंवा गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा

aबोटांनी शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे.

aमहिलेच्या गर्भातील अर्भकाचे लिंग बदलण्याचा दावा करणे.

 4अनुसूची क्रमांक ११ – अलौकिक शक्तीच्या नावाखाली लैंगिक शोषण

∙ ११(अ): स्वतःमध्ये अलौकिक शक्ती असल्याचा किंवा आपण अन्य व्यक्तीचा अवतार अथवा पवित्र आत्मा असल्याचा आभास निर्माण करणे किंवा भक्त व्यक्ती मागील जन्मात आपली पत्नी, पती किंवा प्रियकर होती असे सांगून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे.

∙ ११(ब): अपत्यप्राप्ती होऊ न शकणाऱ्या महिलेला अलौकिक शक्तीद्वारे मातृत्व प्राप्त करून देण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे.

 4अनुसूची क्रमांक १२ – मतिमंद व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचा आभास

∙ मतिमंद व्यक्तीमध्ये अमानवी किंवा अलौकिक शक्ती असल्याचा आभास निर्माण करून त्याद्वारे इतर लोकांना लुबाडणे.

वरील १२ प्रकार हे अधिनियमाच्या अधिकृत अनुसूचीतील क्रमांक आहेत.

 ∙ महसूल अधिकाऱ्यांसाठी स्पष्टीकरण:

या अधिनियमात तहसिलदार किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना स्वतंत्रपणे दक्षता अधिकारी म्हणून नियुक्त केलेले नाही. कलम ५ नुसार दक्षता अधिकारी म्हणून किमान पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची शासन अधिसूचनेद्वारे नियुक्ती अपेक्षित आहे.

aतथापि, तहसिलदार यांनी, अशा प्रकारची घटना निदर्शनास आल्यास संबंधित पोलीस यंत्रणेला माहिती देणे. पीडित व्यक्तीला आवश्यक संरक्षण व मदत मिळण्यासाठी संबंधित प्रशासनाशी समन्वय साधणे, संबंधित व्यक्तीच्या जीवितास धोका असल्यास लागू कायद्यांनुसार तातडीची प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे, अंधश्रद्धा किंवा जादूटोण्याच्या नावाखाली होणाऱ्या जमिनीच्या बळकावण्याच्या, आर्थिक फसवणुकीच्या किंवा सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणांत संबंधित स्वतंत्र कायद्यांनुसार कार्यवाही करणे या बाबी अपेक्षीत आहेत.

 aउपविभागीय अधिकारी यांची उपविभागीय दंडाधिकारी यांची भूमिका तहसिलदारांच्या तुलनेत व्यापक प्रशासकीय व प्रतिबंधात्मक स्वरूपाची असू शकते.

उपविभागात जादूटोणा किंवा नरबळीच्या घटनांमुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होत असल्यास पोलिसांकडून अहवाल मागविणे, संबंधित पोलीस अधिकारी व दक्षता अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे,

पीडित व्यक्तीच्या संरक्षणासाठी सक्षम यंत्रणेला निर्देश देणे, परिस्थितीनुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्‍या (BNSS) मधील प्रतिबंधात्मक तरतुदींचा वापर करणे, जिल्हाधिकाऱ्यांना गंभीर घटनांचा अहवाल सादर करणे, सामाजिक न्याय विभागाच्या जनजागृती कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत समन्वय साधणे इत्‍यादी कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.

b|b

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जादूटोणा विरोधी अधिनियम, २०१३. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.