आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

वहिवाट प्रकरणे आणि पीक पाहणी - फॉर्म नंबर १४

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

वहिवाट प्रकरणे आणि पीक पाहणी - फॉर्म नंबर १४

 शेतात पिकणारे पीक आणि देशाची अर्थव्‍यवस्‍था यांचा जवळचा संबंध आहे. हा परस्परसंबंध प्रस्‍थापित करण्‍यासाठी शेतीपासून मिळणार्‍या उत्‍पन्‍नाचा योग्य अभ्यास आणि विश्लेषण असणे आवश्यक आहे. यासाठी विविध पिकांखाली असलेल्‍या जमिंनीचे अचूक क्षेत्र, जमिनीत पेरण्‍यात आलेल्‍या पिकांचे विविध प्रकार याची योग्‍य, खरी अणि अचूक नोंद असणे अत्‍यावश्‍यक आहे. त्‍यासाठी गाव नमुना १२ अचूक असणे महत्‍वाचे आहे आणि हे काम फक्‍त आणि फक्‍त ग्राम महसूल अधिकारीच करु शकतात. देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेतही ग्राम महसूल अधिकारी किती महत्‍वाची भूमिका बजावतात हे यावरून लक्षात येते.

 ž ‘वहिवाट’ (Possession) या शब्दाचा कायदेशीर अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीने विशिष्ट जमिनीचा/ मालमत्तेचा किंवा मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा घेऊन तिचा वापर करणे, उपभोग घेणे, व्यवस्थापन करणे किंवा तिच्यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणे होय. महाराष्ट्रातील महसूल व जमीनविषयक कायद्यांच्या संदर्भात 'वहिवाट' या शब्दाला विशेष महत्त्व आहे.

 ž वहिवाटीचा कायदेशीर अर्थ:

वहिवाट म्हणजे एखाद्या व्यक्तीने जमिनीचा प्रत्यक्ष वापर व उपभोग घेण्याची वस्तुस्थिती.

उदाहरणार्थ:

∙ जमिनीची प्रत्यक्ष मशागत करणे.

∙ पिकांची लागवड करणे व पीक घेणे.

∙ जमिनीचा कृषीक वापर करणे.

∙ जमिनीवर ताबा व नियंत्रण ठेवणे.

∙ जमिनीचे उत्पन्न किंवा पीक स्वतः उपभोगणे.

∙ दुसऱ्या व्यक्तीमार्फत शेती करून घेणे.

 केवळ गाव नमुना सात-बारा उताऱ्यावर नाव असणे म्हणजे प्रत्यक्ष वहिवाट असणे नव्हे. तसेच प्रत्यक्ष वहिवाट असणे म्हणजे त्या व्यक्तीची मालकी सिद्ध होणे नव्हे. दीर्घकाळ वहिवाट केल्याने आपोआप मालकी हक्क निर्माण होत नाही. तथापि, विशिष्ट कायद्याच्या अटी पूर्ण झाल्यास दीर्घकालीन वहिवाटीला कायदेशीर महत्त्व प्राप्त होऊ शकते.

 ž ‘व्‍यक्तिश: जमीन कसणे’ म्‍हणजे काय:

पीक पाहणी समजून घेण्‍यापूर्वी ‘व्‍यक्तिश: जमीन कसणे’ याबाबतची कुळ कायद्यातील व्याख्‍या लक्षात घ्यावी. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम २ (६) मध्ये ‘व्‍यक्तिश: जमीन कसणे’ याचा अर्थ स्वत:साठी

(एक) स्वत: च्या महेनतीने, अथवा

(दोन) स्वत: च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या कष्टाने अथवा

(तीन) स्वत: च्या किंवा स्वत: च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली, मजुरीने कामावर लावलेल्या मजुरांकडून, त्यांना रोख रक्कम अथवा वस्तूंच्या रूपात वेतन/मोबदला देऊन, परंतु पिकाच्या हिश्श्याच्या स्वरूपात नव्हे, जमीन कसून घेणे’’ असा आहे.

याला अपवाद म्‍हणजे विधवा स्त्री, अवयस्क किंवा शारीरिक अथवा मानसिक दौर्बल्य जडलेला इसम, सशस्त्र, फौजेत नोकरीत असणारा इसम, हे नोकरांमार्फत, मजुरांमार्फत शेत कसून घेत असले तरीही ते स्वत:च जमीन कसतात असे कायदा मानतो.  

याचाच अर्थ अधिकृत अधिकाराशिवाय कोणालाही कोणाचीही जमीन वहिवाटता येणार नाही.

 ž वहिवाट रीत:

अँडरसन मॅन्युअल पृष्ठ क्र. ९७ आणि ९८ ; अ.क्र. २२ आणि २३ अन्वये,

शेतजमीन वहिवाटीच्या खालील पध्दती (रीत) होत्या, रीत ची नोंद गाव नमुना बारा सदरी नोंदवली जात असे:

P रीत-१: शेतजमीन मालकाने स्वतः शेतजमिनीत लागवड /मशागत करणे; कधी कधी मजुरांचे सहाय्य घेतले जाते. याला 'खुद्द' जमीन कसणे असे म्‍हणत. यात कुळ-मालक नातेसंबंध प्रस्‍थापीत होत नाही.

P रीत-२: शेतजमीन मालकाच्या स्वतःच्या किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपूर्णपणे वैयक्तिक आणि नियमित देखरेखीखाली त्याच्या मजुरांतर्फे त्याच्या शेतजमिनीची लागवड/मशागत करून घेतो. (देखरेख म्हणजे नांगरणी, पेरणी, पाणी देणे, तण काढणे, कापणी करणे इत्यादी सर्व कामांच्यावेळेस मार्गदर्शन करणे). यात कुळ-मालक नातेसंबंध प्रस्‍थापीत होत नाही.

 शेतजमीन कुळांमार्फत कसून घेतांना..

P रीत-३: शेतजमीन कसल्याचा मोबदला (भाडे/खंड) म्हणून कुळाने शेतजमीन मालकास रोख रक्कम (cash) देणे. यात कुळ-मालक नातेसंबंध आहेत.

P रीत-४: शेतजमीन कसल्याचा मोबदला (भाडे/खंड) म्हणून कुळाने शेतजमीन मालकास पिकातील वाटा देणे (share of the crop ). याला 'बटाईने' जमीन कसणे म्‍हणत. यात कुळ-मालक नातेसंबंध आहेत. 

P रीत-५: शेतजमीन कसल्याचा मोबदला (भाडे/खंड) म्हणून कुळाने शेतजमीन मालकास उत्पादनाचा निश्चित वाटा (a fixed quantity of produce) देणे. कुळ जर उत्‍पादनातील अर्धा वाटा देत असेल तर त्‍याला 'अर्धेलीने' जमीन कसणे आणि जर पिकातील चौथा हिस्‍सा देत असेल तर ‘चौथाईने’ जमीन कसणे म्‍हणत. यात कुळ-मालक नातेसंबंध आहेत.

P रीत-६: शेतजमीन कसल्याचा मोबदला (भाडे/खंड) म्हणून कुळाने शेतजमीन मालकास काही रोख रक्कम आणि पिकातील काही वाटा असा मिश्र (involving some mixture) स्वरूपात देणे.

 ž पीक पाहणी कालावधी: महाराष्‍ट्र जमीन महसूल नियम पुस्‍तिका- खंड ४ मधील प्रकरण दोन, परिच्‍छेद ४ आणि ५ मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे पीक पाहणीची कामे वर्षात दोन वेळा करायची असतात.

१. खरीप हंगामात (०१ ऑगस्‍ट ते १५ ऑक्‍टोबर)

२. रब्‍बी हंगामात (१५ नोव्‍हेंबर ते ३१ जानेवारी)

तथापि, सध्‍या संकरीत बियाणे लागवड पध्‍दतीमुळे कापणी लवकर केली जात असल्यामुळे. खरीप हंगामात पीक पाहणी हंगामातील सप्टेंबर पर्यंत तर रब्बी हंगामातील पीक पाहणी ३१ डिसेंबरपर्यंत संपविणे अपेक्षित आहे.

काही ठिकाणी उन्‍हाळी भुईमुग, उन्‍हाळी कांदा इत्‍यादी पिकांची लागवड जानेवारी/फेब्रुवारी महिन्‍यात केली जाते. सध्‍याच्‍या ऍग्रिस्‍टॅक पध्‍दतीमुळे उक्‍त कालावधीत बदल झाला आहे.

 ž कायदेशीर तरतूद: पीक पाहणी किंवा वहिवाट याबाबत महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ च्‍या तरतुदी लागू होतात.

तथापि, शासन निर्णय क्रमांकः जमीन-२०२२/प्र.क्र.७४/ज-१ अ. दिनांक ३१ जानेवारी, २०२३ अन्‍वये

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१, नियम २९ व ३० अंतर्गत ई-पिक पाहणी नोंदणी प्रक्रियेतील तरतुदींमध्ये सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत.  

 ∙ पीक पाहणी करतांना ग्राम महसूल अधिकारी यांनी जे पीक खरोखरच शेतात उगवले गेले आहे त्‍याची आणि जितक्‍या क्षेत्रावर ते पीक उगवले गेले आहे त्‍या क्षेत्राची अचूक नोंद घेणे आवश्‍यक आहे. आजकाल संगणीकरण आणि माहितीचा अधिकार यामुळे ग्राम महसूल अधिकारी यांनी याबाबत दक्ष रहाणे आवश्‍यकच आहे. चुकीच्‍या नोंदीचा खुलासा देण्‍याची वेळ न आणणे कधीही चांगले.

 ∙ पीक पाहणी करतांना ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतात उभ्‍या पिकासह, त्‍या जमीनीतील कुळ हक्‍क, वहिवाटदार, सीमा चिन्‍हे, मिश्र पिके, झाडे, फळझाडे, दुबार पिके, जल सिंचनाची साधने नवीन विहीर, बोअरवेल इत्‍यादींची तपासावी करावी व दप्‍तरातील नोंदी अद्‍ययावत कराव्‍या.

 ∙ पीक पाहणी करतांना काही ठिकाणी असे निदर्शनास येते की, अनेक शेतकरी त्यांचे क्षेत्र वहिवाटतांना, पिके घेतांना, रस्ता तयार करतांना हद्दीच्या निशाणीचे नुकसान करतात, हद्दीच्या निशाणीचे दगड, खुणा, निशाण्या जाणून-बुजून नाहीशा करतात किंवा बुजवून टाकतात. जर कोणाही शेतकर्‍याने  त्याचे क्षेत्र वहिवाटतांना, पिके घेतांना, रस्ता तयार करतांना हद्दीच्या निशाणीचे नुकसान केल्याचे, निशाणीचे दगड, खुणा, निशाण्या जाणून-बुजून नाहीशा केल्याचे  किंवा बुजवून टाकल्याचे आढळल्यास त्याचे विरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १४०/१४५ अन्वये कारवाई करण्यात यावी.

 ž फॉर्म नंबर १४:

'फॉर्म नंबर १४' किंवा 'नमुना १४ चा फॉर्म' म्‍हणजे महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३१ अन्‍वये विहीत केलेला नमुना. हा नमुना आणि गाव नमुना ७-ब दोन्‍ही एकाच प्रकारचे आहेत.

‘फॉर्म नंबर १४' ची तरतूद अद्‍यापही अंमलात आहे. ती रद्‍द झालेली नाही.

 'जमिनीचा ताबा हा मालकीपाठोपाठ आला पाहिजे' हे कायद्याचे सर्वसामान्य तत्व आहे.

पीक पाहणी करतांना ग्राम महसूल अधिकारी यांच्‍या असे निदर्शनास आले की,

एखादी जमीन, अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्ज्यात असल्याचे मानण्यात येणार्‍या व्यक्ती व्यतिरिक्त अन्‍य इसमाच्या कब्ज्यात/वहिवाटीस आहे तर ग्राम महसूल अधिकारी यांनी त्‍या जमिनीबाबत 'नमुना १४ चा फॉर्म' भरून शक्य असेल तितक्या लवकर (कमाल दहा दिवसांत) तहसिलदारकडे पाठवावा.

जमीन मालकाशिवाय दुसर्‍या व्यक्तीच्‍या नावे पीक पाहणी सदरी थेट लावण्याचे अधिकार ग्राम महसूल अधिकारी यांना नाहीत. परंतु, जमीन मालकाच्या एकत्र कुटुंबातील अन्य सदस्य वहिवाट करीत असेल तर 'नमुना १४ चा फॉर्म' भरू नये.

सदरचा 'नमुना १४ चा फॉर्म' ग्राम महसूल अधिकारी यांनी स्‍वत: पाठविणे अपेक्षीत आहे. यासाठी कोणताही आदेश देण्‍यात येणार नाही.

 अनेकदा पीक पाहणीची मुदत संपल्यावर केवळ अर्जदाराच्या अर्जावरून फॉर्म नंबर १४ भरून पाठविला जातो, ही बाब चुकीची आहे. एकदा पीक पाहणी झाल्यावर फॉर्म नंबर १४ भरून पाठविण्याचे काहीच कारण नाही.

बर्‍याचदा एकत्रीकरण योजनेमुळे निर्माण झालेल्या दोषाचा गैरफायदा घेऊन किंवा सहधारकाच्या नावे फॉर्म नंबर १४ भरण्याचा आग्रह खातेदारांमार्फत केला जातो. ही बाब अत्यंत चुकीची आणि महसूल कायद्याच्या विसंगत आहे.

 अनेकदा दिवाणी न्यायालयाकडून एखाद्या व्यक्तीस कब्‍ज्‍यासाठी मनाई केलेली असते, तरीही तो जमिनीवरील ताबा सोडत नाही. अशा वेळी कुठल्याही परिस्थित फॉर्म नंबर १४ भरून पाठवू नये. तसेच शासकीय जमीन, देवस्थान जमीन अशा जमिनीबाबत फॉर्म नंबर १४ भरून पाठविण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही.

 कुळ मयत असल्‍यास, त्‍याच्‍या वारसांची नोंद गाव दप्‍तरी न करताच, कुळाच्‍या वारसांच्‍या नावे फॉर्म नंबर १४ भरून पाठवू नये.

 नवीन तरतुदीनुसार जे पोटखराब क्षेत्र वहिवाटीखाली आणले गेले आहे अशा क्षेत्राची पीक पाहणी नोंदविणे हे एक आव्हान आहे. पोटखराब वर्ग अ खाली असणारी जमीन, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ४३ अन्‍वये लागवडीसाठी प्रतिबंधित नाही.

वहिवाटीखाली असलेल्‍या 'पोट-खराब'-वर्ग 'अ' प्रकाराखाली येणार्‍या जमीनीबाबत आकारणी करायची असेल तेव्‍हा त्‍याबाबतचा प्रस्‍ताव तहसिलदारांमार्फत जिल्‍हाधिकारी यांना सादर करून आकारणी ठरविण्‍याचा आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच 'पोट-खराब'-वर्ग 'अ' प्रकाराखाली येणार्‍या जमीनीची आकारणी करता येते.

'पोट-खराब'-वर्ग 'अ' प्रकाराखाली येणार्‍या जमीनीत जर काही पीके घेतली असतील तर पीक पाहणीच्‍या वेळेस अशा पीकांची नोंद घेता येते.

 तथापि, 'पोट-खराब' वर्ग 'ब' म्‍हणजे सार्वजनिक प्रयोजनार्थ अर्थात रस्‍ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरणेत येणारे तलाव किवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती-जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्‍याची टाकी, रहिवास वापर अशा काही विशिष्‍ठ प्रयोजनार्थ राखून ठेवलेले आणि त्‍यामुळे लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेले क्षेत्र. 'पोट-खराब' वर्ग 'ब' क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्‍यात येत नाही. परंतु 'पोट-खराब' वर्ग 'ब' क्षेत्रावर लागवड करण्‍यास 'महाराष्‍ट्र जमीन महसूल (जमिनीच्‍या वापरावरील निर्बंध) नियम १९६८' कलम २(३) च्‍य’ उपबंधानूसार म.ज.म.अ. १९६६, कलम ४३ अन्‍वये प्रतिबंध करण्‍यात आलेला आहे. या तरतुदीचे उल्‍लंघन करणार्‍यास, जिल्हाधिकारी एक हजार रुपयापर्यंत दंड करु शकतात.

 एखाद्‍या चुकीच्या नोंदीमुळे खातेदाराची गैरसोय होणार नाही व शासनाचा महसूल बुडणार नाही ही बाब लक्षात घेऊन कार्यवाही करणे क्रमप्राप्त आहे.

 तहसिल कार्यालयात खातेदारामार्फत दाखल केलेल्‍या पीक पाहणी करण्‍याबाबतच्‍या अर्जाची दखल घेण्‍यात येऊ नये किंवा असे अर्ज फॉर्म नं १४ भरून पाठवावा असे शेरे लिहून ग्राम महसूल अधिकारीकडे पाठविण्‍यात येऊ नये.

 फॉर्म नं १४ चा फॉर्म प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर, तहसिलदार यांनी, किमान सात दिवस आधी पूर्वसूचना देऊन त्या गावी भेट द्यावी. ग्राम महसूल अधिकारीयांनी उपरोक्त जमिनीच्या सर्व हितसंबंधीत लोकांना चौकशीच्या वेळी हजर ठेवावे.

जमीन मालकाव्‍यतिरिक्‍त अन्‍य व्‍यक्‍ती जमीन कसत असल्‍याबाबत, त्‍या त्‍या वर्षाची फॉर्म नं १४ भरून पाठविलेली प्रकरणे त्‍याच वर्षी चौकशी करून निकाली काढण्‍यात यावीत.    

 तहसिलदार यांनी फॉर्म नंबर १४ बाबत लवकरात लवकर चौकशी करावी असे कायद्‍यात नमूद आहे. किती वेळेत चौकशी करावी हे कायद्‍यात स्‍पष्‍टपणे नमूद नसले तरी 'त्‍या त्‍या वर्षाची फॉर्म नं १४ भरून पाठविलेली प्रकरणे त्‍याच वर्षी चौकशी करून निकाली काढण्‍यात यावीत' ही शासनाच्‍या सूचना व कायदेशीर तरतूद तहसिलदारांनी लक्षात घ्‍यावी.     

 तहसिलदार यांनी सदर जमिनीवर जाऊन वहिवाटदाराकडे दोन लायक पंचासह चौकशी करणे अपेक्षित आहे.  यावेळी उपरोक्‍त कुळ कायद्यातील ‘जमीन कसणे’ याबाबतची व्याख्‍या लक्षात घ्यावी. लगतच्या जमीनधारकांचे जबाब घ्यावे. सदर वहिवाटदाराकडे, तो कोणत्या कायदेशीर अधिकाराने किंवा कोणत्या नोंदणीकृत कायदेशीर कागदपत्राच्या आधारे सदर जमीन वहिवाटत आहे याची चौकशी करावी. त्‍याच्‍या ताब्यात जमीन कोणत्या नोंदणीकृत दस्ताने आणि केव्हा आली याबाबत त्याचा सविस्‍तर जबाब आणि पुरावे घ्यावे.

वहिवाटदाराने जमिनीत आत्तापर्यंत कोणकोणती पिके घेतली, आज रोजी कोणते पीक आहे याबाबत पंचनामा करावा. अनेक वेळा खरेदी-विक्रीचा व्यवहार कायद्यानुसार पूर्ण होऊ शकला नाही तर, पीक पाहणीद्‍वारे, गाव दप्‍तरी नाव दाखल करुन आडमार्गाने व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्‍हणून जमिनीचा ताबा कसा आला याबाबत पुरावा दिला गेला पाहिजे.

 सदर वहिवाटदार नोंदणीकृत कायदेशीर कागदपत्राच्या आधारे (नोंदणीकृत दस्त, ताब्यासह नोंदणीकृत साठेखत, न्यायालयीन आदेश, सक्षम अधिकार्‍याचा आदेश, वारसा हक्क, बक्षिसपत्र, मृत्युपत्र इत्‍यादी) अधिकृतपणे जमिनीत वहिवाट करीत असेल अशी तहसिलदाराची खात्री झाल्‍यास, तसा स्‍पष्‍ट उल्‍लेख निकालपत्रात करुन, त्या वर्षासाठी अशा वहिवाटदाराचे नाव सदर जमिनीच्या वहिवाट सदरी नोंदविण्याचा आदेश पारित करावा. केवळ जबाब व पंचानामाच्या आधारे कोणाचीही वहिवाट लावणे अवैध ठरेल हे लक्षात ठेवावे.

 मागील अनेक वर्षाची वहिवाट दाखल करता येत नाही. मागील अनेक वर्षाची वहिवाट लावण्याचा आदेश बेकायदेशीर ठरेल. वहिवाटदाराकडे असणारा दस्त नोंदणीकृतच असावा असा आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेला आहे तसेच मा. विभागीय आयुक्तांनीही अशा प्रकारचे आदेश पारीत केलेले आहेत.

 अशा वहिवाटदाराचे नाव चालू वर्षासाठीच वहिवाट सदरी नोंदविण्याचा आदेश पारित करता येतो हे लक्षात ठेवावे. पुढच्या वर्षी तलाठी यांनी जरी तोच वहिवाटदार वहिवाट करीत असेल तरी पुन्हा नमुना १४ चा फॉर्म भरून पाठवणे आवश्यक असते.

 एखाद्या वर्षी मालकाव्यतिरिक्त दुसर्‍याचे नाव वहिवाट सदरी लागले म्हणजे तो आपोआप कुळ बनला किंवा कुळ हक्‍क सांगु शकेल हा फार मोठा गैरसमज आहे.

कुळकायद्यानुसार कुळ व मालक यांच्यात करार होणे, कुळ व मालक असे नाते सिध्द होणे, कुळाने मालकास खंड देणे इत्यादी बाबी कुळ सिध्द होण्यास आवश्यक असतात. कुळ कायदा कलम ४ मध्‍ये 'कुळ म्‍हणून मानावयाच्‍या व्‍यक्‍ती' ची व्‍याख्‍या नमूद आहे.

कुळ कायदा कलम '३२ ओ' मध्‍ये कुळ कायदा कलम '३२ ओ' मध्‍ये 'जमीन मालकाने दिनांक १.४.१९५७ नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कुळवहिवाटीच्याबाबतीत, जातीने जमीन कसणार्‍या कुळास अशी कुळवहिवाट सुरु झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आंत, त्याने धारण केलेली जमीन मालकांकडून खरेदी करण्याचा हक्क असतो.' असे नमूद असले तरीही कुळ कायदा कलम '३२ ओ' अन्वये कुळ जाहिर करणेसाठी खालील पात्रता अत्‍यावश्‍यक आहे. 

१) कुळकायद्याने कुळास दिलेला हक्क बजावण्याची ज्याची इच्छा असेल त्याने एक वर्षाच्या आंत, त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) विहीत रितीने कळविले पाहिजे.

२) अशा प्रकारे कळविल्यानंतर शेतजमीन न्यायाधिकरण (तहसिलदार) याप्रकरणी नोटीस बजावून चौकशी करतात. या चौकशीच्यावेळी खालील मुद्दे स्पष्टपणे/निसंदिग्धापणे सिध्द होणे अत्यावश्यक असते.

अ) अर्जदार कुळ आणि जमीन मालक यांच्‍यात 'कुळ व मालक' असे नाते सिध्द होत आहे काय?

ब) कुळ आणि मालक यांच्यात 'कुळ व मालक' नाते सिध्द करणारा आणि न्यायालयात निसंदिग्धपणे सिध्द होणारा करार झाला आहे काय?

क) कुळ मालकाला रोखीने खंड देत आहे काय?

ड) कुळ देत असलेला रोख खंड मालक स्वीकारत आहे काय आणि त्याबाबत पावती देत आहे काय?

वरील बाबी सिध्‍द झाल्‍या तरच वहिवाटदार कुळ ठरू शकतो.

जोपर्यंत जमीनमालक कुळाचा कायदेशीर कुळ म्‍हणून स्‍वीकार करत नाही किंवा ती व्‍यक्‍ती कुळ नाही हे विधान कायदेशीररीत्‍या फेटाळले जात नाही तो पर्यंत कुळाचा, कुळकायदा कलम ३१-ओ नुसार दिलेला एक वर्षाचा कालावधी सुरू होत नाही. (लक्ष्‍मण धोंडी झुरळे वि. यशोदाबाई, २००५(२)- ऑल महा. रिपो.-८१२)

 फॉर्म नंबर १४ च्‍या चौकशीच्यावेळी तहसिलदार यांच्या असे निदर्शनास आले की, कोणत्याही नोंदणीकृत दस्ताशिवाय किंवा कायदेशीर कागदपत्राशिवाय, अनाधिकाराने किंवा दंडेलशाहीने अशी वहिवाट सुरू आहे तर तत्काळ अशी वहिवाट करणार्‍याविरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ५९ अन्वये कारवाई करावी.    

 तहसिलदार यांनी 'नमुना १४ च्‍या फॉर्ममध्ये नाव असणारी व्‍यक्‍ती जमीन कसत होती' असा निकाल दिला तर गाव नमुना ७-ब मध्‍ये शेरा स्‍तंभात तहसिलदार यांनी सदर बाबत दिलेल्‍या निकालाचा क्रमांक व दिनांक लिहून तशी नोंद करावी.

 ž वहिवाटीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

 वहिवाटीबाबत तसेच अधिकार अभिलेखातील नोंदीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक ८३९९/२०१५  मध्‍ये एक उत्कृष्ठ आणि सर्वच महसूल अधिकार्यांना उपयोगी असा निकाल इंग्रजी भाषेत दिला आहे. तो निकाल सर्वांना व्‍यवस्‍थित कळावा या दृष्‍टीने मी त्या निकालाचा मराठी भाषेत स्वैर अनुवाद करून देत आहे.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयात

दिवाणी अपील अधिकार क्षेत्रात

दिवाणी अपील क्रमांक ८३९९/२०१५

(विशेष परवानगी याचिका (सी) क्रमांक २६६९८/२०१० यातून उद्भवणारे)

 

नारायण लक्ष्‍मण पाटील                                                                       .... वादी

                                                            विरूध्‍द

मे. गाला कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. आणि इतर                                         .... प्रतिवादी   

 

उक्‍त निकालपत्रातील फक्‍त संबंधित मुख्‍य मुद्‍दे

[१५]  अपिलार्थीचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करतांना आणि या प्रकारची विनंती मान्‍य करतांना, अपिलार्थीने त्‍याचे प्रश्‍नाधीन जमिनीत त्‍याचे स्‍थान किंवा दावा अथवा कोणत्‍या अधिकाराने त्‍याचे नाव दाखल करण्‍यात यावे या संबंधी काहीही खुलासा केलेला नाही. आणि संबंधीत स्‍तंभात असे नाव दाखल करतांना महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम व नियम यांच्‍याकडे दुर्लक्ष झाले आहे हे समजण्‍यात तहसिलदार, बोरीवली अपयशी ठरले आहेत.                                                                           

 [१६] या संदर्भात, महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्‍या खालील तरतुदींची नोंद घेण्‍यात यावी. या तरतुदी खालील प्रमाणे:-

 २. व्‍याख्‍या- या अधिनियमान्‍वये अन्‍य संदर्भ अर्थ अपेक्षित नसेल तर-

(१२) 'जमीन धारण करणे' किंवा 'जमीन धारक असणे' किंवा 'जमिनीचा धारक असणे’ म्‍हणजे वैधरीत्‍या जमिनीचा कब्‍जा असणे, मग ते प्रत्‍यक्षात असो किंवा नसो.

(२३) 'भोगवटादार' म्‍हणजे, कुळ किंवा शासकीय पट्टेदार खेरीज करुन, बिनदुमाला जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असलेला धारक. परंतु  प्रत्यक्ष कब्जा असणारा धारक हा कूळ असेल त्याबाबतीत, भूमिधारक किंवा यथास्थिती, वरिष्ठ जमीनमालक हा भोगवटादार आहे असे मानण्यात येईल.

(२४) 'भोगवटा' म्‍हणजे कब्‍जा.

(२५) 'जमिनाचा भोगवटा करणे' म्‍हणजे जमीन कब्जात असणे किंवा कब्जात घेणे.

 कलम १४८. अधिकार अभिलेख

प्रत्येक गावामध्ये अधिकार अभिलेख ठेवण्यात येतील व अशा अधिकार अभिलेखात

पुढील तपशील असेल :—

(अ) (कुळ सोडून अन्य अशा) ज्या व्यक्ती जमीन धारण करणाऱ्या, भोगवटा करणाऱ्या, मालक किंवा जमीन गहाण घेणाऱ्या किंवा तिचे भाडे किंवा महसूल आपल्या नावे करून घेणाऱ्या असतील अशा सर्व व्यक्तींची नावे.

(ब) शासकीय पट्टेदार म्हणून किंवा संबंधित कुळकायद्याच्या अर्थकक्षेतील कुळे धरून, कुळे म्हणून ज्या व्यक्ती जमीन धारण करीत असतील अशा सर्व व्यक्तींची नावे.

(क) अशा व्यक्तींच्या परस्पर हितसंबंधाचे स्वरूप, त्याची मर्यादा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या अटी किंवा दायित्वे असल्यास त्या अटी किंवा दायित्वे.

(ड) अशा व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तींनी द्यावयाचा किंवा त्यांना देण्याजोगा खंड किंवा महसूल, कोणताही असल्यास, तो खंड किंवा महसूल.

(इ) राज्य शासन, याबाबतीत केलेल्या नियमान्वये सर्वसामान्यपणे किंवा त्यात विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही क्षेत्राच्या प्रयोजनांसाठी विहित करील असे इतर तपशील.

 कलम १४९. अधिकार संपादन केल्याचे प्रतिवृत्त देणे

राज्यातील कोणत्याही क्षेत्रामध्ये असलेली जमीन, धारण करणारा, भोगवटा करणारा, जमीनमालक, जमीन गहाण ठेवून घेणारा, शासकीय पट्टेदार किंवा कुळ म्हणून किंवा तिच्या खंडाचा किंवा महसुलाचा अभिहस्‍तांकिती म्हणून कोणताही अधिकार उत्तराधिकाराने अनुजीविताधिकाराने, वारसाहक्काने, विभागणीने, खरेदीने, गहाणाने, देणगीने, पट्ट्याने किंवा अन्य रीतीने संपादन करणारी कोणतीही व्यक्ती, असा अधिकार तिने संपादन केल्याबद्दल, असा अधिकार संपादन केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत तलाठ्यास तोंडी अथवा लेखी कळवील आणि उक्त तलाठी, कळविणाऱ्या व्यक्तीला असे प्रतिवृत्त मिळाल्याची लेखी पोहोच तात्काळ देईल.

परंतु असा अधिकार संपादन करणारी व्यक्ती अज्ञान असेल किंवा अन्यथा अपात्र असेल तेव्हा असे प्रतिवृत्त तिचा पालक किंवा तिची मालमत्ता जिच्या ताब्यात असेल अशी इतर व्यक्ती तलाठ्यास देईल.

परंतु आणखी असे की, जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीनुसार किंवा नोंदलेल्या दस्तऐवजांच्या आधारे अधिकार संपादन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, तलाठ्यास प्रतिवृत्त देण्याबाबतच्या जबाबदारीतून सूट देण्यात येईल.

परंतु आणखी असे की, जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीने अधिकार संपादन केला असल्याचा एखाद्या व्यक्तीचा दावा असेल, त्याबाबतीत या अधिनियमाच्‍या किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींन्वये, अशी परवानगी आवश्यक असेल त्याबाबतीत, अशी व्यक्ती, तलाठ्याने तीस, तसे करण्यास फर्माविले तर, या अधिनियमान्‍वये करण्यात आलेल्या नियमान्वये आवश्यक असेल त्याप्रमाणे अशी परवानगी ज्या आदेशाद्वारे देण्यात आली असेल त्या आदेशाबाबतचा पुरावा सादर करील.

 कलम १५०. फेरफार नोंदवही व विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही

१) कलम १४९ अन्वये, तलाठी त्याच्याकडे दिलेल्या प्रत्येक प्रतिवृत्ताची किंवा कलम १५४ अन्वये किंवा कोणात्याही जिल्हाधिकाऱ्याकडून मिळालेली संपादनाची किंवा हस्तांतरणाची नोंद फेरफार नोंदवहीत करील.

२) जेव्हा एखादा तलाठी, फेरफार, नोंदवहीत एखादी नोंद करील तेव्हा तो अशा नोंदीची एक प्रत चावडीतील ठळक जागी, त्याच वेळी लावील आणि फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे असे अधिकार अभिलेखावरून किंवा फेरफार नोंद वहीवरून त्यास दिसून येईल, अशा सर्व व्यक्तींना आणि त्यात ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तींना लेखी कळवील.

३) पोट-कलम (१) अन्वये फेरफार नोंदवहीत केलेल्या कोणत्याही नोंदीच्या संबंधात तलाठ्याकडे तोंडी किंवा लेखी आक्षेप घेण्यात आले असतील तर वादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवहीत त्या आक्षेपांच्या तपशीलाची नोंद करणे हे तलाठ्याचे कर्तव्य असेल. आक्षेप सादर करणाऱ्या व्यक्तींना तलाठी त्याबाबत विहित नमुन्यात लेखी पोच देईल.

४) वादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवहीत दाखल केलेली वादग्रस्त प्रकरणे अव्वल कारकुनाच्या हुद्यापेक्षा कमी हुद्दा नसेल असा महसुली किंवा भू-मापन अधिकारी एक वर्षाच्या आत शक्यतोवर निकालात काढील आणि अशा नोंदवहीत नोंद करण्यात आलेले आक्षेप ज्या आदेशान्वये निकालात काढण्यात आले असतील अशा आदेशांची असा अधिकारी याबाबत राज्य शासनाने केलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात येईल अशा रीतीने फेरफार नोंदवहीत नोंद करील.

५) याबाबतीत राज्य शासन जे नियम करील त्यास अधीन राहून फेरफार नोंदवहीतील नोंदी अधिकार अभिलेखात दाखल करण्यात येतील.

परंतु फेरफार नोंदवहीतील नोंद, योग्यरीतीने प्रमाणित आल्याखेरीज, अधिकाराभिलेखात दाखल करण्यात येणार नाही.

६) फेरफार नोंदवहीतील नोंदी तपासण्यात येतील आणि अशा नोंदी बरोबर असल्याचे आढळून आले तर किंवा, यथास्थिति, त्यात दुरुस्ती केल्यानंतर, विहित करण्यात येईल अशा रीतीने त्या अव्वल कारकुनाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल असा महसूल अधिकारी किंवा भू-मापन अधिकारी प्रमाणित करील. (परंतु असे की, ज्या नोंदीसंबंधी कोणताही वाद नसेल त्या नोंदी मंडळ निरीक्षकास तपासता येतील) परंतु आणखी असे की, संबंधित पक्षकारांवर त्याबाबतीत नोटीस बजाविण्यात आल्याशिवाय अशा कोणत्‍याही नोंदी प्रमाणित करण्‍यात येणार नाहीत.

७) राज्य शासनाने याबाबतीत केलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा कार्यपद्धतीनुसार कुळवहिवाटीची नोंदवही ठेवण्यात येईल असा निर्देश राज्य शासन देऊ शकेल.

 [१७] उपरोक्‍त तरतुदी विचार मुंबई उच्‍च न्‍यायालयाने बंसराजीदेवी भुवल सिंग रामनिरंजन सिंगची विधवा आणि इतर विरूध्‍द मे. बायरामजी जीजीभॉय प्रा. लि. आणि इतर २००६ (६) महा. लॉ. जर्न. ९५ या प्रकरणात करून खालील प्रमाणे मुद्‍दे नोंदविले आहेत:

"८. यावरून असे स्‍पष्‍ट होते की, सदर अधिनियमाच्‍या कलम १४८ सह १४९ आणि १५० चे वाचन करता, कोणाचेही नाव अधिकार अभिलेखात दाखल करतांना, अर्जदार हा त्‍या जमिनीचा धारक, वहिवाटदार, मालक, गहाण घेणारा किंवा पट्‍टेदार असावा. याप्रकारचा अधिकार अशा व्‍यक्‍तीसाठीही उपलब्‍ध असतो जो सदर मिळकतीत उत्तराधिकाराने (succession), उत्तरजीविताने (survivorship), वारस हक्‍काने (inheritance), वाटणीने (partition), खरेदीने (purchase), गहाणाने (mortgage), बक्षीसाने (gift), भाडेतत्त्वावर (lease) किंवा अन्‍यप्रकारे (otherwise) सदर जमीन संपादीत (acquire) करतो. भुवलसिंगचा दावा आहे की तो २७ एकर जमिनीचा वहिवाटदार होता आणि सदर हक्‍क त्‍याच्‍याकडे सन १९५० पासून आहे. त्‍यामुळे त्‍याचा सदर हक्‍क "इतर हक्‍कात" नोंदविण्‍यास पात्र आहे. त्‍याचा हा दावा उपजिल्‍हाधिकारी यांनी फेटाळून लावला जो अप्‍पर विभागीय आयुक्‍तांनीही कायम योग्‍यरित्‍या केला. केवळ धारक किंवा वहिवाटदार या कायदेशीर अधिकाराच्‍या आवश्‍यकतेची पूर्तता करीत नाही. सदर अधिनियमाच्‍या कलम २(१२) मध्‍ये नमूद केल्‍यानूसार हे स्‍पष्‍ट होते की, "जमीनीचा धारक (land holder)" किंवा "जमीन धारण करणारा (holder of Land)" म्‍हणजे कायदेशीररित्‍या सदर जमीन "कायदेशीररित्‍या (lawfully)" ताब्‍यात असणे. मग असा ताबा प्रत्‍यक्षात असो किंवा नसो. आणि कलम २(२३) अन्‍वये वहिवाटदार (occupant) म्‍हणजे धारकाच्‍या ताब्‍यात दुसर्‍याच्‍या हाती मालकी नसलेल्‍या जमिनीचा प्रत्‍यक्ष ताबा (actual possession of un-alienated land) असणे. त्‍यामुळे भुवलसिंगला हे सिध्‍द करणे आवश्‍यक आहे की, प्रश्‍नाधीन जमिनीत त्‍याचा ताबा किंवा वहिवाट कायदेशीर होती किंवा त्‍याच्‍या ताब्‍यात सदर जमीन कायदेशीर पध्‍दतीने/शिर्षकाने (by a legal conveyance/title) किंवा पावती इत्‍यादी सारख्‍या दस्‍तऐवजाने आली होती. जरी त्‍याचा ताबा आहे हे मान्‍य केले तरी केवळ प्रतिवादी किंवा त्‍याचे प्रतिनिधी यांनी त्‍यावेळी ताब्‍याला हरकत घेतली नाही म्‍हणून त्‍याचा असा ताबा कायदेशीर ताबा ठरत नाही. त्‍याला त्‍याचा ताबा, कायदेशीर बाबी निदर्शनास आणून हे सिध्‍द करणे आवश्‍यक आहे. आणि जर तो अशा आवश्‍यक बाबी सिध्‍द करू शकला नाही तर महसूल अधिकार्‍यांना भुवलसिंगला खाजगी जमिनीवर अतिक्रमण करणारी व्‍यक्‍ती असे म्‍हणणे योग्‍यच आहे. तहसिलदार आणि त्‍यानंतर एसडीओ ने मुख्‍य मुद्‍दा विचारातच घेतला नाही की प्रश्‍नाधीन जमीन कायदेशीररित्‍या भुवलसिंगच्‍या ताब्‍यात होती किंवा नाही. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत    महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ हे नियम निश्‍चित करण्‍यात आले आहेत. आणि या नियमातील नियम १० अन्‍वये फेरफार नोंदवहीचा फॉर्म दिलेला आहे. नियम ११ अन्‍वये फेरफार नोंदवहीत नोंदी करण्‍याची माहिती देण्‍यात आली आहे. नियम १२ अन्‍वये विवक्षित प्रकरणात फेरफाराची नोंद करण्‍याची माहिती देण्‍यात आली आहे. नियम १३ मध्‍ये नमूद आहे की, कोणत्याही जमिनीच्या संबंधात कलम १५०, पोटनियम (१) अन्वये फेरफाराच्या नोंदवहीत नोंद करण्यात येईल  तेव्हा, तलाठी, अधिकार अभिलेखात त्या जमिनीच्या संबंधात आढळणार्‍या नोंदीसमोर, सदर फेरफार नोंद यथोचितरित्या प्रमाणित करण्यात आलेली नाही या शेर्‍यासह, त्या फेरफाराच्या नोंदीचा क्रमांक अधिकार अभिलेखात पेन्सिलने दर्शवील. ती नोंद प्रमाणित करण्‍यात आल्‍यानंतर ती शाईने केलेल्‍या नोंदीत रूपांतरीत होईल. तहसिलदार आणि त्‍यानंतर एसडीओनी भुवलसिंगचा अर्ज, सदर अधिनियमातील कलम २(१२), २(२३), आणि १४८, १४९ आणि १५० च्‍या कसोटीवर तपासणे आवश्‍यक होते. तथापि, हे दोन्‍ही अधिकार्‍यांनी सादर केलेला अहवाल किंवा तहसिलदारने केलेल्‍या स्‍थळपाहणीच्‍या आधारावर अवलंबून राहून भुवलसिंगचा सदर जमिनीवरील ताबा मान्‍य केला. केवळ ताबा आहे या आधारावर दावेदाराचे नाव इतर हक्‍कात नमूद करणे म्‍हणजे विपर्यास करणे आहे आणि सदरचा ताबा कायदेशीर आहे याबाबत जो पर्यंत संबंधीत अधिकार्‍याची खात्री पटत नाही तो पर्यंत, जरी मूळ मालक हजर राहून आपली बाजू मांडून गेला तरीही अशी नोंद करण्‍यात येऊ नये. जेव्‍हा अधिकारी आपले वैधानिक कर्तव्य करीत असेल तेव्‍हा तर नाहीच नाही.                 

 जेव्‍हा नियम म्‍हणतो की, विशिष्‍ठ पध्‍दतीने कर्तव्‍य केलेच पाहिजे किंवा विशिष्‍ठ पध्‍दतीने चौकशी केलीच पाहिजे, तेव्‍हा तहसिलदारने कायदा/नियमात नमूद आवश्‍यक तरतुदींची पूर्तता होत आहे किंवा नाही याबाबत खात्री करून घेणे आवश्‍यक ठरते.

 [१८] त्‍यामुळे हे स्‍पष्‍ट होते की, एखाद्‍याचे नाव सदर अधिनियमातील कलम १४८ सह १४९ व १५० अन्‍वये अधिकाराचा वापर करून अधिकार अभिलेखात दाखल करतांना, अर्जदार सदर जमिनीचा धारक (holder), वहिवाटदार (occupant), मालक (owner), गहाणदार (mortgagee), किंवा कुळ/भाडेकरू (tenant) असावा. हे अधिकार/हक्‍क उत्तराधिकाराने (succession), उत्तरजीविताने (survivorship), वारस हक्‍काने (inheritance), वाटणीने (partition), खरेदीने (purchase), गहाणाने (mortgage), बक्षीसाने (gift), भाडेतत्त्वावर (lease) किंवा अन्‍यप्रकारे (otherwise) जमीन संपादीत (acquire) करणार्‍याला प्राप्‍त होतात. आम्‍ही मुंबई उच्‍च न्‍यायालयाने घेतलेल्‍या उपरोक्‍त निर्णयातील दृष्‍टीकोनांचा पूर्णपणे स्‍वीकार करतो.

अपीलार्थींचा दावा आहे की, ते, अन्‍य लोकांसह प्रश्‍नाधीन जमिनीत मागिल १५-२० वर्षांपासून वहिवाट करतात त्‍यामुळेत्‍यांची नावे "इतर हक्‍कात" दाखल होणे आवश्‍यक आहे. त्‍यांचा हा दावा उपविभागीय अधिकारी तसेच उपजिल्‍हाधिकारी (अपील) यांनी फेटाळला होता परंतु अप्‍पर आयुक्‍तांनी मान्‍य केला आहे. केवळ धारक (holder) किंवा वहिवाटदार (occupant) या अधिकाराचा वापर करण्‍यासाठी कायद्‍यातील तरतुदींची आवश्‍यकतांची पूर्तता करीत नाहीत. सदर अधिनियमातील वर उल्‍लेखीत कलम २(१२), "जमीनीचा धारक (land holder)" किंवा "जमीन धारण करणारा (holder of Land)" म्‍हणजे कायदेशीररित्‍या सदर जमीन "कायदेशीररित्‍या (lawfully)" ताब्‍यात असणे. मग असा ताबा प्रत्‍यक्षात असो किंवा नसो. आणि कलम २(२३) अन्‍वये वहिवाटदार (occupant) म्‍हणजे धारकाच्‍या ताब्‍यात दुसर्‍याच्‍या हाती मालकी नसलेल्‍या जमिनीचा प्रत्‍यक्ष ताबा (actual possession of un-alienated land) असणे. हे स्‍पष्‍ट करतात. त्‍यामुळे अपिलार्थी यांनी त्‍यांचा सदर जमिनीवर कायदेशीर ताबा आहे किंवा त्‍यांच्‍या ताब्‍यात सदर जमीन कायदेशीर पध्‍दतीने/शिर्षकाने (by a legal conveyance/title) किंवा पावती इत्‍यादी सारख्‍या दस्‍तऐवजाने आली होती आणि ज्‍याला प्रतिवादी क्रमांक १ पक्षकार होते हे सिध्‍द करणे हे आवश्‍यक आहे. या प्रकरणात अपिलार्थी प्रतिकूल ताब्यानेही (adverse possession) हक्‍कदार ठरत नाहीत.

 [१९] केवळ प्रतिवादी क्रमांक १ ने किंवा मूळ मालकाने ताब्‍याला हरकत घेतली नाही असे म्‍हणणे जरी मान्‍य केले तरी, ते त्‍याचा ताबा कायदेशीर ठरवित नाही. अपिलार्थीने त्‍याची ताब्‍याबाबची मालकी सिध्‍द करणे आवश्‍यक आहे. जर तो असे सिध्‍द करू शकला नाही तर सदर फेरफार नोंद रद्‍द होण्‍यास पात्र ठरेल. अपिलार्थी आणि अन्‍य ६ व्‍यक्‍तींची नावे इतर हक्‍कात केवळ ताबा आहे या आधारावर दावेदाराचे नाव इतर हक्‍कात नमूद करणे म्‍हणजे विपर्यास करणे आहे आणि सदरचा ताबा कायदेशीर आहे याबाबत जो पर्यंत संबंधीत अधिकार्‍याची खात्री पटत नाही तो पर्यंत, जरी मूळ मालक हजर राहून आपली बाजू मांडून गेला तरीही अशी नोंद करण्‍यात येऊ नये. जेव्‍हा अधिकारी आपले वैधानिक कर्तव्य करीत असेल तेव्‍हा तर नाहीच नाही.              जेव्‍हा नियम म्‍हणतो की, विशिष्‍ठ पध्‍दतीने कर्तव्‍य केलेच पाहिजे किंवा विशिष्‍ठ पध्‍दतीने चौकशी केलीच पाहिजे, तेव्‍हा तहसिलदारने कायदा/नियमात नमूद आवश्‍यक तरतुदींची पूर्तता होत आहे किंवा नाही याबाबत खात्री करून घेणे आवश्‍यक ठरते.

 [२०] आमच्‍यामते, अपिलार्थी आणि अन्‍य ६ व्‍यक्‍तींची नावे अधिकार अभिलेखात, ज्‍यात मालकी हक्‍क सांगणार्‍यांचे नाव नमूद असते त्‍यात दाखल करता येऊ शकत नाही. आम्‍ही पुढे असेही नमूद करतो की, जरी अपिलार्थी आणि इतरांनी जमिनीवर त्‍यांचा मालकी हक्‍क आहे असा दावा केला नसा तरी त्‍यांची नावे अधिकार अभिलेखात दाखल करणे कायदेशीर ठरणार नाही आणि म्‍हणून फेरफार क्रमांक ४६०१ ची नोंद सदर अभिलेखात घेता येऊ शकत नाही. म्‍हणून फेरफार क्रमांक ४६०१ दिनांक ०६.०३.१९८७ योग्‍यरित्‍या फेटाळण्‍यात आला आहे.

 अपील फेटाळण्‍यात येत आहे. खर्चाबाबत आदेश नाहीत.

 (रंजन गोगोई) .................... न्‍यायमूर्ती

 (आर. के. अग्रवाल) .............. न्‍यायमूर्ती

 नवी दिल्‍ली

ऑक्‍टोबर ८, २०१५

b|b

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला वहिवाट प्रकरणे आणि पीक पाहणी - फॉर्म नंबर १४. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.