आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

हिंदू वारसा कायदे

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

हिंदू वारसा कायदे 

अनुक्रमणिका 

w भारतीय उत्तराधिकार (अधिनियम १९२५ (महत्वाच्या तरतुदी)

कलम ३२ ते ४९

w हिंदू वारसा कायदा १९५६ (महत्वाच्या तरतुदी)

w हिंदू वारसा कायदा १९५६ - कलम ८ अन्‍वये वर्ग १ते वर्ग ४ च्‍या वारसांची अनुसूची

w हिंदू वारसा कायदा १९५६ अन्‍वये हिंदू स्‍त्रीची मालमत्ता

w हिंदू वारसा (सुधारणा) कायदा -२००५ (महत्वाच्या तरतुदी)

w महत्‍वाचे शब्दार्थ

w महत्वाचे न्याय निर्णय

भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ (महत्वाच्या तरतुदी) 

भारतीय उत्तराधिकार अधिनियम दिनांक ३० सप्टेंबर १९२५ रोजी अंमलात आला. त्याद्वारे परंपरेशी संबंधित सर्व भारतीय कायदे एकत्र करण्यात आले. या कायद्यात ११ भाग, ३९१ कलमे आणि ७ परिशिष्ट यांचा समावेश आहे. हा कायदा एकत्र कुटुंबातील, मृत्युपत्र न करता मयत झालेल्या व्यक्ती आणि मृत्युपत्र केलेले असल्‍यास त्‍यात नमूद उत्तराधिकारी यांना लागू आहे. 

ब्रिटीशांना भारतात राज्य करतांना कायदे आनुषंगिकरित्या चालविणे आवश्यक झाले. यात मुख्‍यत: हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचा विशेष विचार करणे आवश्यक होते कारण या दोन्ही समुदायाचे स्वत:चे वैयक्तिक कायदे त्यांच्या पवित्र धर्मग्रंथांमध्ये दिलेले होते. याशिवाय अल्प लोकसंख्‍या असलेले पारसी, ख्रिश्‍चन इत्‍यादी इतर समुदायही होते, ज्यांची हिंदू किंवा मुस्लिम धर्मावर निष्ठा नव्ह्ती आणि ते हिंदू आणि मुस्लिम धर्मियांपेक्षा भिन्न होते. या समुदायांवर हिंदू किंवा मुस्लिम धर्मिय कायदे लादणे योग्य नव्हते. या सर्वांचा विचार करुन भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ बनविण्यात आला. 

सर्वसाधारणपणे मुस्‍लिम धर्मिय वगळता इतर सर्व धर्मियांना उदा. हिंदू, ख्रिश्चन, पारसी इत्‍यादींना हा कायदा लागू होतो. भारतीय मुस्लिम धर्मियांना या कायद्यातील फक्त काही तरतुदी लागू होतात. कोणत्या तरतुदी कोणत्या धर्माला लागू पडतील अथवा पडणार नाही हे त्या तरतुदीमध्येच या कायद्यात स्पष्टपणे दिलेले आहे.

या कायद्‍यान्‍वये मृत्युपत्र न करता मयत झालेल्या हिंदू, मुस्लिम व पारसी वगळता इतर धर्मीय व्यक्तींचे वारस ठरविण्‍यासाठी प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:- 

w कलम ३२: मृत्युपत्र न करता मृत्यू पावलेल्या व्यक्तीची मिळकत प्रथम त्या व्यक्तीची पत्नी किंवा पती अथवा अपत्ये  व जवळचे नातेवाईक यांना विहित नियमांप्रमाणे वारसाने मिळते.

स्पष्टीकरण- जर विवाहापूर्वीच विशिष्ट अधिकृत कराराने एखाद्या स्‍त्रिला तिच्या पतीच्या मिळकतीतील हिस्सा वारसाने मिळणार नाही असे ठरले असेल तर पतीच्या निधनानंतर त्याची विधवा म्हणून तिला कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. 

w कलम ३३: जेव्हा मृत्युपत्र न करता मयत झालेल्या व्यक्तीच्या मागे त्याची

(अ) विधवा आणि वंशपरंपरागत वंशज किंवा

(ब) विधवा आणि जन्माने जोडले गेलेले नातेवाईक/ अपत्ये असतील किंवा फक्‍त

(क) विधवा असेल तर

P उपरोक्‍त (अ) प्रमाणे असेल तर मयताच्‍या मिळकतीतील १/३ (एक त्रित्यांश) भाग त्या विधवेला दिला जाईल व उर्वरित २/३ (दोन त्रित्यांश) हिश्याची विभागणी नियमाप्रमाणे केली जाईल.

P उपरोक्‍त (ब) प्रमाणे असेल तर मयताच्‍या मिळकतीतील  १/२ (अर्धा हिस्सा) विधवेला मिळेल व उर्वरित १/२ (अर्धा हिस्सा) जन्माने जोडले गेलेल्‍या नातेवाईक/आपत्‍यांना मिळेल.

P उपरोक्‍त (क) प्रमाणे असेल तर मयताच्‍या मिळकतीतील संपूर्ण मिळकत मयताच्या विधवेला मिळेल. 

w कलम ३३(अ): (१) जेव्हा मयतामागे अपत्य अगर जवळचे नातेवाईक नसतात आणि फक्‍त विधवा असते तेव्‍हा आणि मयत व्यक्तीच्या मिळकतीचे मूल्य रुपये पाच हजार पेक्षा जास्त नसेल तर  संपूर्ण मिळकत त्या मयताच्या विधवेला मिळते.

(२) जेव्हा उपरोक्‍त परिस्‍थितीत मिळकतीचे मूल्य रु. पाच हजारपेक्षा जास्त असेल अशावेळी त्या संपूर्ण मिळकतीवर त्या विधवेचा रुपये पाच हजारचा भार राहील आणि विधवेच्या पतीच्या मृत्यूच्या दिनांकापासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द. सा. द. शे. ४ टक्के व्याजासह ती रक्कम मिळविण्याचा तिला अधिकार असेल.

(३) रुपये पाच हजारची केलेली तरतूद ही कलम ३३ मध्ये विधवेस दिलेल्या हक्काच्या अतिरिक्त असून त्याशिवाय उर्वरित मिळकतीची विभागणी कलम ३३ मधील तरतुदीप्रमाणे होईल.

(४) मिळकतीचे फक्त मूल्य ठरविताना त्यावरील देणे (कर्ज), मयताच्या उत्तरक्रियेसाठी व मिळकत व्यवस्थापनसाठी झालेला खर्च एकूण मूल्यातून वजा केला जातो.

(५) हे कलम खालील समाजघटकांना लागू पडणार नाही-

अ) भारतीय ख्रिश्चन

ब) मयताचे, त्‍याच्‍या मृत्‍यू समयी ख्रिश्चन असलेलेले नातू/नात किंवा मुले.

क) हिंदू, बौद्ध, शिख आणि विशेष विवाह नोंदणी कायदा १८७२ च्या कलम २४ च्या तरतुदी लागू असणार्‍या व्यक्ती.

ड) मृत्युपत्र केलेल्या व्यक्ती. 

w कलम ३४: जेव्हा मयत व्यक्तीच्या मागे त्याची विधवा किंवा जन्माने जोडले गेलेल्‍या नातेवाईक/आपत्‍यांपैकी कोणीही नसते तेव्हा मयताची मिळकत त्याच्‍या नातेवाईकांकडे नियमाप्रमाणे जाते. जेव्हा वरील कोणीही वारस शिल्‍लक नसेल तेव्हा ती मिळकत सरकारजमा होते. 

w कलम ३५: विधवेला जे हक्क तिच्या पतीच्या मिळकतीत मिळतात तेच हक्क मृत्युपत्र न करता मृत झालेल्या विधूर पतीला मयत पत्‍नीच्या मिळकतीत मिळतात. 

w कलम ३७: जेव्हा मयत व्यक्तीमागे एकच अपत्य असेल व इतर कोणीही पूर्वी मयत झालेल्या अपत्याचे अपत्य नसेल तेव्हा पूर्ण मिळकत जिवंत असणार्‍या त्या एकट्या अपत्याच्या मालकीची होईल. एकापेक्षा जास्त अपत्ये असतील तर त्या सर्वामध्ये ती समान हिश्श्याने वाटली जाईल. 

w कलम ३८: जेव्हा मयतामागे कोणतेही आपत्य नसते मात्र अपत्याचे अपत्य अगर अपत्ये असतात. आणि इतर दूरचे मयत अपत्यामार्फतचे कोणी जिवंत नसते, तेव्हा जिवंत आसणार्‍या अपत्याचे अपत्य (नात किंवा नातू) एकच असल्यास संपूर्ण मिळकत त्याच्याकडे जाईल व अशी एकापेक्षा जास्त आपत्ये असल्यास त्यांच्यामध्ये समान हिस्‍स्‍यात विभागली जाईल. 

w कलम ३९: अशा प्रकारे मयत व्यक्तीची मिळकत वंशपरंपरेने येणार्‍या वारसाकडे संक्रमीत होते. 

w कलम ४०: १) जेव्हा मयत व्यक्तीमागे शिल्‍लक असलेले वारस एकापेक्षा जास्त पिढीच्या अंतराने दुरचे व नजिकचे असे मिश्र स्वरूपात शिल्‍लक राहतात तेव्हा मयताच्या मिळकतीचे त्याचे अपत्यजन वारस व नातेवाईक विचारात घेऊन हिस्से करून सर्व कायदेशीर वारसांना हिस्से मिळतील असे वाटप होईल.

२) वरीलप्रमाणे असलेल्या हिश्यातील प्रत्येक हिस्सा वंशावळीनुसार अति नजिकच्या वारसास तर प्रत्येकी एक अशा मृत वारसास दिले जातात व असे हिस्से या वारसांच्या पुढील उत्तराधिकार्‍याकडे संक्रमीत होतील अशा पध्‍दतीने वाटप केले जाते. 

w कलम ४५: जर मृत व्यक्तीचे वडील जीवंत नाहीत पण आई जिवंत आहे आणि सर्व भाऊ-बहिणी मयत असून त्यांची मुले, मुली जीवंत आहेत असे असेल तर आई व मयत भाऊ-बहिण यांच्या संख्‍येइतके समान हिस्से गृहित धरून मिळकतीचे वाटप होईल. असे हिस्से संबंधित मयत भाऊ, बहिणी यांच्या वारसाकडे संक्रमीत होतील. 

w कलम ४६: जेव्हा मृत व्यक्तीस त्याच्या आईशिवाय कोणीही वारस शिल्‍लक नसते तेव्हा अशा व्यक्तीची संपूर्ण मिळकत आईकडेच जाते. 

w कलम ४७: जेव्हा मृत व्यक्तीचे आई वडील मयत असतात तेव्हा त्याची मिळकत त्याचे जीवंत व मयत भाऊ-बहिणी यांचेमध्ये समान हिस्‍स्‍याने वाटली जाते. मयतांचे हिस्से त्यांच्या वारसांकडे संक्रमीत होतात. 

w कलम ४८: जेव्हा मृत व्यक्तीस आई, वडील, भाऊ, बहिणी किंवा त्यांचे वारस असे कुणीही उत्तराधिकारी नसतात तेव्हा मृत व्यक्तीच्या नजिकच्या पिढीतील जे नातेवाईक हयात असतील त्यांना सम-समान हिश्याने मृताची मिळकत मिळेल. 

w कलम ४९: जेव्हा मृत व्यक्तीच्या मिळकतीचे त्याच्या मुलांमध्ये किंवा वारसांमध्ये विभाजन केले जाते तेव्हा मृत व्यक्तीचे वारस हक्क मागणार्‍या मुलाच्या, मुलीच्या अगर त्यांच्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व विकासासाठी केलेला खर्च मिळकतीचे अथवा हिस्‍याचे मूल्यांकन करताना विचारात घेतला जात नाही.

............................................. ०००० ............................................................ 

हिंदू वारसा कायदा -१९५६ 

दिनांक १७ जुन १९५६ या दिनांकापासून हिंदू वारसा कायदा -१९५६ अंमलात आला. या कायद्यामुळे प्रचलित हिंदू वारसा पध्दतीमध्ये बदल होऊन तो कायदा संहिताबध्द (कोडिफाय) झाला आणि एकत्र कुटुंबातील विनामृत्युपत्र मिळकतीचा वारसा कोणाकडे जातो हे या कायद्याने ठरविले गेले. 

दिनांक १७ जुन १९५६ या दिनांकापूर्वीच्या वारसा संबंधीचा विचार, त्यावेळेस प्रचलित रितीरिवाजाप्रमाणे तर दिनांक १७ जुन १९५६ या दिनांकापूर्वी विधवा झालेल्या स्‍त्रियांच्या बाबतीत ‘द वुमेन्स राईट टु प्रॉपर्टी ॲक्‍ट’, १९३७ (दिनांक १४.४.१९३७) अन्वये केला जातो.दिनांक १७ जुन १९५६ या दिनांकानंतर मयत झालेल्या स्त्री किंवा पुरुष यांच्या मिळकतीवरील वारसा हक्क हिंदू वारसा कायदा -१९५६ प्रमाणे ठरतो. 

सन १९५६ पूर्वी, हिंदू कायद्याप्रमाणे एकत्र कुटुंबातील सहहिस्सेदारास ‘सहदायक (कोपार्सनर)' असे म्हटले जात असे.

∙ [कोपार्सनर (Coparcener) म्हणजे हिंदू कायद्यानुसार (हिंदू अविभक्त कुटुंब किंवा HUF अंतर्गत) कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेत जन्माने समान कायदेशीर हक्क असणारी व्यक्ती. मराठीत याला 'सहदायक' किंवा 'संयुक्त वारस' असे म्हणतात]. 

सहदायक मयत झाला तर त्याचा वारसा इतर सहदायकांकडे जात असे. त्यामुळे सन १९५६ पूर्वी वारसा हा ‘उत्तरजीवीता (सर्व्हायव्हरशिप)' ने होता असे म्‍हणतात.

∙ [उत्तरजीवीताधिकार- सर्व्हायव्हरशिप (Survivorship) म्हणजे जेव्हा संयुक्त कुटुंबातील (Joint Hindu Family) किंवा सहदायक (Coparcenary) मालमत्तेमधील एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचा हिस्सा त्याच्या स्वतःच्या वारसांना न जाता, इतर हयात असलेल्या सहदायादांकडे (जीवंत सदस्यांकडे) आपोआप जातो.] 

सन १९५६ पूर्वी जर एखादा एकत्र कुटुंबात राहणारा परंतु त्याची स्वतंत्र मिळकत असलेला इसम मयत झाला तर त्याच्या मिळकतीचा ‘उत्तराधिकार (सक्सेशन)' हा त्याच्या वारसांकडे जात असे.

∙ [उत्तराधिकार (Inheritance / Succession) म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती, हक्क, जबाबदाऱ्या किंवा अधिकार कायदेशीर पद्धतीने तिच्या वारसदारांकडे किंवा नेमून दिलेल्या व्यक्तीकडे हस्तांतरित होण्याची प्रक्रिया]

म्हणजेच सन १९५६ पूर्वी ‘उत्तरजीवीता (सर्व्हायवरशिप)' आणि ‘उत्तराधिकार (सक्सेशन)' अशा हक्क प्राप्त होणार्‍या दोन वेगवेगळ्यात पध्दती होत्या. 

w हिंदू वारसा कायदा -१९५६ खालील व्‍यक्‍तींना लागू आहे:

(अ) जी व्यक्ती धर्माने हिंदू आहे (वीरशैव, लिंगायत, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाजाचे अनुयायी)

(ब) जी व्यक्ती धर्माने बौध्द, जैन किंवा शिख आहे. किंवा हिंदू, बौध्द, जैन किंवा शिख धर्मात धर्मांतरित किंवा पुनर्धर्मांतरित झालेली आहे.

(क) जी व्यक्ती धर्माने मुस्लिम, ख्रिस्ती, पारसी किंवा ज्यू नाही. 

w कलम ४(२):

हिंदू वारसा कायदा १९५६ मधील कलम ४(२) हे विशेषतः शेतजमिनीच्या वारसाहक्काशी संबंधित आहे. या कलमाचा मुख्य उद्देश असा आहे की, विशिष्ट शेतजमीनधारणा, जमीन सुधारणा, जमीन कमाल धारणा (Ceiling) आणि कुळ वहिवाटीशी संबंधित कायद्यांमधील तरतुदींवर हिंदू वारसा अधिनियमाचा परिणाम होऊ नये.

मूळ कलम ४(२) नुसार, हिंदू वारसा अधिनियमातील कोणतीही तरतूद अशा कायद्यांच्या कार्यवाहीवर परिणाम करणार नाही, जे कायदे खालील बाबींशी संबंधित आहेत:

∙ शेतजमीनधारणेचे विभाजन किंवा वाटप (Fragmentation).

∙ शेतजमीनधारणेची कमाल मर्यादा (Ceiling).

∙ कुळवहिवाटीचे अधिकार.

∙ शेतजमीनधारणेतील हक्कांचे हस्तांतरण.

त्यामुळे कृषी जमिनीच्या वारसाहक्कासंबंधी काही बाबी संबंधित राज्याच्या कृषी व जमीन सुधारणा कायद्यांनुसार ठरविल्या जात असत.

(हे कलम ४(२), सन २००५ च्‍या सुधारणेन्‍वये रद्द करण्यात आले आहे)  

त्यामुळे ९ सप्टेंबर २००५ पासून हिंदू वारसा अधिनियमातील वारसाहक्काच्या तरतुदी शेतजमिनीच्या वारसाहक्काच्या संदर्भातही लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. 

w कलम ५: हा कायदा विशेष विवाह अधिनियम १९५४, कलम २१ मध्‍ये अंतर्भूत असलेल्‍या तरतुदींमुळे भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ द्वारे विनियमित होणार्‍या कोणत्याही मिळकतीस/संपत्तीस लागू असणार नाही. 

w कलम ६: या कलमान्‍वये, या कायद्‍याच्‍या प्रारंभानंतर जर हिंदू पुरूषाचा मृत्‍यू झाला तर  त्‍याच्‍या मृत्‍यू समयी ज्‍या मिताक्षरा सहदायिकी (कोपार्सनर) मालमत्तेत त्‍याचा हितसंबंध असेल अशा बाबतीत त्‍याच्‍या त्‍या मालमत्तेतील हितसंबंध या अधिनियमान्‍वये नाही तर उत्तरजीवीताच्‍या (सर्व्हायवरशिप) तत्‍वानुसार सहदायिकीतील (कोपार्सनर) उत्तरजीवी सदस्‍यांकडे प्रक्रांत होईल.

परंतु मृताच्‍यामागे वर्ग १ मध्‍ये समाविष्‍ट असणार्‍या स्‍त्री नातलग किंवा अशा स्‍त्री नातलगामार्फत दावा सांगणारा पुरूष नातलग हयात असल्‍यास मृताचा मिताक्षर सहदायिकी (कोपार्सनर) मालमत्तेतील हितसंबंध उत्तरजीवीताच्‍या (सर्व्हायवरशिप) तत्‍वानुसार नव्‍हे तर या अधिनियमान्‍वये प्रक्रांत होईल. 

हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ८ अन्‍वये वर्ग १ च्‍या वारसांची अनुसूची 

w कलम ८: पुरूषांच्‍या बाबतीत उत्तराधिकाराचा क्रम: वर्ग १ चे वारस

अ) प्रथमत: त्‍याच्‍या वर्ग एकच्‍या वारसांकडे जातो.

अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला तर त्‍याचा वारसा सर्वप्रथम पुढील बारा जणांना वर्ग १ चे वारस म्हणून मिळतो.  

वर्ग १ चे १२ +४ =१६ वारस मयताचा (१) मुलगा (२) मुलगी (३) विधवा (एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवांना एकत्रीतपणे हिस्सा मिळेल) (४) मयताची आई (५) पूर्वमृत मुलाचा मुलगा

(६) पूर्वमृत मुलाची मुलगी (७) पूर्वमृत मुलीचा मुलगा (८) पूर्वमृत मुलीची मुलगी (९) पूर्वमृत मुलाची विधवा (१०) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाचा मुलगा (११) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाची मुलगी

(१२) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाची विधवा हे एकाचवेळी हिस्सा घेतील.

4 सुधारणा: हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम- २००५, कलम ७ अन्‍वये वर्ग १ च्‍या वारसांच्‍या अनुसूचीमध्‍ये खालील चार वारस जोडले गेले आहेत.

(१३) पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीचा मुलगा (१४) पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीची मुलगी

(१५) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीची मुलगी (१६) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीचा मुलगा 

∙[हिंदू वारसा कायद्‍यामधील ‘एकाहून अधिक विधवा’ असा उल्‍लेख:

हिंदू वारसा कायद्‍यातील तरतुदींचा अभ्‍यास करतांना, हिंदू वारसा कायदा, १९५६, कलम ८  मध्‍ये असा उल्‍लेख आहे की, ‘‘अकृतमृत्युपत्र व्यक्तीची संपत्ती अनुसूचीच्या पहिल्‍या वर्गामधील वारसदारांमध्ये पुढील नियमानुसार विभागली जाईल :-

नियम १. अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या विधवेला, किंवा एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवांना एकत्रितपणे एक हिस्सा मिळेल’’

[अकृतमृत्युपत्र व्यक्‍ती (intestate) म्‍हणजे- स्‍वत:च्‍या संपत्तीबाबात मृत्‍युपत्र न करता मरण पावलेली व्‍यक्‍ती कलम ३(जी)]

कलम १० मधील वरील उल्लेखामुळे, अद्‍यापही काही महसूल अधिकाऱ्यांचा गैरसमज आहे की, एखाद्या मयत व्यक्तीला एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर, ती व्‍यक्‍ती मयत झाल्‍यानंतर सर्व विधवांना एकत्रितपणे हिस्सा मिळतो, त्‍यामुळे एकापेक्षा जास्‍त पत्‍नी असलेल्‍या मयत खातेदाराची वारस नोंद करतांना त्‍याच्‍या सर्व विधवांची नावे वरील तरतुदीनुसार दाखल करावी. असाच सल्‍ला काही महसूल अधिकार्‍यांमार्फत दिला जातो. अर्थातच ही बाब बेकायदेशीर आणि चुकीची आहे.

∙ हिंदू विवाह कायदा १९५५ हा दिनांक १८.५.१९५५ रोजी अंमलात आला. या कायद्‍यातील

∙ कलम ५ अन्‍वये, ‘‘पुढील शर्ती पूर्ण झाल्यास कोणत्याही दोन हिंदूमध्ये विवाह विधिपूर्वक लावता येईल;

(एक) विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास हयात विवाहसाथी नसावा:’’

म्हणजेच विवाहाच्या वेळी संबंधित व्यक्तीचा/ची पत्नी किंवा पती हयात नसावा ही कायदेशीर अट आहे. 

∙ कलम १७ अन्‍वये, या कायद्‍याच्या प्रारंभानंतर विधिपूर्वक लावण्यात आलेला दोन हिंदूंमधील कोणताही विवाह हा, जर अशा विवाहाच्या दिनांकास कोणत्याही पक्षाला हयात पती किंवा पत्नी असेल तर, शून्य असेल आणि तदनुसार 'भारतीय न्‍याय संहिता' यातील ८२(१) आणि ८२(२) या कलमांचे उपबंध लागू होतील.

∙ भा.न्‍या.सं. कलम ८२(१) – पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरा विवाह.

∙ भा.न्‍या.सं. कलम ८२(२)– पहिला विवाह लपवून दुसरा विवाह.

कमाल शिक्षा अनुक्रमे सात वर्षे व दहा वर्षे.

∙वरील कलमाचा अर्थ असा की, हिंदू विवाह कायदा १९५५ च्‍या प्रारंभापूर्वी, म्‍हणजेच दिनांक १८.५.१९५५ पूर्वी, एखाद्‍या  व्‍यक्‍तीला जरी एकापेक्षा जास्‍त पत्‍नी असतील तरी त्‍या सर्व पत्‍नींना ‘कायदेशीर पत्‍नी’ म्‍हणून मान्‍यता होती परंतु दिनांक १८.५.१९५५ नंतर एखाद्‍या  व्‍यक्‍तीने, त्‍याचा जोडीदार (spouse) हयात असताना दुसरे लग्‍न केले तर ते बेकायदेशीर आणि फौजदारी कारवाईस पात्र असेल.    

∙ हिंदू वारसा कायदा, १९५६ हा दिनांक १७.६.१९५६ रोजी अंमलात आला आणि त्‍याआधी अंमलात आलेल्‍या हिंदू विवाह कायदा १९५५ अन्‍वये, बहूपत्‍नीत्‍व पध्‍दत बेकायदेशीर ठरविण्‍यात आली होती. परंतु हिंदू विवाह कायदा अंमलात येण्‍याआधी ज्‍या व्‍यक्‍तींना एकापेक्षा जास्‍त पत्‍नी होत्‍या अशा व्‍यक्‍ती मयत झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या सर्व विधवांसाठी वारसहक्‍क निश्चित करणे आवश्‍यक होते.

म्‍हणुनच, हिंदू विवाह कायदा १९५५ अंमलात येण्‍याआधी ज्‍या व्‍यक्‍तींना एकापेक्षा जास्‍त पत्‍नी होत्‍या अशा व्‍यक्‍ती मयत झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या सर्व विधवांना वारसहक्‍क मिळावा या दृष्टिकोनातून,  हिंदू वारसा कायदा, १९५६, कलम १० मध्‍ये नियम १ अन्‍वये, अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या विधवेला, किंवा एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवांना एकत्रितपणे एक हिस्सा मिळेल अशी तरतूद करण्‍यात आली होती. अर्थातच, उक्‍त तरतूद दिनांक १८.५.१९५५ नंतर झालेल्‍या विवाहांना लागू नाही. त्‍यामुळे, आता एखाद्या मयत खातेदाराला एकापेक्षा जास्त पत्नी असल्‍या तरी फक्‍त कायदेशीरपणे विवाह केलेली पहिली पत्‍नीच अशा खातेदाराची कायदेशीर वारस ठरेल]. 

 ब) अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला आणि त्‍याला वरील वर्ग १ चे कोणीही वारस नसतील तर दुसर्‍यांदा वर्ग २ च्‍या वारसांकडे त्‍याचा वारसा जाईल. 

w हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ८ अन्‍वये वर्ग २ च्‍या वारसांची अनुसूची

वर्ग २ चे वारस ९ गट

∙ (गट एक) १) वडील

∙ (गट दोन) १) मुलाच्या मुलीचा मुलगा २) मुलाच्या मुलीची मुलगी ३) भाऊ ४) बहीण

∙ (गट तीन) १) मुलीच्या मुलाचा मुलगा २) मुलाच्या मुलाची मुलगी ३) मुलीच्या मुलाचा मुलगा

४) मुलीच्या मुलीची मुलगी

∙ (गट चार) १) भावाचा मुलगा २) बहिणीचा मुलगा ३) भावाची मुलगी ४) बहिणीची मुलगी

∙ (गट पाच) १) वडीलांचे वडील २) वडीलांची आई

∙ (गट सहा) १) वडीलांची विधवा-सावत्र आई २) भावाची विधवा

∙ (गट सात) १) वडीलांचा भाऊ २) वडीलांची बहीण

∙ (गट आठ) १) आईचे वडील २) आईची आई

∙ (गट नऊ) १) आईचा भाऊ २) आईची बहीण 

w हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ८ अन्‍वये वर्ग ३ च्‍या वारसांची अनुसूची 

क) अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला आणि त्‍याला वरील वर्ग १ आणि वर्ग २ चे कोणीही वारस नसतील तर खालील वर्ग ३ च्‍या मृताच्‍या गोत्रजांकडे त्‍याचा वारसा जाईल.  

w मृताचे गोत्रज वर्ग ३ चे वारस खालील प्रमाणे आहेत :  

वर्ग ३- मृताचे गोत्रज (Agnates)  मृताचे पितृबंधू, म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तक ग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषांद्वारे संबंध असलेल्या व्यक्ती.

उदा. ∙ वडिलांचा सख्खा भाऊ (काका).

∙ वडिलांच्या भावाचा मुलगा (चुलत भाऊ).

∙ आजोबांचा भाऊ.

∙ आजोबांच्या भावाचा मुलगा.

∙ पणजोबांच्या पुरुष वंशातील नातेवाईक.

∙ वडिलांच्या पुरुष वंशातील इतर नातेवाईक. 

w हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ८ अन्‍वये वर्ग ४ च्‍या वारसांची अनुसूची 

ड) मृताचे भिन्न गोत्रज वर्ग ४ चे वारस खालील प्रमाणे आहेत :  

वर्ग ४- मृताचे भिन्‍न गोत्रज (Cognates)  मृताचे भिन्‍न गोत्रज वर्ग ४ चे वारस खालील प्रमाणे आहेत :  

मयताचे मातृबंधू, म्हणजेच, रक्ताच्या नात्यामुळे किंवा दत्तक ग्रहणामुळे परंतु पूर्णपणे पुरुषांद्वारे संबंध नसलेल्या व्यक्ती.

उदा. ∙ आईचा भाऊ - मामा

∙ आईची बहीण - मावशी

∙ बहिणीचा मुलगा - भाचा

∙ बहिणीची मुलगी - भाची

∙ मुलीचा मुलगा - नातू (मुलीकडील)

∙मुलीची मुलगी - नात (मुलीकडील)

∙ वडिलांच्या बहिणीचा मुलगा - आत्येभाऊ

∙ वडिलांच्या बहिणीची मुलगी - आतेबहीण 

w कलम ९: उत्तराधिकाराचा क्रम :

P उपरोक्‍त वारसांच्‍या वर्गवारीत वर्ग एकमध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या वारसांना एकाच वेळी मालमत्ता मिळेल आणि वर्ग दोन, तीन आणि चारचे वारस वर्जित होतील.

P वर्ग दोनच्‍या वारसांना मालमत्ता मिळणार असेल तेव्‍हा वर्ग दोनच्‍या पहिल्‍या नोंदीत येणार्‍या (वडील) वारसांना, दुसर्‍या नोंदीतील वारसांपेक्षा (मुलाच्या मुलीचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ,  बहीण) प्राधान्‍य मिळेल. याप्रमाणे पुढे.   

w कलम १० :  वर्ग १ मधील वारसामध्ये संपत्तीचे वितरण:

अकृतमृत्युपत्र व्यक्तीस वर्ग एक मधील वारस असतील तर त्याच्या मालमत्तेचा भाग त्यांच्यात पुढील नियमानुसार विभागला जाईल :-

· नियम १ -  मयताची विधवा, किंवा एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवा एकत्रितपणे एक हिस्सा घेतील.

· नियम २ -  मयत व्यक्तीचे हयात मुलगे आणि मुली आणि आई प्रत्येकी एक हिस्सा घेतील.

· नियम ३ -  मयत व्यक्तीच्या प्रत्येक मयत मुलाच्या किंवा प्रत्येक मयत मुलीच्या खात्यातील वारस त्यांच्यात मिळून एक हिस्सा घेतील.

· नियम ४ - नियम ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या हिस्‍स्‍यांचे वितरण मयत व्यक्तीच्या मयत मुलाच्या खात्यातील वारसांमध्ये अशा प्रकारे करण्यात येईल की, त्याची विधवा (किंवा त्याच्या विधवा एकत्रितपणे) आणि हयात मुलगे व मुली यांना समान अंश मिळतील आणि त्याच्या मयत मुलांच्या शाखेला तेवढाच अंश मिळेल. 

मयतास वरील वर्ग १) पैकी कोणीही वारस नसेल तर पुढील वर्ग २) च्या वारसांकडे मयताची संपत्ती वारसा हक्काने जाते. 

w कलम ११ : वर्ग २ मधील वारसामध्ये संपत्तीचे वितरण:

मयतास वर्ग १) मधील वारस नसल्यास वर्ग २) मधील वारस विचारात घेतले जातात.

तथापि, वर्ग १) मधील वारसाप्रमाणे एकसमयावच्छेदेकरून हिस्सा मिळण्याचा हक्क वर्ग २) मधील वारसांना नाही. (अकृतमृत्युपत्र व्यक्तीची) संपत्ती प्रथमत: वर्ग २) (एक) मध्ये नमूद केलेल्या वारसांकडे समान हिश्श्यांमध्ये प्रक्रांत होईल. वर्ग २) (एक) मधील वारस नसल्यास ती वर्ग २) (दोन) मध्ये नमूद केलेल्या वारसांकडे (समान हिस्‍स्‍यांमध्ये) प्रक्रांत होईल. वर्ग २) (एक) आणि (दोन) मधील वारस नसल्यास, ती वर्ग २) (तीन) मधील सर्व वारसांकडे समान हिश्श्यांमध्ये प्रक्रांत होईल. आणि याप्रमाणे पुढे. 

टिप- वर्ग दोनमधील भाऊ किंवा बहीण यामध्ये एकच आई परंतु भिन्न वडील असलेला भाऊ किंवा बहीण यांचा समावेश होत नाही. विनामृत्युपत्र खातेदाराची संपत्ती सर्वांना समान हिस्सा मिळेल अशा प्रकारे वर्ग २) मध्ये नमूद केलेल्या वारसांमध्ये वाटली जाईल. उदाहरणार्थ, २) (एक) मध्ये नमुद केलेले वडील वारस असल्यास सर्व संपत्ती त्यांना मिळेल. वडील हयात नसल्यास सर्व संपत्ती २) (दोन) मधील सर्व वारसांकडे समप्रमाणात प्रक्रांत होईल.

अकृतमृत्युपत्र व्यक्तीस वरील वर्ग १) आणि वर्ग २) पैकी कोणीही वारस नसेल तर पुढील वर्ग ३) च्या मृताचे गोत्रज असणार्‍या वारसांकडे मयताची संपत्ती वारसा हक्काने जाते. 

w हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ अन्‍वये हिंदू स्‍त्रीची मालमत्ता 

∙ कलम १४: हिंदू स्‍त्रिची मालमत्ता:

या अधिनियमापूर्वी किंवा नंतर, हिंदू स्‍त्रीची, तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशी मालमत्ता तिला विवाहापूर्वी किंवा नंतर वारसाहक्‍काने, मृत्‍यूपत्रीय दानाने, वाटणीमध्‍ये पोटगी म्‍हणून, नातलगांकडून मिळालेली असो किंवा तिने अशी मालमत्ता स्‍वत:च्‍या कौशल्‍याने, परिश्रमाने किंवा एखादी संपत्ती दान म्हणून, मृत्यूपत्रान्वये, इतर कोणत्याही लेखान्वये, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यान्वये, आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्यान्वये संपादित केली गेली असेल किंवा अन्‍य कोणत्‍याही मार्गाने संपादित केलेली असो, अशी संपत्ती, हिंदू स्‍त्री संपूर्ण स्वामी म्हणून धारण करील, मर्यादित स्वामी म्हणून नव्हे.

तथापि, असे दानपत्र, मृत्युपत्र, अन्य लेख, हुकूमनामा, आदेश किंवा निवाडा काही अटी किंवा शर्तींच्‍या आधिन ठेवल्‍यामुळे संपत्तीत निर्बंधीत अधिकार निर्माण होत असतील तर अशा संपत्तीला या अधिनियमाचे उपबंध लागू होणार नाहीत. 

w कलम १५ : विनामृत्युपत्र मयत हिंदू स्‍त्रीची मालमत्ता:

(१) विनामृत्युपत्र मयत झालेली हिंदू स्त्री खातेदाराची संपत्ती पुढील प्रमाणे वारसाहक्काने जाईल.

अ) पहिल्यांदा, मुलगे व मुली (कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्ये धरून) आणि पती यांच्याकडे

अ) मधील वारस नसतील तर

आ) पतीच्या वारसाकडे (सासरचे नातेवाईक)

आ) मधील वारस नसतील तर

इ) तिच्या माता आणि पिता यांच्याकडे (माहेरचे नातेवाईक)

इ) मधील वारस नसतील तर

ई) पित्याच्या वारसाकडे आणि

ई) मधील वारस नसतील तर

उ) शेवटी, मातेच्या वारसांकडे कलम १६ मध्ये दिलेल्या नियमानुसार प्रक्रांत होईल.

तथापि,

(क) हिंदू स्त्री जर विनामृत्युपत्र मरण पावली तर तिला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती त्या मृत स्‍त्रीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास अशी संपत्ती मृत स्‍त्रीच्या पित्याच्या वारसाकडे प्रक्रांत होईल पतीकडे जाणार नाही.  

(ख) त्या मृत हिंदू स्‍त्रीला तिच्या पतीकडून किंवा तिच्या सासर्‍याकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, त्या मृत स्‍त्रीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास, मृत स्‍त्रिच्या पतीच्या वारसाकडे प्रक्रांत होईल. 

w कलम १६: वरील कलम १५ मध्ये निर्दिष्ट केलेल्या वारसांमधील उत्तराधिकाराचा क्रम पुढील नियमानुसार असेल :

· नियम १ - कलम १५(१)(अ) मध्ये विनिर्दिष्ट केलेले वारस त्यानंतर १५(१)(आ) मध्ये नमुद केलेले वारस आणि याप्रमाणे पुढे. तथापि, एकाच नोंदीत समाविष्ट असलेल्या वारसांना एकसमयावच्छेदेकरून वारसा मिळेल.

· नियम २ - जर अकृतमृत्युपत्र व्यक्तीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी, अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या आधी मृत्यू पावला किंवा पावली असून, त्यांच्या मागे त्याची किंवा तिची स्वत:ची अपत्ये अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्युसमयी हयात असतील तर, अशी मुलाची किंवा मुलीची अपत्ये त्यांच्यात मिळून, असा मुलगा किंवा मुलगी अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्यूसमयी हयात असता किंवा असती तर त्यांनी जो घेतला असता तो हिस्सा घेतील.

· नियम ३ - अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीची कलम १५ च्या पोटकलम (१) च्या खंड (आ), (इ) व (ई) व पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या वारसांकडे होणारी प्रकांती जर ती संपत्ती, यथास्थिती पित्याची किंवा मातेची किंवा पतीची असती आणि अशी अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्यूच्या निकटनंतर विनामृत्युपत्र मयत झाली असती तर जो क्रम व जे नियम लागू झाले असते त्यांच्या अनुसार होईल. 

w कलम १८: जर नातेसंबंधाचे स्वरूप अन्य प्रत्येक बाबतीत तेच असेल तर, अकृतमृत्युपत्र व्यक्तीशी सख्‍ख्‍या नात्याने संबंधीत असलेल्या वारसांना, सापत्न नात्याने संबंधीत असलेल्या वारसापेक्षा अधिमान दिला जाईल.

 

w कलम २० : गर्भस्थ आपत्य: अकृतमृत्युपत्र खातेदाराच्या मृत्युसमयी जे अपत्य गर्भात होते व नंतर जीवंत जन्मले, त्याला किंवा तिला जणुकाही अकृतमृत्युपत्र व्यक्तिच्या मृत्यूपूर्वी जन्मले होते अशाच प्रकारे अकृतमृत्युपत्र व्यक्तीचा वारस होण्याचा अधिकार असेल. 

w कलम २३ : राहत्या घरासंबंधी:

जर अकृतमृत्युपत्र व्यक्तीला वारसदार कन्या असेल आणि जर ती अविवाहित असेल किंवा तिच्या पतीने तिला सोडून दिले असेल अथवा ती पतीपासून विभक्त झाली असेल किंवा ती विधवा असेल आणि ती अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्‍या घरात राहत असेल तर तिला राहत्या घरात राहण्याचा अधिकार प्राप्त होईल.

(हे कलम २३, सन २००५ च्‍या सुधारणेन्‍वये रद्द करण्यात आले आहे)   

w कलम २४ : मुलाच्या मुलाची विधवा किंवा भावाची विधवा यांनी वाटप दिनांकाच्या वेळेस दुसरे लग्न केले असेल तर त्यांना अकृतमृत्युपत्र खातेदाराच्या संपत्तीचा वारसा मिळण्याचा हक्क मिळणशर नाही.

(हे कलम २४, सन २००५ च्‍या सुधारणेन्‍वये रद्द करण्यात आले आहे)   

w मिळकतीत हिस्‍सा मिळण्यास अपात्र व्यक्ती:  पुढील व्यक्तींना वारसाने संपत्ती मिळण्यास अनर्ह ठरण्यात आले आहे :

w कलम २५: खुनी व्‍यक्‍ती - जी व्यक्ती खातेदाराचा खून करेल किंवा खून करण्यास अपप्रेरणा देईल ती खून झालेल्या खातेदाराच्या संपत्तीत वारसाने अथवा उत्तराधिकाराने हिस्सा मिळण्यास अपात्र ठरेल.    

w कलम २६: धर्मांतरित व्‍यक्‍तीची मुले- या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, एखादी व्यक्ती धर्मांतर केल्याने हिंदू राहिली नसेल तर अशी व्यक्ती, धर्मांतरानंतर तिला झालेली आपत्ये व त्यांचे वारस एकत्र कुटुंबातील संपत्तीत वारसाने अथवा उत्तराधिकाराने हिस्सा मिळण्यास अपात्र ठरतील.  

w कलम २७:  अपात्र व्‍यक्‍ती मयत असल्‍याचे गृहीत धरणे:

वाटपास अपात्र व्यक्ती जणू काही मयत आहे असे समजून वाटप करण्यात यावे. 

w कलम २८: व्याधी, वैगुण्य किंवा व्यंग यांमुळे हिस्‍सा नाकारता येणार नाही:

कोणतीही व्यक्ती, कोणत्याही व्याधी, वैगुण्य किंवा व्यंग असल्याच्या कारणावरून अथवा या अधिनियमात उपबंधित केलेले आहे ते खेरीज करून अन्य कोणत्याही कारणावरून कोणत्याही संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अपात्र असणार नाही.

w कलम २९: बेवारस मालमत्ता:

जर अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मागे अधिनियमाच्या उपबंधानुसार त्याच्या किंवा तिच्या संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास पात्र असेलला कोणताही वारस हयात राहिला नसेल तर अशी संपत्ती शासनाकडे प्रक्रांत होईल आणि शासन ती संपत्ती, वारस ज्यांना आधिन झाला असता त्या सर्व आबंधनांच्या व दायित्वांच्या आधिनतेने घेईल. (म.ज.म.अ. १९६६ कलम ३४ मध्‍ये अशीच तरतूद आहे) 

w कलम ३०:  कोणत्याही हिंदू पुरुष किंवा स्‍त्रीला त्याने/तिने मृत्युपत्राद्वारे किंवा अन्य मृत्युपत्रीय व्यवस्थेद्वारे विल्हेवाट करण्याजोगी असेल अशा कोणत्याही संपत्तीची भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ चे उपबंध किंवा त्या त्या काळी अंमलात असलेला व हिंदूना लागू असलेला अन्य कोणत्याही विधी यानुसार तशी विल्हेवाट करता येईल. 

हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ लागू झाल्यानंतर खातेदार मृत्यू पावल्यास त्याच्या मालमत्तेचे उत्तराधिकारी ठरणारे त्याचे कायदेशीर वारसदार शोधून काढण्यासाठी, उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेण्यात यावी व त्यानंतर उत्तराधिकारासंबंधीचे आदेश देण्यात यावेत. 

खातेदार मरण पावल्यावर, मयत खातेदाराच्या मालमत्तेचा उत्तराधिकार प्राप्त होणार्‍या सर्व वारसांच्या नावाची (हिंदू उत्तराधिकार अधिनियम उपबंधान्वये) वारसाहक्क नोंदवहीत नोंद करावी लागेल. भू-संपत्ती सर्व वारसांमध्ये विभागण्यात आली असल्यास अशा सर्व वारसांची नावे त्याच्या संबंधीत कब्जाप्रमाणे कब्जेदार म्हणून नोंदविण्यात यावीत. तथापि, भुसंपत्ती केवळ काही वारसांमध्येच विभागली असल्यास अशा सर्व वारसांची नावांची त्यांच्या कब्जाप्रमाणे नोंद करण्यात यावी. मयत खातेदराच्या वारसांची नावे (जमिनीचा कब्जा नसलेल्या परंतु मालमत्तेमध्ये अधिकार धारण करणार्‍या) मालमत्तेमधील त्यांचा अधिकार व हितसंबंध दर्शविण्यासाठी, अधिकार अभिलेखाच्या ‘‘कब्‍जेदार’’ या स्तंभातच नोंदविण्‍यात यावीत. शक्‍यतो 'इतर अधिकार' स्‍तंभात नोंद करु नये. कारण कालांतराने 'इतर अधिकार' स्‍तंभातील नावे अनेक कारणांनी (अर्जामुळे, पुनर्लेखनात) कमी केली जातात आणि वारसा हक्‍कांना बाधा येते.

हिंदू वारसा कायदा नियम-१९५६ मध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही तरतुदी, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७  संबंधीच्या किंवा कुळवहिवाट अधिनियमाच्या उपबंधांना कोणत्याही प्रकारे बाधक ठरत नाहीत.

w उपजत वेडा असणार्‍या व्‍यक्‍तीला वाटपात हिस्सा मिळत नाही. परंतु त्याच्या मुलांना हिस्सा मिळु शकतो.

............................................. ०००० ............................................................ 

हिंदू वारसा (सुधारणा) कायदा - २००५ (महत्वाच्या तरतुदी) 

केंद्र शासनाने हिंदू वारसा (सुधारणा) कायदा २००५ हा हिंदू वारसा कायदा १९५६ मध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी दिनांक ९ सप्‍टेंबर २००५ रोजी अंमलात आणला. यानुसार हिंदू वारसा कायदा १९५६ च्‍या कलम ६ मध्‍ये खालील सुधारणा केल्‍या आहेत.

P हिंदू वारसा (सुधारणा) कायदा -२००५ कलम ६ (१) - मिताक्षर कायद्‍याने नियंत्रीत केल्‍या जाणार्‍या संयुक्‍त हिंदू कुटुंबामध्‍ये सहदायकाची कन्‍या:

(अ) ज्‍या रीतीने पुत्र सहदायक (कोपार्सनर) होतो, त्‍याच रीतीने जन्‍मापासून, तिच्‍या स्‍वत:च्‍या हक्‍कामुळे पुत्राप्रमाणेच सहदायक (कोपार्सनर)  होईल.  

(ब) सहदायिकीतील (Coparcenary) मालमत्तेमध्‍ये तिला पुत्राप्रमाणेच सर्व अधिकार असतील. 

(क) सहदायिकीतील मालमत्तेमध्‍ये कन्‍येलाही पुत्राप्रमाणेच सर्व अधिकार, दायित्‍वे, प्राप्‍त होतील.

 तथापि, दिनांक २० डिसेंबर २००४ पूर्वी ज्या वाटण्या (Partition- मालमत्ताचे विभाजन) घडून आल्या असतील त्यांना उपरोक्‍त तरतुदींमुळे बाधा येणार नाही. 

(२) वरील प्रमाणे हिस्‍सा मिळालेली स्‍त्री, त्या हिस्स्याबाबत मृत्युपत्राद्‍वारे किंवा अन्‍य प्रकारे अशा मिळकतीची विल्‍हेवाट सुध्दा लावू शकेल.     

4 मा. सर्वोच्च न्यायालयाचा विनिता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा व इतर (Vineeta Sharma v. Rakesh Sharma & Ors.) हा निर्णय हिंदू वारसा अधिनियम, १९५६ मधील कलम ६ च्या २००५ च्या सुधारणेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने मुलीचा सहदायिकी हक्क जन्मतः प्राप्त होतो आणि ९ सप्टेंबर २००५ पासून तो अंमलात आणता येतो, असे स्पष्ट केले आहे.

सन २००५ च्या सुधारणेला Prospective (अंमलबजावणीच्या दिनांकापासून किंवा भविष्यातील घटनांवर लागू होणारा) प्रभावाने लागू होणारी, परंतु Retroactive (भूतलक्षी प्रभावाने लागू होणारा, मागील तारखेपासून लागू होणारा किंवा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणारा) परिणाम असलेली सुधारणा असे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे २००५ पूर्वी जन्मलेल्या मुलीलाही ९ सप्टेंबर २००५ पासून सहदायिकी हक्क प्राप्त होतो. 

· ‘पवित्र जबाबदारी तरतूद रद्‍द: उपरोक्त सन २००५ च्या सुधारणा कायद्याच्‍या कलम ४ अन्वये पूर्वीच्या कायद्यान्वये वारसाला, त्याच्या पूर्वजांनी (वडील, आजोबा, पणजोबा) घेतलेली कर्जे फेडण्याची जबाबदारी होती. याला ‘पवित्र जबाबदारी (पायस ऑब्लिगेशन)’ म्हटले जात होते. असे कर्ज वारसाने न फेडल्यास, असे कर्ज देणार्‍यास न्यायालयात दाद मागता येत होती. केंद्र शासनाने सन २००५ च्या या सुधारीत कायद्यान्वये वारसाची, त्याच्या पूर्वजांनी (वडील, आजोबा, पणजोबा) घेतलेली कर्जे फेडण्याची जबाबदारी रद्द केली आहे व असे कर्ज देणार्‍यास आता न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी तरतूद केली आहे. 

· वर्ग एकचे नवीन वारस: उपरोक्त सन २००५ च्या सुधारणा कायद्याच्‍या कलम ७ अन्वये वर्ग १ च्‍या वारसांच्‍या अनुसूचीमध्‍ये खालील चार वारस जोडले गेले आहेत.

(१) पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीचा मुलगा, (२) पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीची मुलगी,

(३) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीची मुलगी, (४) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीचा मुलगा.

· कलम ४(२), २३ आणि २४ रद्‍द: सन २००५ च्या हिंदू वारसा (सुधारणा) कायदा- २००५ अन्वये हिंदू वारसा कायदा १९५६ मधील कलम ४(२), २३ आणि २४ रद्द करण्यात आले आहेत.

............................................. ०००० ............................................................                                              

महत्‍वाचे शब्दार्थ

∙ वडिलार्जित मिळकत: वडिलांकडून वारस हक्‍काने मिळालेली मिळकत.

∙ वाडिलोपार्जित मिळकत: आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून वारस हक्‍काने आलेली मिळकत.

हिंदू मिताक्षरा कायद्यानुसार पारंपरिक अर्थाने वाडिलोपार्जित मिळकत म्हणजे अशी मिळकत जी एखाद्या पुरुषाला त्याच्या वडील, आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून विशिष्ट वारसाहक्काच्या स्वरूपात प्राप्त झाली असून, त्याच्या वंशजांना त्या मिळकतीमध्ये जन्मतःच सहदायिकी हक्क प्राप्त होतात.

पारंपरिक सहदायिकीमध्ये पुढील चार पिढ्यांचा विचार केला जातो:

∙ मूळ पुरुष (पणजोबा).

∙ त्याचा मुलगा (आजोबा).

∙ त्याचा नातू (वडील).

∙ त्याचा पणतू (मुलगा).

हिंदू वारसा अधिनियम, १९५६ मधील कलम ६ मध्ये २००५ च्या दुरुस्तीने मुलींनाही मुलांप्रमाणे जन्मतःच सहदायकाचा दर्जा व हक्क दिले आहेत.

सहदायिकीमध्ये मालमत्ताधारक आणि त्याच्यापासून तीन पिढ्यांपर्यंतचे वंशज यांचा समावेश होतो.

4पाचव्या पिढीतील व्यक्तीला केवळ जन्मामुळे विद्यमान सहदायिकीमध्ये स्वतंत्र वाटणी मागण्याचा अधिकार मिळत नाही. मात्र, त्या तीन मधल्या पुरुष वंशजांपैकी एखाद्याचा मृत्यू झालेला असल्यास, विशिष्ट परिस्थितीत पाचव्या पिढीतील व्यक्तीला वाटणी मागण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकतो.

मधल्या तीन पिढ्यांतील संबंधित वंशज जीवंत असतील, तर पाचव्या पिढीतील व्यक्तीला थेट सहदायिकी हक्काने वाटणी मागता येत नाही. 

∙ स्वकष्टार्जित मिळकत: शिक्षणातून/नोकरीतुन, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे सहाय्य न घेता, स्‍वत: कष्ट करुन मिळविलेली मिळकत. स्वकष्टाकर्जित मिळकत एकट्याच्या मालकीची असते. यामिळकतीचे, हयातीत, वारस हक्काने वाटप होत नाही. अशी मिळकत कमविणारी व्यक्ती अशा मिळकतीची स्वेच्छेने विल्हेवाट लावू शकते. 

∙ स्वतंत्र मिळकती: खालील मिळकती या स्वतंत्र मिळकती म्हणून गणल्या जातात.

(ए) अडथळ्यांनी मिळालेली मिळकत:

हिंदू वारसा कायद्यात, विशेषतः मिताक्षरा हिंदू कायद्याच्या पारंपरिक संकल्पनेनुसार, मिळकतीचे दोन प्रमुख प्रकार मानले जातात.

aअप्रतिबंध दाय (Unobstructed Heritage)

aसप्रतिबंध दाय (Obstructed Heritage)

यापैकी अडथळ्याने मिळालेली मिळकत म्हणजे सप्रतिबंध दाय (Sapratibandha Daya) होय.

उदा. एखाद्या व्यक्तीला तिच्या पूर्वजांची किंवा नातेवाइकांची मिळकत त्यांच्या हयातीत केवळ नातेसंबंधामुळे जन्मतःच प्राप्त होत नाही; तर त्या व्यक्तीचा मिळकतीवरील हक्क संबंधित मालकाच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने निर्माण होतो, अशा मिळकतीला पारंपरिक हिंदू कायद्यात सप्रतिबंध दाय असे म्हणतात. यामध्ये मिळकतीवरील हक्क निर्माण होण्यास संबंधित मालकाचे अस्तित्व हा अडथळा असतो. म्हणून त्याला सप्रतिबंध दाय (Obstructed Heritage) म्हणतात.

(अप्रतिबंध दाय -Unobstructed Heritage म्‍हणचे जन्मतः सहदायिकी हक्क निर्माण होतो, मूळ मालकाचे अस्तित्व हा अडथळा नसतो.) 

(बी) देणगी (bestowal):  लहानशी जंगम मिळकत, वडीलांनी प्रेमापोटी आपल्या मुलाला भेट म्हणून दिलेली असते. ती मुलाची स्वतंत्र मिळकत होते. 

(सी) सरकारी अनुदान (Government grants): शासनाकडून प्राप्त झालेली मिळकत स्वतंत्र मिळकत होते. 

(डी) एकत्र कुटुंबाची परत मिळविलेली मिळकत:  एकत्र कुटुंबाची, वाडवडिलांनी गमावलेली मिळकत जर त्याच एकत्र कुटुंबातील सदस्याने, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे सहाय्य न घेता परत मिळविली तर ती त्याची स्वतंत्र मिळकत होते. 

(इ) कमावलेली मिळकत (Earned income):  स्वत: च्या स्वतंत्र मिळकतीतुन संपत्ती मिळवून, त्यातून घेतलेली मिळकत ही स्वतंत्र मिळकत होते. 

(एफ) वाटपातील हिस्सा (Share in partition):  वाटपातील हिस्सा ही स्वतंत्र मिळकत होते. 

(जी) एकटा वारसदार (Sole heir):  मागे एकटाच जीवंत राहिल्यामुळे, वारस म्हणून मिळालेली मिळकत ही स्वतंत्र मिळकत होते. 

∙ सख्‍खे नाते: जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वज-पुरुषापासून, त्याच्या एकाच पत्नीच्याद्वारे वंशोद्भव झालेल्‍या व्‍यक्‍ती सख्‍ख्‍या नात्याने संबंधित असतात.

∙ सापत्न नाते: जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वज-पुरुषापासून, पण त्याच्याच निरनिराळ्या पत्नींच्याद्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सापत्न नात्याने संबंधित असतात.

∙ सहोदर नाते: जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वज-स्त्रीपासून, परंतु तिच्या निरनिराळ्या पतींच्याद्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सहोदर नात्याने संबंधित असतात. (पूर्वज-पुरुषात पित्याचा तर पूर्वज-स्त्रीत मातेचा समावेश होतो.)

∙ अकृतमृत्युपत्र व्यक्ती: ज्या व्यक्तीने त्याच्या मालमत्तेची मृत्यूपत्रांन्वये व्यवस्था केली नसेल अशी व्यक्ती.

∙ गोत्रज: जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने आणि संपूर्णपणे पुरुषांच्याद्वारे संबंधीत असल्यास एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीची गोत्रज असते.

∙ भिन्न गोत्रज: जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने आणि संपूर्णपणे पुरुषांच्याद्वारे नव्हे अशा संबंधीत असल्यास एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीची भिन्न गोत्रज असते.

∙ आळियसंतान कायदा: जर हा अधिनियम पारित झाला नसता तर व्यक्ती या कायद्यातील उपबंधाबाबत ज्या रुढीप्राप्त ‘मद्रास आळियसंतान अधिनियम १९४९’ अन्वये नियंत्रीत झाल्या असता तो कायदा.

∙ वारसदार: या अधिनियमान्वये अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीची उत्तराधिकारी होण्यास पात्र व्यक्ती. 

............................................. ०००० ............................................................ 

महत्वाचे न्याय निर्णय 

P हिंदू विधवा स्त्रीला १९५६ नंतर तिच्या पतीच्या निधनानंतर मिळकत प्राप्त झाली तर ती त्या मिळकतीची संपूर्ण मालक बनते. व त्यानंतर त्या विधवेने लग्न केले तरीही तिला पती निधनानंतर मिळालेल्या मिळकतीवरील तिचा हक्क नष्ट  होत नाही. (ए.आय.आर. १९७१, मुंबई, ४१३) 

P वडिलांनी वाटपात मिळालेल्या मिळकतीतून काही मिळकत खरेदी केल्यास ती मिळकत वडिलांच्या मालकीची होईल. त्या मिळकतीत त्यांचा मुलगा किंवा मुलगे सहदायाद (कोपार्सनर) नसतील. (ऑल महाराष्ट्र रिपोर्टर २००५ (३), ७८९) 

P एकत्र कुटुंबामध्ये एखादी मिळकत खरेदी केली असेल, आणि त्या खरेदीसाठीची रक्कम एकत्र कुटुंबाची होती असे सिध्द करावयाचे असल्यास, अशी मिळकत खरेदी करण्याच्या वेळेस, एकत्र कुटुंबाकडे पुरेसा पैशाचा गाभा (न्यूक्लियस -Nucleus) होता हे सिध्द  करावे लागेल. (ए.आय.आर. १९६५, एस.सी.,२८९) 

P विधवेची शिलभ्रष्टता तिला वाटपास अपात्र ठरवित नाही. विधवा जरी शिलभ्रष्ट असली तरीही तिच्या नवर्‍याचा हिस्सा तिला द्यावा लागेल. (ए.आय.आर. १९७६, कलकत्ता, ३५६; ए.आय.आर. १९७८, कलकत्ता, ४३१) 

P हिंदू मॅरेज ॲक्‍ट, कलम १६ अन्वये वडिलांच्या मिळकतीत अनौरस मुलांचा हिस्सा असतो. परंतु वडिलोपार्जित मिळकतीत अनौरस मुलांचा हिस्सा नसतो. तसेच दुसरी बायको असल्यास तिच्यापासून झालेली मुले वारस ठरतात. (ए.आय.आर. १९९६, एस.सी., १९६३; ए.आय.आर. १९८३, मुंबई, २२२) 

P एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये सर्व सभासदांचा एकत्र हक्क व एकत्र कब्जा असतो. प्रत्येक सहवारसदारास सामाईक कब्जा व मिळकतीचा उपभोग घेण्याचा समान हक्क असतो. केवळ एखाद्या सहवारसदाराचा प्रत्यक्ष कब्जा नाही म्हणून त्याचा हक्क संपत नाही. एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये असणारा कब्जात जरी एकट्याचा असला तरीही असा कब्जा सर्वांचा मिळुन असतो. (ए.आय.आर. १९९५, एस.सी., ८९५) 

P स्त्री-धनाची मिळकत ही त्या स्‍त्रिच्या संपूर्ण मालकीची असते. तिला त्याची वैयक्तिक इच्छेनुसार विल्हेवाट लावता येते. स्त्री-धन हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचा भाग नसतो. (ऑल महाराष्ट्र रिपोर्टर २०११ (६), ४२८ एस.सी.) 

P बेकायदेशीरपणे केलेल्या दुसर्‍या लग्नातील पत्नीला मयत नवर्‍याच्या मिळकतीत हक्क किंवा हिस्सा मिळत नाही. (ए.आय.आर. २००२, गोहत्ती,९६)                                                   

                                        bžb bžb bžb bžb

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला हिंदू वारसा कायदे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.