आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

दत्तक अधिनियमातील महत्‍वाची माहिती

दत्तक अधिनियमातील महत्‍वाची माहिती

दत्तकबाबत हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम,१९५६ मध्‍ये तरतुद केलेली आहे. या अधिनियमातील दत्तक संदर्भातील महत्वाची माहिती खालील प्रमाणे:

हा अधिनियम जम्मू आणि काश्मीर राज्य खेरीज करुन भारतातील सर्व हिंदू धर्मियांना लागू आहे.

æ कलम ६ : दत्तकग्रहणासाठी आवश्यक बाबी:
(एक) दत्तक घेणार्‍या व्यक्तीला दत्तक घेण्याची क्षमता व अधिकार असावा.
(दोन) दत्तक देणार्‍या व्यक्तीला दत्तक देण्याची क्षमता असावी.
(तीन) दत्तक घेतल्या जाणार्‍या व्यक्तीला दत्तक घेतले जाण्याची क्षमता असावी.
(चार) हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम, १९५६ या कायद्यातील तरतुदींचे उल्‍लंघन करुन झालेले दत्तकग्रहण बेकायदेशीर असेल, मग असे दत्तकग्रहण कोणत्याही जातीच्या व्यक्तींमधील असो.
* काही जमातींमध्ये दत्तकग्रहणाच्या वेळी होम-हवन विधी आवश्यक मानले जातात. परंतु या कायद्यानुसार अशा विधींची आवश्यकता नसते.
* दत्तकग्रहणाचा दस्तवऐवज नोंदणीकृत करता येतो.

æ कलम ७ : हिंदू पुरुषाची दत्तक घेण्याची क्षमता.
* अविकल मनाचा सज्ञान पुरूष पुत्र किंवा कन्या दत्तक घेऊ शकतो.
* अशा पुरूषाची पत्नी हयात असेल तर अशा दत्तकग्रहणाला तिची संमती आवश्यक आहे. तथापि,
अशा पुरूषाच्या हयात पत्नीने प्रपंचाचा संपूर्ण आणि कायमचा त्याग केला असेल अथवा ती हिंदू राहिली नसेल किंवा सक्षम न्यायालयाने तिला विकल मनाची घोषित केले असेल तर अशा दत्तकग्रहणाला तिच्या संमतीची आवश्यकता नाही.
* दत्तकग्रहणाच्यावेळी अशा पुरूषाला एकाहून अधिक हयात पत्नी असतील तर सर्व पत्नींची संमती आवश्यक असेल

æ कलम ८ : हिंदू स्त्रीची दत्तक घेण्याची क्षमता.
* अविकल मनाची, सज्ञान स्त्री, जी विवाहित नाही अथवा जिचा विवाह विच्छेद झालेला आहे किंवा जी विधवा आहे किंवा जिच्या पतीने प्रपंचाचा संपूर्ण आणि कायमचा त्याग केला असेल अथवा तो हिंदू राहिला नसेल किंवा सक्षम न्यायालयाने त्याला विकल मनाचा घोषित केले असेल तर अशी हिंदू स्त्री पुत्र किंवा कन्या दत्तक घेण्यास सक्षम असेल.
* या अधिनियमान्वये, मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि सज्ञान हिंदू स्त्रीला स्वत:हून व स्वत:साठी दत्तक घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.


æ कलम ९ : दत्तक देण्यास सक्षम व्यक्ती.
१. फक्त आपत्याची माता किंवा पिता किंवा पालक याच व्यक्ती दत्तक देण्यास सक्षम आहेत
२. पिता हयात असेल तर त्याला एकट्याला दत्तक देण्याचा अधिकार आहे परंतू दत्तक देण्यासाठी मातेची संमती आवश्यक असेल. जर मातेने प्रपंचाचा संपूर्ण आणि कायमचा त्याग केला असेल अथवा ती हिंदू राहिली नसेल किंवा सक्षम न्यायालयाने तिला विकल मनाची घोषित केले असेल तर तिची संमती आवश्यक नसेल.
३. जर पिता मरण पावला असेल किंवा त्याने प्रपंचाचा संपूर्ण आणि कायमचा त्याग केला असेल अथवा तो हिंदू राहिला नसेल किंवा सक्षम न्यायालयाने त्याला विकल मनाचा घोषित केले असेल तर माता आपत्याला दत्तक देऊ शकेल.
४. जर आपत्याचे माता-पिता ज्ञात नसतील किंवा मरण पावले असतील किंवा त्या दोघांनी प्रपंचाचा संपूर्ण आणि कायमचा त्याग केला असेल अथवा ते दोघे हिंदू राहिले नसतील किंवा सक्षम न्यायालयाने त्यांना विकल मनाचे घोषित केले असेल तर आपत्याचा पालक, न्यायालयाच्या पूर्व परवानगीने आपत्य दत्तक देऊ शकेल.

æ शब्दार्थ :
P पिता किंवा माता: या शब्दप्रयोगात दत्तक घेणारे माता किंवा पिता यांचा समावेश होत नाही.
P पालक: या शब्दाचा अर्थ, आपत्याच्या देहाची किंवा आपत्याच्या देहाची आणि मालमत्तेची देखभाल करणारी व्यक्ती असा होतो. अशी व्यक्ती त्या आपत्याची माता किंवा पिता किंवा माता आणि पिता यांच्या मृत्युपत्राद्वारे किंवा सक्षम न्यायालयाद्वारे नियुक्त किंवा घोषित असु शकते.

æ कलम १० : दत्तक घेतली जाण्यास सक्षम व्यक्ती.
(एक) अशी व्यक्ती हिंदू असावी.
(दोन) अशी व्यक्ती आधीच दत्तक घेतली गेली नसावी.
(तीन) अशी व्यक्ती अविवाहित असावी. परंतू दत्तक घेणार्यांत विवाहित व्यक्ती दत्तक घेण्याची ईच्छा असेल किंवा त्यांच्या कुटुंबात तशी रुढी, परंपरा असेल तर ही अट लागू होणार नाही.
(चार) अशा व्यक्तीचे वय १५ वर्षापेक्षा जास्त नसावे. परंतू दत्तक घेणार्‍याची ईच्छा असेल किंवा त्यांच्या कुटुंबात तशी रुढी, परंपरा असेल तर वयाची ही अट लागू होणार नाही.

æकलम ११ : दत्तकग्रहणाच्या अन्य शर्ती.
(एक) जर दत्तकग्रहण पुत्राचे असेल तर दत्तक घेणार्‍या माता-पित्याला दत्तकग्रहणाच्या वेळेस हयात असलेला (औरस रक्तसंबंधाचा किंवा दत्तकसंबंधाचा) हिंदू पुत्र किंवा पुत्राचा पुत्र किंवा पुत्राच्या पुत्राचा पुत्र नसावा.
(दोन) जर दत्तकग्रहण कन्येचे असेल तर दत्तक घेणार्‍या माता-पित्याला दत्तकग्रहणाच्या वेळेस हयात असलेली (औरस रक्तसंबंधाची किंवा दत्तकसंबंधाची) हिंदू कन्या किंवा पुत्राची कन्या नसावी.
(तीन) जर कन्येचे दत्तकग्रहण होत असेल तर दत्तक घेणारा पिता, दत्तक घेत असलेल्या कन्येच्या वयापेक्षा किमान एकवीस वर्षांनी मोठा असावा.
(चार) जर पुत्राचे दत्तकग्रहण होत असेल तर दत्तक घेणारी माता, दत्तक घेत असलेल्या पुत्राच्या वयापेक्षा किमान एकवीस वर्षांनी मोठी असावी.
(पाच) एक आपत्य, एकाच वेळी दोन किंवा अधिक व्यक्तींना दत्तक घेता येणार नाही.
(सहा) दत्तकग्रहण हे प्रत्यक्षात घडले पाहिजे, फक्त कागदोपत्री नाही.


æ कलम १२ : दत्तकग्रहणाचे परिणाम.
* दत्तक घेतले गेलल्या आपत्याचे, दत्तकग्रहणाच्या दिनांकापासून, त्याच्या जनक घराण्याशी असलेले संबंध तुटले आहेत असे मानले जाईल व ते आपत्य  त्याच्या दत्तक माता-पित्याचे आपत्य असल्याचे मानले जाईल.
(अ) दत्तक घेतले गेलेले आपत्य, जर त्याच्या जनक घराण्यातच राहिले असते तर, त्याचा विवाह ज्या  व्यक्तीशी होऊ शकला नसता अशा व्यक्तीशी त्याला विवाह करता येणार नाही.
(ब) दत्तक आपत्याला, दत्तकग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता किंवा त्यावरील दत्तकग्रहणापूर्वीची आबंधने त्याच्याकडेच निहित राहतील.
(क) दत्तक आपत्‍याला, दत्तकग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता कोणीही काढून घेऊ शकणार नाही. 

æ कलम १३ : दत्तकग्राही माता-पित्‍याला त्‍यांच्‍या मालमत्तेची हयात व्‍वक्‍तींमध्‍ये हस्‍तांतरणाद्‍वारे किंवा मृत्‍यूपत्राद्‍वारे विल्‍हेवाट लावण्‍याचा अधिकार असेल.

æ कलम १४ : (१) दत्तक घेणार्‍या पुरुषाची पत्नी, दत्तक घेतले गेलेल्या आपत्याची दत्तकग्राही माता असल्याचे मानले जाईल.
(२) दत्तक घेणार्‍या पुरुषाला एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर त्या पत्नींपैकी विवाहामध्ये ज्येष्ठ असणारी पत्नी दत्तक घेतले गेलेल्या आपत्याची दत्तकगाही माता असल्याचे मानले जाईल व त्या पुरुषाच्या इतर पत्नी सावत्र माता मानल्या जातील.
(३) एखादा अवाहित किंवा विधुर पुरुष जर दत्तक घेईल आणि त्यानंतर एखाद्या स्त्रीशी विवाह करेल तर त्या दत्तक घेणार्‍या पुरुषाची पत्नी, दत्तक घेतले गेलेल्या आपत्याची सावत्र माता मानली जाईल.
(४) एखादी अवाहित किंवा विधवा स्त्री जर दत्तक घेईल आणि त्यानंतर एखाद्या पुरुषाशी विवाह करेल तर त्या दत्तक घेणार्‍या स्त्रीचा पती, दत्तक घेतले गेलेल्या आपत्याचा सावत्र पिता मानला जाईल.


æ कलम १५ : दत्तकग्रहण रद्द करणे.
* कोणतेही कायदेशीर दत्तकग्रहण, दत्तकग्राही माता किंवा पित्याकडून रद्द करता येणार नाही. तसेच दत्तक आपत्यही दत्तकग्राही माता-पित्याचा त्याग करुन त्याच्या जनक घराण्यात जाऊ शकणार नाही.

æ कलम १७ : दत्तकग्रहणासाठी देवाण-घेवाण.
* कोणत्याही कायदेशीर दत्तकग्रहणासाठी, मोबदला म्हणून कोणत्याही रकमेची किंवा बक्षिसाची देवाण-घेवाण करता येणार नाही किंवा तशी कबुलायत करता येणार नाही. या कलमाचा भंग झाल्यास कारावास आणि दंडाची तरतुद आहे.


æ महत्वाचे न्यायालयीन निर्णय:
P हिंदू उत्तराधिकार अधिनियम,1956 अंमलात आल्यानंतर जर एखाद्या विधवा स्त्रीस, एखादा मुलगा दत्तक घेतला असेल तर त्या दत्तक मुलाला, विधवेला मिळालेल्या मिळकतीमध्ये कसलाही अधिकार प्राप्त होणार नाही.
कलम १४ अन्वये हिंदू स्त्री मालक झाल्यानंतर तिने एखादा मुलगा दत्तक घेतला असेल तर त्या दत्तक मुलाला त्या हिंदू स्त्रीच्या मिळकतीमध्ये कसलाही अधिकार प्राप्त होत नाही. (केशरभाई जगन्नाथ गुजर वि. महाराष्ट्र सरकार आणि इतर ए.आय.आर. १९८१, मुंबई, ११५)
P एकत्र कुटुंब असेल आणि त्यांची एकत्रीत मिळकत असेल तर दत्तक घेतल्या मुलाला कुटुंबाच्या मिळकतीत हक्क  प्राप्त होतो.(.आय.आर. २००१, राजस्थान, ३१८)
            ¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨Comments

 1. दतक माता पिता गरीबा असु शकतात का

  ReplyDelete
 2. कमीत कमी किती प्रॉपटी असावी?

  ReplyDelete
 3. दत्तक पुत्रााला त्यााच्याा जनक पिताच्याा वडिलोपार्जत माालमतेत हक माागताा येतो काा ?

  ReplyDelete
 4. संन्यासी व्यक्ति ला दत्तक घेता येते का

  ReplyDelete
Mahsul Guru

Subscribe YouTube Channel