आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

नोटीस' बजावणे

'नोटीस' हा सध्‍या दैनंदिन व्‍यवहारातील शब्‍द बनला आहे. 'नोटीस' या शब्‍दाचा अर्थ बहूतांश लोकांना माहत आहे. खरंतर 'नोटीस' या शब्‍दाचा अचूक आणि पूर्ण अर्थ सांगणे वाटते तितके सोपे नाही.कायद्‍यातही 'नोटीस' या शब्‍दाबाबत फारसे विस्‍तृत भाष्‍य आढळत नाही.
'नोटीस' या शब्‍दाचा बोली भाषेतला अर्थ म्‍हणजे 'सूचना देणे'. 'नोटीस' मध्‍ये माहिती, सूचना, मार्गदर्शन, ज्ञान इत्‍यादी बाबींचा समावेश होतो. एखाद्‍या व्‍यक्‍तीला जागरूक करणे आणि त्‍याच्‍या बाबत एकादी कायदेशीर कारवाई प्रारंभ करण्‍यापूर्वी त्‍याला त्‍याची बाजू मांडण्‍याची संधी देणे हा 'नोटीस'चा उद्‍देश असतो.

'नोटीस' नैसर्गिक न्‍यायतत्‍वाच्‍या सिध्‍दांतांवर (Principle of Natural Justice) आधारीत आहे. नैसर्गिक न्‍यायतत्‍वाचा सिध्‍दांत हा दोन मुलभूत नियमांवर आधारलेला आहे.
(१) दुसरी बाजू ऐका-(Audi alteram partem = Hear other side): कोणतीही व्‍यक्‍ती किंवा आरोपी थेट निर्णयाने प्रभावित होणार नाही. त्‍याला त्‍याची बाजू मांडण्‍याची पूर्ण संधी दिल्‍याखेरीज आणि त्‍याची बाजू ऐकल्‍याखेरीज दोषी ठरविता येणार नाही.
(२) कोणतीही व्‍यक्‍ती आपल्‍या स्‍वत:च्‍या प्रकरणात न्‍यायाधिश होऊ शकत नाही- (Nemo judex in causa sua = No man is a judge in his own case): एखाद्‍या आर्थिक देवाण-घेवाणीवर किंवा स्‍वारस्‍यावर किंवा पक्षपातीपणावर आधारलेला निर्णय वैध ठरू शकणार नाही.
नैसर्गिक न्‍यायतत्‍वाचा सिध्‍दांत सर्व शासकीय संस्‍था, न्‍यायाधिकरणे, सर्व न्‍यायालयांचे निर्णय, शासकीय अधिकार्‍यांनी दिलेले न्‍यायीक किंवा निम-न्‍यायीक निर्णय यांना लागू आहे. नैसर्गिक न्‍यायतत्‍वाचा सिध्‍दांताविरूध्‍द घेतलेला कोणताही निर्णय अवैध ठरेल.

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५०(२) अन्‍वये, जेव्हा एखादा तलाठी, फेरफार, नोंदवहीत एखादी नोंद करील तेव्हा तो अशा नोंदीची एक प्रत चावडीतील ठळक जागी, त्याच वेळी लावील आणि फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे असे अधिकार अभिलेखावरून किंवा फेरफार नोंद वहीवरून त्यास दिसून येईल, अशा सर्व व्यक्तींना आणि त्यात ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तींना लेखी कळवील असे निर्देश आहेत.

सन २०१४ मध्ये महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५० () मध्ये नवीन परंतुक समाविष्ट दुरुस्ती करण्यात आली. त्‍यानुसार ज्‍या ठिकाणी साठवणुकीच्या यंत्राचा वापर करून (कलम २(अ-३३)  कलम १४८ अन्वये अधिकार अभिलेख ठेवण्यात आलेले असतील, तेथे तालुक्यातील तहसिलदार यांनी कलम १५४ अन्वये सूचना मिळाल्यानंतर लगेचच, अशी मिळालेली सूचना  ती सूचना, फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे असे अधिकारांच्या अभिलेखावरुन किंवा फेरफार नोंदवहीवरुन तहसिलदारला दिसून येईल, अशा सर्व व्यक्तींना आणि अशा सूचनेत ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे तहसिलदारला सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला विहीत करण्यात येईल अशा इतर कोणत्याही उपकरणाद्वारे पाठवील असे निर्देश आहेत.

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ सह, सर्वच कायद्‍यांतील, ज्‍या ज्‍या कलमान्‍वये कोणत्‍याही व्‍यक्‍तीच्‍या अधिकारांचे/हक्‍कांचे, उत्तराधिकाराने, अनुजीविताधिकाराने, वारसाहक्काने, विभागणीने, खरेदीने, गहाणाने, देणगीने, पट्ट्याने किंवा अन्य रीतीने संपादन होऊन बदल होत असेल आणि त्‍याबाबत निर्णय करायचा असेल तर त्‍याबाबत सर्व हितसंबंधीतांना नोटीस देणे बंधनकारक आहे.  
'नोटीस' बाबत एक अत्‍यंत महत्‍वाचा मुद्‍दा असा की, फक्‍त 'नोटीस देणे' पुरेसे नाही तर ती 'नोटीस बजावली जाणे' ही अत्‍यंत महत्‍वाचे आहे.
'नोटीस बजावणे' याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २३०, महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल अधिकार्‍यांची कार्यपद्धती) नियम १९६७, दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ मधील पहिल्या अनुसूचीतील क्रम पाच (समन्स काढणे बजावणे) यांमध्‍ये विस्‍तृतपणे विवेचन केले आहे.

¿ नोटीस बजावणे: 'बजावणे' याचा अर्थ संबंधीत व्यक्तीला नोटीस प्राप्त होणे.
महसूल खात्‍यात पहिली नोटीस शक्यतो पोस्टाने पाठवली जाते. दुसरी नोटीस कोतवालामार्फत बजावली जाते आणि तिसरी नोटीस पोहोच-देय नोंदणीकृत पोस्टाने पाठवली जाते. पोहोच-देय नोंदणीकृत पोस्टाची पोहोच परत आल्यास नोटीस बजावली गेली असे गृहित धरले जाते. काही ठिकाणी पहिली नोटीसच कोतवालामार्फत बजावली जाते किंवा पोहोच-देय नोंदणीकृत पोस्टाने पाठवली जाते.

¿ नोटीस बजावण्याची पद्धत:
(१) नोटीस बजावणारी व्यक्तीने, ज्‍यावर ती नोटीस बजावायची आहे त्‍या व्यक्तिला समक्ष भेटुन, नोटीसची प्रत त्‍याला देऊन किंवा स्वाधीन करून मूळ नोटीसवर, बजावण्याची पोहोच म्हणून, ज्‍याला नोटीसची प्रत दिली आहे किंवा स्वाधीन केली आहे त्‍या व्यक्तीची सही किंवा अंगठ्याचा साक्षांकित ठसा घ्यावा.
() ज्‍यावर नोटीस बजावण्याची आहे तो प्राधिकृत अभिकर्ता किंवा विधी व्यवसायी असेल तर त्या नोटिशीची एक प्रत त्याच्या कार्यालयात किंवा त्याच्या निवासस्थानाच्या नेहमीच्या जागी देऊन, मूळ नोटीसीवर बजावण्याची पोहोच म्हणून ज्या व्यक्तीला प्रत दिली किंवा स्वाधीन केली त्या व्यक्तीची सही किंवा आंगठ्याचा ठसा घ्यावा लागेलअशी नोटीस बजावणे प्राधिकृत अभिकर्त्याला व्यक्तीश: नोटीस देण्याइतकेच परिणामकारक मानण्यात येईल.
(३) ज्यावर नोटीस बजावावयाची असेल ती व्यक्ती मिळत नसेल त्या व्यक्तीला कोणताही प्राधिकृत अभिकर्ता नसेल तर अशा व्यक्तीच्या बरोबर राहणार्‍या कुटुंबातील कोणत्याही सज्ञान व्यक्तीवर नोटीस बजावता येईल. ज्याच्यावर नोटीस बजावावयाची त्या व्यक्तीला व्यक्तीश: प्रत देऊन किंवा स्वाधीन करून, मूळ नोटिसीवर बजावण्याची पोहोच म्हणून ज्या व्यक्तीला प्रत दिली किंवा स्वाधीन केली त्या व्यक्तीची सही किंवा आंगठ्याचा ठसा घ्यावा लागेल
स्पष्टीकरण: नोकराला ज्याच्यावर नोटीस बजावयाची त्या इसमाच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून मानता येणार नाही.
() ज्‍याच्‍या नावे नोटीस काढलेली असेल त्‍या व्यक्तीच्या नेहमीच्या निवासस्थानाच्या एखाद्या ठळक भागी किंवा शेवटच्‍या ज्ञात पत्त्‍यावर, घराच्या मुख्‍य दरवाज्याला किंवा जमिनीला डकवून (चिकटवून) बजावली जाते. नोटीसची प्रत चिकटवून व त्‍याबाबत दोन लायक पंचासमक्ष पंचनामा करून नोटीस बजावता येते. या कार्यवाहीबाबत मूळ नोटीस अहवालासह सादर करावी. अशाप्रकारे पंचनाम्याने डकवलेली नोटीस बजावली गेली असे गृहीत धरले जाते.
अनेकवेळा, पक्षकार नोटीसबुकवर सही करण्‍यास येत नाही अशी तक्रार करण्‍यात येते. अशावेळी वरीलपैकी कोणत्‍याही एका पध्‍दतीने नोटीस बजावली जाणे आवश्‍यक असते.     


bb

Comments

  1. तलाठी नोटीस बजावल्यानंतर कोणत्या नोंदवहीमध्ये नोंद करतो तसेच मिळालेल्या नोटिसा चे नोंद तलाठी ला कोणत्या अधिकारी वर्गाला ती नोंद दाखवायचे असते

    ReplyDelete
  2. निलंबनाची नोटीस बजावण्यात अशाच पध्दती आहेत का?

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel