आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

महसूल प्रश्‍नोत्तरे" 126 to 150


· प्रश्‍न १२६: म.ज.म.अ. कलम १४३ आणि मामलतदार कोर्ट क्ट, कलम ५ अन्‍वये रस्‍ता देण्‍याची काय तरतुद आहे?
F उत्तर: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन  रस्ता उपलब्ध करुन देण्याचा अधिकार तहसिलदारांना आहे तर मामलतदार कोर्ट क्ट १९०६, कलम ५ च्या तरतुदींनुसार शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या कोणत्याही जमिनीतील उपलब्‍ध रस्‍त्‍याला किंवा स्वाभाविकपणे वाहत असेल अशा पाण्‍याच्‍या प्रवाहाला कोणीही अवैधरित्‍या अडथळा केला असेल तर असा अवैध अडथळा काढून टाकण्‍याचा अधिकार तहसिलदारांना आहे.
म्‍हणजेच म.ज.म.अ. कलम १४३ अन्‍वये कार्यवाही करतांना रस्‍ता आधी उपलब्‍ध नसतो परंतु मा.को.. १९०६, कलम ५ अन्‍वये कार्यवाही करतांना रस्‍ता आधीच उपलब्‍ध असतो. 

· प्रश्‍न १२७: म.ज.म.अ. कलम १४३ अन्‍वये रस्‍ता देतांना कसा द्‍यावा?
F उत्तर: सर्व बाबींची शाहनिशा करुन, नवीन रस्ता देणे आवश्यक आहे याबाबत तहसिलदारांची खात्री पटल्यानंतर, देण्‍यात येणार रस्‍ता लगतच्या शेतीच्या हद्दी/बांधावरून देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकर्‍यांचे कमीत कमी नुकसान होईल असे पाहिले जाते. असा रस्‍ता फक्त बांधावरुनच रस्ता देतो येतो, या कलमाचे शीर्षकचं "हद्दीवरुन रस्त्याचा अधिकार" असे आहे, त्यामुळे एखादा गटाच्या मधून रस्ता दिल्यास अशी कार्यवाही कलम १४३ च्‍या तरतुदींशी विसंगत होईल आणि त्‍याविरुध्‍द दिवाणी न्यायालयात अपील झाल्यास तिथे असा निर्णय टिकणार नाही.  
असा रस्‍ता देतांना 'गरज' (Necessity) तपासावी. या ठिकाणी 'Indian Easement Act 1882' चे कलम १४ पहावे, यात असा रस्ता 'Reasonably convenient' असावा असा शब्दप्रयोग आहे, कलम १४३ मध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य मार्गाची किती जरुरी आहे, याकडे तहसीलदाराने लक्ष द्यावे असे नमूद आहे, या कलमाखाली किती रुंदीच्या रस्त्याच्या वापराचा हक्क मान्य करावा याबाबत तरतुद आढळून येत नाहीत, त्यामुळे गुंतागुंत टाळण्यासाठी आदेशात 'बांधाच्या एकाबाजूने एक चाकोरी व दुसऱ्या बाजूने एक चाकोरी'  असा किंवा तत्‍सम उल्लेख करुन आदेश पारित करावा, या कलमाखाली फक्त "रस्त्याच्या वापराचा हक्क" मान्य केला जातो, "रस्त्याच्या जागेचा नाही" याची नोंद घ्‍यावी.
रस्‍ता देतांना दोन्ही बाजूने ४४ रूंद असा एकूण ८ फुट रुंदीचा पायवाट रस्‍ता देता येतो. उभतांच्‍या सहमतीने अशा रस्‍त्‍याची रुंदी कमी-जास्‍त करता येते. गाडी रस्ता देतांना तो ८ ते १२ फूट रुंदीचा देता येतो.   
वाजवी रुंदीपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्याची मागणी असल्यास अर्जदाराने लगतच्या शेतकर्‍याकडून रस्त्याचे हक्क विकत घेणे अपेक्षीत आहे.
या कलमाखालील तहसिलदारांचा आदेश मान्य नसल्यास त्याविरूध्द, आदेश प्राप्त झाल्यानंतर साठ दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी यांच्‍याकडे अपील दाखल करता येते. किंवा तहसिलदारांच्या निर्णयाविरूध्द एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्यास महसूल अधिकार्‍याकडे अपील करता येत नाही.

· प्रश्‍न १२८: भागीदारी संस्थेची मालमत्ता कशी हस्तांतरित होते?
F उत्तर: जर एखादी मालमत्ता भागीदारी संस्थेची असेल तर सर्व भागीदार मिळूनच त्‍याचा हस्तांतरण व्यवहार करू शकतात. इतर भागीदारांनी मिळून एका भागीदाराला प्रत्यक्ष नोंदणीकृत कुलमुखत्त्यारपत्र दिली असेल तरच कुलमुखत्त्यारपत्र धारकाला व्यक्तीशी हस्तांतरण व्यवहार करता येतो.

· प्रश्‍न १२९: सहकारी संस्थेची मालमत्ता कशी हस्तांतरित होते?
F उत्तर: सहकारी संस्था कायदा १९६० व नियम १९६१ अन्‍वये सहकारी संस्थेची स्वत:ची मालमत्ता योग्य ते निकष, सर्वसाधारण सभेचा ठराव आणि विभागीय सहकार निबंधकाची पूर्वपरवानगी घेऊन हस्तांतरित करता येते.

· प्रश्‍न १३०: मुस्लीम देवस्थानची मालमत्ता कशी हस्तांतरित होते?
F उत्तर: मुस्लीम देवस्थान/पीराची मालमत्ता वक्फ बोर्डाची पूर्वपरवानगीच घेऊन हस्तांतरीत करता येते.

· प्रश्‍न १३१: ख्रिश्चन देवस्थानची मालमत्ता कशी हस्तांतरित होते?
F उत्तर: ख्रिश्चन धर्मियांच्या चर्चच्या मालमत्तेचे हस्तांतरण करण्याआधी द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट १९५० अन्‍वये धर्मादाय आयुक्त व संबंधित ख्रिश्चन पंथाच्या धर्मगुरूची पूर्वपरवानगी घेऊन कायद्यातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून करता येते.

· प्रश्‍न १३२: न्यासची (ट्रस्ट) मालमत्ता कशी हस्तांतरित होते?
F उत्तर: न्यास (ट्रस्ट) कायद्याने नोंदणीकृत केलेल्या संस्थेची मालमत्ता धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीने व न्यासविषयक कायद्यातील तरतुदींचे पालन करून हस्तांतरित करता येते.

· प्रश्‍न १३३: कंपनीची मालमत्ता कशी हस्तांतरित होते?
F उत्तर: कंपन्यांची मालमत्ता कंपनी कायदा, कंपनीचे मेमोरंडम व आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मधील तरतुदींच्‍या आधारे हस्तांतरित होते.

· प्रश्‍न १३४: दिवाळखोराची मालमत्ता कशी हस्तांतरित होते?
F उत्तर: दिवाळखोराच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाचे सर्व अधिकार योग्य त्या कोर्ट रिसिव्हरकडे अबाधित असतात.  

· प्रश्‍न १३५: पोकळीस्त नाव किंवा नोंद कशी कमी करावी?
F उत्तर: महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम किंवा तत्‍सम कायद्‍यांमध्‍ये "पोकळीस्त नाव कमी करणे" या नावाने कुठलेही कलम किंवा अशा प्रकारचा उल्‍लेख आढळून येत नाही.
'पोकळीस्त' हा बोली भाषेचा शब्‍द असून त्‍याचा अर्थ पोकळ (Hollow) किंवा अर्थहीन असा होतो. कायद्‍याच्‍या भाषेत त्‍याला "ज्‍या नोंदीला किंवा नावाला आज रोजी कायदेशीररित्या महत्व नाही किंवा नजर चुकीने तशीच राहून गेलेली नोंद किंवा नाव" असे म्‍हणता येईल. म्हणजेच एकेकाळी कायदेशीर महत्व असलेली नोंद, कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यामुळे आज अर्थहीन झाली तर ती नोंद पोकळीस्त ठरते.
प्रथम अर्जात नमूद किंवा तो निरीक्षण करीत असतांना आढळलेली, पोकळीस्त नोंद किंवा नाव कोणत्या फेरफार नुसार दाखल झाले होते याचा पुरावा घ्‍यावा. बहुदा अशा नोंदींबाबतचा फेरफार अभिलेख कक्षात आढळून येत नाही. फेरफार न आढळल्‍यास, अभिलेखपालाचा तसा दाखला प्रकरणी समाविष्‍ट करावा. 
æ सात-बारा पुनर्लेखनाच्‍यावेळी काही चूक झाली आहे काय याची खात्री करावी.
æ संबंधीत पोकळीस्त नाव किंवा नोंद कोणत्या हक्काने दाखल झाले होते ते बघावे. उदाहरणार्थ वारस म्‍हणून अथवा गहाणदार म्‍हणून ईत्‍यादी तसेच आज रोजी त्या‍ नावाला कायदेशीररित्या काही महत्व आहे काय याची पडताळणी करावी.
æ  सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावून त्‍यांचे जबाब घ्यावे.
æ  तलाठ्‍यामार्फत स्थानिक चौकशी करुन त्‍या बाबतचा अहवाल प्रकरणी समाविष्‍ट करावा.
æ  उपरोक्‍त सर्व प्रकियेत ते नाव किंवा नोंद पोकळीस्त आहे अशी निर्विवाद (beyond doubt) खात्री पटल्‍यानंतर, निकालपत्रात वरील प्रमाणे केलेल्या सर्व कार्यवाहीचा सविस्तर तपशील नमुद करुन म.ज.म.अ. १९६६, कलम १५५ अन्वये ते नाव किंवा नोंद कमी करण्याचा आदेश पारित करावा.

· प्रश्‍न १३६: टिपण बुक म्‍हणजे काय?
F उत्तर: 'टिपण बुक' म्हणजे जमिनीचा अपरिमाणित नकाशा असतो. ब्रिटीश काळात सर्वप्रथम शेतजमिनीची मोजणी शंकुसाखळीने करण्यात येऊन संबंधित जमिनीचे नकाशे तयार करणेत आले आणि त्यांना सर्व्हे नंबर देण्यात आले. प्रत्येक सर्व्हे नंबरचा नकाशा व क्षेत्र तयार करुन ठेवण्यात आले. त्यालाच 'भूमापनाचे मूळ अभिलेख' किंवा 'टिपण' असे म्हणतात.
'टिपण' हे मोडी लिपीत आहे. त्‍यावेळी मराठवाडयात निजामशाही असल्‍याने तेथील काही भागात 'टिपण' उर्दूमध्ये आहे. टिपणामध्ये सर्व्हे नंबरची बाहय बाजू भरीव रेषेमध्ये व त्यावरील लंब तुटक रेषांनी दर्शविलेले असतात. त्यावर मोजणी केलेल्या साखळीची मापे लिहीलेली असतात. लंबामुळे तयार झालेल्या भागांना 'वसला' (त्रिकोण/ समलंब चौकन) म्हणतात, त्यांना लाल शाईने क्रमांक दिलेले असतात. या टिपणामध्ये संबंधित सर्व्हेनंबरचे लगत भूमापन क्रमांक व जागेवरील स्थिती (गावठाण रस्ते, पाऊल रस्ते, बैलगाडी रस्ता, ओढा, ओघळी, विहीर, झाडे इ.) बाबी नमुद केलेल्या असतात.
या सर्व बाबींमुळे जमिनीच्या भूमापन क्रमांकाचे क्षेत्रफळ अचुक काढता येते. त्यामुळे सध्या केलेल्या मोजणीकामाची तपासणी/खात्री भूमापक टिपणाच्‍या आधारे करतो.
धारण केलेल्या प्रत्येक जमिनीचे (सर्व्हे नंबरचे), त्या जमिनीच्या आकारमानाप्रमाणे परिमाणात न काढलेली, आधार रेषा आणि लंब यांचे शंकुसाखळी नुसार 'रुपये/ आणे' या परिमाणात निश्चित मोजमापे, बांधमापे, वसलाक्रमांक, हद्दीच्या खुणा व लगतचे सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात. अशा पध्दतीने, जमिनीच्या आकारमानाप्रमाणे, परिमाणात न तयार केलेल्या अभिलेख म्हणजे 'टिपण' होय. या 'टिपण'चे दोन उपप्रकार आहेत.
अ) कच्चे टिपण : प्रत्येक भूमापन क्रमांकाचे, धारण केलेल्या वहिवाटी नुसार कच्चेटिपण (परिमाणात नसलेले रेखाचित्र) तयार करण्यात येते. त्यात वहिवाटीच्या हद्दीच्या निशाण्या घेऊन शंकू साखळीचे आधारे साखळी व आणे याप्रमाणे मोजमापे दर्शविली जातात व प्रत्येक भूमापन क्रमांकास मोजणी केलेल्या क्रमानुसार चालता नंबर देण्यात येऊन लगत भूमापन क्रमांक लिहिले जातात. टिपण आकृतीचे मोजमापानुसार वसलेवार पध्दतीने भूमापन क्रमांकाचे क्षेत्र कायम करण्यात येऊन त्यावर एकूण क्षेत्र, बागायत क्षेत्र, तरी/गद्दी याचा उल्लेख असतो.
ब) पक्के टिपण : यामध्ये प्रत्येक भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढलेले रेखाचित्र असते. त्यावर बांधमापे दर्शवून चालता नंबर, अंतिम नंबर, शेताचे नाव व सत्ता प्रकार इत्यादी बाबी नमुद केल्या जातात.

· प्रश्‍न १३: शेतवार पत्रक म्‍हणजे काय?
F उत्तर: ज्‍या पुस्तकात भूमापन क्रमांकानुसार क्षेत्र व आकार नमुद केलेला असतो त्‍याला शेतवारपत्रक म्‍हणतात.

· प्रश्‍न १३८: कच्चा सुड म्‍हणजे काय?
F उत्तर: मुख्‍यत: कोकण विभागात एकूण क्षेत्र दाखविण्याकामी सुड वापराला जातो. त्यामध्ये भूमापन क्रमांक, पोट हिस्‍सानंबर, स्थळाचे नाव, जिरायत, बागायत यांचे क्षेत्र व आकार नमूद असतो.

· प्रश्‍न १३९: पक्का सुड म्‍हणजे काय?
F उत्तर: हा मुख्‍यत: डोंगराळ भागातील गावासाठी ठेवण्यात येतो. यामध्ये भूमापन क्रमांक व त्यामध्ये पडलेल्या पोटहिस्स्याची स्केली आकृती असते. तसेच जमिनीचा प्रकार, भूमापन क्रमांक व पोट हिस्स्याचे असणारे खराबा क्षेत्र व आकार नमूद असतो.

· प्रश्‍न १४०: दरवारी म्‍हणजे काय?
F उत्तर: दरवारी मध्ये भूमापन क्रमांक, प्रत नंबर, कच्चा व पक्का आकार व क्षेत्र नमूद असते.

· प्रश्‍न १४१: क्लासर रजिस्टर म्‍हणजे काय?
F उत्तर: यात भूमापन क्रमांक / पोट हिस्‍सा नंबर, जमिनीचे प्रकारनिहाय क्षेत्र, पोटखराब, जिरायत, बागायत व तरी याप्रमाणे दर व आकार नमूद केलेला असतो. तसेच जमिनीची गावापासून व पाण्यापासून असणारी लांबी, मैल वरुन कायम एकरी दर काढलेला असतो.

· प्रश्‍न १४२: प्रतिबुक म्‍हणजे काय?
F उत्तर: जमाबंदीच्‍यावेळी प्रतबंदी करतांना, प्रत्येक भूमापन क्रमांकाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन त्याचे ठराविक चौकोन आखुन त्या प्रत्येक भागाची प्रत ठरविली जाते. प्रत्येक भागाचे / जमिनीचे प्रतिवार निरीक्षण करुन, त्याप्रमाणे विहित नमुन्यात प्रतवारी प्रमाणे भागआणे काढले जातात व त्या भागआणे वरुन नंतर त्याचा एकरी दर कायम करुन, आकार बसविण्याचे काम केले जाते. त्याच्या नोंदी प्रतिबुक नोंदवही मध्ये करण्यात येतात त्यामध्ये भूमापन क्रमांक, मोजणी नंबर, डागाचे नाव, कर्दाचे नाव, जमिनीचा प्रकार, क्षेत्र, खराबा क्षेत्र, व लागवडी लायक क्षेत्र, इत्यादी नोंदी घेतल्या जातात.

· प्रश्‍न १४३: क्षेत्रबुक म्‍हणजे काय?
F उत्तर: मोजणी अंती भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढलेले रेखाचित्राचे क्षेत्र समाविष्ट असणारे मोजणीचे पुस्तक म्हणजे क्षेत्रबुक होय. यात धारकाचे नांव, सर्व्हे नंबर व त्याचे क्षेत्र, चालता नंबर, इ. बाबी नमुद असतात.

· प्रश्‍न १४४: वसलेवार बुक म्‍हणजे काय?
F उत्तर: भूमापन क्रमांकाचे क्षेत्र काढण्यासाठी, त्‍या भूमापन क्रमांकाची काटकोन, त्रिकोण व समलंब चौकोनात विभागणी करुन मोजमापाच्या सहाय्याने क्षेत्र गणना करण्याची पध्दत म्हणजे वसलेवार होय.
मोजणी केलेल्या भूमापन क्रमांकाची शंकु पध्दतीने त्रिकोण आणि समलंब चौकोनामध्ये विभागणी करुन, निश्चित परिमाणात मापे टाकण्यात येवून, गणितीय पध्दतीने प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्र नमुद करण्यात येते. अशा मोजणी केलेल्या सर्व भूमापन क्रमांकाची नोंद ज्या नोंद वहीत केलेली असते, त्या नोंदवहीस वसलेवार बुक असे म्हणतात.

· प्रश्‍न १४५: बागायत तक्ता म्‍हणजे काय?
F उत्तर: बागायत सर्व्हे नंबरसाठी तक्ता तयार करतात. हया तक्त्यात वर्गीकरण करताना जी माहिती सर्व्हेअरने प्राप्त करुन घेतली, ती सर्व हयात नमुद केली जाते. विहीरीची नोंद, सर्व्हे नंबरच्‍या हद्दी व हद्दीच्या निशाण्या (खुणा) तपासुन लिहून घेतात. वर्गकार सुध्दा प्रत्येक सर्व्हे नंबरची नोंद ठेवतात. त्या सर्व्हे नंबरचे गावापासूनचे अंतरही नोंदवतात. गाव नकाशा व गाव नोंदवही तयार करतात व ओलीताचे/पाण्याची साधने कोणकोणती आहेत. त्यांची नोंद त्यात करतात. तलाव, वोडी, कुंटा या पासुन शेतीला पाणी मिळते किंवा नाही याच्या नोंदी ठेवल्या जातात.

· प्रश्‍न १४६: आकार बंद म्‍हणजे काय?
F उत्तर: गावातील प्रत्यक्ष जमिनीची भूमापन मोजणी व जमाबंदी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भूमापन क्रमांकाचे क्षेत्र वसलेवार पध्दतीने काढले जाते. क्षेत्र काढताना जिरायत, बागायत, तरी (भातशेती) इत्यादी वेगवेगळे क्षेत्र नमुद केले जाते. त्याप्रमाणे (गाव नमुना एक) आकारबंद तयार केला जातो.
एखादया गावाचे एकूण क्षेत्र, भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक, त्यांचे प्रत्येकी क्षेत्र, आकार, लागवडीचे क्षेत्र, पोटखराबा, सत्ताप्रकार, प्रतवारी, जमिन महसूल आकारणी, जमाबंदीची मुदत तसेच एकूण क्षेत्र कोणकोणत्या प्रकाराखाली किंवा प्रयोजनासाठी वापरात आहे, त्याचा तपशील दर्शविणारा गाव नमुना एक म्हणजे आकारबंद होय. आकारबंदामध्ये गावचे एकुण क्षेत्र, लागणी लायक, खराबा त्याचा आकार या नोंदी केल्या जातात.
आकारबंदाच्‍या शेवटच्‍या पानावर संपूर्ण भूमापन क्रमांकाच्या क्षेत्राची/ आकाराची बेरीज, जमिनीच्‍या वेगवेगळया प्रकारनिहाय दर्शविलेली असते. तसेच गावठाण, नदया, नाले, शिवेवरील भाग, ओढा, रस्ते, कॅनॉल, तलाव, रेल्वे, इ. क्षेत्राचा वेगळा उल्लेख असतो आणि शेवटी वर उल्लेख केलेल्या सर्वांचे क्षेत्राची एकत्रीत बेरीज केलेली असते. त्यास 'जुमला बेरीज' असेही म्हणतात.

· प्रश्‍न १४७: गावचे नकाशे म्‍हणजे काय?
F उत्तर: गाव नकाशा हा भूमापन अभिलेख आहे. कारण तो गावचे सर्व भूक्रमांक दर्शवितो. गाव नकाशा
एक इंच = २० साखळी किंवा १० साखळी या परिमाणात काढला जात होता. दशमान पध्दत सुरु केल्यानंतर मोजणी प्रमाणित दशमान साखळीने केली जाते आणि गावनकाशे १:५००० व १:१०००० या परिमाणात तयार केले जातात. गाव नकाशा मध्ये गावातील गावठांण, झाडे, विहिरी, डोंगर, टेकडी, ओढा, ओघळी, गाडी रस्ते, पांळंद रस्ते, पक्के रस्ते, झुरी इ. बाबी नमुद असतात. गाव नकाशाच्या आधारे एखादया गट नंबरच्या किंवा गावाच्या दिशादर्शक चतु:सिमा समजून येतात. ज्या गावामध्ये एकत्रीकरण योजना अंमलात आली अशा गावामध्ये सर्व्हे नंबर ऐवजी एकत्रीकरणानंतर त्यास गट नंबर असे संबोधले गेले.

· प्रश्‍न १४८: अधिकार अभिलेख म्‍हणजे काय?
F उत्तर: वऱ्हाड क्षेत्रात सर्व्हे नंबर नुसार कब्जेदारांचे हक्काचे अधिकार अभिलेख, त्यांच्‍या कब्जातील क्षेत्रनिहाय तयार करणेत आले. मध्य प्रांतात (नागपूर विभागामध्ये) 'खसरा पत्रक' तयार करणेत आले. मराठवाडयात सुध्‍दा 'खासरा पत्रक' तयार करणेत आले. पश्चिम महाराष्ट्रात 'कडई पत्रक' तयार करणेत आले. महाराष्ट्र जमिन महसुल अधिनयम १९६६ लागू झाल्यानंतर अधिकार अभिलेख म्हणून सात-बारा अंमलात आला.  सात-बारा हा मूळ महसूल अभिलेख असून, महाराष्ट्र जमिन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३,,६ आणि ७ नुसार सात-बारा तयार केला जातो.


· प्रश्‍न १४९: कडई पत्रक म्‍हणजे काय?
F उत्तर: सन १९१०च्‍या आसपास जमीन मोजणी संदर्भात बंदोबस्‍त योजना राबविण्‍यात येऊन त्‍यानुसार जमिनींचे बंदोबस्‍त नकाशे तयार करण्‍यात आले.बंदोबस्‍त नकाशातील शेताच्‍या दर्शक क्रमांकास सर्वे नंबर म्‍हणतात. बंदोबस्‍त नकाशाच्‍या आधारे वर्‍हाड भागात सर्वे नंबर नुसार कब्‍जेदारांच्‍या कब्‍ज्‍यातील क्षेत्रानुसार हक्‍काचे अधिकार अभिलेख तयार करण्‍यात आले. या अधिकार अभिलेखांना विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रात खसरा पत्रक तर पश्‍चिम ‍महाराष्‍ट्रात कडई पत्रक म्‍हणतात.   

· प्रश्‍न १५: फाळणी नकाशे म्‍हणजे काय?
F उत्तर: एखादया भूमापन क्रमांकाचे रितसर हिस्से पाडण्यासाठी जागेवरील वहिवाटीची मोजणी करुन तयार केलेला नकाशा म्हणजे फाळणी नकाशा होय. फाळणी नकाशे हे सन १९५६ पर्यंत शंकुसाखळीने तयार केले गेले.  त्यानंतर ते फलकयंत्राच्‍या साहाय्याने तयार केलेले आहेत. फाळणी नकाशा आधारे पोटहिस्स्यांच्या गहाळ खुणांची स्थिती निश्चित करता येते. हद्दीचे वाद मिटविता येतात. ज्या भूमापन क्रमांकामध्ये पोटहिस्से पडलेले आहेत त्यांच्‍या हिस्स्याप्रमाणे असलेल्या हद्दी योग्य त्या स्केलाप्रमाणे कायम करुन, यामध्ये भूमापन क्रमांकाच्या हद्दी काळया शाईने व पोटहिस्याच्या हद्दी तांबडया शाईने दर्शवून त्यात त्या- त्या पोटहिस्स्याचा क्रमांक नमुद केलेला असतो.

Comments

  1. कृपया करून मला प्र जिल्हा मार्ग किती रुंदीचे असतात याचे मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  2. फाळणी नकाशा चुकला असेल तर काय करावे

    ReplyDelete
  3. जमिनीच्या नकाश्यावर पोकळीस्त म्हणजे काय? ह्या पोकळीस्त जमिनीला सर्वे नंबर सुद्धा नसतो.

    ReplyDelete
  4. तुकडे बिल ताबा सोडायचा नाही त्यासाठी काय तरतूद आहे

    ReplyDelete
  5. समजा गट नं.139 मधील शेतकरी नजीकच्या गट क्र.94,95,96 मधीलशेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या रस्त्याचा वापर मागील 25 वर्षांपासून करत असेल तर आज रोजीही खुला असणारा हा रस्ता संबंधित गटातील शेतकरी गट नं.139 मधील शेतकऱ्यास वापरण्यास मनाई करु शकतात का?

    ReplyDelete
  6. तालुका भुमिअभिलेक कार्यालयात फाळणी नकाशा मिळत नाही खराब-गहाळ झाले तर ते कुठ मिळतील

    ReplyDelete
  7. 1943 ला पंजोबांनि जमीन सेजारे सोबत खरेदी केली 1967 ला फाळणी बारा मधे सेजारे ने कब्जेदार मनुन नावे लावली जमीन 1989 ला पुनरवसन कजाब झाली आमाला वडोलोपारजीत जमिन मिळेल का

    ReplyDelete
    Replies
    1. माझा पण तोच प्रश्न आहे

      Delete
  8. जुन्या 7/12 मध्ये इतर अधिकार मध्ये झुरी 1 आर असा शब्द आहे तर झुरी म्हणजे काय?

    ReplyDelete
  9. जर फेरफार वरती वाटप पत्रात 20 आर उल्लेख दुसऱ्या व्यक्तीला राहण्यासाठी(वस्तीपढ )असेल आणि ते 20 आर क्षेत्र त्या गटातून कमी न होता उतारा जर तेवढ्याच क्षेत्राचा असेल आणि त्या 20 आर चा उतारा त्या गटात निघत नसेल तर नेमकी चूक कोणाची आणि काय व काय करू शकतो.... शंखेचे उत्तर मिळावे ही अपेक्षा...

    ReplyDelete
  10. c.t serve no 679 आहे आणि त्यामध्ये हे क्षेत्र 146.4चौ.मी असे दर्शविले आहे तरी हे 146.4चौ.मी म्हणजे किती फूट जागा आहे.आणि कसे मोजावे

    ReplyDelete
  11. भूमि अभिलेख कार्यालय मध्ये पी- वन अभिलेख असतो.हा अभिलेख नमुना अधिनियमातील ज्या कलम अथवा नियम नुसार तयार करण्यात आलेला आहे त्या अधिनियम बद्दल माहिती आवश्यक आहे.

    ReplyDelete
  12. सुड रजिस्टर कोठे पहायला मिळेल
    पुणे तहसिल मध्ये विचारले असता पेशवे दप्तर ला मिळेल व पेशवे दप्तर ला विचारले असता पुणे तहसिल मध्ये मिळेल असे सांगण्यात आले हे नक्की कोठे पहायला मिळेल व यात कोणती माहिती उपलब्ध आहे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel