आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

एकावन्‍न समज/अंधश्रद्धा आणि वास्‍तव

एकावन्‍न समज/अंधश्रद्धा आणि वास्‍तव

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे, त्‍यावर विश्‍वास ठेवणे याला अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेचे विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी, तसेच भूत- प्रेत, पिशाच्चांवर अंधविश्वास, अफवा व कृती करणे आणि अशा कृतींचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होणे याला अंधश्रद्धा फोफावणे असे म्हणतात.

अंधश्रद्धा म्हणजे अशा श्रद्धा आणि आचरण, ज्यांना कोणत्याही पुराव्याचा आधार नसतो त्‍या समाजाने गाठलेल्या प्रबुद्धतेच्या पातळीशी विसंगत असतात. एखाद्या समाजाच्या श्रद्धा आणि आचार त्या समाजाच्या तत्कालीन ज्ञान आणि अनुभवांशी जोपर्यंत सुसंगत असतील तोपर्यंत त्या श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. अनेक अंधश्रद्धा आपण कारण माहित नसतांना पिढ्‍यानपिढ्‍या पाळत आलो आहे.

पूर्वीच्‍याकाळी वयाने, मानाने, नात्‍याने मोठे असणार्‍या व्‍यक्‍तीला 'असे कां?' हा प्रश्‍न विचारण्‍याचे धाडस कोणीही करत नसे. काही ठिकाणी 'आमचे पूर्वज करत होते म्‍हणून आम्‍ही करतो, तुम्‍हीही करा' असे उत्तर त्रोटक मिळत असे. अनेक अंधश्रद्धांमागचे खरे कारण अशा मोठ्‍या व्‍यक्‍तींनाही माहीत नसावे. 'पिढ्‍यानपिढ्‍या पाळल्‍या जात आहेत म्‍हणून पाळणे' ही श्रद्धा पुढे अंधश्रद्धा झाली.

कोणतीही गोष्‍ट करायला इतरांना भाग पाडायचे असले की त्‍यांचा देव, भाग्‍य, भरभराट अशा गोष्‍टींशी मेळ घालायचा आणि त्‍या गोष्‍टी न केल्‍यास संकट, दुर्भाग्‍य येईल असा समज निर्माण करून देणे ही आपल्‍याकडची जुनी खेळी आहे.

ज्‍या प्रथांमुळे फायदा झाला नाही तरी चालेल परंतु कोणाचेही नुकसान होऊ नये अशा प्रथा, रूढी, परंपरा पाळण्‍यात काहीच हरकत नाही.पण स्‍वत:ला किंवा समाजातील कोणत्‍याही घटकाला हानीकारक असणार्‍या प्रथा, रूढी, परंपरांचा विरोध व्‍हायलाच हवा.

या लेखाच्‍या अनुषंगाने काही प्रथा, रूढी, परंपरा, अंधश्रध्‍दा आणि त्‍यांचे वास्‍तव मांडण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. अर्थातच हे माझे विचार आहेत. यामागे कोणाच्‍याही कोणत्‍याही प्रकारच्‍या भावना दुखावण्‍याचा हेतू निश्‍चितच नाही याची नोंद घ्‍यावी.

१: हिंदू धर्मानुसार ३३ कोटी देव आहेत.

वास्‍तव: येथे 'कोटी' या शब्दाचा अर्थ 'करोड' असा संख्यावाचक घेतला जातो ते चुकीचे आहे. येथे 'कोटी' या शब्दाचा अर्थ “प्रकार” (Degree) असा विशेषणात्मक अभिप्रेत आहे.

हिंदू धर्मातील धार्मिक ग्रंथानुसार (महाभारत, हरिवंश ) आठ वसू, अकरा रूद्र, बारा आदित्य आणि आणखी दोन अश्विनीकुमार किंवा इंद्र आणि प्रजापती असे मानले गेले आहेत. यांची एकूण संख्‍या ३३ आहे. त्‍यामुळे हिंदू धर्मात ३३ कोटी नव्‍हे ३३ प्रकारचे देव आहेत.

२: देव संकटातून तारतो.

वास्‍तव: संकटं दोन प्रकारची असतात. वास्‍तववादी आणि आभासी. भूकंप, त्सुनामी, आग, पूर, शारीरिक व्‍याधी इत्‍यादी संकटे वास्‍तववादी आहेत. अशा संकटातून देव तारू शकत नाही. यांचे परिणाम भोगावेच लागतात. भुतांची भीती वगैरे प्रकारची संकटे आभासी आहेत. यांचा स्‍वत: सोक्षमोक्ष लावल्‍याशिवाय आभासी भिती कमी होत नाही.

मानव हा जन्‍मत: परावलंबी आहे. दुसर्‍यावर विसंबून राहणे मानवाला जन्‍मत: आवडते.

आभासी संकटात 'रामनाम' घेतल्‍यामुळे मानसिक बळ प्राप्‍त होते. देव या संकटातून तारून नेईल या विश्‍वासामुळे आपण आभासी संकटातून बाहेर पडतो. अशा प्रसंगात खरंतर स्‍वत:च्‍या विश्‍वास काम करतो परंतु श्रेय 'रामनामाला' जातं. स्‍वत:च्‍या विश्‍वास ही एक शक्तिशाली भावना आहे, संकट समयी आवश्‍यक ते बळ देण्‍याचे काम विश्‍वास करतो.

३: अमुक देव नवसाला पावतो.

वास्‍तव: नवस' म्‍हणजे काय ? "तु माझे हे काम केलं तर मी त्‍या बदल्‍यात तुझ्‍यासाठी अमुक करेन" ही भावना म्‍हणजे 'नवस'. आधुनिक शब्‍दात 'लाच' देणे. 'नवस' फेडण्‍यासाठी केलेल्‍या कृत्‍यामुळे फक्‍त देवळातील पुजारी आणि देवस्‍थानचे पोट भरत असते. 'देवापर्यंत' काहीच पोहोचत नाही. जर अमुकच देव नवसाला पावत असेल तर इतर देवांचे काय? यावरून आपणच देवादेवात भेदभाव निर्माण करत नाही का? बाकीचे देव कमी दर्जाचे, कमी शक्‍तीशाली आहेत हेच आपण सांगत नाही का? हिंदीत एक वाक्‍य आहे, 'किसी चिज की दिल से तमन्‍ना करो तो पुरी कायनात उसे दिलाने के लिए कोशिश करती हैं' नवसामुळेही हेच होते. पुन्‍हा पुन्‍हा एकाच वस्‍तुचा ध्‍यास लागल्‍यामुळे ती मिळविण्‍यासाठीचा आपलाच आत्‍मविश्‍वास वाढतो. आणि ती वस्‍तू आपल्‍याला प्राप्‍त होते. देवाच्‍या नावाने मंदिरात नवस फेडण्‍याऐवजी एखाद्‍या गरीबाला मदत केलेली कधीही चांगली. नवस बोलायचाच असेल तर काम झाल्‍यानंतर गरीबांसाठी काही करण्‍याबाबत बोलावा. इंग्रजीत म्‍हण आहे, "गॉड हेल्प्स देम हू हेल्प देम सेल्व्हज्‌!'

४: पाल अंगावर पडल्यास स्नान करावं.

वास्‍तव: या मागे धार्मिक कारणापेक्षा वैज्ञानिक कारण आहे. पाल हा विचित्र, किळसवाणा दिसणारा प्राणी आहे. तो ‘फायलम कारडाटा’ या समूहात मोडतो. या समूहातील प्राणी आपल्या शरीरातील विष (युरिक अॅसिड) आपल्या शरीरावर जमा करतात. त्यामुळे हे प्राणी सुरक्षित राहतात. जेव्हा पाल आपल्या अंगावर पडते तेव्हा तिच्या शरीरातील विष ती समोरच्या व्‍यक्‍तीच्‍या शरीरावर फेकते. हे विष रोमछिद्रातून शरीरात जाते आणि त्वचारोग किंवा शारीरिक व्याधीचे कारण बनू शकते. यामुळेच पाल अंगावर पडली तर आंघोळ करावी. काही ठिकाणी तुळशीची पाने टाकुन आंघोळ की जाते आणि तुळशीची पाने खायला दिली जातात. कारण तुळशीची पाने टाकून आंघोळ केल्‍याने व तुळशीची पाने खाल्ल्याने विषाचा प्रभाव कमी होतो.

५: देवाला प्रसन्‍न करण्‍यासाठी उपवास करावा.

वास्‍तव: याबाबत एक शक्‍यता अशी आहे की, शरीरातील पाचन संस्‍थेस आराम मिळावा म्‍हणून 'लंघन' करावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. 'लंघन' करा असे सांगितल्‍यावर कोणी ऐकणार नाहीत म्‍हणून देवाची भिती घालून देवाला प्रसन्‍न करण्‍यासाठी उपवास करावा अशी अंधश्रध्‍दा निर्माण करण्‍यात आली असावी. दुसरी शक्‍यता अशी आहे की, पूर्वीच्‍या एकत्र कुटूंबातील अनेक सदस्‍यांसाठी स्‍वयंपाक करण्‍यात फार वेळ जात असल्‍याने, घरातील स्‍त्रीला आराम व ध्‍यान-साधनेसाठी वेळ मिळत नसावा. तिला स्‍वयंपाकातून थोडा वेळ मिळावा आणि आराम ध्‍यान-साधना करता यावी म्‍हणून उपवासाची पध्‍दत सुरू करण्‍यात आली असावी. उपाशी राहून देव प्रसन्‍न झाला असता तर जगात ज्‍यांना अन्‍न उपलब्‍ध नसल्‍यामुळे उपाशी राहवे लागते त्‍यांना तो आधी प्रसन्‍न झाला असता.

६: झोपताना दक्षिणेकडे पाय केल्‍यास मृत्‍यू होतो.

वास्‍तव: याबाबत आपल्या धर्मगंथात मृत्‍युची देवता यम, याची दिशा दक्षिण सांगितली आहे. दक्षिणेकडून यम येतो असा समज करून दिला आहे. पृथ्‍वीचे चुंबकीय क्षेत्र उत्तर दिशेकडून दक्षिण दिशाकडे असते आणि जेव्हा आपण दक्षिणीकडे पाय करून झोपतो, तेव्हा शरीर पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीच्या संपर्कात येते. या चुंबकीय शक्तीमुळे शरीरातील रक्‍तात असणारे लोह घटक डोक्याकडे प्रवाहित होऊ लागतात. फलस्‍वरूप अलझायमर, पार्किन्सन, उच्च रक्त दाब किंवा मानसिक रोग होण्याची शक्यता वाढते म्हणून झोपतांना दक्षिणेकडे पाय नसावेत.

७: महिलांनी बांगड्या न घालणे अशुभ आहे.

वास्‍तव: महिलांनी बांगड्‍या घालणे हा श्रृंगारातील एक भाग आहे. पूर्वीच्या महिलांच्या हातात खूप बांगड्या असायच्या आता हे प्रमाण फार कमी झाले आहे. महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते, अक्युप्रेशर पध्‍दतीनुसार गर्भाशयाचा दाब बिंदू (Pressure point) मनगटावर, अंगठ्याच्या खालील बाजूस आहे आणि बीजांड कोषचा (ovaries) चा दाब बिंदू (Pressure point) मनगटावरील करंगळी खालील बाजूस आहे. हे दाब बिंदू दोन्ही हातांवर आहेत. बांगड्‍या घातल्‍यामुळे हे दाब बिंदू आपोआपच दाबले जातात. पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे,पाळी साफ न होणे, चाळीशीशी नंतर टाचा दुखणे वगैरे त्रास होत नाहीत. म्‍हणून महिलांना बांगड्या घालण्‍यासाठी प्रेरित करण्‍यासाठी महिलांनी बांगड्या न घालणे अशुभ आहे असे म्‍हणण्‍याची पध्‍दत सुरू झाली असावी.

८: महिलांनी कुंकू न लावणे अशुभ आहे.

वास्‍तव: भारतात कुमारिका व सौभाग्यवतींनी कपाळाला कुंकू लावावे अशी पूर्वापार परंपरा रूढ आहे. भ्रूमध्याला म्हणजेच दोन्ही भुवयांच्यामध्ये कुंकू लावायचे असते. कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावल्याने आज्ञाचक्र (Third Eye Chakra) प्रभावित होते. आज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन्ही भुवयांच्यामध्ये असते. मानसशक्ती, इच्छाशक्तीचे हे केंद्र आहे. आज्ञा चक्राकडे बुद्धिमत्ता, चेहरा, डोळे, कान, सायनस, लहान मेंदू (Cerebellum), मज्जासंस्था (Central nervous system) यांचे नियंत्रण असते. मेंदूतील पिच्युटरी ग्रंथी, एण्डोक्राइन ग्रंथींचे नियंत्रण, माणसाचे विचार तसेच सर्व प्रमुख चक्रांचे नियंत्रण या चक्राकडे असते. अक्युप्रेशर पध्‍दतीनुसार मेंदूच्या पायथ्याशी असणार्‍या पियुषिका ग्रंथीचा (पिच्युटरी ग्रंथी – Pituitary Gland) दाब बिंदू (Pressure point) येथे आहे. याठिकाणी शुद्ध कुंकू लावले असता कुंकवातील औषधी घटक त्वचेवाटे पिच्यूटरी ग्रंथींना सक्रिय करतात. त्यामुळे पिच्यूटरी ग्रंथी व्यवस्थित काम काम करू लागते आणि महिलांच्या हार्मोन्सची निर्मिती व्यवस्थित होते. महिलांना पाळीचे त्रास होत नाहीत. बिंदी/कुंकूचा वापर आज्ञाचक्राशी संबंधित बाबींचा फायदे मिळवून देतो.

९: विवाहित महिलांनी सिंदूर न लावणे अशुभ आहे.

वास्‍तव: भारतात विवाहित महिलांनी सिंदूर लावण्‍याची पध्‍दत आहे. विवाहित स्त्रीने डोक्यावरील केसांचे मधोमध दोन भाग करून त्यात सिंदूर भरण्याची प्रथा आहे. सिंदूर लावणे हा विवाहित स्त्रीचा महत्त्वाचा श्रृंगार आहे. अविवाहित स्त्रीने सिंदूरचा वापर करू नये असा संकेत आहे. याला ‘मांग भरणे’ असेही म्हणतात. चांगल्‍या प्रतीच्‍या सिंदूरमध्‍ये पार्‍याचा (Mercury) अंश असतो. पारा थंड असल्याने रागाचे शमन होते. सिंदूर लावण्याची जागा सहस्त्रार चक्राशी (Crown Chakra) संबंधित असते. सहस्त्रार चक्र हे मेंदूशी (Cerebrum) संबंधित असल्याने सिंदूरचा वापर हा मेंदूसाठी उपयोगी ठरतो. सिंदूर मधील पार्‍यामुळे मेंदू शांत राहतो. संसारात स्त्रीने ‘डोके शांत ठेवणे’ हे सुखी संसाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. डोक्‍यातील सर्व दाब बिंदू (Pressure point) डोक्यावरील केसांच्‍या मधोमध असतात, त्‍या भागावर मसाज अथवा दाब दिल्‍यास मेंदू उत्‍तेजीत होऊन त्‍याचे कार्य सुकर होते. सिंदूर लावतांना त्‍या जागेचा आपोआप मसाज होतो व मेंदू उत्तम पध्दतीने काम देतो.

भारतात काही ठिकाणी 'मांग-टिका' वापरण्‍याची पध्‍दत आहे. विवाहित स्त्रीने सिंदूर भरल्‍यानंतर त्‍यावर मांग-टिका लावला जातो. मांग-टिका हा सोन्याचा बनलेला असतो. सोन्याच्या छोट्या चेनला एका बाजूला हूक व दुसर्‍या बाजूला नक्षीकाम केलेले पदक असते. हूक डोक्यावरील केसांना मागील बाजूस अडकवून नक्षीकाम केलेले पदक बरोबर कपाळावर येईल असे चेनच्या साहाय्याने लावतात. मांगेत भरलेला सिंदूर जास्त काळ टिकावा म्हणून मांग-टिका लावला जातो.

मांग-टिक्‍यामुळे डोक्‍यातील सर्व प्रेशर पॉइंटस्‌वर जागेवर आपोआप दाब पडतो व मेंदू उत्तम पध्‍दतीने काम देतो. गुजरात, राजस्थानमध्‍ये आजही विवाहित स्त्रिया मांग-टिका वापरतात.

१०: मासिक पाळीत महिला अस्‍पृश्‍य असतात.

वास्‍तव: मासिक पाळीत असलेल्‍या स्‍त्रीला ‘रजस्वला स्त्री’ असेही म्‍हणतात. विशेषत: भारतात, मासिक पाळीत असलेली महिला अस्‍पृश्‍य असते ही फार मोठी अंधश्रध्‍दा आहे. रजस्वला स्त्रीला मासिक पाळीच्‍या काळात स्‍पर्श करू नये, त्‍यांनी पुजा, स्‍वयंपाक करू नये, एकांतात बसावे अशी अनेक बंधने लादली जातात.

साधारणपणे मुलगी १२-१३ वर्ष वयाची झाल्‍यावर ती वयात आली असे म्‍हणतात. या वयात तिच्‍या योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो त्याला मासिक पाळी असे म्हणतात. खरेतर माणसाचा वंश चालविण्याचे महत्त्वाचे कार्य स्त्रीच्या हातून पार पाडण्याची ही निसर्गाची योजना आहे.

मासिकपाळी सुरु झाली म्हणजे मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरु झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ती एक महत्त्वाची घटना असते. सर्व अवयवांचे काम व्यवस्थित चालू असल्याची ती पावतीच आहे. म्हणूनच मासिक पाळीला निसर्गाचे वरदान मानतात. मुलगी वयात आल्‍यानंतर दर महिन्याला एक स्त्रीबीज, बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो.

मासिक पाळी आल्यावर किंवा येण्यापूर्वी थोडे फार पोट दुखणे, झोप न लागणे, कंबर दुखणे, डोके दुखणे, अंग दुखणे, रक्‍तस्‍त्रावामुळे शारीरिक थकवा येणे असे तात्पुरते त्रास शरीर प्रक्रियेत बदल झाल्याने होऊ शकतात. पूर्वीच्या काळी स्त्रियांना अंगमेहनतीची कामे बऱ्याच प्रमाणात करावी लागत असत. उदा. विहिरीतून पाणी काढणे, दळण-कांडण, मसाला वाटणे, धुणी धुणे इ.

मासिक पाळीच्‍या काळात अशा काळात अंगमेहनतीची कामे, पुजा, स्‍वयंपाक इत्‍यादी कामे केल्‍यास जास्‍त प्रमाणात थकवा येऊन त्रास वाढण्‍याची शक्‍यता असते. सतत होणार्‍या रक्‍तस्‍त्रावामुळे त्‍या स्‍त्रीला अस्‍वच्‍छ वाटत असते. तिची चिडचिड होत असते. मासिक पाळीच्या काळात जास्तीत जास्त विश्रांती घेणे गरजेचे असते. प्रत्येक पाळीच्या काळात ३० ते ४० मि.ली. रक्तस्राव गृहित धरला तर साधारण वर्षांला ३६० ते ४८० मि.ली. होईल व ३५ वर्ष पाळी असेल तर १२ ते १६ लिटर एवढा रक्तस्राव होत असतो. प्रत्येक महिन्याला किमान ५ दिवस विश्रांती मिळाली तर वर्षांला ६० दिवस व ३५ वर्षांत ७० महिने म्हणजे ५ ते ६ वर्ष एवढी विश्रांती मिळेल. मासिक पाळीत विश्रांती घेणाऱ्या स्त्रीचे आरोग्यही उत्तम राहील व आयुष्य किमान १० वर्षांनी वाढेल. त्यामुळे पाळीच्या काळात शक्य तेवढी विश्रांती घेतली पाहिजे म्हणजे होणारा रक्तस्राव भरून निघतो. स्त्रियांमध्ये पाळीच्या काळात कंबर व पाठ दुखीचे प्रमाण फार वाढले आहे. यासाठी आहारात गूळ-खोबऱ्याचे प्रमाण वाढविले पाहिजे. तिला या काळात पोषक आहार मिळणे महत्‍वाचे. पूर्वीच्या काळी स्त्रियांची ओटीसुद्धा गूळ, खारीक-खोबरे, तांदूळ देऊन भरली जायची ते ही गोष्‍ट लक्षात राहावी म्‍हणूनच.

जुन्‍या काळात स्‍त्रीने स्‍वत: आराम मिळावा याची मागणी करणे शक्‍य नव्‍हते. त्‍यामुळे काही विद्‍वान स्‍त्रीयांनी मासिक पाळीत महिला अस्‍पृश्‍य असतात असा समज करून दिला असावा. अर्थातच यामागचे कारण चांगलेच होते परंतु याचा अर्थ चुकीचा घेतला गेला.

११: महिलांनी देवळाच्‍या गाभार्‍यात प्रवेश करू नये.

वास्‍तव: या अंधश्रध्‍देमागे मासिक पाळीत महिला अस्‍पृश्‍य असतात ही वर नमुद केलेली अंधश्रध्‍दा कारणीभूत आहे. देवाला पवित्र मानले जाते. त्‍यामुळे अपवित्र, अस्‍पृश्‍य व्‍यक्‍तीचा स्‍पर्श अशा पवित्र देवाला होऊ नसे अशी अंधश्रध्‍दा यामागे आहे. कोणतीही स्‍त्री, तिची मासिक पाळी सुरू आहे हे जाहिररित्‍या सांगणार नाही. त्‍यामुळे याबाबत कळायला मार्ग नसतो. म्‍हणून सरसकट सर्व महिलांवर देवळाच्‍या गाभार्‍यात प्रवेश न करण्‍याचे बंधन अंधश्रध्‍देपोटी लादले गेले.

१२: साप पुजनिय आहे.

वास्‍तव: या अंधश्रध्‍देमागे सापांबद्दल असणारी भिती कारणीभूत आहे. साप उंदीर व तत्‍सम प्राणी खातो त्‍यामुळे धान्‍याचे नुकसान टळते त्‍यामुळे सापाला उपयुक्त, शेतकर्‍याचा मित्र मानले जाते. नागपंचमीला त्‍याची पूजा केली जाते. साप/नागाला जगातील अनेक देशांनी देवाचे स्थान दिलेले आहे. भारतातही सर्पसृष्टीचे महत्त्व आपल्या पूर्वजांनाही ओळखले होते. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे असणाऱ्या द्रविड संस्कृतीत नागांची पूजा केली जात होती. मोहेंजोदडो येथील उत्खननामध्ये नागप्रतीमा सापडल्या असल्याने इसवी सनापूर्वी किमान पाच ते सहा हजार वर्षापूर्वी नागपूजा होत असल्याचे दिसते. वैदिक धर्माप्रमाणेच बौद्ध व जैन धर्मातही नागाचे स्थान मोठे आहे. परंतु यामध्ये श्रद्धेपेक्षा भितीपोटी असलेली अंधश्रद्धाच जास्त आहे. खरेतर पुजेच्‍या साहित्‍यामुळे (हळद, कुंकू इ.) सापाला त्रास होतो आणि त्‍याचा मृत्‍यू होतो असे समोर आले आहे.

१३: साप डूख धरतात.

वास्‍तव: या अंधश्रध्‍देमागे परंपरागत लोककथा, कहाण्या, गूढकथा, भ्रामक भाकडकथा आणि शास्त्रीय माहितीविषयी अज्ञान कारणीभूत आहे. साप डूख धरतात या समजूतीला काहीही शास्त्रीय आधार नाही.

१४: सापाचे विष मंत्राने/जडीबुटीने उतरते.

वास्‍तव: ही अत्‍यंत घातकी अंधश्रध्‍दा आहे. या अंधश्रद्धेपायी देशात दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. सापाच्या विषावर प्रतिसर्प विष हेच एकमेव औषध आहे. अनेक मांत्रिक देवऋषी आणि गारुडी सापाचे विष उतरविणारी औषधी म्हणून जडीबुटी, नागवेली, तेले, भस्मे, अंगारे आदी विकतात. वास्तविक ते बेन्झाईनचे किंवा प्राण्यांच्या पित्ताशयात तयार झालेले खडे असतात. परंतु यापैकी कशाचाही उपयोग सर्पदंशावर होत नाही. सर्पदंशावर वैद्‍यकीय इलाज हा एकमेव उपाय आहे.

१५: साप दूध पितो.

वास्‍तव: या अंधश्रध्‍देमागेही परंपरागत लोककथा, कहाण्या, गूढकथा, भ्रामक भाकडकथा आणि शास्त्रीय माहितीविषयी अज्ञान कारणीभूत आहे. दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. दूध हे सस्तन प्राण्याचे अन्न आहे. साप हा सस्तन नाही तर सरपटणारा प्राणी आहे. त्‍यामुळे त्‍याने दुध पिण्‍याचा काहीही संबंध नाही.

१६: म्हाताऱ्या सापाच्या अंगावर केस असतात.

वास्‍तव: ही गोष्‍ट साफ चुकीची आहे. सस्तन प्राण्यांच्याच अंगावर केस असतात, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर केस नसतात. साप ठराविक दिवसांनी कात टाकतात. त्यांची कात व्यवस्थित न निघाल्यास त्‍यांच्‍या अंगावर चिटकून राहिलेली कात पांढऱ्या केसांसारखी दिसते. त्‍यामुळे म्हाताऱ्या सापाच्या अंगावर केस असतात ही अंधश्रध्‍दा प्रचलीत झाली आहे.

१७: साप पुंगीवर डोलतो.

वास्‍तव: काही चित्रपटांमुळे समाजात पसरलेला हा गैरसमज आहे. याचा दुरूपयोग काही गारूडी करतात. सापाला कान नसल्याने त्याला ऐकू येत नाही. तो हलणाऱ्या वस्तूवर हल्ला करण्याच्या व स्वसंरक्षणाच्या दृष्टीकोनातून लक्ष ठेवून असतो. आपला फणा पुंगीच्या हालचालीप्रमाणे हलवत असतो. आपल्याला मात्र तो पुंगीच्या तालावर डोलत असल्याचा भास होतो.

१८: शिवपिंडाला अर्धीच प्रदक्षिणा दोन्हीकडून घालावी.

वास्‍तव: शिवपिंड हे स्त्री आणि पुरुषांच्या मिलनाचे प्रतिक आहे. त्यातून वाहणारे पाणी हे पवित्र नसून त्याज्य असते. ते पिऊ नये किंवा अंगावर उडवून घेऊ नये. आणि म्हणूनच ते ओलांडायचे नसते अशी अंधश्रध्‍दा आहे. शिवपिंड प्रदक्षिणेला “सोमसूत्री” प्रदक्षिणा असे म्हणतात. म्हणजे जिथे शाळुंका संपते तेथ पर्यंत जाऊन पुन्हा उलट फिरून उलट्या बाजूने शाळून्के पर्यंत जाऊन पुन्हा समोर येणे. इथे एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

१९: शिवमंदिराच्‍या गाभार्‍यात प्रवेश करण्‍यापूर्वी टाळ्‍या वाजवाव्‍या.

वास्‍तव: शिवमंदिराचा गाभारा खालगट भागात असतो. शिंवपिंडाला सतत अभिषेक होत असल्‍यामुळे तिथे गारवा असतो. साप व तत्‍सम सरपटणार्‍या प्राण्‍यांना गारवा आवडतो. जर या गारव्‍याच्‍या मोहापायी एखादा सरपटणारा प्राणी शिवपिंडाजवळ असेल तर टाळीच्‍या आवाजाने सावध व्‍हावा व त्‍याची हालचाल दिसावी म्‍हणून शिवमंदिराच्‍या गाभार्‍यात प्रवेश करण्‍यापूर्वी टाळ्‍या वाजविण्‍याची प्रथा आहे.

२०: एकाच देवघरात अनेक मुर्ती ठेऊ नये.

वास्‍तव: एकाच देवघरात दोन किंवा अधिक शिवलिंगे, शाळिग्राम, शंख, देवीच्‍या, गणपतीच्‍या मुर्ती पूजेत ठेऊ नये अशी अंधश्रध्‍दा आहे. देवाची पुजा करतांना चित्त एकाग्र असावे. एकाच प्रकारच्‍या एकापेक्षा जास्‍त मुर्तींमुळे पुजा करतांना मनातल्‍या मनात नकळतपणे दोन मुर्तींची तुलना केली जाते. यामुळे मन एकाग्र होत नाही आणि केलेली पुजा सार्थक होत नाही असा समज असल्‍यामुळे एकाच देवघरात दोन किंवा अधिक मुर्ती ठेवत नाहीत.

२१: अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.

वास्‍तव: अंगावर फाटलेला कपडा शिवल्‍यास अनावधानाने सुई टोचून जखम होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही म्‍हणून अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये अशी प्रथा आहे.

२२: उंबऱ्यावर बसून शिंकू नये.

वास्‍तव: उंबरा हा घराच्‍या प्रवेशद्‍वाराजवळ असतो. शिंकतांना तोंडातील थुंकी किंवा कफ उडण्‍याची शक्‍यता असते. प्रवेशद्‍वाराजवळ उडालेली तोंडातील थुंकी किंवा कफ हा दिसायला किळसवाणा दिसतो म्‍हणून उंबऱ्यावर बसून शिंकू नये असे म्‍हणतात.

२३: झोपलेल्या माणसास कधीही ओलांडून जावू नये.

वास्‍तव: झोपलेल्या माणसास ओलांडतांना आपला तोल जाऊन पडण्‍याची शक्‍यता असते. तसेच झोपलेल्‍या माणसाच्‍या अंगावर पाय पडण्‍याची शक्‍यता असते. यामुळे ओलांडणारा आणि झोपलेली व्‍यक्‍ती या दाघांनाही त्रास होऊ शकतो. मध्‍येच झोप उघडली गेल्‍याने चिडचिड, भांडण होण्‍याची शक्‍यता असते.

२४: मांजराला प्रेत ओलांडून देवू नये.

वास्‍तव: मांजराला वाईट शक्‍तींचा वाहक मानले जाते अथवा मांजरात वाईट शक्‍तींचा वास करतात असा गैरसमज आहे. मांजराने प्रेत ओलांडल्‍यास मांजरातील वाईट शक्‍ती प्रेतात प्रवेश करतील अशा अंधश्रध्‍देतून मांजराला प्रेत ओलांडून देवू नये असे म्‍हणतात.

२५: सायंकाळी केर काढू नये.

वास्‍तव: पूर्वी घराघरात दिवे नव्‍हते. नकळत एखादी महत्‍वाची वस्‍तू, दागिना जमिनीवर पडला असेल तर तो केराबरोबर झाडला जाईल व कचर्‍यात फेकला जाईल या भितीने सायंकाळी केर काढू नये असे म्‍हणत.

२६: सायंकाळी नखे कापू नये.

वास्‍तव: पूर्वी घराघरात दिवे नव्‍हते. तयार झालेला स्‍वयंपाक जमिनीवर ठेवला जात असे. नखे कापतांना ती उडून जेवणात जाण्‍याची आणि जेवतांना तीच नखे पोटात जाण्‍याची भिती असायची. उडून जमिनीवर पडलेल्‍या नखांवर अंधारात नकळत पाय पडला तर ती बोचण्‍याची शक्‍यता असायची. अंधारात नखे कापतांना हात कापला जाण्‍याची शक्‍यता असते. म्‍हणून सायंकाळी नखे कापू नये असे म्‍हणत.

२७: कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.

वास्‍तव: 'जातो' या शब्‍दाचा अर्थ पुन्‍हा कधीही परत न येण्‍यासाठी जात आहे असा घेतला जायचा. 'येतो' म्‍हणजे लवकरच पुन्‍हा भेटु असा अर्थ होतो. म्‍हणून कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा असे म्‍हणतात.

२८: एका हाताने देवाला नमस्कार करू नये.

वास्‍तव: एका हाताने नमस्कार करणे म्‍हणजे उध्‍दटपणा मानला जातो. देव सर्वशक्‍तीशाली मानला गेल्‍याने, देवासमोर नम्रपणेच जावे असा समज असल्‍याने देवाला एका हाताने नमस्कार करू नये असे म्‍हणतात.

२९: दरवाज्‍यावर लिंबू-मिरची टांगून ठेवावी.

वास्‍तव: लिंबू-मिरची मधील सायट्रिक ॲसिड (Citric Acid) किटकनाशकाचे काम करते. यामुळे घरात सूक्ष्‍मजीव, किटाणू प्रवेश करू शकत नाहीत व निरोगी राहण्‍यास मदत मिळते. म्‍हणून दरवाज्‍यावर लिंबू-मिरची टांगून ठेवतात.

३०: साप मारल्‍यावर त्‍याचे डोके ठेचावे.

वास्‍तव: काही चित्रपटांमुळे हा गैरसमज समाजात पसरलेला आहे. सापला मारणार्‍याची प्रतिमा सापाच्‍या डोळ्‍यात छापली जाते आणि त्‍याआधारे दुसरा साप मारणार्‍याचा बदला घेतो असा भ्रम समाजात पसरवला गेला आहे. यात काहीही तथ्‍य किंवा वैज्ञानीक पुरावा नाही. सापला मारणार्‍याची प्रतिमा सापाच्‍या डोळ्‍यात छापली गेली असेल तर ती नष्‍ट व्‍हावी या हेतूने साप मारल्‍यावर त्‍याचे डोके ठेचावेही अंधश्रध्‍दा प्रचलीत झाली.

३१: नदीत नाणे फेकल्‍यास भाग्‍य उजळते.

वास्‍तव: पूर्वीच्‍या काळात नाणी तांब्‍याची बनलेली असत. तांब्‍याची नाणी पाण्‍यात टाकून ठेवली असता पाण्‍यातील हानीकारक जिवाणू नष्‍ट होतात. त्‍यामुळे नदीत नाणे फेकल्‍यास भाग्‍य उजळते ही अंधश्रध्‍दा वाढीस लागली.

३२: महत्‍वाच्‍या कामाला जातांना दही-साखर खाऊन घराबाहेर जावे.

वास्‍तव: दही खाल्‍ल्‍याने पोट थंड राहते. साखरेतील ग्‍लुकोजमुळे शरीराला उर्जा मिळून उत्‍साह वाढतो. शांत डोक्‍याने आणि उत्‍साहाने केलेले कोणतेही काम यशस्‍वी होते. म्‍हणून महत्‍वाच्‍या कामाला जातांना दही-साखर खाऊन घराबाहेर जावे असे म्‍हणतात.

३३: स्‍मशानातून आल्‍यावर आंघोळ न करणे अशुभ असते.

वास्‍तव: स्‍मशानातील वातावरण नकारात्‍मक आणि उदासवाणे असते. संसर्गजन्‍य रोगाने मृत्‍यू पावलेल्‍या मयत शरीरावरील किटाणूंचा फैलाव सर्वत्र झालेला असतो. यांमुळे मानसिक आणि शारीरिक स्‍वास्‍थ बिघडण्‍याचा संभव असतो. आंघोळ केल्‍यामुळे शरीर स्‍वच्‍छ होऊन मनालाही प्रसन्‍नता लाभते. त्‍यामुळे स्‍मशानातून आल्‍यावर आंघोळ न करणे अशुभ असते असे म्‍हणतात.

३४: सूर्य ग्रहण काळात बाहेर जाणे अशुभ असते.

वास्‍तव: सूर्य ग्रहण काळात अतिनील किरणे प्रभावी असतात. त्‍यांचा विपरीत परिणाम वातावरणात तसेच त्‍वचेवर होण्‍याचा संभव असतो. उघड्‍या डोळ्‍यांनी सूर्य ग्रहण पाहिले असता डोळ्‍यांवर वाईट परिणाम होतो. त्‍यामुळे सूर्य ग्रहण काळात बाहेर जाणे अशुभ असते असे म्‍हणतात. या काळात तयार केलेले अन्‍न, पाणी न वापरण्‍यामागे अतिनील किरणांचा प्रभाव टाळणे हेच कारण असते.

३५: मंदिरात गेल्‍यावर देवाला जागे करण्‍यासाठी घंटा वाजवावी.

वास्‍तव: घंटानादामुळे निर्माण झालेली सकारात्‍मक उर्जा शरीर आणि मनस्‍वास्‍थ्‍यासाठी उपकारक असते. त्‍यामुळे मंदिरात गेल्‍यावर देवाला जागे करण्‍यासाठी घंटा वाजवावी असे म्‍हणतात.

३६: घरात चप्‍पल/बूट उलटी ठेवल्‍यास लक्ष्‍मी येत नाही.

वास्‍तव: चप्‍पल किंवा बूट घालून आपण बाहेर जातो. बाहेरची अनेक प्रकारची घाण त्‍याला लागलेली असते. घरात चप्‍पल/बूट उलटा ठेवल्‍यास ती घाण दिसून येते व किळस वाटते. तसेच पूर्वीच्‍या काळात दिवे नव्‍हते. अंधारात उलटा ठेवलेल्‍या चप्‍पल/बूटला अडखळून पडण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. त्‍यामुळे घरात चप्‍पल/बूट उलटी ठेवल्‍यास लक्ष्‍मी येत नाही अशी अंधश्रध्‍दा प्रचलित झाली.

३७: ओली पुसणी घरात तशीच ठेऊ नयेत. घरात लक्ष्‍मी येत नाही.

वास्‍तव: ओली पुसणी घरात तशीच ठेवली तर त्‍यात बॅक्‍टेरीया वाढीस लागतात. हवेतून या बॅक्‍टेरीयांचा प्रसार होतो जो मानवी आरोग्‍यास हानीकारक असतात. त्‍यामुळे ओली पुसणी घरात तशीच न ठेवता उन्‍हात वाळत घालावीत.

३८: घरात किंवा बाहेर कुठेही थुंकू नये. दारिद्रय येते, यश, सन्मान मिळत नाही.

वास्‍तव: तोंडातील लाळ ही रोग जंतूंचा प्रसार करण्‍यास फार महत्‍वाची भूमिका असते. एखादा संसर्गजन्‍य विकार किंवा रोग झालेल्‍या व्‍यक्‍तीला घरात किंवा बाहेर कुठेही थुंकण्‍याची सवय असेल तर त्‍यामुळे त्‍याला असलेल्‍या रोगाचा प्रसार सर्वत्र होईल. यामुळे थुंकायचे असेल तर वॉश बेसिन वापरावे, इतरत्र थुंकू नये.

३९: खरकटी भांडी तशीच ठेऊ नये, घरात लक्ष्‍मी येत नाही.

वास्‍तव: खरकटे ताट किंवा भांडी तशीच ठेवल्‍यामुळे त्‍या भांड्‍यावर बॅक्‍टेरीया, बुरशी वाढीस लागते. झुरळ व तत्‍सम किटकांचा त्रास वाढतो. भांड्‍यावर डाग पडतात, अशी बॅक्‍टेरीया, बुरशी वाढीस लागलेली भांडी व्‍यवस्‍थित धुतली गेली नाही तर त्‍यांवरील बॅक्‍टेरीया, बुरशी पोटात जाऊन आरोग्‍यास हानी पाहोचते. त्‍यामुळे खरकटी भांडी तशीच ठेऊ नये. ती विसळूनच ठेवावी.

४०: घरात आलेल्‍या प्रत्‍येकाला पिण्‍यासाठी पाणी द्‍यावे. यामुळे घरावर दुष्प्रभाव पडत नाही आणि अचानक उद्भवणारे कष्ट आणि संकटापासून मुक्ती मिळते.

वास्‍तव: ही पध्‍दत मानवतावादी दृष्‍टीकोनातून सुरू झाली आहे. तसेच ही सन्मान करण्‍याची, आपुलकी दाखविण्‍याची एक पध्‍दत आहे. बाहेरून आलेली व्‍यक्‍ती, उन्‍हातून आलेली असते, दमलेली असते, शरीराचे तापमान वाढलेले असते. त्‍या व्यक्तीला प्‍यायला स्वच्छ पाणी दिल्‍यामुळे त्‍याच्‍या शरीराचे तापमान कमी होते. त्‍याला मानसिक शांती मिळते, उत्‍साह वाढतो. आपसातील संबध या जिव्‍हाळ्‍यामुळे दृढ होण्‍यास मदत मिळते. पूर्वी गुळ-पाणी देण्‍याची पध्‍दत होती. गुळामुळे शरीराला उर्जा मिळून शरीरातील आम्‍लाचे प्रमाण कमी होते.

४१: झाडांना पाणी दिल्‍यामुळे समस्यांना समोरे जाण्‍याचे सामर्थ्य प्राप्त होते.

वास्‍तव: झाडांची निगा राखली, त्‍यांची वाढ चांगली झाली म्‍हणजे ते वातावरणात ऑक्‍सिजन सोडतात. झाडांमुळे असणारे अनेक फायदे सर्व ज्ञात आहेत. काही संशोधनांनी सिध्‍द केले आहे की संगीताच्‍या सानिध्‍यात झाडांची वाढ उत्तम होते. मानव आणि निसर्गाचे संबंध दृढ व्‍हावे, झाडांची निगा राखण्‍याची सवय व्‍हावी म्‍हणून या प्रकारची रूढी तयार झाली.

४२: पादत्राणे नेहमी जागेवर ठेवावीत. त्‍यामुळे प्रतिष्ठा मिळते.

वास्‍तव: जे लोक बाहेरहून आल्यावर आपल्या चपला-जोडे आणि मोजे इकडे-तिकडे फेकून देतात, त्यांना ‍त्यांचे शत्रु त्रास देतात. यापासून बचावसाठी आपली पादत्राणे योग्य जागेवर व्यवस्थित ठेवली पाहिजेत असे सांगितले जाते. पादत्राणे आणि शत्रुचा काहीही संबंध नाही. योग्‍य ठिकाणी वस्‍तू ठेवण्‍याची सवय व्‍हावी हा आशय आहे. पादत्राणे योग्य जागेवर नसल्‍यास घाईच्‍या वेळी बाहेर जातांना ती न मिळाल्‍यास चिडचिड होईल. पादत्राणे इतरत्र पसरलेली असल्‍यास, पादत्राणांना लागलेली धुळ/घाण यामुळे आरोग्‍यास हानी पोहोचेल. इतरत्र पसरलेल्‍या पादत्राणांमुळे घरातील लहान मुले, वृध्‍द व्‍यक्‍ती अडखळून पडण्‍याची, त्‍यांना इजा होण्‍याची भिती असते. म्‍हणून या प्रकारची रूढी तयार झाली.

४३: झोपेतून उठल्‍यानंतर प्रथम बिछाना आवरावा. अन्‍यथा दारिद्रय येते.

वास्‍तव: जे लोक झोपेतून उठल्‍यानंतर बिछाना तसाच ठेवतात, त्याला व्यवस्थित आवरत नाही अशा लोकांचे ‍दैनिक जीवनही व्यवस्थित नसते. असे लोक स्‍वभावाने आळशी असतात. अव्‍यवस्‍थित बिछाना दिसायलाही वाईट दिसतो. निटनेटकेपणाने राहण्‍याची सवय व्‍हावी म्‍हणून या प्रकारची रूढी तयार झाली.

४४: पायांची स्वच्छता ठेऊन निगा राखावी. त्‍यामुळे मा‍नसिक शक्ती वाढते.

वास्‍तव: पाय हा शरीराचा पाया आहे तरीही अत्‍यंत दुर्लक्षीत अवयव आहे. पायाला इजा झालेली व्‍यक्‍ती नीट चालुही शकत नाही. मधुमेह झालेल्‍या व्‍यक्‍तीला पायाची विशेष निगा राखण्‍याचा सल्‍ला दिला जातो. शरीराचा पाया असलेल्‍या पायांचीच जर व्‍यवस्‍थित निगा राखली गेली नाही तर संपूर्ण शरीराला त्‍याचा त्रास जाणवल्‍याशिवाय राहणार नाही. त्‍यामुळे प्रत्‍येकाला आपल्या पायांच्या स्वच्छतेवर लक्ष द्यायला पाहिजे.

४५: कोणाच्‍याही घरी प्रथमच जातांना रिकाम्या हाताने झाऊ नये, लक्ष्मी रूसून निघून जाते.

वास्‍तव: या रूढीत लक्ष्‍मी रूसून निघून जाण्‍याचा काहीही संबंध नाही. दातृत्‍वाची सवय लागावी हा या मागचा मूळ उद्‍देश आहे. एकमेकांचा सन्‍मान करण्‍याची ही पध्‍दत आहे. यामुळे आपसातील संबंध जिव्‍हाळ्‍याचे आणि दृढ होतात. एकोपा वाढतो. दिवाळी किंवा विविध उत्‍सवात एकमेकांना फराळासाठी बोलविण्‍याच्‍या प्रथेचे कारणही हेच आहे.

४६: पानात अन्न सोडू नये, देव शाप देतो.

वास्‍तव: भारतीय पध्‍दतीत अन्‍नाला परब्रम्‍ह मानले जाते. अनेक गरीब लोकांची अन्‍नाची दैनंदिन गरज पूर्ण होत नाही. पानात अन्न सोडणे म्‍हणजे अन्‍नाची नासाडी करणे, अन्‍न देणार्‍याचा अपमान करणे असे मानले जाते. कोणत्‍याही गोष्‍टीचे नुकसान न करता काटकसरीने राहण्‍याची सवय लागावी या दृष्‍टीने पानात अन्न सोडू नये, देव शाप देतो असे म्‍हणण्‍याची प्रथा आहे.

४७: काही साप मणिधारी असतात. हा मणी चमकदार, मौल्यवान आणि चमत्कारी मणी असतो.

वास्‍तव: सापांशी संबंधित एका मान्यतेनुसार, काही सापांच्‍या डोक्यावर एक चमकदार, मौल्यवान आणि चमत्कारी मणी असतो. ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. जीवशास्‍त्रानुसार, जगभरात आतापर्यंत जेवढ्या प्रकारच्या सापांची माहिती उपलब्ध झाली आहे त्यामध्ये एकही साप मणिधारी नाही. ह्‍या अंधश्रध्‍देमुळे अनेक सापांचे बळी घेतले गेले आहेत. याच अंधश्रध्‍देमुळे अनेक नरबळी दिले गेले आहेत. परंतु आजपर्यंत असा मणी असल्‍याचा पुरावा जगात कधीही आणि कुठेही आढळला नाही.

४८: वाहनात, लिंबू, मिरची, बिब्बा एका टोकदार तारेत ओवून बांधून ठेवावा. अपघात, बाधा दृष्‍ट लागणे असे प्रकार होत नाहीत.

वास्‍तव: या प्रथेचा आणि अपघात, बाधा, दृष्‍ट यांचा काहीही संबध नाही. ज्या काळात स्‍वयंचलीत वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैल गाडीतून प्रवास करीत असत. दुरच्‍या प्रवासात बैलगाडीला लिंबू, मिरची, बिब्बा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. प्रत्येक घराच्या बाहेरही लिंबू, मिरची, बिब्बा टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणार्या वाटसरूना तो लगेच मिळेल. याचे कारण असे की, दुरचे अंतर चालत असताना माणसाला तहान लागल्यास आणि पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करता येते ज्यामुळे माणसाची तहान तात्पुरती शमावता येऊ शकते. त्या काळी साप, नाग यांचा वावर फार होता, म्हणून चालत जाताना एखाद्‍या व्‍यक्‍तीला साप चावल्यास त्या व्‍यक्‍तीला मिरची खायला देत. यावरून तो साप विषारी होता कि नाही ह्‍याची माहित मिळत असे. जर साप चावलेल्‍या व्‍यक्‍तीला मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता असा अंदाज बांधला जात असे.

बिब्बा हा उत्कृष्ट अँटीबायोटीक आहे. जखम झाल्यास, कापल्यास त्‍याजागी बिब्बा लावला जात असे. टोकदार तारेचा उपयोग पायात रूतलेला काटा काढण्यास उपयोगात येई. अशा प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर, घराच्या दर्शनी भागात लावला जात असे आणि याचा उपयोग प्रथमोपचारासाठी केला जात असे.

४९: शुभ कार्य करतांना कुंडली पाहून मुहूर्त काढावा. अशा मुहूर्तावर काम करणे शुभ असते. कार्य निर्विध्‍न पार पडते अन्‍यथा कार्यात विघ्‍न येते.

वास्‍तव: मुहूर्तावर अवलंबून काम करणे ही मोठी अंधश्रध्‍दा आहे. सर्वच दिवस आणि सर्वच वेळा शुभ आहेत.

स्‍वत:चे वर्चस्‍व कायम ठेवण्‍यासाठी आणि पोट भरण्‍यासाठी तथाकथीत कुंडली जाणकारांनी जाणूनबुजून सुरू केलेली ही अंधश्रध्‍दा आहे. कारण कुंडली फक्‍त याच तथाकथीत कुंडली जाणकारांना कळत असे. ज्‍याच्‍यासाठी शुभ कार्याचा मुहूर्त काढून दिला ती व्‍यक्‍ती शुभ कार्यात यांना जेवायला बोलवीत असे.

जर मुहूर्त पाहून केलेले कार्य निर्विध्‍न पार पडते हे खरे असते तर कुंडल्या पाहून मुहूर्तावर लग्‍न केलेल्‍या अनेक स्त्रीया विधवा आणि पुरूष विधूर झाले नसते. पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट झाले नसते. मुहूर्त काढून तिर्थ यात्रेवर गेलेल्‍या लोकांचे अपघात झाले नसते, अपघातात अकाली मृत्यू झाले नसते.

मुहूर्त पाहून निवडणुकीचा फॉर्म भरणार्‍या उमेद्वारांचा पराभव झाला नसता. मुहूर्त पाहून मंत्रीपदाची शपथ घेणार्‍याचे मंत्रीपद अल्प कालावधीत गेले नसते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. थोडक्‍यात, शुभमुहूर्त हे थोतांड आहे. ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

५०: वास्‍तु पिरॅमिड घरात लावल्‍यामुळे, ग्रहांचे खडे घातल्‍यामुळे भाग्‍य बदलते, भरभराट होते.

वास्‍तव: आधुनिक युगात वास्‍तु पिरॅमिड ही फार मोठी अंधश्रध्‍दा बनली आहे. दोन इंच बाय दोन इंचाचे, प्‍लॅस्‍टिकने बनलेले हे वास्‍तु पिरॅमिड उर्जा कशी साठवणार? काही लोकांच्‍या म्‍हणण्‍यानुसार या प्‍लॅस्‍टिकच्‍या पिरॅमिडच्‍या मागे असलेल्‍या तांब्‍याच्‍या पट्‍टीमुळे उर्जा साठवली जाते. दोन इंच बाय दोन इंचाच्‍या, प्‍लॅस्‍टिकने बनलेले वास्‍तु पिरॅमिडच्‍या मागे किती मोठी तांब्‍याची पट्‍टी असणार? त्‍या छोट्‍याशा तांब्‍याच्‍या पट्‍टीत किती उर्जा साठवली जाणार? त्‍यात उर्जा साठवली जाते हे वादासाठी मान्‍य केले तरी घराचे क्षेत्रफळ आणि ती साठवलेली उर्जा याचे गणितच जुळत नाही.

तीच गत ग्रहांच्‍या खड्‍यांची. हजारो-लाखो किलोमीटर दूर असणारा तथाकथित ग्रह, त्‍या छोट्‍या खड्‍यात काय आणि किती उर्जा देणार? आजच्‍या युगात मानव त्‍या ग्रहांवर जाऊन आला आहे. त्‍या ग्रहांवर मानवी वस्‍ती करण्‍याचा प्रयत्‍न यशस्‍वी होत आहे. आणि त्‍याच ग्रहांचे छोटे छोटे खडे भाग्‍य बदलणार? यातून आपण आपल्‍या भरभराटीसाठी काहीतरी उपाय केला आहे हे एक मानसिक समाधान मिळण्‍यापलिकडे विशेष काही फरक पडत नाही. वास्‍तु पिरॅमिड आणि ग्रहांचे खडे विकणार्‍यांची भरभराट होते हे मात्र खरे.

५१: सकाळी झोपेतून उठल्‍यानंतर स्‍वत:च्‍या दोन्ही तळ हाताचे दर्शन घ्यावे तळ हात बघावा, दिवसभरातील आपली सगळी कामे शुभ होतात.

वास्‍तव: वरील प्रथेनुसार तळ हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी विद्यादात्री सरस्वती व मूळभागात (मनगटाची बाजू) गोविंद म्हणजेच ब्रम्हाचा निवास असल्याने त्यांच्या दर्शनाने आपल्या प्रत्येक दिवसाचा प्रारंभ झाला पाहिजे. त्यामुळे चांगल्या फळाची अपेक्षापूर्ती होते. याचे शास्‍त्रीय कारण असे की, सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण जर लांब असलेली वस्तू पाहिली तर रात्रभर मिटलेल्‍या अवस्‍थेत असणार्‍या आपल्या नाजूक डोळ्याना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी सर्वात जवळची वस्‍तू ते आपले दोन्ही तळ हात बघावे. जर तळ हातात देवांचा वास असता तर त्‍यांनी कोणालाच त्‍या तळहातांनी वाईट कामे करण्‍याची प्रेरणा दिली नसती.

अंधश्रद्धा ही आधुनिक युगात समाजाला लागलेली कीड आहे. अंधश्रद्धेमुळे समाजाची अधोगती होत आहे. अनिष्ट रूढी, परंपरा, दैवधर्म, भूतपिशाचामध्ये समाज गुरफुटलेला आहे. विज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाने जगाचा कायापालट केला हे सत्य असले तरीसुद्धा समाज अंधश्रद्धेला बळी पडत आहे हे म्‍हणणे नाकारता येणार नाही.

देव कुणीही पाहिला नाही. ज्यांनी देवाचा साक्षात्कार झाल्याचा दावा केला त्यांना तो देव इतरांना दाखविता आला नाही. सर्वच धर्मांमध्ये देवाच्या नावाने थोतांड आहे. जोपर्यंत व्यक्तीपूजन संकल्पना अस्तित्वात असेल तोपर्यंत देवाचे अस्तित्व कायम राहील.

अनेक लोक देवदर्शनासाठी तासनतास लाईन लावतात. स्‍वत:सोबतच बरोबर असलेल्‍या लहान मुलाचेही हाल करतात. तोच देव त्‍यांच्‍या घरातल्या देवालयात सुध्‍दा असतो. घरात मनोभावे केलेली पुजा तो नाकारणार आहे का? घरातला देव वेगळा आणि मंदिरातला देव वेगळा हा फरक का ?

अनेकदा देवदर्शनाला जाताना किंवा देवदर्शन करून येतांना भाविकांचा अपघात झाल्‍याचे आपण वाचतो. तेव्‍हा निशिचतच प्रश्‍न पडतो की देव अशा अपघातातून त्‍यांना वाचवत का नाही. जेव्‍हा जेव्हा काही लोकांनी देवळे तोडली, देवमूर्त्या भग्न केल्या तेव्हा प्रश्‍न पडतो की सर्वशक्तीमान भगवंताने स्वत:चा बचाव का केला नाही ? अशी अनेक उदाहरणे देता येतील.

हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच की, लोकांच्‍या सांगण्‍यावर विश्‍वास ठेऊन आपण अंधश्रध्‍द बनत आहोत. कोणी काहीही सांगतो आणि आपण विश्‍वास ठेवतो.

आता आपण खोलात जाऊन विचार करायला हवा. चिकित्सक वृत्ती वाढवायला हवी.

सरासर विचार न करता, डोळे मिटून कोणावर विश्वास ठेवणे यालाच अंधश्रद्धा म्हणतात.

मानवी सामर्थ्य अमर्याद असून, त्याच्या कल्पनांना मर्यादा नाही, या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या त्याच्या बुद्धी, जिद्द आणि कार्यशक्तीलाही तोड नाही. अंधश्रद्धा ही सामाजिक कीड आहे ती नष्‍ट होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.


डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel