आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

जिरायत, बागायत जमिनी

 

जिरायत, बागायत जमिनी

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्‍ये जिरायत किंवा बागायत जमिनींची स्‍पष्‍ट व्‍याख्‍या नमुद नाही.

म.ज.म.अ. मध्‍ये कलम ९०(ब) मध्‍ये ʻजमिनीचा वर्गʼ ची उदाहरणे म्‍हणुन वरकस, कोरडवाहू, भाताची जमीन किंवा बागायत जमीन असे नमुद असुन या प्रकारांची व्‍याख्‍या नमुद नाही.

महाराष्‍ट्र जमीन महसूल (शेतजमिनीवरील जमीन महसुलाची आकारणी व जमाबंदी) नियम, १९७०, नियम १४(२) (क) आणि (इ) (दोन) मध्‍येही (१) कोरडवाहू (२) भाताची (३) बागायत आणि (४) वरकस असे वर्गीकरण नमुद असुन मुख्‍य पिकांचे उत्‍पन्‍न लक्षात घेऊन उत्तम, मध्‍यम व हलकी अशा उपवर्गामध्‍ये वर्गीकरण केलेले आहे तथापि, स्‍पष्‍ट व्‍याख्‍या नमुद नाही.

 त्‍यामुळे अन्‍य माध्‍यमे, कायदे, लेख येथुन संदर्भ घेऊन (१) कोरडवाहू (२) भाताची (३) बागायत आणि (४) वरकस जमिनींची व्‍याख्‍या खालीलप्रमाणे करता येईल.

(१) कोरडवाहू जमीन: या जमिनीला जिरायत जमीन असे सुद्धा म्हटले जाते.   

५० ते १०० सें.मी.च्या आसपास असणाऱ्या, अधिक निश्चित असलेल्या पर्जन्यमानावर अवलंबून ज्या जमिनीत पिके काढली जातात त्या जमिनीला कोरडवाहू किंवा जिरायत जमीन असे संबोधले जाते. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात या जमिनीत पिके घेतली जातात. जून ते ऑक्टोबर या हंगामात खरीप पीक तर नोव्हेंबर ते मार्च-एप्रिल या हंगामात रब्बी पिके घेतली जातात.

खरीप हंगामात प्रत्यक्ष पावसाच्या पाण्यावर तर रब्बी हंगामात जमिनीत जी ओल टिकून असते त्यावर पिके घेतली जातात. या जमिनीचा शेतसारा हा बागायती जमिनीपेक्षा कमी असतो तसेच या जमिनीवर रोजगार हमी उपकर व शिक्षण उपकर वसूल केला जात नाही.

 

(२) भाताची जमीन: भात पिकासाठी काळी, भारी आणि पाणी धरून ठेवणारी जमीन आवश्‍यक असते. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळले जाते. भाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण केली जाते. भात हे तृणधान्य म्हणजे एक प्रकारचे गवत आहे. पण भाताचे वैशिष्ठ्य असे आहे की तो दोनदा पेरावा लागतो.

प्रथम भात पेरण्यांसाठी जमीन नांगरून घेतात. त्यावर मजूरांकडून भाताची बियाणे फेकली जातात. काही दिवसांनी रोपे ६ इंचांपर्यंत वाढली की दुसरीकडे चौकोनी शेताच्या तुकड्यास समतळ करून चोहिकडे मातीचा बंधारा करून त्यात पाणी भरून ठेवतात आणि खुडलेली रोपे त्यात पुन्हा पेरतात. पावसाळ्यातच हे पिक येते त्यामुळे रोपांना पाणथळ जमीन मिळते. नाहीतर जलसिंचन करून शेत पाण्याने भरलेले ठेवावे लागते. सप्टेंबर- ऑक्टोबर दरम्‍यान साळी तांदूळाच्या लोंब्या किंवा कणीस तयार होतात. नंतर कापणी आणि मळणी यंत्राने पूर्ण रोप

काढून लोंब्या वेगळ्या करतात. मग साळीतून तांदूळ वेगळा काढण्यासाठी पाखडला जातो. त्याला हातसडीचे तांदूळ म्हणतात. हा तांदूळ मळकट किंवा लाल दिसतो. पांढरा शुभ्र तांदुळ मिळवण्यास त्याला यंत्रात पॉलीश केले जाते.

 (३) बागायत जमीन: पर्जन्यावर कमीतकमी अवलंबित्व व पाण्याची निश्चित उपलब्धता असणाऱ्या जमिनींना बागायत जमीन म्हटले जाते. या जमिनीला कॅनॉल, मोट, पाट इत्‍यादी जलस्‍त्रोताने शेतीसाठी पाणीपुरवठा होत असतो. या जमिनीत पाण्याच्या उपलब्धतेनुसार वर्षभर पिके घेतली जाऊ शकतात. यात सुद्धा हंगामी बागायती किंवा बारमाही बागायती असे दोन प्रकार आहेत.

हंगामी बागायती शेती : पाणीपुरवठा हा बागायती शेतीचा पाया असल्याने त्याचा स्रोतच जर हंगामी असेल तर हंगामी बागायती शेती पद्धतीचा अवलंब करावा लागतो. यात सामान्यतः खरीप आणि रब्बी या हंगामांत संरक्षित पाण्याच्या पाळ्या देऊन पिके घेतली जातात. खरीप हंगामातील पिके बहुतांश पावसाच्या पाण्यावर येतात आणि रब्बी हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध पाण्याचा संरक्षित म्हणून वापर करून पीक घेतले जाते.

बारमाही बागायती शेती : या प्रकारात पाणीपुरवठयाचास्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात.

बागायत जमिनींवर रोजगार हमी उपकर व शिक्षण उपकर वसूल केला जातो व तो शेतसाऱ्यासोबतच वसूल केला जातो.

बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहीर बागायत, धरणाखालील बागायत किंवा उपसा सिंचन बागायत असेही प्रकार करतात.

पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीवरून बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, फवारा सिंचन, तुषार सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार आहेत.

 महसूल कायद्‍यामध्‍ये, सात-बारा सदरी नमुद जिरायत क्षेत्राचे बागायत क्षेत्रात रूपांतर करण्‍याची पध्‍दत विहित केलेली नाही. त्‍यामुळे सात-बारा सदरी जरी जिरायत क्षेत्र नमुद असले आणि प्रत्‍यक्षात शेतजमिनीमध्‍ये पाण्‍याचा स्‍त्रोत उपलब्‍ध असेल आणि संबंधीत शेतकरी बागायत पीके घेत असेल तरी सात-बारा सदरी जिरायत क्षेत्राचे बागायत क्षेत्रात रूपांतर करता येत नाही. मुख्‍यत: भूसंपादन प्रकरणात यामुळे अडचण आणि वाद निर्माण होतात.

व्‍यवहारिकदृष्‍ट्‍या, जरी सात-बारा सदरी नमुद जिरायत क्षेत्र नमुद असले आणि प्रत्‍यक्षात अशा शेतजमिनीमध्‍ये पाण्‍याचा स्‍त्रोत उपलब्‍ध असेल आणि संबंधीत शेतकरी किमान दोन वर्ष सलगपणे बागायत पीके घेत असेल तर, शेतकर्‍याच्‍या अर्जावरून, जबाब, पंचनामा व अन्‍य पुरावे यांच्‍या आधारे आणि उपअधिक्षक, भूमी अभिलेख यांच्‍या सल्‍ल्‍याने, आदेशान्‍वये, अशा शेतजमिनीचे जिरायत क्षेत्र बागायत क्षेत्रात रूपांतरीत करण्‍याची तरतुद होणे आवश्‍यक आहे.

(४) वरकस जमीन: भात शेती लागवडीसाठी, राबखताच्या प्रयोजनार्थ उपयोगात आणली जाणारी जमीन म्‍हणजे वरकस जमीन. वरकस जमिनीची व्याख्या महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २०-अ मध्ये नमूद आहे.

=राब जमीन/ राब पद्धत:  महाराष्ट्रातील कोकण व मावळ भागात रोपे तयार करण्यासाठी प्रथम जमीन भाजण्याची पद्धत बऱ्याच वर्षापासून प्रचलित आहे व त्या पद्धतीला ‘राब भाजणे’असे म्हणतात. राब भाजण्यासाठी गुरांचे शेण व जंगलातील झाडांच्या फांद्या वापरतात. प्रथम शेणाचे बारीक पुंजके राबाच्या जागेवर पसरतात. शेण संपूर्ण वाळल्यावर त्यावर गवताचा थर देतात व वरून वाळलेला पालापाचोळा पसरतात. पालाचालोळ्याच्या थरावर थोडा शेणाचा काला पसरून वरून मातीचा पातळ थर देतात. मातीमुळे राब सावकाश जळण्यास मदत होते. वारा नसताना किंवा मंद असताना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने राब पेटवतात. तो सावकाश जळत राहतो त्यामुळे जमिनीखालील ५ ते ७ सेंमी. मातीचा थर संपूर्ण भाजून निघतो. त्यातील कीडरोगजंतू व तणांचे बी जळून नष्ट होते आणि जमीन सच्छिद्र झाल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. राबाच्या राखेचा खत म्हणून उपयोग होतो. राब पद्धतीचे वरील फायदे असलेतरी या पद्धतीत सेंद्रिय खत देणारे पदार्थ जळून जातात व जमिनीला त्यापासून सेंद्रिय खताचा पुरवठा होत नाही. संशोधन केंद्रावरील प्रयोगांवरून असे सिद्ध झाले आहे कीराब न भाजता केवळ खताचा वापर करून भाताची चांगली रोपे तयार करता येतात. मात्र अशा रीतीने तयार केलेल्या रोपांत तणांचा उपद्रव जास्त असतो. त्यासाठी तणनाशकांचा वापर करणे आवश्यक असते.

 अनेक तज्‍ज्ञांच्‍यामते, जिरायत आणि बागायत हे जमिनीचे प्रकार नसुन पीक घेण्याचे प्रकार आहेत. काही पिके अशी असतात की जी पावसाच्या पाण्यावर किंवा आपल्या भारतीय हवामानात म्हणजेच उन्हाळी पावसावर (आपल्याकडे पाऊस बहुतांशी उन्हाळ्यात पडतो त्याला मौसमी पाऊस म्हणतात) घेता येत नाहीत कारण त्या पिकांना हवामान थंड कोरडे व पाणी अत्यल्प लागते उदा. गहू, हरभरा, राई, करडी इत्यादी. ही पिके हिवाळ्यातच नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यातच घेता येतात.

 ´ शेतजमिनीचे अन्‍य प्रकार:

=वाडी जमीन: नारळ, पोफळी, झाडे लावण्यासाठी वापरण्यात येणारी जमीन.

= गाळपेर जमीन: नदी, नाले तलाव, सरोबर, जलाशय बांध, जलमार्ग, किंवा सर्व स्थिर आणि प्रवाही पाण्याच्या तळाशी स्थित असलेली जमीन, नैसर्गरीक प्रक्रियेमध्ये पाणी कमी झाल्यामुळे दिसू लागते आणि सामान्यतः कृषि उत्पादनास उपलब्ध होते अशी जमीन.

=मळई / जलोढ जमीन: नदी किनाऱ्यावरील गाळामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेली गाळाची वाढीव जमीन.

=धौत जमीन: नदी पात्रात घट झाल्यामुळे किंवा धुपीमुळे घट(कमी) झालेली जमीन.

 ´ शेतीचे अन्‍य प्रकार:

¨ दुर्जल शेती: वार्षिक ५० सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी अशा निश्चित पर्जन्यमानाच्या प्रदेशात केली जाणारी  शेती.

¨फळबाग शेती : विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असणारी, कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरडया हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल, तर केळीचे पीक उत्तम प्रकारेघेता येते. फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरूवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आंबा, चिकू, नारळ, सुपारी इत्यादी. परंतु संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते.फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

¨ कोरडवाहू फळबाग शेती: ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा उपलब्ध सिंचन सुविधा अत्यल्प आणि हंगामी स्वरूपाची आहे, अशा ठिकाणी बोर, डाळिंब, आवळा, सीताफळ इ. फळझाडांची लागवड करून कोरडवाहू फळबाग शेती केली जाते. पाण्याची अत्यल्प उपलब्धता असूनही कोरडवाहू फळबागा चांगले उत्पन्न मिळवून देतात.

¨ बागायत फळबाग शेती: सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता भरपूर असेल, तर केळी, पपई, चिकू, द्राक्षे, संत्री, मोसंबी यांसारख्या फळझाडांची लागवड फायदेशीर ठरते. या फळबागांसाठी वर्षभर पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास मोठया प्रमाणात आर्थिक फायदा होतो.

¨ भाजीपाल्याची शेती: भाजीपाल्याची शेती ही पूर्णपणे बागायती स्वरूपाची शेती आहे. निश्चित पर्जन्यमान, सिंचन सुविधेची उपलब्धता आणि चांगल्या बाजारपेठेची अनुकूलता असली म्हणजे या प्रकारात जमिनीचा आणि इतर साधनसामगीचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो. अशा प्रकारच्या शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने त्याची विकी व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे. जलद मालवाहतुकीची चांगली सोय असल्यास बाजारपेठ थोडी दूर असली तरी चालू शकते. मजुरांची उपलब्धता असणे हेही महत्त्वाचे आहे.

¨ फुलशेती : फुलशेती हा सुद्धा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूर्वीपासून फुलांचा मोठया प्रमाणावर वापर होणाऱ्या केंद्रांच्या आसपास केवळ लहान प्रमाणावर फुलशेती केली जात असे परंतु आता व्यापारी तत्त्वावर काहीशा मोठया प्रमाणात फुलशेतीचा अवलंब झालेला आहे. फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथापि आता फुलांच्या लांब अंतरावरील वाहतुकीसाठी वातानुकूलित वाहने मोठया प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे भारतात चांगल्या फुलबागांची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात हरितगृहाचा (पॉली हाऊस) वापर मुख्यत्वे फुलशेतीसाठी केलेला दिसून येतो. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्धतीने घेतले जाते.

¨ पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती : यापूर्वी उल्लेख केलेल्या पिकांपैकी कोणत्याही पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशांत किंवा परिस्थिती अनुकूल असूनही जर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्या बाबतीत तो प्रदेश पिकांच्या शेतीपेक्षा जास्त किफायतशीर होण्यासारखा असेल, तर तेथे पशुधन प्रधान शेतीप्रकार सुरू केलेला आढळतो. या व्यवसायासाठी जनावरांना चरण्यासाठी चराऊ राने व जनावरांना वैरण, चारा, धान्यादी खाद्य किफायतशीरपणे उत्पादन करता येण्यासारख्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या जमिनीची आवश्यकता असते.

याशिवाय पशुधनाच्या संवर्धनातील आणि दुग्धव्यवसायातील उत्पादने सुलभतेने व किफायतशीरपणे विकी करण्याची सोय त्या भागात असणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती या शेतीप्रकाराला पोषक असते. सामान्यतः अशाच प्रदेशात हा शेतीप्रकार आढळतो. मोठया शहरांचे सान्निध्य आणि वाहतुकीची चांगली सोय अत्यंत आवश्यक आहे.

जेथे अत्यंत विशेषीकृत पशुधन प्रधान अशी शेती केली जाते, तेथे दाणावैरण, आद्य पशुधन इ. गोष्टी विकत घेतल्या जातात आणि संवर्धित पशुधन आणि दुग्धोत्पादन हे विकले जाते. ज्या शेती प्रकारामध्ये जनावरांसाठी खाद्य म्हणून वनस्पतीचे उत्पादन त्या शेतीवरच करण्यात येते असा दाणा-वैरण व पशुधन प्रधान शेतीप्रकार बऱ्याच ठिकाणी आढळून येतो.

¨ मिश्रशेती : ‘पिके आणि पशुधनासह शेती ’ असेही या प्रकाराला संबोधण्यात येते. रोख विक्री करून द्रव्यार्जन करण्यासाठी पिके घेतली जातात आणि पशुधन संवर्धनही करतात. पशुधन संवर्धन शेतीपासून पशुधनाची त्याचप्रमाणे पशुधनापासून मिळणाऱ्या दुग्धादी उत्पादनाची विक्री करता येते. त्यामुळे शेतमाल आणि पशुधन ही दोन्ही उत्पादने महत्त्वाची आणि एकमेकांना पूरक असतात.या प्रकारच्या शेती मध्ये लावलेल्या पिकांचा शेतीवरील जनावरांना दाणा वैरण म्हणून उपयोग होतो.पिकांना जनावरांच्या मलमूत्रापासून उपयुक्त खत मिळून उत्पन्न चांगले येते. शेतकऱ्याला आपल्याजवळच्या साधनसामगीचा पूर्णपणे उपयोग करण्याची संधी मिळते. या शेतीच्या उत्पादनात बरीच शाश्वती असते आणि जोखीम कमी असते. काही मिश्रशेतींत पिकांच्या शेतीला प्राधान्य असते. काहींत पिके व पशुधन यांमध्ये भांडवल सारख्या प्रमाणात गुंतविलेले असते, तर काहींमध्ये पशुधनाला पिकांपेक्षा जास्त प्राधान्य दिलेले असते. हा शेतीप्रकार जगातील अनेक देशांत आणि विशेषतः भारतात रूढ आहे. या शेतीप्रकाराचे यांत्रिकीकरणही प्रचारात येऊ लागले आहे.

¨ मत्स्य शेती : हा शेतीप्रकार अलीकडच्या काळात चांगलाच रूढ होऊ लागला आहे. मत्स्य शेती करण्यासाठी शेतातील माती खोदून, मोठया आकाराची तळी तयार करून त्यांत पाणी सोडतात. या तळ्यात मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोडया पाण्यात वाढणाऱ्या माशांच्या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते. बागायती क्षेत्रात पाण्याच्या अती वापरामुळे पाणथळ आणि क्षारपड झालेल्या जमिनीत इतर पिके घेणे फायदेशीर होत नाही, अशा वेळी मत्स्य शेती फायदयाची ठरते. माशांच्या प्रमाणेच गोडया पाण्याच्या तळ्यात कोळंबीचे उत्पादन सुद्धा काही ठिकाणी घेतले जाते.

¨ सेंद्रिय शेती : पिकांची अन्नद्रव्यांची गरज जमिनीतून भागविली जाते. वापरल्या गेलेल्या अन्नद्रव्यांचे मातीत पुनर्भरण करणे त्यामुळे गरजेचे आहे. उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना अन्नद्रव्यांचा वापरही मोठया प्रमाणात होतो. पालापाचोळा जमिनीत कुजवून ताग किंवा धैंचा यांसारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून, शेणखत आणि कंपोस्ट खतांचा वापर करून, तसेच इतर सर्व प्रकारचे वनस्पतिजन्य सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून आणि कुजवून वापरलेल्या अन्नद्रव्यांचे पुनर्भरण करतात. अशा प्रकारे अन्नद्रव्यांनी समृद्ध केलेल्या जमिनीत जेव्हा पिके घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्धती असे संबोधण्यात येते. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या धान्याची प्रत उच्चदर्जाची असते. सर्व प्रकारच्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर सेंद्रिय शेतीत कटाक्षाने टाळणे ही मुख्य गरज आहे. रोग व कीड नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य रोगनाशके व कीटकनाशके वापरूनही गरज भागविता येते.

¨ रासायनिक शेती : फक्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करून मोठया प्रमाणात उत्पादन वाढीला मर्यादा येतात. कारण मातीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता हाच प्रमुख अडसर आहे. यावर मात करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करून अन्नद्रव्ये सहजपणे उपलब्ध करून दिली जातात आणि उत्पादन वाढविले जाते. याचबरोबर रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके आणि रोगनाशके वापरली जातात. अशा प्रकारच्या रासायनिक शेती पद्धतीत काही काळ उत्पादन वाढलेले दिसते परंतु उत्पादित धान्याची गुणवत्ता कमी झालेली दिसून येते. याशिवाय धान्यामधून मानवाच्या शरीरात जाणारी रासायनिक द्रव्ये शरीरावर घातक परिणाम करतात.

¨ हरितगृहातील शेती : कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादींसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर केला जातो. हरितगृहांतील शेती हा अगदी अलीकडच्या काळातील अतिशय विशेषीकृत शेतीप्रकार आहे. हरितगृह उभारणीसाठी लोखंडी पाइपचा सांगाडा आणि प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केला जातो. हरितगृहाचे अनियंत्रित, अंशत: नियंत्रित आणि पूर्ण नियंत्रित असे तीन प्रकार आहेत. जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलशेतीसाठी हरितगृहांचा वापर मोठया प्रमाणात होतो.

¨ रोपवाटिका शेती : रोपवाटिका ही फळबाग शेती, फुलशेती, भाजीपाला शेती या प्रकारच्या शेतीसाठी पूर्वतयारी म्हणून गरजेची आहे. ही गरजलक्षात घेऊन काही प्रगतिशील शेतकरी फक्त रोपवाटिकेचीच शेती करतात. जमिनीची उत्तम मशागत आणि भरपूर खतांचा वापर करून तयार केलेल्या शेतातविशेष काळजी घेऊन वेगवेगळ्या फळझाडांची व फुलझाडांची कलमे आणि रोपे तसेच काही प्रकारच्या भाजीपाल्यांची रोपे रोपवाटिकेत तयार केली जातात. त्यांची विक्री गरजू शेतकऱ्यांना करून चांगला आर्थिक फायदा होत असल्याने रोपवाटिकांचा प्रसार झपाटयाने झालेला आहे.

¨ फिरती शेती : या पद्धतीनुसार जंगलाचा काही भाग झाडे तोडून वजाळून साफ करतात. या जमिनीवर मिश्र पिक पद्धतीने किंवा स्वतंत्रपणे वेगवेगळी पिके घेण्यात येतात. दोन किंवा तीन वर्षे शेती केल्यावर जमिनीचा कसकमी झाल्यामुळे उत्पादन घटते, म्हणून ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेती करण्यात येते. उष्ण कटिबंधातील जास्त पावसाच्या प्रदेशांत अशा प्रकारची शेती रूढ आहे. या शेतीला देशपरत्वे निरनिराळी नावे आहेत.

भारतात शेतीची ही पद्धत विशेषे करून ईशान्य भागातील आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश आणि मिझोराम तसेच ओरिसा व आंध प्रदेश इत्यादींमध्ये विस्तृत प्रमाणावर आढळून येते. भारतातही अशा प्रकारच्या शेतीला निरनिराळी नावे आहेत.

¨ वनशेती : डोंगराळ प्रदेशांत जमिनी उथळ आणि हलक्या असतात. इतर पिकांची शेती अशा जमिनीत किफायतशीर होत नाही. पावसाची अनिश्चितता असेल तर वनशेतीला पर्याय रहात नाही. लहानलहान खड्डे किंवा चर काढून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपे किंवा बिया लावून वनशेती केली जाते.डोंगर उतारावर वन शेतीची लागवड सरकारी यंत्रणेमार्फत मोठया प्रमाणात करण्यात येते. झाडे मोठी झाल्यानंतर त्यांचा वापर इमारती लाकूडकिंवा जळाऊ लाकूड म्हणून होतो. पर्यावरण संतुलनांत वनशेती महत्त्वाची आहे.

शेती व्यवसाय उदयोग म्हणून करताना शेतीच्या वरील विविध पद्धतीचा वापर केला जातो. छंद म्हणून शेती करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता त्यांची नोंद घेणेसुद्धा आवश्यक आहे. शेतीचा छंद जोपासणारे लोक परसबागेत किंवा घराच्या गच्चीवर शेती करतात. परसबागेतील किंवा गच्चीवरील शेतीत सामान्यतः भाजीपाला आणि फुले यांचे घरगुती प्रमाणावर किंवा लहान प्रमाणावर उत्पादन घेता येते. गच्चीवरील शेती करताना तर अलीकडे मातीविना शेती ही पद्धतसुद्धा विकसित झालेली आहे. यात मातीऐवजी वजनाने हलके असलेले परंतु वनस्पतींना वाढीसाठी पोषक वातावरण देणारे ‘ रॉक वुल ’ वापरून त्यात भाजीपाला, फुलझाडे, शोभेची झाडे इ. लावली जातात. छंद जोपासण्याबरोबरच घरगुती गरजा भागविण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे.

¨ सहकारी शेती : या पद्धतीत शेतीची सर्वच्या सर्व किंवा काही कामे ही अनेक शेतकरी एकत्र येऊन स्वेच्छेने सहकारी पद्धतीने करतात. प्रत्येक शेतकऱ्याचा आपल्या शेतीवरचा हक्क कायम असतो. पण लागवडीच्या कामासाठी एकच परिमाण म्हणून अनेक शेतकऱ्यांची जमीन एकत्र जोडली जाते. सहकारी शेतीचे अधिक चांगले असे संयुक्त शेती, सामूहिक शेती इ. प्रकार आहेत. मोठया प्रमाणावर लागवड करण्याचे कित्येक फायदे या सहकारी शेती पद्धतीत आहेत परंतु वैयक्तिक उत्तेजनाचा अभाव यासारखे काही तोटेही या पद्धतीत आहेत. [→ सहकारी शेती].

¨ सामुदायिक शेती : या पद्धतीत ‘ समूह सदस्य ’ आपली स्वतःची बहुतेक जमीन आणि इतर साधनसामगी सोसायटीच्या स्वाधीन करतात. हे सदस्य एका ‘ सर्वसाधारण व्यवस्थापक मंडळा ’च्या नियंत्रणाखाली एकत्रितपणे काम करतात. कामाचा दिवस हे परिमाण धरून सदस्यांना मोबदला दिला जातो. सदस्यांच्या मुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे समूहाला मिळणारा हंगाम आणि सदस्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून मिळणारा दुय्यम स्वरूपाच्या उत्पन्नाचा लहानसा भाग ही होय. या प्रकारची शेती पद्धती रशियात आणि चीनमध्ये थोड्याफार फरकाने रूढ आहे.

 

=

 

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel