आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करता येईल काय?

नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करता येईल काय?

एखाद्‍या व्‍यक्‍तीची अंतिम इच्‍छा अंमलात आणण्‍याचे मृत्युपत्र हे एक कायदेशीर साधन आहे. भारतीय नोंदणी कायदा १९०८, कलम १८ (ई) अन्‍वये, मृत्युपत्राची नोंदणी करणे अनिवार्य नसून ऐच्‍छीक आहे. तथापि, भविष्‍यातील वाद टाळता यावे या दृष्‍टीने मृत्युपत्र नोंदणीकृत करण्‍याचा सल्‍ला दिला जाताो.

परंतु, मृत्युपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या हयातीनंतर नोंदणीकृत मृत्युपत्र रद्‍द करता येत नाही असे नाही. कायद्याच्या न्यायालयासमोर, नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत मृत्युपत्राला आव्हान दिले जाऊ शकते.

मृत्युपत्र करणार्‍याच्‍या हयातीनंतर, नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत मृत्युपत्राला खालील कायदेशीर मुद्‍द्‍यांवर सक्षम न्‍यायालयात आव्‍हान दिले जाऊ शकते.


१) बळजबरी ( Coercion) :

मृत्युपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीवर, मृत्युपत्र करतांना, त्‍याच्‍या इच्छेविरुद्ध अनुचित पध्‍दतीने बळजबरी करून आणि मृत्युपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या स्वतंत्र इच्‍छेचा किंवा परिणामांचा पुरेसा विचार करू न देता त्‍याला मृत्युपत्र करण्‍यास भाग पाडण्‍यात आले.

उदा. मृत्युपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीला, मृत्युपत्र एखाद्‍या विशिष्‍ठ व्‍यक्‍तीच्‍या नावे करण्‍यासाठी जिवे मारण्‍याची धमकी देणे, मृत्युपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या मुलाने किंवा मुलीने अथवा अन्‍य नातेवाईकाने, जर मृत्युपत्र अमूक व्‍यक्‍तीच्‍या नावे केले नाही तर मी आत्‍महत्‍या करीन किंवा अमूक व्‍यक्‍तीला मारून टाकीन अशी धमकी देणे इत्‍यादी.

मृत्युपत्र करणारी व्‍यक्‍ती, मृत्युपत्र करतांना दहशतीखाली होती ही बाब जर न्‍यायालयात पुराव्‍यांसह सिध्‍द करण्‍यात आली तर न्‍यायालय संबंधीत मृत्युपत्र रद्‍द करू शकेल.


२) फसवणूक ( Fraud) :

एखाद्या अन्‍य दस्‍तऐवजावर स्‍वाक्षरी घेत आहे असे भासवून मृत्युपत्रावर स्‍वाक्षरी/अंगठा घेणे. उक्‍त बाब जर न्‍यायालयात पुराव्‍यांसह सिध्‍द करण्‍यात आली तर न्‍यायालय संबंधीत मृत्युपत्र रद्‍द करू शकेल

३) अनुचित प्रभाव ( Undue Influence) :

मृत्युपत्र करणारी व्‍यक्‍ती मद्‍य, अमली पदार्थ किंवा एखाद्‍या औषधाच्‍या प्रभावामुळे पूर्णपणे शुध्‍दीवर नसतांना त्‍याच्‍याकडून त्‍याच्‍या मिळकतीबाबत मृत्युपत्र करून घेतले असेल असे मृत्युपत्र अवैध ठरेल. उक्‍त बाब जर न्‍यायालयात पुराव्‍यांसह सिध्‍द करण्‍यात आली तर न्‍यायालय संबंधीत मृत्युपत्र रद्‍द करू शकेल


४) समज नसणे ( lack of understanding) :

ज्‍याला आपण काय करत आहे आणि याचे परिणाम काय हेणार आहेत या गोष्‍टींची समज नाही अशा व्‍यक्‍तीकडून त्‍याच्‍या मिळकतीबाबत मृत्युपत्र करून घेणे. उदा. मतीमंद व्यक्ती, वेडाच्‍या प्रभावाखाली असलेली किंवा वेडेपणाचा झटका आलेली वेडसर व्‍यक्‍ती अथवा आजारपणामुळे ग्‍लानीत असलेली व्‍यक्‍ती किंवा अतिवृध्‍दपणामुळे समज नसलेली/बुद्‍धीभ्रष्‍ट झालेली व्‍यक्‍ती. अशा व्यक्तींनी केलेले किंवा अशा व्‍यक्‍तींकडून करून घेतलेले मृत्युपत्र अवैध ठरते. उक्‍त बाब जर न्‍यायालयात पुराव्‍यांसह सिध्‍द करण्‍यात आली तर न्‍यायालय संबंधीत मृत्युपत्र रद्‍द करू शकेल.


५) योग्य अंमलबजावणीचा अभाव ( Lack of proper execution):

मृत्यूपत्रावर, मृत्युपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीची स्‍वाक्षरी, अंगठा नसणे तसेच मृत्युपत्रकर्त्याने आमच्‍यासमोर मृत्युपत्रावर स्‍वाक्षरी केली आहे असे सिध्‍द करणेर्‍या दोन साक्षीदारांची स्वाक्षरी मृत्युपत्रावर नसणे याबाबी मृत्युपत्र बेकायदेशीर ठरण्‍यात कारणीभूत होऊन न्‍यायालय असे मृत्युपत्र रद्‍द करू शकेल.

६) क्षमतेचा अभाव ( Lack of testamentary capacity) :

कायद्‍यान्‍वये, अज्ञान (वय वर्षे १८ पेक्षा कमी) व्यक्तीला स्‍वत:च्‍या मिळकतीचे मृत्युपत्र करता येत नाही तसेच जी मिळकत स्‍व-मालकीची नाही त्‍या मिळकतीचे मृत्युपत्र करता येत नाही. कलम १५२ अन्‍वये,

मृत्युपत्र करणारी व्‍यक्‍ती अज्ञान होती किंवा मृत्युपत्रात नमूद मिळकत मृत्युपत्र करणार्‍या व्यक्तीच्‍या मालकीची नव्‍हती या बाबी जर न्‍यायालयात पुराव्‍यांसह सिध्‍द करण्‍यात आल्‍या तर न्‍यायालय संबंधीत मृत्युपत्र रद्‍द करू शकेल.


७) निरस्तीकरण ( Revocation) :

भारतीय वारसा कायदा १९२५, कलम- ६२ अन्वये मृत्युपत्र करणारी व्‍यक्‍ती, त्‍याने केलेले मृत्युपत्र रद्‍द करु शकते किंवा त्‍यात कितीही वेळा बदल किंवा दुरुस्‍ती करू शकते. एखाद्‍या व्‍यक्‍तीने आधी केलेले मृत्‍युपत्र लेखी दस्‍तऐवजाद्‍वारे रद्‍द केले असेल, आणि आधी केलेले मृत्‍युपत्राच्‍या आधारे कोणी दावा करीत असेल तर आधी केलेले मृत्‍युपत्र लेखी दस्‍तऐवज पुरावा म्‍हणून सादर केल्‍यास न्‍यायालय संबंधीत मृत्युपत्र रद्‍द करू शकेल.

८) गर्भस्‍थ शिशू ( child in womb) :

हिंदू डिस्‍पोझिशन्‍स ऑफ प्रॉपर्टी ऍक्‍ट, १९१६ च्‍या तरतुदी अस्‍तित्‍वात असल्‍याने गर्भस्‍थ शिशुच्‍या नावे मृत्‍युपत्र करता येते. तथापि, असे गर्भस्‍थ शिशु जीवंत जन्‍मले नाही तर न्‍यायालय संबंधीत मृत्युपत्र रद्‍द करू शकेल.

 = 


Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel