आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

रजा आणि सुट्‍टी नियम

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

रजा आणि सुट्‍टी नियम (महत्‍वाच्‍या तरतुदी)

महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१

 शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना राज्‍य शासनाने राजपत्रातील अधिसुचनेद्‍वारा जाहीर केलेल्‍या सण व इतर सुट्‍ट्‍या वगळून प्रतीवर्ष महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्‍वये खाते प्रमुखाकडे अर्ज देऊन, तो मान्‍य झाल्‍यावर रजा उपभोगता येते.

 F सुट्‍टी: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२३) अन्‍वये,

(१) परक्राम्‍य संलेख अधिनियम १८८१, कलम २५ अन्‍वये विहीत केलेली अथवा अधिसूचित केलेली सुट्‍टी.

(२) शासनाने राजपत्रातील अधिसूचनेव्‍दारा, शासकीय कार्यालय कामापुरते बंद ठेवण्‍याचा दिलेला आदेश याला सुट्‍टी असे संबोधण्‍यात येते.

 F रजा: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२८) अन्‍वये, सक्षम प्राधिकार्‍याने कामावर अनुपस्‍थित राहण्‍यास दिलेली परवानगी म्‍हणजे रजा.

 F रजेचा हक्‍क: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १० अन्‍वये,

(१) सक्षम प्राधिकार्‍याने कामावर अनुपस्‍थित राहण्‍यास दिलेली परवानगी म्‍हणजे रजा.

(२) हक्‍क म्‍हणून रजा मागता येत नाही.

(३) लोकसेवेच्‍या निकडीमुळे, रजा मंजूर करण्‍यास सक्षम अधिकारी, कोणत्‍याही प्रकारची रजा नाकारू शकतो किंवा रद्‍द करू शकतो.

(४) शासकीय कर्मचार्‍यास लेखी विनंती खेरीज, देय असलेल्‍या आणि मागितलेल्‍या रजेचा प्रकार बदलता येणार नाही.   

 F अखंडीत रजेची कमाल मर्यादा: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १६ अन्‍वये, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सतत पाच वर्षाहून अधिक कालावधी करीता कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही. रजेच्‍या कालावधीत सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगी शिवाय दुसरी नोकरी किंवा व्‍यवसाय करता येत नाही.

 F वैद्‍यकीय रजा: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, नियम ४० अन्‍वये राजपत्रित अधिकार्‍यांना शासकीय वैद्‍यकीय अधिकार्‍याच्‍या वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे वैद्‍यकीय कारणास्‍तव रजा मंजूर करता येते. अराजपत्रित अधिकारी/कर्मर्‍यांना नोंदणीकृत वैद्‍यकीय व्‍यवसायीच्‍या वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे वैद्‍यकीय कारणास्‍तव रजा मंजूर करता येते. नियम ४७ अन्‍वये वैद्‍यकीय रजा संपल्‍यानंतर स्‍वास्‍थ प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.

F महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, नियम २७ व २९, परिशिष्‍ठ-१, अ.क्र. ५ अन्‍वये अराजपत्रित कर्मचार्‍यांच्‍या विशेष विकलांगता रजा आणि अध्‍ययन रजा या व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारच्‍या रजा मंजूर करण्‍याचे अधिकार नियुक्‍ती प्राधिकार्‍यांना आहेत.

 उपजिल्‍हाधिकारी, उपजिल्‍हाधिकारी (निवड श्रेणी), तहसिलदार, नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्‍यांना विशेष विकलांगता रजा आणि अध्‍ययन रजा या व्‍यतिरिक्‍त, १८० दिवसांपेक्षा जास्‍त कालावधीच्‍या रजा (सतत पाच वर्षे कमाल मर्यादेस आधिन राहून) मंजूर करण्‍याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्‍तांना प्रदान करण्‍यात आले आहेत.

 F विना परवाना रजा: विना परवाना रजेवर जाणारा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरेल तसेच रजा संपल्‍यानंतर स्‍वेच्‍छेने गैरहजर राहणारा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरेल. (नियम ४८)

 F शासनाच्‍या एका सेवेचा राजीनामा देऊन दुसर्‍या शासकीय सेवेत रूजु झाल्‍यास, राजीनाम्‍याच्‍या दिवशी शिल्‍लक असलेली रजा नवीन सेवेत हिशोबात घेण्‍यात येते. (नियम २२)

 

F रजा वेतन: रजेवर जाण्‍याच्‍या दिवशी ज्‍या दराने वेतन मिळत होते त्‍याच दराने रजावेतन मिळते. रजा काळात वेतन वाढ मिळते परंतु त्‍याचा प्रत्‍यक्ष लाभ रजा संपवून हजर झाल्‍यावर मिळतो.   

 

रजेचे नाव आणि नियम

किती दिवस

शेरा

अर्जित रजा (पूर्ण पगारी)

(Earned Leave) (नियम ५०)

३०० दिवस

(एका वेळी सलग १८० दिवस)

¨ प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी प्रत्‍येकी १५ दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्‍त्‍यात अर्जित रजा आगाऊ जमा होते. 

¨ एकूण कामाचे दिवस गुणीले १/११= येणारे दिवस.

(३०० दिवसापर्यंत रजा खात्‍यात जमा करुन ठेवता येते.)

अर्ध वेतनी रजा (Half pay Leave) (नियम ६०)

सेवेच्‍या पूर्ण केलेल्‍या प्रत्‍येक वर्षासाठी २० दिवस

¨ प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी, प्रत्‍येकी १० दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्‍त्‍यात आगाऊ जमा होते. यात निलंबन काळ धरू नये.

¨ ही रजा कोणत्‍याही कारणासाठी घेता येते. याच्‍या साठवणुकीवर मर्यादा नाही.

¨ याकाळात ५०% दराने वेतन मिळते.

परिवर्तीत रजा (Commuted Leave) (नियम ६१)

देय असलेल्‍या अर्ध वेतनी रजेच्‍या निम्‍मे दिवस

¨ देय अर्धपगारी रजा दुप्‍पट खर्ची टाकुन परिवर्तीत रजा मिळते. कमाल ९० दिवस. (एकूण उपभोगलेली रजा ही अर्ध वेतनी रजेच्‍या दुप्‍पट दिवस खर्ची पडेल)

¨ कर्मचारी कामावर परत न आल्‍यास या रजेचे रूपांतर अर्धवेतनी रजेत करून अतिप्रदानाची रक्‍कम वसूल करण्‍यात येते.

अनिर्जित रजा (Leave not due) (नियम ६२)

अर्जित रजा, अर्धवेतनी रजा शिल्‍लक नसल्‍यास ही रजा मंजूर करण्‍यात येते. वैद्‍यकीय प्रमाणपत्र असल्‍यास, जेवढी अर्ध वेतनी रजा अर्जित होण्‍याची शक्‍यता असेल तितके दिवस

¨ एकूण सेवेत कमाल ३६० दिवस.

एका वेळेस ९० दिवस.

¨ संपूर्ण सेवा काळात कमाल १८० दिवस.

¨ अर्धवेतनी रजेतून ही रजा कपात करण्‍यास येते.

¨ ही रजा कायम कर्मचार्‍यांसाठीच अनुज्ञेय.

असाधारण रजा  

(Extraordinary Leave)

(नियम ६३)

¨ तीन वर्ष  सतत सेवा पूर्ण –

६ महिने.

¨ पाच वर्ष सतत सेवा पूर्ण – १२ महिने.

¨ जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांच्‍या प्रमाणपत्रावर मानसिक आजार, कर्करोग ई. साठी – १८ महिने.

¨ रजा खात्‍यावर कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तर किंवा विनंती वरुन. ¨ वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक.

अस्‍थाई कर्मचारी:-

¨ वैद्‍यकीय प्रमाणपत्राशिवाय- ३ महिन्‍यापर्यंत

¨ एक वर्षाच्‍या सेवेनंतर-वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे- ६ महिन्‍यापर्यंत

¨ पाच वर्षाच्‍या सेवेनंतर-वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे- १२ महिन्‍यापर्यंत

परिविक्षाधीन कर्मचार्‍यास रजा (Leave on Probation)

(नियम ६४)

                 --

अनुज्ञेय रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.

त्‍यापेक्षा जास्‍त रजा घेतल्‍यास परिविक्षाधिन काळात वाढ केली जाईल.

निवृत्तीपूर्व रजा

(Leave to Preparatory to Retirement) (नियम ६६)

सलग १८० दिवस किंवा एकूण सेवा कालात कमाल २४ महिने.

नियत सेवा निवृत्तीच्‍या तारखेपलिकडे जाणार नाही ही दक्षता घेऊन १८० दिवस.

प्रसूती रजा

(Maternity Leave)

(नियम ७४)

 १८० दिवस पगारी रजा

¨ शासकीय सेवेत असणार्‍या महिला कर्मचार्‍यास, (नव्‍याने रूजु झालेल्‍यांसह) दोनपेक्षा कमी मुले हयात असतील तर अर्जाच्‍या तारखेपासून २६ आठवडे.

¨ किमान सेवेची अट रद्‍द करण्‍यात आली आहे.

गर्भपात रजा (Abortion leave) (नियम ७४(५)

वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक.

सहा आठवड्‍यापेक्षा जास्‍त होणार नाही इतकी रजा.

विशेष रजा

(Special leave) (Surrogacy)

 

सरोगसी पध्‍दतीने जन्‍मलेल्‍या आपत्त्‍याचे संगोपन करण्‍यासाठी महिला कर्मचार्‍यास आपत्त्‍याच्‍या जन्‍म दिनांकापासून - १८० दिवस

 ¨ संपूर्ण सेवा कालात एकदाच अनुज्ञेय आहे.

¨ अशा महिला कर्मचार्‍यास आपत्‍य नसावे तसेच तिने मुल दत्तक घेतलेले नसावे.

अपघाती/विशेष विकलांगता रजा

(Special Disability leave for Accidental Injury)

(नियम ७५ व ७६)

¨ पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अनुज्ञेय        

¨ अपघाती रजा २४ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.

¨ विशेष विकलांगता रजा १२० दिवसांपेक्षा अधिक नाही, इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.

रुग्‍णालयीन रजा

(Hospital Leave) (नियम ७७)

पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अनुज्ञेय        

२८ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.

क्षय रोग/कर्क रोग/कुष्‍ठ रोग/ पक्षघात/एड्‌स रजा (T.B./Cancer/Leprosy/ Paralysis/Aids Leave)

(नियम ७९)

रोजंदारी व अंशकालीय कर्मचारी वगळून

तीन वर्ष सेवेनंतर सवलती अनुज्ञेय

१२ ते २४ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

पिसाळलेला कुत्रा अथवा तत्‍सम जनावराने चावा घेतल्‍यास.

२१ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

स्‍वत: नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास

६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

एकदा केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास

६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास

कर्मचार्‍यास ४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीच्‍या बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास

कर्मचार्‍यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.

(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

स्‍त्री कर्मचार्‍याने बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास

स्‍त्री कर्मचार्‍यास १४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.

(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

बाल संगोपन रजा

(Special Leave) (Child care)

महिला कर्मचारी, पत्‍नी नसलेले पुरूष कर्मचारी यांच्‍यासाठी

¨ १८ वर्षेपेक्षा कमी वयाच्‍या ज्‍येष्‍ठ मुलाच्‍या संगोपनासाठी,

¨ कमाल १८० दिवस

(एका वर्षामध्‍ये दोन महिन्‍याच्‍या कमाल मर्यादेत)

¨ शासकीय सेवेत एक वर्ष पूर्ण झाल्‍यावर अनुज्ञेय

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

कर्मचार्‍याने स्‍वेच्‍छेने विनामूल्‍य रक्‍तदान केल्‍यास

कर्मचार्‍यास १ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (एका वर्षात कमाल १० दिवस)

(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

राष्‍ट्रीय क्रिडा स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी

कॅलेंडर वर्षात ३० दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.

(क्रिडा अधिकार्‍याचा दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर किंवा अन्‍य वेळी केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास

कर्मचार्‍यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.

(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

किरकोळ रजा

(Casual Leave)

(अचानक, आपत्‍कालीन खाजगी कामासाठी रजा) किरकोळ रजा.

अत्‍यंत  निकड असतांना काढली जाते.

¨ १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कॅलेंडर वर्षात ८ दिवस अनुज्ञेय.  

¨ साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त नाही. अपवादात्मक परिस्थितीतच सात दिवसा वाढविता येते.

(किरकोळ रजा शक्‍यतोवर बिनपगारी करू नये. ¨ किरकोळ रजा नामंजूर करणे, नाकारणे अथवा रद्द करणे अशी तरतुद कायद्‍यात नाही. प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा नाकारू नये.  

¨ किरकोळ रजा ही रजा समजली जात नाही. अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजेला जोडून किरकोळ रजा घेता येईल. अथवा किरकोळ रजेला जोडून अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजा घेता येतील.

¨ नैमित्तिक रजेच्‍या मागे आणि/किंवा पुढे कितीही रविवार किंवा सार्वजनिक सुट्‍टी असली तर ती जोडून रजा घेता येते.

(कमाल सात ते दहा दिवस)

¨ सेवापुस्‍तकात नोंद घेता येत नाही. स्‍वतंत्र नोंदवही ठेवावी.

मोबदला सुट्‍टी (compensation Leave)

 

फक्‍त निम्‍नश्रेणी (वर्ग ४) कर्मचार्‍यांना अनुज्ञेय. जादा कामाचा आर्थिक मोबदला दिल्‍यास अनुज्ञेय नाही.

¨ मा. उच्च न्यायालय, मुंबई पत्र क्र. बी- २३११/२२,

दिनांक ५.१०.२००४.

¨ शासन परिपत्रक, राजकीय आणि सेवा विभाग, क्र. P-13-11-5, दिनांक २७.७.१९५९मध्ये जारी केलेल्या आदेशात बदल करून,

¨ सुट्‍टीत केलेल्‍या कामाचा मोबदला म्‍हणून देतात.

¨ सरकारी नोकरांनी अर्धा दिवस (उदा. सकाळी १०.३०ते दुपारी २.०० पर्यंत) काम करावे लागते अशा प्रकरणांमध्ये मोबदला सुट्या मंजूर करण्याच्या उद्देशाने असे दोन अर्धे दिवस एका पूर्ण दिवसाच्या समतुल्य मानले जावेत.

¨ सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या सुट्ट्या नियम आणि अनुज्ञेय सुट्ट्या जोडून असू शकतात.

¨ एक कॅलेंडर वर्षात एकावेळी तीन पेक्षा जास्‍त दिवस साठवता येत नाही.

¨ पुढील वर्षी उपयोगात आणता येत नाही.

विपश्‍यना रजा (Vipassana Leave)

 

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना एकावेळी १४ दिवस परिवर्तित रजा घेता येते.

तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेवा काळात सहा वेळा.

विकलांग आपत्‍य रजा

(Disabled Child Leave)

विकलांग आपत्‍य असलेल्‍या महिला कर्मचार्‍यास आणि विकलांग आपत्‍य असून पत्‍नी नसलेल्‍या पुरूष कर्मचार्‍यास, संपुर्ण सेवेत ७३० दिवस अनुज्ञेय

¨ ४०% पेक्षा जास्‍त अंधत्‍व, क्षीण दृष्‍टी, बरा न झालेला कुष्‍ठरोग, श्रवण शक्‍तीतील दोष, चलन-वलन विगलांगता, मतिमंदता, मानसिम आजार.

¨ पहिल्‍या हयात दोन आपत्‍यांसाठी. आपत्‍याच्‍या २२ वर्षे वयापर्यंत.

 ¨ एकाहून अधिक हप्‍त्‍यात

¨ एका आर्थिक वर्षात कमाल तीन आठवडे

गिर्यारोहण मोहीम रजा

(Mountaineering expedition Leave)

एका आर्थिक वर्षात कमाल ३० दिवस

भारतीय गिर्यारोहण फेडरेशन मान्‍यता प्राप्‍त किंवा भारतीय युथ होस्‍टेल संस्‍थेने आयोजित केलेली गिर्यारोहण मोहिम

महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष रजा (दत्तक रजा)

(Adoption Leave)

 

t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक महिन्‍यापेक्षा कमी असेल तर- एक वर्ष

t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय सहा महिनेपेक्षा जास्‍त परंतु सात महिन्‍यापेक्षा कमी असेल तर -सहा महिने

t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय नऊ महिनेपेक्षा जास्‍त परंतु दहा महिन्‍यापेक्षा कमी असेल तर -तीन महिने

t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक वर्षाच्‍या आत असेल तर-१८० दिवस

t दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक वर्षापेक्षा जास्‍त आणि तीन वर्षापर्यंत तर-९० दिवस.

दत्तकाबाबत कायदेशीर कागदपत्रे आवश्‍यक आणि हयात आपत्‍ये  दोनपेक्षा कमी असावीत.

खाजगी शाळेतील महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष रजा (गर्भपात रजा)

(Abortion Leave)

संपूर्ण सेवाकाळात एकदा

गर्भपात/गर्भस्‍त्राव/गर्भसमापन यासाठी- -४५ दिवस

  F रजा संपल्‍यानंतर स्‍वेच्‍छेने गैरहजर: असा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरेल. (नियम ४९)

 F रजा मंजुरीचे अधिकार:

उपजिल्‍हाधिकारी (निवड श्रेणी), उपजिल्‍हाधिकारी, तहसिलदार व नायब तहसिलदार यांना विशेष विकलांगता रजा व अध्‍ययन रजा वगळून १८० दिवसापेक्षा अधिक असलेल्‍या सर्व रजा, सतत पाच वर्षाच्‍या कमाल मर्यादेस आधीन राहून, मंजूर करण्‍याचे अधिकार दिनांक ३/१२/२०१६ च्‍या परिपत्रकान्‍वये विभागीय आयुक्‍तांना प्रदान करण्‍यात आले आहेत.

अराजपत्रित कर्मचाऱ्याच्या बाबतीत रिक्तपद भरण्यास जबाबदार असणारा प्राधिकारी अथवा अन्य सक्षम प्राधिकारी विशेष विकलांगता व अध्ययन रजा सोडून इतर रजा मंजूर करू शकतील. राजपत्रित अधिकारी यांच्या बाबतीत विशेष विकलांगता रजा व अध्ययन रजा याव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या रजा मंजूर करण्याचे अधिकार शासन निर्णय वित्त विभाग क्र. अ रजा - २४९३/५९/सेवा-९ दिनांक १६.७.१९९४ ने खालीलप्रमाणे प्रत्यायोजित केले आहेत.

विभाग प्रमुख:- वर्ग-१ व वर्ग-२ अधिकारी बाबतीत १८ दिवसापर्यंत.

प्रादेशिक विभाग प्रमुख:- वर्ग-२ अधिकाऱ्यांच्या बाबतीत ज्यांच्या रजेच्या कालावधीत या पदावर कोणताही अन्य व्यक्ती नियुक्त करण्यात येणार नाही या शर्तीच्या अधीन राहून १८० दिवसांपर्यंत.

मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव :- पूर्ण अधिकार.

l अध्ययन रजा: कर्तव्य क्षेत्राशी संबंध असलेल्या विषयातील उच्च शिक्षण / पाठ्यक्रम, भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी अध्‍ययन रजा पाच वर्ष सेवेनंतर अनुज्ञेय होते आणि  संपूर्ण सेवा कालात १२ ते २४ महिने मंजूर करता येते.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील प्रकरण ७ मध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून शासकीय कर्मचाऱ्यांना भारतामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अध्ययन रजा मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव मंजूर करू शकतील. तथापि, शासकीय कर्मचाऱ्यांना भारताबाहेरील म्हणजेच परदेशी असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मात्र अध्ययन रजा संबंधीत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्या मान्यतेने मंजूर करता येईल. (नियम २७,२९, ८०)

 अध्‍ययन रजा संपल्यानंतर कामावर कामावर परत येणे आवश्यक. नंतर किमान पाच वर्षे सेवा बंधनकारक.तथापि, कामावर परत आलेल्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत सेवानिवृत्त होणार असेल अथवा सेवानिवृत्ती होईल अशांना ही अध्‍ययन रजा मंजूर करता येत नाही. अध्‍ययन रजा एका व्यक्तीला वारंवार मंजूर करता येणार नाही.

भारतात अभ्यासक्रम पूर्ण करता पूर्ण करण्याकरता, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग यांना पूर्ण अधिकार आहेत. भारताबाहेरील अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरता, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, सामान्य प्रशासन विभागाशी विचारविनिमय करून निर्णय घेतात.

वरील अधिकार महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ चे प्रकरण सात मध्ये विहीत केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रत्यायोजित केलेले आहेत.

F रजेवर असताना बदली:

रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली दुसऱ्या विभागात झाली व रजा संपल्यानंतर असा कर्मचारी नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होणार असेल तर रजा मंजूर करणे व रजा वेतन देण्याची जबाबदारी पूर्वीच्या म्हणजे जेथून बदली झाली त्या विभागाची आहे.

 पूर्वीच रजा मंजूर केलेल्या कर्मचाऱ्याची बदली दुसऱ्या विभागात झाली व त्याने वाढीव रजेचा अर्ज दिला तर रजेचा मूळ कालावधी संपल्यानंतर ज्या विभागात बदली झाली तेथील कर्मचाऱ्याची बदली अमलात येणार असेल तर त्या विभागाने म्हणजेच जेथे बदली झाली त्या कार्यालयाने वाढीव रजा मंजूर करावी. तथापि, ज्या विभागात बदली झाली आहे तेथील बदली कर्मचाऱ्याची बदली काळात वाढीव रजा समाप्त होणार असेल तर ज्या कार्यालयातून बदली झाली त्या कार्यालयाची रजा मंजुरी जबाबदारी राहील.

एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झालेल्या कर्मचाऱ्याने मार्गस्थ असताना संक्रमण काळात रजेसाठी अर्ज दिला तर ज्या ठिकाणी त्यास रुजु व्हावयाचे आहे अशा कार्यालयाने रजा मंजूर करणे आवश्यक आहे. (नियम ३०)

  शासकीय कर्मचाऱ्यास सेवेतून बडतर्फ करण्याचा, काढून टाकण्याचा किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय शिक्षण देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने घेतला असेल तर त्यास कोणतीही रजा मंजूर करता येणार नाही. (नियम ३१)

अल्प कालांतराने वैद्यकीय प्रमाणपत्रावर कर्मचारी जर वारंवार रजेवर जात असेल तर अशा कर्मचाऱ्यास वैद्यकीय मंडळ याकडे काळजीपूर्वक तपासणीसाठी पाठवावे. व त्यानंतर प्राप्त वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रानुसार रजामंजुरी बाबतचा निर्णय रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकारी यांनी घ्यावा. (नियम ३२)

वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे रजा अनुज्ञेयता नव्हे, वैद्यकीय प्रमाणपत्रात शर्त-वजा अशी टीप असली पाहिजे की, शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नियमानुसार त्याला अनुज्ञेय नसणारी कोणतीही रजा हक्काने मागण्याचा पुरावा म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य मानले जाणार नाही. (नियम ३७ )

 

महत्‍वाची शासन निर्णय/परिपत्रके

 

F एकदा दिलेली सुट्टी रद्द करुन त्याऐवजी दुसर्‍या दिनांकाला सट्टी देण्याचा प्रस्ताव नामंजूर करणेसंबंधी.

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक - स्थानिसु -१३०४/१०९०/प्र.क्र.१२८/२००४/२९,

दिनांक: ६ डिसेंबर, २००४

परिपत्रक

शासन निर्णय, राजनैतिक व सेवा विभाग क्रमांक पी बी- II -बी, दिनांक ६/८/१९५८ अन्वये विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांना त्यांच्या महसूली जिल्हयात निवडक महत्वाच्या सण प्रसंगाना स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यानुसार प्रतिवर्षी अशा सुट्टया संबंधित कार्यालयाकडून जाहीर करण्यात येतात.

यासंदर्भात असे निदर्शनास आले आहे की, एकदा जाहीर केलेली स्थानिक सुट्टी काही कारणावरुन सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर झाल्यास, अशी स्थानिक सुट्टी अन्य दिवशी जाहीर करण्यास अनुमती देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होतात. यानुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, ज्या कारणासाठी सुट्टी दिलेली असते ते प्रयोजन नंतर शिल्लक रहात नसल्याने त्या सुट्टी ऐवजी अन्य दिवशी सुट्टी देणे अप्रस्तुत ठरते. सबब, एकदा जाहीर केलेली सुट्टी रद्द करुन त्याऐवजी दुसर्‍या दिनांकाला सुट्टी देण्याचा कोणताही प्रस्ताव यापुढे शासनाकडे पाठविण्यात येऊ नये.

 

F स्‍थानिक सुट्‍टी:

GOVERNMENT OF BOMBAY,

POLITICAL AND SERVICES DEPARTMENT.

Resolution No, 5681/34, Bombay Castle, 31st December 1947.

officers not lower in rank than heads of districts should again have the power to grant their subordinates holidays of local importance up to a maximum of three holidays in year.

By order of the Governor of Bombay,

 

F राज्य शासकीय व अन्य (पुरूष) कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा:  

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७ /प्र.क्र.२५/सेवा-६, दिनांक : १५ डिसेंबर २०१८

राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलाच्या संगोपनासाठी बाल संगोपन रजा मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय वरीलप्रमाणे दिनांक २३.०७.२०१८ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १(XVI) मध्ये नमूद केल्यानुसार,

ज्या पुरुष वर्गीय शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणास खिळलेली आहे, अशा पुरुष कर्मचार्‍यास त्याच्या मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बाल संगोपन रजा अनुज्ञेय करण्यासाठी, पत्नीस कोणकोणते आजार असले पाहिजेत, तसेच अशा स्वरुपाचे आजार असल्याबाबत कोणकोणते निकष असावेत, याबाबतचा प्रस्ताव काही काळ, शासनाच्या विचाराधीन होता. सदर प्रकरणी सर्वसाकल्याने विचार करुन, पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :

ज्या राज्य शासकीय पुरुष कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर पुरुष कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न महाविद्यालयातील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर पुरुष कर्मचारी यांची पत्नी विविध आजारपणाच्या कारणास्तव जेवढ्या कालावधीसाठी अंथरुणास खिळून राहिली आहे (Bed Ridden), अथवा त्यांची पत्नी मनोरुग्ण असल्यामुळे, जेवढ्या कालावधीसाठी बाल संगोपन करण्यास असमर्थ होत आहे (Incapacitated), तेवढ्या कालावधीचे वैद्यकीय अधीक्षक (जे. जे. रुग्णालय) / जिल्हा शल्य चिकित्सक (शहरी भागासाठी) / जिल्हा आरोग्य अधिकारी (ग्रामीण भागासाठी) यांचेकडून संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर, संबंधित शासकीय पुरुष कर्मचार्‍यास, तेवढ्या कालावधीची बाल संगोपन रजा अनुज्ञेय करण्यास, या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येते.

 

F राज्य शासकीय (पुरूष) कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१७/प्र.क्र. २५/सेवा-६, दिनांक : २३.७.२०१८

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलाच्या संगोपनासाठी बाल संगोपन रजा मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या काही काळ विचाराधीन होता. त्याबाबत सांगोपांग विचार करुन पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :

राज्य शासकीय महिला कर्मचारी तसेच पत्नी नसलेले पुरुष वर्गीय शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी, जिल्हा परिषदेचे पत्नी नसलेले पुरुष वर्गीय शासकीय कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये यामधील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यास तसेच वर नमूद केलेल्या विविध कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली आहे, अशा कर्मचाऱ्यास देखील १८० दिवसांच्या कमाल मर्यादेत बाल संगोपन रजा पुढील अटी व शर्तींच्या अधिन राहून मंजूर करण्यास या शासन निर्णयाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

१. मुलांचे वय १८ वर्षे होईपर्यंतच सदर रजा लागू राहील. (बाल संगोपन रजेवर असताना मुलाच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यास, त्या दिनांकापासून पुढे सदर रजा लागू होणार नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी, रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याची राहील.)

२. एका वर्षामध्ये २ महिन्यांच्या कमाल मर्यादेत सदर रजा घेता येईल.

३. सदर रजा ही उपरोक्त अट क्र.१ च्या अधिन राहून सेवा कालावधीत १/२/३/४ टप्प्यात (In Spells) घेता येईल. तथापि, सदर रजा एका कॅलेंडर वर्षात तीन टप्प्यांमध्ये ( In Three Spells) घेता येईल.

३. पहिल्या २ ज्येष्ठतम हयात मुलांकरिताच ही रजा लागू राहील.

४. शासकीय सेवेचे १ वर्ष पूर्ण झाल्यावर सदर रजा लागू राहील.

५. अर्जित रजा व अर्धवेतनी रजा खात्यावर असली तरी सदर रजा मंजूर करता येईल.

६. अर्जित रजा, अर्धवेतनी रजा तसेच प्रसूती रजेला जोडून ही रजा घेता येईल.

७. एका कॅलेंडर वर्षात घेतलेली रजा पुढील कॅलेंडर वर्षीही सलग असल्यास, ती ज्या कॅलेंडर वर्षात प्रारंभ झाला, त्या कॅलेंडर वर्षातील समजण्यात येईल.

८. बालसंगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल.

९. परिवीक्षाधीन कालावधीत बालसंगोपन रजा मान्य करता येणार नाही. तथापि, रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास, कर्मचाऱ्याच्या मुलाबाबतच्या गंभीर परिस्थितीमुळे त्यास रजा घेणे अत्यावश्यक आहे अशी खात्री झाल्यास, परिवीक्षाधीन कालावधीतही संबंधितास अपवादात्मक परिस्थितीत, कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा मंजूर करता येईल. त्या प्रमाणात संबंधित महिला / पुरुष कर्मचाऱ्याचा परिवीक्षाधीन कालावधी वाढविला जाईल.

१०. सदर रजा कालावधीत रजा प्रवास सवलत (LTC) अनुज्ञेय ठरणार नाही.

११. सदर रजा हक्क म्हणून मागता येणार नाही. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेनेच सदर रजा घेता येईल. बालसंगोपन रजा मंजूर करताना पदनिर्मिती तसेच पदभरती होणार नाही व दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन रजा मंजूर करण्याची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्याची राहील. संबंधित कर्मचाऱ्याची वारंवार रजा घेण्याची प्रवृत्ती नाही, ही बाब देखील सदर रजा मंजूर करताना विचारात घ्यावी.

१२. कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा नवीन नियुक्ती स्वीकारत असेल अशा बाबतीत, वेगवेगळ्या ठिकाणचा कालावधी एकत्रित गणला जाऊन अशा एकूण सेवेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती असली तरी एकंदर १८० दिवस इतकीच बालसंगोपन रजा अनुज्ञेय होईल.

१३. बालसंगोपन रजेचा हिशोब विहित प्रपत्रात घेऊन ते सेवापुस्तकात ठेवावे. तसेच सेवा पुस्तकामध्ये देखील उपभोगलेल्या बाल संगोपन रजेची नोंद घ्यावी.

१४. ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्याची सेवा किमान दहा वर्षे होण्याच्या आधी सदर कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेतून, राज्य शासनाव्यतिरिक्त अथवा राज्याच्या एकत्रित निधीतून वेतनावरील खर्च भागविला जात नाही, अशा इतर सेवेत जाण्याकरिता किंवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यावयाचा असल्यास अथवा कार्यमुक्त व्हावयाचे झाल्यास, अशा कर्मचाऱ्याने बाल संगोपन रजा म्हणून घेतलेल्या कालावधीतील वेतनाइतके वेतन, राज्य शासनास अदा केल्यानंतरच अशा कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देता येईल किंवा राज्य शासकीय सेवेतून कार्यमुक्त होता येईल. संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने तशा आशयाचे बंधपत्र (बाँड) सदर रजेसाठी अर्ज करताना कार्यालयास, न चुकता सादर करावे.

१५. पत्नी असाध्य आजाराने अथंरुणास खिळलेली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यास त्याच्या मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बाल संगोपन रजा अनुज्ञेय करण्यासाठी, पत्नीच्या आजाराबद्दल, तसेच आजाराबद्दलच्या निकषाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील. त्यानंतरच अशा कर्मचाऱ्यास बाल संगोपन रजा विहीत अटी व शर्तींच्या अधिन राहून मंजूर करता येईल.

१६. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकाश करण्यात येतील.

 

F विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकाच्या दिवशी संबंधित मतदारसंघाचे मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक - विनैर २०११/प्र.क्र.१४६/का-२९, दिनांक- २३ जून, २०११

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील तसेच शिक्षक मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचार्‍यांना संबंधित मतदारासंघाच्या निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात यावी. सदर रजा ही कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजे व्यतिरिक्त असेल.

 

F विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत...

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र. ५७ / सेवा – ६, दिनांक : २१.९.२०१६.

विकलांग अपत्य असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती :- शासन निर्णय :

विकलांग व्यक्तींसाठी (समान संधी, हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियम,१९९५ मधील कलम-१३(१) अन्वये स्थापित केलेल्या राज्य समन्वय समितीची शिफारस विचारात घेऊन, पुढे नमुद केल्यानुसार अपत्य असलेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास तसेच पुढे नमुद केल्यानुसार अपत्य असून पत्नी नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास म्हणजेच अशा अपत्याच्या वडीलांनादेखील संपूर्ण सेवेत ७३० दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्यास शासन मान्यता देत आहे:-

(अ) विकलांग व्यक्तींसाठी (समानसंधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ मधील कलम २ (झ) नुसार पुढील विकलांगता

(१) अंधत्व (Blindness), (२) क्षीण दृष्टी (Low vision), (३) बरा झालेला कुष्ठरोग (Leprosy- cured) (४) श्रवण शक्तीतील दोष (Hearing impairment) (५) चलन- वलन विषयक

विकलांगता (Loco Motor disability) (६) मतिमंदता (Mental retardation) (७) मानसिक आजारपण (Mental illness)

सदर विकलांगता उपरोक्त अधिनियमातील विकलांगतेबाबतच्या व्याख्येप्रमाणे असणे अनिवार्य राहील तसेच सदर विकलांगता किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणित केले पाहिजे.

(आ) दि नॅशनल ट्रस्ट फॉर दि वेलफेअर ऑफ पर्सन्स विथ ऑटीझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन आणि मल्टीपल डिसॅबिलीटी अॅक्ट १९९९ मधील कलम २ (ए), २(सी), २ (जी), २ (एच) व २(ओ) मध्ये वर्णन केल्यानुसार अनुक्रमे आत्ममग्न (Autism), सेरेब्रल पाल्सी (cerebral palsy), मतिमंद (mental retardation), बहुविकलांग (multiple disabilities) व गंभीर स्वरुपाची विकलांगता (severe disability) असलेले अपत्य, सदर रजा अनुज्ञेयतेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत:

) उपरोक्त परिच्छेद क्र. १ मधील विकलांगतेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक (Civil Surgeon) अथवा त्यापेक्षा वरिष्ठ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने अथवा शासनाने वेळोवेळी निर्गमित

केलेल्या निर्णयानुसार निर्गमित केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

२) सदर रजा हक्क म्हणून मागता येणार नाही. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेनेच सदर रजा घेता येईल.

) सदर रजा विकलांग अपत्याच्या वयाच्या २२ वर्षापर्यंत घेता येईल.

) सदर रजा पहिल्या २ हयात अपत्याकरीता लागू राहील.

) विशेष बाल संगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत

असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल.

) सदर रजा एकाहून अधिक हप्त्यामध्ये (Spell) तथापि एका आर्थिक वर्षात तीनापेक्षा जास्त नाही अशा मर्यादेत घेता येईल.

) विशेष बालसंगोपन रजेचा हिशोब विहित प्रपत्रात घेऊन ते सेवापुस्तकात ठेवावे.

तसेच सेवा पुस्तकामध्येही हिशोब योग्यरित्या नोंदविण्यात यावा.

) परिविक्षाधीन कालावधीत विशेष बाल संगोपन रजा मान्य करता येणार नाही तथापि, कर्मचाऱ्यास विकलांग अपत्याबाबतच्या गंभीर परिस्थितीमुळे रजा घेणे अत्यावश्यक आहे अशी रजा मंजूर करणाच्या सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री झाल्यास, परिविक्षाधीन कालावधीत अपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा घेता येईल.

त्या प्रमाणात संबंधित महिला/पुरुष शासकीय कर्मचाऱ्याचा परिविक्षाधीन कालावधी वाढविला जाईल.

) विशेष बाल संगोपन रजेस पात्र असणारा महिला/पुरुष शासकीय कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा नवीन नियुक्ती स्वीकारत असेल अशा बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणच्या कालावधीची रजा एकत्रित गणली जाऊन, अशा एकूण सेवेच्या कालावधीमध्ये एकूण ७३० दिवस इतकीच रजा अनुज्ञेय होईल.

१०) अर्ज केल्यास विशेष बाल संगोपन रजेला जोडून अन्य अनुज्ञेय रजा जोडून घेता येईल मात्र अन्य अनुज्ञेय रजा कालावधी एक वर्षापेक्षा अधिक असणार नाही

११) विकलांग अपत्य शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून आहे, असे प्रमाणपत्र शासकीय कर्मचाऱ्याने सादर करणे अनिवार्य राहील.

 

हे आदेश मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये यामधील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांनादेखील लागू राहतील.

 

सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मध्ये आवश्यक सुधारणा यथावकाश करण्यात येतील.

 

शासकीय / निमशासकीय सेवेतील खेळाडूंच्या पालकांना रजा सवलती देण्याबाबत.

राज्य क्रीडा धोरण – २०१२, महाराष्ट्र शासन, वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांकः विरजा २०१२/२५८/प्र.क्र.१४/सेवा-६

दिनांक १३.८.२०१३

१) महाराष्ट्र खेळ परिषद किंवा अखिल भारतीय खेळ परिषद यांनी मान्यता दिलेल्या अधिकृत मंडळांनी / संघटनांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेणाऱ्या अल्पवयीन, किशोरवयीन व महिला खेळाडूसोबत शासकीय, निमशासकीय सेवेतील

पालकांनी आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धा कालावधीत व्यतीत केलेला कालावधी तसेच त्यांनी केलेला जाण्या-येण्याचा प्रवासाचा कालावधी विशेष रजा म्हणून मंजूर करुन नियमित करण्यात यावा. राष्ट्रीय खेळासाठी अशा प्रकारची सवलत एका वर्षात १० दिवसापर्यंत मर्यादित राहील.

२) महाराष्ट्र खेळ परिषद किंवा अखिल भारतीय खेळ परिषद यांनी मान्यता दिलेल्या अधिकृत मंडळांनी/संघटनांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेणाऱ्या अल्पवयीन, किशोरवयीन व महिला खेळाडूसोबत उपस्थित राहणाऱ्या संबंधीत शासकीय, निमशासकीय सेवेतील पालकांनी रजेची मागणी केल्यास त्यांना सर्वप्राथम्याने देय व अनुज्ञेय रजा देण्यात यावी.

३) क्रीडा स्पर्धांचे आयोजन अधिकृत असावे.

४) संबंधीत शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यास पाल्य खेळाडूंसोबत खेळस्पर्धेदरम्यान उपस्थित राहण्यासाठी विभाग प्रमुखांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

५) ही सवलत शासन मान्य अधिकृत खेळ संघटनांच्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांना लागू राहील. मात्र निमंत्रित स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्यासाठी ही सवलत अनुज्ञेय ठरणार नाही.

६) रजा सवलतीसाठी खेळ स्पर्धेच्या अधिकृततेबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी याचे प्रमाणपत्र तसेच खेळ स्पर्धा झाल्यानंतर खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी झाल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

७) ही सवलत अधिकृत स्पर्धेसाठी निवड होऊन प्रत्यक्ष सहभागी झालेल्या १८ वर्षे वयाखालील अल्पवयीन, किशोरवयीन व महिला खेळाडूंच्या शासकीय, निमशासकीय सेवेतील पालकांना अनुज्ञेय राहील.

८) या खेळाडूंसोबत जाणाऱ्या पालकाला त्यांचा सर्व खर्च स्वतः करावा लागेल.

९) पती/पत्नी दोघेही शासकीय / निमशासकीय कर्मचारी असल्यास सदर सवलत केवळ एकालाच अनुज्ञेय राहील.

१०) वरील सवलती शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या क्रमांक क्रीडाधो २०११/प्र.क्र.५५/११/क्रीयुसे-१, दि. १४.६.२०१२ सोबतच्या परिशिष्ट - अ " राज्याचे क्रीडा धोरण - २०१२" मधील परिच्छेद ८.४ मध्ये नमूद केलेल्या गट-अ व गट-ब खेळासाठी लागू राहतील.

 

b|b

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला रजा आणि सुट्‍टी नियम. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.