आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

महसूल शब्दावली - 11

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

६२६. खाका: रेखांकन, ले-आऊट, नकाशा (Layout, Sketch).

६२७. मुसावी: जमाबंदीच्‍यावेळी प्रत्येक महसुली गावासाठी, सर्व क्षेत्रांची स्थिती आणि सीमा दर्शवणारा मूळ नकाशा.

 ६२८. पैमाईश: जमिनीचे मोजमाप.

६२९. शजरा: तपशीलवार गाव नकाशा जो सर्व जमिनींचे खसरा क्रमांक आणि सीमा दर्शवितो.

 ६३०. बुरजी सरवेरी: सर्वेक्षणाचा दगड.

 ६३१. शीव: दोन गावांमधील हद्‍दी/सीमेला शीव म्‍हणतात. शीवेला अन्‍य नावे म्‍हणजे गावकूस, कोट, वेस. लगतचे दोन्ही गावांच्या लगतच्‍या गटाच्या बांधावरील गट मोजून शीव निश्चित केली जाते. शीव रस्‍ता हा सर्वसाधारणपणे ३३ फूट असणे अपेक्षीत आहे

६३२. रकबा: शेतजमिनीचे क्षेत्रफळ.

 ६३३. मिजान कुलदेह: गावाच्‍या एकूण क्षेत्रफळाची बेरीज.

 ६३४. शेतबांधाची मोजमापे:

. कोरडवाहू जमीन: ०.४६ मीटर रुंद X ०.६१ मीटर उंच

. भाताची व बागायत जमीन: ०.२३ मीटर रुंद X ०.६१ मीटर उंच

. सरबांध: १.२२ मीटर रुंद X ०.६१ मीटर उंच

                                       [महाराष्ट्र जमीन महसूल (सीमा व चिन्हे) नियम १९६९, नियम ४]

 ६३५. बिघा, साखळी आणि गज: अकबरच्या कारकिर्दीत त्याचा अर्थमंत्री राजा तोरडमल याने (सन  १५७१-१५८२) जमिनीचे परिमाण बिघा हे कायम करुन त्‍याच्‍या मोजमापासाठी ‘साखळी’ आणि ‘गज ही परिमाणे ठरविली.

 ६३६. प्राचिन मोजमापे:

दोन गहू म्‍हणजे एक गुंजा ;

१/२ गुंजा म्‍हणजे एक रत्ती ;

२/५ गुंजा म्‍हणजे एक वळा ;

आठ गुंजा म्‍हणजे एक मासा ;

सहा मासा म्‍हणजे एक सहमासा

दोन सहमासा किंवा चाळीस वळा म्‍हणजे एक तोळा.

एक गहू म्‍हणजे गव्‍हाच्‍या दाण्‍याइतके माप (a grain of wheat), गुंजा आणि वळा म्‍हणजे विशिष्‍ठ प्रकाराच्‍या झाडांच्‍या बिया.

एक रत्ती  हा दोन दाणे वजनाइतका तांब्‍याचा छोटा तुकडा होता.

मासा  एक चौकोनी आकाराचा तर तोळा हा आयताकृती, धातूचा तुकडा होता.

एक तोळा वजन म्‍हणजे येथे प्रचलीत शासकीय रुपयाच्‍या नाण्‍याच्‍या वजनापेक्षा थोडे जास्‍त वजन, जे १११/२ मासा च्‍या  बरोबरीचे होते.

चांदीची विक्री करतांना, मोजण्‍यासाठी येथे प्रचलीत शासकीय रुपयाच्‍या नाण्‍याचा वजन म्‍हणून उपयोग केला जातो.

 ६३७. कनिष्ठ धातू आणि इतर वस्‍तूंची विक्रीसाठी वजन-मापे:                                     

पाच तोळे  म्‍हणजे एक छटाक,

 चार छटाक म्‍हणजे एक पावशेर,

दोन पावशेर म्‍हणजे एक अछर,

दोन अछर म्‍हणजे एक शेर,

चाळीस शेर म्‍हणजे एक मण,

तीन मण म्‍हणजे एक पाला

वीस मण म्‍हणजे एक खंडी.

 तोळा आणि पावशेर वगळता, अछर आणि शेर ही वजने काही ठिकाणी तांबे किंवा पितळाने बनविलेले होती. अन्‍यथा ही सर्व वजने लोखंडाची बनविलेली होती. या वजनांचा आकार घंटी सारखा अणि वरच्‍या भागाला सपाट आहे. त्‍यांना उचल्‍यासाठी वरच्‍या बाजूला एक गोल कडी होती. दूध आणि तेल तांबे किंवा पितळाने बनविलेल्‍या कपाच्‍या (Cup) आकाराच्‍या मापाने विकली जातात.   

 ६३८. शेर: सन १८२२ च्‍या सुमारास, निझामाचे राज्‍य असणार्‍या भागात धान्‍य खालील प्रमाणे विकले जात असे.                 

दोन शेर म्‍हणजे एक अधेली,

दोन अधेली म्‍हणजे एक पायली,

बारा किंवा सोळा पायली म्‍हणजे एक मण.

 तीस पायली म्‍हणजे एक पळ.

वीस मण म्‍हणजे एक खंडी.

अधेली हे धान्‍य मोजायचे सर्वात मोठे माप आहे. 

 एक शेर  म्‍हणजे तीन किंवा चार पाऊंड वजनाच्‍या बरोबरचे होते. (एक पाऊंड म्‍हणजे अंदाजे अर्धा किलो).

 ६३९. जुनी धान्य मोजण्याची मापने:

दोन नेळवी = एक कोळवे

दोन कोळवी = एक चिपटे दोन चिपटी = एक मापटे दोन मापटी = एक शेर दोन शेर = एक अडशिरी

दोन  अडशिऱ्या = एक पायली

सोळा पायल्या = एक मण वीस मण = एक खंडी

पायली म्हणजे ७ किलो

अर्धा पायली (आडसरी) म्हणजे साडे ३ किलो १ शेर म्हणजे अंदाजे २ किलो

मापट म्हणजे अर्धाशेर म्हणजे ~ १ किलो चिपट म्हणजे पावशेर म्हणजे~अर्धा किलो कोळव म्हणजे पाव किलो

निळव म्हणजे आतपाव १२५ ग्राम चिळव म्हणजे छटाक ५० ग्राम

 

६४०. गज: सुती किंवा रेशमी कापडाची लांबी मोजण्‍यासाठी तसु, गज, हात, आणि वार अशी मापे वापरली जातात.

चौदा तसु म्‍हणजे एक क्‍युबिट (cubit) (क्‍युबिट म्‍हणजे १८ ते २१ इंच लांब) किंवा एक हात ;

 ३/४ क्‍युबिट म्‍हणजे एक गज ;

 दोन क्‍युबिट  म्‍हणजे एक यार्ड  किंवा एक वार. 

कापडाची घाऊक खरेदी अखंड तुकडा किंवा थान  नुसार होते. एक थान २० ते ४० यार्ड ची होती.  

 धोतर (Waist-cloths) आणि महिलांची लुगडी ( women's robes) जोडीने किंवा स्‍वतंत्र विकली जात होती. लोकरीचे कपडे, घोंगडी (blanket) मेंढपाळांतर्फे तयार करुन, त्‍यांची वीसच्‍या संख्‍येत किरकोळ बाजारात तर शंभरच्‍या संख्‍येत घाऊक बाजारात विक्री केली जात असे.

 लाकूड आणि मातीच्‍या वस्‍तू स्‍वेअर गज  या परिमाणात मोजल्‍या जात.

दगडी बांधकाम सोळा इंच म्‍हणजे एक हात  या परिमाणात केले जात असे. असे तीन हात  म्‍हणजे एक खाण.  दगड (Hewn stones) शंभरच्‍या संख्‍येत विकली जातात.

 ६४१. काठी (a stick): जमीन मोजण्‍याचे स्‍थानिक परिमाण म्‍हणजे ५ ते ६ हात लांब म्‍हणजे एक काठी,

वीस काठी  म्‍हणजे एक पाँड,

वीस पाँड म्‍हणजे एक बिघा,

 तीस बिघा म्‍हणजे एक पैकू

चार पैकू म्‍हणजे एक चाहू.

 काठी हे परिमाण एकतर लाकडाचे किंवा दोरीचे (string) होते.

एक तृतीयांश ते दोन बिघा  माप म्‍हणजे एक एकर  किंवा ४,८४० चौरस यार्ड असते.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या काळातही चावर, बिघा असे परिमाण वापरात असल्‍याचे अनेक दाखले मिळतात. त्‍याकाळात काठी हे परिमाण प्रचलीत असल्‍याचे दिसते.

वीस काठी  चौरस म्‍हणजे एक बिघा

१२० बिघा  म्‍हणजे एक चावर असे परिमाण होते.

एक हात = १६ इंच ; एक काठी = पाच ते सहा हात ; तीस बिघा = एक पैकू ;

चार पैकू = एक चावर ; एक आणा = सव्वा दोन फूट.

 

बिघा हे एकक सामान्यतः उत्तर भारतात वापरले जाते, कर्नाटक राज्यांमध्येही जमीन मोजण्याचे हे एक लोकप्रिय एकक आहे. एक बिघा म्हणजे पंचवीस गुंठे क्षेत्र.

  एकर: एक एकर म्‍हणजे चाळीस गुंठे

  हेक्‍टर: एक हेक्टर म्हणजे २.४७ एकर किंवा १०००० चौरस मिटर.

  गुंठा: एक गुंठा म्‍हणजे १०८९ चौरस फूट .

  साखळी: लांबी मोजण्‍याची प्राचीन पध्‍दत-  १ साखळी म्‍हणजे ६६ फूट किंवा २२ यार्ड किंवा १०.०८ मीटर्स किंवा १६ आणे.  १० साखळी म्‍हणजे एक फर्लांग. १ आणा म्‍हणजे ६३ सेंटिमिटर्स.

 ब्रिटीशांच्‍या काळात काही इंग्रजी वजन-मापे प्रचलीत करण्‍यात आलीत परंतु वजन आणि मापे याबाबत फारशी सुधारणा किंवा प्रयत्‍न झाल्‍याचे दिसून येत नाही. देशात एकाच प्रकारची वजन आणि मापे असावीत म्‍हणून 'मुंबई वजन व मापे (अंमलबजावणी) कायदा १९५८' अंमलात आला. या कायद्‍यांमुळे दशमान पध्‍दतीची (metric system) सुरुवात झाली.

 ६४२. गुंटूर चेन (Guntur chain): ब्रिटिशांनी भारतात जमिनीचे मोजमाप साखळी पद्धतीने केले. यामध्ये त्यांनी जमिनीचे क्षेत्र एकर गुंठ्यात काढले. या भूमापनासाठी गुंटूर नामक अधिकार्‍याने ३३ फूट लांबीच्‍या साखळीचा उपयोग केला होता. गुंटूर या अधिकार्‍याच्‍या नावावरून या साखळीला 'गुंटूर चेन' असे नाव पडले. ही चेन (साखळी) ३३ फूट लांबीची असून, ती १६ भागांत विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला ‘आणा’ म्हटले जात होते. एक साखळी लांब आणि एक साखळी रुंद अशा ४० गुंठ्यांचा एक एकर असे प्रमाण ठरवण्यात आले. लांबी व रुंदी साठी जेव्‍हा आणे पै चा उपयोग केला जातो तेव्‍हा सोळा आणे म्हणजे तेहतीस (३३) फुट व एक आणा म्हणजे १६ भागिले ३३. गुंठा हा शब्द याच गुंटूर अधिकार्‍याच्‍या नावावरून रूढ झाला असे म्‍हणतात.

 

६४३. खण: हे क्षेत्रफळाचे माप असून जुन्या काळी वापरले जात असे.

सर्वसाधारणपणे एक खण म्हणजे (२.५ फूट x१०फूट) २५ चौरस फूट. वेगवेगळ्या भौगोलिक भागात वेगवेगळे हे प्रमाण भिन्‍न असू शकते. तीन खणाचे घर म्हणजे तीन खोल्या परंतु प्रत्येकाला दार नसणारे घर. पूर्वी माजघर, देवघर व दिवाणखाना असे तीन खणी घर असायचे.

 ६४४. प्राचीन चलन: १ आणा म्‍हणजे १२ पैसे; १ रुपया म्‍हणजे १६ आणे किंवा १९२ पैसे किंवा २५६ दमडी किंवा १२८ धेला किंवा  ६४ पै. (जुने) एका सात-बाराचे १६ आणे क्षेत्र म्‍हणजे (१९२ पै) मानले जाते. १ पैसा म्‍हणजे २ धेला, १ धेला म्‍हणजे २ दमडी.

 ६४५. खारीचा वाटा: खारीचा वाटा ही रामायणातील कथा सर्वश्रुत आहे. प्रभू रामचंद्राला सेतुबंधाच्या कामात एका लहानशा खारीने तिच्या परीने केलेली मदत आणि प्रभू रामचंद्राने यावरून या छोटयाशा मदतीचे केलेले कौतुक आणि तिच्या कार्याचा गौरव खारीचा वाटा हा वाकप्रचार रूढ झाला.

मात्र काही भाषा अभ्यासकांच्या मते ‘खार’ हे पूर्वीच्या काळातील मापन प्रमाणक असून आता जसा किलोचा वाटा, एकराचा वाटा आहे, तसा पूर्वी ‘खारीचा वाटा’ असे. यासाठी त्यांनी गीर्वाण लघुकोशातील मुष्टिका, निष्टिका, अष्टिका, कुडव, प्रस्थ, आढकी, द्रोण आणि खार या मापन प्रमाणकांचा संदर्भ दिला आहे. त्यानुसार-

४ मुठी (fistful) = ४ मुष्टिका = १ निष्टिका; ८ मुठी = २ निष्टिका = १ अष्टिका

१६ मुठी = २ अष्टिका = १ कुडव ; ६४ मुठी = ४ कुडव = १ प्रस्थ

२५६ मुठी = ४ प्रस्थ = १ आढकी; १०२४ मुठी = ४ आढकी = १ द्रोण

२०४८० मुठी = २० द्रोण = १ खार

यावरून १ खार धान्य म्हणजे २०४८० मुठी धान्य. जर १ मूठ धान्य अंदाजे ५० ग्रॅमच्या स्वरूपात धरल्यास २०४८० = १०२४ किलो धान्य होते.

 ६४६. चौरस फूट - चौरस मीटर: चौरस फूट भागिले १०.७६४ = चौरस मीटर ; चौरस मीटर गुणिले १०.७६४ = चौरस फूट 

 ६४७. टी.एम.सी. (TMC): धरणांची पाणी साठवण्याची क्षमता टी एम सी या एककामध्ये मोजतात. एक TMC म्‍हणजे एक हजार दशलक्ष घन फूट (एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) क्यूबिक फीट) म्‍हणजेच २८,३१,६८,४६,५९२ लिटर. धरणाची क्षमता १.९७ TMC आहे म्‍हणजे धरणात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी साठा करता येतो.

 ६४८. क्‍युसेक (Cusec): हे वाहते पाणी मोजण्याचे एकक आहे.

एक क्‍युसेक म्‍हणजे एका सेकंदाला एक घन फूट (क्यूबिक फीट) म्‍हणजेच एका सेकंदाला २८.३१७ लिटर. याचा अर्थ एका सेकंदात २८.३१ लिटर पाणी बाहेर पडते. (१ घनफूट = २८.३१ लिटर)

धरणातून ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत. म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या वेगाने पाणी सोडले जात आहे.

  

६५०. 'टपाली मतदान  (Postal Voting): निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या मतदारांनी प्रत्‍यक्ष मतदान केंद्रावर न जाता, मतपत्रिका टपालामार्फत पाठवू आपले मत नोंदविणे. सन २००१ पासून जिल्‍हा परिषदा, पंचायत समित्‍या, ग्रामपंचायती महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्‍या निवडणूकांमध्‍ये टपालव्‍दारे मतदान नोंदविण्‍याची तरतुद करण्‍यात आली आहे. याशिवाय, संबंधित मतदार संघातील मतदार यादीत मतदार म्‍हणून नावे असलेले- भारतीय सेनादलात कार्यरत मतदार, विशेष मतदार म्‍हणून घोषित व्‍यक्‍ती, प्रतिबंधात्‍मक स्‍थानबध्‍दतेतील मतदार, निवडणूक कर्तव्‍यार्थ नेमलेले सर्व अधिकारी / कर्मचारी, निवडणूक आयोगाने विशेषरित्‍या आदेशीत केलेले मतदार हे टपालाद्‍वारे मतदान करू शकतात. (Conduct of Elections Rules, 1961, Part III) (निवडणूक निर्णय अधिकारी पुस्‍तिका, प्रकरण १०) (टपाली मतपत्रिका आदेश २००१, दिनांक १६.१.२००१)

टिप-१: हद्‍दपार केलेल्‍या व्‍यक्‍ती, तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात, विशेष परवानगी व बंधपत्र सादर करून मतदानासाठी परत येऊ शकतात. (मु.पो.का. कलम ६३)

टिप-२: कारागृत शिक्षा भोगत असलेल्‍या किंवा प्रवासादरम्‍यान (Transit) कारागृहात असलेल्‍या व्‍यक्‍तींना मतदानाचा अधिकार नाही. [लो. प्र. कायदा १९५१, कलम ६२(५)]

 ६५१. 'प्रॉक्सी मतदान' (Proxy voting):  सशस्‍त्र सेना दलातील व्यक्ती जर मतदानासाठी प्रत्‍यक्ष उपस्थित रहाण्‍यास असमर्थ असेल तर, त्‍याला त्‍याच्‍या कुटुंबातील एखादी व्‍यक्‍ती जी, वयाने सज्ञान असून त्याच मतदारसंघात राहते, भारतीय नागरिक आहे आणि ज्‍यावर त्या मतदारसंघाच्या मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी त्‍यावर करण्यास बंदी नाही अशा व्‍यक्‍तीला स्‍वत:तर्फे मतदान करण्‍यासाठी नियुक्‍त करता येते. फॉर्म १३-फ विहित पध्‍दतीने भरून सादर केल्‍यानंतर निवडणूक आयोगातर्फे अशा बाबतीत स्‍वतंत्र यादी पुरविण्‍यात येते. अशा मतदारांना मतदार यादीत 'वर्गीकृत मतदार' (व से म) म्हणून वर्गीकृत करण्यात येते. प्रॉक्सी मतदान करणार्‍या व्यक्तीच्‍या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावली जाते.

 ६५२. 'प्रदत्त मतदान' (Tender vote): एखादा मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्यावर असे निदर्शनास आले की, त्या व्यक्तीचे नावे कोणीतरी व्‍यक्‍ती यापूर्वीच मतदान करून गेली आहे. तथापि, आता आलेली व्यक्ती त्याच्या ओळखी विषयी समाधानकारक पुरावे सादर करीत असेल तर त्याला प्रदत्त मतदान करण्याची परवानगी देण्‍यात येते. त्‍याचे मतदान ‘प्रदत्त मतपत्रिका’ असे लिहिलेल्‍या  मतपत्रिकेवर बाण-फुलीच्या चिन्‍हाच्‍या सहाय्‍याने केले जाते. ईव्हीएम मशीनवर असे मतदान करता येत नाही. त्‍या मतपत्रीकांचा स्‍वतंत्र हिशोब ठेवला जातो व विहित पाकीटात त्‍यांना सीलबंद करण्‍यात येते. मतमोजणीच्‍या वेळेस या प्रदत्त मतपत्रिका’ मोजल्‍या जात नाहीत. 

 ६५३. आव्हानीत मत (Challenged Vote): ज्‍या व्‍यक्‍तीचे नाव मतदार यादीत आहे त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र एखाद्‍या मतदाराचे नाव, पहिल्‍या मतदान अधिकार्‍याने मोठ्‍याने पुकारले असता, उमेदवार अथवा त्याच्या प्रतिनिधीने त्‍या मतदाराच्या ओळखीस आव्हान दिले आणि तो मतदार बनावट असल्याचे सांगितले तर मतदान केंद्राध्‍यक्षाला संक्षिप्त चौकशी करून याबाबत निर्णय घ्यावा लागतो. अशावेळी ज्‍या मतदान प्रतिनिधीने मतदाराच्या ओळखीस आव्हान दिले आहे त्‍याच्‍याकडून रुपये दोन इतकी रक्कम अनामत म्हणून ठेवून घेतात आणि त्याला विहित नमुन्‍यातील पावती देतात.  

संबंधित मतदाराची चौकशी केल्यानंतर असा मतदार खरा असल्याचे पुराव्‍यांसह निष्‍पन्‍न झाल्‍यास त्याला मतदान करण्‍याची परवानगी दिली जाते व रुपये दोन अनामत रक्कम जप्‍त करावी. परंतु असा मतदार खरा नसल्याचे आणि बोगस मतदार असल्‍याचे निष्पन्न झाल्यास त्याला मतदान करण्‍यास प्रतिबंध करून आणि लेखी तक्रार करून पोलिसांच्या ताब्‍यात दिले जाते व रुपये दोन अनामत रक्कम आक्षेप घेणार्‍या उमेदवारास अथवा त्या मतदार प्रतिनिधीस परत केली जाते. या घटनेची नोंद केंद्राध्‍यक्षाच्‍या दैनंदिनीमध्‍ये आणि विहित नोंदवहीत करण्‍यात येते.  

 ६५४. अभिरूप मतदान (Mock Poll): मतदानासाठी विहित केलेल्‍या वेळेच्‍या एक तास आधी, मतदान प्रतिनिधींच्‍या उपस्‍थितीत अभिरूप मतदान घेण्‍यात येते. तथापि, मतदान केंद्राध्‍यक्ष मतदान प्रतिनिधी उपस्‍थित होण्‍याची पंधरा मिनिटे वाट पाहतात, त्‍यानंतर एकच मतदान प्रतिनिधी उपस्‍थित असेल किंवा एकही मतदान प्रतिनिधी उपस्‍थित नसेल तरी अभिरूप मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाते. अभिरूप मतदानात प्रत्‍येक उमेदवाराला किमान एक "नोटा" मत देऊन किमान पन्‍नास मतांचे मतदान घेण्‍यात येते. सर्व मतदान यंत्रे योग्‍यरित्‍या काम करीत आहे याची खात्री आणि प्रदर्शन करण्‍यासाठी ही तरतूद आहे.

 ६५५. चाचणी मतदान (Test Vote): मतदान करतांना जर मतदाराला, त्याने ज्या उमेदवाराला मतदान केले आहे त्या उमेदवाराव्यतिरिक्त अन्य उमेदवाराची स्‍लिप VVPAT यंत्रावर दिसून आल्यास तो मतदान केंद्राध्यक्षाकडे याबाबत तक्रार करू शकतो. अशा वेळी मतदाराकडून विहित नमुन्‍यात घोषणापत्र करून घेतात. यानंतर मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम सदर घटना चित्रीकरण करण्‍याची व्‍यवस्‍था करून उपस्‍थित उमेदवार प्रतिनिधींच्याबरोबर संबंधीत मतदाराला मतदान कक्षात घेऊन जातो व त्‍याला पुन्‍हा मतदान करण्‍यास लावतो. मतदाराची तक्रार खोटी आढळल्‍यास त्‍याच्या विरुध्द भा..वि.कलम १७७ अन्वये गुन्हा दाखल केला जातो. तक्रारीत तथ्‍य आढळल्‍यास तात्‍काळ VVPAT यंत्र बदलले जाते.

 ६५६. व्हिव्हिपॅट (VVPAT):  व्‍होटर व्‍हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (Voter Verifiable Paper Audit Trail) हे उपकरण निवडणुकीत मतदान यंत्राला (बॅलेट युनिटला) जोडले जाते. या सुविधेमुळे मतदाराला, त्‍याने कोणत्या उमेदवाराला मत दिले आहे हे VVPAT वरील स्‍क्रीन मधून जाणार्‍या चिठ्ठीवर दिसते.

 ६५७. गं. भा.:  गंगा-भागीरथी. विधवा स्त्रीला विधवा म्‍हणणे अपमानास्‍पद वाटु नये म्‍हणून विधवा स्त्रीच्या नावाअगोदर गं. भा. असे लिहिण्‍याची पध्‍दत होती.  

 

६५८. को’ किंवा ‘कोम’: जुन्या फेरफार नोंदीत काही महिलांच्या नावानंतर, तिच्या पतीच्या नावापूर्वी ‘को किंवा ‘कोम’ असे लिहिलेले आढळते. असे लिहिलेले असल्‍यास त्‍या महिलेचा पती मयत असून  ती महिला विधवा असल्याचे समजण्यात येत होते. उदा. कौशल्‍याबाई कोम शांताराम पंडीत (विधवा कौशल्‍याबाई)

 

६५९. भ्रतार:  जुन्या फेरफार नोंदीत काही महिलांच्या नावानंतर, तिच्या पतीच्या नावापूर्वी ‘भ्रतार’ असे लिहिलेले आढळते. असे लिहिलेले असल्‍यास त्‍या महिलेचा पती जीवंत/हयात आहे असे समजण्यात येत होते. उदा. अनुसयाबाई भ्र. भगवानराव देशमुख.

 ६६०. मे. जा. व्हावे: मेहेरबानास जाहीर व्हावे.

 ६६१. अ. शा. पत्र: अर्ध शासकीय पत्र (Demi Official Letter)

 ६६२. दा. ता.:  दाखल तारीख (टपालावर)

 ६६३. द. दा.:  दफ्तरी दाखल (फाईल/ टपाल दफ्तरी दाखल करण्यासाठी)

 ६६४. नि. स. प्र.: नियंत्रित सत्ता प्रकार

६६५. खु.: खुद्द, स्‍वत:

 ६६६. न. श.: नवीन शर्त

 ६६७. नळपाट: पूर्वी जुन्या शहर/ गावांना पाण्याची सुविधा पुरवितांना खूप लांब अंतरावरून मातीच्‍या खापरी पाइपने जमिनीमध्ये चर खोदून पाणी आणले जात होते. ज्या जमिनीच्‍या भागा मधून असे खापरी पाइप टाकून पाणी आणले जात होते त्या जमिनीच्‍या भागास नळपाट असे संबोधले जाते.

 ६६८. हरदास बिदागी: हिंदू मंदिरांमधील मूर्तींसमोर गायन, वादन आणि पठण करण्याच्‍या व्यावसायिक प्रवीणतेसाठी भत्ते देणे.

(Hardas Bidagi means allowances for professional proficiency in singing, playing, and reciting before idols in Hindu temples.)

 ६६९. पन्थनी: मोठ्या रस्‍त्‍याच्या जवळची जागा. अशा ठिकाणी गाडीवाले गाड्या उभ्या करून पाणी मागण्यासाठी येतात. पांथस्थ (वाटसरू) विश्रांतीसाठी येऊन बसतात व गप्पागोष्टी करतात.

 ६७०. सोण्डी:  म्हणजे हौद, जेथे हौद किंवा दुसरा अशाच प्रकारचा जलाशय असतो तेथे पाणी पिण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी अनेक लोक येतात.

 ६७१. पट्टन: बाजाराची जागा, तळ. येथे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बाजार भरत असतो.

 ६७२. 'जळीपळीची' भांडणे: एकाने दुसऱ्याची बायको पळवून नेणे किंवा विधवा अगर कुमारिका स्‍त्री गरोदर राहणे. अशा भांडणांत जातपंचायत बोलवून जातपाटील अपराध्यास शासन करीत असे.

 ६७३. 'तेल-गोटी'चे प्रमाण: गुन्हेगार जातीत एकमेकांच्या दगाबाजीबद्दलचा न्याय जातपंचायत मार्फत होत असे. त्याला प्रमाण, इमान किंवा दिव्य म्हणत. आपल्या साथीदाराला चोरून जर एखाद्या भामट्याने चोरीचा माल बळकावला आहे असा संशय आला तर जातपंचायत कढईत तेल कढवित असे आणि त्या कडकडीत तेलातून अंगठी, रवा, गोटी किंवा पैसा टाकत. ज्यावर तोहमत असेल त्याला त्या कडकडीत तेलातून ती अंगठी, रवा, गोटी किंवा पैसा हाताने काढण्‍यास सांगत. तेलाने जर त्याचा हात भाजला नाही तर तो निर्दोष आहे असे समजत. याला 'तेल-रवा' किंवा 'तेल-गोटी'चे प्रमाण म्‍हणत. निर्दोष व्‍यक्‍तीचे हात भाजत नाहीत कारण त्याच्या आत्म्याला सत्याचे आवरण असते अशी श्रध्‍दा होती. सीतेची अग्निशुद्धी पुराण प्रसिद्ध आहे.

 ६७४. बिछायती: बाहेरून- अन्‍य ठिकाणाहून आलेली व्‍यक्‍ती. त्‍यामुळेच जुन्‍या काळी घराच्‍या बाहेर ओट्‍यावर बाहेरून आलेल्‍या व्‍यक्‍तीसाठी बिछायती (चटई, चादर, जाड कापड) टाकून ठेवत असत.

 ६७५. वसवा: मोठ्‍या झाडाच्‍या सावलीमुळे, त्‍या सावलीखाली पीक न येणारे क्षेत्र.

 ६७६. रिबेट: नियमितपणे कर्जाचे हप्‍ते भरल्‍यास बँकेकडून कर्ज भरणार्‍याला दिलेली सूट.

 ६७७. सागुती: शिकारीच्‍या मटनाचा रस्‍सा.

 ६७८. सारवटगाडी: ज्‍या बैलगाडीला बंद असे लाकडी फळ्यांच्या छताचं आवरण असून दोन्ही बाजूला दोन रेशमी पडदे लावलेल्या खिडक्या असतात. गाडीवानाला देखील आतली व्यक्ती दिसणात नाही.

 ६७९. मोहतर: शूद्र स्त्रीचे किंवा शुद्र पुरुषाचे दुसरे लग्न किंवा विधवेसोबत विवाह

 ६८०. आबादी देह: गावातील वस्तीचे क्षेत्र.

 ६८१. अक्स (Copy): प्रत, नक्‍कल

 ६८२. बाहुक्‍म अदालत: न्‍यायालयीन आदेशान्‍वये.

 ६८३. बदस्तूर (Unaltered): अपरिवर्तित, कोणताही बदल न करता, जसे आहे तसे.

 ६८४. बहिस्सा बराबर (Equal division): समान वाटणी.

 ६८५. बैय: जेव्हा एखादी व्यक्ती आपली जमीन पूर्णपणे किंवा अंशतः दुसर्‍या व्यक्तीला विकते तेव्हा या प्रकारचे फेरफार नोंदीला बैय किंवा विक्री म्हणून ओळखले जाते.

 ६८६. बनाम: च्या नावाने.

 ६८७. जलसाआम: समाजाचा मेळावा.

 ६८८. कारगुजारी: प्रगती अहवाल. (Progress Report).

 ६८९. खाक दस्ती: हाताने केलेले रेखाटन (Hand Sketch)

 ६९०. लंबरदार: गावाचा प्रमुख

 ७००. मुजारा: जो कूळ जमीन मालकाला महसूल/कर देतो.

 ७०१. मुन्द्रजा: वर लिहिल्‍याप्रमाणे (Ditto).

 ७०२. तक्कावी: सरकारने जमीन मालकाला शेतीच्या कामासाठी दिलेले कर्ज.

 ७०३. सकूनत: निवास स्थान

 ७०४. पडत सरकार: महसूल अभिलेख कक्षात जतन करण्‍यात येणारी अभिलेखाची प्रत. 

 ७०५. पडत पटवार: पटवारी/ तलाठीकडे ठेवण्‍यात येणारी अभिलेखाची प्रत. 

 ७०६ फर्द: जमाबंदी नक्‍कल. एखाद्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या जमिनीच्या नोंदींची प्रत ज्यामध्ये मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, मालकांचे हिस्‍से आणि जमिनीत केलेली लागवड, जमीनीचे भाडे, जमीन महसूल आणि इतर उपकर नमूद असतात.

 ७०७. फर्द बदर: महसूल अभिलेखातील चूक दुरूस्‍त करणे.

 ७०८. इकरारनामा (Mutual Agreement): परस्पर करार.

 ७०९. लत्ता गिरदावरी: पटवारी/तलाठी कडील गाव नकाशाची कापडावर छापलेली प्रत.

 ७१०. मुख्तियारनामा: परवाना, अधिकार पत्र.

 ७११. संचकार: अगाऊ रक्‍कम (advance)

 ७१२. संस्कार: समाजयोग्य नागरीक बनवण्यासाठी जन्माच्या पूर्वीपासून मृत्यूपर्यंत चालणाऱ्या या शुद्धीकरण क्रियेत खालील संस्कार येतात.

गर्भाधान - जेव्हा गर्भाशयात गर्भाची स्थापना होते.

पुंसवन - गर्भाच्या तिसऱ्या महिन्यात पुत्रप्राप्तीसाठी

 सीमंतोनयन – गर्भिणीचे अनिष्टकारी शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी

 जातकर्म - बालकाच्या जन्माच्या वेळी

नामकरण - जन्माच्या १०व्या किंवा १२व्या दिवशी

निष्क्रमण - बालकाचे घराच्या बाहेर येणे.

अन्नप्राशन- बालकांना अन्न भरवणे (सामान्यतः जन्माच्या सहाव्या महिन्यात)

चूडाकर्म - बालकांचे केस कापणे (जन्माच्या पहिल्‍या किंवा तिसर्‍या वर्षी)

कर्णवेधन जन्माच्या पहिल्‍या, तिसर्‍या किंवा पाचव्‍या वर्षात

विद्यारंभ - जन्माच्या ५व्या वर्षी.

उपनयन - गुरूच्या आश्रमात येण्यापूर्वी तीन धागे धारण करून द्विज अवस्था प्राप्त करणे. या संस्काराचा संबंध शिक्षणाशी आहे.

वेदारंभ - गुरू आश्रमात वेद पाठांतराच्या वेळी.

केशांत (गोदान) - विद्यार्थी प्रथमच दाढी-मिशा कापतो

समावर्तन - हा संस्कार गुरूकडून गुरुकुलातील शिक्षण संपल्‍या नंतर स्‍नान करून केला जातो.

¡ विवाह - 

प्रकार: ग्रह्मसूत्रात ८ प्रकारच्या विवाहाचे वर्णन आहे.

ब्रह्मविवाह याप्रकारात वधूपिता स्वतः आपली कन्या वराला घरी बोलावून सोपवत असे. हा विवाह प्रकार सर्वोत्तम आणि सर्वाधिक प्रचलित विवाह प्रकार होता.

दैवविवाह - ब्राह्मणाकडून यज्ञ विधी करवून कन्यादान केले जात असे.

आर्यविवाह - वराकडून गाय किंवा बैल जोडी घेवून कन्यादान केले जात असे.

प्रजापत्य विवाहपित्‍याकडून वधू-वरांना कर्तव्य निर्वाहाची वचनबद्धता घेवून विवाह केला जात असे.

असूर विवाह - यात पिता कन्येची विक्री करत असे.

गंधर्व विवाह - प्रेम विवाह, स्वयंवर हे गंधर्व विवाहाचे रूप होते.

राक्षस विवाह कन्‍येचे अपहरण करून तिच्‍याशी विवाह केला जात असे. क्षत्रिय लोकांमध्ये या विवाहास मान्यता होती.  

पिशाच विवाह – महिलेवर जबरदस्ती बलात्कार करून तिच्‍याशी विवाह केला जात असे. हा विवाह प्रकार सर्वात निकृष्ट दर्जाचा मानला जातो.

अंतेष्टी - मृत्‍युनंतरचे अंतिम विधी, अंतिम संस्कार.

 

७१३. धोंडा मास: ज्‍या काळात सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करीत नाही त्‍या काळाला अधिक मास किंवा मल मास म्‍हणतात. या महिन्‍यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्‍यामुळे हा महिना व्‍यर्थ महिना असतो. म्‍हणून त्‍याला धोंडा मास किंवा धोंड्‍याचा महिना म्‍हणतात.   

 

७१४. 'शेतकरी': व्‍यक्‍तिश: जमीन कसणारी व्‍यक्‍ती.

                                       [महाराष्‍ट्र कुवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(२)]

जर एखाद्या व्‍यक्‍तीची जमीन सार्वजनिक कामासाठी संपादित झाली असेल तर महाराष्ट्र कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३ अन्वये त्‍याला, अशा संपादनासाठी त्‍याच्‍या जमिनीचा कब्जा घेतल्याच्या तारखेपासून १० वर्षेपर्यंत ती व्‍यक्‍ती शेतकरी असल्याचे मानण्यात येत होते. या कलमात दिनांक २७.५.२०१४ च्‍या शासन राजपत्रानुसार सुधारणा होऊन उपरोक्‍त व्‍यक्‍तीच्‍या वारसांनाही शेतकरी मानण्यात यावे अशी सुधारणा केली आहे.

कोणत्‍याही व्‍यक्‍तीने शेतीची जमीन नोंदणीकृत कागदपत्रान्‍वये विकत घेतली असल्‍यास ती व्‍यक्‍ती शेतकरी आहे की नाही हे ठरविण्‍याचा अधिकार दिवाणी न्‍यायालयाला नसून तो योग्‍य त्‍या अधिकार्‍याचा आहे. (हौसाबाई पां. झवर वि. सुभाष श्री. पाटील, २००६(५), महा. लॉ जर्नल ७६५ ; २००६(६) ऑल महा. रिपो.(ए.ओ.सी.)

 

७१५. 'बेदखल कुळ ': कुळाने-

अ) कोणत्‍याही महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्‍या त्‍या वर्षांच्‍या ३१ मे पूर्वी न भरल्‍यास,

ब) जमिनीची खराबी अथवा कायम स्‍वरुपी नुकसान होईल असे कृत्‍य जाणूनबुजून केल्‍यास,

क) जाणूनबुजून महाराष्‍ट्र कुवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्‍या कलम २७ चे उल्‍लंघन करुन जमिनीची पोट विभागणी, पोटपट्‍टा किंवा अभिहस्‍तांतरण केल्‍यास,

ड) व्‍यक्‍तीश: जमीन न कसल्‍यास,

इ) जमिनीचा उपयोग शेती किंवा शेतीसंलग्‍न जोडधंद्‍यासाठी न करता इतर प्रयोजनांसाठी केल्‍यास,

कूळ  कसूरवार ठरतो. जमीन मालकाने कुळास तीन महिन्‍यांची लेखी नोटीस देऊन कूळ वहिवाट समाप्‍त करू शकतो. अशा कसूरवार कुळास जमिनीतून घालवून दिल्‍यास त्‍याला बेदखल कुम्‍हणतात.

                                             (महाराष्‍ट्र कुवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, कलम १४)

 

७१६. 'अनुसूचित जाती' (Scheduled caste): भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३४१ अन्वये, अनुसूचित जाती म्हणून समजण्यात येत असतील अशा जाती, वंश किंवा जमाती अशा जातीचे, वंशाचे किंवा जमातीचे भाग किंवा त्यातील गट.

                [महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१, नियम २()]

 

७१७. 'विधि व्यवसायी': अधिवक्त्यांबाबत अधिनियम, १९६१ मध्‍ये नमूद संज्ञेच्‍या अर्थाप्रमाणे.  

                                                                                                       [म.ज.म.अ. कलम २(२०)]

 

७१८. 'मान्यताप्राप्त अभिकर्ता': म.ज.म. अधिनियमान्वये करण्‍यात येणार्‍या कार्यवाहीत कोणत्‍याही पक्षकाराच्‍यावतीने उपस्थित राहण्यासाठी, अर्ज करण्यासाठी आणि इतर कामे करण्यासाठी लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती.                                                                         [म.ज.म.अ. कलम २(२९)]

 

७१९. 'मागास वर्ग': अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द, परिशिष्ट मध्ये

विनिर्दिष्ट केलेल्या विमुक्त जाती, परिशिष्ट मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या भटक्या जमाती परिशिष्ट मध्ये विनिर्दिष्ट केलेले इतर मागास वर्ग.

[महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१, नियम २()]

 

७२०. लोकसेवक (public servant ): शासनाच्‍या/ स्‍थानिक प्राधिकरणाच्‍या सेवेत असलेली किंवा शासनाकडून वेतन घेणारी किंवा कोणतेही सार्वजनिक कर्तव्‍य पार पाडण्‍यासाठी शासनाकडून फी किंवा कमिशनच्‍या स्‍वरूपात पारिश्रमिक घेणारी कोणतीही व्‍यक्‍ती.

                                                      [भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मध्‍ये कलम २(क)]

मुख्‍यमंत्री, सर्व मंत्री वर्ग हे लोकसेवक आहेत. (करूणानिधी वि. भारतीय महासंघ- एआयआर १९७९, सर्वोच्‍च न्‍या. ८७८) 

 

७२१. 'हितसंबंधित' (Interested person): हितसंबंधिताची व्याख्या ही प्रकरण परत्वे भिन्‍न असते. दाखल करण्‍यात आलेल्‍या प्रकरणाशी किंवा झालेल्‍या व्‍यवहाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असणार्‍या सर्व व्‍यक्‍ती, संस्‍था यांचा समावेश 'हितसंबंधित' या व्‍याख्‍येत करण्‍यात येतो. दाखल करण्‍यात आलेल्‍या प्रकरणाची किंवा झालेल्‍या व्‍यवहाराची समज सर्व हितसंबंधितांना व्‍हावी म्‍हणून नोटिस बजावण्‍याची तरतुद नैसर्गिक न्‍याय तत्‍वात सुध्‍दा करण्‍यात आली आहे. कोणत्‍याही प्रकरणात एखादी जादा नोटीस बजावली तरी अडचण येत नाही. उलट अधिक पारदर्शकता येते.

 

७२२. फाजिंदार आणि फाजिंदारी कुळे: नियत जमीन भाडे भरून, सेवानिवृत्ती कर भू-धारणापद्धतीवर राज्य शासनाकडून जमीन अखंडतेने धारण करीत असेल आणि जिने इमारती इतर बांधणी उभारण्याच्या प्रयोजनार्थ अशी जमीन किंवा तिचे भाग, इतर व्यक्तींना रूढ किंवा संमत भाडे भरल्यावर पट्ट्याने दिलेली असेल अशी व्यक्ती, ज्या इतर व्यक्तींना अशी जमीन किंवा तिचे भाग पट्ट्याने देण्यात आले असतील त्या व्यक्तींनाफाजिंदारी कुळेअसे संबोधण्यात येईल.

[म.ज.म.अ. संकीर्ण- मुंबई शहर (इनामी विशेष) भू-धारणापद्धती नाहीशा करण्याबाबत आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (सुधारणा) अधिनियम, १९६९, नियम २(४)]

 

७२३. प्रकल्पबाधित व्यक्ती (Project affected person):  

() एखाद्या प्रकल्पाच्या प्रयोजनाकरिता, ज्या भोगवटादाराची प्रकल्पबाधित परिमंडलातील जमीन (गावठाणातील जमीन धरून) संपादित करण्यात आली असेल, अशी भोगवटादार व्यक्ती. जेथे एखाद्या शेत जमिनीची, संबंधित गावाच्या अभिलेखातील नोंद, अविभक्त हिंदू कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा व्यवस्थापक म्हणून कोणत्याही एका भावाच्या नावे केलेली असेल, तेथे, प्रत्येक भावाला (किंवा मृत भावाचा मुलगा किंवा मुलगे यांना संयुक्तपणे) त्या जमिनीत हिस्सा राहील, मग त्याचे नाव अशा गावाच्या अभिलेखात नोंदलेले असो नसो, आणि त्यास प्रकल्पबाधित व्यक्ती म्हणून मानण्यात येईल.

() जमिनीच्या संपादनाच्या वेळी जिच्याकडे संबंधित कूळ वहिवाट कायद्यान्वये बाधित परिमंडलातील जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असेल अशी व्यक्ती.

() लाभधारक परिमंडलातील ज्या भोगवटादार व्यक्तींची जमीन, मोठ्या मध्यम पाटबंधारे प्रकल्पांखालील कालवे त्यांचे किनारे यांचे बांधकाम, विस्तार, सुधारणा किंवा विकास यांसाठी किंवा बाधित परिमंडलातील व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी नवीन गावठाण बसविण्यासाठी संपादित केली असून,

(एक) संपादनानंतर जिची उर्वरित लागवडयोग्य धारण जमीन हेक्टरहून कमी झाली आहे किंवा

(दोन) जिची उर्वरित धारण जमीन अशा तुकड्यांमध्ये विभागली गेली आहे, की ते लागवडीच्या दृष्टीने फायदेशीर राहिलेले नाहीत किंवा

(तीन) जिची उर्वरित धारण जमीन लागवडीस अयोग्य ठरली आहे. अशी भोगवटादार व्यक्ती.

               [संकीर्ण- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, नियम २(२)]

 

७२४. 'भूमिहीन व्‍यक्‍ती': ज्‍या व्‍यक्‍तीने, शेतीच्‍या प्रयोजनासाठी मालक म्‍हणून किंवा कूळ  म्‍हणून कोणत्‍याही प्रकारची शेतजमीन धारण केलेली नाही व जी व्‍यक्‍ती मुख्‍यत: अंगमेहनतीने आपली उपजीविका करते आणि जिचा शेतीचा व्‍यवसाय करण्‍याचा हेतू आहे व ती जमीन कसण्‍यास समर्थ आहे.

                                                (महाराष्ट्र कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ९-अ)

 

७२५. 'अल्‍पभूधारक शेतकरी': मुख्‍यत: शेती करून किंवा शेतमजुरी करून उपजिविका करणारी, निर्वाहक क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेली जमीन (२.५ एकर पासून एकर पर्यंत) क्षेत्र धारण करणारे कसणारी व्‍यक्ती.                                                [महाराष्‍ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम २(१६-ब)]

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महसूल शब्दावली - 11. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.