आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

महसूल शब्दावली - 7

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

२९२. भूमि-अभिलेख (Land Records): महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या पबंधान्वये किंवा त्याच्या प्रयोजनांकरिता ठेवलेले अभिलेख आणि त्या संज्ञेत राज्यात अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने कोणत्याही क्षेत्रात अंमलात आलेल्या आणि अशा कायद्यान्वये किंवा अन्यथा कोणत्याही महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आलेल्या अंतिम नगर रचना योजनेचे, सुधारणा योजनेचे किंवा धारण जमिनीच्या एकत्रीकरण योजनेचे नकाशे किंवा आराखडे यांच्या प्रतीचा समावेश होतो तसेच यामध्ये ज्या प्रकरणात रीतसर किंवा संक्षिप्त चौकशी करण्यात येते अशा सर्व प्रकरणांतील निर्णय, आदेश व त्याबाबतची कारणे यांच्या व सादर केलेल्या कागदपत्रांच्या अधिकृत प्रती व अनुवाद, नकाशे आणि जमिनीसंबंधीचे अभिलेख, दस्तऐवज, योजना, नोंदवह्या, लेख यांचाही समावेश होतो.

भूमि-अभिलेखांच्या प्रतींचे निरीक्षण, शोध व पुरवठा यासाठी लागणारी योग्य ती फी दिल्यानंतर प्रमाणित प्रती पुरविल्या जातात अगर निरीक्षण करून दिले जाते.

[म.ज.म.अ. कलम २(१८); ... (भूमि अभिलेखांच्या प्रतीचे निरीक्षण, शोध व पुरवठा) नियम १९७०]

 

२९३. टिपण बुक:  'टिपण बुक' म्हणजे जमिनीचा अपरिमाणित नकाशा असतो. ब्रिटीश काळात सर्वप्रथम शेतजमिनीची मोजणी शंकू आणि साखळीच्या सहाय्याने मोजणी करून संबंधित जमिनीचे नकाशे तयार करण्‍यात आले आणि त्यांना सर्व्हे नंबर देण्यात आले. प्रत्येक सर्व्हे नंबरचा नकाशा व क्षेत्र तयार करुन ठेवण्यात आले. त्यालाच 'भूमापनाचे मूळ अभिलेख' किंवा 'टिपण' असे म्हणतात. टिपण नकाशा हा परिमाणात नसतो. हे नकाशे भूमापन करताना सर्व्हे नंबरची सीमा निश्चित करण्यासाठी वापरले जातात.

  'टिपण' हे मोडी लिपीत आहे. त्‍यावेळी मराठवाडयात निजामशाही असल्‍याने तेथील काही भागात 'टिपण' उर्दूमध्ये आहे. टिपणामध्ये सर्व्हे नंबरची बाहय बाजू भरीव रेषेमध्ये व त्यावरील लंब तुटक रेषांनी दर्शविलेले असतात. त्यावर मोजणी केलेल्या साखळीची मापे लिहीलेली असतात. लंबामुळे तयार झालेल्या भागांना 'वसला' (त्रिकोण/ समलंब चौकन) म्हणतात, त्यांना लाल शाईने क्रमांक दिलेले असतात. या टिपणामध्ये संबंधित सर्व्हेनंबरचे लगत भूमापन क्रमांक व जागेवरील स्थिती (गावठाण रस्ते, पाऊल रस्तेबैलगाडी रस्ताओढाओघळीविहीरझाडे इ.) बाबी नमूद केलेल्या असतात.

या सर्व बाबींमुळे जमिनीच्या भूमापन क्रमांकाचे क्षेत्रफळ अचूक काढता येते. त्यामुळे सध्या केलेल्या मोजणीकामाची तपासणी/खात्री भूमापक टिपणाच्‍या आधारे करतो.

धारण केलेल्या प्रत्येक जमिनीचे (सर्व्हे नंबरचे), त्या जमिनीच्या आकारमानाप्रमाणे परिमाणात न काढलेलीआधार रेषा आणि लंब यांचे शंकुसाखळी नुसार 'रुपये/ आणे' या परिमाणात निश्चित मोजमापे, बांधमापेवसलाक्रमांकहद्दीच्या खुणा व लगतचे सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात. अशा पध्दतीने, जमिनीच्या आकारमानाप्रमाणे, परिमाणात न तयार केलेल्या अभिलेख म्हणजे 'टिपण' होय.

या 'टिपण'चे दोन उपप्रकार आहेत.

अ) कच्चे टिपण: प्रत्येक भूमापन क्रमांकाचे, धारण केलेल्या वहिवाटी नुसार कच्चेटिपण (परिमाणात नसलेले रेखाचित्र) तयार करण्यात येते. त्यात वहिवाटीच्या हद्दीच्या निशाण्या घेऊन शंकू साखळीचे आधारे साखळी व आणे याप्रमाणे मोजमापे दर्शवली जातात व प्रत्येक भूमापन क्रमांकास मोजणी केलेल्या क्रमानुसार चालता नंबर देण्यात येऊन लगत भूमापन क्रमांक लिहिले जातात. टिपण आकृतीचे मोजमापानुसार वसलेवार पध्दतीने भूमापन क्रमांकाचे क्षेत्र कायम करण्यात येऊन त्यावर एकूण क्षेत्र, बागायत क्षेत्र, तरी/गद्दी याचा उल्लेख असतो.

ब) पक्के टिपण: यामध्ये प्रत्येक भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढलेले रेखाचित्र असते. त्यावर बांधमापे दर्शवून चालता नंबर, अंतिम नंबर, शेताचे नाव व सत्ता प्रकार इत्यादी बाबी नमुद केल्या जातात.

 

२९४. ट्रँग्युलेशन नकाशे: भूमापन न झालेल्या नाम गावांची मोजणी सन १९५७ च्या सुमारास करण्यात आली. या गावांची मोजणी ट्रँग्युलेशन पध्दतीने करण्यात आली आहे. या शीटवर १:१०००परिमाणामध्ये सर्व्हे नंबर आणि हिस्सा नंबरचे नकाशे आहेत. या गावांतील सर्व्हे नंबर आणि हिस्सा नंबरच्या हद्दी कायम करण्यासाठी हे नकाशे वापरले जातात.

 २९५. नगर भूमापन नकाशे: नगरपरिषद, महानगरपालिका क्षेत्रामध्ये नगर भूमापन करण्‍यात आले.  लोकसंख्या दोन हजार पेक्षा जास्‍त असलेल्या गावांमध्ये गावठाण भूमापन करण्यात आले आहे. हे अभिलेख म्हणजे गावातील किंवा नगर भूमापन मर्यादेतील मिळकतींचा नकाशा आहे. हे नकाशे १:५०० या परिमाणामध्ये असून मिळकतींच्या हद्दी नेमक्या जाणून घेण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

२९६. फाळणी नकाशे: एखादया भूमापन क्रमांकाचे रीतसर हिस्से पाडण्यासाठी जागेवरील वहिवाटीची मोजणी करुन तयार केलेला नकाशा म्हणजे फाळणी नकाशा होय. फाळणी नकाशे हे सन १९५६ पर्यंत शंकू साखळीने तयार केले गेले. त्यानंतर ते फलक यंत्राच्‍या साहाय्याने तयार केले आहेत. फाळणी नकाशा आधारे पोटहिस्स्यांच्या गहाळ खुणांची स्थिती निश्चित करता येते. हद्दीचे वाद मिटविता येतात. ज्या भूमापन क्रमांकामध्ये पोटहिस्से पडलेले आहेत त्यांच्‍या हिस्स्याप्रमाणे असलेल्या हद्दी योग्य त्या स्केल प्रमाणे कायम करुनयामध्ये भूमापन क्रमांकाच्या हद्दी काळया शाईने व पोटहिस्याच्या हद्दी तांबडया शाईने दर्शवून त्यात त्या- त्या पोटहिस्स्याचा क्रमांक नमूद केलेला असतो. हे नकाशे सर्व प्रकारच्या जमीन मोजणी प्रकरणांमध्ये आणि सर्व्हे नंबरमधील हिस्सा क्रमांकाची सीमा निश्चित करण्यासाठी वापरले जातात.

 २९७. फेअर स्केच नकाशे: सर्व्हे नंबरमधील उपविभागाच्या मोजणीनंतर तयार केलेल्या फाळणी नकाशाची '' प्रत म्हणजे फेअर स्केच नकाशे आहेत. हिस्सा नंबरची हद्द कायम करण्यासाठी फाळणी नकाशा उपलब्ध न झाल्यास या नकाशांचा वापर केला जातो.

२९८. बंदोबस्त नकाशे: पूर्वीच्या मध्य प्रांत (नागूपर विभाग) मध्ये मूळ भूमापनाच्या वेळी १:४००० या परिमाणामध्ये ग्राम नकाशा तयार करण्यात आलेला आहे. मूळ भूमापनाच्या वेळी असणारी खसरा नंबरची हद्द समजण्यासाठी या नकाशाचा उपयोग होतो.

 २९९. बिनशेती मोजणी नकाशे: सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीने जेव्हा भूभाग किंवा त्यापैकी क्षेत्र शेतीतून अकृषिमध्ये रूपांतरीत केले जाते, तेव्हा लेआऊटचे मोजमाप केले जाते आणि संबंधित नकाशे तयार केले जातात.

 ३००. भूसंपादन मोजणी नकाशे: धरणे, रस्ते, महामार्ग आणि इतर सार्वजनिक उद्देशांसाठी शासन विविध जमीन धारकाकडून जमीन संपादन करते. अशा सर्व संपादनासाठी संबंधित भूसंपादन संस्थेसह विभागाद्वारे संयुक्त मोजणी सर्वेक्षण (Joint Measurement Survey) केला जातो. या नकाशामुळे जमिनीच्या भूभागाची अद्ययावत स्थिती समजते.

 ३०१. काटे फाळणी / फोडी टिपण: हे नकाशे सर्व्हे नंबर मधील उपविभागांची मोजणी करून तयार केले आहेत. हे नकाशे सुध्दा परिमाणात नसून ते टिपण स्वरूपात आहेत. हे नकाशे सर्व प्रकारच्या जमीन मोजणीवेळी वापरले जातात.

 ३०२. गटबुक नकाशे: फाळणी नकाशे आकसून त्यांचा A-4 आकाराच्या कागदावर तयार केलेला नकाशा म्हणजे गट बुक नकाशा. हे नकाशे सर्वसाधारणपणे १:२०००, १:४०००किंवा १: ८००० या परिमाणामध्ये उपलब्ध असून सर्व्हे नंबरमधील हिस्सा नंबरची हद्द निश्चित करण्यासाठी १:१ ०००या परिमाणामध्ये नकाशा तयार करावा लागतो.

 ३०३. शेतवार पत्रक किंवा सूड पत्रक: भूमि अभिलेख विभागाच्‍या ज्‍या पुस्तकात भूमापन क्रमांकानुसार क्षेत्र व आकार नमुद केलेला असतो.

 ३०४. कच्चा सुड: मुख्‍यत: कोकण विभागात एकूण क्षेत्र दाखवण्याकामी सुड वापराला जातो. त्यामध्ये भूमापन क्रमांक, पोट हिस्‍सा नंबरस्थळाचे नावजिरायतबागायत यांचे क्षेत्र व आकार नमूद असतो.

 ३०५. पक्का सुड: पक्‍का सुड मुख्‍यत: डोंगराळ भागातील गावासाठी ठेवण्यात येतो. यामध्ये भूमापन क्रमांक व त्यामध्ये पडलेल्या पोटहिस्स्याची स्केली आकृती असते. तसेच जमिनीचा प्रकार, भूमापन क्रमांक व पोट हिस्स्याचे असणारे खराब क्षेत्र व आकार नमूद असतो.

                        

३०६. दरवारी: दरवारी मध्ये भूमापन क्रमांक, प्रत नंबर, कच्चा व पक्का आकार व क्षेत्र नमूद असते.

 ३०७. क्लासर रजिस्टर: यात भूमापन क्रमांक / पोट हिस्‍सा नंबर, जमिनीचे प्रकार निहाय क्षेत्र, पोटखराबजिरायतबागायत व तरी याप्रमाणे दर व आकार नमूद केलेला असतो. तसेच जमिनीची गावापासून व पाण्यापासून असणारी लांबीमैल वरुन कायम एकरी दर काढलेला असतो.

 ३०८. प्रतिबुक: जमाबंदीच्‍यावेळी प्रतबंदी करतांना, प्रत्येक भूमापन क्रमांकाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन त्याचे ठराविक चौकोन आखुन त्या प्रत्येक भागाची प्रत ठरविली जाते. प्रत्येक भागाचे / जमिनीचे प्रतिवार निरीक्षण करुनत्याप्रमाणे विहित नमुन्यात प्रतवारी प्रमाणे भागआणे काढले जातात व त्या भाग आणे वरुन नंतर त्याचा एकरी दर कायम करुनआकार बसविण्याचे काम केले जाते. त्याच्या नोंदी प्रतिबुक नोंदवही मध्ये करण्यात येतात त्यामध्ये भूमापन क्रमांकमोजणी नंबरडागाचे नावकर्दाचे नावजमिनीचा प्रकारक्षेत्रखराबा क्षेत्रव लागवडी लायक क्षेत्रइत्यादी नोंदी घेतल्या जातात.

 ३०९. क्षेत्रबुक: मोजणी अंती भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढलेले रेखाचित्राचे क्षेत्र समाविष्ट असणारे मोजणीचे पुस्तक म्हणजे क्षेत्रबुक होय. यात धारकाचे नांवसर्व्हे नंबर व त्याचे क्षेत्रचालता नंबरइ. बाबी नमूद असतात.

 ३१०. वसलेवार बुक: भूमापन क्रमांकाचे क्षेत्र काढण्यासाठीत्‍या भूमापन क्रमांकाची काटकोनत्रिकोण व समलंब चौकोनात विभागणी करुन मोजमापाच्या सहाय्याने क्षेत्र गणना करण्याची पध्दत म्हणजे वसलेवार होय. मोजणी केलेल्या भूमापन क्रमांकाची शंकु पध्दतीने त्रिकोण आणि समलंब चौकोनामध्ये विभागणी करुननिश्चित परिमाणात मापे टाकण्यात येवूनगणितीय पध्दतीने प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्र नमुद करण्यात येते. अशा मोजणी केलेल्या सर्व भूमापन क्रमांकाची नोंद ज्या नोंद वहीत केलेली असतेत्या नोंदवहीस वसलेवार बुक असे म्हणतात.

 ३११. बागायत तक्ता: बागायत सर्व्हे नंबरसाठी तक्ता तयार करतात. हया तक्त्यात वर्गीकरण करताना जी माहिती सर्व्हेअरने प्राप्त करुन घेतलीती सर्व हयात नमुद केली जाते. विहीरीची नोंदसर्व्हे नंबरच्‍या हद्दी व हद्दीच्या निशाण्या (खुणा) तपासुन लिहून घेतात. वर्गकार सुध्दा प्रत्येक सर्व्हे नंबरची नोंद ठेवतात. त्या सर्व्हे नंबरचे गावापासूनचे अंतरही नोंदवतात. गाव नकाशा व गाव नोंदवही तयार करतात व ओलीताचे/पाण्याची साधने कोणकोणती आहेत. त्यांची नोंद त्यात करतात. तलाववोडी, कुंटा या पासुन शेतीला पाणी मिळते किंवा नाही याच्या नोंदी ठेवल्या जातात.

 ३१२. आकार बंद: गावातील जमिनीची प्रत्यक्ष भूमापन मोजणी व जमाबंदी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भूमापन क्रमांकाचे क्षेत्र वसलेवार पध्दतीने काढले जाते. क्षेत्र काढताना जिरायतबागायत, तरी (भातशेती) इत्यादी वेगवेगळे क्षेत्र नमुद केले जाते. त्याप्रमाणे आकारबंद तयार केला जातो.  व त्‍या आधारे तलाठी गाव नमुना एक तयार करतात. एखादया गावाचे एकूण क्षेत्र, भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक, त्यांचे प्रत्येकी क्षेत्र, आकारलागवडीचे क्षेत्रपोटखराबसत्ताप्रकारप्रतवारीमीन महसूल आकारणी, जमाबंदीची मुदत तसेच एकूण क्षेत्र कोण-कोणत्या प्रकाराखाली किंवा प्रयोजनासाठी वापरात आहेत्याचा तपशील आकारबंदामध्ये दर्शवला जातो. गावचे एकूण क्षेत्रलागणी लायकखराबा त्याचा आकार या नोंदी केल्या जातात.

आकारबंदाच्‍या शेवटच्‍या पानावर संपूर्ण भूमापन क्रमांकाच्या क्षेत्राची/ आकाराची बेरीज, जमिनीच्‍या विविध प्रकार निहाय दर्शविलेली असते. तसेच गावठाणनदया, नालेशिवेवरील भागओढारस्तेकॅनॉल, तलावरेल्वेइ. क्षेत्राचा वेगळा उल्लेख असतो आणि शेवटी वर उल्लेख केलेल्या सर्वांचे क्षेत्राची एकत्रीत बेरीज केलेली असते. त्यास 'जुमला बेरीज' असेही म्हणतात. या आकारबंद वरून तलाठी गाव नमुना एक तयार करीत असत.

 ३१३. गाव नकाशे: गाव नकाशा हा भूमापन अभिलेख आहे. कारण तो गावचे सर्व भूक्रमांक दर्शवितो. गाव नकाशा एक इंच = २० साखळी किंवा १० साखळी या परिमाणात काढला जात होता. दशमान पध्दत सुरु केल्यानंतर मोजणी प्रमाणित दशमान साखळीने केली जाते आणि गाव नकाशे १:५००० व १:१०००० या परिमाणात तयार केले जातात. गाव नकाशामध्ये गावातील गावठाणझाडे, विहिरी, डोंगरटेकडीओढाओघळीगाडी रस्तेपाणंद रस्तेपक्के रस्ते इ. बाबी नमूद असतात. गाव नकाशाच्या आधारे एखादया गट नंबरच्या किंवा गावाच्या दिशादर्शक चतु:सीमा समजून येतात. ज्या गावामध्ये एकत्रीकरण योजना अंमलात आली अशा गावामध्ये सर्व्हे नंबर ऐवजी एकत्रीकरणानंतर त्यास गट नंबर असे संबोधले गेले.

 ३१४. 'आकारफोड पत्रक': सर्व्हे नंबर/गट नंबरचे उपविभाग पडल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळात झालेल्या बदलानुसार भूमि अभिलेख विभागाने तयार केलेले दुरुस्ती पत्रक म्‍हणजे आकारफोड पत्रक. भूमापनाचे वेळी सर्व्हे नंबरचे क्षेत्र व आकार, एकत्रिकरण योजनेवेळी गटाचे क्षेत्र व आकार कायम केलेला आहे. सदरहू सर्व्हे नंबर अथवा गट नंबर मध्ये पोटहिस्सा मोजणीने, न्‍यायालयीन वाटपाने, भूसंपादनाने किंवा बिनशेती आदेशाने सदरहू सर्व्हे नंबर अथवा गट नंबरचा आकार कमी-जास्त केला जातो त्या पत्रकाला आकारफोड पत्रक असे म्हणतात.

३१५. 'भू-मापन निशाणी': म.ज.म.अ. च्‍या प्रयोजनांसाठी भू-करासंबंधी (कॅडस्ट्रल) भू-मापनाच्या प्रयोजनांसाठी उभारण्यात आलेली निशाणी.                                [म.ज.म.अ. कलम २(३६)]

 

३१६. अधिकृत सीमा चिन्हे व भू-मापन चिन्हे:  

(अ) सलग सीमाचिन्हे :

(१) सीमापट्टा,

(२) धुरा, सरबांध किंवा कुंपण आणि भिंतीखाली इतर कायम स्वरूपाची सलग बांधकामे.

(ब) खंडित चिन्हे :

(३) ओबडधोबड आकार दिलेले लांबुडके दगड.

(४) ताशीव दगडाचे खांब किंवा सिमेंटचे चिरेबंदी खांब किंवा निमुळता पाया घालून जमिनीत घट्ट बसविलेले सिमेंट किंवा चुना यांचे खांब किंवा माती, सिमेंट किंवा चुन्यामध्ये बसविलेल्या पक्क्या विटांचे बनविलेले खांब.

(५) लोलकाकृती, आयताकृती किंवा कोणाकृती उंचवटा किंवा सुट्या दगडांचा बुरुज.

(६) भू-भागासाठी योग्य वाटतील अशी संचालकांनी मान्यता दिलेली इतर चिन्हे, उदा. कोकणच्या किनारपट्टीवरील दलदलीच्या प्रदेशातील सागवानी खांबाची चिन्हे.

परंतु, संचालक, त्याबाबतच्या कोणत्याही सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे

सीमांकित करतील अशा एकाप्रकारच्या चिन्हांऐवजी इतर कोणतेही अधिकृत चिन्ह वापरण्याची परवानगी जिल्हाधिकारी जमीनधारकास देऊ शकतील.

 () इतर भू-मापन चिन्हे:

(१) संचालक वेळोवेळी, विहित करतील अशा आकाराचे व शिरोभागी फुली कोरलेले, ओबडधोबड कापलेले भू-मापन दगड.

(२) संचालकांनी याबाबत विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही क्षेत्रातील गरजेनुसार तो विहित करील असे कोणतेही इतर भू-मापन चिन्‍हे.

                                           (महाराष्ट्र जमीन महसूल (सीमा व सीमा चिन्हे) नियम १९६९, नियम ३)

 

३१७. अभिलेखाचे संभाव्य किंवा अनुमानित मूल्य (Probative or Presumptive Value): सन १९१३ मध्ये मुंबई जमीन महसुलाच्या १८७९ च्या कायद्यात सुधारणा होईपर्यंत गावपातळीवर ज्या हक्क नोंदी व अधिकार अभिलेख तयार केले जात असत त्यांना न्यायालयात पुरावा मानले जात नसे. मुंबई जमीन महसुलाच्या १८७९ च्या कायद्याकलम १३५-जे अन्‍वये सुधारणा करुन, फेरफार नोंदी आणि अधिकार अभिलेखातील नोंदींना सकृत दर्शनी खरे मानण्याचे गृहित समाविष्‍ट करण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५७ अन्‍वये सन १८७९ च्‍या महसूल कायद्‍याचे कलम १३५-जे कायम करण्यात आले.

[म.ज.म.अ. कलम १५७: अधिकाराभिलेख व फेरफार नोंदवही यांमधील नोंदी बरोबर असल्याचे गृहीत धरणे : अधिकाराभिलेखातील नोंद आणि फेरफार नोंदवहीतील प्रमाणित नोंद, ही एतद्विरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत किंवा त्याबद्दल नवीन नोंद कायदेशीररीत्या दाखल करण्यात येईपर्यंत, खरी असल्याचे गृहीत धरण्यात येईल.]

 

३१८. हक्क नोंदणी पत्रक: (गा.न. ७-१२):  ही नोंदवही मॅक्सवेल पद्धतीमध्ये सुचवली गेली. त्यात प्रथमतः रोजनाम्याप्रमाणे जसजसे हक्क संपादन केले जातील त्या क्रमाने जमिनीवरील सर्व खाजगी हक्कांचा तपशील नमूद केला जात होता. त्यानंतर प्रत्येक गावातील सर्व्हे नंबरच्या अनुक्रमाने जमिनीच्या अनुक्रमणिकेत म्हणजे गाव नमुना ७ मध्ये अधिकार अभिलेखाचा फेरफार क्रमांक लिहून या हक्कांचा गोषवारा लिहिला जात होता. हेच तत्व स्वीकारुन दिनांक २८..१९२१ पासून तत्कालीन सेटलमेंट कमिश्‍नर आणि संचालक, भूमि अभिलेख श्री. एफ. जी. हार्टनेल अंडरसन यांनी तयार केलेले The Land Revenue Rules, 1921लागू करण्यात आले. यामधील नियम १०४ ते ११३ मध्ये हक्‍क नोंदणीची कार्यपद्धती देण्‍यात आली. माहे नोव्हेंबर १९२८ पासून सर्व जिल्हयामध्ये अधिकार अभिलेख पत्रकाचा फॉर्म (नमुना) बदलण्यात आला व अधिकार अभिलेख पत्रक (गाव नमुना ),  कुळाची नोंदवही गाव नमुना -) आणि पिकांची नोंदवही (गाव नमुना १२) असा संयुक्त फॉर्म स्वीकारण्यात आला. तोच फॉर्म थोड्याफार फरकाने आजही वापरात आहे.

 

३१९. 'गुणाकार बु': एखादया भूमापन क्रमांकामध्ये किंवा गटामध्ये कोणत्याही कारणामुळे हिस्से पाडले जातात तेव्हा मोजणीवेळी गुणाकार बु(हिस्सा फॉर्म नं.४) भरला जातो. संबंधित जमीन धारकाने दर्शविल्याप्रमाणे वहिवाटीप्रमाणे पोटहिस्स्यांची मोजणी करुन आलेले क्षेत्र स्‍तंभ क्रमांक ६ मध्ये लिहिण्यात येते. त्यानंतर सर्व्हे नंबरच्या एकूण क्षेत्राशी मेळ ठेवण्यासाठी क्षेत्र कमी अधिक स्‍तंभ क्रमांक ८ व ९ मध्ये भरुन सर्व्हे नंबरचे एकूण क्षेत्र स्‍तंभ क्रमांक १० मध्ये कायम केले जाते. त्यावेळी प्रत्येक हिस्साच्या खातेदारांचे नाव/हजर असल्‍याबाबत अंगठा किंवा स्वाक्षरी (स्‍तंभ  क्रमांक १२ मध्ये) घेतली जाते. यामध्ये ज्या भूमापन क्रमांकाचे हिस्से करायचे आहेत त्यामध्ये खाष्टे पाडून अथवा त्रैराषिक पध्दतीने क्षेत्रफळ काढले जाते. पोटहिस्सा मोजणी करत असताना जमीन एकत्रीकरण योजना १९४७ च्या नियमास अधिन राहून विहीत केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमीचा हिस्सा / तुकडा पडणार नाही अशा रीतीने जमिनीची विभागणी केली जाते. एकंदरीत सर्व्हे नंबर अथवा गट नंबर मध्ये जेव्हा विभागणी होते, तेव्हा मोजणी समयी जागेवर करावयाच्या / भरावयाच्या तक्त्याला गुणाकार बुक असे म्हणतात.

 

३२०. सर्व्हे नंबर/ गट नंबर/ भूमापन क्रमांक: अनेक कागदपत्रात आपण सर्व्हे नंबर/ गट नंबर/ भूमापन क्रमांक असा उल्‍लेख वाचतो. वस्‍तुत: सर्व्हे नंबर/ गट नंबर/ भूमापन क्रमांक या संज्ञांचा वापर विशिष्‍ठ योजनांदरम्‍यान केला गेला आहे. त्‍यामुळे त्‍या त्‍या विशिष्‍ठ योजनांचा उल्‍लेख करतांना त्‍या त्‍या विशिष्‍ठ संज्ञेचा वापर करणे अपेक्षीत आहे.

(१) बंदोबस्‍त योजनेदरम्‍यान: सर्व्हे नंबर (स.नं.) या संज्ञेचा वापर करण्‍यात आला आहे.

(२) पुनर्मोजणी योजनेदरम्‍यान: भूमापन क्रमांक (भू.क्र.) या संज्ञेचा वापर करण्‍यात आला आहे.

(३) एकत्रीकरण योजनेदरम्‍यान: गट नंबर (गट नं.) या संज्ञेचा वापर करण्‍यात आला आहे.

 

३२१. पहाणी पत्रक: हे पत्रक मराठवाडा विभागात सन १९३० पूर्वीपासून मोडी/उर्दू/फारसी भाषेत उपलब्‍ध असून त्‍यात सर्वे क्रमांक, हिस्सा क्रमांक, खातेदाराचे नाव, जात, जमिनीचा आकार, पिक पेरणी, पिकांची नावे आणि माहिती नोंदविण्‍यात येत असे.                    (हैदराबाद जमीन महसूल कायदा, १३१७ फसली)

 

३२२. पत्रक: हे पत्रक मराठवाडा विभागात फसली १३५४ (सन १९४४) पासून मोडी/उर्दू/फारसी भाषेत उपलब्‍ध असून त्‍यात सर्वे क्रमांक, जमिनीचे स्थानिक नाव, पोटखराब क्षेत्र, आकार, जमीन मालकाचे नाव, जात, कोणत्या हक्कान्वये मालक झाला ईत्यादी उपलब्‍ध आहेत. याला नमुना १ हक्क नोंद पत्रक असेही म्‍हणतात.                                                           (हैदराबाद जमीन महसूल कायदा, १३१७ फसली)

 

३२३. एकत्रिकरणाचा ९(३) - ९(४) उतारा: हा उतारा म्‍हणजे, मुंबईचा धारण जमीनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत नियम १९५९ मधील

नियम ९: एकत्रिकरण योजनेमध्ये समाविष्ट करण्याची विवरणपत्रे, अभिलेख आणि नकाशे तसेच  एकत्रिकरण योजनेमध्ये समाविष्ट असलेली विवरणपत्रे अभिलेख आणि नकाशे. या शिर्षकाखाली असलेले पोटनियम.(३) आणि (४) अन्‍वयेचे विवरणपत्र.

 नियम ९(तीन): प्रत्येक भूधारकाचे नाव, त्याचेकडील सध्याची जमीन, सर्वे नंबर, हिस्सा नंबर, जमिनीचा वर्ग, धारणापद्धती, क्षेत्र, आकार आणि इतर हक्क किंवा असल्यास गहाणाचे बोजे (हक्क अभिलेखा अद्यावत केल्यानंतर) दाखविणारे विवरणपत्र.

नियम ९(चार): नवीन एकत्रीत जमीन द्यावयाच्या भूधारकाचे नाव, त्याला दिलेल्या जमिनीच्या तपशिलासह म्हणजे सर्वे नंबर, हिस्सा नंबर, जमिनीचा वर्ग, धारणपद्धती, क्षेत्र, आकार आणि इतर हक्क किंवा असल्यास गहाणाचे बोजे दाखविणारे विवरणपत्र.

 

३२४. थळझाडा (Field register):  थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत जमीन व्यवस्थेसंबंधी जमिनीची नोंद असलेली नोंदवही.

 

३२५. पांढर झाडा (House register):  थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत जमीन व्यवस्थेसंबंधी घरांची नोंद असलेली नोंदवही.

 

३२६. 'कोटवार बुक': स्वातंत्रपूर्व काळात जेव्‍हा ग्रामपंचायती नव्हत्‍या तेव्‍हा पोलीस पाटील, मुसाफीर नोंदवही व जन्मनोंद वही यांत अनुषंगिक नोंदी करीत असत. ज्‍या जन्म, उपजत मृत्‍यू व मृत्युची नोंद आणि मृत्युच्‍या कारणांची नोंद करण्‍यात येत असे त्‍याला 'कोटवार बुक' (नोंदवही) असे संबोधतात. मामलतदार कडून सदर नोंदवहीची तपासणी केली जात होती. ही शासनाची अधिकृत नोंदवही होती.

 

३२७. मिसल हकीयत: बंदोबस्‍त योजनेच्‍यावेळी तयार केलेली विस्तारपूर्वक जमाबंदी.

 ३२८. नक्शा कमीबेशी: मागील जमाबंदीच्‍या तुलनेत क्षेत्रफळात केलेली वाढ किंवा घट.

 ३२९. कानूनी सेटलमेंट (Kanooni (Regular) Settlement): जेथे पूर्वीचे कोणतेही अभिलेख अस्तित्वात नाही तेथे नियमित जमाबंदी घेतली जाते. या जमाबंदीवर, सर्वेक्षण उपकरणांच्या मदतीने संपूर्ण मोजमाप केले जाते आणि प्रथमच नवीन अधिकार अभिलेख तयार केले जातात.

 ३३०. लाल किताब: जमाबंदीच्‍यावेळी तयार केलेले गाव नोटबुक. यामध्‍ये गावातील जमिनींमध्‍ये घेतलेली पिके, मातीचे वर्गीकरण, विविध पिकांखालील क्षेत्र, जमिनीचा वापर, गावातील जमीन, विहिरी आणि सिंचनाची इतर साधने आणि गावातील पशुधन आणि पशुगणनेचा गोषवारा यासंबंधी मौल्यवान माहिती असते.

 

३३१. संक्षिप्‍त जमाबंदी (Summary Settlement): या प्रकारची जमाबंदी, सर्वेक्षण उपकरणांच्या मदतीशिवाय, अल्प कालावधीसाठी तात्पुरता उपाय म्‍हणून फक्त खाका दास्ती (हस्‍त स्केच) तयार करून केली जाते. या जमाबंदी सोबत सत्याचे गृहितक जोडले जात नाही. (No presumption of truth is attached to a summary Settlement.)

  ३३२. फिल्ड बु (Field Book): प्रत्येक जमिनीच्‍या क्षेत्राच्या मोजमापाचा तपशील असलेले पुस्तक उदा. जमिनीची लांबी, रुंदी, कर्णरेषा तपशील आणि एकूण क्षेत्रफळ.

 ३३३. बंदोबस्त: बंदोबस्त किंवा जमाबंदी ही एक व्यापक संज्ञा आहे ज्यामध्ये जमीन सर्वेक्षण आणि मोजमाप, महसूल नोंदी तयार करणे आणि जमीन महसुलाचे मूल्यांकन या सर्व बाबींचा समावेश होतो.

 ३३४. पैमाईश: जमीन मोजणी. 

 ३३५. 'वर्गवारीची किंमत' (Classification Value):  जमिनीचा प्रकार, तिचे स्थान, पाणी इतर फायदे लक्षात घेऊन भू-मापन अभिलेखात नोंद केल्याप्रमाणे असलेली जमिनीची सापेक्ष किंमत आणि तीत नागपुर, चंद्रपुर, वर्धा, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट तालुक्यातील घटक साधन प्रमाणाच्या आधारावर जमिनीच्या प्रकाराच्या स्वरुपात तिचे जे मूल्य दर्शविण्यात आले असेल ते मूल्य. [म.ज.म.अ. कलम ९०(अ)]

 ३३६. जमाबंदी (Settlement): जमीन महसुलाची आकारणी ठरविण्‍यासाठी एखाद्‍या प्रदेशात चालविलेल्‍या कामकाजातून निष्‍पन्‍न झालेली कार्यवाही.                          [म.ज.म.अ. कलम ९०(]

 

३३७. 'प्रमाण दर' (Standard Rate): गटातील एखाद्या विशिष्ट जमिनीच्या वर्गाच्या बाबतीत त्या वर्गाच्या सोळा आणे किमतीच्या वर्गीकरणाच्या जमिनीवरील दर एकरी पिकांच्या सरासरी उत्पन्नांची (एक पंचविसांशापेक्षा अधिक होणार नाही अशी) किंमत.                             [म.ज.म.अ. कलम ९०(फ)]

 

३३८. 'जमाबंदीची मुदत' (Term of Settlement): राज्य शासनाने ज्या मुदतीसाठी जमाबंदी अंमलात राहील असे जाहीर केले असेल ती मुदत. जमाबंदी  तीस  वर्षे अंमलात  राहते  आणि  अशी  मुदत  संपल्यानंतर  नव्या जमाबंदीची  मुदत सुरू होईपर्यंत ही जमाबंदी अंमलात असण्याचे चालू राहते. [म.ज.म.अ. कलम ९३]       

 ३३९. 'संपूर्ण बाजार मूल्‍य' (Full Market Value): संबंधित जमिनीचे बाजार मूल्य अधिक त्या वेळी अंमलात असलेल्‍या आकारणीच्‍या भांडवलीकृत आकारणीच्‍या रकमेइतकी रक्‍कम. संपूर्ण बाजार मूल्‍य ठरविण्‍यासाठी, शासनाने नियमानुसार काही तत्‍वे ठरवून दिलेली आहेत.

[महाराष्‍ट्र जमीन महसूल (जमिनीच्‍या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम, १९६९, नियम १५(१) ते (जे) ; म.ज.म.अ. कलम १०८]

 

३४०. '.जा..' (K.J.P.): कमी-जास्‍त पत्रक: गावातील शेतजमिनी, रस्ते, नाले, ओढे, स्मशान भूमी, वनक्षेत्र, भूसंपादन इत्यादी विविध कारणांमुळे जमिनीच्या क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल होत असतो. अशावेळी गटाचे मूळ क्षेत्र बदलल्यामुळे जमिनीच्या मूळ अभिलेखामध्ये, मोजणी खात्याकडून एक गोषवारा आणि रेखाचित्र जोडून कमी-जास्त पत्रक नावाचे विवरणपत्र म्‍हणजे .जा.. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमात तरतूद केल्याप्रमाणे सर्व्हे नंबर/गट नंबरचे आकार व क्षेत्रामध्ये काही कारणांस्तव बदल झाल्यास, गावच्या आकारबंद मध्ये बदल करण्यासाठी जो अभिलेख तयार केला जातो त्याला कमी-जास्त पत्रक म्हणतात. साधारणपणे शेतजमिनीचा वापर बिनशेती प्रयोजनासाठी करावयाचा असल्यास, मूळ भूमापनामध्ये गणितीय किंवा हस्तदोषाने निर्माण झालेली चूक (क्षेत्र दुरूस्ती), बिन आकारी जमिनीवर आकारणी करणे (मूळ भूमापनाच्या वेळी आकारणी न केलेल्या जमीनी), मळई जमीनींचे प्रदान इ. भूसंपादन या प्रकरणी कमी-जास्त पत्रक तयार करावे लागते.

 

३४१. मर्ज-उल-मौत (Marz ul Maut): हा शब्द अरबी भाषेतून आला आहे, यात ‘मर्झ म्हणजे आजार आणि मौत म्हणजे मृत्यू. ही मृत्‍युशैय्‍येवर (Deathbed) असतांना वस्तू भेट (giving gifts) देण्याची इस्लामिक कायद्यातील संकल्पना आहे. ज्या परिस्थितीमध्‍ये हस्तांतरणकर्त्याच्या मनात मृत्‍युची वाजवी भीती असताना दिलेली अशी भेटवस्तू केवळ तेव्हाच वैध मानली जाते जेव्‍हा भेटवस्‍तु दिल्‍यानंतर हस्तांतरणकर्त्याचा मृत्‍यू होतो. असे हस्तांतरण हा मृत्‍युत्राचा एक प्रकार मानला जातो. मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या दफन विधी खर्च व कर्ज फेडीसाठी आवश्‍यक असणारी रक्‍कम वेगळी ठेऊन, त्‍याला त्‍याच्‍या संपत्तीच्‍या १/३ संपत्तीपुरती भेटवस्‍तू/वसियतनामा कोणत्‍याही वारसांच्‍या संमतीशिवाय देता येते. १/३ संपत्तीपेक्षा जास्‍त संपत्तीचे मृत्‍युपत्र वारसांच्‍या संमतीनेच वैध होते.                                        (मुस्‍लिम वारसा कायदा)   

 

३४२. वडिलोपार्जित मालमत्ता (Ancestral property): वडिलोपार्जित मालमत्तेला पुरूष वंशाच्या चार पिढ्यांना वारसा मिळालेला असतो. याचा अर्थ वडील (father), आजोबा (grandfather), पणजोबा (great grandfather) आणि खापर पणजोबा (great-great grandfather) यांच्‍या मालमत्तेला वडिलोपार्जित मालमत्ता म्हणतात. परंतु अशी मालमत्ता चौथ्‍या पिढीपर्यंत अविभाजीत (undivided) राहिली पाहिजे.

अन्‍य मालमत्तेवर, मालमतेच्‍या मालकाच्‍या मृत्‍युनंतर वारसाधिकार प्राप्‍त होतो परंतु वडिलोपार्जित मालमत्तेत वारसांना जन्मतःच विभाजनाचा अधिकार प्राप्त होतो.

 कोणतीही वडिलोपार्जित मालमत्ता विभाजनाचा दस्‍त (partition deed), कौटुंबिक व्यवस्था (family arrangement)त्‍यादीद्वारे विभाजित (divide) केली गेली तर तिचे वडिलोपार्जित हे वैशिष्‍ठ (ancestral character) नष्‍ट होते. वडिलोपार्जित मालमत्तेची पूर्वापेक्षा (pre-requisite) अशी आहे की, ती संयुक्‍त कुटुंबात विभागली जाऊ नये, कारण वडिलोपार्जित मालमत्तेच्‍या विभाजनानंतर प्रत्येक सहदायादाला (coparcener) मिळालेला त्‍याचा वाटा किंवा हिस्‍सा (share or portion) ही त्‍याची स्‍वत:ची स्‍वतंत्र स्‍वकष्‍टार्जित मालमत्ता (self-acquired/ separate property) बनते.

वडिलोपार्जित मालमत्तेचे हक्क प्रत्येक पट्टी प्रमाणे निर्धारित केले जातात, प्रति व्यक्ति नाही (per stripes and not per capita) याचा अर्थ असा आहे की प्रत्येक पिढीचा वाटा प्रथम निश्चित केला जातो आणि त्यानंतरच्या पिढ्यांतील वाटा, पहिल्‍या पिढीच्‍या व्‍यक्‍तीला असणार्‍या वारसांनुसार विभागला जातो.

¡ आई (mother), आजी (grandmother), काका (uncle) आणि भाऊ (brother) यांच्‍याकडून मिळालेली मालमत्ता,  मृत्‍युपत्र (will) आणि भेट (gift) म्‍हणून मिळालेली मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता होत नाही.

स्वकष्‍टार्जित मालमत्ता, वडिलोपार्जित मालमत्तेत संम्‍मिलीत केल्‍यास आणि त्‍याचा वापर संयुक्‍तपणे केला जात असल्‍यास अशी मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्ता बनू शकते.

वडिलांनी आपल्या मुलाला भेट म्‍हणून दिलेली मालमत्ता, फक्‍त त्‍याला वडिलांकडून मिळालेली आहे या कारणामुळे वडिलोपार्जित मालमत्ता ठरणार नाही.

 

३४३. मृत्‍युपत्र (Will): एखाद्‍या व्‍यक्‍तीने, त्‍याच्‍या मालकीच्‍या संपत्तीचे वाटप त्‍याच्‍या मृत्‍युनंतर, कसे व्‍हावे याबाबत लेखी स्‍वरूपात घोषित केलेली इच्‍छा म्‍हणजे मृत्‍युपत्र.

भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५, कलम- २ (ह) अन्वये मृत्युपत्र-इच्छापत्राची व्याख्‍या खालीलप्रमाणे दिलेली आहे.

‘‘मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीने, त्याच्या मृत्युनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीरपध्‍दतीने घोषित केलेली इच्छा होय’’

मृत्‍युपत्र एक असा दस्‍तऐवज आहे जो मयत व्‍यक्‍तीच्‍या इराद्‍याची किंवा इच्‍छांची अंमलबजावणी करण्‍यासाठी, त्‍याच्‍या मागे जीवंत असलेल्‍या व्‍यक्‍तींना दिला जातो. मृत्‍युपत्र म्‍हणजे मयत व्‍यक्‍तीची शेवटची इच्‍छा असते. मृत व्यक्तीचा असा इरादा, त्याच्या इच्छेनुसार अत्यंत आदराने आणि पवित्रतेने अंमलात आणला गेला पाहिजे. मृत्‍युपत्राकडे सामान्य दस्तऐवजांपेक्षा वेगळा विशिष्‍ट आणि पवित्र दस्‍तऐवज म्‍हणून बघितले जावे. मृत्‍युपत्र एक असे घोषणापत्र आहे की ज्‍याव्‍दारे मृत्‍युपत्र करणार्‍याने त्‍याच्‍या मृत्युनंतर करण्‍यात येणार्‍या व्‍यवस्‍थेची इच्छा व्यक्त केलेली असते.

 

३४४. स्‍वतंत्र किंवा स्‍वकष्‍टार्जित मालमत्ता (Separate or Self-acquired property):

जी मालमत्ता संयुक्त (joint) नसते तीला स्वतंत्र (separate) किंवा स्व-कष्‍टार्जित (self-acquired) मालमत्ता म्हणतात. 'स्व-कष्‍टार्जित' हा शब्द असे सुचवितो की, ती मालमत्ता अशा प्रकारे संपादन करण्‍यात आली आहे की त्‍यावर त्‍या व्‍यक्‍तीशिवाय अन्‍य कोणाचाही अधिकार नाही.

 हिंदू व्‍यक्‍तीने खालीलपैकी कोणत्याही मार्गाने संपादन केलेली मालमत्ता ही, तो एका संयुक्त हिंदू कुटुंबाचा सदस्य असूनही त्‍याची स्‍वतंत्र किंवा स्‍वकष्‍टार्जित मालमत्ता असते:

 () एका हिंदू व्‍यक्‍तीने स्वत:च्या प्रयत्नांद्वारे मिळवलेली मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असेल कारण संयुक्त कुटुंबातील इतर सदस्यांच्‍या संयुक्त श्रमांशिवाय आणि संयुक्त कुटुंब मालमत्तेस नुकसान न करता ती प्राप्त केलेली असते.

 (बी) जेव्‍हा एखादी व्यक्ती प्रतिकूल ताब्‍याने (adverse possession) मालमत्ता संपादन करेल तर ती मालमत्ता त्‍याची स्‍वतंत्र किंवा स्‍वकष्‍टार्जित मालमत्ता आहे असे मानले जाईल.  

 (सी) जेव्‍हा संयुक्त कुटुंबातील सदस्य त्‍याचा स्‍वतंत्र  व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवतो आणि मालमत्ता खरेदी करतो तेव्‍हा त्‍याने मिळविलेले सर्व उत्पन्न आणि मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असेल.

मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने मकलियन सिंग वि. कुलवंत सिंग  या प्रकरणात असे निरीक्षण नोंदविले आहे की,

संयुक्त हिंदू कुटुंबातील एका पुरुष सदस्याने स्वत:च्या पगाराच्या उत्पन्नातून मालमत्ता खरेदी केली असेल तर अशी मालमत्ता त्‍याची स्वत:ची संपत्ती आहे. अशा मालमत्तेत उत्तराधिकाराने त्‍याच्‍या वारसदारांना वारसा मिळेल. अशा मालमत्तेला संयुक्त हिंदू कुटुंबाची मालमत्ता म्हणता येणार नाही.

(डी) एखाद्या व्‍यक्‍तीला त्‍याचे वडील, आजोबा, पणजोबा यांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीकडून मिळालेली मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असेल. जेव्हा एखादी व्यक्ती परंपरागत पुजेसारख्या अनुवांशिक व्यवसायातून पैशांची कमाई करते तेव्हा ती त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल, त्याच्या संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या रूपात मानली जाणार नाही.

मदनलाल फुलचंद जैन वि. महाराष्ट्र राज्य  या प्रकरणात मा. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले आहे की,

हिंदू व्‍यक्‍ती एकावेळेस स्वतंत्र मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ताही धारण करू शकतो.

संयुक्त कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्याच्या काकाकडून (uncle) मिळालेली जमीन त्‍याची स्‍वतंत्र मालमत्ता असेल. त्‍या जमिनीची मनाप्रमाणे विल्‍हेवाट लावण्‍याचा त्‍याला पूर्ण अधिकार आहे. अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला भाऊ, काका इत्यादीसारख्या दुय्‍यम नातेवाईकांकडून मिळालेली मालमत्ता, त्‍याची स्‍वतंत्र मालमत्ता असेल ती वडिलोपार्जित मानली जाऊ शकत नाही.

 () संयुक्त हिंदू कुटुंबाच्या विभाजनाचा भाग म्हणून हिंदू व्‍यक्‍तीने मिळविलेली कोणतेही मालमत्ता त्‍याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल. जेव्‍हा एखादी हिंदू व्‍यक्‍ती, संयुक्त कुटुंबातील मालमत्तेत त्याला मिळालेल्‍या हिश्‍शाच्‍या आधारे काही मालमत्ता संपादन करेल तर ती मालमत्ता त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 (एफ) एकमेव हयात वारस म्‍हणून वारसाहक्‍काने मिळालेली मालमत्ता त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 (जी) एखाद्‍या हिंदू व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या वडिलांनी, आजोबांनी, पणजोबांनी भेट म्‍हणून दिलेली मालमत्ता स्वतंत्र मालमत्ता असेल. तथापि, अशी भेट त्‍याच्‍या कुटुंबाच्या फायद्यासाठी (benefit) दिलेली नसावी.

 (एच) पित्याद्वारे, पितृ मालमत्तेतून स्‍नेहाने दिलेल्या भेटवस्तू किंवा मालमत्ता ही त्‍या मुला/मुलीची स्वतंत्र मालमत्ता असेल.

 (आय) शासनाकडून अनुदान म्‍हणून मिळालेली संपत्ती स्‍वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 (जे) संयुक्त कुटुंबाची असलेली परंतु संयुक्त कुटुंबाने गमावलेली मालमत्ता, नंतर त्‍या संयुक्त कुटुंबाच्‍या एखाद्‍या सदस्याने, संयुक्त निधीच्या मदतीशिवाय पुनर्प्राप्त केली तर ती त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 (के) शिक्षणाद्वारे किंवा व्‍यवसायाव्‍दारे किंवा तज्‍ज्ञ किंवा विशेष बुद्धिमत्तेद्वारे एकत्रित संयुक्त कुटुंबातील सदस्याने मिळविलेले कोणतेही उत्पन्न त्याची स्वतंत्र मालमत्ता मानले जाईल.

 जिथे संयुक्त कुटुंबातील सदस्य, संयुक्त कुटुंबाच्‍या निधीच्या आधारे शिक्षण घेतल्यानंतर काही ज्ञान किंवा कौशल्य प्राप्त करतात आणि नंतर त्यातून त्‍यांना मोठी रक्कम प्राप्‍त होते, मग ती रक्कम त्यांची स्वतंत्र मालमत्ता मानावी किंवा संयुक्त कुटुंबातील मालमत्ता मानावी हा विवादास्पद मुद्दा बनला होता.

के.एस. सुभ्‍भई पिल्लई वि. आयकर आयुक्त  या प्रकरणात न्‍यायाधिकरणाने असा निर्णय दिला होता की, संयुक्त हिंदू कुटुंबाच्या कर्ताला मिळणारे पारिश्रमिक त्याची वैयक्तिक पात्रता आणि परिश्रमांमुळे मिळते, संयुक्त कुटुंबाने केलेल्‍या फंडांच्या गुंतवणूकीमुळे नाही. त्‍यामुळे असे पारिश्रमिक संयुक्त हिंदू कुटुंबाची उत्पत्ती म्हणून मानता येणार नाही.

 

३४५. 'जद्द सहीहू' आणि 'जद्द फासीद': सर्वसाधारणपणे आईच्‍या तसेच वडीलांच्‍या वडीलांना आजा (आजोबा) म्हणतात. त्यांना काही विशेषण लावत नाही. परंतु प्राचीन अरबांमध्ये वंशाभिमान जाज्वल्य असल्याने ते आई आणि वडीलांच्‍या वडीलांमध्ये फरक करतात. त्‍यांच्‍या पध्‍दतीत 'आजा' म्हणजे 'जद्द'.

वडीलांच्‍या वडीलांना 'जद्द सहीहू' आणि आईच्या वडीलांना 'जद्द फासीद' असे म्हणतात. 'सहीह' म्हणजे मराठीत अगदी तंतोतंत तर 'फासीद' म्हणजे अगदी तंतोतंत नव्हे किंवा ज्यात काहीतरी कमतरता आहे असे. मुस्लिम विधीवर ग्रंथ लिहिणाऱ्यानी 'सहीह'ला खरे, तंतोतंत किंवा अस्सल आणि 'फासीद'ला अनियमित किंवा निमअस्सल असे शब्द वापरले आहेत.                                         (मुस्लिम वारसा कायदा)

 

३४६. हिंदू व्‍यक्‍ती: जी व्यक्ती धर्माने हिंदू आहे (वीरशैव, लिंगायत, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज,

आर्य समाजाचे अनुयायी).

() जी व्यक्ती धर्माने बौध्द, जैन किंवा शिख आहे. किंवा हिंदू, बौध्द, जैन किंवा शिख धर्मात धर्मांतरित किंवा पुनर्धर्मांतरित झालेली आहे.

() जी व्यक्ती धर्माने मुस्लिम, ख्रिस्ती, पारसी किंवा ज्यू नाही. (हिंदू वारसा कायदा १९५६)

 

३४७. मयत हिंदू विवाहीत पुरूषाचे वर्ग' (Class I) चे वारस:

अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला तर अशा मयत हिंदू पुरूषाचे एकूण १६ वारस ठरविण्‍यात आले आहेत, त्‍या सर्वांना एकाचवेळी हिस्सा मिळतो आणि वर्ग दोन, तीन आणि चारचे वारस वर्जित होतील.                                                  (हिंदू वारसा कायदा १९५६, कलम ९)

 

  

३४८. मयत हिंदू विवाहीत पुरूषाचे वर्ग' (Class II) चे वारस:

अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला आणि त्‍याला वर्ग १ चे कोणीही वारस नसतील तर त्‍याचा वारसा वर्ग २ च्‍या वारसांकडे  जाईल. वर्ग' वारसांचे ९ गट आहेत. हे वारस गट निहाय वारसा घेतात. एका गटातील वारस उपलब्‍ध नसले तरच दुसर्‍या गटातील वारसांना हिस्‍सा मिळतो,

 ३४९. मयत हिंदू विवाहीत पुरूषाचे वर्ग' आणि  वर्ग' चे वारस:

  वर्ग' (Class III) चे वारस म्‍हणजे मयताचे गोत्रज, मयताचे पितृबंधू म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तकग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध असलेल्या, एक गोत्र असलेल्या व्यक्ती

वर्ग' (Class IV) चे वारस मयताचे भिन्‍न गोत्रज, मयताचे मातृबंधू, म्हणजेच रक्ताच्या नात्यामुळे किंवा दत्तकग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध नसलेल्या, भिन्न गोत्र असलेल्या व्यक्ती.

                                                                                       (हिंदू वारसा कायदा १९५६, कलम )

उपरोक्‍त वारसांच्‍या वर्गवारीत वर्ग एकमध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या वारसांना एकाच वेळी मालमत्ता मिळेल आणि वर्ग दोन, तीन आणि चारचे वारस वर्जित होतील.(हिंदू वारसा कायदा १९५६, कलम ९)

 

३५०. मयत विवाहीत हिंदू स्‍त्रीचे वारस: विनामृत्युपत्र मयत झालेल्‍या हिंदू स्त्रीची संपत्ती जर तिच्‍या लग्‍नापूर्वी तिने संपादीत केली असेल किंवा तिला पती कडून अथवा सासरकडून मिळाली असेल तर प्रथम तिचे मुलगे व मुली, (कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्ये धरून) आणि पती यांच्याकडे वारसा हक्‍काने जाईल. तिचे असे वारस उपलब्‍ध नसतील तर,  

दुसर्‍यांदा, पतीच्या वारसाकडे, ते नसल्‍यास, तिसर्‍यांदा, तिच्या माता आणि पिता यांच्याकडे ते नसल्‍यास, चवथ्यांदा, पित्याच्या वारसाकडे आणि ते नसल्‍यास, शेवटी, मातेच्या वारसांकडे प्रक्रांत होईल. तथापि, अशा मयत हिंदू स्त्रीला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती त्या तिच्‍या पतीकडे प्रक्रांत होणार नाही. अशी संपत्ती, तिचा मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास अशी संपत्ती मृत स्‍त्रिच्या पित्याच्या वारसाकडे प्रक्रांत होईल.  (हिंदू वारसा कायदा १९५६, कलम १५)

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महसूल शब्दावली - 7. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.