आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

महसूल शब्दावली - 8

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

३५१.  मयत अविवाहीत हिंदू स्‍त्रीचे वारस: विनामृत्युपत्र मयत झालेल्‍या अविवाहीत हिंदू स्त्रीची संपत्ती  तिचे आई, वडील, भाऊ, बहिण यांना मिळेल. जर तिचे आई-वडील, भाऊ, बहिण हयात नसतील तर तिच्या आजी-आजोबांना वारसा मिळू शकतो.

 ३५२. अविवाहित हिंदू व्‍यक्‍तीचे वारस:

मयत खातेदार अविवाहित असल्याने त्याला वर्ग च्या वारस यादीतील, "आई" वगळता एकही वारस लागू होणार नाही सबब, ‍व्‍यक्‍तीची ʻआईʼ ही त्‍याची वर्ग ची वारस असेल.

अविवाहीत खातेदाराची आई हयात नसल्यास,

वर्ग वारसांच्‍या ९ गटांपैकी, गट (एक) मधील ʻवडीलʼ वारस ठरतील.

वडील हयात नसतील तरच, वर्ग वारसांपैकी, गट (दोन) मधील ʻभाऊʼ आणि ʻबहीणʼ हे वारस ठरतील आणि सामाईकपणे हिस्‍सा घेतील.

(भाऊ बहीण यामध्ये एकच आई परंतु भिन्न वडील असलेला भाऊ किंवा बहीण यांचा समावेश होणार नाही)

वर्ग वारसांपैकी, गट (तीन) अविवाहीत मयत व्यक्तीस लागू नाही.

वर्ग वारसांच्‍या ९ गटांपैकी, गट (दोन) मधील एकही वारस हयात नसेल तरच, गट (चार) मधील ʻभावाचा मुलगाʼ, ʻबहिणीचा मुलगाʼ, ʻभावाची मुलगीʼ, ʻबहिणीची मुलगीʼ वारस ठरतील.

वर्ग वारसांच्‍या ९ गटांपैकी, गट (चार) मधील एकही वारस हयात नसेल तरच, गट (पाच) मधील ʻवडीलांचे वडीलʼ, ʻवडीलांची आईʼ वारस ठरतील.

वर्ग वारसांच्‍या ९ गटांपैकी, गट (पाच) मधील वारस हयात नसतील तरच, गट (सहा) मधील ʻभावाची विधवाʼ वारस ठरेल.

वर्ग वारसांच्‍या ९ गटांपैकी, गट (सहा) मधील वारस हयात नसतील तरच, गट (सात) मधील ʻवडीलांचा भाऊʼ ʻवडीलांची  बहीणʼ वारस ठरतील.

वर्ग वारसांच्‍या ९ गटांपैकी, गट (सात) मधील वारस हयात नसतील तरच, गट (आठ) मधील ʻआईचे वडीलʼ, ʻआईची आईʼ वारस ठरतील.

वर्ग वारसांच्‍या ९ गटांपैकी, गट (आठ) मधील वारस हयात नसतील तरच, गट (नऊ) मधील ʻआईचा भाऊʼ, ʻआईची बहीणʼ वारस ठरतील.

वर्ग वारसांच्‍या नऊ गटांपैकी कोणत्‍याही गटात प्रक्रांत होणारी संपत्ती, त्‍यात नमुद वारसांकडे समान हिस्स्यात प्रक्रांत होईल.

वर्ग वारसांच्‍या नऊ गटांपैकी कोणत्‍याही गटातील वारस उपलब्‍ध नसतील तर मयत हिंदू पुरूषाच्‍या वर्ग' (Class III) चे वारस- मयताचे गोत्रज म्‍हणजे मयताचे पितृबंधू म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तकग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध असलेल्या, एक गोत्र असलेल्या व्यक्ती वारस ठरतील.

मयत हिंदू पुरूषाच्‍या वर्ग' (Class III) चे वारस उपलब्‍ध नसतील तर मयत हिंदू पुरूषाचे वर्ग' (Class IV) चे वारस, मयताचे भिन्‍न गोत्रज - मयताचे मातृबंधू, म्हणजेच रक्ताच्या नात्यामुळे किंवा दत्तकग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध नसलेल्या, भिन्न गोत्र असलेल्या व्यक्ती वारस ठरतील.

मयताला, वारस  वर्ग  १ ते ४ मधील कोणतही वारस नसल्यास त्‍याची मिळकत शासन जमा होईल.

 

३५३. गर्भस्थ अपत्य:  विनामृत्युपत्र मयत झालेल्‍या खातेदाराच्या मृत्यूसमयी जे अपत्य गर्भात होते व नंतर जीवंत जन्मले, त्याला किंवा तिला जणु काही ते अकृतमृत्युपत्र व्यक्तिच्या मृत्‍युपूर्वी जन्मले होते अशाच प्रकारे अकृतमृत्युपत्र व्यक्तीचा वारस होण्याचा अधिकार असेल.

                                                                         (हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २०)

मुस्‍लिम धर्मानुसार, वसियतनामा (मृत्युपत्र) करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍युच्‍यावेळी जी व्‍यक्‍ती हयात असेल त्‍याच व्‍यक्‍तीच्‍या नावे वसियतनामा करता येतो. तथापि, वसियतनामा करण्‍याच्‍या वेळी गर्भात असणार्‍या शिशूचा जन्‍म, वसियतनामा करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍युनंतर सहा महिन्‍यात झाला तर त्‍याच्‍या नावे केलेला वसियतनामा ग्राह्‍य मानला जातो.

 ३५४. पालक (parents): या शब्दाचा अर्थ, आपत्याच्या देहाची किंवा आपत्याच्या देहाची आणि मालमत्तेची देखभाल करणारी व्यक्ती असा होतो. अशी व्यक्ती त्या आपत्याची माता किंवा पिता किंवा माता आणि पिता यांच्या मृत्युपत्राद्वारे किंवा सक्षम न्यायालयाद्वारे नियुक्त किंवा घोषित असु शकते.

 ३५५. आळियसंतान कायदा: जर हिंदू वारसा कायदा १९५६ पारित झाला नसता तर व्यक्तीच्‍या वारस हक्‍क  रुढीप्राप्तमद्रास आळियसंतान अधिनियम १९४९अन्वये नियंत्रीत झाले असते.

 ३५६. वारसदार: हिंदू वारसा कायदा १९५६ न्वये अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीची उत्तराधिकारी होण्यास पात्र व्यक्ती

 ३५७. संयुक्‍त मृत्युपत्र (Joint Will): जेव्‍हा एकापेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती, एकाच लेखाने, त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर, त्‍यांच्‍या संपत्तीची विल्‍हेवाट कशी लावावी याबाबत लेख करतात त्‍याला संयुक्‍त मृत्युपत्र म्‍हणतात. या व्‍यक्‍तींपैकी ज्‍याचा मृत्‍यू होईल, त्‍या व्‍यक्‍तीच्‍या संपत्त्तीबद्‍दल मृत्यूपत्रातील भाग प्रभावित होईल.

 ३५८. पारस्‍परिक मृत्युपत्र (Mutual Will): जेव्‍हा दोन व्‍यक्‍ती, एकाचा मृत्‍यू झाल्‍यावर दुसर्‍याला त्‍याची संपत्ती मिळेल या आशयाचा लेख करतात त्‍याला पारस्‍परिक मृत्युपत्र म्‍हणतात.

 ३५९. स्‍वलिखित मृत्युपत्र (Holographic Will): पूर्णत: स्‍वहस्‍ताक्षरात लिहिलेल्‍या मृत्यूपत्राला स्‍वलिखित मृत्युपत्र म्‍हणतात.

 ३६०. नोंदणीकृत मृत्युपत्र (Registered Will): नोंदणी कायदा, १९०८, कलम १८ अन्‍वये मृत्‍युपत्राची नोंदणी करणे ऐछीक असले तरी, नोंदणी कायदा, १९०८, कलम १७ अन्‍वये नोंदणी केलेल्‍या मृत्‍युपत्राला नोंदणी करता येते. अशा नोंदणी केलेल्‍या मृत्‍युपत्राला नोंदणीकृत मृत्युपत्र म्‍हणतात.

 ३६१. जमा केलेले मृत्युपत्र (Deposited Will): नोंदणी कायदा, १९०८, कलम ४२ अन्‍वये मृत्युपत्र, पाकीटात बंद/सील करुन निबंधकाकडे जमा करता येते. याला जमा केलेले मृत्युपत्र म्‍हणतात.   

 ३६२. विशेष मृत्युपत्र (Privileged Will): एखाद्‍या सज्ञान सैनिकाने प्रत्‍यक्ष युद्धाच्‍या वेळेस किंवा विशेष मोहीमेवर असतांना, किंवा एखाद्‍या सज्ञान दर्यावर्दीने जहाजावर असतांना किंवा एखाद्‍या सज्ञान वैमानिकाने, विमानात असतांना केलेल्‍या मृत्यूपत्राला विशेष मृत्युपत्र म्‍हणतात. (भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५, कलम ६५असे विशेष मृत्युपत्र लेखी अथवा तोंडी असू शकते. ((भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५, कलम ६६)

३६३. प्रतिकात्‍मक वाटप (Notional partition ): हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम २००५  अंमलात येण्‍यापूर्वी एखाद्‍या एकत्र हिंदू कुटुंबाच्‍या मिळकतीत हक्‍क असणारा सहदायक (कोपार्सनर) मयत झाल्‍यास त्‍याच्‍या मुलींना ज्‍या पध्‍दतीने  मिळकतीचे वाटप होऊन हिस्‍सा मिळत होता त्‍याला प्रतिकात्‍मक वाटप असे म्‍हणत.

 ३६४. उत्तराधिकाराचा क्रम: वारसांच्‍या वर्गवारीत, वर्ग एकमध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या वारसांना एकाच वेळी मालमत्ता मिळेल आणि वर्ग दोन, तीन आणि चारचे वारस वर्जित होतील.

वर्ग दोनच्‍या वारसांना मालमत्ता मिळणार असेल तेव्‍हा वर्ग दोनच्‍या पहिल्‍या गटात येणार्‍या वारसांना, दुसर्‍या नोंदीतील वारसांपेक्षा प्राधान्‍य मिळेल. याप्रमाणे पुढे. (हिंदू वारसा कायदा १९५६, कलम ९)                                                                                 

 ३६५. सख्‍खे नाते, सापत्न नाते आणि सहोदर नाते (‘full blood’; ‘half bloodand uterine bloodrelation):

जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वज-पुरुषापासून, त्याच्या एकाच पत्नीच्याद्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सख्‍ख्‍या नात्याने संबंधित असतात.

जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वज-पुरुषापासून, पण त्याच्याच निरनिराळ्या पत्नींच्याद्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सापत्न नात्याने संबंधित असतात.

जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वज-स्त्रीपासून, पण तिच्या निरनिराळ्या पतींच्याद्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सहोदर नात्याने संबंधित असतात. (पूर्वज-पुरुष यात पित्याचा तर पूर्वज-स्त्री यात मातेचा समावेश होतो.) [हिंदू विवाह कायदा १९५५, कलम ३ (ग- c ; (घ-d)]

 ३६६. ‘सावत्र मुलगा’: एखाद्याच्या पती किंवा पत्नीचा पूर्वीच्या संबंधाने झालेला मुलगा (a son of one’s husband or wife by a former union).

संदर्भ: मा. सर्वोच्‍च न्‍यायालय- तीन न्‍यायमुर्तीच्‍या पिठाने, लछमन सिंह विरूध्‍द कृपा सिंह आणि इतर (एआयआर १९८७ एससी १६१६) दिनांक १४.४.१९८७ रोजी दिलेला निकाल.

 

 ३६७. अकृतमृत्युपत्र व्यक्ती (intestate): ज्या व्यक्तीने त्याच्या मालमत्तेची मृत्यूपत्रांन्वये व्यवस्था केली नसेल अशी व्यक्ती अर्थात मृत्‍युपत्र न करता मृत्‍यू पावलेली व्यक्ती. (भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५)

 ३६८. गोत्रज आणि भिन्न गोत्रज ‘Agnates and Cognates’:

जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने आणि संपूर्णपणे पुरुषांच्याद्वारे संबंधीत असल्यास एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीची गोत्रज असते आणि जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने आणि संपूर्णपणे पुरुषांच्याद्वारे नव्हे अशा संबंधीत असल्यास एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीची भिन्न गोत्रज असते.

 ३६९. पवित्र जबाबदारी (Pious Obligation):  पूर्वीच्या वारसा कायद्यान्‍वये, त्याच्या पूर्वजांनी (वडील, आजोबा, पणजोबा) कर्जे घेतली असतील अशी कर्जे फेडण्याची जबाबदारी वारसांची होती. असे कर्ज वारसाने न फेडल्यास, असे कर्ज देणार्‍यास न्यायालयात दाद मागता येत होती.

सुधारीत हिंदू वारसा कायदा, २००५ अन्‍वये ही तरतूद रद्द करण्‍यात आली आहे.  तथापि, सन २००५ पूर्वी घेतलेल्‍या कर्जास ही सुधारणा लागू होणार नाही.  

 ३७०. हक्‍कसोडपत्र (Relinquish Deed): एखाद्‍या एकत्र कुटुंबातील कोणत्‍याही सदस्‍याने, सहहिस्‍सेदाराने, त्‍याचा, त्‍या एकत्र कुटुंबाच्‍या मिळकतीवरील, स्‍वत:च्‍या हिस्‍स्‍याचा वैयक्‍तिक हक्‍क, त्‍याच एकत्र कुटुंबाच्‍या सदस्‍याच्‍या किंवा सहदायकाच्‍या लाभात, स्‍वेच्‍छेने आणि कायमस्‍वरुपी सोडून दिल्‍याबाबत नोंदणीकृत दस्‍त म्‍हणजे हक्‍कसोडपत्र.                                   (मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, १८८२)

 ३७१. दत्तक (Adoption): रक्ताशी संबंधित नसलेल्या व्यक्तींमध्ये पालक-मुलाचे नाते निर्माण करणारी कायदेशीर कार्यवाही. मुलीला दत्तक घ्यावयाचे असल्यास दत्तक घेणाऱ्या आई-वडिलास स्वतःची व दत्तकाची मुलगी किंवा नात नसावी.

स्त्रीने मुलाला दत्तक घ्यावयाचे असेल तर दत्तक घेणार्‍या स्त्रीचे (दत्तक आईचे) वय दत्तक  मुलापेक्षा कमीत कमी २१ वर्षांनी जास्त हवे.
 जर पुरुषांनी मुलीला दत्तक घ्यावयाचे असेल तर दत्तक घेणाऱ्या पुरूषाचे वय दत्तक मुलीपेक्षा कमीत कमी २१ वर्षांनी जास्त हवे.
दत्तक आपत्याला, दत्तकग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता किंवा त्यावरील दत्तकग्रहणापूर्वीची आबंधने त्याच्याकडेच निहित राहतील तथापि, दत्तक गेल्‍यानंतर, दत्तक मुलाला, जनक कुटुंबाच्‍या मिळकतीत हिस्‍सा मिळत नाही परंतु तो दत्तक गेलेल्‍या कुटुंबाच्‍या मिळकतीत त्‍याला हिस्‍सा मिळतो.                                                                       
                             (हिंदू दत्तक कायदा १९५६)

 

३७२. उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession certificates): उत्तराधिकार प्रमाणपत्र एक असा प्राथमिक दस्तऐवज आहे, ज्याद्वारे मृत्‍युपत्र करून न ठेवता मयत झालेल्‍या नातेवाईकाच्‍या मालमत्तेवर त्‍याचे  वारस दावा करू शकतात.                                              (भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५, भाग -१ एक्स)

उत्तराधिकार प्रमाणपत्र प्रदान करण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयालाच आहे. कोणत्याही मयताच्या स्थांवर मालमत्तेबाबत वारसांमध्ये वाद असल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र आवश्यक असते.

                                                                 (भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५, कलम ३७०)

 ३७३. वारस प्रमाणपत्र (Heirship certificate): मयत व्‍यक्‍तीच्‍या केवळ योग्यरित्या मान्यताप्राप्त वारस, व्‍यवस्‍थापक किंवा प्रशासक प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. काही प्रसंगी महसूल अधिकार्‍यांकडूनही वारस प्रमाणपत्र दिले जाऊ शकते. वारस प्रमाणपत्र मालमत्तेमध्‍ये कोणतेही अधिकार देत नाही, परंतु ज्याला असे प्रमाणपत्र दिले जाते ती व्यक्ती मयत व्‍यक्‍तीच्‍या मालमत्तेचे कायदेशीर व्यवस्थापन करू शकते.

                                                                               (मुंबई नियमन कायदा VIII १८२७, कलम २)

३७४. मयत शासकीय कर्मचारी- वारस दाखला: फक्त मयत शासकीय कर्मचारी मयत झाल्‍यास आणि यांच्या वारसांना, मयताच्या भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी इत्यादींची रक्कम मिळणेकामी, वारसांमध्ये कोणताही वाद नसेल तर, तहसिलदारांना वारस दाखला देण्याचा अधिकार आहे. असा दाखला प्रदान करण्यापूर्वी तहसिलदारांनी संक्षिप्त चौकशी करणे आवश्यक आहे. हा दाखला फक्त मयत शासकीय कर्मचार्‍याच्या भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी इत्यादींची रक्कम मिळणेकामीच वापरता येतो. अन्य कोणत्याही कारणांसाठी नाही.                                                   (महाराष्ट्र ट्रेझरी नियम, १९६८, नियम ३५९)

 ३७५. नातेसंबंध (relationship): सख्‍खी बहीण (Full sister); सावत्र/सगोत्र बहीण (Consanguine sister) (एकच वडील पण भिन्न आई); सहोदर बहीण (Uterine sister) (आई एकच पण वडील वेगळे); सहोदर भाऊ (Uterine brother) (आई एकच पण वडील वेगळे).

ज्याची आई एकच आहे पण वडील वेगळे आहेत:- Uterine brother/ sister/half sister

ज्याचे वडील एकच आहेत पण आई वेगळी आहे:- Consanguine/ agnate brother/ sister

 ३७६. नामनिर्देशन (Nomination): एखाद्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर, त्‍याच्‍या नावे जमा असलेली रक्‍कम ताब्‍यात घेण्‍यास पात्र व्‍यक्‍तीचे नाव नामनिर्देशित व्यक्ती (Nominee) म्‍हणून दाखल करणे. म्‍हणजे एखाद्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर, त्‍याच्‍या नावे जमा असलेली रक्‍कम ताब्‍यात घेण्‍यास पात्र असलेली व्‍यक्‍ती. नामनिर्देशन, मृत्‍युपत्र किंवा वारस कायद्‍यांपेक्षा वरचढ ठरत नाही. साध्‍या भाषेत नामनिर्देशन म्‍हणजे मयताची वित्तिय संपत्ती 'स्‍वीकारण्‍याचा' अधिकार, मालकीचा नव्‍हे. (Nomination is the right to receive not to own). 'नामनिर्देशन' या शब्‍दाचा अर्थ विश्‍वस्‍त (Trusty) असाच होतो.                                                                    

                                                                              (जीवन विमा कायदा १९३८, कलम ३९)

 ३७७. अग्रहक्‍क (Right of pre-emption): वारस हक्‍काने मिळालेली एकत्र कुटुंबाची मिळकत, एकत्र कुटुंबाबाहेरील किंवा त्रयस्‍थ व्‍यक्‍तीला विक्री करण्‍यापूर्वी, एकत्र कुटुंबातील वर्ग एक च्‍या सदस्‍याला सदर मिळकत बाजारभावाप्रमाणे खरेदी करण्‍याचा प्रथम अधिकार म्‍हणजे अग्रहक्‍काचा अधिकार.

ही तरतूद सामान्यतः एखाद्या त्रयस्‍थ-अनोळखी व्यक्तीला सामायिक किंवा एकत्र कुटुंबातील मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आणि विद्यमान नातेसंबंधांत सुसंवाद राखण्यासाठी वापरली जाते.

                                                                            (हिंदू वारसा कायदा, १९५६, कलम २२ )

 ३७८. वसियतनामा: मृत्‍युपत्राला मुस्लिम धर्मात वसियतनामा म्‍हणतात. भारतीय वारसा कायदा मुस्‍लिम व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍युपत्राबाबत लागू होत नाही. मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍तींसाठी मृत्‍युपत्राबाबतच्‍या तरतुदी त्‍यांच्‍या 'हेदाय' या बाराव्‍या शतकातील अधिकृत ग्रंथात दिलेल्‍या आहेत. (भारतीय उत्तराधिकार  कायदा, १९२५, कलम ५८) मुस्लिम धर्मिय व्‍यक्‍तीला, त्‍याच्‍या वारसांच्‍या संमतीशिवाय  त्‍याच्‍या मिळकतीपैकी फक्‍त १/३ मिळकत वसियतनाम्‍याने देता येते.

 ३७९. कोडिसिल (Codicil): कोडिसिल म्‍हणजे एक असा दस्त ज्याद्‍वारे मृत्युपत्रातील मजकुरासंबंधात स्पष्टीकरण दिलेले आहे किंवा बदल केलेला आहे किंवा अधिक माहिती जोडलेली (add) आहे. कोडिसिलचा दस्त मृत्युपत्राचा एक भाग मानला जातो.                (भारतीय उत्तराधिकार  कायदा १९२५, कलम ७०)

 

३८०. प्रोबेट (Probate): प्रोबेट म्‍हणजे मृत्युपत्राची शाबिती. एखाद्या व्‍यक्‍तीला मृत्‍युपत्राबाबत काही आक्षेप असेल तर त्याला प्रोबेटव्‍दारे मृत्‍युपत्रास आव्हान देता येते.

                          (भारतीय वारसा कायदा १९२५, कलम ६३; पुरावा कायदा १८७२, कलम ६८ व ७१)

प्रोबेट म्हणजे "सक्षम न्‍यायालयाने, स्‍वत:च्‍या सही अणि शिक्‍क्‍यासह मयत व्‍यक्‍तीच्‍या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्‍यासाठी दिलेली मृत्‍युपत्राची प्रमाणित प्रत. म्‍हणजेच सक्षम न्‍यायालयाने संबंधित मृत्युपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे. प्रोबेट प्रमाणपत्र सर्व संबंधितांवर बंधनकारक असते.                                                     [भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५, कलम २ (फ)]

 प्रोबेटच्‍या तरतुदी खालील व्‍यक्‍तींना लागू आहेत जर मृत्‍युपत्र:

(i) सप्टेंबर १८७० च्या पहिल्या दिवशी किंवा त्यानंतर हिंदू, बौद्ध, शीख किंवा जैन, जे त्या तारखेला बंगालच्या लेफ्टनंट-गव्हर्नरच्या अधि असणार्‍या प्रदेशात राहात होते किंवा मद्रास आणि बॉम्बे येथील उच्च न्यायालयांच्‍या सर्वसाधारण मूळ नागरी क्षेत्राच्या स्थानिक हद्दीत राहात होते. किंवा

(ii) मृत्‍युपत्र त्या प्रदेश आणि मर्यादेच्या बाहेरील स्थावर मालमत्तेशी संबंधित आहे.

जोपर्यंत सक्षम मृत्‍युपत्राबाबत प्रोबेट मंजूर करीत नाही तोपर्यंत व्‍यवस्‍थापकाला मयताच्‍या मालमत्तेवर अधिकार मिळणार नाही.

तथापि, ही तरतूद केवळ वरील प्रकरणांमध्येच लागू आहे. म्हणूनच, वर सांगितलेल्या दोन प्रकरणांपैकी एखाद्यामध्ये मृत्‍युपत्र बनविले गेले असेल तर ʻप्रोबेट ऑफ विलʼ अनिवार्यपणे आवश्यक आहे, अन्यथा, ʻप्रोबेट ऑफ विलʼ अनिवार्य नाही.                                     (भारतीय उत्तराधिकार कायदा, ९२५)

 सर्वसाधारणपणे खालील बाबींसाठी प्रॉबेट घेण्‍याचा घेण्याचा सल्ला दिला जातो.

(i) जेव्हा अस्तित्वात असलेल्या मृत्‍युपत्राबाबत काही संशय असेल तर
(ii) जर मृत्युपत्राचा लाभार्थी, मृत्युपत्र करणार्‍या व्यक्तीच्‍या आधी मृत पावला असेल तर.

 तथापि, फक्त मुंबई, चेन्नई  आणि कोलकत्ता ह्या मेट्रोपॉलिटिन शहरांमधील मालमत्तेबाबत मृत्‍युपत्र केले असेल तर अशा मृत्‍युपत्राचे प्रोबेट अनिवार्य आहे. इतर ठिकाणी नाही.

मा. उच्‍च न्‍यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र असलेल्‍या मुख्य न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात, भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५, कलम ३७४ अन्‍वये प्रोबेटसाठी याचिका दाखल करावी लागते.

(A petition has to be filed before the Principal Court of Original Jurisdiction or before the Hon'ble High Court)

प्रोबेटसाठी वकीलांच्या मदतीने, ज्‍या उच्‍च न्‍यायालयाच्‍या अधिकार क्षेत्रात मालमत्ता स्‍थित असेल, त्‍या उच्‍च न्‍यायालयात अर्ज करावा लागतो. काही ठिकाणी कमी किंमतीच्या स्‍थावर मालमत्तेसाठी प्रोबेटचे अधिकार कनिष्‍ठ न्‍यायालयांना प्रदान करण्‍यात आले आहेत तथापि, उच्‍च किमतीच्‍या स्‍थावर मालमत्तेसाठी प्रोबेटचे अधिकार उच्च न्यायालयांनाच आहेत. प्रोबेटसाठी मालमत्तेच्‍या किंमतीवर आधारित न्‍यायलीन शुल्‍क अदा करणे आवश्‍यक असते. 

 ज्या ठिकाणी प्रोबेट कायद्यानेच आवश्‍यक नाही तिथे त्याची सक्ती करणे चुकीचे आहे.  अधिकार्‍याने संबंधित व्‍यक्‍तीकडून फार तर indemnity bond लिहून घ्‍यावा.

प्रोबेटसाठी मालमत्तेच्या मुल्यांकनानुसार कोर्ट फी भरावी लागते. महाराष्ट्र राज्यात, सध्या ती मालमत्तेच्या किंमतीच्या २% ते ७.५०% परंतु जास्तीत जास्त ₹. ७५,००० आहे.

 प्रोबेट हे फक्त मृत्‍युपत्रामधे नमूद केलेल्या व्यक्तीलाच (व्यवस्थापक किंवा निष्पादक (Manager /Executors) मागणीनुसार देता येते. मृत्‍युपत्र करणाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ७ दिवसानंतरच असा अर्ज करता येतो. मृत्युपत्र करणार्‍याच्या मृत्यूच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत प्रोबेटची याचिका दाखल करणे आवश्यक आहे. "योग्य" कारणे असतील तर दिलेले प्रोबेट रद्द करता येते.

 ३८१. व्‍यवस्‍थापन पत्र -लेटर ऑफ ऍडमिनीस्‍ट्रेशन (Letter of Administration):.

सक्षम दिवाणी न्‍यायालयामार्फत, एखाद्या मयत व्यक्तीच्या मालमत्तेचे व्‍यवस्‍थापन करण्यासाठी व्‍यवस्‍थापक खालील परिस्‍थितीमध्‍ये नियुक्त केला जातो.

मयत व्‍यक्‍तीने मृत्‍युपत्राव्‍दारे मृत्युपत्राचा व्यवस्थापक (executor) नियुक्त केला नसेल तर किंवा

मृत्युपत्रान्‍वये नियुक्त केलेला व्यवस्थापक काम करण्यास नकार देत असेल तर किंवा

मृत्युपत्रान्‍वये नियुक्त केलेला व्यवस्थापकाचा मृत्‍युपत्र अंमलात येण्‍याआधीच मृत्‍यू झाला असेल तर. जर वारस अज्ञान, लहान किंवा मतीमंद असेल तर मृत्युपत्राद्वारे एक विश्वस्त नेमला जातो जो मृत्‍युपत्रातील ईच्‍छांच्‍या अंमलबजावणीस जबाबदार असतो.

 ३८२. हिबा हिबानामा: मुस्‍लिम वैयक्‍तिक कायद्‍यान्‍वये 'हिबा' ची तरतूद आहे. 'हिबा' म्‍हणजे तोंडी बक्षीस (gift). 'हिबानामा' म्‍हणजे बक्षीसाचा लेखी दस्‍त. भारतीय राज्‍यघटनेने मुस्‍लिम वैयक्‍तिक कायद्‍याला मान्‍यता दिली असल्‍याने मुस्‍लिम वैयक्‍तिक कायद्‍यातील तरतुदी आहे तशा लागू होतात. मुस्‍लिम कायद्‍यांतर्गत, मुस्‍लिम व्‍यक्‍ती, कायदेशीरपणे, स्‍वत:च्‍या हयातीत, (inter vivos) अन्‍य हयात व्‍यक्‍तींला स्‍वत:ची संपूर्ण संपत्ती 'हिबा' मार्फत हस्‍तांतरीत करू शकते. हिच संपत्ती जर त्‍याने मृत्‍युपत्राद्‍वारे दिली तर त्‍याला फक्‍त १/३ मिळकत देण्‍याचा अधिकार प्राप्‍त होतो आणि मृत्‍युपत्राद्‍वारे दिलेल्‍या मिळकतीचे हस्‍तांतरण त्‍याच्‍या मृत्‍युनंतरच शक्‍य होते, त्‍याच्‍या हयातीत नाही.       

मालमत्ता हस्‍तांतरण अधिनियम १८८२ कलम १२२ मध्‍ये बक्षीस/दान (gift) ची प्रक्रिया स्‍पष्‍ट केलेली आहे. परंतु 'हिबा' या प्रकाराला कायद्‍यानुसार 'व्यवहार (transaction) मानले जाते कारण मुस्‍लिम कायदा 'हिबा' (gift) ला कराराच्‍या कायद्‍याचा भाग (part of contract law) मानतो कारण 'हिबा' साठी काहीठिराविक अटींची पूर्तता होणे अनिवार्य असते. 'हिबा' तोंडी किंवा लेखी असू शकेल. 

मालमत्ता हस्‍तांतरण कायदा १८८२, कलम १२९ अन्‍वये, या कायद्‍यातील प्रकरण सात मधील दान (gift) बाबतच्‍या तरतुदी मुस्‍लिम कायदा पाळणार्‍यांना लागू होत नाहीत अशी तरतूद आहे. त्‍यामुळे लेखी 'हिबा' नोंदणीकृत असावा असे बंधन नाही.

'हिबा'चा समावेश 'शरीयत कायदा १९३७' या मुस्‍लिम व्‍यक्‍तीगत कायद्‍यात करण्‍यात आला आहे म्‍हणून 'हिबा' मुळे भारतीय राज्‍यघटनेच्‍या कलम १४ चा भंग होत नाही.

 ३८३. नैसर्गिक पालक (Natural Guardian): हिंदू अज्ञान व्यक्तीच्या संपत्तीसंबंधात (एकत्र कुटुंबाच्या संपत्तीतील त्याचा किंवा तिचा अविभक्त हितसंबंध वगळून) नैसर्गिक पालक पुढीलप्रमाणे आहेत:

(अ) अविवाहित मुलगा किंवा मुलगी यांच्या बाबतीत वडील आणि त्याच्या पश्चात आई. तथापि,  ज्याच्या वयाला पाच वर्षे पूर्ण झालेली नाहीत अशा अज्ञान मुलाची अभिरक्षा सामान्यतः मातेकडे असेल;

(ब) अनौरस अविवाहित मुलगा किंवा मुलगी यांच्या बाबतीत आई आणि तिच्या पश्चात वडील.

(क) विवाहित मुलीच्या बाबतीत पती परंतु कोणतीही व्यक्ती--

(ड) जर ती हिंदू राहिली नसेल तर, किंवा

(इ) जर आई किंवा वडीलांनी वानप्रस्‍थाश्रम स्‍वीकारला असेल अथवा त्‍यांनी संन्यासी बनून कायमचा प्रपंचाचा त्याग केलेला असेल तर ते अज्ञान व्यक्तीचा नैसर्गिक पालक म्हणून कार्य करण्यास हक्कदार असणार नाहीत.

स्पष्टीकरण. या कलमात, ‘वडील’ व ‘आई’ या शब्दप्रयोगात सावत्र वडील व सावत्र आई यांचा समावेश होणार नाही.                                       (हिंदू अज्ञानत्‍व आणि पालकत्व कायदा १९५६, कलम ६)

 

३८४. 'जंगी इनाम': (स्वातंत्र्यपूर्व शौर्य पुरस्कार): भारतीय सैनिकांसाठी आणि त्यांच्या मृत्‍युनंतर त्यांच्या पुढच्या पिढीसाठी 'दोन पिढींसाठी' विशेष निवृत्ती वेतन तत्कालीन ब्रिटिश सरकारने सन १९२० ला सुरू केले होते. आणि सन १९४७ नंतर भारत सरकार हे विशेष निवृत्ती वेतन देत आहे. सध्‍या जंगी इनाम’ विशेष निवृत्ती वेतन दर महा रु. १०००/- (रु. एक हजार फक्त) आहे. जंगी इनाम विजेत्यांच्या सर्व श्रेणींना आणि पहिल्या महायुद्धातील त्यांच्या कायदेशीर वारसांना (दोन पिढी) आणि दुसरे महायुद्ध (फक्त एक पिढी) असे त्‍याचे स्‍वरूप आहे.

 ३८५. ‘अतियात’ : इनाम जमिनीचे वारस ठरविण्‍यासंबंधी तरतूद.

                                                (हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४)

 ३८६. ‘मुंतखब’: सक्षम अधिकार्‍यातर्फे प्रदान करण्‍यात आलेली इनामाची "सनद" किंवा दस्‍तूर उल अमल इनाम किंवा इतर शशसकीय आदेशान्‍वये अतियात अनुदानांची पुष्‍टी केल्‍यानंतर देण्‍यात येणारा दस्‍तऐवज असा आहे.                                                                (तेलंगाना अतियात चौकशी कायदा, १९५२)

 ३८७. ‘काबिजे-ए-कदीम’: इनामदाराव्‍यतिरिक्‍त इनाम जमीन धारण करणारी आणि इनाम मंजूर झाल्‍यापासून जमीन कब्‍जात असणारी व्‍यक्‍ती,

 (हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा१९५४) [तेलंगाना इनाम निर्मूलन कायदा १९५५, कलम २(इ)]

 ३८८. खिदमतमाश (Service) किंवा सेवाधारी इनाम: देवस्‍थान, मंदिर, मस्‍जिद, इत्‍यादिंना प्रदान करण्‍यात आलेली जमीन. अशी जमीन फक्‍त पुजा-अर्चा व देवाची सेवा करण्‍यासाठी मुंतखंबच्‍या आधारे प्रदान करण्‍यात आली आहे. खिदमतमाश इनाम जमीन कोणत्‍याही परिस्‍थितीत खालसा करता येत नाही किंवा अशा जमिनीची विक्री, हस्‍तांतरण करता येत नाही.        (हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे  कायदा १९५४)

 ३८९. मदतमाश (Community) इनाम: सहाय्‍य म्‍हणून किंवा उपजिविकेसाठी प्रदान केलेली जमीन. मदतमाश जमीन खालसा करण्‍यात येऊ शकते. अशी जमीन चालू बाजारमुल्‍याच्‍या ५% रक्‍कम नजराणा रक्‍कम शासनाला प्रदान करून विक्री करता येईल.

                                 (हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४- कलम २-ए)

 ३९०. ‘जुडी’ किंवा ‘भाडे-सोड’ (quit rent): इनाम जमिनीच्‍या संदर्भात, वरिष्‍ठ धारक, कनिष्‍ठ धारकांकडून वसूल केलेल्‍या जमीन महसुलापैकी जो भाग सरकार जमा करतात तो भाग. ग्रँट ऑफ रेव्‍हेन्‍यू या प्रकारच्‍या जमिनींना शेतसार्‍यामध्‍ये सवलत दिलेली होती तरी 'जुडी' वसूल केली जात असे. 'जुडी'चा दर शेतसार्‍याच्‍या २५% असे. (तेलंगाना इनाम निर्मूलन कायदा, १९५५, कलम ३(एल)

(Ref: MANUAL OF Revenue Accounts OF THE Villages, Talukas and Districts OF THE BOMBAY STATE By F. G. HARTNELL ANDERSON, M.A., I.C.S.)

  

३९१. 'नुकसान': कनिष्‍ठ धारकांकडून जमीन महसूल वसूल करण्‍याच्‍या मोबदल्‍यात वरिष्‍ठ धारकांना जमीन महसुलात मिळालेली पूर्ण किंवा अंशत: सूट अथवा मोबदला. याला 'नुकसान' म्‍हणतात. (इनाम/वतन कायदे) 

 ३९२. 'संकीर्ण इनाम': सार्वजनिक कारणांसाठी महसूल कायद्यातील तरतुदींन्वये विशिष्ठ अट आणि सारा माफीने, कब्जेहक्काची किंमत न घेता दिलेल्या जमिनी. उदा. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, क्रिडांगणे इत्‍यादींना काही अटींवर दिलेल्‍या जमीनी. अशा जमिनींची नोंद गाव नमुना २ व ३ मध्ये असते. या जमिनींना इनाम वर्ग-असेही म्‍हणतात.                                                               (इनाम/वतन कायदे) 

 ३९३. 'देवस्थान इनाम' : देवी-देवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी शासनाने प्रदान केलेली जमीन. याला इनाम वर्ग- असेही म्‍हणतात. अशा जमिनींची नोंद गाव नमुना १-क व ३ मध्ये असते. अशा जमिनीचे हस्‍तांतरण शासनाच्‍या परवानगीशिवाय होऊ शकत नाही.             (इनाम/वतन कायदे)

(मा. उच्च न्यायालय, मुंबई - याचिका क्रमांक १८११/२०१९ - सुवर्णा आप्पासाहेब क्षीरसागर विरुद्ध महाराष्ट्र राज्य- दिनांक १५ एप्रिल २०२५)

 ३९४. ग्रँट ऑफ रेव्‍हेन्‍यू: या प्रकारच्‍या जमिनीचे देवस्‍थानच्‍या नावे हस्‍तांतरण झालेले नसुन देवस्‍थानला फक्‍त अशा जमिनीचा जमीन महसूल घेण्‍याचा अधिकार होता. या जमिनींना शेतसार्‍यामध्‍ये सवलत दिलेली असली तरी 'जुडी' वसूल केली जात असे. 'जुडी'चा दर शेतसार्‍याच्‍या २५% असे. अशा जमिनी ग्रँट ऑफ रेव्‍हेन्‍यू किंवा रेव्‍हेन्‍यू ग्रँटच्‍या होत्‍या. अशा जमिनीवर देवस्‍थानचा मालकी हक्‍क नसे परंतु देवस्‍थानला गावातील जमीन महसुलातुन खर्च वजा जाता उर्वरीत महसूल मिळण्‍याचा हक्‍क असतो.

(Where only the Revenue out of the concerned Land is given to the Devasthan and the Land is not transferred to the Devasthan, the Devasthan is not an Owner where Revenue Grant is made.  In case of Revenue Grant, the Devasthan has right to receive revenue only.)

 ३९५. ग्रँट ऑफ सॉईल:  पूर्वीचे राजे किंवा संस्‍थानिकांनी ज्‍या जमिनी देवस्‍थानाला, त्‍या जमिनीशी संलग्‍न दगड, धोंडे, तृण, पाषाण, नदी, नाले, गवत, झाडे-झुडपे यांच्‍या हक्‍कासह, संपूर्ण मालकी हक्‍काने प्रदान केल्‍या होत्‍या, यामुळे अशा जमिनींवर राजाला त्‍या जमिनीच्‍या शेतसार्‍यावर कोणतीही जुडी द्‍यावी लागत नव्‍हती, अशा जमिनींवरील सर्व हक्‍क देवस्‍थानचे होते. अशा जमिनींना ग्रँट ऑफ सॉईल किंवा सॉईल ग्रँट म्‍हणतात. काही देवस्‍थानांना संपूर्ण गावे सॉईल ग्रँट म्‍हणून प्रदान केलेली आहेत. अशा जमिनीवर देवस्‍थानचा मालकी हक्‍क असे.   

(Where the then Ruler or the Government has granted complete ownership of land to the Devasthan, such land is called Soil Grant. the Devasthan is owner of land only in those cases where Soil Grant is made.)

 एखादी देवस्‍थान जमीन रेव्‍हेन्‍यू ग्रँटची आहे किंवा सॉईल ग्रँटची आहे हे माहित करण्‍यासाठी महत्‍वाचा पुरावा म्‍हणजे त्‍या जमिनीची 'सनद'. (the type of grant can be seen from the provisions of respective Sanad.) आज बर्‍याच जुन्‍या सनद उपलब्‍ध नाहीत. तिथे इतर अनुषंगीक पुरावे आणि स्‍थानिक चौकशी करून निर्णय घेणे अपेक्षीत आहे. परंतु सन १८६० ते १८६२ दरम्‍यान इनाम कमिश्‍नर यांनी याबाबत चौकशी करून देवस्‍थान इनाम जमिनींची नोंद 'लँड लिनेशन रजिस्‍टर' मध्‍ये केलेली आहे.

 ३९६. दुमाला जमिनींची नोंदवही (Land Alignment Register): ब्रिटिश शासनाने महसूल माफीने दिलेल्‍या जमिनींचा, ज्‍यांना ऍलिनेटेड लँड (Alienated Land) म्‍हणून संबोधण्‍यात येत असे, त्‍याबाबत अभिलेख तयार केले, या अभिलेखाला दुमाला जमिनींची नोंदवही (Land Alignment Register) म्हणतात. सदर नोंदवहीची तरतूद, मुंबई जमीन महसूल संहिता १८७९, कलम ५३ अन्‍वये करण्‍यात आली. 

 महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ७५ अन्‍वये जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी, महाराष्‍ट्र जमीन महसूल (दुमाला जमिनींची नोंदवही) नियम, १९६७ अन्‍वये एक नोंदवही ठेवलेली असते. त्‍यात जिल्‍ह्‍यातील सर्व इनाम/वतन जमिनींची नोंद करण्‍यात येते. गाव पातळीवर दुमाला जमीनची नोंद तलाठी यांच्याकडील गाव नमुना ३ मध्ये असते. 'सनद' उपलब्‍ध नसेल तर या नोंदवहीमधील नोंद मालकी हक्‍काचा पुरावा म्‍हणून ग्राह्‍य मानण्‍यात येते.

'लँड लिनेशन रजिस्‍टर' मध्‍ये ज्‍या जमिनींना 'जुडी' आकारल्‍याचे नमुद आहे त्‍या जमिनी ग्रँट ऑफ रेव्‍हेन्‍यू किंवा रेव्‍हेन्‍यू ग्रँटच्‍या समजाव्‍या आणि ज्‍या जमिनींना 'जुडी' आकारल्‍याचे नमुद नाही त्‍या जमिनी ग्रँट ऑफ सॉईल किंवा सॉईल  ग्रँटच्‍या समजाव्‍या.

 ३९७. 'रिग्रॅन्‍टची रक्‍कम' (Amount of Regrant): इनाम/वतन कायद्‍यान्‍वये देवस्थान इनाम वर्ग तीन आणि इनाम वर्ग सात (महसूल माफीच्या जमिनी) वगळता बाकी सर्व वतन/इनामे विविध तारखांना खालसा/नष्ट करण्यात आली आहेत. या सर्व जमिनी शासनाकडे वर्ग झाल्यानंतर अशा जमिनींची आकारणीच्या पटीतील ठराविक रक्‍कम आणि मुदत ठरवून या जमिनी वतनदारांना पुन्‍हा नवीन शर्तीवर प्रदान (रिग्रॅन्‍ट) करण्‍यात आल्‍या. ज्‍या वतनदारांनी मुदतीत रक्‍कम भरली त्‍यांच्‍याकडून सहापट आणि मुदतीनंतर बारापट रक्‍कम वसूल करण्‍यात आली. अशी रक्‍कम म्‍हणजे रिग्रॅन्‍ट रक्‍कम. (इनाम/वतन कायदे)

 ३९८. 'मौजे गाव' आणि 'कसबा': कमी वाड्या असणारे कसबे गावापेक्षा छोटे गाव म्‍हणजे मौजे गाव आणि कसब म्‍हणजेच कौशल्य, कला, नैपुण्य, प्राविण्य असणार्‍या लोकांच्‍या जास्‍त वाड्‍या असणारे गाव म्‍हणजे कसबा. हा भाग मौजेपेक्षा विस्‍तृत आणि संपन्‍न असतो.  

 ३९९. पेठ: बाजार किंवा दुकानांनी व्‍यापलेला गावाचा भाग.   

 ४००. ʻमामुल जुडी किंवा जुनी सलामिʼ (Mamul Judi or Old Salami): इनामचे मूल्य कमी करण्याच्‍या हेतुने जमीन महसूलाचा शासनातर्फे घेण्‍यात येणार भाग. (a portion of land revenue taken by Government to reduce the value· of Inam, up to their intention)

 ४०१. ʻरोख भत्ताʼ (Cash allowance): अनुदान किंवा कोणत्याही हक्क, विशेषाधिकार, परवानगी, किंवा कार्यालयाच्‍या बाबतीत शासनातर्फे देय जमीन महसूल. (a grant of money or land revenue payable on the part of Government in respect of any right, privilege, perquisite or office)

 ४०२. ‘सलामि’ किंवा ‘सलामिआ’ (Salami or Salamia): सरकारने, मर्जी असेपर्यंत, इनामचे मूल्य कमी करून घेतलेला जमीन महसूलाचा एक भाग.  (Mamul Judi or Old Salami:-Means a portion of land revenue taken by Government to reduce the value of Inam up to their intention)

 ४०३. 'खुर्द' आणि 'बुद्रुक गावे' (Khurd and Budruk): पूर्वी मुस्‍लिम राजवटीत उर्दू मिश्रित किंवा फारसी मिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे. मोगल किंवा आदिलशाही कुतुबशाही, निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात होते.

एखाद्या नदीमुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर ते दोन भाग समसमान कधीच नसत. एक भाग लहान तर दुसरा मोठा असे. त्यातील मोठा भाग असलेल्या गावाला 'बुद्रुक' आणि लहान भाग असलेल्या गावाला 'खुर्द' म्‍हणतात. 

 ४०४. 'कब्‍जेहक्‍काची रक्‍कम किंवा भोगाधिकार मूल्‍य': एखाद्‍या व्‍यक्‍तीस जेव्‍हा शासकीय जमिनीचे वाटप केले जाते तेव्‍हा त्‍या जमिनीचा भोगवटा करण्‍याचा अधिकार दिल्‍याबद्‍दल मोबदला म्‍हणून देय असणारी रक्‍कम. उदा. धरणग्रस्त व्यक्तीस पुनर्वसनासाठी जमीन वाटप केली जाते त्यावेळी त्या जमिनीची संपादनाचे वेळी ठरविलेली रक्कम ही कब्जेहक्काची रक्कम म्हणून वसूल केली जाते, शासकीय जमिनीतील वाढीव गावठाणा मधील प्लॉट एखाद्या व्यक्तीस नवीन शर्तीने दिला जातो त्या वेळी सदर जमिनीचे शिघ्रसिद्ध गणकानुसार (रेडी रेकनर) बाजारमूल्य ठरविले जाते व अशी रक्कम सदर व्यक्ती कडून कब्जेहक्काची रक्कम म्हणून वसूल केली जाते. [महाराष्ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट लावणे) नियम १९७१, नियम २(के)(एक)]

४०५ ‘नजर’ करणे: निजामकाळात, निजामाची भेट घेतांना नजराणा म्‍हणून तळहातावर हातरुमालाची घडी करून त्‍या घडीवर एक रुपया ठेवून तो तेथे उपस्थित अधिकार्‍याच्‍या समोर धरायचा. त्‍या अधिकार्‍याने फक्त रुपयाला स्पर्श करावयाचा. ‘नजर’ उचलून स्वीकारण्याचा मान फक्त निजामाचा असे.       

 ४०६. बा मिसल:  (टपालावरील ब्रिटीश कालीन शेरा)प्रकरण (फाईल) तयार करा  (Put up file)

 ४०७. बा कैफियत: (टपालावरील ब्रिटीश कालीन शेरा) टिपणी तयार करा (Put up Note)

 ४०८. बाद तनक्की: (टपालावरील ब्रिटीश कालीन शेरा) छाननीनंतर (After scrutiny)

 ४०९. पिवळी ज्वारी: खरीप हंगामातील ज्वारी. माहे जुन नंतरचे पीक

 ४१०. पांढरी ज्वारी: रब्‍बी हंगामातील ज्वारी. हिवाळयातील पीक

 ४११. पेशकश: खंडणी/लाच

 ४१२. दस्‍तुर: रूढ पध्‍दत/प्रथा

 ४१३. शुकराना: आभार प्रदर्शन

 ४१४. तहरीर: मजकूर

 ४१५. मेहराना: कृपादृष्‍टी

४१६. आखाजी: खानदेशी भाषेत अक्षय तृतीया. खानदेशात अक्षय तृतीया म्हणजे लोकांचा महत्वाचा सण, सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. नवे कपडे शिवले जातात. आखाजीच्या दरम्यान घरोघरी झाडांना, घरात झोके बांधले जातात. सालदारांसाठी आखाजीला नवीन वर्ष सुरु होते. आखाजी पत्ते खेळण्यासाठी प्रसिध्द आहे, लहानमोठे सर्वजण त्या दिवशी पत्त्यांचा जुगार खेळतात.

 ४१७. दवंडी (beats of drum): राजाचा हुकूढोल वाजवून दंवंडीने लोकांना सार्वजनिक रित्या सांगण्याची पध्दत. दवंडी देण्यासाठी खास गावात माणूस नेमला जाई. नवीन आलेला कोणताही नियम किंवा हुकूम लोकांना सांगण्यासाठी जसा दवंडीचा वापर केला तसेच तो स्वातंत्र्यानंतर विविध प्रकारचे आजार, साथीचे रोग, जमिनींचे लिलाव, विक्री इत्यादी कामे करताना महसुल यंत्रणेकडून दंवडी देऊन लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला. गेल्या अनेक वर्षात ही दवंडी कोणी पाहिलेली नाही किंवा ऐकलेली पण नाही. तरी सुध्दा सर्रासपणे विविध न्यायालयात सुध्दा दवंडीचा उतारा मागितला जातो आणि ग्राम महसूल अधिकारी सुध्दा सदर गावात दवंडी द्वारे नोटीस प्रसिध्द केल्याचा अहवाल कागदोपत्री सादर करतात. 

 ४१८. 'कुणबी' आणि 'अडाणी': उद्‍योगासाठी लोक वस्तीचे 'कुणबी' आणि 'अडाणी' असे भाग पडतात. कुणबी याचा अर्थ शेतकरी आणि 'अडाणी' म्हणजे बिगर शेतकरी. कुणबी म्हणजे कोणीबी (anybody) असे संबोधले जाते. कुणबी, कणबी, किरसान हे शब्द संस्कृत कृषि किंवा कृषिवल शब्दापासून ले असावेत, तर काही लोक म्हणतात कुणबी म्हणजे 'कुनमी' म्हणजेच पृथ्वीला नमन करणारा. शेती व्‍यवसायासाठी खूप ताकद (बळ) आवश्‍यक असते, त्‍यामुळेच शेतकर्‍याला बळी (बलवान) म्‍हणण्‍याची पध्‍दत रूढ झाली. अकबराच्या काळात राजा तोरडमल यांनी जमिनी मोजल्या आणि जमिनीवर कर वेगळा बसविला. निजामशाहीमध्ये चांद बिबीचा नोकर मल्लिकांबर याने मोजणी करुन प्रतवारी ठरविली. जमीन कसणाऱ्या कुणब्यांची मालकी बनवून त्यांना जमिनीच्या खरेदी विक्रीचा हक्क दिला. पाटील, कुलकर्णी व गावातील काम करणारे इ. यांचे वेतन 'मिरास' करुन वंश परंपरेने करुन दिले. त्यामुळे कुणब्यांकडे असलेल्या जमिनीला मिरासदार किंवा वतनदार असे म्हटले जाऊ लागले. पिढयानपिढ्या वारसा हक्काने मिळत राहणाऱ्या या जमिनीला त्यामुळे 'मिरासी' असे म्हणत. त्यामुळे तुकोबा म्हणतात, "हे माझे मिरासी | ठाव तुझा पापाशी ||"

 ४१९. 'जुनी शर्त' व ‘नवीन शर्त’ची जमीन:  शासनामार्फत, जनतेला जमिनी प्रदान करताना काही अटी शर्तीवर देण्याची तरतूद आहे. लोकांनी परस्पर अशा जमिनी इतर लोकांना विकू नये हा त्यामागे हेतू होता. अशा जमिनी परस्पर विक्रीचा हक्क ज्या लोकांना आहे अशा जमिनी म्‍हणजे 'जुन्‍या शर्तीच्‍या जमिनी' व ज्या जमिनीच्‍या विक्रीवर निर्बंध आहेत त्‍या नविन शर्तीच्‍या जमिनी.

                                                      (मुंबई प्रांतासाठीचा मुंबई जमीन महसूल कायदा, १८७९)

 

४२०. इनामदार: ज्‍या व्‍यक्‍तीला जमीन किंवा गाव सरकररने इनाम म्‍हणून प्रदान केला आहे किंवा इनाम जमिनीमध्‍ये त्‍याचा स्‍वत:च्‍या फायद्‍यासाठी अथवा वंशपरंपरागत हिस्‍सा आहे आणि ज्‍याला पूर्णत: किंवा अंशत: जमीन महसूल वसूल करण्‍याचा हक्‍क प्राप्‍त झाला आहे अशी व्‍यक्‍ती.

                                                              [तेलंगाना इनाम निर्मूलन कायदा १९५५, कलम २(डी)]

 

४२१. ʻवतनʼ: वतन हा मूळचा अरबी शब्द आहे ज्‍याचा अर्थ स्वदेश किंवा जन्मभूमी.

ʻवतनʼ म्‍हणजे वतनदाराने दिलेल्‍या सेवेचा मोबदला म्‍हणून दिलेले ईनाम. (Inam in lieu of services render by watandar) गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल एखाद्‍या व्यक्तीला उपजीविकेसाठी वंशपरंपरेने चालणारे उत्पन्‍नाचे साधन म्हणजे वतन होय. वतन' हा शब्द 'वर्तन' (उपजीविकेचे साधन) ह्या संस्कृत शब्दापासून आला असावा. राहण्याच्या जागेला अरबी भाषेत वतन म्हणतात. जातधंदा, वंशपरंपरागत काम, चाकरी, नेमणूक, उत्पन्न, अधिकार, मानपान, हक्क, वडिलोपार्जित मिळकत, स्थावर अगर स्थावराच्या योग्यतेची जंगम मालमत्ता, जन्मभूमी ह्या सर्वांना वतन शब्द लावतात. वतन धारण करणाराला वतनदार म्हटले जाते.

 ४२२. वतनदार: वतन हा मूळचा अरबी शब्द आहे, ज्‍याचा अर्थ वर्तन, स्वदेश, जन्मभूमी असा होतो. गावासाठी किंवा देशासाठी करत असलेल्या कर्तव्याबद्दल अशा व्यक्तीला उपजीविकेकरिता वंशपरंपरेने चालणारे उत्पन्‍नाचे साधन मिळते ते म्हणजे वतन. वतन धारण करणार्‍याला वतनदार म्हटले गेले आहे. इनामदार, जहागिरदार, मनसबदार, सरंजामदार हे या एकाच संकल्पनेत मोडतात. वतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असत.

 ४२३. मिरासदार: तत्‍कालीन कायद्यानुसार, जमीन महसुलाच्या देय रकमेची भरपाई करून सशर्त जमीन कायमस्वरूपी धारण करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती. जोपर्यंत मिरासदार त्याच्या शेतसारा भरत आहे तोपर्यंत सरकार किंवा इनामदार त्‍याला विस्थापित करू शकत नाहीत. (Mirasdar-Means a person who has a right to hold land in perpetuity conditionally on the payment of the amounts due on account of the land revenue for the same according to the law for the time being in force. Government or an Inamdar cannot displace a Mirasdar as long as he pays the assessment on his fields.)

 ४२४. नजराणा: उत्तराधिकार आणि हस्तांतरणाच्या संदर्भात सरकारकडील सर्व दाव्यांसाठी वार्षिक किंवा नैमित्तिक निश्चित रुपांतरण रक्‍कम.

(Nazarana-Means an annual or occasional fixed payment in commutation of all claims of Government in respect of succession and transfer.)

 ४२५. परगणा वतनदार: वंशपरंपरागत जिल्‍ह्‍याच्‍या प्रमुख अधिकार्‍यांना परगणा वतनदार म्हणत. एक परगण्‍यात, प्रत्येक तालुक्‍यातील अनेक खेड्यांचा समावेश असे ज्याचे प्रमुख एक शहर होते. त्यांची काही पदे पुढीलप्रमाणे होती:-

() देशमुख, देसाई, नरगौडा किंवा सर पाटील - पाटीलांचे प्रमुख.

(२) देशपांडे किंवा कार्य कुलकर्णी - कुलकर्णीचे प्रमुख.

हे अधिकारी पाटील, कुलकर्णी यांच्यासारखे वतनदार सरकारी नोकर होते.

 प्रत्येक परगण्यातील पाटलांचा प्रमुख सरकारी देणी वसूल करण्याची जबाबदारी पार पाडत असे आणि कुलकर्णींचा प्रमुख त्याच्याशी संबंधित हिशेब व पत्रव्यवहार ठेवत असे.

(The Hereditary District Officers were called Pargana Watandars. A Pargana: consisted of several villages in each Taluka with one town at the head. Some of their designations were as follows: -

(I) Deshmukh, Desai, Nargauda or Sar Patil-Head of Patils.

(2) Deshpande or Karyat Kulkarni-Head of Kulkarnis.

These officers were Watandar Government servants like Patils and Kulkarnis of the present day.

 'In each Pargana the head of the Patils was responsible for the collection of Government dues and the head of Kulkarnis kept accounts and correspondences connected therewith.)

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महसूल शब्दावली - 8. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.