आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

बक्षीसपत्र

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

बक्षीसपत्र 

बक्षीसपत्राला इंग्रजी भाषेत Gift Deed म्‍हणतात. बक्षीसपत्र हा एखाद्‍या मिळकतीमधील मालकी हक्क हस्‍तांतरीत करण्याचा एक लोकप्रिय दस्तऐवज आहे.

बक्षीसपत्र (Gift Deed) म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मालकीची स्थावर किंवा जंगम मालमत्ता कोणताही मोबदला (Consideration) न घेता, स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीला कायमस्वरूपी देणे आणि संबंधित व्यक्तीने ते बक्षीस स्वीकारणे होय. 

w बक्षीसपत्रासंबंधी प्रमुख कायदे :

∙ मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ (Transfer of Property Act, 1882).

∙ नोंदणी अधिनियम, १९०८ (Registration Act, 1908).

∙ महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ (Maharashtra Stamp Act, 1958). 

w मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२, कलम १२२ अन्‍वये,

बक्षीस म्हणजे विद्यमान जंगम किंवा स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस स्वेच्छेने व कोणताही मोबदला न घेता केले जाते आणि ज्याचा स्वीकार बक्षीस घेणाऱ्या व्यक्तीने किंवा तिच्या वतीने केला जातो.

उक्‍त व्याख्येतील महत्त्वाचे घटक :

∙ मालमत्ता अस्तित्वात असणे आवश्यक आहे. भविष्यात मिळणाऱ्या मालमत्तेचे बक्षीस अवैध ठरेल.

∙ मालमत्ता हस्तांतरण करणार्‍या व्यक्तीला ‘बक्षीस देणारी व्‍यक्‍ती’  (Donor) म्‍हणतात.

∙ मालमत्ता स्वीकारणारी व्यक्ती (बक्षीस घेणारी’ व्‍यक्‍ती’ (Donee) म्‍हणतात.

∙ बक्षीस स्वेच्छेने दिलेले असावे.

∙ बक्षीस देतांना कोणताही आर्थिक मोबदला (Consideration) घेतलेला नसावा.

∙ बक्षीस घेणाऱ्या व्यक्तीने बक्षीस स्वीकारलेले (Acceptance) असावे. 

w बक्षीसपत्र कसे करावे?

aस्थावर मालमत्तेचे बक्षीसपत्र (उदा. जमीन, घर, सदनिका, प्लॉट इत्यादी.)

∙ बक्षीसपत्र लेखी स्वरूपात असावे.

∙ त्यावर दात्याची किंवा त्याच्या वतीने अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी असावी.

∙ किमान दोन साक्षीदारांनी साक्षांकन (Attestation) केलेले असावे.

∙ बक्षीसपत्राची नोंदणी करणे बंधनकारक आहे. 

aजंगम मालमत्तेचे बक्षीसपत्र (उदा. वाहन, दागिने, रोख रक्कम इत्यादी.)

∙ जंगम मालमत्तेचे बक्षीस नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे किंवा मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा देऊन करता येते. 

∙ जेव्हा एखादी व्यक्ती एकाच मालमत्तेचे बक्षीस दोन किंवा अधिक व्यक्तींना देते, तेव्हा त्यापैकी एखादी व्यक्ती बक्षीस स्वीकारत नसेल, तर त्या व्यक्तीच्या हिस्स्यापुरते बक्षीस निष्फळ ठरते.

इतर व्यक्तींनी स्वीकारलेले बक्षीस त्यांच्या बाबतीत वैध राहू शकते.

w बक्षीसपत्र रद्द करण्याच्या तरतुदी :

∙ दाता आणि दानग्रहीता यांच्यामध्ये बक्षीसपत्र रद्द करण्याबाबत विशिष्ट अट असू शकते.

∙. अशी अट एखाद्या विशिष्ट घटनेवर अवलंबून असावी. ती घटना केवळ दात्याच्या इच्छेवर अवलंबून नसावी.

∙ दात्याला स्वतःच्या मर्जीने केव्हाही बक्षीसपत्र रद्द करण्याचा अधिकार नसतो.

∙. फसवणूक, दबाव, अनुचित प्रभाव किंवा चुकीचे प्रतिपादन यांसारख्या कारणांमुळे करार रद्द होऊ शकत असल्यास, त्याच स्वरूपाच्या कारणांवर बक्षीसपत्र रद्द करण्याची मागणी करता येऊ शकते. 

w बोजायुक्त बक्षीस (Onerous Gift)

∙ एखाद्या मालमत्तेचे बक्षीस स्वीकारताना त्या मालमत्तेसोबत काही आर्थिक दायित्व किंवा जबाबदारीदेखील स्वीकारावी लागत असेल, तर त्याला बोजायुक्त बक्षीस म्हणतात.

∙ बोजायुक्त बक्षीस स्वीकारल्यास त्यासंबंधीचे दायित्व स्वीकारण्याचा प्रश्न निर्माण होतो.

∙ एका व्यक्तीस एकाच व्यवहारात दिलेल्या अनेक स्वतंत्र मालमत्तांपैकी एक बोजायुक्त मालमत्ता स्वीकारून दुसरी नाकारण्याचा पर्याय कायद्यात दिला आहे.

∙ मात्र, एकाच मालमत्तेच्या बाबतीत लाभ स्वीकारून त्याच मालमत्तेवरील बोजा नाकारता येत नाही. 

w  बक्षीसपत्रासाठी पात्रता:

अ) बक्षीस देणारी व्यक्ती (Donor)

∙ सज्ञान व्यक्ती असावी.

∙ मानसिकरित्‍या सक्षम असावी.

∙ संबंधित मालमत्तेवर हस्तांतरण करण्यायोग्य वैध हक्क असावा.

∙ बक्षीस स्वेच्छेने देत असावी.

 

ब) बक्षीस स्वीकारणारी व्यक्ती (Donee)

∙ बक्षीस स्वीकारणारी व्‍यक्‍ती सज्ञान असणे अनिवार्य नाही.

∙ अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने तिचा नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक बक्षीस स्वीकारू शकतो.

s बक्षीसपत्र फक्‍त नातेवाइकांच्‍याच लाभात करावे असे बंधन नाही. बक्षीसपत्र हे त्रयस्‍थ व्‍यक्‍ती, संस्‍था, मंडळ इत्‍यादींच्‍या लाभातही करता येते. 

w बक्षीस स्वीकारण्याची मुदत:

∙ दाता जिवंत असताना बक्षीस स्वीकारले गेले पाहिजे.

∙ दाता बक्षीस देण्यास सक्षम असतानाच स्वीकार झाले पाहिजे.

∙ बक्षीस स्वीकारणारी व्‍यक्‍ती बक्षीस स्‍वीकारण्‍यापूर्वी मयत झाल्यास बक्षीसपत्र निष्फळ ठरते.

∙ बक्षीसाचा स्वीकार स्पष्ट शब्दांत किंवा परिस्थितीनुसार कृतीतूनही दर्शविता येतो.

∙ बक्षीसपत्रामध्ये बक्षीस स्वीकारल्याची स्पष्ट नोंद करणे योग्य ठरते. 

w बक्षीसपत्राची नोंदणी (Registration of Gift Deed)

स्थावर मालमत्तेचे बक्षीसपत्र नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

w कोणत्‍या मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते?

∙ स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षीसपत्राने हस्‍तांतरीत करता येते.

∙ स्वकष्‍टार्जित मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ वडिलोपार्जित मिळकतीतील स्‍वत:च्‍या हिश्‍शाचे बक्षीसपत्र करता येते.

∙ मृत्‍युपत्राने (Will) मिळालेली मालमत्ता ही स्‍वतंत्र मिळकत (separate property) ठरते म्‍हणून अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ भेट (gift) म्‍हणून मिळालेली मालमत्ता ही स्‍वतंत्र मिळकत ठरते म्‍हणून अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ हिंदू व्‍यक्‍तीने स्वत:च्या प्रयत्नांद्वारे मिळवलेली मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असते म्‍हणून अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ जेव्‍हा एखादी व्यक्ती कायदेशीरपणे प्रतिकूल ताब्‍याने (adverse possession) मालमत्ता संपादन करेल तर ती मालमत्ता त्‍याची स्‍वतंत्र मालमत्ता आहे असे मानले जाते, म्‍हणून अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ जेव्‍हा संयुक्त कुटुंबातील सदस्य त्‍याचा स्‍वतंत्र व्यवसाय करून त्‍यातून पैसे कमवतो आणि मालमत्ता खरेदी करतो तेव्‍हा त्‍याने मिळविलेले सर्व उत्पन्न आणि मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असते म्‍हणून अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ जेव्हा एखादी व्यक्ती परंपरागत पुजेसारख्या अनुवांशिक व्यवसायातून पैशांची कमाई करते तेव्हा ती त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाते. अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ एकमेव हयात वारस म्‍हणून वारसाहक्‍काने मिळालेली मालमत्ता त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाते, अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ एखाद्‍या हिंदू व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या वडिलांनी, आजोबांनी, पणजोबांनी भेट म्‍हणून दिलेली मालमत्ता स्वतंत्र मालमत्ता असते. अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ पित्याद्वारे, पितृ मालमत्तेतून स्‍नेहामुळे मुला/मुलीला दिलेल्या भेटवस्तू किंवा मालमत्ता ही त्‍यांची स्वतंत्र मालमत्ता असते, अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ शासनाकडून विना अट अनुदान म्‍हणून मिळालेली संपत्ती स्‍वतंत्र मालमत्ता मानली जाते, अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ संयुक्त कुटुंबाची असलेली परंतु संयुक्त कुटुंबाने गमावलेली मालमत्ता, नंतर त्‍या संयुक्त कुटुंबाच्‍या एखाद्‍या सदस्याने, संयुक्त निधीच्या मदतीशिवाय पुनर्प्राप्त केली तर ती त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाते, अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ शिक्षणाद्वारे किंवा व्‍यवसायाव्‍दारे किंवा तज्‍ज्ञ किंवा विशेष बुद्धिमत्तेद्वारे मिळविलेली कोणतीही मालमत्ता स्वतंत्र मालमत्ता मानली जाते, अशा मालमत्तेचे बक्षीसपत्र करता येते.

∙ हिंदू वारसा कायदा १९५६ कलम १४ अन्‍वये, हिंदू वारसा कायदा १९५६ अंमलात येण्‍यापूर्वी किंवा अंमलात आल्‍यानंतर, कोणत्‍याही हिंदू स्‍त्रीची, तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशी मालमत्ता तिला, कोणत्‍याही अटी/शर्ती विना, विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर वारसाहक्‍काने, मृत्‍युपत्रीय दानाने, वाटणीमध्‍ये, पोटगी म्‍हणून, नातलगांकडून मिळालेली असो किंवा तिने अशी मालमत्ता स्‍वत:च्‍या कौशल्‍याने, परिश्रमाने कमावलेली असो किंवा एखादी संपत्ती दान/भेट किंवा इतर कोणत्याही लेखान्वये, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यान्वये, आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्यान्वये संपादित केली गेली असेल किंवा अन्‍य कोणत्‍याही मार्गाने संपादित केलेली असो, अशी संपत्ती, ती हिंदू स्‍त्री संपूर्ण स्वामी म्हणून धारण करील, मर्यादित स्वामी म्हणून नव्हे. त्‍यामुळे कोणत्‍याही हिंदू स्‍त्रीला वरील प्रमाणे प्राप्‍त झालेल्‍या मिळकतीचे बक्षीसपत्र करता येईल.

 w बक्षीसपत्रात काय नमूद असावे?

∙ बक्षीस पत्र करून देणाऱ्याचे (दाता) नाव, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.

∙ बक्षीस पत्र करून घेणाऱ्याचे (लाभार्थी) नाव, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.

∙ दोन्ही पक्षांचे ओळख पुरावे, पॅन कार्ड आणि आधार कार्ड

∙ बक्षीस देत असलेल्‍या संबंधित मालमत्तेच्‍या नोंदणीकृत आणि कायदेशीर कागदपत्रांन्‍वये मालमत्तेचे अचूक वर्णन.

∙ बक्षीस देत असलेली मालमत्ता, दात्‍याच्‍या नावावर कशी हस्‍तांतरीत झाली आणि  दात्‍याचा मालकी हक्‍क कसा निर्माण झाला त्‍याबाबत सविस्‍तर वर्णन.

∙ बक्षीस देत असलेल्‍या संपत्तीवर कोणतेही कर्ज नसल्याचे घोषणापत्र करणे आवश्‍यक असते अथवा अशा संपत्तीवर कोणतेही कर्ज असल्यास बक्षीस पत्रात त्याचा उल्लेख करावा लागतो त्यासाठी लाभार्थीची सहमती असणे आवश्यक आहे.

∙ बक्षीसपत्र करून देणारा (दाता) अथवा बक्षीसपत्र करून घेणार (लाभार्थी) यांवर बक्षीसपत्र करण्‍यासाठी किंवा करून घेण्‍यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याबाबत उल्‍लेख.

∙ बक्षीसपत्र करून घेणाऱ्याने (लाभार्थीने) बक्षीसाचा स्वीकार केला आहे असा स्‍पष्‍ट उल्‍लेख/घोषणा.

∙ दाता आणि लाभार्थी दोघेही निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याचा उल्‍लेख.
∙ दोन निष्‍पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्‍वाक्षरी.

∙ आवश्यक असल्यास, इतर तपशील 

w बक्षीस पत्र हे विना-मोबदलाच असावे काय?

 होय, बक्षीस पत्र हे विना-मोबदलाच असावे. म्हणजेच मिळकतीमधील हक्क हस्‍तांतरीत केल्याच्या बदल्यात दाताला लाभार्थीकडून कोणताही मोबदला मिळत नाही. 

काही अटींना अधीन राहून म्हणजेच सशर्त (Conditional) बक्षीसपत्र देखील करता येते. सशर्त भेट स्‍वरूप आणि उद्देशानुसार भिन्न असू शकतात.

अटींच्या उदाहरणांमध्ये, लाभार्थीने मालमत्तेचा विशिष्ट हेतूसाठी वापर करणे, जसे की शिक्षण, धर्मादाय प्रयोजासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी करणे बंधनकारक असू शकते. भेटवस्‍तुची विक्री प्रतिबंधित करणे किंवा मालमत्ता विशिष्ट कौटुंबिक वंशात राहण्याची खात्री देणे, दात्‍याची काळजी घेणे किंवा त्‍याला आर्थिक सहाय्य किंवा वैद्यकीय सेवा पुरवणे, भेट मिळालेल्या मालमत्तेचा वापर एखाद्या विशिष्ट हेतूसाठी करणे अशा अटी समाविष्‍ट असू शकतात.

बक्षीसपत्रात नमूद केलेल्या अटींचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास भेट रद्द करण्याचा अधिकार दाता राखून ठेवू शकतो. तथापि, दाता आणि लाभार्थी या दोघांनीही बक्षीसपत्रातील अटी व शर्तींना त्यांची ऐच्छिक संमती दिली पाहिजे.

भेटवस्तूशी संलग्न अटी बेकायदेशीर, अनैतिक किंवा सार्वजनिक धोरणाच्या विरुद्ध नसाव्यात.

w मुद्रांक शुल्‍कात सवलत:

∙ विशिष्‍ठ रक्‍तसंबंधी नातेवाईंक, उदा. पती, पत्नी, भाऊ, बहीण किंवा दात्याचे सरळ वंशातील पूर्वज अथवा वंशज यांना बक्षीस यांमध्‍ये होणार्‍या बक्षीसपत्रासाठी मुद्रांक शुल्‍कामध्‍ये सवलत दिलेली आहे. तसेच पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात, मयत मुलाची पत्नी यांना निवासी किंवा कृषी मालमत्ता बक्षीस दिल्यास मुद्रांक शुल्काची विशेष तरतूद आहे.

(दुय्‍यम निबंधक कार्यालयातून अद्‍ययावत माहिती घ्‍यावी) 

w एकदा केलेले बक्षीसपत्र रद्‍द करता येते काय?

∙ सर्वसाधारणपणे, एकदा बक्षीसपत्राचा नोदणीकृत दस्‍त केल्‍यानंतर ते रद्‍द करता येत नाही. बक्षीस दिलेल्‍या मिळकतीत पुन्‍हा हक्‍क, हिस्‍सा मागण्‍याबाबत कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. 

तथापि, लाभार्थीने,

∙ जर दात्‍याची फसवणूक करून बक्षीसपत्र करून घेतले असेल,

∙ दात्‍याला बक्षीसपत्र करून देण्‍यास भाग पाडले गेले असेल,

∙ दात्यावर दबाव किंवा अनुचित प्रभाव टाकून गेले असेल,

∙ बक्षीसपत्राच्‍या दस्तऐवजात त्याच्या हेतूचा चुकीचा अर्थ लावला गेला असेल,  

∙ बक्षीसपत्र करताना दात्याची कायदेशीर क्षमता नसल्याचे सिद्ध झाल्यास.या बाबी दिवाणी न्‍यायालयात बक्षीसपत्रातील वैध अटीचा भंग झाला असल्यास.

उक्‍त बाबी पुराव्‍यासह सिध्‍द करता आल्‍या तर, दिवाणी न्‍यायालयाकडून बक्षीसपत्र रद्‍द करता येईल. तथापि, ज्याप्रमाणे एखादा करार रद्द करता येतो त्या कारणांनी बक्षीसपत्र रद्द करता येऊ शकेल. केवळ दात्याने एकतर्फी रद्द खत करून नोंदणीकृत बक्षीसपत्र रद्द झाले असे गृहीत धरता येत नाही. 

w महसूल अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचे :

∙ बक्षीसपत्र नोंदणीकृत असावे, तथापि फक्‍त बक्षीसपत्र नोंदणीकृत असल्याने फेरफार नोंद आपोआप प्रमाणित होत नाही.

∙ बक्षीसपत्र करणाऱ्या व्यक्तीचा मालकी हक्क तपासणे आवश्यक आहे.

∙ दात्याचा संपूर्ण हिस्सा बक्षीस दिला आहे की अंशतः, हे तपासावे.

∙ स्‍वत:च्‍या मालकी हिश्श्यापेक्षा अधिक क्षेत्राचे बक्षीस देता येत नाही.

∙ बक्षीसपत्रामुळे अस्तित्वात नसलेला मालकी हक्क निर्माण होत नाही.

∙ फेरफार नोंद ही महसुली अभिलेखातील नोंद असून ती स्वतःहून मालकी हक्क निर्माण करीत नाही. 

w मुस्लिम कायद्यातील बक्षीस 

aहिबा – हिबानामा:

∙ मुस्‍लिम वैयक्‍तिक कायद्‍यान्‍वये 'हिबा' ची तरतूद आहे.

∙ 'हिबा' म्‍हणजे तोंडी बक्षीस (gift). 'हिबानामा' म्‍हणजे बक्षीसाचा लेखी दस्‍त.

∙ भारतीय राज्‍यघटनेने मुस्‍लिम वैयक्‍तिक कायद्‍याला मान्‍यता दिली असल्‍याने मुस्‍लिम वैयक्‍तिक कायद्‍यातील तरतुदी आहे तशा लागू होतात.

∙ मुस्‍लिम कायद्‍यांतर्गत, मुस्‍लिम व्‍यक्‍ती, कायदेशीरपणे, स्‍वत:च्‍या हयातीत, (inter vivos) अन्‍य हयात व्‍यक्‍तींना स्‍वत:ची संपूर्ण संपत्ती 'हिबा' मार्फत हस्‍तांतरीत करू शकते.

∙ हिच संपत्ती जर त्‍याने मृत्‍युपत्राद्‍वारे दिली तर त्‍याला फक्‍त १/३ मिळकत देण्‍याचा अधिकार प्राप्‍त होतो आणि मृत्‍युपत्राद्‍वारे दिलेल्‍या मिळकतीचे हस्‍तांतरण त्‍याच्‍या मृत्‍युनंतरच शक्‍य होते, त्‍याच्‍या हयातीत नाही.         

∙ मालमत्ता हस्‍तांतरण अधिनियम १८८२, कलम १२२ मध्‍ये बक्षीस/दान (gift) ची प्रक्रिया स्‍पष्‍ट केलेली आहे. परंतु 'हिबा' या प्रकाराला कायद्‍यानुसार 'व्यवहार (transaction) मानले जाते कारण मुस्‍लिम कायदा 'हिबा' (gift) ला कराराच्‍या कायद्‍याचा भाग (part of contract law) मानतो कारण 'हिबा' साठी तीन आवश्यक अटींची पूर्तता होणे अनिवार्य असते.

१. दात्याने बक्षीस देण्याची स्पष्ट घोषणा करणे (Declaration).

२. दानग्रहीत्याने बक्षीस स्वीकारणे (Acceptance).

३. मालमत्तेचा प्रत्‍यक्ष ताबा देणे (Delivery of Possession).

s 'हिबा' तोंडी किंवा लेखी असू शकतो.

s हिबानामावर दोन साक्षीदारांची सही असावी.

s मुस्लिम व्‍यक्‍तीला स्‍वत:च्‍या संपूर्ण संपत्तीचा हिबा करता येतो.

s मालमत्ता हस्‍तांतरण कायदा १८८२, कलम १२९ अन्‍वये, या कायद्‍यातील प्रकरण सात मधील दान (gift) बाबतच्‍या तरतुदी वैयक्‍तिक कायदा पाळणार्‍यांना लागू होत नाहीत अशी तरतुद आहे. त्‍यामुळे लेखी 'हिबा' नोंदणीकृत असावा असे बंधन नाही. 

s 'हिबा'चा समावेश 'शरीयत कायदा १९३७' या मुस्‍लिम व्‍यक्‍तीगत कायद्‍यात करण्‍यात आला आहे म्‍हणून 'हिबा' मुळे भारतीय राज्‍यघटनेच्‍या कलम १४ चा भंग होत नाही. 

a मर्ज-उल-मौत (Marz-ul-Maut): हा शब्द अरबी भाषेतून आला आहे, यात ‘मर्ज’ म्हणजे आजार आणि ‘मौत’ म्हणजे मृत्यू. ही मृत्‍युशैय्‍येवर (Deathbed) असतांना स्‍वत:च्‍या संपत्तीपैकी १/३ संपत्ती भेट (giving gifts) देण्याची इस्लामिक कायद्यातील संकल्पना आहे. ज्या परिस्थितीमध्‍ये मुस्‍लिम हस्तांतरणकर्त्याच्या मनात मृत्‍युची वाजवी भीती असताना दिलेली कोणतीही संपत्ती/भेटवस्तू केवळ तेव्हाच वैध मानली जाते जेव्‍हा संपत्ती/भेटवस्तू दिल्‍यानंतर हस्तांतरणकर्त्याचा मृत्‍यू होतो. असे हस्तांतरण हा (वसियतनामा) मृत्‍युपत्राचा एक प्रकार मानला जातो. मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍तीला, त्‍याच्‍या दफन विधी खर्च व कर्ज फेडीसाठी आवश्‍यक असणारी रक्‍कम वेगळी ठेऊन, त्‍याच्‍या संपत्तीच्‍या १/३ संपत्ती, कोणत्‍याही वारसांच्‍या संमतीशिवाय भेट किंवा वसियतनामा करून देता येते. १/३ संपत्तीपेक्षा जास्‍त संपत्तीचे मृत्‍युपत्र (वसियतनामा) सर्व वारसांच्‍या संमतीनेच वैध होते.  

w पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा, २००७, 

s कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाने, एखाद्या व्यक्तीला, तो, त्या ज्येष्ठ नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवेल किंवा त्याच्या मूलभूत शारीरिक गरजा पुरवेल या शर्तीस अधिन राहून, बक्षीसपत्राने अथवा अन्य प्रकारे आपली मालमत्ता हस्तांतरीत केली असेल आणि त्या व्यक्तीने, त्या ज्येष्ठ नागरिकाला मूलभूत सुविधा पुरविण्यास किंवा मूलभूत शारीरिक गरजा पुरविण्यास नकार दिला असेल किंवा तो त्यासाठी निष्फळ ठरला असेल तर असे झालेले मालमत्तेचे हस्तांतरण लबाडीने किंवा जबरदस्तीने किंवा गैरवाजवी प्रभावाने केले असल्याचे मानण्यात येईल आणि न्यायाधिकरणास असे हस्तांतरण अवैध आहे असे न्‍यायाधिकरणाला घोषित करता येईल. [आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, कलम २३(१)] 

s पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा, २००७,  कलम २३ केवळ तेव्हाच आकर्षित केले जाईल जेव्हा ज्येष्ठ नागरिकाने मालमत्तेचे हस्तांतरण मूलभूत सुविधा आणि मूलभूत सुविधा प्रदान करण्याच्या अटीच्या अधीन असेल. (सुदेश चिकारा विरुद्ध रामती देवी (मा. सर्वोच्‍च न्‍यायालय-२०२२), 

बक्षीसपत्र मृत्युपत्र आणि खरेदी खत यातील फरक

मुद्दा

बक्षीसपत्र

मृत्युपत्र

खरेदीखत

इंग्रजी नाव

Gift Deed

Will

Sale Deed

संबंधित कायदा

मालमत्ता हस्तांतरण

अधिनियम

भारतीय उत्तराधिकार

अधिनियम

मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि नोंदणी कायदा

हस्तांतरण

दात्याच्या हयातीत

मृत्यूनंतर

मोबदल्याच्या बदल्यात

मोबदला

नसतो

नसतो

असतो

स्वीकार

आवश्यक

स्वीकार आवश्यक नाही

विक्री व्यवहारानुसार

नोंदणी

स्थावर मालमत्तेसाठी

बंधनकारक

ऐच्छिक

स्थावर मालमत्तेसाठी अनिवार्य

बदल किंवा रद्द

मर्यादित परिस्थितीत

इच्छेनुसार बदलता किंवा रद्द करता येते

मर्यादित परिस्थितीत

मालकी हक्क

वैध हस्तांतरण पूर्ण

झाल्यावर प्राप्त

मृत्यूनंतर प्राप्त

वैध हस्तांतरण पूर्ण झाल्यावर प्राप्त

 

b|b

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला बक्षीसपत्र. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.