आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

वारस कायदा विषयक प्रश्‍नोत्तरे" 1 to 25


· प्रश्‍न १: हिंदू अविभक्त कुटुंब, सहदायिकी आणि मिताक्षरा म्‍हणजे काय?
F उत्तर: हिंदू कायद्याप्रमाणे, एकाच पूर्वजांच्या वंशातील सभासदांचा समावेश असलेले कुटुंब म्‍हणजे हिंदू अविभक्त कुटुंब. लग्न झाल्यानंतर आपोआप तयार होते. या कुटुंबात मुलांचा त्यांच्या बायकांचा, अविवाहित मुलींचा समावेश होतो. हिंदू अविभक्त कुटुंबाचा सभासद होण्यासाठी त्‍या कुटुंबामध्ये जन्म घेणे गरजेचे असते. जर मुलाला दत्तक घेतले तर ते मूल हिंदू अविभक्त कुटुंबाचा सभासद बनतो. मुलगी लग्नानंतर वडिलांच्या हिंदू अविभक्त कुटुंबामधून बाहेर पडून तिच्या नवऱ्याच्या हिंदू अविभक्त कुटुंबमध्ये सामील होते.
हिंदू अविभक्त कुटुंबामध्‍ये सभासद आणि सहदायिकी (coparcenary) असे सदस्‍य असतात. यातील सहदायिकी हा संपत्तीमधील वाटा मागू शकतो तर सभासदांना संपत्तीतून वाटा मागता येत नाही, तो त्यांना सहदायिकी करवी मागता येतो. हिंदू कायद्याप्रमाणे भारतात दोन प्रकारचे नियमशास्त्र आहेत. एक दयाभाग आणि दुसरे मिताक्षरा. दयाभाग हे नियमशास्त्र पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये लागू होते आणि मिताक्षरा भारतातील इतर राज्यात लागू होते. दयाभाग नियमशास्त्राप्रमाणे वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला वडिलोपार्जित संपत्तीचा हक्क मिळतो. मिताक्षरा नियमशास्त्राप्रमाणे मुलाला जन्मानंतर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान हक्क प्राप्त होतो.

· प्रश्‍न २: वारस नोंदीच्‍या अर्जाबरोबर कोणकोणती कागदपत्रे घ्‍यावीत?
F उत्तर:ñ मयताच्या मृत्युचा दाखला
ñ मयताच्या मिळकतीचा चालू वर्षातील (तीन महिन्याच्या आतील) सात-बारा उतारा
ñ सदर मिळकत खरेदी केल्याचा फेरफार किंवा मयताचे नाव सदर मिळकतीवर कसे लावले गेले याबाबतचा फेरफार
ñ सर्व वारसांची नावे नमूद असणारा अर्ज 
ñअर्जात नमूद वारसांव्यतिरिक्त अन्य कोणीही वारस नाहीअसे नमूद केलेले स्वयंघोषणापत्र
ñ अशा मिळकतीबाबत न्यायालयात काही वाद सुरु असतील, न्यायालयाने जर स्थगिती आदेश किंवा जैसे थे आदेश दिला असेल तर त्याची कागदपत्रांसह माहिती किंवा तसे नसल्‍याबाबत स्वयंघोषणापत्र
ñ कुटुंबातील सर्व लोक कळावेत यासाठी मयताच्या कुटुंबाची शिधापत्रिका.
ñ मिळकतीचा खाते उतारा

· प्रश्‍न ३: विवाहित मुलींची नावे वारस म्हणून लावू नये अशी विनंती खातेदाराने केल्‍यास काय करावे?
F उत्तर: खातेदाराचे म्हणणे असते की, मुलीच्या लग्नात आम्ही खर्च केलेला आहे. त्यामुळे आता तिचे नाव वारस म्हणून दाखल करण्याची आवश्यकता नाही.’ ही बाब अयोग्य आहे. मुलीच्या लग्नात खर्च केला म्हणून तिचा वारस हक्क संपुष्टात येत नाही. मुलींसह सर्व वारसांची नावे चौकशी अंती गाव दप्‍तरी दाखल करावी. 

· प्रश्‍न ४: मयताच्या वारसांपैकी फक्त पुरुषांची नावेच सात-बाराच्या कब्जेदार सदरी नोंदवावी आणि महिलांची नावे इतर हक्कात नोंदववी अशी विनंती खातेदाराने केल्‍यास काय करावे?
F उत्तर: अशी विनंती मान्‍य करणे अयोग्‍य आहे. महिलांची नावे (पत्नी, विवाहित/अविवाहित मुली इत्यादी) इतर हक्कात नोंदवली जातात. ही पध्दत अत्यंत चुकीची आहे. हिंदू वारसा कायदा १९५६ मधील सन २००५ च्या सुधारणेनुसार मुलींनाही, मालमत्तेत मुलाइतकाच हिस्सा मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे. त्‍यामुळे मयताच्या वारसांपैकी महिलांची नावे सुध्दा कब्जेदार सदरीच नोंदवावी.

· प्रश्‍न ५: एखाद्या जमिनीवर एकत्र कुटूंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेली व्‍यक्‍ती मयत झाल्यानंतर, वारस नोंद करतांना काय कार्यवाही करावी?
F उत्तर: एखाद्या जमिनीवर एकत्र कुटूंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेला इसम मयत झाल्यानंतर त्याचे वारस, वारस नोंदीसाठी अर्ज करतात आणि त्या मयत ए.कु.मॅ. चे वारस म्हणून फक्त त्यांच्याच मुला/मुलींच्या नावाची त्याचे वारस म्हणून नोंद केली जाते. यामुळे मयत इसम ज्यांचा ए.कु.मॅ. असतो त्यांचा वारस हक्क डावलला जातो. वास्तविक एकत्र कुटूंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेला इसम मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद करतांना मयत इसमाचे नाव ज्या फेरफार नुसार ए.कु.मॅ. म्हणून दाखल झाले होते त्या फेरफारात नमूद सर्व व्यक्तींना नोटीस बजावणे आवश्यक असते. त्यापैकी जे सज्ञान झाले आहेत त्यांची नावे तसेच इतर व्यक्तींपैकी जे मयत आहेत त्यांच्या वारसांची आणि ए.कु.मॅ. चे वारस अशा सर्वांची नावे वारस ठराव करून आणि त्यानंतर गाव नमुना सहामध्ये कब्जेदार सदरी आणणे आवश्यक असते. 

· प्रश्‍न ६: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ कोणाला लागू आहे?
F उत्तर: () जी व्यक्ती धर्माने हिंदू आहे (वीरशैव, लिंगायत, ब्राम्हो समाजाचे, प्रार्थना समाजाचे, आर्य समाजाचे अनुयायी)
() जी व्यक्ती धर्माने बौध्द, जैन किंवा शिख आहे किंवा हिंदू, बौध्द, जैन किंवा शिख धर्मात धर्मांतरित किंवा पुनर्धर्मांतरित झालेली आहे
() जी व्यक्ती धर्माने मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किंवा ज्यू नाही अशा सर्व व्‍यक्‍तींना हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ लागू आहे. 

· प्रश्‍न ७: वडिलार्जित मिळकत, वाडिलोपार्जित मिळकत आणि स्वकष्टाकर्जित मिळकत म्‍हणजे काय?
F उत्तर: वडिलांनी स्‍वकमाईने घेतलेली मिळकत म्‍हणजे वडिलार्जित मिळकत, वाडिलोपार्जित मिळकत म्‍हणजे आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून वारसाने आलेली मिळकत आणि स्‍वत: कष्‍ट करुन, एकत्र कुटुंबाच्‍या पैशाशिवाय कमावलेल्‍या मिळकतीला स्वकष्टाकर्जित मिळकत म्‍हणतात.
वडिलार्जित आणि वाडिलोपार्जित मिळकतीचे वाटप करता येते. एखादी व्यक्ती जर वडिलार्जित किंवा वाडिलोपार्जित मिळकत धारण करीत असेल तर त्याच्या मुलाच्या मुलाला आणि पणतूला त्या मिळकतींत जन्मत: किंवा दत्तक घेतल्यापासून, त्यातील हिस्यात हक्क प्राप्त होतो.
स्वकष्टाकर्जित आणि एकट्याच्या मालकीच्या मिळकतीचे, हयातीत, वारस हक्काने वाटप होत नाही. अशी मिळकत कमविणारी व्यक्ती अशा मिळकतीची स्वेच्छेने विल्हेवाट लावू शकते.  

· प्रश्‍न ८: एक खातेदार १९९० साली मयत झाला. त्‍याची स्‍वकष्‍टार्जित जमीन गावी आहे. त्‍याला वारस पत्‍नी व दोन अज्ञान मुले. गाव दप्‍तरी वारस नोंद झालेली नाही. मयत खातेदाराच्‍या पत्‍नीने १९९१ मध्‍ये, मयत पतीच्‍या नावे असलेल्‍या (स्‍वकष्‍टार्जित) जमिनीची विक्री केली आहे. सन १९९४ मध्‍ये तिने दाखल केलेल्‍या वारस नोंदीच्‍या अर्जावरून तिचे व मुलांचे नाव वारस म्‍हणून दाखल झाले आहे. १९९५ साली तिने १९९१ मध्‍ये केलेला विक्री दस्‍त हजर केला आहे. तलाठी यांनी त्‍यानुसार विक्रीची नोंद केली. मंडलअधिकारी यांनी काय निर्णय घ्‍यावा?
F उत्तर: ज्या क्षणी सदर खातेदार मयत झाले त्याक्षणी त्याच्या‍ पत्नीचा वारस हक्क सुरू होतो. ती त्या‍ची कायदेशीर वारस ठरते. त्यामुळे मयत पतीच्या नावे असलेली जमीन ती वारस हक्काने विकू शकते. फक्त गाव दप्तरी वारस नोंद झाली नाही म्हणून तिचा वारस हक्क डावलता येणार नाही. जमीन विक्री दस्‍त नोंदवितांना दुय्यम निबंधकाने वारसाची नोंद नाही याबाबत हरकत घेणे आवश्यक होते. तथापि, तसे झालेले नाही. जमीन पतीची स्वकष्टार्जित आहे. अज्ञान मुलांचा संबंध येत नाही. वारस नोंद मंजूर आहे त्यावरून मयताला इतर वारस नाहीत असे दिसून येते. तिने कायदेशीर वारसहक्काने जमीन विकली आहे त्यामुळे नोंद मंजुर करण्यात यावी.

· प्रश्‍न ९: सख्‍खे नाते, सापत्न नाते आणि सहोदर नाते म्‍हणजे काय?
F उत्तर: जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वज-पुरुषापासून, त्याच्या एकाच पत्नीच्याद्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सख्‍ख्‍या नात्याने संबंधित असतात. जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वज-पुरुषापासून, पण त्याच्याच निरनिराळ्या पत्नींच्याद्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सापत्न नात्याने संबंधित असतात. आणि जेव्हा दोन व्यक्तींचा समान पूर्वज-स्त्रीपासून, पण तिच्या निरनिराळ्या पतींच्याद्वारे वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सहोदर नात्याने संबंधित असतात. (पूर्वज-पुरुष यात पित्याचा तर पूर्वज-स्त्री यात मातेचा समावेश होतो.)

· प्रश्‍न १०: अकृतमृत्युपत्र व्यक्ती म्‍हणजे काय?
F उत्तर: ज्या व्यक्तीने त्याच्या मालमत्तेची मृत्यूपत्रांन्वये व्यवस्था केली नसेल अशी व्यक्तीला अकृतमृत्युपत्र व्यक्ती म्‍हणतात.

· प्रश्‍न ११: गोत्रज आणि भिन्न गोत्रज म्‍हणजे काय?
F उत्तर: जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने आणि संपूर्णपणे पुरुषांच्याद्वारे संबंधीत असल्यास एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीची गोत्रज असते आणि जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने आणि संपूर्णपणे पुरुषांच्याद्वारे नव्हे अशा संबंधीत असल्यास एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीची भिन्न गोत्रज असते.

· प्रश्‍न १२: वारसदार म्‍हणजे काय?
F उत्तर: उत्तराधिकार अधिनियमान्वये अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीची उत्तराधिकारी होण्यास पात्र व्यक्ती म्‍हणजे वारसदार. 

· प्रश्‍न १३: स्वतंत्र मिळकती म्‍हणजे कोणत्‍या मिळकती?
F उत्तर: खालील मिळकती या स्वतंत्र मिळकती म्हणून गणल्या जातात. यांना वाडवडिलार्जित मिळकती म्हणता येत नाही.
() अडथळ्यांनी मिळालेली: जी मिळकत, वडील, आजोबा, पणजोबा व्यतिरिक्त इतरांकडून प्राप्त झालेली आहे. अशी मिळकत एकत्र कुटुंबाची किंवा एकत्र कुटुंबाच्या वारसा हक्कानी मिळालेली नसते.
() देणगी: लहानशी जंगम मिळकत, वडीलांनी प्रेमापोटी आपल्या मुलाला भेट म्हणून दिलेली असते. ती मुलाची स्वतंत्र मिळकत होते.
() सरकारी अनुदान: शासनाकडून प्राप्त झालेली मिळकत स्वतंत्र मिळकत होते.
() एकत्र कुटुंबाची परत मिळविलेली मिळकत: एकत्र कुटुंबाची, वाडवडिलांनी गमावलेली मिळकत जर त्याच एकत्र कुटुंबातील सदस्याने, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे सहाय्य न घेता परत मिळविली तर ती त्याची स्वतंत्र मिळकत होते.
() कमावलेली मिळकत: स्वत:च्या स्वतंत्र मिळकतीतुन संपत्ती मिळवून, त्यातून घेतलेली मिळकत ही स्वतंत्र मिळकत होते.
() वाटपातील हिस्सा: वाटपातील हिस्सा ही स्वतंत्र मिळकत होते.
() एकटा वारसदार: मागे एकटाच जिवंत राहिल्यामुळे, वारस म्हणून मिळालेली मिळकत ही स्वतंत्र मिळकत होते.
() स्वकष्टार्जित: शिक्षणातून/नोकरीतुन, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे सहाय्य न घेता, कष्ट करुन मिळविलेली मिळकत स्वतंत्र मिळकत होते.

· प्रश्‍न १४: हिंदू उत्तराधिकार (महाराष्‍ट्र सुधारणा) अधिनियम १९९४ अन्‍वये काय सुधारणा केली गेली?
F उत्तर: (एक) मिताक्षर कायद्‍याने नियंत्रीत केल्‍या जाणार्‍या संयुक्‍त हिंदू कुटुंबामध्‍ये सहदायकाची कन्‍या, ज्‍या रीतीने पुत्र सहदायाद होतो, त्‍याच रीतीने जन्‍मापासून, तिच्‍या स्‍वत:च्‍या हक्‍कामुळे सहदायाद होईल आणि ती पुत्र असती तर तिला जे जे अधिकार, दायित्‍वे, नि:समर्थता प्राप्‍त झाली असती, ती प्राप्‍त होईल.
(दोन) उपरोक्‍त संयुक्‍त हिंदू कुटुंबामधील वाटणीच्‍या वेळेस पुत्राला वाटून देण्‍यात येत असलेल्‍या हिस्‍स्‍याइतका हिस्‍सा कन्‍येलाही मिळेल.
(तीन) उपरोक्‍त प्रमाणे हिस्‍सा मिळालेली स्‍त्री, त्या हिस्स्याबाबत मृत्युपत्रद्‍वारे किंवा अन्‍य प्रकारे अशा मिळकतीची विल्‍हेवाट सुध्दा लावू शकेल.
(चार) उपरोक्‍त तरतुदी हिंदू उत्तराधिकार (महाराष्‍ट्र सुधारणा) अधिनियम-१९९४ च्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापूर्वी (२२ जुन १९९४ पूर्वी) ज्या मुलींचे लग्न झाले आहे त्यांना लागू असणार नाही.        
(पाच) दिनांक २२ जुन १९९४ पूर्वी ज्या वाटण्या घडून आल्या असतील त्यांना उपरोक्‍त तरतुदींमुळे बाधा येणार नाही.

· प्रश्‍न १५: मा. सर्वोच्च न्यायालयाचा सन २०१५ मध्‍ये वारसासंबंधात काय निकाल दिला आहे?
F उत्तर: मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १६/१०/२०१५ रोजी दिवाणी अपिल क्र. ७२१७/२०१३ (प्रकाश आणि इतर विरुध्द फुलवती आणि इतर) प्रकरणात निकाल देऊनवडिलोपार्जित हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्मजात हक्क मिळणारी मुलगी आणि त्या मिळकतीत हक्क असणारा सहदायक (कोपार्सनर) हे दोन्ही दिनांक ९ सप्टेंबर २००५ रोजी हयात असावेत, मग ती मुलगी कधीही जन्मली असो.' असे म्हटले आहे.

· प्रश्‍न १६: वारसा कायद्‍यान्‍वये कर्जे फेडण्याची जबाबदारी काय होती?
F उत्तर: पूर्वीच्या वारसा कायद्यान्‍वये, त्याच्या पूर्वजांनी (वडील, आजोबा, पणजोबा) कर्जे घेतली असतील अशी कर्जे फेडण्याची जबाबदारी वारसांची होती. यालापवित्र जबाबदारी (पायस ऑब्लिगेशन)’ म्हटले जात होते. असे कर्ज वारसाने न फेडल्यास, असे कर्ज देणार्‍यास न्यायालयात दाद मागता येत होती.
केंद्र शासनाने सन २००५ च्या सुधारीत वारसा कायद्यान्वये वारसांची, त्याच्या पूर्वजांनी (वडील, आजोबा, पणजोबा) घेतलेली कर्जे फेडण्याची जबाबदारी रद्द केली आहे व असे कर्ज देणार्‍यास आता न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी तरतुद केली आहे. तथापि, सन २००५ पूर्वी घेतलेल्‍या कर्जास ही तरतुद लागू होणार नाही.  

· प्रश्‍न १७: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ८ अन्‍वये 'वर्ग १' च्‍या वारसांची अनुसूचीत कोणाचा समावेश होतो?
F उत्तर: अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला तर त्‍याचा वारसा सर्वप्रथम पुढील बारा जणांना 'वर्ग १' चे वारस म्हणून मिळतो.  
'वर्ग १' चे १२ + ४ =१६ वारस: मयताचा () मुलगा () मुलगी () विधवा (एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवांना एकत्रीतपणे हिस्सा मिळेल) () मयताची आई (५) पूर्वमृत मुलाचा मुलगा () पूर्वमृत मुलाची मुलगी () पूर्वमृत मुलीचा मुलगा () पूर्वमृत मुलीची मुलगी () पूर्वमृत मुलाची विधवा (१०) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाचा मुलगा (११) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाची मुलगी (१२) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाची विधवा हे एकाचवेळी हिस्सा घेतात.
हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम- २००५, कलम ७ अन्‍वये 'वर्ग १' च्‍या वारसांच्‍या अनुसूचीमध्‍ये खालील चार वारस जोडले गेले आहेत.
(१३) पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीचा मुलगा (१४) पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीची मुलगी
(१५) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीची मुलगी (१६) पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीचा मुलगा
अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला आणि त्‍याला वरील 'वर्ग १' चे कोणीही वारस नसतील तर दुसर्‍यांदा 'वर्ग २' च्‍या वारसांकडे त्‍याचा वारसा जातो.

· प्रश्‍न १८: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ अन्‍वये अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्‍या 'वर्ग १' मधील वारसामध्ये संपत्तीचे वितरण कसे होईल ?
F उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम १० अन्‍वये अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्‍या 'वर्ग १' मधील वारस असतील तर त्याच्या मालमत्तेचा भाग पुढील नियमानुसार विभागला जाईल:-
नियम १ - मयताची विधवा, किंवा एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवा एकत्रितपणे एक हिस्सा घेतील.
नियम २ - मयत व्यक्तीचे हयात मुलगे आणि मुली आणि आई प्रत्येकी एक हिस्सा घेतील.
नियम ३ - मयत व्यक्तीच्या प्रत्येक मयत मुलाच्या किंवा प्रत्येक मयत मुलीच्या खात्यातील वारस त्यांच्यात मिळून एक हिस्सा घेतील.
नियम ४ - नियम ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या हिस्‍स्‍यांचे वितरण मयत व्यक्तीच्या मयत मुलाच्या खात्यातील वारसांमध्ये अशा प्रकारे करण्यात येईल की, त्याची विधवा (किंवा त्याच्या विधवा एकत्रितपणे) आणि हयात मुलगे व मुली यांना समान अंश मिळतील आणि त्याच्या मयत मुलांच्या शाखेला तेवढाच अंश मिळेल. 

· प्रश्‍न १९: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ८ अन्‍वये 'वर्ग २' च्‍या वारसांची अनुसूची अनुसूचीत कोणाचा समावेश होतो?
F उत्तर: अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला आणि त्‍याला 'वर्ग १' चे कोणीही वारस नसतील तर दुसर्‍यांदा 'वर्ग २' च्‍या वारसांकडे त्‍याचा वारसा जातो.
'वर्ग २' चे ९ वारस:  (एक) १) वडील
(दोन) ) मुलाच्या मुलीचा मुलगा ) मुलाच्या मुलीची मुलगी ) भाऊ ) बहीण
(तीन) ) मुलीच्या मुलाचा मुलगा ) मुलाच्या मुलाची मुलगी ) मुलीच्या मुलाचा मुलगा ) मुलीच्या मुलीची मुलगी
(चार) ) भावाचा मुलगा ) बहिणीचा मुलगा ) भावाची मुलगी ) बहिणीची मुलगी
(पाच) १) वडीलांचे वडील २) वडीलांची आई
(सहा) १) वडीलांची विधवा २) भावाची विधवा
(सात) १) वडीलांचा भाऊ २) वडीलांची बहीण
(आठ) १) आईचे वडील २) आईची आई
(नऊ) १) आईचा भाऊ २) आईची बहीण
अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला आणि त्‍याला वरील 'वर्ग १' आणि
'वर्ग २' चे कोणीही वारस नसतील तर वर्ग ३ च्‍या मृताच्‍या गोत्रजांकडे त्‍याचा वारसा जाईल.

· प्रश्‍न २०: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ अन्‍वये अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्‍या 'वर्ग २' मधील वारसामध्ये संपत्तीचे वितरण कसे होईल ?
F उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ११ अन्‍वये अकृतमृत्युपत्र मयतास 'वर्ग १' पैकी कोणीही वारस नसेल तर त्‍याच्‍या 'वर्ग २' मधील वारसांत त्याच्या मालमत्तेचा भाग पुढील नियमानुसार विभागला जाईल:-
'वर्ग २' च्‍या वारसांत संपत्ती विभागतांना 'वर्ग १' मधील वारसाप्रमाणे एकसमयावच्छेदेकरून हिस्सा मिळण्याचा हक्क 'वर्ग २' मधील वारसांना नसतो. (अकृतमृत्युपत्र व्यक्तीची) संपत्ती प्रथमत: 'वर्ग २'-(एक) मध्ये नमुद केलेल्या वारसांकडे समान हिश्श्यांमध्ये प्रक्रांत होईल. 'वर्ग २'-(एक) मधील वारस नसल्यास ती 'वर्ग २'-(दोन) मध्ये नमुद केलेल्या वारसांकडे (समान हिस्‍स्‍यांमध्ये) प्रक्रांत होईल. 'वर्ग २'-(एक) आणि (दोन) मधील वारस नसल्यास, ती 'वर्ग २'-(तीन) मधील सर्व वारसांकडे समान हिश्श्यांमध्ये प्रक्रांत होईल. आणि याप्रमाणे पुढे.
टीप- 'वर्ग २' मधील भाऊ किंवा बहीण यामध्ये एकच आई परंतु भिन्न वडील असलेला भाऊ किंवा बहीण यांचा समावेश होत नाही. विनामृत्युपत्र खातेदाराची संपत्ती सर्वांना समान हिस्सा मिळेल अशा प्रकारे 'वर्ग २' मध्ये नमूद केलेल्या वारसांमध्ये वाटली जाईल. उदाहरणार्थ, 'वर्ग २'-(एक) मध्ये नमुद केलेले वडील वारस असल्यास सर्व संपत्ती त्यांना मिळेल. वडील हयात नसल्यास सर्व संपत्ती 'वर्ग २' मधील गट २ च्‍या सर्व वारसांकडे समप्रमाणात प्रक्रांत होईल.
अकृतमृत्युपत्र व्यक्तीस वरील 'वर्ग १' आणि 'वर्ग २' पैकी कोणीही वारस नसेल तर पुढील 'वर्ग ३' च्या मृताचे गोत्रज असणार्‍या वारसांकडे मयताची संपत्ती वारसा हक्काने जाते. 

· प्रश्‍न २१: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ८ अन्‍वये 'वर्ग ३' च्‍या वारसांची अनुसूची अनुसूचीत कोणाचा समावेश होतो?
F उत्तर: अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला आणि त्‍याला वरील 'वर्ग १' आणि
'वर्ग २' चे कोणीही वारस नसतील तर खालील 'वर्ग ३' च्‍या मृताच्‍या गोत्रजांकडे त्‍याचा वारसा जातो.   
'वर्ग ३'- मृताचे गोत्रज:  मृताचे पितृबंधू, म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तक ग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषांद्वारे संबंध असलेल्या व्यक्ती.
अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला आणि त्‍याला वरील 'वर्ग १' 'वर्ग २' आणि 'वर्ग ३' चे कोणीही वारस नसतील तर शेवटी 'वर्ग ४' च्‍या, मृताच्या भिन्न गोत्रज असणार्‍यांकडे मयताची संपत्ती वारसा हक्काने जाते.

· प्रश्‍न २२: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ८ अन्‍वये 'वर्ग ४' च्‍या वारसांची अनुसूची अनुसूचीत कोणाचा समावेश होतो?
F उत्तर: अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाला आणि त्‍याला 'वर्ग १' 'वर्ग २' आणि 'वर्ग ३' चे कोणीही वारस नसतील तर शेवटी 'वर्ग ४' च्‍या, मृताच्या भिन्न गोत्रज असणार्‍यांकडे मयताची संपत्ती वारसा हक्काने जाते.
वर्ग ४ चे मृताचे भिन्‍न गोत्रज: मयताचे मातृबंधू, म्हणजेच, रक्ताच्या नात्यामुळे किंवा दत्तक ग्रहणामुळे परंतू पूर्णपणे पुरुषांद्वारे संबंध नसलेल्या व्यक्ती.

· प्रश्‍न २३: अकृतमृत्युपत्र व्‍यक्‍तीस, वर्ग १ ते ४ मधील कोणीही वारस नसेल तर अशा मालमत्तेबाबत हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ मध्‍ये काय तरतुद आहे?
F उत्तर: अकृतमृत्युपत्र व्‍यक्‍तीस, वर्ग १ ते ४ मधील कोणीही वारस नसेल तर अशा व्‍यक्‍तीची मालमत्ता, हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम २९ अन्‍वये सरकार जमा करण्‍याची तरतुद आहे.

· प्रश्‍न २४: हिंदू उत्तराधिकार अधिनियमान्‍वये वारस उत्तराधिकाराचा क्रम कसा असतो?
F उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम ९ अन्‍वये, अविभक्‍त हिंदू कुटुंबातील एखादा पुरूष विना मृत्युपत्र मयत झाल्‍यास त्‍याच्‍या वारसांच्‍या वर्गवारीत 'वर्ग एक' मध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या वारसांना एकाच वेळी मालमत्ता मिळेल आणि 'वर्ग दोन', 'वर्ग तीन' आणि 'वर्ग चार' चे वारस वर्जित होतील.
जेव्‍हा 'वर्ग एक' चे वारस नसल्‍यामुळे 'वर्ग दोन' च्‍या वारसांना मालमत्ता मिळणार असेल तेव्‍हा 'वर्ग दोन' च्‍या पहिल्‍या गटातील नोंदीत येणार्‍या (वडील) वारसांना दुसर्‍या गटाच्‍या नोंदीतील वारसांपेक्षा (मुलाच्या मुलीचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ, बहीण) प्राधान्‍य मिळेल. याच पध्‍दतीने पुढील उत्तराधिकाराचा क्रम असेल.

· प्रश्‍न २५: हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ अन्‍वये हिंदू स्‍त्रिच्‍या मालमत्तेबाबत काय तरतुद आहे?    
F उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम १४ अन्‍वये, हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ या अधिनियमापूर्वी किंवा नंतर, हिंदू स्‍त्रिची, तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशी मालमत्ता तिला विवाहापूर्वी किंवा नंतर वारसाहक्‍काने, मृत्‍यूपत्रीय दानाने, वाटणीमध्‍ये पोटगी म्‍हणून, नातलगांकडून मिळालेली असो किंवा तिने अशी मालमत्ता स्‍वत:च्‍या कौशल्‍याने, परिश्रमाने किंवा एखादी संपत्ती दान म्हणून, मृत्यूपत्रान्वये, इतर कोणत्याही लेखान्वये, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यान्वये, आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्यान्वये संपादित केली गेली असेल किंवा अन्‍य कोणत्‍याही मार्गाने संपादित केलेली असो, अशी संपत्ती, हिंदू स्‍त्री संपूर्ण स्वामी (पूर्ण मालक) म्हणून धारण करील, मर्यादित स्वामी म्हणून नव्हे.
हिंदू स्‍त्रिला, वरीलप्रकारे मिळालेल्‍या मिळकतीची विल्‍हेवाट मृत्‍यूपत्राने किंवा अन्‍य प्रकारे लावण्‍याचा पूर्ण अधिकार आहे. 
तथापि, असे दानपत्र, मृत्युपत्र, अन्य लेख, हुकूमनामा, आदेश किंवा निवाडा, काही अटी किंवा शर्तींच्‍या आधिन ठेवल्‍यामुळे संपत्तीत निर्बंधीत अधिकार निर्माण होत असतील तरच अशा संपत्तीला या अधिनियमाचे उपबंध लागू होणार नाहीत.

Comments

 1. Jar muline dusra lagn kel tar ticha mulanvar ticha hakk rahil kay?

  ReplyDelete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 3. जर जमीन मालकाला २मुल असतील आणि त्या पैकी एक मुलगा मयत असेल आणि त्याला पश्चात विधवा आणि मुल असतील तर त्यांना सारखा वाटा मिळेल का ?

  ReplyDelete
 4. आमच्या आजोबाच्या वेळी बाजुच्या शेत जमिन मालकाने पूर्वी महार असल्याने गावकीच्या कामाच्या बदल्यात आमच्या आजोबा व त्यांच्या घरातील चुलत भावांना १६ गुंठे जमिन दिली होती. असे आमच्या आई वडिलांकडून समजले. सद्या जमिन आमच्या कडेच आहे. जुन्या गट नं. व सर्वे नं. प्रमाणे १९३२ते १९५७ पर्यंत चे सात बारा मिळाला आहे. तर आता नविन गट व सर्वे प्रमाणे सात बारा मिळून आता हयात असणाऱ्या वारसदारांनी नांवे लावायची आहेत. काय करावे लागेल. तरी मार्गदर्शन करावे ही विनंती.

  ReplyDelete

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel