· प्रश्न ५१: मृत्युपत्र रद्द करता येते किंवा त्यात
बदल करता येतो काय?
F उत्तर: होय, भारतीय
वारसा कायदा,
१९२५, कलम- ६२ अन्वये मृत्युपत्र
करणारी व्यक्ती त्याच्या हयातीत, त्याने केलेले मृत्युपत्र रद्द करु शकते
किंवा त्यात कितीही वेळा बदल किंवा दुरुस्ती करू शकते. मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रात
बदल करणे, ते रद्द करणे, नष्ट करणे,
नवीन मृत्युपत्र करणे इत्यादी करण्याचे अधिकार, मृत्युपत्र करणार्या
व्यक्तीला असतात.
आधीचे
मृत्युपत्र रद्द करुन नवीन मृत्युपत्र करतांना, "आधीचे, दिनांक ...रोजी
केलेले मृत्युपत्र रद्द समजावे" असा उल्लेख नवीन मृत्यूपत्रात असणे
अपेक्षीत आहे.
एकाच
व्यक्तीने, एकापेक्षा जास्त मृत्युपत्र एकाच व्यक्तीचे असतील तर त्याने सर्वात
शेवटच्या दिनांकास केलेले मृत्युपत्र ग्राह्य मानले जाते.
· प्रश्न
५२: कोडिसिल (Codicil) म्हणजे काय?
F उत्तर: भारतीय
वारसा कायदा, १९२५, कलम ७० अन्वये, कोडिसिल म्हणजे एक असा दस्त ज्याद्वारे मृत्यूपत्रातील
मजकुरासंबंधात स्पष्टीकरण दिलेले आहे किंवा बदल केलेला आहे किंवा अधिक माहिती
जोडलेली (add) आहे. कोडिसिलचा दस्त मृत्युपत्राचा एक भाग
मानला जातो.
· प्रश्न
५३: मृत्युपत्र कसे असावे?
F उत्तर: मृत्यूपत्रासाठी
कोणताही निश्चित असा नमुना कोणत्याही कायद्यात सांगितलेला नाही. (वेंकटरामा अय्यर वि. सुंदरमबाळ, ए.आर.आर- १९४० मुंबई- ४०२)
भारतीय
वारसा कायदा,
१९२५, कलम- ६३ अन्वये,
æ मृत्युपत्र
हस्तलिखित, टंकमुद्रित किंवा संगणकावर मुद्रित केलेले असू शकते.
æ मृत्यूपत्रावर,
मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने, मृत्युपत्र त्याने स्वत: केले आहे हे
दर्शविण्याची निशाणी म्हणून त्यावर स्वाक्षरी किंवा अंगठा किंवा इतर निशाणी दिनांकासह
केलेली असावी.
æ मृत्युपत्र
करणारी व्यक्ती जर स्वाक्षरी करण्यास असमर्थ असेल तर, इतर कोणतीही व्यक्ती, मृत्युपत्र
करणार्या व्यक्तीच्या निर्देशानुसार, मृत्युपत्र करणार्या व्यक्तीच्या
समक्ष मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करु शकते.
æ मृत्युपत्र किमान दोन किंवा अधिक साक्षीदारांनी, त्यांची नावे, वय, पत्ता
व स्वाक्षरी व दिनांकासह साक्षांकित केलेले असावे.
(जरूर तर साक्षीदारांनी मृत्यूपत्रावर 'श्री.
........ यांनी या मृत्यूपत्रावर आमच्या समक्ष स्वाक्षरी केली आहे.' असा शेरा
लिहून ते दिनांकासह साक्षांकित करावे.)
æ मृत्यूपत्रात
उल्लखित मिळकतीबाबत पुरेसे आणि निश्चित वर्णन मृत्यूपत्रात असावे.
æ मृत्यूपत्रात उल्लेखित मिळकती मृत्युपत्र करणार्याकडे कशा आल्या आणि मृत्यूनंतर
त्या मिळकतीची विल्हेवाट कोणी व कशी लावावी याबाबत स्पष्ट उल्लेख असावा.
æ मृत्यूपत्रात शेवटी, मृत्युपत्र स्वतंत्रपणे, शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ
असतांना आणि विचारपूर्वक केलेले असल्याचा उल्लेख असावा.
æ मृत्यूपत्रावर शेवटी किंवा स्वतंत्रपणे, 'मृत्युपत्र करणारी व्यक्ती, मृत्युपत्र
करण्यास, शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ आहे' असा उल्लेख असलेले डॉक्टरचे
प्रमाणपत्र असावे. असे प्रमाणपत्र मृत्यूपत्राचाच भाग असावा. यामुळे पुढे कायदेशीर
अडचणी उद्भवत नाहीत.
æ हिंदू व्यक्ती स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील
फक्त स्वत:चा हिस्सा, अशा एकूण मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी
यासाठी मृत्युपत्र करू शकते. मृत्युपत्र करणार्याने त्याच्या
मालमत्तेची विल्हेवाट त्याच्या मृत्यूनंतर कशी लावावी हे स्पष्ट केल्याशिवाय ते मृत्युपत्र
पूर्णपणे कायदेशीर होत नाही. (अहमद बिन सलाह वि. मोहमद बादशहा, ए.आय.आर. १९७२ एस. सी.)
æ मुस्लिम धर्मीयाने मुस्लीम कायद्यानुसार आपले मृत्युपत्र केले असेल तरच ते
परिणामक्षम मृत्युपत्र ठरते.
æ कोणतेही मृत्युपत्र हे मृत्युपत्र करणार्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच अंमलात
येऊ शकते.
· प्रश्न
५४: मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून सही करणारी व्यक्ती मृत्यूपत्राचा
व्यवस्थापक असू शकतो काय?
F उत्तर:
होय, भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ६८ अन्वये, मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी
करणार्या व्यक्तीला, त्या मृत्यूपत्रात नमूद संपत्तीत वाटा मिळत असल्यास
किंवा अशा साक्षीदार व्यक्तीला, मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने मृत्यूपत्राचा
व्यवस्थापक (Executor) म्हणून नेमलेले असले तरी तिच्या साक्षीदार
असण्यावर परिणाम होणार नाही.
· प्रश्न
५५: मृत्युपत्राची नोंद तलाठी घेऊ शकतात काय किंवा त्यासाठी वरिष्ठांचा आदेश आवश्यक
आहे?
F उत्तर: मृत्युपत्राची
नोंद तलाठी घेऊ शकतात. वरिष्ठांचा आदेश आवश्यक नाही.
· प्रश्न
५६: प्रोबेट म्हणजे काय?
F उत्तर: प्रोबेट
म्हणजे मृत्युपत्र शाबित करणे (Probate of Will). ही अशी
कायदेशीर प्रक्रिया आहे ज्यात भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५
कलम ५७, २१३ अन्वये, फक्त मुंबई उच्च
न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र असलेल्या
मुंबई, कलकत्ता, चेन्नई या ठिकाणचीच
दिवाणी न्यायालये मृत्युपत्राची सत्यता (authenticity) प्रमाणित
करतात. फक्त याच न्यायालयांना प्रोबेटचा अधिकार आहे.
(भगवानजी करसनभाई राठोड वि. सुरजमल आनंदराज
मेहता, दिनांक ८ जुलै २००३, मुंबई उच्च न्यायालय)
इतर
दिवाणी न्यायालये मृत्यू्पत्र योग्य की अयोग्य याबाबत निर्णय देऊ शकतात.
· प्रश्न
५७: एक व्यक्ती ५० वर्षापूर्वी मयत आहे. आज त्याच्या वारसांकडे ती व्यक्ती मयत
असल्याबाबत कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नाहीत तसेच सरकार दप्तरी आढळ होत नाही. त्यामुळे
वारस नोंद होत नाही. वारस नोंद कामी काय करावे?
F उत्तर: इतर
संबंधीत पुरावे सादर करून,
दिवाणी न्यायालयातून वारस दाखला मिळविणे आवश्यक आहे.
· प्रश्न
५८: मर्ज-उल-मौत म्हणजे काय?
F उत्तर:
मुस्लिम धर्मिय व्यक्तीला त्याचा दफन खर्च व कर्ज फेडीसाठी आवश्यक रक्कम
सोडून, त्याच्या संपत्तीच्या १/३ संपत्तीपुरते मृत्युपत्र कोणत्याही वारसांच्या
संमतीशिवाय करता येते. दफन खर्च व कर्ज फेडीसाठी आवश्यक रक्कम म्हणजे मर्ज-उल-मौत.
१/३
संपत्तीपेक्षा जास्त संपत्तीचे मृत्युपत्र वारसांच्या संमतीनेच वैध होते.
· प्रश्न
५९: एका खातेदाराने केलेली दोन मृत्यूपत्रे नोंदीसाठी प्राप्त झालीत. कोणत्या मृत्यूपत्राची
नोंद करावी?
F उत्तर:
एकाच व्यक्तीने, एकापेक्षा जास्त मृत्युपत्र कलेली असली तरी त्याने सर्वात शेवटच्या
दिनांकास केलेले मृत्युपत्र ग्राह्य मानले जाते.
· प्रश्न
६०: मृत्यूपत्रात काही विसंगत प्रदाने असतील तर काय करावे?
F उत्तर:
भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ८८ अन्वये मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने त्याच्या मृत्यूपत्रात
केलेल्या विधानांची दोन कलमे विसंगत ठरत असतील आणि दोन्ही गोष्टी एकत्र करणे
शक्य नसल्यास शेवटचे कलम विधिग्राह्य ठरते.
· प्रश्न
६१: परागंदा असलेल्या व्यक्तीच्या वारसाची नोंद कशी करावी?
F उत्तर:
एखादा खातेदार सात किंवा अधिक वर्षे परागंदा आहे आणि त्याचा ठावठिकाणा किंवा बातमी
मिळून येत नाही असे संबंधिताने दिवाणी न्यायालयात सिध्द करावे लागते. भारतीय पुरावा
कायदा,
१८७२ च्या कलम १०७, १०८ अन्वये दिवाणी न्यायालयामार्फत
वारस दाखला प्राप्त करून, असा दाखला, प्रतिज्ञापत्रासह सादर केल्यास परागंदा
व्यक्तीची वारस नोंद करण्यात येते.
· प्रश्न
६२: समान आडनाव असलेल्या वारसहीन खातेदाराच्या मिळकतीवर वारसहक्क सांगणार्या
संशयीत वारसांची नोंद कशी करावी?
F उत्तर:
असा हक्क सांगणार्या वारसांकडून इतर सर्व कागदपत्रांसह तीन पिढ्यांची वंशावळ प्रतिज्ञापत्रावर
घ्यावी.
वंशांवळीमध्ये नमुद सर्वांना समक्ष बोलावून चौकशी करावी. या
चौकशीतून वारस हक्क सांगणारा विश्वासहार्य वारस नसल्याचे आढळून आल्यास त्याला दिवाणी
न्यायालयातून त्याचा वारस हक्क सिध्द करून आणण्यास सांगुन आणि तसे नमूद करून वारस
ठराव रद्द करावा.
मयत
खातेदारास कोणीही वारस नसल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३४ अन्वये कारवाई करता येते.
· प्रश्न
६३: हक्कसोडपत्र म्हणजे काय?
F उत्तर:
कोणत्याही एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सहहिस्सेदाराने, त्याचा, त्या
एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिस्स्याचा वैयक्तिक हक्क, त्याच
एकत्र कुटुंबाच्या सदस्याच्या किंवा सहदायकाच्या लाभात, स्वेच्छेने आणि
कायमस्वरुपी सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्त म्हणजे हक्कसोडपत्र.
· प्रश्न
६४: हक्कसोडपत्र कोणाला करता येते ?
F उत्तर:
एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहहिस्सेदार हक्कसोडपत्र
करु शकतो. एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार
फक्त वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील
स्वत:च्या हिस्स्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र, त्याच एकत्र कुटुंबाच्या
स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात करु शकतो.
· प्रश्न
६५: हक्कसोडपत्र कोणत्या मिळकतीचे करता येते ?
F उत्तर: फक्त
वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या
हिस्स्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र करता येते.
· प्रश्न
६६: हक्कसोडपत्र कोणाच्या लाभात करता येते ?
F उत्तर: फक्त
त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या
लाभात हक्कसोडपत्र करता येते. त्या एकत्र कुटुंबाचे सदस्य किंवा सहहिस्सेदार
नसलेल्या व्यक्तीच्या लाभात झालेला दस्त हक्कसोडपत्र होत नाही. असा दस्त
हस्तांतरणाचा दस्त म्हणून गृहीत धरला जातो व मुंबई मुद्रांक कायदा १९५८ मधील
तरतुदींन्वये मूल्यांकनास व मुद्रांक शुल्कास पात्र ठरतो.
· प्रश्न
६७: हक्कसोडपत्राचा मोबदला घेता येतो का?
F उत्तर: सर्वसाधारणपणे
हक्कसोडपत्र विनामोबदला केले जाते परंतू हक्कसोडपत्र हे मोबदल्यासह असू शकते.
मोबदल्यासह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार
यांच्या लाभात असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जात नाही तथापि हक्कसोडपत्र
नोंदणीकृत असते त्यामुळे ते नोंदणी शुल्कास पात्र असते.
· प्रश्न
६८: हक्कसोडपत्र नोंदणीकृतच असावे काय?
F उत्तर: होय,
हक्कसोडपत्राचा दस्त रक्कम रु. २००/- च्या (अद्ययावत तरतुद पहावी)
मुद्रांकपत्रावर (स्टँप पेपरवर) आणि लिखित स्वरुपात आणि नोंदणीकृत असणे
अत्यावश्यक आहे अन्यथा त्याची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही. हक्कसोडपत्र
म्हणजे दान/बक्षीस पत्र. हक्कसोडपत्रामुळे हक्काचे हस्तांतरण होते. मालमत्ता
हस्तांतरण अधिनियम, १८८२ कलम १२३ अन्वये असे दान/बक्षीस द्वारे झालेले हस्तांतरण
नोंदणी झालेल्या लेखाने करणे आवश्यक असते.
नोंदणी
अधिनियम १९०८, कलम १७ अन्वये स्थावर मालमत्तेचे दान, लेख यांची नोंदणी करणे आवश्यक
आहे. याकामी जाणकार विधिज्ञाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.
· प्रश्न
६९: हक्कसोडपत्र कसे करावे ?
F उत्तर: एकत्र
कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारी व्यक्ती आणि तो हक्क ग्रहण करणारी व्यक्ती
यांना स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे, त्याच
एकत्र कुटुंबातील कोणत्याही एकाच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात
हक्कसोडपत्राचा दस्त करता येतो.
हक्कसोडपत्र,
स्वत:च्या हिस्स्याच्या सर्व किंवा काही मिळकतींबाबत करता येते. हक्कसोडपत्र
स्वत:च्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात करीत
आहे आणि स्वत:च्या हिस्स्याच्या कोणत्या मिळकतींबाबत हक्कसोडपत्र केलेले
नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोडपत्रात असावा. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण
येणार नाही.
· प्रश्न
७०: हक्कसोडपत्रात कोणत्या गोष्टी नमूद असाव्यात?
F उत्तर: हक्कसोडपत्राच्या
दस्तात खालील गोष्टी नमूद असाव्यात.
æ हक्कसोडपत्राचा
दस्त लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
æ हक्कसोडपत्राचा
दस्त लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
æ एकत्र
कुटुंबाच्या सर्व शाखांची वंशावळ.
æ एकत्र
कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण.
æ दोन
निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वाक्षरी.
æ दस्ताचे
निष्पादन व नोंदणी अत्यावश्यक आहे.
· प्रश्न
७१: हक्कसोडपत्राची मुदत किती असते?
F उत्तर: हक्कसोडपत्र
कधीही करता येते,
त्यास मुदतीचे बंधन नाही. हक्कसोडपत्रासाठी सात-बारा अथवा मिळकत
पत्रीकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्याची आवश्यकता नसते. फक्त तो
एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिध्द करण्याइतपत पुरावा असावा.
· प्रश्न
७२: हक्कसोडपत्राचा दस्त मिळाल्यावर
तलाठी यांनी काय करावे?
F उत्तर: हक्कसोडपत्राची
कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी हक्कसोडपत्राचा दस्त हा नोंदणीकृत असल्याची
खात्री करावी.
अनोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंद करु नये. हक्कसोडपत्राची
नोंद करतांना संबंधिताने स्वत:च्या हिस्स्याच्या
हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात हक्कसोडपत्र केले
आहे आणि स्वत:च्या हिस्स्याच्या कोणत्या मिळकतींबाबत हक्कसोडपत्र केलेले
नाही याचा स्पष्ट उल्लेख फेरफार नोंदीत करावा. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण
येणार नाही. हक्कसोडपत्र नोंदणीकृत असले तरच गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद करावी.
सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजवावी. अनोंदणीकृत
हक्कसोडपत्राची नोंद करणे अवैध आहे.
· प्रश्न
७३: हक्कसोडपत्र जर एखाद्या महिलेने केले असेल तर काय करावे?
F उत्तर: खातेदाराच्या
कुटुंबातील महिलेने जर हक्कसोडपत्राचा नोंदणीकृत दस्त करून दिला असेल तर त्या महिलेला
प्रश्न विचारुन,
तिने हक्कसोडपत्राचा दस्त कोणाच्या दबाबाखाली केला नाही याची खात्री
करावी. हक्कसोडपत्रामुळे तिला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही याची
तिला कल्पना द्यावी. हिंदू वारसा कायदा १९५६ मधील सन २००५ च्या
सुधारणेनुसार महिलांनाही मालमत्तेत समान हिस्सा मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे
याचीही तिला कल्पना द्यावी. जरूर तर सदर महिलेचा तसा जबाब घ्यावा.
· प्रश्न
७४: बहिणीने केलेल्या कायदेशीर हक्कसोडपत्राच्या नोंदीवर त्या बहिणीच्या मुलाने
हरकत घेतली आहे. काय निर्णय घ्यावा?
F उत्तर:
बहिणीने
जर स्वत:च्या मिळकतीचे कायदेशीर हक्कसोडपत्र केले असेल तर बहिणीच्या मुलास अशा
हक्कसोडपत्रावर हरकत घेण्याचा अधिकार नाही. नोंद प्रमाणीत करावी. जरूर तर बहिणीच्या
मुलाने ते हक्कसोडपत्र दिवाणी न्यायालयात आव्हानित करावे.
· प्रश्न
७५: एखादी व्यक्ती मयत झाल्यावर वारसाची नोंद न करता त्याचे नोंदणीकृत हक्कसोडपत्र
करता येते काय?
F उत्तर: नाही,
प्रथम वारस नोंद प्रक्रिया पार पाडावी नंतर हक्कसोडपत्र करावे.
· प्रश्न
७६: तलाठी यांनी हक्कसोडपत्रानंतर वारस नोंद कशी करावी हे उदाहरणांसह स्पष्ट
करा.
F उत्तर: उदाहरण
१: मयत खातेदार अ च्या नावावर गावात
एकच शेतजमीन होती. ते मयत झाल्यानंतर त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी ब ,
तीन मुले- क, ड आणि इ तसेच दोन मुली- र आणि ल यांची नावे दाखल झाली. काही दिवसानंतर
र आणि ल या मुलींनी त्यांच्या भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले.
कालांतराने मयत खातेदाराची पत्नी ब मयत झाली. आता वारस नोंद करतांना ब चे वारस म्हणून
मुले क, ड आणि इ यांची नावे दाखल करावीत आणि मुली र आणि ल या दोन वारसांनी दिनांक
... /.../.... रोजी, त्यांचे भाऊ क, ड आणि इ यांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन
दिले आहे, त्याची नोंद फेरफार क्रमांक ....... अन्वये नोंदविलेली आहे असे नमूद
करावे.
उदाहरण २: मयत खातेदार च च्या नावावर गावात तीन
शेतजमिनी, एक घर आणि एक फार्महाऊस होते.
च
मयत झाल्यानंतर त्यांच्या उपरोक्त पाच मिळकतींना त्यांचे वारस म्हणून त्यांची
पत्नी ज, दोन मुले- ट आणि त तसेच दोन मुली- न आणि प यांची नावे दाखल झाली. काही
दिवसानंतर न आणि प या मुलींनी त्यांच्या भावांच्या हक्कात काही मिळकतींचे हक्कसोडपत्र
करुन दिले. या हक्कसोड पत्राची नोंद करतांना, न आणि प या मुलींनी उपरोक्त
कोणकोणत्या मिळकतींवरील हक्क सोडला आहे याची सविस्तर नोंद घ्यावी. जरूर तर ज्या
मिळकतींवरील हक्क सोडलेला नाही त्याबाबत स्पष्टपणे नमुद करावे. कालांतराने मयत
खातेदाराची पत्नी ज मयत झाली. आता वारस नोंद करतांना ज चे वारस म्हणून ट आणि त
यांची नावे दाखल करावीत आणि न आणि प या दोन मुलींनी (वारसांनी) दिनांक ...
/.../.... रोजी, ट आणि त या भावांच्या हक्कात ....., ....., ..., या या
मिळकतींवरील हक्कसोडपत्र करुन दिले आहे, त्याची नोंद फेरफार क्रमांक .......,
दिनांक ... /.../.... अन्वये नोंदविलेली आहे. परंतु .....,..., या या मिळकतीबाबत
न आणि प यांनी हक्कसोडपत्र करुन दिलेले नाही. त्यामुळे हक्कसोडपत्र करुन न
दिलेल्या ...., ..... या मिळकतीवर मुलगे ट आणि त तसेच मुली न आणि प यांचे नाव ज
चे वारस म्हणून दाखल केले आहे असे नमुद करावे.
· प्रश्न
७७: एकदा हक्कसोडपत्राचा नोदणीकृत दस्त केल्यानंतर, हक्क सोडलेल्या मिळकतीत
पुन्हा हक्क, हिस्सा मागता येतो काय?
F उत्तर:
नाही, अशी कोणतीही कायदेशीर तरतुद नाही.
· प्रश्न
७८: धर्मांतरित व्यक्तीला वारसाधिकार प्राप्त होतो काय?
F उत्तर: हिंदू
वारसा कायदा १९५६, कलम २६ अन्वये हिंदू वारसा कायदा १९५६ या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, एखादी व्यक्ती धर्मांतर केल्याने हिंदू राहिली नसेल तर अशी व्यक्ती,
धर्मांतरानंतर तिला झालेली आपत्ये व त्यांचे वारस एकत्र कुटुंबातील संपत्तीत
वारसाने अथवा उत्तराधिकाराने हिस्सा मिळण्यास अपात्र ठरतात.
· प्रश्न
७९: हिंदू विवाह कायदा १९५५ बाबत थोडक्यात माहिती द्या?
F उत्तर: हिंदू
विवाह कायदा १९५५ हा फक्त हिंदू धर्मिय (हिंदू, बौध्द, जैन, शिख आणि
धर्मांतरित हिंदू) व्यक्तींच्या, धार्मिक पध्दतीने पार पडलेल्या
विवाहांना लागू होतो. यात विवाह निबंधकासमक्ष विवाह करण्याची आवश्यकता नसते. ज्या
विवाह निबंधकाच्या कार्यक्षेत्रात असा विवाह पार पडला असेल त्याच्याकडे
विवाहाचे जरुर ते पुरावे (लग्न समारंभाचे दोन फोटो, लग्नाची निमंत्रण
पत्रिका, वर आणि वधुचे वयाचे आणि पत्त्याचे पुरावे आणि नोटरी किंवा कार्यकारी
दंडाधिकारी यांच्या समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र ज्यात 'सदर विवाह हिंदू विवाह
कायदा १९५५ नुसार झाला असून, विवाहाच्यावेळी वर आणि वधु दोघेही मानसिकदृष्ट्या
स्वस्थ होते आणि सदरचा विवाह प्रतिबंधीत नातेसंबंधात झालेला नाही' असे नमूद
असावे.) सादर करावे. अर्ज भरून, वर आणि वधु, दोघांचे पालक आणि दोन
साक्षीदारांनी विवाह निबंधकासमक्ष स्वाक्षरी करावी. यानंतर काही दिवसात विवाह
प्रमाणपत्र दिले जाते. हे विवाह प्रमाणपत्र, विवाहाचा पुरावा म्हणून सर्वत्र
ग्राह्य मानले जाते.
· प्रश्न
८०: विशेष विवाह कायदा, १९५४ बाबत थोडक्यात माहिती द्या?
F उत्तर:
विशेष विवाह कायदा, १९५४ हा सर्व भारतीय नागरिकांना लागू होतो. यात धर्माचे बंधन
नाही. यात विशेष विवाह कायद्यान्वये अधिकार प्रदान केलेल्या विवाह अधिकारी
किंवा विवाह निबंधक यांच्याकडे, विवाहाच्या एक महिना आधी विवाहाची नोटीस देणे
आवश्यक आहे. या नोटीसीची एक प्रत नोटीस बोर्डावर प्रसिध्द केली जाते आणि एक
प्रत, ज्या भागात वर आणि वधु रहातात, त्या भागातील विवाह अधिकार्याकडे प्रसिध्दीसाठी
पाठविण्यात येते. जर एका महिन्याच्या कालावधीत कोणतीही हरकत नोंदवली गेली तर
विवाह अधिकारी योग्य तो निर्णय घेतात.कोणतीही हरकत नोंदवली गेली नाही तर
मुदतीनंतर (वर आणि वधुचे प्रत्येकी दोन फोटो, वर आणि वधुचे वयाचे आणि पत्त्याचे
पुरावे आणि नोटरी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र
ज्यात 'सदर विवाह हिंदू विवाह कायदा १९५५ नुसार झाला असून, विवाहाच्यावेळी वर
आणि वधु दोघेही मानसिकदृष्ट्या स्वस्थ होते आणि सदरचा विवाह प्रतिबंधीत
नातेसंबंधात झालेला नाही' असे नमूद असावे.) पुरावे सादर करावे. वर आणि वधु,
दोघांचे पालक आणि तीन साक्षीदारांनी विवाह निबंधकासमक्ष स्वाक्षरी करावी. यानंतर
काही दिवसात विवाह प्रमाणपत्र दिले जाते. हे विवाह प्रमाणपत्र, विवाहाचा पुरावा म्हणून
सर्वत्र ग्राह्य मानले जाते.
दिनांक
२५ ऑक्टोबर २००६ रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिश अर्जित पसायत आणि
पी. सतसिवम यांच्या खंडपिठाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या मताला सहमती दर्शवून,
प्रत्येक विवाह, विवाहाच्या दोन पैकी एका कायद्याखाली नोंदणी केलेला असणे
बंधनकारक केले आहे.
· प्रश्न
८१: एखादा खातेदार दिनांक ९ सप्टेंबर २००५ पूर्वी किंवा नंतर मयत झाला तर त्याच्या
मिळकतीचे वाटप कसे होईल?
F उत्तर: æ हिंदू
उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम-२००५ हा कायदा दिनांक ९ सप्टेंबर
२००५ रोजी अंमलात आला.
समजा
अ हे खातेदार, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असे वारस मागे ठेऊन दिनांक ९ सप्टेंबर
२००५ पूर्वी मयत झाले असते तर त्यांच्या मिळकतीचे वाटप खालील प्रमाणे करण्यात
येईल.
प्रथम
त्यांच्या मिळकतीचे (१) मयत खातेदाराचा प्रतिकात्मक हिस्सा (२) पत्नीचा हिस्सा
(३) मुलाचा असे तीन भाग करण्यात येतील.
त्यानंतर
मयत खातेदाराच्या प्रतिकात्मक हिस्साचे समान भाग करून सर्व मुला/मुलींमध्ये
समप्रमाणात वाटण्यात येईल.
त्यानंतर
जेव्हा मयत अ च्या पत्नीचे निधन होईल तेव्हा तिला मिळालेल्या हिस्स्याचे सम
प्रमाणात मुलाला आणि दोन्ही मुलींना वाटप करण्यात येईल.
æ
हाच अ खातेदार दिनांक ९ सप्टेंबर २००५ नंतर मयत झाला तर त्याच्या मिळकतीचा हिस्सा,
त्याची पत्नी, मुलगा आणि दोन्ही मुली या सर्वांना सम प्रमाणात विभागून मिळेल.
æ
उपरोक्त अ हा खातेदार आणि त्याची एक मुलगी हे दोघेही दिनांक ९ सप्टेंबर २००५
नंतर मयत झाले तर, अ ची मिळकत, त्याची
पत्नी, मुलगा आणि मयत मुलगी आणि हयात मुलगी या सर्वांना सम प्रमाणात विभागून
मिळेल आणि मयत मुलीचा हिस्सा, तिच्या वारसात समप्रमाणात विभागला जाईल.
जर
अ ची मुलगी दिनांक ९ सप्टेंबर २००५ पूर्वी मयत असती तर तिला अ च्या मिळकतीत हिस्सा
मिळाला नसता.
æ अ
जर दिनांक २२ जुन १९९४ ते दिनांक ९ सप्टेंबर २००५ या दरम्यान मयत झाला असते तर हिंदू
उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम १९९४ च्या तरतुदींनुसार वाटप करण्यात
येईल. त्यावेळेस त्याच्या मुलींचा विवाह दिनांक २२ जुन १९९४ पूर्वी झाला आहे की
नंतर झाला आहे याचा विचार करण्यात येईल.
· प्रश्न
८२: जर वाटपात एखादा हिस्सेदार डावलला गेला तर काय परिणाम होईल?
F उत्तर:
जर वाटपात एखादा सहहिस्सेदार वगळला गेला असतांना वाटपाला अंतिम स्वरूप दिले गेले
तर ते वाटप शून्यनिय (Voidable) होते. त्यामुळे ते वाटप पुन्हा केले जाणे आवश्यक असते. (ए.आय.आर.
१९८९, कर्नाटक १२०; ए.आय.आर. १९९९, मद्रास ७१) इतकेच नव्हे तर गर्भात मूल असेल
आणि ते वाटपानंतर जन्मले तरी फेरवाटप केले जाते (ए.आय.आर.१९६४, ओरिसा ७५).
· प्रश्न
८३: मुस्लिम व्यक्तीला त्याची सर्व मिळकत मृत्यूपत्राने देता येते काय?
F उत्तर:
नाही, हिंदु उत्तराधिकार अधिनियम, १९५६ च्या तरतुदी मुस्लिम धर्मियांना
लागू होत नाहीत. त्यांच्या मिळकतीचे वारस मुस्लिम व्यक्तीगत
(पर्सनल लॉ) कायद्यातील तरतुदीप्रमाणे ठरविले जातात.
मुस्लिमांच्या
वैयक्तिक कायद्याप्रमाणे हनाफी सुन्नी आणि शिया अशा दोन्ही पंथांचे वारसाविषयीचे वेगवेगळे
नियम आहेत.
७
ऑक्टोबर १९३७ रोजी शरियत कायदा, १९३७ अंमलात आला. याला मुस्लिम
धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असे म्हटले आहे. या कायद्यातील कलम
२ अन्वये, रुढी व परंपरा विरुध्द असली तरी शेतजमीन सोडून इतर
अन्य बाबी जसे वारसा हक्क, स्त्रीची विशेष संपत्ती, निकाह, तलाक, उदरनिर्वाह,
मेहर, पालकत्व, बक्षीस,
न्यास, न्यासाची मालमत्ता, वक्फ या सर्व बाबी मुस्लिम व्यक्तिगत कायदान्वये ठरविल्या जातात.
भारतीय
वारसा कायदा, १९२५, कलम ५८ अन्वये भारतीय वारसा कायदा मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूपत्राबाबत
(वसियतनामा) लागू होत नाही.
मुस्लिम धर्मिय व्यक्तींसाठी मृत्यूपत्राबाबतच्या तरतूदी त्यांच्या 'हेदाय'
या बाराव्या शतकातील अधिकृत ग्रंथात दिलेल्या आहेत. यासंबंधात दुसरा ग्रंथ 'फतवा
आलमगिरी' हा सतराव्या शतकात लिहिण्यात आला. 'शराय-उल-इस्लाम' हा ग्रंथ प्रामुख्याने
शिया पंथीय मुस्लिमांसाठी आहे.
मृत
मुस्लिम व्यक्तीचा अंत्यविधीचा खर्च आणि त्याचे कर्ज भागवल्यानंतर जी संपत्ती
शिल्लक राहील ती वारस योग्य संपत्ती असते याच संपदेचे वाटप/ विभागणी करण्यात येऊ शकते. मुस्लिम धर्मिय व्यक्तीला त्याचा दफन खर्च
व कर्ज फेडीसाठी आवश्यक रक्कम वगळून, त्याच्या संपत्तीच्या १/३ संपत्तीपुरतेच
मृत्युपत्र कोणत्याही वारसांच्या संमतीशिवाय करता येते. १/३ संपत्तीपेक्षा जास्त
संपत्तीचे मृत्युपत्र वारसांच्या संमतीनेच वैध होते.
· प्रश्न
८४: एकत्र कुटुंबाच्या संपूर्ण मिळकतीचे मृत्युपत्र करता येते काय?
F उत्तर:
नाही, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवर सर्व वारसांचा अधिकार असतो. त्यामुळे एकत्र
कुटुंबाची सर्व मिळकत मृत्यूपत्राने देण्याचा अधिकार नसतो. जरी असे मृत्युपत्र
केले तरी,
मृत्युपत्रातील असा भाग अवैध ठरेल. (वारसा कायदा १९२५, कलम १५२) एकत्र
कुटुंबातील, स्वत:च्या हिस्स्याची मिळकत मृत्यूपत्राने देता येऊ शकेल.
(ए.आय.आर. २००७, एन.ओ.सी. १६३१, मुंबई)
· प्रश्न
८५: दत्तकग्रहाणापूर्वी मिळालेल्या मिळकतीवर दत्तकाचा अधिकार कायम राहतो काय?
F उत्तर:
होय, हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम, १९५६, कलम १२ (ब)
अन्वये दत्तक आपत्याला, दत्तकग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता
किंवा त्यावरील दत्तकग्रहणापूर्वीची आबंधने त्याच्याकडेच निहित राहतील आणि कलम १२
(क) अन्वये दत्तक आपत्याला, दत्तकग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता कोणीही काढून
घेऊ शकणार नाही अशी तरतूद आहे.
· प्रश्न
८६: दत्तक गेलेल्या मुलाला, दत्तक गेल्यानंतर, जनक कुटुंबाच्या मिळकतीत हिस्सा
मिळतो काय?
F उत्तर:
नाही, दत्तक गेलेल्या मुलाला, दत्तक गेल्यानंतर, जनक कुटुंबाच्या मिळकतीत हिस्सा
मिळत नाही परंतु तो दत्तक गेलेल्या कुटुंबाच्या मिळकतीत त्याला हिस्सा मिळतो.
· प्रश्न
८७: एखाद्या सात-बारा सदरी महिला वारसांची नांवे इतर अधिकारामध्ये नोंदविण्यात
आलेली आहे. त्यांची कब्जेदार सदरी दाखल करण्यासाठी काय करावे लागेल?
F उत्तर: वारस
कायद्यातील सुधारणांन्वये महिलांनी मिळकतीत समान हक्क आहे. या सुधारणांपूर्वी
जेव्हा महिलांना मिळकतीत समान हक्क नव्हता तेव्हा महिला वारसांची नांवे इतर
अधिकारामध्ये नोंदविण्याची पध्दत प्रचलित होती. ही पध्दत आता बदलणे आवश्यक आणि
कायदेशीर आहे. यासाठी तहसीलदार यांनी म.ज.म.अ. कलम १५५ अन्वये आदेश आवश्यक आहे.
उपरोक्त संदर्भात, तहसीलदार यांना स्वत:हून (Suo-moto) प्रकरण सुरू करता येईल. सर्व संबंधितांची सुनावणी घेऊन आदेश पारीत करता
येतील.
· प्रश्न
८८: एखादी मिळकत एकत्र कुटुंबाची आहे किंवा स्वतंत्र आहे हे कसे ठरते?
F उत्तर:
जर एखादी व्यक्ती, एखादी मिळकत एकत्र कुटुंबाची आहे किंवा स्वतंत्र आहे असा
दावा करीत असेल तर त्याने तसे सिध्द करावे लागते. एखादी मिळकत एकत्र कुटुंबाची
आहे किंवा स्वतंत्र आहे हे ठरवितांना, मिळकत खरेदी करतांना पैसा कुठुन आला ते
पहावे लागते. जर असा पैसा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतून घेतला गेला असेल तर ती
मिळकत एकत्र कुटुंबाची आहे असे मानले जाते. स्वकमाइतून पैसा खर्च केला असे सिध्द
झाल्यास ती मिळकत स्वतंत्र/स्वकष्टार्जित आहे असे मानले जाते.
· प्रश्न
८९: सावत्र मुलाला, सावत्र वडिलांच्या मिळकतीत हिस्सा मिळतो काय?
F उत्तर:
नाही.
सावत्र मुलाला, सावत्र वडिलांच्या मिळकतीत हिस्सा मिळत नाही.
·
प्रश्न ९०: एका व्यक्तीने मृत्युपूर्वी २०१२ साली
त्याच्या नातवास मृत्युपत्राने
३.०० हेक्टर आर जमीन दिली, त्यानंतर २०१५ मध्ये
त्यानेच, त्याच जमिनीपैकी १.०० हेक्टर क्षेत्राची दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली.
२०१६ मध्ये मृत्यपत्र करणार्याचा मृत्यू
झाल्यानंतर आज नातवाने ३.००हेक्टर चे मृत्युपत्र फेरफार नोंदविण्यासाठी दाखल
केले आहे. परंतु मृत्यपत्र करणार्याच्या नावे फक्त २.०० हेक्टर जमीन शिल्लक आहे.
या प्रकरणात काय कार्यवाही करावी.
F
उत्तर: भारतीय
वारसा कायदा,
१९२५, कलम २ (एच) अन्वये मृत्यूपत्राची व्याख्या
दिली आहे. आणि याच कायद्याच्या भाग ६ मध्ये कलम ५७ पासून मृत्युपत्राबाबत
तरतुदी दिलेल्या आहेत. भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम १५२ अन्वये,
फक्त स्वत:च्या मालकीच्या मिळकतीचे किंवा मिळकतीतील स्वत:च्या हिश्शाचेच
मृत्यूपत्र करता येते. तसेच स्वत:च्या मालकीच्या मिळकतीची स्वेच्छेने विल्हेवाट
लावण्याचा हक्कही आहे. मृत्यपत्र करणार्या व्यक्तीला, त्याच्या हयातीत, त्याच्याच
मृत्यपत्रात नमुद मिळकतीची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण हक्क आहे. वरील प्रकरणात
फेरफार नोंदवितांना मूळ मृत्युपत्रातील मजकूर, मृत्यपत्र करणार्याने जमीन विकल्याचा
उल्लेख आणि उर्वरीत क्षेत्राचा सविस्तर उल्लेख करून, मृत्यपत्र करणार्या व्यक्तीच्या
नावे आज जितकी जमीन शिल्लक आहे त्याची नोंद ज्याच्या नावे मृत्यपत्र करून दिले
आहे त्याच्या नावे करावी.
·
प्रश्न ९१: एका मिळकतीचे सन १९८८ मध्ये खरेदी
नोंदणीकृत खत झाले आहे , परंतु तेव्हा त्याबाबचा फेरफार
नोंदविण्यात आला नाही. सदर खातेदार मयत झाल्यानंतर सात-बारा सदरी त्याचे वारस
दाखल झाले आहेत. आज सन १९८८ मध्ये झालेले नोंदणीकृत खरेदीखत सादर करून संबंधिताने फेरफार
नोंदविण्याकामी अर्ज सादर केला आहे. नोंदणीकृत खरेदीखताची वैधता (validity) किती वर्षे असते? या प्रकरणात काय कार्यवाही
करावी?
F
उत्तर: नोंदणीकृत
खरेदीखत सक्षम न्यायालयाकडून रद्द होत नाही तोपर्यंत वैध (valid) असते. वरील प्रकरणात नोंदणीकृत
खरेदी खताची नोंद घ्यावी. वारसांना नोटीस द्यावी.
खरेदी
झालेल्या क्षणाला खरेदी देणार याचा मालकी हक्क, खरेदी घेणार यांच्या नावे
हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे खरेदी घेणार याची नोंद होणे आवश्यक आहे. महसूल
दप्तरी त्याची नोंद नाही म्हणून नोंदणीकृत खरेदी खत बेकायदेशीर/अवैध/रद्द ठरत
नाही. तक्रार आल्यास मंडलअधिकार्यांनी केस चालवावी व उपरोक्त तरतुदींन्वये निकाल
द्यावा.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला वारस कायदा विषयक प्रश्नोत्तरे" 51 to 91. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !