हिबा आणि हिबानामा
हिबा आणि हिबानामा
मुस्लिम वैयक्तिक कायद्यान्वये 'हिबा' ची तरतुद आहे.
'हिबा' म्हणजे तोंडी बक्षीस (gift). 'हिबानामा' म्हणजे बक्षीसाचा लेखी दस्त. भारतीय राज्यघटनेने मुस्लिम वैयक्तिक
कायद्याला मान्यता दिली असल्याने मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील तरतुदी, आहे
तशा लागू होतात.
अनेक न्यायालयांनी, मुस्लिम कायद्यातील 'हिबा' बाबतचे
नियम वाजवी वर्गीकरणावर आधारीत आहेत आणि मुस्लिम समाजाने 'हिबा' बाबतच्या नियमांचे
अनुपालन केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत नाही या आशयाचे निकाल दिलेले
आहेत.
केरळ उच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की, मालमत्ता
हस्तांतरण कायद्याचे कलम १२९ आणि भारतीय राज्यघटनेचे कलम १४ यांचा एकत्रीत अर्थ
लावला असता असे स्पष्ट होते की, मुस्लिम कायद्यांतर्गत केवळ धार्मिक
कारणांसाठी दिलेल्या बक्षीसांना सूट दिलेली आहे, धार्मिक कारणांशिवाय इतर
बक्षीसांना हे संरक्षण लागू नाही.
मुस्लिम कायद्यांतर्गत, मुस्लिम व्यक्ती, कायदेशीरपणे, स्वत:च्या
हयातीत, (inter vivos) अन्य हयात
व्यक्तींला स्वत:ची संपूर्ण संपत्ती 'हिबा' मार्फत हस्तांतरीत करू शकते. हीच संपत्ती जर त्याने मृत्यूपत्राद्वारे
दिली तर त्याला फक्त १/३ मिळकत देण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि मृत्युपत्राद्वारे
दिलेल्या मिळकतीचे हस्तांतरण त्याच्या मृत्युनंतरच शक्य होते, त्याच्या हयातीत
नाही.
मालमत्ता
हस्तांतरण अधिनियम १८८२ कलम १२२ मध्ये बक्षीस/दान ची प्रक्रिया स्पष्ट केलेली
आहे. परंतु 'हिबा' या प्रकाराला कायद्यानुसार
'व्यवहार (transaction)' समजले जाते कारण मुस्लिम कायदा
'हिबा' (gift) ला कराराच्या कायद्याचा भाग (part of contract law) मानतो. कारण 'हिबा' साठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक
असते. 'हिबा' तोंडी किंवा लेखी असू शकेल.
¿ मुस्लिम कायद्यान्वये 'हिबा' साठी खालील गोष्टी
आवश्यक आहेत.
१) प्रस्ताव/घोषणा (Ijab) (Offer/Declaration):- दात्यामार्फत
(donor) म्हणजेच ज्याने असे बक्षीस द्यायचे आहे त्याने,
तो कोणाला, काय बक्षीस देत आहे याची घोषणा करणे किंवा तसा प्रस्ताव ठेवणे आवश्यक
आहे. ही घोषणा स्वेच्छेने आणि स्पष्ट शब्दात असावी. संदिग्ध शब्दात (ambiguous
words) केलेली घोषणा अवैध ठरेल. तसेच धमकीमुळे किंवा बळजबरीमुळे
अथवा अयोग्य प्रभावाखाली किंवा फसवणूक करून दिलेला/घेतलेला 'हिबा' अवैध ठरेल.
२) स्वीकार (qabtil) (Acceptance):- ज्याला असे बक्षीस मिळणार आहे (donee) त्याने 'हिबा' चा स्वीकार केला पाहिजे.
३) हस्तांतरण/ताबा (qabza) (Transfer/ Possession):- देण्यात आलेले बक्षीस, ज्याला देण्यात आले आहे त्याच्याकडे हस्तांतरीत
करण्यात यावे. (ताबा देण्यात यावा.)
४) त्याग (relinquishment):- 'हिबा' दिल्यानंतर, दात्याने
(donor), 'हिबा'
दिलेल्या मिळकतीतील स्वत:चा अधिकाराचा, हितसंबंधाचा, मालकीचा त्याग केला
पाहिजे. असे न झाल्यास (काही अपवाद वगळता) सदर 'हिबा' अवैध ठरेल.
'हिबा' चे किमान दोन साक्षीदार असावे. 'हिबा'च्या बदल्यात
कोणताही मोबदला अपेक्षीत नाही.
¿ पात्रता: 'हिबा' वैध ठरण्यासाठी, दात्याकडे (donor) खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
अ) तो सज्ञान (adult) असावा: 'हिबा' देणारा पुरूष किंवा स्त्री दाता (donor) सज्ञान असावा. त्याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे. तो जर न्यायालयाने
नेमलेल्या पालकाच्या देखरेखीखाली असेल तर वयाच्या एकवीस वर्षानंतर त्याला
सज्ञान समजण्यात येते. अज्ञानाने दिलेला 'हिबा'
अवैध ठरेल.
ब) तो स्वस्थचित्त (of sound
mind) असावा:
'हिबा' देणारा पुरूष किंवा स्त्री दाता (donor) स्वस्थचित्त असावा. वेडसर नसावा कारण वेडसर माणसाला तो करत असलेल्या
कामाचे कायदेशीर परिणाम कळत नाहीत. तथापि, वेडसर व्यक्तीने वेडाच्या भरात
नसतांना (lucid interval) दिलेला 'हिबा' वैध ठरेल कारण या कालावधीत तो सामान्य व्यक्ती असतो आणि
त्याला तो करत असलेल्या कामाचे कायदेशीर परिणाम ज्ञात असतात. परंतु प्रसंगी तसे
सिध्द करावे लागेल.
क) तो मुस्लिम (Muslim) असावा: 'हिबा'ची
घोषणा करते समयी पुरूष किंवा स्त्री दाता (donor) मुस्लिम असावा. तो मुस्लिम नसेल तर असे बक्षीस 'हिबा' ठरणार नाही आणि मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ च्या
तरतुदींना पात्र ठरेल. त्याला मुस्लिम कायदा लागू होणार नाही. तथापि, 'हिबा'
नंतर एखाद्या मुस्लिम व्यक्तीने मुस्लिम धर्माचा त्याग केला तरी, त्याने
मुस्लिम असतांना दिलेला 'हिबा' अंमलात राहील.
ज्याला
'हिबा' मिळणार आहे (donee) ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, लिंगाची, वयाची किंवा मानसिकतेची असू
शकेल.
मुस्लिम
व्यक्तीला, हिंदू, ख्रिश्चन किंवा अन्य बिगर मुस्लिम व्यक्ती, पुरूष, स्त्री,
अज्ञान व्यक्ती, वेडसर व्यक्तीच्या हक्कात 'हिबा' करता येईल.
ड) त्याचा हक्क (Right) असावा: ज्या मालमत्तेचा 'हिबा' दिला जात आहे त्या मालमत्तेवर
'हिबा' देणार्या पुरूष किंवा स्त्री दात्याचा (donor) पूर्णत: वैध व कायदेशीर अधिकार/हक्क असावा. स्वत:च्या मालकीची नसलेली
किंवा अवैध पध्दतीने कमविलेल्या मालमत्तेचा 'हिबा'
देता येणार नाही तसेच मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२, कलम ६ अन्वये नमूद गोष्टींचाच
'हिबा' देता येईल. कोणत्याही कायद्यान्वये हस्तांतरणास प्रतिबंधीत वस्तूंचा 'हिबा'
देता येणार नाही.
¿ 'हिबा' देणारा दाता (donor) विवाहीत किंवा अविवाहीत असू शकतो.
¿ 'हिबा' फक्त हयात/जीवंत व्यक्तीच्याच लाभात देता
येतो. मयत व्यक्तीच्या नावे 'हिबा' देता येत नाही.
¿ गर्भस्थ आपत्य (Child in
Womb): गर्भात असलेल्या आपत्याच्या
हक्कात 'हिबा' करता येतो. यावेळी प्रमुख अट आहे की, असे आपत्य 'हिबा'
करतांना आईच्या गर्भात जीवंत असावे आणि असे गर्भात
असलेले आपत्य (en
ventur sa mere) 'हिबा' च्या
दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जीवंत जन्मले पाहिजे. गर्भस्थ आपत्य जरी अस्तित्वात
नसले तरी कायदा त्याला जीवंत व्यक्ती मानतो. असे आपत्य जर कोणत्याही
कारणामुळे जीवंत जन्मले नाही किंवा 'हिबा' करतांना आईच्या गर्भात जीवंत नसेल तर
असा 'हिबा' रद्द/अवैध ठरेल.
¿ कायद्याने स्थापित व्यक्ती (Juristic
Person): कायद्याने स्थापित व्यक्ती म्हणजे कायद्याद्वारे
स्थापन झालेले महामंडळ, नोंदणीकृत संस्था, विद्यापीठ, शाळा, मस्जिद इत्यादी.
यांचे जैविक अस्तित्व नसले तरीही कायदा यांना व्यक्ती (person) मानतो. कायद्यानुसार 'व्यक्ती'
या संज्ञेत फक्त जैविक व्यक्ती नव्हे तर कायद्याने स्थापित व्यक्तींचाही
समावेश होतो. कायद्याने स्थापित व्यक्ती या सज्ञान (adult) आणि स्वस्थचित्त (of
sound mind) मानल्या जातात.
कायद्याद्वारे स्थापित अशा व्यक्तींचे काही हक्क (rights) असतात व त्यांच्यावर काही
कर्तव्ये (duties) सोपविलेली असतात.
अशा कायद्याने स्थापित व्यक्तींच्या नावाने केलेला 'हिबा'
वैध असतो. अशा 'हिबा' चा स्वीकार, या संस्थांचे प्रबंधक किंवा सक्षम अधिकारी
करतात.
¿ अज्ञान किंवा वेडसर व्यक्तीच्या
नावे 'हिबा': अज्ञान
किंवा वेडसर व्यक्तीच्या नावे 'हिबा' करावयाचा
असल्यास, त्याचा स्वीकार खालील अग्रक्रमाने दर्शविलेल्या "मालमत्ता पालक
(guardian
of the property)" व्यक्ती
करू शकतात.
क) वडील
ख) वडीलांचा व्यवस्थापक
ग) वडीलांचे वडील
घ) वडीलांच्या वडीलांचा व्यवस्थापक
वडीलांच्या उपस्थितीत, वडीलांचा व्यवस्थापक किंवा
वडीलांचे वडील किंवा वडीलांच्या वडीलांचा व्यवस्थापक 'हिबा' चा स्वीकार करू
शकणार नाही. वरील अग्रक्रमाचे काटेकोरपणे पालन व्हावे. मुस्लिम कायद्यान्वये
आईला "मालमत्ता पालक" दर्जा नाही. त्यामुळे आई अज्ञान
किंवा वेडसर व्यक्तीच्या नावे केलेल्या 'हिबा'
चा स्वीकार करू शकत नाही.
¿ एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे 'हिबा': एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे किंवा व्यक्ती
समूहाच्या नावे 'हिबा' देता येऊ शकेल. परंतु त्या सर्वांची एकमेकांशी ओळख असावी
आणि प्रत्येकाचा हिस्सा (share) स्वंत्रपणे
ठरविण्यात आलेला असावा तसेच त्या सर्वांनी वैयक्तिकरित्या 'हिबा' चा स्वीकार
करावा.
¿ मुस्लिम व्यक्तीला, तो जर मृत्युशय्येवर नसेल तर,
त्याच्या संपूर्ण मिळकतीचा 'हिबा' करता येतो. परंतु तो जर मृत्युशय्येवर असेल
तर मात्र त्याला त्याच्या १/३ मिळकतीचाच 'हिबा' करता येतो. (पाहा: Mulla Principles of Mahomedan Law, 17th edition by
Ex Justice M. Hidayatullah, chapter xi, page 137, section 142.)
¿ 'हिबा'चा दस्त नोंदणीकृत असावा का?
मुस्लिम कायद्यान्वये 'हिबा' हा तोंडीसुध्दा असू
शकतो. त्यामुळे तोंडी 'हिबा' नोंदणीकृत असावा असे बंधन नाही.
मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२, कलम १२९ अन्वये,
मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ च्या तरतुदी मुस्लिम कायद्यातील कोणत्याही
तरतुदींवर परिणाम करत नाहीत अशी तरतुद आहे. त्यामुळे लेखी 'हिबा' नोंदणीकृत असावा
असे बंधन नाही.
'हिबा'चा समावेश 'शरीयत कायदा १९३७' मध्ये करण्यात आला
आहे. म्हणून 'हिबा' मुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ चा भंग होत नाही.
तथापि, दिनांक ०५ मे २०११ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने हफीजाबीबी व
इतर वि. शेख फरीद (मयत) व इतर (०५ मे २०११) या प्रकरणात निकाल देतांना, परिच्छेद
क्रमांक २८ मध्ये, मालमत्ता हस्तांतरण
अधिनियम १८८२, कलम १२९ च्या तरतुदीचा अर्थ
अपरिहार्य प्रतिबंध (sine qua non) असा
मानण्यात येऊ नये असे निर्देशित केले आहे.
Section 129 Transfer of Property Act, excludes the rule of
Mahomedan law from the purview of Section 123, which mandates that the gift of
immovable property must be effected by a registered instrument as stated
therein. However, it cannot be taken as a sine qua non in all cases that
whenever there is writing about a Mahomedan gift of immovable property, there must be registration thereof.
¿ दात्याने (donor) 'हिबा' चा ताबा देण्याआधी केवळ घोषणेद्वारे (declaration) 'हिबा' कधीही रद्द केला जाऊ शकतो. परंतु ताबा दिल्यानंतर
फक्त न्यायालयाच्या हुकूमनाम्यानेच 'हिबा' रद्द होऊ शकतो. तथापि, खालील परिस्थितीत
'हिबा' रद्द होणार नाही.
१)
जर पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला 'हिबा'
दिलेला असेल.
२) जर 'हिबा' देणार आणि घेणार हे एकमेकांशी प्रतिबंधित नातेसंबंधांनी संबंधित असतील.
३) जर 'हिबा' 'सदका' म्हणून (धार्मिक कामासाठी) दिला असेल.
४) जर 'हिबा' घेणार (donee) मयत झाला असेल.
५)
जर 'हिबा' म्हणून स्वीकारलेली वस्तू, 'हिबा'
घेणार (donee) याने विकल्यामुळे, बक्षीस दिल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे त्याच्या
ताब्यातून निघून गेली असेल.
६)
जर 'हिबा' म्हणून दिलेली वस्तू गहाळ झाली
असेल किंवा नष्ट झाली असेल.
७) जर कोणत्याही कारणामुळे 'हिबा' म्हणून दिलेल्या वस्तूचे मूल्य वाढले
असेल.
८) जर 'हिबा' म्हणून दिलेल्या वस्तूचे स्वरूप ओळखता येणार नाही इतके बदलले
असेल. (उदा. गव्हाचे पीठात रूपांतर)
९) जर दात्याने (donor) 'हिबा'च्या बदल्यात काही स्वीकारले
असेल.
b|b
Very useful 👍
ReplyDeleteApne kiya hai Hiba se7/12p nam lagane ka
DeleteSir hiba registered hona zaruri hai kiya Maharashtra ke Aurangabad district ke Gangapur taluka ke tahsildar ne bola hai hibanama registered karke lao
ReplyDeleteमुस्लिम कायद्यान्वये 'हिबा' हा तोंडीसुध्दा असू शकतो. त्यामुळे तोंडी 'हिबा' नोंदणीकृत असावा असे बंधन नाही.
Deleteमालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२, कलम १२९ अन्वये, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ च्या तरतुदी मुस्लिम कायद्यातील कोणत्याही तरतुदींवर परिणाम करत नाहीत अशी तरतुद आहे. त्यामुळे लेखी 'हिबा' नोंदणीकृत असावा असे बंधन नाही
Hamare mamu ke bete ko hiba notary karke diye hai 39 gunthe zameen ka hai fair faar karke Talathi nahi dete 7/12 me naam nahi lagate hum bahut parshan hai hum ko Insaaf dilao
ReplyDeleteJikthan gaonw ka hai gat no.124 hai
ReplyDeleteJikthan Gaonw ka hai gat no.124
ReplyDelete