आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!

एक्सह्‍युमेशन (Exhumation) - फौ.प्र.सं., कलम १७६(३)

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

एक्सह्‍युमेशन (Exhumation) - फौ.प्र.सं., कलम १७६(३)

Exhumation या इंग्रजी शब्‍दाचा अर्थ आहे, जमिनीखाली खोदून काहीतरी बाहेर काढणे (विशेषतः प्रेत) यालाच दुसरा इंग्रजी पर्यायी शब्‍द आहे, Disinterment of Bodies (the act of digging something out of the ground (especially a corpse) where it has been buried).

Exhumation हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे. यातील 'Ex' चा अर्थ 'च्‍या बाहेर' (out of) आणि 'humus' चा अर्थ 'जमीन' (ground). अशा प्रकारे Exhumation चा शब्दशः अर्थ 'जमिनीच्‍या बाहेर' असा होतो. याचा अर्थ, मयत व्‍यक्‍तीच्‍या मृत्युचे कारण निश्‍चित करण्यासाठी किंवा काही इतर संबंधित तथ्यांवर निर्णय घेण्यासाठी, कायदेशीरपणे त्‍याचे मृत शरीर दफन भुमीतून खोदून शव पेटीच्‍या बाहेर काढणे. (authorized digging out the coffin of a dead person from his grave, in order to establish his cause of death, or to decide upon some other relevant fact.)

भारतात Exhumation चा वापर क्वचितच केला जातो, कारण भारतात मृत शरीर अग्‍नि संस्‍कार (burning) करून नष्‍ट केले जाते. भारतात केवळ काही समुदायांमार्फतच मृत शरीराचे दफन केले जाते. त्‍यामुळे Exhumation प्रक्रिया केवळ या समुदायांशीच संबंधित आहे.

एखाद्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्युच्या वेळेस कोणतीही संशयास्‍पद परिस्‍थिती नव्हती आणि त्‍याच्‍या मृतदेहाचे दफन शव विच्‍छेदनाशिवाय केले गेले. त्‍यानंतर काही अशी तथ्ये प्रकाशात आली ज्‍यामुळे त्‍याचा मृत्‍यु संशयास्‍पद परिस्‍थितीत झाल्‍याचे दिसून आले. मृत्‍युचे नेमके कारण कळण्‍यासाठी शव विच्‍छेदन आवश्यक आहे. किंवा काही प्रकरणात पहिले झालेले शव विच्‍छेदन अपर्याप्त होते तेव्हा दफन केलेले प्रेत पुन्‍हा बाहेर काढून पुन्‍हा शव विच्‍छेदन केल्‍यास अधिक तथ्य प्रकाशात येईल अशी खात्री पटते. अशा प्रसंगी Exhumation प्रक्रिया केली जाते. याचा अर्थ शव विच्‍छेदन करण्‍यासाठी दफन केलेले प्रेत बाहेर काढणे असा होतो. 

u दफन केलेले प्रेत बाहेर काढणे विरूध्‍द  गुप्तपणे दडवलेले मयत शरीर पुनर्प्राप्त करणे
(Exhumation v/s retrieval of a clandestinely buried body)

दफन केलेले प्रेत बाहेर काढणे (Exhumation) आणि गुप्तपणे दडवलेले मयत शरीर पुनर्प्राप्त करणे (retrieval of a clandestinely buried body) या दोन्‍ही गोष्‍टी एकच नसुन दोन्‍ही गोष्‍टी भिन्‍न आहेत हे लक्षात घ्‍यावे.
गुप्तपणे दडवलेले मयत शरीर पुनर्प्राप्त करणे या प्रक्रियेत मयत शरीर कायदेशीरपणे दफन केलेले (legally buried or inhumed) नसते.
एखाद्या व्यक्तीला एखाद्‍या गुन्हेगाराने किंवा गुन्हेगारांच्या टोळीने ठार मारले आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे शरीर गुप्तपणे दफन केले गेले. अशा शरीराची पुनर्प्राप्ती म्‍हणजे Exhumation नाही. या प्रकाराला गुन्हेगारी पध्‍दतीने ठार मारलेल्‍या व्‍यक्‍तीचे बेकायदेशीरपणे पुरलेले मृत शरीर बाहेर काढणे म्‍हणता येईल.
Exhumation हा शब्‍द तेव्‍हाच लागू होईल जेव्‍हा धार्मिक पध्‍दतीने, कायदेशीर रित्‍या मृत शरीराचा दफन विधी केला गेला असेल.
Exhumation या शब्‍दाचा अर्थ, जमिनीखाली दफन केलेले प्रेत खोदून बाहेर काढण्‍याची कायदेशीर प्रक्रिया. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ अन्‍वये पोलिस संशयास्‍पद मृत्युचा तपास करू शकतात. कलम १७४ अन्वये तपास करणारे पोलीस अशा संशयास्पद मृत्युच्या चौकशीसाठी दंडाधिकार्‍याला विनंती करु शकतात.

फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १७६(३) अन्‍वये Exhumation बाबत कायदेशीर तरतुद आहे. या कलमान्‍वये, ज्या मयत व्‍यक्‍तीचे आधीच दफन करण्‍यात आले आहे किंवा त्‍याला जमिनीखाली पुरण्यात आले आहे अशा कोणत्याही व्यक्तीच्या मृत्युचे कारण शोधून काढण्यासाठी त्याच्या मृतदेहाची तपासणी करणे जेव्हा दंडाधिकारी यांना समयोचित वाटेल तेव्हा असा मृतदेह जमिनीखालून उकरून काढण्यात लावण्‍याचा आणि त्याची तपासणी करवून घेण्‍याचा अधिकार दंडाधिकारी यांना आहे.

महसूल खात्‍यातील दंडाधिकारीय अधिकार असणारे अधिकारी या कलमान्‍वये कारवाई करू शकतात. यासाठी न्‍यायीक कामकाज करणार्‍या न्‍यायाधिशांच्‍या परवानगीची आवश्‍यकता नाही. कारण फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १७६ अन्‍वये करण्‍यात येणारी चौकशी ही एक दंडाधिकारीय चौकशी (magisterial inquiry) आहे.
   
मुंबईमध्‍ये हा अधिकार अपघाती किंवा अनैसर्गिक वाटणार्‍या मृत्युची चौकशी करणार्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या विशेष अधिकार्‍यास (Coroner) आहे.
भारतामध्‍ये Exhumation साठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. Exhumation साठी फ्रान्समध्‍ये १० वर्षे, जर्मनीमध्‍ये ३० वर्षे आणि स्कॉटलँडमध्‍ये २० वर्षे अशी कालमर्यादा निश्‍चित केलेली आहे.

एखाद्‍या गुन्‍ह्‍याचा तपास करतांना जेव्हा पोलीस अधिकार्‍याला वाजवी शंका येईल की, एखाद्‍या व्यक्तीचे शरीर (प्रेत) संशयास्पद परिस्थितीत दफन केले गेले आहे, तेव्हा तो लिखित स्वरूपात त्‍याबाबतची  कारणे नोंदवेल आणि जवळच्या कार्यकारी दंडाधिकार्‍याकडे फौ.प्र.सं. कलम १७६(३) अन्‍वये कारवाई करण्‍याची लेखी विनंती करेल.

दरम्यानच्‍या काळात, त्या पोलीस अधिकार्‍याने कबरीच्‍या संरक्षणाची (to guard the grave) व्यवस्था केली पाहिजे. तसेच प्रेत ओळखणारे साक्षीदार आणि वैद्‍यकीय अधिकारी घटनास्‍थळी उपस्‍थित राहतील याची व्‍यवस्‍था केली पाहिजे. प्रेत विघटित (decompose) झाले असण्‍याची शक्‍यता असल्‍यास, घटनास्‍थळीच शव विच्‍छेदन (post mortem) करण्‍याच्‍या दृष्‍टीने योग्‍य ती व्‍यवस्‍था केली पाहिजे.

सामान्यत: अशा प्रकरणात दंडाधिकार्‍याकडून या प्रक्रियेवर पर्यवेक्षण करण्यासाठी आणि शव विच्‍छेदनाचे निरीक्षण करण्यासाठी एक पथक तयार केले जाते. Exhumation प्रक्रिया कशी करावी याचे  निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्‍यात आलेली नाहीत परंतु दफनानंतर किंवा मृत्युच्या कारणास्तव उद्भवणार्या कोणत्याही गुन्हेगारी किंवा नागरी उद्दीष्टासाठी ही प्रक्रिया वैयक्तिकरित्या वापरली जाते.

u Exhumation केव्‍हा केले जाते?
१. मयताच्‍या मृत्‍युचे नेमके कारण जाणून घेण्‍यासाठी जेव्‍हा:
अ. मयताला दफन केल्‍यानंतर काही खात्रीशीर शंका उद्भवली असल्‍यास,
ब. शव विच्‍छेदनानंतर दफन विधी झाल्‍यावरही मयताच्‍या मृत्युच्या कारणाबाबत काही वाद उद्भवल्‍यास,
क. एखाद्या महत्त्वाच्या वस्तूची पुनर्प्राप्ती करणे ज्यामुळे मयत प्रकरणावर अधिक प्रकाश टाकता येईल, जसे की एखाद्या व्यक्तीला अग्निशस्‍त्रांनी ठार मारल्यास मृत व्यक्तीच्‍या शरीरावरील गोळी (bullet) परत मिळवणे इत्‍यादी
२. विमा, वारसा, नुकसान किंवा अपघात प्रकरणात दावा करण्यासाठी ओळख स्थापित (To establish the Identity) करणे कामी. याकामी मयताच्‍या नातेवाईकांची संमती आवश्यक असते.
३. अयोग्यपणे किंवा फसवणूक करून, चुकीच्या माणसाचे शरीर दफन करण्‍यात आले असल्‍यास.
४. मागील पिढ्यांमधील पोषण किंवा/आणि रोग यांची तुलनात्‍मक अभ्‍यासासाठी.
५. मागील पिढ्यांमधील मृत्यूचे कारण स्थापित करण्यासाठी.
६. जेव्हा दफन भूमीची जागा पुनर्विकासासाठी हलविली जाते.
७. जेव्हा मयत व्‍यक्‍तीचे नातेवाईक काही कारणास्तव कबर स्थानांतरित करू इच्छितात.
८. मृत शरीराची अपघटन (decomposition) प्रक्रिया रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठीच्‍या पद्धतींचे परीक्षण किंवा संशोधनात्‍मक अभ्‍यास करण्‍यासाठी.
९. एखादी अत्‍यंत महत्‍वाची वस्‍तू अनवधानाने मयतासोबत दफन झाली असल्‍यास ती परत मिळविण्‍यासाठी कुटुंबियांच्‍या विनंतीवरून.

u Exhumation साठी आवश्‍यक बाबी:
१. कार्यकारी दंडाधिकारी किंवा याकामी नियुक्‍त केलेल्‍या विशेष अधिकार्‍याचा लेखी आदेश.
२. मयताच्‍या नातेवाईकांची उपस्‍थिती तसेच त्‍यांनी किंवा दफनभूमीची देखभाल करणार्‍या व्‍यक्‍तीने अथवा खुन प्रकरणात आरोपीने, मयत व्‍यक्‍तीला दफन केलेली जागा अचूक ओळखणे.
Exhumation प्रक्रिया करतांना, मयत व्‍यक्‍तीचे नातेवाईक, कार्यकारी दंडाधिकारी किंवा याकामी नियुक्‍त केलेल्‍या विशेष अधिकारी, संबंधित पोलीस अधिकारी, वैद्‍यकीय अधिकारी आणि दोन किंवा जास्‍त प्रतिष्‍ठीत पंच व घटनेशी संबंधीत अन्‍य व्‍यक्‍ती (असल्‍यास) यांनी उपस्‍थित असावे. संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रीकरण (photography & videography) करण्‍यात यावे.

दंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय पोलीस Exhumation करू शकत नाहीत.
भारतात सर्वसाधारणपणे अशी प्रथा आहे की Exhumation साठी दंडाधिकारी, तीन वेगवेगळ्या वैद्यकीय संस्थांकडून तीन वेगवेगळ्या फॉरेंसिक रोगनिदान शास्त्रज्ञांच्या (forensic pathologists) मंडळाची स्थापना करतात. हे मंडळ संयुक्तपणे Exhumation प्रक्रियेचे निरीक्षण करते आणि शव विच्‍छेदन परीक्षांचे (postmortem examination) आयोजन करते.
जरी कायद्याला विशेषतः अशा मंडळाची निर्मिती करण्याची आवश्यकता नसली तरी सामान्यपणे या मागे, मयताच्‍या नातेवाईकांना, Exhumation प्रक्रिया कोणत्याही दबावाने मुक्त आणि न्याय्य पद्धतीने केली गेली आहे असा संदेश मिळावा हा उद्‍देश असतो.

प्रेत उकरून काढतांना करण्‍यात येणारे खोदकाम अत्‍यंत काळजीपूर्वक करण्‍यात यावे. शव-पेटी (coffin) किंवा प्रेताला (corpse) कोणत्‍याही प्रकारची ईजा, नुकसान होणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्‍यावी. यानंतर शव-पेटी आणि/किंवा प्रेताची ओळख संबंधितांकडून पटवून घ्‍यावी.

शव-पेटी कबरेतून बाहेर काढल्यानंतर शवपेटीचे झाकण उघडून सर्व उपस्‍थितांनी थोडावेळ शव पेटीपासून दूर थांबाबे. यामुळे शव-पेटीत तयार झालेले हानीकारक वायू मोकळ्‍या हवेत निघून जातात. (foul gases to escape in open air) आणि वैद्‍यकीय अधिकार्‍यास मृत शरीराची तपासणी करणे सोयीस्‍कर होते.
वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत शरीराची तपासणी करण्‍यापूर्वी मृत शरीराची छायाचित्रे घ्यावी. कारण त्यानंतरच्या हाताळणी दरम्यान मृत शरीराची हाडे, त्‍वचा इत्‍यादी अपघटन (decomposition) प्रक्रियेमूळे नाजूक झालेली असतात व ती तुटण्‍याची शक्‍यता असते. 

शव विच्‍छेदनापूर्वी संबंधितांना सर्व घटनेची सविस्‍तर माहिती (detailed history) द्‍यावी.
यावेळी करण्‍यात येणारे शव विच्‍छेदन दिवसा आणि नैसर्गिक प्रकाशातच (during day time, under natural light) करण्‍यात यावे आणि तपासणीची गोपनियता अबाधित ठेवण्‍यात यावी.  

शक्‍य असल्‍यास मयताच्‍या संपूर्ण शरीराची क्ष-किरण तपासणी (X-ray) करण्‍यात यावी. शव विच्‍छेदनाची प्रक्रिया नेहमीप्रमाणेच करण्‍यात यावी. नियमित पध्‍दतीने रासायनिक विश्लेषणासाठी व्हिसेरा इत्‍यादी जतन करण्‍याबरोबरच खालील वस्‍तुंचे नमुने गोळा करण्‍यात यावे.
अ. मयताची हाडे, नखे आणि केस
ब. शव पेटी/ मयताच्‍या शरीरावरील, चारही बाजूंची आणि त्‍याच्‍या खालील मातीचे नमुने स्‍वतंत्रपणे गोळा करून ते स्‍वतंत्र डब्‍यात दर्शक चिठ्‍ठी लाऊन ठेवावे. (Samples of soil from above, below, and from all four sides of the coffin/corpse should be collected and preserved in separate glass jars, with identification tags.)
उपरोक्‍त सर्व प्रक्रियांची लेखी नोंद घेण्‍यात यावी.

u मर्यादा:
१. प्रगत अपघटन (Advanced decomposition) इजा आणि रोग प्रक्रिया ओळखण्यास अडथळा आणू शकते.
२. मयताच्‍या, आर्द्रता पूर्णपणे संपलेल्‍या, सुकुन गेलेल्‍या आणि काळे झालेल्‍या (mummified and blackened) बोटांमुळे मयताची ओळख स्थापित करण्यासाठी बोटांचे ठसे घेणे अवघड होते.
३. फक्‍त जीवंतपणीच शरीरावर आढळणार्‍या काही नैसर्गिक खुणा (Artefacts) नष्‍ट झालेल्‍या असतात.
४. प्रगत अपघटनामध्‍ये (Advanced decomposition) फक्‍त हाडाच्‍या सांगाड्‍यावरील इजाच (skeletal injuries) कळून येऊ शकतात.   
५. प्रगत अपघटनामुळे गुदमरणे, डूबणे, आघात, इत्‍यादींची पुष्टी करणे किंवा नाकारणे अशक्य होते.

उपरोक्‍त मर्यादा असूनही, बाहेर काढलेल्या प्रेताच्‍या शवविच्‍छेदनामुळे मोठ्या प्रमाणावर माहिती मिळू शकते. नातेवाईक आणि जनतेच्या मनात असलेल्‍या शंकाचे निरसन केले जाऊ शकते. प्रगत अपघटन झाले असले तरी हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे ओळखले जाऊ शकते. बंदुकीची गोळी, छर्‌रे शस्त्रास्‍त्रांचे अवशेष (Presence of foreign bodies like bullets, pellets, parts of weapon etc.) इत्यादीसारख्या वस्‍तुंचे अस्तित्व मृत्युचे स्‍वरूप (nature of death) स्‍पष्‍ट करू शकते. व्हिसेराचे रासायनिक परीक्षण विषबाधा प्रकरणांत उपयोगी ठरू शकते. डेंटल डेटा आणि सुपरइम्पोजीशन (dental data and superimposition technique) तंत्रांच्‍या मदतीने मयताची ओळख स्थापित करण्यात मदत मिळू शकते.
                                                                 
bžb


Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला एक्सह्‍युमेशन (Exhumation) - फौ.प्र.सं., कलम १७६(३). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.