आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!

गावगाडा अर्थात प्राचीन वतन व्‍यवस्‍था

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

गावगाडा अर्थात  प्राचीन वतन व्‍यवस्‍था

 माणूस वसती करून राहु लागला, त्यातून वाड्या व गावांची निर्मिती झाली आणि त्यातून गावगाड्याची निर्मिती झाली. या गावगाड्याकरिता प्रमुखाची आश्‍यकता निर्माण झाली. त्यातून विविध पदांची निर्मिती करण्‍यात आली. कालांतराने या पदांची नोंद ठेवण्याची पद्धत सुरू झाली आणि त्‍यातुन गावापासून राज्यापर्यंत एक शाश्वत यंत्रणा निर्माण झाली. त्याला वतनदार, इनामदार, जमीनदार, बलुतेदार इत्‍यादी संज्ञा प्राप्त झाल्या. 

 गावातील प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदांना पाटील, कुलकर्णी, चौगुले, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन अशी नावे देण्‍यात आली. कालांतराने या पदांचे महत्त्व एवढे वाढले की, ही पदनामे आडनाव म्हणून स्वीकारली गेली.


 ग्रामसंस्थांचा कारभार नीटपणे चालावा म्हणून प्राचीन काळ राज्यकर्त्यांनी या वतनसंस्थेस मान्यता दिली आणि मग राजेही आपल्या मर्जीतील व्यक्तींना, विशेषतः नात्यागोत्यांतील इसमांना, गावे इनाम देऊ लागले. जे आपल्या हुषारीने किंवा पराक्रमाने, राज्य मिळविण्यासाठी व त्याचे रक्षण करण्यासाठी राजांना मदत करीत. त्यांना अशी इनामे कायमची मिळू लागली. शासनव्यवस्थेत उच्च अधिकारपदांसाठीही अशी जमीन तोडून देण्याची प्रथा सुरू झाली. राजे किंवा सरदार हे देवालयांच्या योगक्षेमासाठीही जमीनी व गावे इनाम देऊ लागले. च. अशा प्रकारे वतनदारी ही पद्धती राजमान्य व धर्ममान्य ठरली.

 वतनदारीचे दोन प्रमुख प्रकार आढळतात : राजाला हवी असेल तेव्हा लष्करी किंवा इतर मदत देण्याच्या अटीवर जी वतने दिली जातात, ती सरंजामशाही वतने आणि गावकामगारांना गावकीकडून (गावसभा) ग्रामव्यवस्थेच्या विशिष्ट कामासाठी मिळतात ती वतने. याशिवाय बलुतेदार म्हणजे निरनिराळे कारागीर-कामगार, गावासाठी जी विशिष्ट सेवा करीत, त्याबद्दल त्यांना मेहनतान्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून कायमस्वरूपी ठराविक धान्य मिळत असे.

 

ग्रामसंस्थेतील कारभारात काही अधिकारपदे काही कुळांकडे वंशपरंपरेने दिली जात आणि त्या कुळांना काही जमीन कायमची इनाम देण्याची प्रथा असे. त्यामुळे त्या त्या कुळातील अधिकारी आपापली कामे दक्षतेने करीत असत. ग्रामव्यवस्थेत पाटील हा सर्वांत मोठा वतनदार आढळतो. त्‍या खालोखाल देशमुख किंवा देशग्रामकूट होते.

पाटील हा जसा गावचा राजा, तसा देशमुख हा आपल्या हाताखालच्या प्रदेशाचा नायक असे. वतनाच्या अधिकाराचे महत्त्व मोठे असले, तरी कर्तव्यपालनाची इच्छा त्यापेक्षा अधिक असे. वतनदार हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून लोकांच्या हितासाठी झटणारे असल्यामुळे लोक त्यांना मान देत. वतनदारांनीही आपल्या वतनाचा व आपल्या अधिकाराचा मोठा अभिमान वाटे. ग्रामसंस्था ही प्रत्येक गावात असे आणि तिचा कारभार ग्रामपंचायत नावाची सभा करीत असे. पुढे मात्र ही व्यवस्था थोडी बदलली आणि ग्रामीण भागात देशकसत्ता आली. देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, चौगुला आणि प्रमुख ग्रामस्थ या सर्वांना मिळून ‘देशक’ म्हणत. गावाच्या कारभारासाठी ज्या सभा भरत, त्यांत बारा बलुतेदार, शेतकरी, जोशी या सर्व जनपदस्थ लोकांचा समावेश असे. राजसत्त बदलली तर अधिकारी बदलत पण लोकव्यवहाराचा कणा बनलेली वतनदार मंडळी कायम असत.


 राजसत्तेच्या खालोखाल देशकसत्ता म्हणजे देशमुख, कुळकर्णी, देशकुळकर्णी, पाटील, बलुतेदार इ. वतनदारांची लहानमोठे अधिकार असलेली उतरंड होती. देशकसंस्थेला वतन म्हणत आणि गोत म्हणजे ग्रामसंस्था. त्यालाही वतन म्हणत. ह्या ग्रामसंस्थेला फार महत्त्व होते. गावातील वतनाचे भांडण-तंटे ग्रामसंस्थेमार्फत निकालात काढण्याचा प्रघात होता. त्यावेळी महाराष्ट्रात कडेकपारी अनेक खेडी होती. त्यांपैकी प्रत्येक गाव बव्हंशी स्वयंपूर्ण होते. गावात शेतीखेरीज कारागिरी करणाऱ्यास बलुते अशी संज्ञा असे. त्यांना पोटाकरिता जमिनीच्या उत्पन्नानुसार धान्यादी वस्तू मिळत व जमीन इनाम मिळे.

 शिवकालीन ग्रामसंस्था कुटुंबतत्त्वावर आधारित होती. वतनदार कुळकर्णी हा गावचा मिरासदार असे. कुळकर्ण्याचा निर्वंश झाल्यास त्याच्या जागी दुसरा कुळकर्णी वंशपरंपरेने नेमण्याचा हक्क ग्रांमस्थांना असे. तत्पूर्वी ग्रामस्थ तात्पुरता मुतालिक नेमून नव्या कुळकर्ण्याचा शोध घेत. ग्रामस्थांनी अशी वतने बहाल केली, तरी त्यांवर परण्याच्या देशमुखांचे शिक्के व देशपांड्यांचे दस्तक असावे लागत. एकदा वतन दिल्यानंतर त्याला कोणी हरकत घेतली, तर सारा गाव वतनदाराची पाठ राखीत असे. कुळकर्ण्याप्रमाणे पाटीलसुद्धा मिरासदार होता. पाटील मृत्यू पावला तर त्याच्या बायकोच्या आणि अज्ञान मुलाच्या हातून ग्रामस्थ कारभार चालविण्यास मदत करीत. शिवकालीन समाजात वतनासक्ती जबरदस्त होती व वतनासंबंधी भांडणे पिढीजात चालू राहत परंतु वतनाच्या भांडणात राजसत्ता अखेरचा निकाल ग्रामसभांवर सोपवी. राजाकडून फिर्यादीस मुळातच हुकूम असे की, ‘हे मिराशीचे काम आहे, तरी उभयता वादी गोतामध्ये जाऊन कागद रूजू करून निवाडा करून घेणे.’

 

वतनदार:  वतन हा मूळचा अरबी शब्द आहे ज्‍याचा अर्थ वर्तन, स्वदेश, जन्मभूमी. गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल अशा व्यक्तीला उपजीविकेकरिता वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न मिळते ते म्हणजे वतन होय. वतन धारण करणाराला वतनदार म्हटले गेले. इनामदार, जहागिरदार, मनसबदार, सरंजामदार हे या एकाच संकल्पनेत मोडतात. वतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असत.

 पाटील : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द प्रचारात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा) वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत असे. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर होती त्‍यामुळे तो एकप्रकारे तो गावचा राजाच बनला. गावकरी व बलुतेदार आपल्या सेवा पाटलाला मोफत देत असत. त्याच्या शब्दाला किंमत होती. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात.


पुढे काम वाढल्याने पाटलाची पोलिस पाटील आणि मुलकी पाटील अशी दोन पदे निर्माण झाली. गावातील सर्वच कार्यक्रमात, समारंभात पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी (जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) कुळवाडी यांच्यासह बारा बलुतेदार होते. आपल्या परगण्यात वसूल आणि शांतता अशा दोहोंची जबाबदारी पाटलांवर होती. शिवाय राजाला गरज पडल्यास ससैन्य त्याच्यासोबत स्वारीवर जावे लागे.

 चौगुला: म्हणजे पाटलाचा मदतनीस. धान्याची कोठारे व इतर सर्व कामे करणारा ग्राम अधिकारी. गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक सनदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत(गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत इनामला जहागिर हा प्रचलीत झाला.

 

कुळवाडी: शेकडो पिढ्या पासून कुळ वारसाने आलेली जमीन जो कसत असे त्याला कुळवाडी म्हणत आणि या कुळवाडी मध्ये ९६ कुळे अस्तिवात होती. यातील ज्या कुळाचे जे बलुतेदार, आलुतेदार होते ते त्या कुळासाठी त्यांची सेवा प्रदान करत होते कारण संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर म्हणजेच पर्यायाने कुळवाडी लोकांच्या कुळाच्या आधारावर चालत होती. पुढे मुस्लिम आणि ब्रिटिश राजवटीत या कुळवड्याच्‍या जमिनी देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी आणि सावकार यांनी हस्‍तगत केल्‍या आणि गावच्या मोठ्या जमिनीचे स्वतःच मालक बनले आणि कुळांना जमिनी फक्त कसण्यासाठी दिल्या त्यामुळे कुळवाडी स्वतःच्या जमिनीचेच नामधारी मालक बनले.

 कुलकर्णी: गाव पातळीवर पाटलाला मदत करणारा व गावचे रेकॉर्ड लिहिणारा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे कुलकर्णी. कुळवाडी लोकांच्या कुळावर कर आकारणी करतो तो कुलकर्णी. कूळ+आकारणी= कूळ करणी = कुलकर्णी.


कुळ म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती. त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. काही भागात याला पटवारी, पांड्याही म्हणतात. प्राचीन काळी कुलकर्णी हे ब्राह्मण समाजाचा असायचे. परंतु पुढे इतरही उच्च जातीत कुलकर्णी पद आले. पाटलाप्रमाणे यालापण गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत. कुलकर्णीच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले. 

 गुरव: हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. गुर देवळात देवाची पूजा करायचे आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायचे.


 जोशी: पूजाअर्चा आणि भाकित वर्तविण्याकरिता जोशी वृत्ती आली. त्यातून ग्रामजोशी, कुडबुडे जोशी हे प्रकार आले. जोशी वृत्ती या नावाने प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या ग्रामसंस्थेतील हा एक वतनदार समाज आहे, त्यांचा उल्लेख ‘ग्राम जोशी’, ‘कुडबुडे जोशी’, ‘गिडबिडकी’ इ. नावांनी करण्यात येतो आणि या नावांप्रमाणे त्यांच्या व्यावसायातही फरक आढळतो. यांची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांत असून पूर्वी जोशी हे भिक्षेकरी होते. मराठे, धनगर, माळी इ. जातींचा यात भरणा असे. जोशांचे ‘खास जोशी ’ व ‘अकरमासे जोशी’ असे दोन पोटभेद असून त्यांच्यात रोटीव्यवहार होता, पण वेटीव्यवहार होत नसे. त्यांच्या सर्व चालीरीती मराठ्यांप्रमाणे होत्या.

ग्रामजोशी मात्र जुन्या ग्रामव्यवस्थेतील एक धार्मिक अधिकारी होता. पंचांग सांगणे, लग्न लावणे, अंत्यसंस्काराचे पौरोहित्य करणे आणि प्रसंगोपात उपाध्येपणा करणे, हा ग्रामजोशीचा अधिकार असे. त्याच्याकडे ग्रमदेवतेची पूजा-अर्चा, नैवेद्य आणि शकुन-अपशकुन पाहणे ही कामे असत. तो जातीने ब्राम्हण असे आणि कुणब्‍याकडून धान्याचा शेकडा एक या प्रमाणात त्याला पेंढ्या मिळत. याशिवाय नैमित्तिक शिधा व दक्षिणा वेगळी असे. गिडबिडकी जोशी हे प्रामुख्याने महाराष्ट्र−कर्नाटकांत आढळतात. ते डमरू वाजवून भिक्षा मागतात, म्हणून त्यांना गिडबिडकी किंवा कुडबुडे म्हणतात. यांच्या चालीरीती मराठ्यांप्रमाणेच असून हे पिंपळानामक पक्ष्याचा शब्द एकून भविष्य कथन करतात.


 महार: गावचा आणखी एक महत्त्वाचा वतनदार म्हणजे महार. कोतवाल, जागल्या व येसकर ही गावकामे महाराकडे होती. गावच्या संरक्षणाची जबाबदारी महार आणि मांग अशा दोन्ही समाजाकडे होती. जागत्या, वेसकर इ. महारकीच्या कामाचे पोटविभाग असल्यामुळे अनेक ठिकाणी त्यावेळी ही सर्व कामे महार करीत असत आणि तिन्ही प्रतींचे बलुते घेत असत. महार जागले हे पाटील−कुलकर्ण्यांचे हरकामे शिपाई होत. सरकारी कामानिमित्त ज्या इसमाची त्यांना गरज लागते, त्याला बोलावणे, गावात कोणी परकीय मनुष्य आल, जनन, मरण किंवा गुन्हा झाला, सरकारी मालमत्ता, झाडे, हद्दनिशाण्या यांचा बिघाड झाला किंवा सरकारी जागेवर कोणी अतिक्रमण केले, तर त्याबद्दलची बातमी पाटील−कुलकर्ण्यांना देणे, गाव स्वच्छ ठेवणे, गस्त घालणे, पाटील-कुलकर्ण्यांबरोबर परगावाला सरकारी कामानिमित्त जाणे, गावचा वसूल, कागदपत्र व सरकारी सामान ठाण्यात किंवा परगावी पोहोचविणे, पलटणीचा बंदोबस्त, सरकारी अंमलदारांचा सरबराई, गाड्या धरणे वगैरे कामांत पाटील-कुलकर्ण्यांना मदत करणे इ. कामे महार जागले करीत असत. महार मुलकीकडील व जागले पोलीसकडील नोकर असल्याने वरील कामांपैकी जी मुलकी अंमलदारांकडून चालतात, ती महार करत व जी पोलीसांकडून चालतात, ती कामे जागले करीत असत. महारांना रोख मुशाहिरा मिळत नसे. बहुतेक गावी महारांना इनाम जमिनी आहेत, त्यांना ‘हाडकी हाडोळा’ म्हणतात.


शेटे आणि महाजन: गाव वाढला म्‍हणुन व्यापार वाढला आणि त्यातून गावात स्वतंत्र पेठ हा भाग निर्माण झाला. या पेठेची व्यवस्था लावण्याकरिता शेटे आणि महाजन हे वतनदार आले. त्यांच्याकडे बाजारपेठेशी निगडित सर्व व्यवस्था आली. या वतनाचा संबंध व्यापाराशी, प्रामुख्याने वाणी व्यवसायाशी, निगडीत असून गुजरात−महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आणि ग्रामव्यवस्थेतही त्यांचे स्थान महत्त्वाचे होते. इतर वतनांबरोबरच हे वतन वृद्धिंगत झाले. अर्थव्यवहाराचे नियमन करणारी संस्था म्हणून तिचे महत्त्व होते. व्यवहाराचे शिरस्ते ठरविणे, लवाद करणे, सरकार-दरबारी दाद मागणे इ. सर्व महत्त्वाचा कारभार महाजन चालवीत असे. व्यापारी व सावकार मिळून एकच महाजन संस्था असे. तिला ‘महाजनकी’ म्हणत. महाजनांच्या प्रमुखास नगरशेठ अशी संज्ञा होती.

 देशमुख: दहा पाटलांवर अर्थात गावावर एक देशमुख आला. देश म्हणजे मुलुख आणि मुख म्हणजे प्रमुख अर्थातच त्याला ‘हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट’ म्हटले गेले. अनेक गावचा परगणा तयार व्हायचा. त्याचा अधिकारी म्हणजे देशमुख. नवीन वसाहत वसविणे, मुलकी आणि लष्करी व्यवस्था लावणे, पाटलांकडील महसूल सरकारमध्ये जमा करणे ही कामे त्‍यांच्‍यावर सोपविली गेली.


 देशपांडे: संरक्षण व उत्पन्नातून पाटलांचे वाडे तर देशमुखांच्या गढ्या निर्माण झाल्या. त्‍यांची नोंद ठेवण्याकरिता देशपांडे पद निर्माण झाले. देशपांडेच्या हाताखाली मोहरीर म्हणजे मदतनीस असायचा.

देशमुख, देशपांडेच्या हक्कांना रुसूम आणि भिकणे म्हटले जायचे. यांना मदतीसाठी णीस म्हणजे कारकून अर्थातच चिट (स्टेनो), फड (मुख्य कार्यालय) ही विविध पदे निर्माण झाली. कर्नाटकात याला नाडगावुडा किंवा नाडकर्णी म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या वसुलीतून देशमुखांना २० टक्के तर पाटलांना १० टक्के वाटा असायचा. पाटील आणि देशमुख वरवर स्वयंपूर्ण दिसत असले तरी सरकारी अधिकारी मामलेदाराची तपासणी करताना त्यांना कसरत करावी लागायची.


 देशमुख-देशपांडे व देसाई : हे उच्चश्रेणीतील परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. देशमुखी म्हणजे लष्करी व फौजदारी अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी, तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख-देशपांडे यांनी अमूक एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे, शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत. कर्नाटकात देशमुख-देशपांडे यांनाच अनुक्रमे ‘नाडगावुडा’ आणि ‘नाडकर्णी’ म्हणत. हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. देशमुख−देशपांडे यांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. त्यास ‘रूसूम’ म्हणत. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत.

परागण्याच्या जमाबंदीचे सर्व दप्तर देशपांड्यांच्या ताब्यात असे. त्यांच्या हाताखाली ‘मोहरीर’ नावाचा एक कारकून हे काम पाही. निरनिराळ्या वहिवाटदारांचे, वतनदारीचे हक्क व जमिनीची प्रतवारी, तिचे वर्णन इ. बारीकसारीक बाबींची नोंद या हिशोबात केलेली असे. देशपांडे विविध गावांच्या कुलकर्ण्यांनी पाठविलेले सर्व हिशोब संकलित करून सर्व परगण्यांचा ताळेबंद तयार करीत असे. कोकणात व कर्नाटकात हे काम देसाई हे वतनदार करीत. कोकणातील प्रभुपणाचा हुद्दाही देसायांच्याच जोडीचा असे. काही वेळा प्रभुदेसाई असा वतन-हुद्याचा उच्चार करीत. देशपांडे-देसाई हे देशमुखाच्या हाताखालील वतनदार असत. काही ठिकाणी देशपांड्यासच देशकुलकर्णी असेही म्हटले आहे.


 बलुतेदार-अलुतेदार: गावोगावी बव्हंशी सेवाकार्ये करणारे जुने वतनदार म्हणजे अलुतेदार आणि बलुतेदार होत. बलुतेदार हे प्रत्येक गावातील व्यवहाराकरिता व दैनंदिन व्यवहाराकरिता अपरिहार्य नसलेले वतनदार होते. पूर्वापार प्रत्येक गावास वंशपरंपरेच्या हुद्देदारांची संख्या २४ असे. त्यांपैकी बाराजणांना ‘अलुतेदार’ असे संबोधण्यात येई. पेशवाईअखेर या अलुते-बलुतेदारांची संख्या इतकी फोफावली की या २४ अलुते-बलुतेदारांच्या जोडीस तितक्याच लोकांची भर पडली व त्या सर्वांना वतनदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. प्रत्येक गावात हे सर्वच्या सर्व असतच असे नव्हे. प्रदेशपरत्वे त्यांच्या संख्येत फरक आढळतो. सुतार, लोहार, चांभार, न्हावी असे सतत ज्यांची गरज भासते, असे बलुतेदार बहुतेक गावात रहात असत तर तेली, तांबोळी, साळी, सनगर, माळी, गोंधळी असे नैमित्तिक अलुतेदार हे वाड्यांवर वस्ती करून रहात असत. अर्थात आपापल्या शेतीवाडीजळच राहणे सोयीचे असल्यामुळे मुख्य गावठाणाजवळ जमीन असलेले वतनदार गावठाणात रहात, तर लांबवर जमीन असलेले वतनदार रानात वस्ती करून रहात. हळूहळू त्यांच्या वस्तीच्या वाड्या बनत. काही अलुतेदार दरसाल ठराविक हंगामात एका गावाहून दुसऱ्या गावी येत-जात असत. यांपैकी गोंधळी, घडशी, घिसाडी हे प्रमुख होत.


दरसाल ठराविक हंगामात व्यवसायपरत्वे गावोगाव भटकणारे असे फिरस्तेही कालांतराने वतनदार बनलेले दिसतात. अशा वतनदारांत तीर्थोपाध्याय, डोंबारी, मांगगारूडी, दरवेशी, नंदीबैलवाले, कलावंत, कुडमु (बु)डे जोशी, वासुदेव इत्यादींचा अंतर्भाव होतो.

अलुते-बलुतेदारांस वर्षाकाठी सुगीच्या वेळी धान्यरूपाने अगर खळ्यावर पेंढ्यांच्या रूपाने ठराविक मोबदला मिळत असे. फिरस्ते मात्र प्रत्येक शेतकऱ्याकडून विकलेल्या मोबदल्यात किंवा हत्यारे-अवजारांची दुरूस्ती केल्यास, त्याचा मोबदला म्हणून किंवा केलेल्या खेळ-करमणुकीच्या किंवा सांस्कृतिक कार्यक्रमापोटी देणग्यांच्या ऐपतीस व वसूल करणाऱ्यांच्या ताकदीस अनुसरून धान्य अगर शेतातून पेंढ्या वसूल करीत. ते दरसाल नियमाने विशिष्ट हंगामात फिरू लागल्याने साहजिकच वहिवाटीनुसार ते वतनदार बनले आणि विशिष्ट कामापोटी गावकऱ्यांकडून मोबदला वसूल करणे हा आपला हक्क आहे असे ते मानू लागले.


 भारतीय खेड्यांतील परंपरागत वतनी हक्क. हे हक्क ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया होत. खेड्यांत राहणाऱ्या बिगर-शेतकरी लोकांचा व्यवसाय हा परंपरेने चालत आल्यामुळे त्याला कुलपरंपरागत हक्काचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे व्यवसाय व त्यांना मिळणारा मोबदला हे प्रत्येक व्यावसायिकाचे वतनी हक्क झाले आहेत. हे वतनी हक्क ‘अलुते-बलुते’नावाने ओळखले जातात. या हक्कांवरून शेतकरी व त्यांवर उदरनिर्वाहाकरिता पूर्णपणे अवलंबून असणारे बिगर-शेतकरी लोक यांचे परस्परसंबंध वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसून येते. शेतकऱ्‍यांबरोबरच्या इतर लोकांच्या या परस्परसंबंधांना उत्तरेत जजमानी (यजमानी) पद्धत व महाराष्ट्रात ‘अलुतेदारी-बलुतेदारी’म्हणतात. या जजमानी किंवा अलुतेदारी-बलुतेदारी पद्धतीत शेतकरी हा यजमान समजला जातो, तर बिगर-शेती-व्यावसायिक हे ‘कामिन’(इच्छुक) समजले जातात.


नारू-कारू: महाराष्ट्रात अशा बिगर-शेती व्यावसायिकांचे अलुतेदार अगर ‘नारू’आणि बलुतेदार अगर ‘कारू’असे दोन प्रकार आढळतात. शेतकऱ्‍यांची अधिक महत्त्वाची कामे करणारे, त्यांच्या नित्याच्या गरजा भागविणारे ते बलुतेदार. साहजिकच त्यांना मोबदलाही अधिक मिळत असे. सामान्यपणे पाटील, कुलकर्णी हे सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने ‘बारा बलुतेदार’म्हणून प्रसिद्ध होते. ज्यांच्यावाचून शेतकऱ्‍यांचे नडत नाही, पण जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा भागवितात ते अलुतेदार. यांमध्ये तेली, तांबोळी, साळी, सनगर, शिंपी, माळी, गोंधळी, डवऱ्या, भाट, ठाकर, गोसावी, मुलाणा, वाजंत्री, घडशी, कलावंत, तराळ, कोरव, भोई या अठरा जाती येतात.

 बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती.


कुंभार, कोळी, गुरव, चांभार, मातंग, तेली, न्हावी, परीट, माळी, महार, लोहार, सुतार.

तेली हिंदू तर मुलाणा मुसलमान असत. बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यांत वेगवेगळी असू शकतात. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. ज्या गावात बलुतेदार नव्हते तेथे अलुतेदार हे बलुतेदाराचे काम करत असत.

 मुस्लिम बलुतेदार: आत्तार, कुरेशी, छप्परबंद, तांबोळी, पिंजारी-नदाफ, फकीर, बागवान, मदारी, मन्यार, मोमीन, मिसगर, शिकलगार.

 अलुतेदार हा अठरा जातींचा समूह आहे. यांचे महाराष्ट्रातील प्रमाण ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्ग (ओबीसी)मध्ये मोडतो. अलुतेदारांनाच ’नारू’ म्हणतात.

कासार, कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवर्‍या, तराळ, तांबोळी, तेली, भट, भोई, माळी, जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी.

या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.


अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी :
कळवंतखाटीकगोंधळीघडशीडावर्‍यातराळतांबोळीमाळीशिंपीसाळीसोनार हे बारा अलुतेदार.

तर काही ठिकाणी १२ अलुतेदारांची ही:

कळवंतघडशीचौगुलामुलाणाठाकरडवर्‍यातराळतांबोळीतेलीमाळीसाळीसोनार अशी दिली आहे.

गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही.

एक नक्की की अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत.

बलुतेदार आणि अलुतेदार हे खरे गावकामगार. बलुतेदारांच्या आणि अलुतेदारांच्या यादींमध्ये एकवाक्यता नाही.

एका यादीप्रमाणे, कुंभारकोळीमातंगगुरवचांभारचौगुलाजोशीधोबीन्हावीलोहारसुतारमहार हे बारा,

तर दुसर्‍या यादीप्रमाणे कुंभारमातंगगुरवचांभारजोशीधोबीन्हावीमहारमुलाणीलोहारसुतारमहार

हे बारा बलुतेदार आहेत. या दुसर्‍या यादीत, पहिल्या यादीतले कोळी आणि चौगुला नाहीत त्‍या ऐवजी महार आणि मुलाणी आहेत.
तिसर्‍या एका यादीप्रमाणे महार हा बलुतेदार नसून अलुतेदार आहे.


अलुतेदारांच्या यादीत असाच गोंधळ आहे. एका यादीप्रमाणे:

कलावंत, कोरव, गोंधळी, गोसावीघडशी, ठाकर, डवर्‍या, तराळ, तांबोळी, तेली, भाट, भोई, माळीमुलाणा, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी हे अठरा अलुतेदार, तर दुसर्‍या यादीप्रमाणे:

कळावंतघडशी, चौगुला, जंगम, ठाकर, डौरी, तराळ, तांबोळी, माळी, साळी, सोनार, चौगुला

हे फक्त बारा अलुतेदार आहेत. कोठे कोठे वाजंत्री, गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात.

 शेतीच्या कामाव्यतिरिक्त लग्न किंवा इतर धार्मिक-सामाजिक समारंभांतही महार-मांगांसकट सर्व अलुत्या-बलुत्यांची कामे परंपरेने ठरलेली असतात. त्यांकरिता त्यांना खण-नारळ वगैरे मोबदला कामाप्रमाणे व ऐपतीप्रमाणे मिळत असे.


या अलुतेदारी-बलुतेदारी पद्धतीत एकंदर गावातील बिगर-शेती-व्यवसायातील कुटुंब, त्याचे काम आणि त्याचा मोबदला यांचा निश्चित आणि अभेद्य संबंध दिसून येतो.

ग्रामीण अर्थव्यवस्थेस आधारभूत असलेली ही पद्धत औद्योगिकीकरणाच्या व नागरीकरणाच्या प्रभावाखाली आता मोडकळीस आली आहे.  

 वतनसंस्थेने प्रत्येक व्यवहारात त्या त्या कुटुंबांची मक्तेदारी आणि एकाधिकार निर्माण केला होता. यामुळे आपापसांतील स्पर्धा नाहीशी होऊन धंदा-व्यवसायसुद्धा सांप्रदायिक बनला होता. गावातील गिऱ्हाईक-कुटुंबे बांधली गेली होती. त्या त्या कुटुंबाला अलुत्या-बलुत्यांच्या शिरस्त्याप्रमाणे वस्तू अगर सेवा बहाल करणे हा वतनदारीचा हक्क बनला होता. इतका की, कामानिमित्त शहरात गेलेला एखादा कुणबी तेथे केशकर्तनालयात दाढी करून परतला, तर गावाचा वतनदार न्हावी त्याला पंचापुढे खेचत असत. अशा बाबतीत पंचायतीनेसुद्धा वतनदार बलुतेदाराचा हक्क मान्य केल्याची उदाहरणे आहेत. गिऱ्हाइके अशा रीतीने बांधली गेल्यामुळे वतनदारांच्या एकाधिकारास तडा जाण्यास वाव नव्हता.


 इंग्रजी राजवटीतील राजकीय हस्तक्षेप, औद्योगिकीकरण व शहरीकरण तसेच वाहतुकीची साधने, संदेशवहनाच्या सुविधा आणि दळणवळणाच्या सोयी यांमुळे ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क वाढला. परिणामतः जात-पंचायत व ग्रामपंचायत यांच्या अनिर्बंध सत्तेला मर्यादा पडल्या. गावकऱ्यांच्या नित्यनैमित्तिक गरजा भागविकण्याकरिता बाजारात सर्व प्रकारच्या वस्तूंची, उपकरणांची विक्री होऊ लागली. विनिमयाकरिता धान्याचे माध्यम देवघेवीच्या व्यवहारात कालबाह्य होऊन कुचकामी ठरू लागले. त्याचप्रमाणे ताळेबंदाच्या काटेकोरपणातही ते गैरसोईचे ठरले. साहजिकच दैनंदिन व्यवहारात पैशाच्या चलनाचा वापर सुरू झाला. त्यामुळे शेतकरी शहरी बाजारपेठांकडे वळले आणि सुतार, लोहार इ. बलुतेदारकारागीर खेड्यात स्वतःचा धंदा चालेना म्हणून मोलमजुरीसाठी खेड्याबाहेर पडले.

संस्थानातील इनामे नष्ट करण्याच्या १९५५ च्या कायद्यामुळे या सरंजामी वतनदारांचा खेड्यांशी संबंधही तुटला व ते कायमचे शहरवासी बनले. अशा प्रकारे विसाव्या शतकाच्या सुमारास हजार-दीडहजार वर्षे अव्याहत चालत आलेली वतनसंस्था अखेर संपुष्टात आली.

 

  n  

 

 

 

 

 

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला गावगाडा अर्थात प्राचीन वतन व्‍यवस्‍था . याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.