आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

मुस्‍लिम वारसा - सर्वसाधारण नियम

मुस्‍लिम वारसा - सर्वसाधारण नियम

शरीयत कायदा हा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असून तो जगभरातील सर्व मुस्लिम धर्मियांसाठी लागू आहे. मुस्लिम कायद्याचे प्रमुख चार उगम स्त्रोत आहेत.

(१) पवित्र कुराण, (२) सुन्ना, (३) इज्‍मा, (४) कियास. याशिवाय इस्‍तेहसान, इस्‍तिदलल, इस्‍तिलाह, रुढी, परंपरा, राष्ट्रीय कायदे ही दुय्यम उगम स्त्रोत आहेत.

मुस्लिम धर्मिय कायद्यान्वये मुस्लिम समाजात प्रामुख्‍याने दोन शाखा आहेत (१) शिया (२) सुन्नी.

मुस्लिम समाजात लग्न (निकाह), घटस्फोट (तलाक), मेहर (लग्नाआधी नवरदेवाने नवर्‍या मुलीला देण्याची रक्कम), बक्षीस पत्र (हिबा), मृत्‍युपत्र (वसियतनामा), वारसा हक्क, पालनपोषण, अज्ञान पालकत्व, वक्फ आदी सर्व बाबी मुस्लिम कायद्यान्वये पार पाडल्या जातात. मुस्लिम व्यक्तीमार्फत न्यायालयात दाखल दाव्यातही मुस्लिम कायद्यान्वये प्रकरण चालवले जाते.

ब्रिटिश राजवटीत मुस्लिम धर्मियांसाठी काही कायदे केले गेले. त्यातील शरीयत कायदा-१९३७ हा कायदा महत्वाचा आहे.


8 री यत कायदा -१९३७: शरीयत या शब्‍दाचा अर्थ ʻअवलंबवायचा मार्गʼ असा आहे. हा कायदा ७ ऑक्टोबर १९३७ रोजी अंमलात आला. याला मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा मानले जाते. या कायद्यातील कलम २ अन्वये, रुढी व परंपरा विरुध्द असली तरी, शेतजमीन सोडून इतर अन्य बाबी जसे, वारसा हक्क, स्त्रीयांची विशेष संपत्ती, निकाह, तलाक, उदरनिर्वाह, मेहर, पालकत्व, बक्षीस, न्यास, न्यासाची मालमत्ता, वक्फ या सर्व बाबी मुस्लिम व्यक्तिगत कायदान्वये ठरविल्या जातील.त्यासाठी असलेल्या अटी म्हणजे (१) व्यक्ती धर्माने मुसलमान असावी (२) भारतीय करार कायद्यातील कलम ११ अन्वये, व्यक्ती करार करण्यास सक्षम असावी. (३) हा कायदा ज्या प्रदेशात लागू असेल त्या प्रदेशातील रहिवासी असावी.

हिंदु उत्तराधिकार अधिनियम, १९५६च्या तरतुदी मुस्‍लिम धर्मियांना लागू होत नाहीत. त्यांच्या मिळकतीचे वारस मुस्‍लिम व्यक्तीगत (पर्सनल लॉ) कायद्यातील तरतुदीप्रमाणे ठरविले जातात.

मुस्‍लिमांच्या वैयक्तिक कायद्याप्रमाणे हनाफी सुन्नी आणि शिया अशा दोन्ही पंथांचे वारसाविषयीचे वेगवेगळे नियम आहेत. धार्मिक आणि राजकीय भेदांमुळे सुन्नी आणि शिया हे दोन पंथ बनले.


8 मुस्लिम वारसा हक्क कायदा हा चार इस्लामिक कायद्यांचा संग्रह आहे .

(१) पवित्र कुराण

(२) सुन्नी (प्रेषिताला मानणारे)

(३) इज्मा (ठराविक मुद्द्यावर निर्णय घेतांना समाजातील सुशिक्षीत लोकांचा विचार

घेणारे)

(४) क्विया (देवाने जे चांगले आणि योग्य ठरवून दिले आहे त्यात सुधारणा करणारे).


8 मुस्‍लिम व्यक्तीगत कायद्या न्‍वये वारसाविषयक सर्वसाधारण नियम खालीलप्रमाणे आहेत.

मुस्‍लिम धर्मात वारसा हा वैयक्‍तीक ʻशरीयत कायद्याचाʼ अविभाज्य भाग मानला जातो.

पवित्र कुराणातील तरतुदीन्‍वये मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍तींना एकमेकांकडून वारसा मिळतो. म्हणून, मयत व्यक्तीच्या मालमत्तेत नातेवाईकांचा कायदेशीर वाटा असतो. वारसाबाबतचे प्रमुख नियम पवित्र कुराणात तपशीलवार दिलेले आहेत.

जेव्हा एखादी मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍ती मरण पावते तेव्हा चार कर्तव्ये पार पाडावी लागतात.

मयत व्यक्तीच्या संपत्तीचा उपयोग प्रथम खाली नमूद चार बाबींपैकी अनुक्रमांक (१) आणि (२) साठी केला जाणे अनिवार्य आहे. त्यानंतरच उर्वरीत मिळकत वारसांमध्ये विभागली जाते.

. अंत्यसंस्कार आणि दफन विधीचा खर्च.

. मयत व्यक्तीवर असणारे कर्ज फेडणे.

. मयत व्यक्तीने मृत्‍युपत्र करून ठेवले असेल तर त्‍याप्रमाणे पूर्तता करणे.

. शरीयत कायद्यानुसार मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना मयत व्‍यक्‍तीच्‍या संपत्ती आणि मालमत्तेचे वाटप करणे.


8 मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍तींचे विविध प्रकारचे वारस :

मुस्लिम कायद्यांतर्गत मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍तींच्‍या वारसांचे खालील श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते:

१. भागधारक (Sharers).

२. अवशेष/ अवशिष्ट (Residuary/Remaining)

३. दूरचे वंशज (Distant Kindred)


१. भागधारक ( Sharers ) :

हे पवित्र कुराणात नमूद प्राथमिक वारस आहेत आणि पवित्र कुराणच्या नियमांनुसार त्यांना मयत व्‍यक्‍तीच्‍या मालमत्तेचा विहित वाटा मिळण्याचा हक्क आहे. हे वारस नेहमीच वारस हक्‍काच्‍या हिश्‍शाचे हक्कदार असतात. ते कधीही पूर्णपणे वगळले जात नाहीत. त्यांची संख्या १२ आहे.

मयत मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍तीचा/ची

(१) पती (२) पत्नी (३) मुलगी,

(४) मुलाची मुलगी (किंवा मुलाचा मुलगा इ.) (५) वडील

(६) आजोबा (वडीलांचे वडील) (७) आई ( ) आजी (वडीलांची आई)

(९) सख्‍खी बहीण (Full sister)

(१०) सावत्र/सगोत्र बहीण (Consanguine sister) (एकच वडील पण भिन्न आई)

( ११ ) सहोदर बहीण (Uterine sister) (आई एकच पण वडील वेगळे).

( १२ ) सहोदर भाऊ (Uterine brother)

¨ज्याची आई एकच आहे पण वडील वेगळे आहेत:- Uterine brother/ sister/half sister

¨ज्याचे वडील एकच आहेत पण आई वेगळी आहे:- Consanguine/ agnate brother/ sister


२. अवशेष / अवशिष्ट ( Residuary / Remaining)

हे वारस केवळ पुरुषांद्वारे मयत व्यक्तीशी संबंधित असतात. त्यांना, मयताच्‍या मालमत्तेत अवशिष्ट वाटा मिळण्याचा हक्क आहे. भागधारकांनी विहित हिस्‍सा घेतल्यानंतर उर्वरीत मालमत्तेत त्यांना हिस्‍सा मिळण्‍याचा अधिकार असतो.


३. दूर चे वंश ( Distant Kindred )

भागधारक आणि अवशेष वारस उपस्थित नसल्यास, मयत व्‍यक्‍तीची मालमत्ता दूरचे वंशज असलेल्‍या नातेवाईकांकडे प्रक्रांत होते. उदा. आजोबा (आईचे वडील), मावशी, भाची आणि स्त्री कडील चुलत भाऊ यांचा समावेश होतो.


8 मिळकत वाटपाची प्रक्रिया :

सर्व भागधारकांना समभाग वाटप केले जातात. यात मालमत्ता संपली तर वाटप प्रक्रिया पूर्ण होते. अन्यथा,

अवशेष/ अवशिष्ट वारसांना संपत्तीची उर्वरित भाग मिळतो. जर कोणतेही भागधारक किंवा अवशेष/ अवशिष्ट वारस नसतील तर दूरच्‍या वंशजांना मालमत्ता मिळते.

परंतु, भागधारक किंवा अवशेष/ अवशिष्ट वारस किंवा दूरचे वंशज असे कोणीही वारस नसतील तर मयत व्‍यक्‍तीची मालमत्ता राज्याच्या तिजोरीत जमा होईल.


8 समावेश आणि वगळण्याचे नियम :

मुस्‍लिम कायद्यात, मयत व्यक्तीशी कायदेशीर रक्ताचे नाते असलेल्या नातेवाईकांनाच वारस हक्‍क मिळण्याचा अधिकार आहे. अनौरस मुले आणि दत्तक मुलांना वारस हक्क मिळत नाही.

मयत पुरुषाने एखाद्‍या गर्भवती महिलेला सोडून दिले असल्यास, गर्भातील, न जन्मलेल्या मुलाचा वाटा राखून ठेवला जाईल. तसेच घटस्फोटानंतर प्रतिक्षाकाळ (इद्दत) दरम्यान स्त्री ही वारसाहक्कासाठी मयत व्यक्तीची पत्नी मानली जाते.


8 महिला आणि वारसा :

मुस्‍लिम कायद्यात, स्त्रियांना वारसा हक्क आहे. सामान्यतः स्त्रियांना समान वडिलांकडून वारसा मिळाल्यास पुरुषांना मिळणाऱ्या वारसापैकी अर्धा वाटा मिळतो. उदाहरणार्थ, जेथे मयत व्यक्तीला मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले आहेत, तेथे मुलाचा वाटा मुलीच्या दुप्पट आहे.

काही परिस्थितीत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वाटा मिळू शकतो.

काही वेळा स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत दुप्पट वाटा मिळतो.


8 वारस योग्य संपत्ती : मयत मुस्‍लिम व्‍यक्‍तीच्‍या अंत्‍यविधीचा खर्च आणि त्यावर असणारे कर्ज भागवल्यानंतर जे उरेल त्या संपदेचे वाटप/ विभागणी वारसांमध्‍ये करण्‍यात येते.


8 अमान्‍य संकल्‍पना :

P इंग्रजी कायद्‍यात असलेला 'स्थावर संपत्ती' किंवा 'वारसाने मिळालेली संपत्ती' किंवा 'स्‍वअर्जित संपत्ती' असा भेद मुस्‍लिम कायद्‍यात केला जात नाही. सर्व संपत्‍ती सारखीच समजली जाते.

P हिंदू कायद्‍यामध्ये असलेला 'वडिलोपार्जित संपत्ती' आणि 'स्वसंपादित संपत्ती' असा भेद मुस्‍लिम कायद्‍यात नसतो.

P मुस्‍लिम कायद्‍यात संयुक्त किंवा एकत्र कुटुंब ही संकल्‍पना नसते. मुस्‍लिम धर्मिय व्यक्तीची सर्व प्रकारची मालमत्ता त्‍याच्‍या एकट्‍याच्या मालकीची असते व तो मयत झाल्यावर अशी संपत्ती त्‍याच्‍या वारसांकडे त्यांच्या विहीत हिश्‍श्याप्रमाणे प्रक्रांत होते.

P मुस्‍लिम कायद्‍याला 'जन्मसिद्ध अधिकार' हे तत्‍व मान्य नाही. मुस्‍लिम धर्मिय व्यक्तीचा वारसाधिकार पूर्वस्वामीच्या मृत्युनंतरच निर्माण होतो. पूर्वस्वामी जीवंत असतांना केवळ जन्मामुळे पूर्वस्वामीच्या संपत्तीत काहीही हितसंबंध निर्माण होत नाहीत तसेच संभाव्य उत्तराधिकाराचे हस्तांतरण निरर्थक ठरते.

P मुस्‍लिम धर्मिय कायद्‍याला प्रतिनिधीत्वाचे तत्व मान्य नाही, मात्र याबाबतीत शिया आणि सुन्नी यांच्या नियमात फरक आहे.


8 वारसाधिकार : मुस्लिम कायद्‍यान्‍वये स्‍त्रियांना वारसाधिकार मिळतो. मात्र नात्याच्या दृष्टीने एकाच स्तरावरील स्त्री-पुरुषाला स्त्रीच्या दुप्पट हिस्सा मिळतो. अनौरस संततीला वडीलांचा हिस्सा मिळत नाही. पण आईचा हिस्‍सा मिळतो. मनुष्यवध करणार्‍या व्यक्तीस वारसाधिकार मिळत नाही.


8 मुस्लिम विधवा : मुस्लिम धर्मात विधवेला वारस म्हणून डावलता येत नाही. आपत्यहीन विधवेलाही मयत पतीच्‍या मिळकतीत, अंत्यविधी, कर्ज आणि इतर कायदेशीर खर्च भागविल्यानंतर १/४ हिस्सा मिळतो. तथापि, आपत्ये किंवा नातवंडे असलेल्या विधवेला मयत पतीच्या मिळकतीत, अंत्यविधी, कर्ज आणि इतर कायदेशीर खर्च भागविल्यासनंतर १/८ हिस्सा मिळतो.


परंतु जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीने आजारपणात त्‍याची सेवा करणार्‍या एखाद्या स्त्रीशी लग्न करण्‍याचा विचार केला असेल परंतु धर्मानुसार लग्नाबाबतची परिपूतर्ता करण्याआधी तो, त्या आजारपणात मयत झाला तर अशा स्‍त्रीला वारस म्हणून हिस्सा मिळत नाही. तथापि, अशा आजारी व्यक्तीने आजारपणात स्‍वत:च्‍या पत्‍नीला घटस्फोट दिला आणि नंतर तो त्या आजारपणात मयत झाला तर त्‍याच्‍या पत्‍नीला, पतीच्या मिळकतीत वारस म्हणून हिस्सा मिळतो आणि तिचा हा वारसाधिकार, ती पुनर्विवाह करीत नाही तोपर्यंत चालू राहतो.


8 अनौरस अपत्य : विवाहबाह्य अनौरस अपत्य हे फक्त त्याच्या आईचे अपत्य आहे असे मानण्यात येते. अशा आपत्याला आईचा आणि आईकडूनच्या नातेवाईकांचा वारसा मिळतो आणि आई आणि तिेचे नातेवाईक यांना अनौरस आपत्यांचा वारसा मिळतो. त्यात पिता आणि त्याचे नातेवाईक आणि अनौरस पुत्र यांच्यामध्ये परस्पर वारसाधिकार मिळत नाही. एका स्त्रीला औरस आणि अनौरस असे पुत्र असतील तर अनौरस पुत्र औरस पुत्राचा वारस होऊ शकत नाही असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्‍हटले आहे.


8 पती-पत्नी : हे दोघेही विवाहसंबंधामुळे भागधारकांच्या यादीत आले आहेत. स्त्री मयत झाली आणि तिच्या मागे तिचा पती आणि अपत्ये किंवा कितीही खालच्या पुत्राची अपत्ये राहिली तर पतीला १/४ हिस्सा मिळतो आणि असे नसले तर १/२ हिस्सा मिळतो. या उदाहरणात पती आणि पत्नी यांच्या जागांची उलटापालट केली तर पत्नीला अनुक्रमे १/८ किंवा १/४ हिस्सा मिळतो. पत्नी अनेक असल्यास त्यांच्यामध्ये १/८ किंवा १/४ हिस्सा समप्रमाणात विभागला जाईल. वडिलांप्रमाणे आईलाही अनिवार्यपणे हिस्सा मिळतोच.


8 कन्या : काहीही झाले तरी कन्या वारसदार होतेच. एकच कन्‍या असेल तर तिला १/२ हिस्सा मिळतो. पण दोन किंवा अधिक कन्या असल्‍यास त्यांना सर्वांना मिळून २/३ हिस्सा मिळतो. मयत व्‍यक्‍तीला पुत्र असल्यास कन्या अवशेषग्राही होते. पुत्राला तिच्या दुप्पट हिस्सा मिळतो.

8 बहीण : बहीणीच्या अस्तित्वामुळे कन्या अपवर्जित होत नाही. मृताला एक कन्या आणि एक बहीण असल्यास कन्येला हिस्सेदार म्हणून तिचा १/२ हिस्सा व बहीणीला १/२ हिस्सा मिळतो. त्याचप्रमाणे दोन कन्या आणि दोन बहिणी असल्यास, दोन कन्यांना मिळून २/३ हिस्सा मिळतो.


8 पुत्राची कन्या : पुत्र किंवा कन्या यांच्यापैकी कोणीही नसेल तर पुत्राच्या कन्येला १/२ हिस्सा, आणि पुत्राच्या दोनपेक्षा अधिक कन्या असतील तर त्यांना २/३ हिस्सा मिळतो. मात्र काही परिस्थितीत पुत्राच्या कन्येचा हिस्सा १/६ होतो आणि समान पुत्राचा पुत्र असल्यास ती अवशिष्टग्राही होते. पण पुत्राची कन्या आणि पुत्राची कन्येची कन्या असल्यास त्यांना मिळून २/३ हिस्सा मिळतो.


8 सहोदर भाऊ किंवा सहोदर बहिण- हे प्राथमिक वारसदार नव्हेत. त्या दोघांनाही प्रत्येकी १/६ हिस्सा मिळतो. दोन सहोदर भाऊ किंवा सहोदर बहिणी असल्यास सहोदर भावाचा १/३ आणि सहोदर बहिणीचा १/३ हिस्सा असतो. दोन सहोदर भावांमध्ये वारसाधिकार उत्पन्न होण्यासाठी ते दोघेही औरस असावे लागतात. एका स्त्रीला एक औरस आणि एक अनौरस असे दोन पुत्र झाले तर ते दोघे सहोदर भाऊ होत नाहीत आणि ते एकमेकांचे वारसदार होत नाहीत.


भागधारक किंवा अवशिष्टग्राही वारसांपैकी कोणीही वारस असल्यास दूरचे वंशज अपवर्जित होतात. याला अपवाद पती आणि पत्नी. ते हयात असले आणि भागधारक आणि अवशिष्टग्राही यांच्यापैकी दुसरे कोणीही वारस नसले तरी पती पत्नीचे हिस्से वजा जाता बाकी संपदा दूरच्या वंशजांकडे जाते. सर्वसाधारणपणे, नजीकचे वारसदार दूरच्या वारसांना अपवर्जित करतात.

8 प्रत्यावर्तन : सर्व भागधारकांचे हिस्से दिल्यानंतर संपदेचा काही भाग शिल्‍लक राहिला आणि कोणीही अवशिष्टग्राही वारस नसेल तर तो उर्वरित भाग परत भागधारकांकडे येतो आणि तो भागधारकांमध्ये त्यांच्या त्यांच्या हिश्श्याप्रमाणे विभागला जातो. या परत येण्याच्या क्रियेला पारिभाषिक शब्दात 'प्रत्यावर्तन’ म्हणतात.


भागधारकांच्‍या यादीतील अस्तित्वात असलेल्या सर्व हक्कदार वारसदारांचे ठराविक हिस्से दिल्यानंतर उर्वरित सर्व संपदा अवशिष्टग्राहींकडे येते. त्यांच्यापैकी एक व्यक्ती जरी असली तरी उर्वरित संपदा भागधारकांकडे प्रत्‍यावर्तीत होणार नाही. तथापि, अवशिष्टग्राहींपैकी कोणीही वारस नसेल तर तो उर्वरित भाग दूरच्या वंशजांकडे न जाता भागधारकांकडे प्रत्‍यावर्तीत होईल.

याबाबतीत अपवाद पती आणि पत्नी. अवशिष्टग्राहींपैकी कोणीही नसेल आणि पती किंवा पत्नी भागधारक वारस असतील तर उर्वरित संपदा पती किंवा पत्नी यांच्याकडे परत न येता दूरच्या वंशजांकडे जाते. परंतु अवशिष्टग्राही वारस नसतील आणि दूरचे वंशजही नसतील आणि पती किंवा पत्नी किंवा दोघेही इतकेच वारसदार असतील तर मात्र संपदा त्यांच्याकडे, तिच्याकडे किंवा दोघांकडे परत येईल. अशावेळी संपदा सरकारजमा होणार नाही.


8 बक्षीस (हिबा): मुस्लिम कायद्यान्वये बक्षीसाला ‘हिबा’ म्हणतात. जी मुस्लिम धर्मिय व्यक्ती वडिलोपार्जित स्थावर/जंगम मालमत्ता धारण करीत असेल ती व्यक्ती, इतर सहधारकांची ‘हिबा’ साठी संमती नसली तरीही त्याची स्थावर/जंगम मिळकत ‘हिबा’ म्हणून देऊ शकेल.

‘हिबानामा’ साठी आवश्यक असलेल्या अटी म्हणजे (१) ‘हिबा’ देणार्‍याची इच्छा व त्याचे प्रकटीकरण (२) ज्याला ‘हिबा’ द्यावयाचा आहे त्याची अथवा त्याच्या वतीने दुसर्‍याची संमती. (३) जी मालमत्ता ‘हिबा’ द्यावयाची आहे त्या मालमत्तेचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष ताबा दिला पाहिजे. यापैकी एकही गोष्ट घडली नाही तर ‘हिबा’ व्यवहार अवैध ठरतो.


8 काही संकीर्ण तरतुदी :

) सरकारजमा : नातेवाईक वारसदारांपैकी कोणीही जिवंत नसल्यास, मयताची संपदा सरकारजमा होते.

) अनौरस अपत्य: अनौरस अपत्यांना वारसाधिकार आहे किंवा कसे याबद्दल मतभेद आहे. एक मत असे आहे की अनौरस अपत्ये फक्त आईचे वारसदार होतात, त्यांना वडीलांचा वारसा मिळत नाही.

मुल्लांच्या मते या बाबतीत विधी असा आहे की, अनौरस अपत्याला आईचासुद्धा वारसा मिळत नाही आणि आई किंवा तिचे नातेवाईक यांना अनौरस अपत्यांचा वारसा मिळत नाही.

) दोन किंवा अधिक नाती: एखादी व्यक्ती दोन नात्यांमुळे मृताची वासरदार असेल तर त्या व्यक्तीला दोन्ही नात्यांनी वारसाधिकार मिळतो. एका स्त्रीने आपल्या चुलत भावाशी विवाह केला. पुढे ती मयत झाली. तिच्या पतीला पती म्हणून एक आणि चुलत भाऊ म्हणून एक असा दुहेरी हिस्सा मिळतो.


8 मुस्‍लिम व्‍यक्‍तीचे मृत्‍युपत्र :

भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ५८ अन्‍वये भारतीय वारसा कायदा मुस्‍लिम व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍युपत्राबाबत (वसियतनामा) लागू होत नाही. मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍तींसाठी मृत्‍युपत्राबाबतच्‍या तरतूदी त्‍यांच्‍या 'हेदाय' या बाराव्‍या शतकातील अधिकृत ग्रंथात दिलेल्‍या आहेत. यासंबंधात दुसरा ग्रंथ 'फतवा आलमगिरी' हा सतराव्‍या शतकात लिहिण्‍यात आला. 'शराय-उल-इस्‍लाम' हा ग्रंथ प्रामुख्‍याने शिया पंथीय मुस्‍लिमांसाठी आहे.


4 सज्ञानता: मुस्‍लिम कायद्‍यानुसार पुरूष व्‍यक्‍ती १५ वर्षे वयाचा झाल्‍यावर त्‍याला सज्ञान समजले जाते. इंडियन मेजॉरिटी ॲक्‍ट, १८७५ अन्‍वये पुरूष व्‍यक्‍ती १८ वर्षे वयाचा झाल्‍यावर त्‍याला सज्ञान समजतात परंतु जर अशी व्‍यक्‍ती अज्ञान असतांना न्‍यायालयाने त्‍याच्‍याबाबत 'पालक' नेमला असेल तर अशी व्‍यक्‍ती २१ वर्षे वयाचा झाल्‍यावर त्‍याला सज्ञान समजतात. इंडियन मेजॉरिटी ॲक्‍ट, १८७५ हा सर्वधर्मियांना लागू असल्‍याने मुस्‍लिम पुरूष व्‍यक्‍ती १८ वर्षे वयाचा झाल्‍यावरच सज्ञान समजली जाते. १५ वर्षे वयाची सज्ञानता केवळ विवाह, तलाक. मेहेर यांसाठीच लागू आहे.

4 गर्भस्‍थ शिशू: मुस्‍लिम धर्मानुसार त्‍याच व्‍यक्‍तीच्‍या नावे मृत्‍युपत्र करता येते जी मृत्‍युपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यू समयी जीवित असेल. तथापि, मृत्‍युपत्र करतांना गर्भात असणार्‍या शिशूचा जन्‍म मृत्‍युपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर सहा महिन्‍यात झाला तर त्‍याच्‍या नावे केलेले मृत्‍युपत्र ग्राह्‍य मानले जाते.


4 मर्ज-उल-मौत: मुस्‍लिम धर्मिय व्‍यक्‍तीला त्‍याचा दफन खर्च व कर्ज फेडीसाठी आवश्‍यक रक्‍कम सोडून, त्‍याच्‍या संपत्तीच्‍या १/३ संपत्तीपुरते मृत्‍युपत्र कोणत्‍याही वारसांच्‍या संमतीशिवाय करता येते. १/३ संपत्तीपेक्षा जास्‍त संपत्तीचे मृत्‍युपत्र वारसांच्‍या संमतीनेच वैध होते.

4 प्रोबेट: भारतीय वारसा कायदा, १९२५ चे कलम २१३ मुस्‍लिम व्‍यक्‍तीला लागू होत नाही. त्‍यामुळे त्‍यांना प्रोबेटची आवश्‍यकता नाही.

4 अपात्रता: मुस्लिम कायद्यान्वये ज्या व्यक्तीने आत्महत्त्या करण्यासाठी विष प्राशन केले असेल किंवा स्वत:ला जखमी करुन घेतले असेल अशा व्यक्तीला वसियतनामा करण्याचा अधिकार नसतो.


8 अमान्‍य तत्‍व: मुस्लिम कायद्याला अविभक्त कुटुंब, मयत व्यक्तीच्‍या मागे जीवंत असणारे, , जन्मसिध्द हक्‍क, ज्येष्ठ मुलाचा हक्क अशी तत्वे मान्य नाहीत. एखाद्या व्यक्तीचा मुलगा, त्या व्यक्तीच्या जिवंतपणी मयत झाला तर मयताच्या मुलाला मालमत्तेत कोणताही हक्क नसतो.

पवित्र कुराणात, सर्व रक्त संबंधी, लग्नामुळे झालेले संबंधी हे जवळचे वारस (शेअरर) मानले जातात. मुस्लिम कायद्यान्वये पवित्र कुराणात ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वारसांना हिस्सा मिळतो.

मुस्लिम सुन्नी हनफी कायद्यानुसार मुस्लिम व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला मयत व्यक्तीच्या मालमत्तेतील १/८ ठराविक हिस्सा मिळतो. मयत मुस्लिम व्यक्तीस दोन पत्नी असतील तर प्रत्येक पत्नीला १/६ हिस्सा मिळतो. मयताला मुले असतील तर मुलाला दोन हिस्से आणि मुलीला एक हिस्सा मिळतो.

Mahsul Guru Youtube Channel
डॉ. संजय कुंडेटकर,
उपजिल्हाधिकारी

Comments

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel