आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

मामलतदार न्‍यायालयाचे अधिकार

 

मामलतदार न्‍यायालयाचे अधिकार

 कलम :                       

(१) प्रत्‍येक मामलतदार हा मामलतदार न्‍यायालयाचा अध्‍यक्ष असेल ज्‍याला मामलतदारांचे न्‍यायालय म्‍हणता येईल. आणि त्‍याला त्‍याच्‍या अधिकार क्षेत्रासाठी या अधिनियमाच्‍या कलम ६ आणि २६ चे आणि राज्‍यशासन वेळोवेळी प्रदान करेल असे अधिकार असतील जसे -

() शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या, पिके किंवा झाडे असलेल्या कोणत्याही जमिनीतून किंवा तीस संलग्न असलेल्या जमिनीत/जमिनीतून किंवा वाहत्या कालव्याच्या प्रवाहात किंवा ज्यातून पाणी स्वाभाविकपणे वाहत असेल अशा कोणत्याही पृष्ठभागावर, अवैधरित्या कोणीही अडथळा निर्माण केला असेल व अशा अडथळ्यामुळे शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या/पिके किंवा झाडे असलेल्या जमिनीस किंवा वाहत्या कालव्याच्या प्रवाहाला किंवा ज्यातून पाणी स्वाभाविकपणे वाहत असेल अशा कोणत्याही पृष्ठभागाला धोका पोहोचण्याचा संभव असेल तर असा अवैध अडथळा काढून टाण्‍याचे  अधिकार.

E या कलमान्वये कारवाई करतांना रस्ता पूर्वापार वहिवाटीचा व वापरामध्ये असावा तसेच त्या रस्त्यात अडथळा निर्माण केला गेला असावा. नवीन रस्ता देणे या कायद्यात अपेक्षीत नाही.

() ज्‍या व्‍यक्‍तींना कायदेशीर मार्गाखेरीज अन्‍य तर्‍हेने त्‍यांच्‍या शेती, कुरणे, झाडे, पिके, मासेमारीची जागा, घर, विहीर, तलाव, पाट, पाण्‍याचा प्रवाह यांचा कब्‍जा काढून घेतला असेल किंवा त्‍यांचे याबाबतचे कायदेशीर हक्‍क हिरावून घेतले असतील किंवा उपरोक्त प्रमाणे अवैध अडथळा केला असेल तर वैध मालकास असा कब्जा देता येईल.

परंतु असे की, या अधिनियमाखाली दाखल केलेल्‍या एखाद्‍या प्रकरणाबाबत मामलतदारचे असे मत झाले की, एखाद्‍या प्रकरणात कोणताही अडथळा दूर करणे किंवा ताबा देणे यासाठी कायद्‍याचा सखोल अभ्‍यास करून निर्णय देणे क्रमप्राप्‍त आहे किंवा एखाद्‍या प्रकरणात दिवाणी न्‍यायलय उचित निर्णय घेण्‍यास सक्षम आहे किंवा एखादे प्रकरण या अधिनियमान्‍वये न चालवता अन्‍य कायद्‍यान्‍वये किंवा अन्‍य न्‍यायासनाकडे चालविणे उचित राहील, तर मामलतदार अशा प्रकारचे प्रकरण लेखी कारणे नमूद करून फेटाळू शकेल.    

 E या कलमाखाली कुळ किंवा कुळाचे हक्‍क  ठरविता येणार नाही. त्‍यासाठी कुळ कायद्‍याच्‍यातरतुदींप्रमाणे अर्ज करावा  लागेल.

()  याशिवाय, उपरोक्‍त तरतुदीन्‍वये, न्‍यायालयाला उपकलम (१) मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या, पिके किंवा झाडे असलेल्या कोणत्याही जमिनीतून किंवा तीस संलग्न असलेल्या जमिनीत/जमिनीतून किंवा वाहत्या कालव्याच्या प्रवाहात किंवा ज्यातून पाणी स्वाभाविकपणे वाहत असेल अशा कोणत्याही पृष्ठभागावर, अवैधरित्या कोणीही अडथळा निर्माण केला असेल किंवा अडथळा निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करीत असेल व अशा अडथळ्यामुळे शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या/पिके किंवा झाडे असलेल्या जमिनीस किंवा वाहत्या कालव्याच्या प्रवाहाला किंवा ज्यातून पाणी स्वाभाविकपणे वाहत असेल अशा कोणत्याही पृष्ठभागाला धोका पोहोचण्याचा संभव असेल तर असा अवैध अडथळा निर्माण करण्‍यापासून मनाई आदेश काढून रोखण्‍याचा अधिकार असेल.

() वरील प्रमाणे कारण घडल्‍यापासून सहा महिन्याच्या आत त्याविरूध्द दावा दाखल करण्‍यात आला नाही तर अशा मुदतीनंतर दाखल झालेला दावा या अधिनियमाखाली स्वीकारता येणार नाही.

(४) वरीलप्रमाणे ज्‍या दिनांकास असा अडथळा, निष्कासन, हानी सुरू करण्‍यात आली असेल त्‍या दिनांकापासून ही मुदत सुरू झाल्‍याचे मानण्‍यात येईल.

 E या अधिनियमाचा उद्‍देश तत्‍काळ न्‍याय प्रदान करणे हा आहे. त्‍यामुळे ज्‍याप्रकरणांत कायद्‍याचा सखोल अभ्‍यास करून निर्णय देणे क्रमप्राप्‍त आहे. किंवा अन्‍य न्‍यायासनाकडे किंवा अन्‍य कायद्‍यान्‍वये चालविणे उचित राहील अशी प्रकरणे मामलतदारला लेखी कारणे नमूद करून फेटाळता येतील.

 E ज्‍या प्रकरणात शासकीय अधिकार्‍यांचा अधिकृत सहभाग असेल अशी प्रकरणे मामलतदार न्‍यायालयाला हाताळता येणार नाहीत.

 E मामलतदार न्‍यायालयाला (१) शेतीसाठी किंवा गुरे चरण्‍यासाठी वापरात असलेल्‍या जमिनीचा (२) शेतीखाली असलेल्‍या परिसराचा (३) झाडांचा (४) मासेमारी बाबत (५) पिकांचा तात्‍काळ ताबा देता येईल.

 E मामलतदार न्‍यायालयाने पुढील बाबींची खात्री करावी:

t जमिनीचा ताबा परत मिळवून देतांना: (१) ताबा अवैधरित्‍या काढून घेतलेला असावा (२) प्रतिवादी, दावा दाखल होण्‍याच्‍या लगतपूर्व बारा वर्षाच्‍या काळात, दावा जमिनीचा पूर्वीचा मालक इत्‍यादी नसावा.

t पाण्‍याचा ताबा परत मिळवून देतांना: (१) या अधिनियमान्‍वये फक्‍त शेतीसाठी वापरण्‍यात येणार्‍या पाण्‍याचा ताबा परत मिळवून देता येईल (२) पाण्‍याचा स्‍त्रोत नैसर्गिक किंवा कृत्रीम असू शकतो.

 E मामलतदार न्‍यायालयास कोणत्याही जमिनीतून किंवा तीस संलग्न असलेल्या जमिनीत/जमिनीतून नैसर्गिक किंवा कृत्रीमरित्‍या वाहत्या पाण्‍याच्‍या प्रवाहात अवैधरित्या निर्माण केलेला अडथळा जर पिके किंवा झाडांना हानीकारक असेल तर तो दूर करता येईल.

E कोणतीही व्‍यक्‍ती  (१) जमिनीच्‍या वैध ताब्‍यास (२) नैसर्गिक किंवा कृत्रीम स्‍त्रोतातून पाण्‍याच्‍या वापरास (३) शेतजमिनीपर्यंत किंवा पाण्‍यापर्यंत जाणार्‍या रस्‍त्‍यात किंवा वहिवाटीच्‍या रस्‍त्‍यात अडथळा निर्माण केला असेल किंवा करीत असेल तर मामलतदार न्‍यायालयास मनाई हुकूम देता येईल.

 E मनाई आदेश देतांनाची दक्षता: मनाई आदेश हा अत्‍यंत सावधगिरीने दिला गेला पाहिजे. नुकसान होण्‍याची शक्‍यता, नुकसानाचे प्रमाण, त्‍याचे परिणाम लक्षात घेऊनच मनाई आदेश दिला गेला पाहिजे. एकतर्फी मनाई आदेश देणे टाळले पाहिजे, तातडीच्‍या वेळेस, विरोधी पक्षकाराच्‍या अनुपस्‍थितीत एकतर्फी मनाई आदेश देणे अनिवार्य असल्‍यास, अशा एकतर्फी मनाई आदेशाची प्रत अनुपस्‍थितीत पक्षकाराला प्राप्‍त होण्‍यास जो कालावधी आवश्‍यक असेल तितक्‍याच कालावधीसाठी एकतर्फी मनाई आदेश देण्‍यात यावा. नंतर दोन्‍ही पक्षकारांच्‍या उपस्‍थितीत त्‍याबाबत योग्‍य तो निर्णय घेण्‍यात यावा. मनाई आदेश शक्‍यतो तात्‍पुरता असावा. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन त्‍यात योग्‍य तो बदल करावा.

 E मामलतदार न्‍यायालय अधिनियम फक्‍त शेतीसाठी लागू आहे त्‍यामुळे शेतीकडे, शेतीसाठी असणार्‍या पाण्‍याकडे जाणारे रस्‍ते, परंपरागत वहिवाटीचे रस्‍ते, सामाईक गुरचरण कुरणाकडे जाणारे रस्‍ते त्‍यादींमध्‍ये अवैध अडथळा किंवा प्रतिबंध केला असल्‍यास मामलतदाराला मनाई आदेश देता येईल.

 E मनाई आदेश हा व्‍यक्‍ती विरूध्‍द देता येतो, जमिनीविरूध्‍द नाही हे लक्षात घ्‍यावे. वैध उपभोग घेण्‍यापासून वंचित केले असता मामलतदारला मनाई आदेश देण्‍याचा अधिकार आहे. मामलतदार न्‍यायालय अधिनियमान्‍वये मामलतदारला अंतरिम किंवा तात्‍पुरता मनाई आदेश (Interim injunction) देण्‍याचा अधिकार नाही. [जामदार सुलेमान बच्‍जुमिया वि. महाविर मथरदीन- IV गुजरात, एल.आर १३१ (१९६३)]

 E एखाद्‍या व्‍यक्‍तीने उपरोक्‍त वैध मार्गात अडथळा करण्‍याचा प्रयत्‍न (attempt) केला तरी त्‍याला अधिनियमान्‍वये तसे न करण्‍याबाबत मनाई करता येईल मग कृती (act) पूर्ण झालेली नसली तरी चालेल.

कृती (act) म्‍हणजे काय?  कोणतीही कृती घडण्‍यास तीन गोष्‍टी कारणीभूत ठरतात. (१) उद्‍देश/हेतू (intention), (२) तयारी (preparation), (३) प्रयत्‍न (attempt). त्‍यामुळे अशा अवैध कामासाठी केलेले प्रयत्‍न (attempt) भविष्‍यात घडणार्‍या कृतींच्‍या धोक्‍यांची सूचना (alarm) देतात.

 कलम ७: दावापत्रातील मजकूर

या अधिनियमान्‍वये दाखल करण्‍यात येणारे अर्ज दावा (plaint) म्‍हणून, दाव्‍याच्‍या स्‍वरूपात दाखल करण्‍यात येतील. दावा म्‍हणजे कृती/घटना घडल्‍याच्‍या कारणाचे (cause of action) लिखित स्‍वरूपात असलेले निवेदन.

प्रत्‍येक दाव्‍यात खालील मजकूर असणे आवश्‍यक असेल:

(अ) वादीचे संपूर्ण नाव, वय, धर्म, जात, व्यवसाय व रहिवासाचा पत्ता.

(ब) प्रतिवादीचे संपूर्ण नाव, वय, धर्म, जात, व्यवसाय व रहिवासाचा पत्ता.

(क) उभारलेल्या अडथळ्याचे स्वरूप, ठिकाण व जी निषेध आज्ञा/कब्जा हवा त्याचे स्वरूप.

(ड) दाव्याचे कारण उद्भवल्याची तारीख.

(इ) दाव्याचे कारण उद्भवण्यास कारणीभूत परिस्थिती.

(फ) दाव्यास उपयुक्त कागदपत्रे, पुरावे, साक्षीदारांची संपूर्ण माहिती.

(माहिती अपूर्ण आहे या सबबीखाली मामलतदारला दावा फेटाळता येणार नाही.)

 P 'वादी' (plaintiff) म्‍हणजे जी व्‍यक्‍ती दुसर्‍या व्‍यक्‍तीच्‍या विरोधात, [ज्‍याला प्रतिवादी किंवा जाब देणार (defendant) असे म्‍हणण्‍यात येते] कायदेशीर कारवाईला सुरूवात करतो. एकापेक्षा जास्‍त वादी असू शकतात.

या अधिनियमान्‍वये वादी म्‍हणजे जी व्‍यक्‍ती सर्वसाधारणपणे खालील गोष्‍टी खर्‍या आहेत असे प्रतिज्ञेवर सांगते की,

(अ) त्‍याच्‍या जमिनीतून निसर्गत: वाहणारा पाण्‍याच्‍या प्रवाहास अडथळा (impeded) करण्‍यात आला आहे जे जमिनीच्‍या नुकसानाला (damage) कारणीभूत ठरू शकेल. अडथळा करणे म्‍हणजे वाहते पाणी मुक्‍तपणे पुढे जाण्‍यास अडचण होईल असे कृत्‍य करणे. अशा कृत्‍यामुळे पाण्‍याचा प्रवाह किंवा पाण्‍याचे वाहणे बंदच झाले पाहिजे असे नाही. अडवणे (obstruct) म्‍हणजे पाण्‍याच्‍या प्रवाहास प्रतिबंध करणे, प्रवाह बंद करणे.

(ब) त्‍याला अवैधपणे कोणत्‍याही मिळकतीतून हुसकावून (dispossess) लावण्‍यात आले आहे किंवा मिळकतीचा उपभोग घेण्‍यापासून वंचित (deprived) ठेवण्‍यात आले आहे.

(क) त्‍याला मिळकतीचा ताबा (possession) घेण्‍याचा किंवा जमीन वापरण्‍याचा (use) कायदेशीर हक्‍क (entitled) आहे.

 कलम ८: विनंती अर्ज दावापत्र म्‍हणून समजणे

या जर एखादा विनंती अर्ज दाव्‍याच्‍या स्‍वरूपात नसून साध्‍या अर्जाच्‍या स्‍वरूपात मामलतदारला सादर केला गेला असेल आणि वादविषय या अधिनियमाच्‍या कलम ५ च्‍या कक्षेत येतो असे मामलतदारला दिसून आल्‍यास तो अशा अर्जदाराला या अधिनियमाच्‍या तरतुदी आणि स्‍वरूप समजावून सांगेल आणि अर्जदाराची तशी ईच्‍छा असल्‍यास, त्‍या अर्जावर तसा शेरा लिहून, तो अर्ज या अधिनियमाच्‍या कलम ७ अन्‍वये सादर केला गेला आहे असे समजण्‍यात येईल.   

 P दावापत्र मामलतदार यांना खुल्‍या न्‍यायालयातच (open court), वादी किंवा त्‍याच्‍या कायदेशीर प्रतिनिधीमार्फत समक्ष सादर केले गेले पाहिजे. दावापत्र मामलतदारच्‍या बंद खोलीत (chamber), घरात दिले, टेबलावर ठेवले, पोस्टाने पाठवले, लिपीकाला दिले तर ते अयोग्यप्रकारे सादर केले असे मानले जाईल. कारण या जागा म्‍हणजे खुले न्‍यायालय (open court) नाही. (आय.एल.आर. ९, मुंबई-एच.सी.आर.- २५४)  

 P सत्‍यापन किंवा इतर पूर्तता केली नाही म्‍हणून वादपत्र नाकारता येणार नाही. वादपत्रातील उणिवा, सुनावणीची संधी देऊन दुरूस्‍त करून घेणे ही मामलतदारची जबाबदारी आहे.  

 कलम ९: वादीची शपथेवर तपासणी

या अधिनियमातील कलम ७ अन्‍वये नमूद केलेला मजकूर जर दावा पत्रात नसेल तर किंवा दावा पत्र अनावश्‍यक रित्‍या लांबलचक असेल तर, वरीलप्रमाणे दावापत्र तहसिलदार यांना समक्ष सादर केल्‍यानंतर मामलतदार  वादीची शपथेवर तपासणी करेल आणि या अधिनियमातील कलम ७ अन्‍वये नमूद केलेला मजकूर, स्‍वतंत्र जोडपत्रावर (annexure) लिहून घेईल. सदर जोडपत्र दावा पत्राचा भाग बनेल. वादीला काही माहिती किंवा कागदपत्र जमा करण्‍यास अवधी हवा असेल तर मामलतदार आवश्‍यक तो कालावधी परिस्‍थितीनुरूप प्रदान करेल.

 शपथ म्‍हणजे देवाला साक्ष ठेऊन केलेले सत्‍य विधान. शपथेमध्‍ये पुष्‍टीकरण (affirmation) आणि घोषणा करणे (declaration) यांचा समावेश होतो. शपथ घेण्‍याबाबत कोणाची हरकत असल्‍यास तो दावा पत्राचे पुष्‍टीकरण करून तसे घोषित करू शकतो. पुष्‍टीकरण ही शपथ न घेता गंभीरतेने (solemnly) केलेली घोषणा असते.

दावापत्रामधील दोष, मामलतदारने वादीची तपासणी करतांना दुरूस्‍त करून घ्‍यावे.

 कलम १०: दावापत्राचे पुष्टीकरण आणि सत्यापन

दावापत्र खुल्‍या न्‍यायालयात सादर केले गेले, उपरोक्‍त कलम ९ अन्‍वये पुर्तता करण्‍यात आली त्‍यानंतर वादीने, मामलतदार समक्ष दावापत्रावर शेवटी समक्ष स्वाक्षरी करून खालीलप्रमाणे पुष्टीकरण आणि सत्यापन करणे आवश्‍यक आहे. पुष्टीकरण आणि सत्यापनाशिवाय दावा स्वीकारला जाणार नाही.

  (खोटे सत्यापन सादर करणे हा भा.दं.वि. कलम १९३ अन्वये शिक्षेस पात्र अपराध आहे.)  

वादी अज्ञान असल्‍यास, त्‍याचा नैसर्गिक पालक/आई स्‍वाक्षरी करू शकते. वादीने स्‍वत: स्‍वाक्षरी करणे अपेक्षीत आहे

 कलम ११: दावापत्रावर शेरा नोंदवणे

(१) मामलतदारने वरील प्रमाणे सर्व पूर्तता करून घेतल्‍यानंतर दावापत्रावर तसा शेरा नोंदवावा.

(२) वादी लिहू शकत नसेल तेव्‍हा दावापत्राशी संबंधित सत्‍यापन त्‍याच्‍यावतीने अन्‍य व्‍यक्‍तीकडून खुल्‍या न्‍यायालयात लिहून घ्‍यावे आणि सत्‍यापनाच्‍या अधिकृततेचे निदर्शक म्‍हणून वादीचा डाव्‍या हाताचा अंगठा उमटवावा आणि मामलतदारने समक्ष म्‍हणून स्‍वाक्षरी करावी.

  कलम १२: दावापत्र नाकारणे

दावापत्राची तपासणी केल्यानंतर जर मामलतदारच्‍या निदर्शनास आले की –

(अ) दावापत्रावर कलम ९ अन्‍वये करण्‍यात येणारे पुष्टीकरण आणि सत्यापन करण्‍यास वादीने नकार दिला आहे. किंवा

(ब) वादी कलम ९ अन्‍वये करण्‍यात येणारे पुष्टीकरण आणि सत्यापन करण्‍यास तयार नाही किंवा त्‍याने तसे केले आहे परंतु कलम ७ अन्‍वये दाव्‍यासाठी आवश्‍यक माहिती, त्‍याने मुदत देऊनही मुदतीत सादर केलेली नाही. किंवा

(क) दावापत्राची छाननी केली असता –

(१) दावा मिळकत किंवा दाव्‍याचे स्‍वरूप कलम ५ मध्‍ये नमूद केल्‍यानूसार नाही किंवा,

(२) दाव्‍याचे कारण घडून सहा महिन्‍यांपेक्षा जास्‍त कालावधी झालेला आहे.

(ड) कलम १० आणि ११ अन्‍वये नमूद केल्‍यानूसार पुष्टीकरण आणि सत्यापन करण्‍यास किंवा सही/अंगठा करण्‍यास वादी नकार देत आहे तर –

दावापत्रावर तसा शेरा नोंदवून मामलतदार दावापत्र नाकारू शकतील.

दाव्‍यावर किंवा प्रतिवादीवर गंभीर परिणाम न करणारे हस्‍तदोष किंवा चुका मामलतदार, खुल्‍या न्‍यायालयात दुरूस्‍त करून घेऊ शकतील. हस्‍तदोष किंवा चुकांच्‍या कारणांवरुन दावा फेटाळला जाणार नाही.

 कलम १४: दावापत्र स्‍वीकारल्‍यानंतरची कार्यवाही

(१) दावापत्र दाखल करून घेण्‍यायोग्‍य असल्‍यास मामलतदार ते स्वीकारेल, त्‍यानंतर तात्काळ त्‍याबाबत सुनावणीची तारीख आणि उभय पक्षकारांच्या सोयीची जागा ठरवून, अनुसूची अ मध्‍ये प्रतिवादीला नोटीस काढेल. आणि अशा नेमलेल्‍या दिनांकास आणि ठिकाणी, वादीला दाव्‍याशी संबंधित इतर कागदपत्रांसह (काही असल्‍यास) आणि साक्षीदारांसह उपस्‍थीत राहण्‍याची सूचना करेल.

(२) सुनावणीचा दिनांक, नोटीस दिल्यानंतरच्या दिवसापासून दहा दिवसाच्‍या आतील आणि पंधरा दिवसानंतरचा नसावा. अपरिहार्य कारणास्‍तव या कालावधीत बदल करायचा असेल तर त्‍याची लेखी कारणे मामलतदारने नमूद करावीत.

(३) सुनावणीचे ठिकाण, मामलतदारचे कार्यालय किंवा दावा मिळकती जवळचे किंवा उभय पक्षकारांच्या सोयीने मामलतदारने ठरविलेले असावे.

 सुनावणीच्‍या आधी उभय पक्षकारांना नोटीस मिळाली आहे, सुनावणीची जागा उभय पक्षकारांच्‍या सोयीची आहे याची खात्री मामलतदारने करावी.

जिल्‍हाधिकारी यांनी सुध्‍दा, या अधिनियमान्‍वये मामलतदारच्‍या आदेशाची फेरतपासणी करतांना, सुनावणीची जागा उभय पक्षकारांच्‍या सोयीची आहे याची खात्री करावी.

 कलम १९: सुनावणीच्या वेळी तपासावयाचे मुद्‍दे

(१) सुनावणीच्‍या किंवा ज्‍या दिवसापर्यंत कामकाज तहकूब करण्‍यात आले होते त्‍या दिवशी, कलम १६ च्‍या आधिन राहून मामलतदारने दाव्‍यातील किंवा सादर केलेल्या पुराव्यातील प्रत्येक मुद्द्याची स्वत: चौकशी करावी. म्‍हणजे -

(अअ) वादीचे म्‍हणणे असेल की, प्रतिवादीने उभारलेल्‍या कोणत्‍याही अडथळ्‍यामुळे, त्‍याच्‍या जमिनीतून वाहणारा पाण्‍याचा प्रवाह अडविला गेला आहे ज्‍यामुळे वादीच्‍या जमिनीस किंवा जमिनीवरील गुरचरण जागेस, झाडांस, पिकांस नुकसान पोहोचले आहे किंवा नुकसान पोहोचण्‍याचा संभव आहे तर मामलतदारने खात्री करावी की,

(१) वादीच्‍या जमिनीच्‍या पृष्‍ठभागावरून वाहणारे पाणी, नैसर्गिकरित्‍या वादीच्‍या जमिनीतून प्रतिवादीच्‍या जमिनीकडे वाहत होते किंवा कसे?

(२) अशा प्रवाहात प्रतिवादीने अवैधरित्‍या कोणताही अडथळा उभारला आहे किंवा कसे?

(३) अशा नैसर्गिक प्रवाहात उभारलेला अडथळा, दावा दाखल करण्‍यापूर्वी सहा महिन्‍यांच्‍या आत उभारला आहे किंवा कसे?

(४) अशा अडथळ्‍यामुळे वादीच्‍या जमिनीस किंवा जमिनीवरील गुरचरण जागेस, झाडांस, पिकांस नुकसान पोहोचले आहे किंवा नुकसान पोहोचण्‍याचा संभव आहे किंवा कसे?

 (अ) वादीचे म्‍हणणे असेल की, प्रतिवादीने कोणत्‍याही मालमत्तेवरील त्‍याचा कब्‍जा किंवा उपयोग अवैधपणे  हिरावून घेतला आहे तर मामलतदारने खात्री करावी की,

(१) सदर मालमत्तेचा कब्‍जा किंवा उपयोग वादीकडे किंवा वादीच्‍यावतीने अन्‍य व्‍यक्‍तीकडे, दावा दाखल करण्‍यापूर्वी सहा महिन्‍यांच्‍या आत कोणत्‍याही वेळी होता किंवा कसे?

(२) दावा दाखल करण्‍याच्‍यावेळी प्रतिवादीकडे सदर मिळकतीचा कब्‍जा आहे किंवा कसे? आणि असेल तर असा कब्‍जा प्रतिवादीने वैधरित्‍या मिळविला आहे किंवा कसे?

 (ब) वादीचे म्‍हणणे असेल की, कोणत्‍याही मालमत्तेचा कब्‍जा किंवा उपयोग परत मिळण्‍यास तो पात्र आहे आणि प्रतिवादीचा सदर मिळकतीवरील कोणताही हक्‍क संपल्‍यामुळे त्‍या मालमत्तेचा कब्‍जा किंवा उपयोग परत मिळण्‍यास तो पात्र आहे तर मामलतदारने खात्री करावी की,

(१) प्रतिवादीकडे त्‍या मालमत्तेचा कब्‍जा किंवा उपयोगाचा अधिकार वादीकडून किंवा त्‍याने ज्‍याच्‍या मार्फत दावा दाखल केला आहे त्‍याच्‍याकडून प्राप्‍त झाला आहे किंवा कसे?

(२) दावा दाखल करण्‍यापूर्वी सहा महिन्‍यांच्‍या आत, कोणत्‍याही वेळी असा अधिकार संपला आहे किंवा कसे?

(३) प्रतिवादी हा दावा दाखल होण्‍याच्‍या लगतपूर्व बारा वर्षाच्‍या काळात, दावा जमिनीचा पूर्वीचा मालक किंवा अंशत: मालक किंवा मालकाचा किंवा अंशत: मालकाचा वैध प्रतिनिधी आहे किंवा कसे?

 (क) वादीचे म्‍हणणे असेल की, त्‍या मालमत्तेचा कब्‍जा किंवा उपयोगाचा अधिकार अद्‍याप वादीकडेच आहे परंतु प्रतिवादी त्‍याच्‍या या कब्‍ज्‍याला किंवा उपयोगाला हरकत करत आहे किंवा अडथळा आणण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे तर मामलतदारने खात्री करावी की,

(१) दाव्‍यातील मालमत्तेचा कब्‍जा  किंवा उपयोगाचा अधिकार वादीच्‍या किंवा वादीच्‍या वतीने कोणत्‍याही व्‍यक्‍तीच्‍या प्रत्‍यक्ष कब्‍ज्‍यात किंवा उपयोगात आहे किंवा कसे?

(२) प्रतिवादी, वादीच्‍या कब्‍ज्‍याला किंवा उपयोगाला हरकत करत अणत आहे किंवा अडथळा आणण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे किंवा कसे?

(३) अशा हरकतीची किंवा अडथळ्‍याची सुरूवात दावा दाखल करण्‍यापूर्वी सहा महिन्‍यांच्‍या आत झाली होती किंवा कसे?

 

(२) न्‍यायदानाच्‍या कामात मदत व्‍हावी म्‍हणून, मामलतदारास योग्‍य आणि आवश्‍यक असेल अशा कोणत्‍याही व्‍यक्‍तीला, योग्‍य ती नोटीस किंवा आज्ञापत्र काढून बोलविण्‍याचा, त्‍यांची तपासणी करण्‍याचा, कोणताही दस्‍तएवज हजर करण्‍यास सांगण्‍याचा किंवा तसे करण्‍यासष भाग पाडण्‍याचा, मालमत्तेला किंवा वाद जागेला भेट देण्‍याचा, पाहणी करण्‍याचा अधिकार असेल. अशी पाहणी केल्‍यानंतर मामलतदारने संबंधित मुद्‍द्‍यांचे टाचण, पक्षकारांना त्‍यांचे म्‍हणणे मांडण्‍याची संधी दिल्‍यानंतर करावे. असे टाचण दाव्‍यातील कागदपत्रांचा एक भाग समजले जाईल.

(३) साक्षीदारांच्‍या तपासणीचे काम चालू असतांना मामलतदार, अशा साक्षीबाबतचे संक्षीप्‍त टाचण स्‍वहस्‍ताक्षरात लिहून काढेल. त्‍याबाबतचे निष्‍कर्ष नोंदवून त्‍यावर स्‍वाक्षरी करेल.

 (४) वादाबाबत मामलतदाराचा निर्णय वादीच्‍या बाजूने असेल तर, मामलतदार कलम ५ अन्‍वये त्‍याच्‍याकडे असलेल्‍या अधिकाराचा वापर करून आणि अधिकारमर्यादेत राहून त्‍याला योग्‍य वाटेल तसा आदेश पारित करेल. आणि जर मामलतदाराचा निर्णय प्रतिवादीच्‍या बाजूने असेल तर तो दावा काढून टाकेल. वरीलपैकी कोणत्‍याही बाबतीत बजावणीचा खर्च, ज्‍याच्‍याविरूध्‍द निर्णय होईल त्‍याने दिला पाहिजे.

.या अधिनियमाखालील प्रकरणे तातडीने निकाली काढणे अपेक्षीत असले तरी कोणत्‍याही प्रकरणाचा निर्णय देण्‍यापूर्वी मामलतदारने पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून घेणे त्‍यावर बंधनकारक आहे. तो पक्षकारांचा हक्‍क आहे [मोतीलाल वि. पानाजी, पुनरीक्षण अपील, २८५ (१९६०)]

 कलम २१: मामलतदारच्‍या आदेशाची अंमलबजावणी

(१) जेव्‍हा मामलतदारचा आदेश अडथळा काढून टाकण्‍याबाबत (removal of an impediment) किंवा कब्‍जा देण्‍याबाबत (awarding possession) किंवा उपयोग चालू करण्‍याबाबत (restoring a use) असेल तेव्‍हा त्‍याला तो निर्णय ग्राम अधिकार्‍यास किंवा त्‍याच्‍या अधिनस्‍त असलेल्‍या कोणत्‍याही दुय्‍यम अधिकार्‍यास आदेश देऊन किंवा त्‍याला योग्‍य वाटेल त्‍या पध्‍दतीने अंमलात आणता येईल.

परंतु, या अधिनियमात काहीही नमुद असले तरी, वरील प्रमाणे आदेश देतांना दावा जमिनीत प्रतिवादीने स्‍वखर्चाने पेरलेले पीक असेल तर आणि असे पीक चांगल्‍या हेतुने पेरलेले असल्‍याची  मामलतदारची खात्री झाल्‍यास किंवा प्रतिवादीने दाव्‍याच्‍या खर्चाबाबत योग्‍य त्‍या तारणासह (security) किंवा रक्‍कमेसह विनंती अर्ज दिल्‍यास,

(अ) त्‍या पिकाची अशा वेळेस, शासकीय आकारणी सह जी किंमत असेलती वादी प्रतिवादीस देण्‍याचे कबूल करे पर्यंत, किंवा

(ब) वादी उपरोक्‍त रक्‍कम देण्‍यास तयार नसेल तर, प्रतिवादी असे पीक काढून घेईपर्यंत मामलतदार स्‍वत:चा वरील प्रमाणे दिलेला आदेश स्‍थगित ठेवील.

उपरोक्‍त (अ) अन्‍वये ठरलेली रक्‍कम जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूल करता येईल.

(२) मामलतदारने मनाई आदेश (injunction) देण्‍याचा निर्णय घेतला असेल तेव्‍हा तो असा मनाई आदेश अनुसूची बब किंवा अनुसूची मध्‍ये तयार करेल आणि प्रतिवादी हजर असल्‍यास त्‍याला त्‍याच वेळेस बजावेल आणि प्रतिवादी हजर नसल्‍यास ग्राम अधिकार्‍यामार्फत किंवा त्‍याच्‍या अधिनस्‍त असलेल्‍या कोणत्‍याही दुय्‍यम अधिकार्‍यामार्फत किंवा त्‍याला योग्‍य वाटेल त्‍या पध्‍दतीने बजावता येईल.

 E मामलतदार न्‍यायालय अधिनियमान्‍वये तहसिलदारला अंतरिम किंवा तात्‍पुरता मनाई आदेश (Interim injunction) देण्‍याचा अधिकार नाही. मामलतदार न्यायालय अधिनियम हा विशेष कायदा (Special Act) असल्‍यामुळे तो सामान्‍य कायद्‍यांपेक्षा (General Act) प्रभावी आहे. कलम १४ (२) अन्‍वये या कायद्‍याखाली दाखल प्रकरणातील सुनावणीचा दिनांक, नोटीस दिल्यानंतरच्या दिवसापासून दहा दिवसाच्‍या आतील आणि पंधरा दिवसानंतरचा नसावा असे नमुद आहे. बाधित शेतकर्‍यास तातडीने न्‍याय मिळवून देणे या कायद्‍यान्‍वये अभिप्रेत आहे. त्‍यामुळे या कायद्‍याखाली अंतरिम किंवा तात्‍पुरता मनाई आदेश देता येत नाही. (मा. न्‍यायाधिश श्री. एन. डी. कामत-सी.आर.ए.नं. ३७३/७२, ६.१२.१९७२)

 (३) जेव्‍हा मामलतदारने खर्च देण्‍याचा निर्णय घेतला असेल तेव्‍हा अशा खर्चाची रक्‍कम, ज्‍याला असा आदेश दिला असेल अशा पक्षकाराकडून जमीन महसूलाची थकबाकी म्‍हणून वसूल करता येईल.

 (४) मामलतदारने उपकलम (२) अन्‍वये दिलेल्‍या मनाई आदेशाची अवज्ञा, भा.दं.विधान कलम १८८ अन्‍वये शिक्षेस पात्र असेल.

 E मामलतदारने त्‍याच्‍या आदेशांची अंमलबजावणी ताबडतोब करणे आवश्‍यक आहे. आदेशाच्‍या अंमलबजावणीस विलंब झाल्‍यास संबंधित पक्षकारांच्‍या हितसंबंधाना बाधा पोहोचते. (भगवानलाल वि. छबीलभाई, पी.जे.१८९६, पी. ६००)

 E मामलतदारला योग्‍य वाटल्‍यास आणि आवश्‍यक असेल तर पोलीस अधिकाल्‍याला आदेश देऊन त्‍याच्‍या मार्फतही आदेशाची अंमलबजावणी करून घेता येईल.

 E या अधिनियमात 'डीक्री' (decree) हा शब्‍द कुठेही वापरण्‍यात आला नाही 'निर्णय' (decision) या शब्‍दाचाच वापर करण्‍यात आला आहे हे लक्षात घ्‍यावे.

 E मामलतदारने या अधिनियमान्‍वये दिलेल्‍या ताब्‍याच्‍या आदेशाची अंमलबजावणी करतांना, घराचे दार बंद करून प्रतिकार केला असता, आवश्‍यक असल्‍यास घराचे दार फोडून ताबा देण्‍यात काहीही चूक नाही. (बाजी देव वि. सदाशिव भाई शंकर, ५-बॉम्‍बे, उच्‍च न्‍यायालय , आर. १५८)

 E मामलतदारने या अधिनियमान्‍वये दिलेल्‍या अडथळा काढण्‍याच्‍या आदेशाची अंमलबजावणी करतांना प्रतिकार केला असता, ग्राम अधिकार्‍याने योग्‍य त्‍या बळाचा वापर केला तर ते चूक नाही. (शंकर रामलाल वि. मार्तंड भाऊ, १४-बॉम्‍बे, उच्‍च न्‍यायालय , १५७)

E मामलतदारने या अधिनियमान्‍वये दिलेल्‍या ताब्‍याच्‍या आदेशाची अंमलबजावणी करतांना, ग्राम अधिकार्‍याने किंवा मामलतदारच्‍या अधिनस्‍त असलेल्‍या कोणत्‍याही दुय्‍यम अधिकार्‍याने किंवा अन्‍य व्‍यक्‍तीने, समक्ष जागेवर जाऊन प्रत्‍यक्षात (actual) ताबा द्‍यावा. ताबा प्रतिकात्‍मक (symbolic) नसावा.

==

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel