मृत्युपत्राची वैधता सिद्ध करणारी ११ आवश्यक तत्त्वे - मा. सर्वोच्च न्यायालय
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात
दिवाणी अपील अधिकार क्षेत्र
सिव्हिल अपील क्र. ३३५१/२०१४
(SLP(C) क्र. १७११५/२०१० मधून उद्भवणारे)
मीना प्रधान आणि इतर ...अपीलार्थी
विरुद्ध
कमला प्रधान आणि इतर …प्रतिवादी
मा. न्यायमूर्ती श्री. अभय एस. ओक - मा. न्यायमूर्ती श्री. संजय करोल
निकाल दिनांक: २१ सप्टेंबर २०२३
वरील निकालपत्रात मा. न्यायमुर्तींनी,
मृत्युपत्राची वैधता सिद्ध करणारी ११ आवश्यक तत्त्वे ठरवून देतांना खालीलप्रमाणे उहापोह
केला आहे.
‘‘खटल्यातील वस्तुस्थिती जाणून
घेण्यापूर्वी, मृत्युपत्राच्या वैधतेशी संबंधित तरतुदी
समजून घेणे आवश्यक आहे.
भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५, कलम ६३: विनाविशेषाधिकार
(unprivileged) मृत्युपत्राच्या निष्पादनाविषयी:
लष्करी मोहिमेवर गेलेला किंवा प्रत्यक्ष युद्धात गुंतलेला (in actual warfare) भूसैनिक किंवा
वायु सैनिक अथवा सागरावरील नाविक (mariner at sea) यांच्या व्यतिरिक्त अन्य प्रत्येक मृत्युपत्रकर्ता,
आपल्या मृत्युपत्राचे निष्पादन पुढील नियमांनुसार करील :-
(अ) मृत्युपत्रकर्ता मृत्युपत्रावर स्वाक्षरी करील किंवा आपली निशाणी
लावील अथवा ते त्याच्या समक्ष व त्याच्या निर्देशावरून
अन्य एखाद्या व्यक्तीकडून स्वाक्षरीत केले
जाईल.
(ब) मृत्युपत्रकर्त्याची स्वाक्षरी किंवा निशाणी अथवा त्याच्याकरिता
स्वाक्षरी करणाच्या व्यक्तीची स्वाक्षरी अशा जागी केली जाईल की, त्या लेखास
मृत्युपत्र म्हणून परिणामक करण्याचा त्यामागे उद्देश होता असे दिसून येईल.
(क) ज्यांच्यापैकी प्रत्येकाने मृत्युपत्रकर्त्याला मृत्युपत्रावर
स्वाक्षरी करताना किंवा आपली निशाणी लावताना पाहिले असेल अथवा कोणत्याही व्यक्तीस
मृत्युपत्रकर्त्याच्या समक्ष व त्याच्या निर्देशावरून
त्या मृत्युपत्रावर स्वाक्षरी करताना पाहिले असेल अशा दोन किंवा अधिक
साक्षीदारांकडून ते मृत्युपत्र साक्षांकित केले जाईल
आणि साक्षीदारांपैकी प्रत्येक जण मृत्युपत्रकर्त्याच्या
समक्ष मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी
करील.
तथापि, एकाहून अधिक साक्षीदारांनी एकाचवेळी उपस्थित राहण्याची जरूरी असणार
नाही आणि साक्षांकन कोणत्याही विशिष्ट नमुन्यात
असण्याची आवश्यकता असणार नाही.
भारतीय पुरावा कायदा १८७२, कलम ६८
जी कागदपत्रे साक्षीदारामार्फत साक्षांकित
करणे कायद्याने आवश्यक आहे ती न्यायालयात सिध्द करतांना, अशी कागदपत्रे साक्षांकित
केलेला एखादा साक्षीदार हयात असल्यास आणि साक्ष देण्यास सक्षम असल्यास, किमान एका साक्षीदाराला
अशा कागदपत्रांची अंमलबजावणी सिद्ध करण्याच्या उद्देशाने बोलावले जात नाही तोपर्यंत
ती कागदपत्रे पुरावा म्हणून वापरली जाणार नाहीत.
मृत्युपत्र हे मृत्युनंतर मालमत्तेचे वितरण करण्याचे एक साधन आहे. स्वत:च्या हयातीत मृत्युपत्र
करणे ही एक कायदेशीर मान्यताप्राप्त पद्धत आहे जे मृत्युनंतर अंमलात येते, त्याच्याबरोबर
एक पवित्रतेचा घटक समाविष्ट असतो. (It
carries with it an element of sanctity)
मृत्युपत्राच्या दस्तऐवजाची
वैधतेसाठी तपासणी करताना, मृत्युपत्र ज्या परिस्थितीत
अंमलात आणले गेले होते त्याबाबत साक्ष देण्यासाठी मृत्युपत्रकर्ता (testator/testatrix) उपलब्ध नसल्यामुळे, मृत्युपत्रात कोणताही अवैध
फेरबदल झालेला नाही हे पुराव्याच्या आधारे तपासण्याची वैधानिकपणे आज्ञा दिली आहे.’’
[मृत्युपत्र
करणारा पुरुष = testator; मृत्युपत्र करणारी महिला = testatrix ]
मा. सर्वोच्च न्यायालयाने, उक्त निकालपत्रात, मा. सर्वोच्च न्यायालयाने आधी
पारीत केलेल्या पाच निकालपत्रांचा संदर्भ देऊन पुढे विषद केले आहे की,
‘‘मृत्युपत्राची वैधता आणि
अंमलबजावणी (validity and execution) सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली तत्वांबाबत आम्ही खालील निष्कर्ष/ अनुमान काढू शकतो:
(i) न्यायालयाने पुढील दोन पैलूंचा विचार केला पाहिजे:
पहिले म्हणजे, मृत्युपत्र करणार्यानेच ते अंमलात आणले आहे.
(The Will is executed by the
testator)
आणि दुसरे म्हणजे, हे मृत्युपत्र त्याच्याद्वारे
अंमलात आणलेले शेवटचे मृत्युपत्र होते.
(It was the last Will executed by him)
(ii) उक्त बाब गणिताच्या अचूकतेने सिद्ध
करणे आवश्यक नाही, परंतु विवेकी मनाच्या समाधानाची कसोटी लागू करणे आवश्यक आहे. (satisfaction of the prudent mind has to be applied)
(iii) भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५, कलम ६३ अन्वये मृत्युपत्रासाठी
आवश्यक असलेल्या सर्व औपचारिकता
पूर्ण करण्यात आल्या आहेत. म्हणजे:-
(ए) मृत्युपत्र करणार्याने
मृत्युपत्रावर आपली खूण/ स्वाक्षरी केली पाहिजे किंवा
त्याच्या उपस्थितीत आणि त्याच्या निर्देशानुसार इतर एखाद्या व्यक्तीने स्वाक्षरी केली
पाहिजे.
अशी स्वाक्षरी, सदर लिखाणाला
मृत्युपत्राचे स्वरूप देण्याचा हेतू होता असे दर्शवते.
(बी) साक्षांकनाचा विशिष्ट नमुना विहित
नसला तरी दोन किंवा अधिक साक्षीदारांकडून
मृत्युपत्र साक्षांकीत
करणे अनिवार्य आहे.
(सी) मृत्युपत्रावर स्वाक्षरी
करणार्या प्रत्येक साक्षीदाराने, मृत्युपत्रकर्ताला, मृत्युपत्रावर खूण/स्वाक्षरी करतांना
पाहणे किंवा इतर एखाद्या व्यक्तीने
मृत्युपत्रकर्ताच्या निर्देशानुसार, त्याच्या उपस्थितीत
मृत्युपत्रावर सही करताना
पाहणे आवश्यक आहे.
(डी) प्रत्येक साक्षीदार, मृत्युपत्रकर्ताच्या
उपस्थितीत मृत्युपत्रावर स्वाक्षरी
करेल, तथापि, एकाच वेळी सर्व साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक नाही.
(iv) मृत्युपत्राची अंमलबजावणी सिद्ध करण्याच्या
उद्देशाने, साक्षीदारांपैकी किमान एक साक्षीदार, जो हयात आहे, न्यायालयाच्या प्रक्रियेच्या अधीन
आहे आणि साक्ष देण्यास सक्षम आहे, त्याची तपासणी केली जाईल.
(v) साक्ष देणाऱ्या साक्षीदाराने केवळ मृत्युपत्रकर्त्याच्या
स्वाक्षऱ्यांबद्दलच नाही तर प्रत्येक साक्षीदाराने मृत्युपत्रावर मृत्युपत्रकर्त्याच्या
उपस्थितीत स्वाक्षरी केली होती हे देखील सांगितले पाहिजे.
(vi) जर एक साक्षीदार मृत्युपत्राची अंमलबजावणी
सिद्ध करू शकत असेल, तर इतर साक्षीदारांची तपासणी रद्द केली जाऊ शकते.
(vii) जेथे एक साक्षीदार मृत्युपत्र सिद्ध करण्यासाठी
तपासला गेला आणि मृत्युपत्राची योग्य अंमलबजावणी सिद्ध
करण्यात अयशस्वी ठरला, तर त्याच्या पुराव्याची पूर्तता करण्यासाठी अन्य उपलब्ध साक्षीदारास
बोलावणे आवश्यक आहे.
(viii) मृत्युपत्राच्या अंमलबजावणीबद्दल जेव्हा
जेव्हा कोणतीही शंका असते तेव्हा ती शंका तसेच सर्व शंका कायदेशीरपणे दूर करणे आणि मृत्युपत्रकर्त्याने केलेले शेवटचे मृत्युपत्र म्हणून सिध्द करणे ही प्रस्तावकाची जबाबदारी असते.
(ix) ज्या प्रकरणांमध्ये मृत्युपत्राची अंमलबजावणी
संशयास्पद असते अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी न्यायिक विवेकाची चाचणी (test of judicial conscience) विकसित केली गेली आहे.
यासाठी मृत्युपत्रकर्त्याची
मृत्युपत्रातील मजकुराबद्दल
जागरूकता, त्याचे परिणाम आणि स्वरूप यासारख्या घटकांचा
विचार करणे आवश्यक असते. मृत्युपत्र लिहितांना मृत्युपत्रकर्त्याची मन:स्थिती
आणि स्मरणशक्ती आणि मृत्युपत्र करणार्याने स्वत:च्या स्वतंत्र इच्छेनुसार मृत्युपत्र अंमलात आणले आहे (on his own free Will) याचा विचार करणे आवश्यक
ठरते.
(x) मृत्युपत्राबाबत फसवणूक, बनावटगिरी, अवाजवी
प्रभाव इत्यादी आरोप करणाऱ्याने ते सिद्ध केले पाहिजेत. तथापि, असे आरोप नसतानाही शंका निर्माण झाल्यास, अशा
संशयास्पद परिस्थितीचे समंजस आणि विश्वासार्ह स्पष्टीकरण देऊन ते दूर करणे हे प्रस्तावकांचे
कर्तव्य बनते.
(xi) संशयास्पद परिस्थिती 'वास्तविक, सुसंगत आणि वैध' (‘real, germane and
valid’) असली पाहिजे आणि केवळ 'शंकेखोर मनाची कल्पनारम्यता (‘the fantasy of the doubting mind’) नसावी. एखादी बाब ‘संशयास्पद’ म्हणून पात्र ठरेल की नाही
हे प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितींवर अवलंबून असते.
कायदेशीर स्वरूपाची शंका
निर्माण करणारी कोणतीही परिस्थिती ‘संशयास्पद परिस्थिती’ म्हणून पात्र ठरते. उदाहरणार्थ, थरथरत्या हाताने
केलेली स्वाक्षरी, दुर्बल मन, मालमत्तेचे अयोग्य आणि अन्यायकारक
वितरण, प्रस्तावक स्वत:
मृत्युपत्र तयार करण्यात अग्रगण्य भाग घेतो ज्या अंतर्गत त्याला भरीव लाभ मिळतो इत्यादी.
थोडक्यात, वैधानिक अनुपालनाव्यतिरिक्त,
असे सिध्द करता आले पाहिजे की,
(अ) मृत्युपत्र करणार्याने
स्वेच्छेने मृत्युपत्रावर स्वाक्षरी केली
आहे.
(signed the Will out of his own free will)
(ब) मृत्युपत्र लिहितांना त्याची मानसिक स्थिती चांगली
होती.
(at the time of execution
he had a sound state of mind)
(क) त्याला मृत्युपत्राचे स्वरूप आणि त्याचे परिणाम याची जाणीव होती आणि
(aware of the nature and
effect thereof)
(ड) मृत्युपत्र कोणत्याही
संशयास्पद परिस्थितीत अंमलात आणले गेले नाही.
(Will was not executed under any
suspicious circumstances)
hf
. :
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मृत्युपत्राची वैधता सिद्ध करणारी ११ आवश्यक तत्त्वे - मा. सर्वोच्च न्यायालय. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link
Telegram Channel Link धन्यवाद !