आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

जमीन किंवा पाणी संबंधी वाद - फौ. प्र. सं. कलम १४५

 

जमीन किंवा पाणी संबंधी वाद - फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४५

 ¨ जमीन किंवा पाणी यासंबंधीच्‍या तंट्‍यामुळे शांतता भंग घडून येणाचा संभव असतो तेव्‍हाची प्रक्रिया.

 · फौ.प्र.सं.-कलम १४५(१): जेव्‍हा पोलीस अहवाला वरून अथवा अन्‍य खबरी वरून कार्यकारी दंडाधिकार्‍याची खात्री पटेल की, जमीन किंवा पाणी यासंबंधीच्‍या तंट्‍यामुळे शांतता भंग घडून येणाचा संभव आहे तेव्‍हा तो त्‍याबाबची कारणे नमूद करून एक लेखी समन्‍स काढून अशा वादाशी संबंधीत सर्व पक्षांना त्‍याच्‍या न्‍यायालयात निश्‍चित केलेल्‍या तारखेस व वेळेत जातीने किंवा वकीलामार्फत हजर राहण्‍यास आणि वादाविषयीच्‍या प्रत्‍यक्ष कब्‍ज्‍याबाबतच्‍या कागदोपत्री पुराव्‍यांसह हजर राहण्‍यास समन्‍सद्‍वारे फर्मावेल आणि वाद मिळकती कब्‍ज्‍याच्‍या वस्‍तुस्‍थितीबाबत लेखी निवेदन सादर करण्‍यास फर्मावेल.  

 · आवश्‍यक बाबी:

) वाद मिळकत संबंधित कार्यकारी दंडाधिकार्‍याच्‍या अधिकार क्षेत्रातील असावी.

) वाद हा जमिनीशी, पाण्‍याशी अथवा हद्‍दीशी संबंधित आणि अस्‍तित्‍वात असावा.

) वादाबाबत पोलीस अहवाल किंवा मिळालेल्‍या अन्‍य खबरीवरून कार्यकारी दंडाधिकार्‍याची वाद असल्‍याची खात्री झाली पाहिजे.

 · फौ.प्र.सं.-कलम १४५(२):जमीन आणि पाणीया शब्‍दप्रयोगात इमारती, बाजार मत्‍स्‍य क्षेत्रे, पिके किंवा जमीनीतील अन्‍य उत्‍पादन आणि अशा कोणत्‍याही मालमत्तेचे भाडे उत्‍पन्‍न किंवा फायदे यांचा समावेश होतो.

 · फौ.प्र.सं.-कलम १४५(३): कार्यकारी दंडाधिकारी निर्देशित करील अशा सर्व पक्षांवर विहित पध्‍दतीने समन्‍स बजावण्‍यात येईल आणि समन्‍सची एक प्रत वाद मिळकतीच्‍या ठिकाणी किंवा वाद मिळकतीच्‍या जवळपास ठळक ठिकाणी लावून प्रदर्शित केली जाईल. 

 · फौ.प्र.सं.-कलम १४५(४): सुनावणीच्‍या तारखेस कार्यकारी दंडाधिकारी दोन्‍ही पक्षांचे म्‍हणणे ऐकून घेईल, त्‍यांनी सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन, जरूर तर अधिक पुरावे मागवून, कलम १४५(१) अन्‍वयेचे समन्‍स जेव्‍हा दिले गेले होते तेव्‍हा कोणत्‍या पक्षाकडे वाद मिळकतीचा/वस्‍तुचा ताबा होता याचा निर्णय करेल.

तथापि, सदर तंट्‍याबाबत अहवाल/खबर प्राप्‍त होण्‍याच्‍या लगतपूर्वीच्‍या दोन महिन्‍यात किंवा कलम १४५(१) अन्‍वये समन्‍स बजावण्‍याआधी कोणत्‍याही पक्षाकडून वाद मिळकतीचा/वस्‍तुचा कब्‍जा बळाने अथवा गैरवाजवीपणे काढून घेण्‍यात आला आहे असे कार्यकारी दंडाधिकार्‍यास दिसून आल्‍यास, ज्‍याच्‍याकडून असा कब्‍जा काढून घेण्‍यात आला आहे त्‍याच्‍याकडेच कब्‍जा आहे असे गृहित धरण्‍यात येईल.

 · फौ.प्र.सं.-कलम १४५(५): संबंधित वाद मिळकती/ वस्‍तुबाबत वाद नाही असे कोणत्‍याही पक्षाने दाखवून दिल्‍यास कार्यकारी दंडाधिकारी आपला आदेश रद्‍द किंवा स्‍थगित करेल.

 · फौ.प्र.सं.-कलम १४५(६): वाद मिळकतीच्‍या कब्‍ज्‍याबाबत दंडाधिकारी यांनी एकदा आदेश पारित केला असेल किंवा कब्‍जा गृहित धरला असेल तर अनधिकृत कब्‍जा असणार्‍याला रीतसर विधीक्रमानुसार वाद मिळकतीतुन निष्‍कासीत करून वैध कब्‍जा असणार्‍या हक्‍कदारास कब्‍जा परत देता येईल. जरूर तर वाद मिळकतीच्‍या वापरास अडथळा न करण्‍याचा आदेश देता येईल. असा आदेश रीतसर बजावला व प्रदर्शित केला जाईल.

 · फौ.प्र.सं.-कलम १४५(७): सदर दावा चालू असतांना एखादा पक्षकार मयत झाल्‍यास, त्‍या मयत पक्षकाराच्‍या वैध प्रतिनिधीला पक्षकार बनविण्‍यात येईल.

  · फौ.प्र.सं.-कलम १४५(८): वाद वस्‍तु जर जलद व निसर्गत: नाश पावणारी आहे असे दंडाधकार्‍याचे मत असेल तर तो अशा मालमत्तेच्‍या योग्‍य अभिरक्षेचा किंवा विक्रीचा आदेश देऊ शकेल आणि चौकशी पूर्ण झाल्‍यावर त्‍याला योग्‍य  वाटेल असा अशा मालमत्तेच्‍या किंवा तिच्‍या विक्री उत्‍पन्‍नाच्‍या विल्‍हेवाटीचा आदेश देईल.

 · फौ.प्र.सं.-कलम १४५(९): दंडाधिकारी या कलमाखालील कार्यवाहीत कोणत्‍याही टप्‍प्‍यावर, कोणत्‍याही पक्षाच्‍या अर्जावरून कोणालाही साक्षीदार म्‍हणून हजर राहण्‍यासाठी किंवा कागदपत्र हजर करण्‍यासाठी समन्‍स बजावू शकेल.

 · फौ.प्र.सं.-कलम १४५(१०): फौ.प्र.सं. कलम १४५ अन्‍वये कार्यवाही चालु असताना,  फौ.प्र.सं. कलम १०७ खाली कार्यवाही करण्‍याच्‍या अधिकाराचे न्‍यूनीकरण होत नाही. आवश्‍यकतेनुसार, कारणे नमुद करून कार्यकारी दंडाधिकार्‍याला फौ.प्र.सं. कलम १०७ अन्‍वये कारवाई करता येऊ शकेल.

 · फौ.प्र.सं.-कलम १४५ () : महाराष्ट्र राज्य सुधारणा

मूळ कलम १४५ (१) मधील "जेव्हा कार्यकारी दंडाधिकाऱ्याची" ऐवजी "बहुन्मुबईत, महानगर दंडाधिकाऱ्याची' ही वाक्य रचना करण्यात आली आहे.

¨ फौ.प्र.सं.-कलम १४६: तंट्‍याची विषय वस्‍तू जप्‍त करण्‍याचा आणि प्रपक नेमण्‍याचा अधिकार

 · फौ.प्र.सं.-कलम १४६(१): फौ.प्र.सं.-कलम १४५(१) अन्‍वये आदेश दिल्‍यानंतर कोणत्‍याहीवेळी कार्यकारी दंडाधिकार्‍याला ते प्रकरण आणिबाणीचे वाटेल, किंवा वाद मिळकतीचा ताबा/कब्‍जा कोणत्‍याही पक्षाकडे नव्‍हता असा निर्णय कार्यकारी दंडाधिकार्‍याने दिला असेल तर, सक्षम न्‍यायालयाने वाद मिळकतीची मालकी सिध्‍द करेपर्यंत कार्यकारी दंडाधिकार्‍याला वाद मिळकत जप्‍त करता येईल. वाद मिळकतीमुळे शांतता भंग होण्‍याची शक्‍यता नाही याची खात्री पटल्‍यास कार्यकारी दंडाधिकार्‍याला अशी जप्‍ती मागे घेता येईल.

 · फौ.प्र.सं.-कलम १४६(२): कार्यकारी दंडाधिकार्‍याने वाद मिळकतीची जप्‍ती केल्‍यास, दिवाणी न्‍यायालयाने जर त्‍याबाबत कोणताही प्रापक नेमला नसेल तर कार्यकारी दंडाधिकार्‍याला प्रापक नेमण्‍याचा अधिकार आहे. या प्रापकाला दिवाणी प्रक्रिया संहितेन्‍वये नेमलेल्‍या प्रापकाला असलेले सर्व अधिकार असतील.

दिवाणी न्‍यायालयाने या वाद मिळतीस प्रापक नेमल्‍यानंतर, कार्यकारी दंडाधिकार्‍याने नेमलेला प्रापक, दिवाणी न्‍यायालयाने नेमलेल्‍या प्रापकास कब्‍जा देऊन कार्यमुक्‍त होईल.

 · फौ.प्र.सं.-कलम १४७(१): मिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या हक्कासंबंधीचा तंटा

आपल्या स्थानिक अधिकारीतेतील कोणत्याही जमिनीच्या किंवा पाण्याचा वाप करण्याच्या अभिकथित हक्काविषयी सांगितलेला असो वा अन्य प्रकारे असो - ज्यामुळे शांतता भंग होण्याचा मग असा हक्क 'सुविधाधिकार' म्हणून संभव आहे असा एखादा तंटा अस्तित्वात आहे अशी जेव्हा केव्हा पोलीस अधिकाऱ्याच्या अहवालावरून किंवा मिळालेल्या अन्य खबरीवरून बृहन्मुंबईत महानगर दंडाधिकाऱ्याची आणि राज्यात इतरत्र कार्यकारी दंडाधिकाऱ्याची खात्री होईल तेव्हा तो याप्रमाणे आपली खात्री झाल्याची कारणे निवेदन करून एक लेखी आदेश काढील आणि त्याद्वारे, अशा तंट्याशी संबंधित असणाऱ्या पक्षांना आपल्या न्यायालयात विनिर्दिष्ट दिनांक व वेळी, जातीने किंवा वकीलामार्फत हजर राहण्यास आणि आपापल्या दाव्यांची लेखी निवेदने मांडण्यास फर्मावील.

 · फौ.प्र.सं.-कलम १४७(२): त्यानंतर दंडाधिकारी याप्रमाणे मांडलेल्या निवेदनांचे अवलोकन करील, पक्षांचे म्हणणे ऐकून घेईल त्यांच्यांपैकी प्रत्येक जण हजर करील असा सर्व पुरावा स्वीकारील, अशा पुराव्याचा परिणाम विचार घेईल त्याला जरूर वाटल्यास तसा आणखी पुरावा घेईल आणि शक्य असल्यास असा हक्क विद्यमान आहे किंवा काय हे निर्णीत करील आणि कलम १४५ चे उपबंध, शक्य तेथवर, अशा चौकशीच्या बाबतीत लागू होतील.

· फौ.प्र.सं.-कलम १४७(३): असा हक्क विद्यामान आहे असे जर अशा दंडाधिकाऱ्याला दिसून आले तर, अशा हक्काच्या वापरास कसलीही आडकाठी करण्यास मनाई करणारा आदेश व योग्य बाबतीत अशा कोणत्याही हक्काच्या वापरास असलेला अडथळा दूर करण्यासाठी द्यावयाचा आदेशसुद्धा तो देऊ शकेल.

परंतु जर, तो हक्क बारमहा वापरता येण्यासारखा असेल तर, ज्यामुळे चौकशी सुरू करावी लागली असा, पोटकलम (१) खालील पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल किंवा अशी अन्य खबर मिळण्याच्या लगतपूर्वीच्या तीन महिन्यांमध्ये असा हक्क वापरलेला असल्याशिवाय अथवा जर तो हक्क केवळ विशिष्ट हंगामात किंवा विशिष्ट प्रसंगीच वापरता येण्यासारखा असेल तर असा अहवाल किंवा खबर मिळण्यापूर्वीच्या अशा हंगामापैकी अखेरच्या हंगामाला किंवा अशा प्रसंगापैकी अखेरच्या प्रसंगी असा हक्क वापरला असल्याशिवाय असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.

· फौ.प्र.सं.-कलम १४७(४): कलम १४५(१) अन्‍वये सुरू केलेल्या कोणत्याही कार्यवाहीत जेव्हा, मिनीचा किंवा पाण्याचा वापर करण्याच्या अभिकथित हक्काविषयी तंटा आहे असे दंडाधिकाऱ्याला आढळून येईल तेव्हा ती कार्यवाही जणू काही कलम १४५(१) अन्‍वये सुरू केलेली असावी त्याप्रमाणे ती त्याला आपल्या कारणांची नोंद करून पुढे चालू ठेवता येईल आणि कलम १४५(१) अन्‍वये सुरू केलेल्या कोणत्याही कार्यवाहीत जेव्हा, कलम १४५ अन्‍वये त्या तंट्याचा परामर्श घेतला पाहिजे असे दंडाधिकाऱ्याला आढळून येईल तेव्हा, ती कार्यवाही जणू काही कलम १४५(१) अन्‍वये सुरू केली असावी त्याप्रमाणे ती त्याला आपल्या कारणांची नोंद करून पुढे चालू ठेवता येईल.

 उक्‍त कलम, संबंधित श्रेत्रातील जमीन किंवा पाणीचे वापर बाबतचा आहे आणि संबंधित दंडाधिकारी, पोलीस अहवालावर किंवा स्थानिक चौकशीअंती, किंवा स्वत: सर्व पक्षाचे मत / पुरावे / साक्षीपाहून योग्य ते निर्णय घेतील. वरील कलमाचा उपयोग जेव्हा करायचा असेल तेव्हा वरील प्रकरणात शांतता भंग होण्याची दाट शक्यता निर्माण होते.

 · फौ.प्र.सं.-कलम १४ : महाराष्ट्र राज्य सुधारणा

महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ सन १९७८, दिनांक १५.४.१९७८ पासून अंमलात १४७(१) मध्ये बृहन्‍मुंबई कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी 'महानगर 'दंडाधिकारी' व बृहन्‍मुंबई सोडून इतर राज्याचे कोणतेही कार्यक्षेत्रसाठी ‘कार्यकारी दंडाधिकारी हे शब्द समाविष्ट करावे.

 ¨ फौ.प्र.सं.-कलम १४८: स्‍थानिक चौकशी

 · फौ.प्र.सं.-कलम १४८(१):  जेव्‍हा जेव्‍हा फौ.प्र.सं.-कलम १४५, १४६, १४७ च्‍या प्रयोजनासाठी स्‍थानिक चौकशीची आवश्‍यकता असेल तेव्‍हा जिल्‍हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी, त्‍यास दुय्‍यम असणार्‍या दंडाधिकार्‍यास प्रतिनियुक्‍त करू शकेल व त्‍याला वेळेवेळी योग्‍य ते निर्देश देऊ शकेल.

· फौ.प्र.सं.-कलम १४८(२): अशा प्रकारे प्रतिनियुक्‍त केलेल्‍या दंडाधिकार्‍याचा अहवाल त्‍या प्रकरणातील पुरावा म्‍हणून ग्राह्‍य धरता येईल.

 · फौ.प्र.सं.-कलम १४८(३): फौ.प्र.सं.-कलम १४५, १४६, १४७ अन्‍वयेच्‍या कार्यवाहीत झालेला खर्च कोण कोणत्‍या पक्षाने, संपूर्ण किंवा अंशत: द्‍यावयाचा याबाबत निर्देश देता येतील. या खर्चात साक्षीदारांबाबत व वकीलांच्‍या फी बाबत आलेला, वाजवी खर्च समाविष्‍ठ असु शकेल.

 ¡ महत्‍वाचे न्‍यायालयीन निर्णय:

¨ फौ.प्र.सं. कलम १४५ कलमाखालील चौकशी संक्षिप्‍त चौकशी असून ती जलद पूर्ण करावी. (१९७२ एम.पी.एल.जे-६५७)

¨ फौ.प्र.सं. कलम १४५ कलमाखाली चौकशी सुरू करण्‍यासाठी स्‍थावर मिळकतीबाबत वाद असून त्‍यावरून शांततेचा भंग होण्‍याचा संभव असावा. (ए.आय.आर. १९६३-आसाम-३२, क्रि.लॉ.जर्न. १९६३(१)-५६५)  

¨ फौ.प्र.सं. कलम १४५  च्‍या चौकशीत दंडाधिकारी मालकी हक्‍क ठरवू शकणार नाही. प्रत्‍यक्ष कब्‍जा कोणत्‍या पक्षाचा आहे हे पाहणे आवश्‍यक असते. (१९६५ के.लॉ.टा. २१९)  

¨ दिवाणी न्‍यायालयाने मालकी हक्‍क ठरवेपर्यंत फौ.प्र.सं. कलम १४५ चा आदेश अंमलात राहील. (ए.आय.आर. १९५७-मद्रास-४०५)  

¨ छापील फॉर्ममधील नोटीस पुरशी नाही (१९७३ सी.एल.आर.-३६३)  

¨ जर दिवाणी न्‍यायालयाने उभय पक्षांचे हक्‍क ठरविले असतील तर फौ.प्र.सं. कलम १४५ अन्‍वये कारवाई करता येणार नाही. शांतता भंग होण्‍याचा संभव असेल तर फौ.प्र.सं. कलम १०७  अन्‍वये कारवाई करावी. (ए.आय.आर. १९६९-म्‍हैसूर-२९७)  

¨ दिवाणी न्‍यायालयात वाद मिळकतीबाबत दावा सुरू असेल तर फौ.प्र.सं. कलम १४५ अन्‍वये कारवाई करता येणार नाही. (ए.आय.आर. १९८५-सर्वोच्‍च न्‍या. ४७२; क्रि.लॉ.जर्न. ७५२)

                                                                         ž›ž

 वादातील जमीन, इत्यादींच्या कब्जास पक्षकार हक्कदार असल्याचे घोषित करणारा दंडाधिकार्‍याचा आदेश.

                                                              समन्‍स

                                                 (फौ. प्र. सं. कलम १४५ (१) पहा)

रीतसर नोंदविलेल्या आधारकारणांवरुन मला असे दिसून आले आहे की, माझ्या स्थानिक अधिकारितेत स्थित असलेल्या विवक्षित (तंट्याचा विषय संक्षिप्तपणे नमुद करावा)...... संबंधी खालील पक्षकारांमध्‍ये जेणेकरून शांतता भंग होण्याची शक्यता आहे असा तंटा अस्तित्वात आहे.

(१) पक्षकाराचे नाव:                                                     राहण्याचे ठिकाण:

(२) पक्षकाराचे नाव:                                                     राहण्याचे ठिकाण:

(३) पक्षकाराचे नाव:                                                     राहण्याचे ठिकाण:

(४) पक्षकाराचे नाव:                                                     राहण्याचे ठिकाण:

                                             किंवा

(तंटा गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये असेल तर)

(राहण्याचे ठिकाण) ....................

उक्त सर्व पक्षकारांना जातीने अथवा त्‍यांच्‍या कायदेशीर प्रतिनिधीमार्फत उक्त (तंट्याची विषयवस्तू), त्याचा प्रत्यक्ष कब्जा कोणाकडे होता या तथ्यासंबंधी आपापले दावे मांडणासाठी आणि लेखी कैफियती सादर करण्यासाठी जरूर त्‍या कागदपत्रांसह माझ्‍या न्‍यायालयात दिनांक .../.../.... रोजी सकाळी .../... वाजता रीतसर चौकशीसाठी उपस्थित राहण्‍याचे आदेश देण्‍यात येत आहेत.

 दरम्‍यानच्‍या काळात ज्‍यांच्याकडे उक्त .......... (तट्यांचा विषय) चा कब्जा आहे आणि त्‍याला रीतसर कायदेशीर मार्गाने त्यास (त्यांस) काढून टाकण्याचा आदेश दिला जाईपर्यंत त्‍यांच्‍या कब्जाला कोणताही अडथळा आणण्यास मी सक्त मनाई करीत आहे.

आज दिनांक ......... माहे............ २०......... रोजी हा आदेश माझ्‍या सही शिक्‍क्‍यासह देण्‍यात आला आहे.

                                                               (मोहोर)

 दिनांक:                                                                          (नाव, पदनाम व दिनांकीत सही)

प्रत: १. संबंधित पोलीस निरीक्षक

२. संबंधित मंडळ अधिकारी

३. संबंधित तलाठी, साझा......

४. संबंधित पोलीस पाटील

या समन्‍सची एक प्रत वाद मिळकतीच्‍या ठिकाणी किंवा वाद मिळकतीच्‍या जवळपास ठळक ठिकाणी लावून प्रदर्शित रावी.

                                                              (मोहोर)

 दिनांक:                                                                          (नाव, पदनाम व दिनांकीत सही)

--

                                                       नमुना क्र. २५

                                                              आदेश

                                                 (फौ. प्र. सं. कलम १४५(४) पहा)

रीतसर नोंदलेल्या आधारकारणांवरुन मला असे दिसून येते की, माझ्या स्थानिक अधिकारितेत स्थित असलेल्या विवक्षित (तंट्याचा विषय संक्षिप्तपणे नमुद करावा)...... संबंधी..... (पक्षकाराचे नाव व राहण्याचे ठिकाण, किंवा तंटा गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये असेल तर फक्त राहण्याचे ठिकाण लिहावे) यांच्या मध्ये, जेणेकरून शांतता भंग होण्याची शक्यता आहे असा तंटा अस्तित्वात होता. उक्त सर्व पक्षकारांना उक्त (तंट्याची विषयवस्तू), त्याचा प्रत्यक्ष कब्जा कोणाकडे होता या तथ्यासंबंधी आपापले दावे मांडणार्‍या लेखी कैफियती सादर करण्यास सांगितले होते, आणि रीतसर चौकशी केली असता, कब्जाच्या वैध हक्काबाबत, उक्त पक्षकारांपैकी कोणाच्या दाव्यात कितपत तथ्य आहे ते विचारात न घेता असे दिसते की, उक्त .......... (नाव किंवा नावे किंवा वर्णन) याचा प्रत्यक्ष कब्जाबाबतचा दावा खरा आहे अशी खात्री झाल्यामुळे, मी, ............... (नाव व पदनाम) असे घोषित करतो की, .............. (नाव/नावे) यांच्याकडे) उक्त .......... (तट्यांचा विषय) चा कब्जा आहे आणि रीतसर कायदेशीर मार्गाने त्यास (त्यांस) काढून टाकण्याचा आदेश दिला जाईपर्यंत असा कब्जा ठेऊन घेण्यास तो (ते) हक्कदार आहे (आहेत) आणि दरम्यान त्याच्या (किंवा त्यांच्या) कब्जाला कोणताही अडथळा आणण्यास मी सक्त मनाई करीत आहे.

आज दिनांक ......... माहे............ २०......... रोजी हा आदेश माझ्‍या सही शिक्‍क्‍यासह देण्‍यात आला आहे.

                                                               (मोहोर)

 दिनांक:                                                                          (नाव, पदनाम व दिनांकीत सही)

-- 

जमीन, इत्यादींच्या कब्जाच्या वादप्रकरणी जप्तीचे वॉरंट

नमुना क्र. २६

जप्तीचे वॉरंट

(फौ. प्र. सं. कलम १४६(१) पहा)

........... (ठिकाण) येथील पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी,

यांस ,

ज्याअर्थी, मला असे दाखवून देण्यात आले आहे की, माझ्या अधिकारितेच्या मर्यादांच्या आत स्थित असलेल्या ........ (तंट्याचा विषय संक्षिप्तपणे नमद करावा) संबंधी ........ (संबंधित पक्षकारांची नावे, राहण्याचे ठिकाण, किंवा तंटा गावकर्‍यांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये असेल तर,फक्‍त राहण्याचे ठिकाण लिहावे) यांच्यामध्ये, जेणेकरुन शांतता भंग होण्याची शक्यता आहे असा तंटा अस्तित्वात होता आणि, उक्त पक्षकारांना .......... (तंट्याची विषयवस्तु) याचा प्रत्यक्ष कब्जा कोणाकडे होता या तथ्यासंबंधी आपापले दावे लेखी मांडाण्यास सांगितले होते, आणि ज्याअर्थी, उक्त दाव्यासंबंधी रीतसर चौकशी केली असता, माझा असा निर्णय झाला आहे की, उक्त पक्षकारांपैकी कोणाकडेही ......... (उक्त तंट्याची विषयवस्‍तु) याचा कब्जा नव्हता (किंवा पूर्वोक्तप्रमाणे कब्जा कोणत्या पक्षकाराकडे होता याबद्दल मी स्वत:ची खात्री करून घेऊ शकलो नाही)

म्हणून, .................. (उक्त तंट्याची विषयवस्तू) याचा कब्जा घेण्यास आणि स्वत: कडे ठेवून घेण्यास, आणि तो कब्जा पक्षकाराचे हक्क किंवा कब्जासंबंधीचा दावा निर्णीत करणार्‍या सक्षम न्यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश प्राप्‍त होईपर्यंत ते जप्तीखाली ठेवण्यास, या वॉरंटाव्दारे तुम्हास प्राधिकृत करीत आहे आणि फर्मावित आहे.

सदर वॉरंटाची अंमलबजावणी कशा रीतीने केली ते प्रमाणित करणार्‍या शेर्‍यासह सदर वॉरंट परत करण्यात यावे.

आज दिनांक ......... माहे............ २०......... रोजी हा आदेश माझ्‍या सही शिक्‍क्‍यासह देण्‍यात आला आहे.

                                                              (मोहोर)

 दिनांक:                                                                          (नाव, पदनाम व दिनांकीत सही)

--

जमिनीवर किंवा जलाशयावर एखादी गोष्ट करण्यास मनाई करणारा दंडाधिकार्‍याचा आदेश

नमुना क्र. २७

मनाई आदेश

                                               (फौ. प्र. सं. कलम १४७(३) पहा)

माझ्या स्थानिक अधिकारितेत स्थित असलेली/ला ............................. (तंट्याची विषयवस्तू संक्षिप्तपणे नमूद करावी) याच्या वापरासंबंधी तंटा उद्भवला असून त्या जमिनीच्या (किंवा जलाशयाच्या) वापरावर ....................... (व्यक्तीचे किंवा व्यक्तींचे वर्णन करावे) याने/यांनी सर्वस्वी आपला हक्क सांगितला आहे, आणि त्याबाबत रीतसर चौकशी केल्यानंतर मला असे दिसू येते की, सदर जमिनीचा (किंवा जलाशयाचा) वापरहक्क जनतेला (किंवा व्यक्ती किंवा व्यक्तिवर्ग असेल तर, त्याचे किंवा त्यांचे वर्णन करावे) खूला झालेला आहे आणि उक्त चौकशी सुरु केल्यापासून तीन महिन्यांत (किंवा जर वापरहक्क फक्त विशिष्ट मोसमातच उपभोगता येण्यासारखा असेल तर, "तो उपभोगणे शक्य असेल त्या मोसमापैकी फक्त शेवटच्या मोसमात'' असे म्हणावे) सदर वापरहक्क उपभोगण्यात आलेला आहे.

सबब, मी, ............... (नाव व पदनाम)  आदेश देत आहे की, उक्त (कब्जाचा/चे मागणीदार) किंवा त्याचा कोणीही हितसंबंधी याला (किंवा यांना) सर्वस्वी कब्जा मिळण्यास हक्कदार म्हणून न्यायनिर्णीत करणारा समक्ष न्यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश मिळेपर्यंत, त्याने/त्यांनी, इतरांना उक्त जमिनीच्या (किंवा जलाशयाच्या) वापराचा हक्क उपभोगण्यापासून वंचित ठेवून कब्जा घेऊ नये (किंवा ठेवून घेऊ नये).

आज दिनांक ......... माहे............ २०......... रोजी हा आदेश माझ्‍या सही शिक्‍क्‍यासह देण्‍यात आला आहे.

                                         (मोहोर)

 दिनांक:                                                                          (नाव, पदनाम व दिनांकीत सही)

b|b

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel