महिलांसंबंधीत
गुन्हे
भारतीय न्याय
संहितेमधील नवीन तरतुदी
(या लेखातील काही शब्द किंवा वाक्यरचना वाचतांना
अश्लिल वाटली तरी ते कायद्यातील शब्द आहे हे लक्षात घ्यावे.)
या लेखात, भारतीय न्याय संहितेतील महिलांसंबंधीत
गुन्ह्यांबाबतच्या तरतुदींची माहिती घेऊ.
n लैंगिक गुन्हे
l कलम ६३: बलात्कार:
एखाद्या पुरुषाने ‘बलात्कार’ केला
असे म्हटले जाते जर त्याने:
(ए) एखाद्या
महिलेच्या योनी,
तोंड,
मूत्रमार्ग
किंवा गुदद्वारात त्याच्या लिंगाचा कोणत्याही मर्यादेपर्यंत प्रवेश केला असेल किंवा
तिला त्याच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसोबत असे करण्यास भाग पाडले असेल किंवा,
(बी) पुरुषाच्या
लिंगाशिवाय इतर कोणतीही वस्तू, महिलेच्या योनीमार्गात, मूत्रमार्गात
किंवा गुद्द्वारात कोणत्याही प्रमाणात घुसवील किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला असे
करण्यास प्रवृत्त केले असेल किंवा,
(सी) एखाद्या
महिलेच्या शरीराचा कोणताही भाग अशा रीतीने हाताळील की तो अशा महिलेच्या योनीमार्ग,
मूत्रमार्ग,
गुद्द्वार
किंवा शरीराच्या कोणत्याही भागामध्ये घुसवला जाईल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला
असे करण्यास भाग पाडले असेल किंवा,
(डी) एखाद्या
महिलेच्या योनी,
गुद्द्वार,
मूत्रमार्गाला
त्याने त्याचे तोंड लावले असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला असे करण्यास भाग
पाडले असेल.
खालील
सात वर्णनांपैकी कोणत्याही परिस्थितीत:
(i) महिलेच्या
इच्छेविरुद्ध;
(ii) महिलेच्या
संमतीशिवाय;
(iii) जेव्हा
तिला किंवा तिचे हितसंबंध जिच्यामध्ये गुंतलेले असतील अशा कोणत्याही व्यक्तीला,
मृत्यूच्या
भीतीने किंवा दुखापत होण्याच्या भीतीने तिची संमती प्राप्त केली असेल;
(iv)
जेव्हा
पुरुषाला माहीत आहे की तो त्या महिलेचा पती नाही परंतु तो तिचा पती आहे असा विश्वास
ठेऊन किंवा तिची संमती दिली गेली आहे कारण तिला विश्वास आहे की तो असा पुरुष आहे
ज्याच्याशी कायदेशीररित्या तिचा विवाह झाला आहे असा विश्वास ठेऊन तिने संभोगासाठी
संमती दिली असेल,
(v) तिने
अशी संमती देताना, मानसिक अस्वस्थतेमुळे किंवा नशेमुळे
किंवा त्याने स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत तिला कोणतेही मती गुंग
करणारे किंवा अपथ्यकारक पदार्थ सेवन करायला दिल्यामुळे, तिला
त्याचे स्वरूप आणि परिणाम समजू शकत नाहीत म्हणून तिने त्याला संमती दिली आहे,
(vi) ती महिला
अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर तिच्या संमतीने किंवा संमती शिवाय,
(vii) जेव्हा
ती संमती देण्यास असमर्थ असते.
तेव्हा
त्या पुरूषेने अशा महिलेवर बलात्कार केला आहे असे मानले जाईल.
स्पष्टीकरण
- २: ‘संमती’
म्हणजे जेव्हा महिला, शब्दांव्दारे, हावभावांव्दारे
किंवा शाब्दिक किंवा गैर-मौखिक संप्रेषणाच्या कोणत्याही स्वरूपाद्वारे,
विशिष्ट
लैंगिक कृतीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करते अशी एक स्पष्ट, असंदिग्ध आणि स्वेच्छापूर्ण संमती.
परंतु , जर
एखाद्या महिलेने पुरूषाच्या लिंग प्रवेशाच्या कृतीला प्रतिकार केला नाही तर ती
केवळ त्या कारणास्तव, लैंगिक कृतीला संमती देते असे मानण्यात
येणार नाही.
अपवाद
-१: वैद्यकीय
प्रक्रिया किंवा हस्तक्षेप हा बलात्कार ठरणार नाही.
अपवाद
- २: एखाद्या
पुरुषाने वय अठरा वर्षांपेक्षा कमी नसलेल्या स्वतःच्या पत्नीशी केलेला लैंगिक
संबंध किंवा लैंगिक कृत्य हा बलात्कार नाही.
(१) जो
कोणी,
उक्त
दोन अपवादांव्यतिरिक्त, बलात्कार
करतो,
त्याला
दहा वर्षांपेक्षा कमी नसेल आणि आजन्म कारावासापर्यंत वाढविता येईल अशी सश्रम कारावासाची
आणि द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल.
(२) जो
कोणी:
(अ) पोलीस
अधिकारी असताना,
बलात्कार
करेल,
(i) अशा पोलीस
अधिकाऱ्याची ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियुक्ती असेल त्या हद्दीत;
किंवा
(ii) कोणत्याही
पोलीस स्टेशनच्या आवारात; किंवा
(iii) अशा
पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यात असलेल्या महिलेवर किंवा अशा पोलीस अधिकाऱ्याच्या
अधीनस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यात असलेल्या महिलेवर बलात्कार करेल;
किंवा
(ब) लोकसेवक
असताना, अशा लोक सेवकाच्या ताब्यात किंवा अशा लोकसेवकाच्या अधीनस्थ असलेल्या
सार्वजनिक सेवकाच्या ताब्यात असलेल्या महिलेवर बलात्कार करेल;
किंवा
(क) केंद्र
सरकार किंवा राज्य सरकारने एखाद्या क्षेत्रात तैनात केलेल्या सशस्त्र दलाचा सदस्य
असून अशा भागात बलात्कार करेल; किंवा
(ड) तुरूंग,
सुधारगृह किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा
त्याअंतर्गत स्थापन केलेली इतर कोणतीही कोठडी किंवा महिलांच्या किंवा संस्थेच्या
व्यवस्थापनावर किंवा कर्मचारी वर्गात असतांना अशा कारागृहातील, सुधार गृहातील, ठिकाणातील
किंवा संस्थेतील कोणत्याही अंतर्वासीवर बलात्कार करेल; किंवा
(इ) रुग्णालयाच्या
व्यवस्थापनात किंवा कर्मचारी असताना, त्या
रुग्णालयातील महिलेवर बलात्कार करतो; किंवा
(एफ)
एखाद्या महिलेचा
नातेवाईक,
पालक
किंवा शिक्षक किंवा विश्वस्त किंवा प्रधिकारी असलेली व्यक्ती,
अशा
महिलेवर बलात्कार करते; किंवा
(जी) जातीय
किंवा सांप्रदायिक हिंसाचाराच्या वेळी बलात्कार करतो; किंवा
(एच) एखादी
महिला गर्भवती असल्याचे माहीत असून तिच्यावर बलात्कार करतो;
किंवा
(आय) संमती
देण्यास असमर्थ असलेल्या महिलेवर बलात्कार करतो; किंवा
(जे) एखाद्या
महिलेवर नियंत्रण किंवा वर्चस्व ठेवण्यासाठी नियुक्त असतांना अशा महिलेवर
बलात्कार करतो;
किंवा
(के) मानसिक
किंवा शारीरिक अपंगत्व असलेल्या महिलेवर बलात्कार करतो; किंवा
(एल) बलात्कार
करताना त्या महिलेला गंभीर शारीरिक दुखापत करतो किंवा
तिला
पंगू किंवा विद्रूप करतो किंवा तिच्या जीवनास धोका निर्माण करतो;
किंवा
(एम) एकाच
महिलेवर वारंवार बलात्कार करतो,
त्याला
दहा वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु जी जन्मठेपेपर्यंत वाढू शकते अशा मुदतीची म्हणजेच
त्या व्यक्तीचे उर्वरित आयुष्याच्या कारावासात असेल अशी शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडालाही
पात्र असेल.
स्पष्टीकरण: या कलमाच्या प्रयोजनार्थ:
ए) ‘सशस्त्र दल’ म्हणजे
नौदल,
लष्कर
आणि हवाई दल आणि त्यामध्ये सध्याच्या काळासाठी लागू असलेल्या कोणत्याही
कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या सशस्त्र दलाच्या कोणत्याही सदस्याचा समावेश
आहे,
ज्यामध्ये
निमलष्करी दल आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या
कोणत्याही सहायक दलांचा समावेश आहे.
(बी) ‘रूग्णालय’ म्हणजे
रूग्णालयाचा परिसर आणि दुखण्यातुन बरे होण्याच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय देखभाल
किंवा पुनर्वसन आवश्यक असलेल्या व्यक्तींच्या उपचारांसाठी असलेल्या कोणत्याही
संस्थेच्या परिसराचा समावेश होतो.
(सी) ‘पोलीस अधिकारी’ चा
अर्थ पोलीस अधिनियम, १८६१अन्वये ‘पोलीस’ या
अभिव्यक्तीला नेमून दिलेला समान अर्थ असेल.
(डी) ‘महिलाची किंवा मुलांची संस्था’
म्हणजे अनाथाश्रम किंवा उपेक्षित महिला किंवा मुलांसाठी घर किंवा
विधवा गृह किंवा इतर कोणत्याही नावाने ओळखली जाणारी संस्था,
जी
महिलांच्याची किंवा मुलांची काळजी घेण्यासाठी स्थापन आणि देखरेख करणारी संस्था.
(१) जो
कोणी,
सोळा
वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलेवर बलात्कार करतो,
त्याला
वीस वर्षांपेक्षा कमी नसलेल्या परंतु आजन्म कारावासापर्यंत वाढवता येईल अशी शिक्षा
दिली जाईल,
ज्याचा
अर्थ त्याचे उर्वरित जीवन कारावासात असेल आणि तो द्रव्यदंडास देखील पात्र असेल.
परंतु असा द्रव्यदंड
पीडित महिलेच्या वैद्यकीय खर्च आणि पुनर्वसनासाठी न्याय्य आणि वाजवी असेल आणि असा आकारण्यात
आलेला कोणताही द्रव्यदंड पीडित महिलेला दिला जाईल.
परंतु असा द्रव्यदंड
पीडित महिलेच्या वैद्यकीय खर्च आणि पुनर्वसनासाठी न्याय्य आणि वाजवी असेल आणि असा आकारण्यात
आलेला कोणताही द्रव्यदंड पीडित महिलेला दिला जाईल.
जो
कोणी कलम ६४(१) किंवा ६४(२) अन्वये शिक्षापात्र गुन्हा करेल आणि अशी कृती करतांना
त्या महिलेला अशी दुखापत करेल ज्यामुळे त्या महिलेचा मृत्यू होईल किंवा महिलेची
सतत टिकून राहणारी वनस्पतीवत अवस्था होईल तर त्याला वीस वर्षांपेक्षा कमी
नसलेल्या आणि आजन्म कारावासापर्यंत वाढवता येईल अशी शिक्षा दिली जाईल,
ज्याचा
अर्थ त्याचे उर्वरित जीवन कारावासात असेल किंवा देहांताची शिक्षा दिली जाईल.
जो
कोणी, विभक्तीच्या हुकूमनाम्यानुसार किंवा अन्य कारणाने विभक्त राहत असणार्या
स्वत:च्या पत्नीशी, तिच्या संमतीशिवाय लैंगिक समागम करेल, त्याला
दोन वर्षांपेक्षा कमी नसलेल्या परंतु सात वर्षापर्यंत वाढू शकणाऱ्या कालावधीसाठी
कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल. आणि द्रव्यदंडासही पात्र
असेल.
जो
कोणी-
(अ) अधिकाराच्या
पदावर किंवा विश्वासू नातेसंबंधात असतांना; किंवा
(ब) लोकसेवक
असताना;
किंवा
(सी) तुरूंग,
सुधारगृह, कारागृहाचा, किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या
कोणत्याही कायद्याद्वारे किंवा अंतर्गत स्थापित केलेल्या कोठडीची कोणतीही जागा किंवा
महिला किंवा मुलांची संस्था यांचा अधिक्षक किंवा व्यवस्थापक असतांना किंवा
(डी) रुग्णालयाच्या
व्यवस्थापनावर किंवा रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गात असताना,
त्याच्या
ताब्यातील किंवा प्रभाराखालील किंवा त्या आवारात उपस्थित असलेल्या एखाद्या महिलेने
त्याच्याशी लैंगिक समागम करावा यासाठी तिला प्रवृत्त करण्यासाठी किंवा फूस लावण्यासाठी
किंवा प्रलोभन दाखवण्यासाठी आपल्या पदाचा किंवा दर्जाचा किंवा विश्वासू संबंधाचा गैरवापर करील तर, बलात्काराचा
अपराध ठरत नसलेल्या लैंगिक समागमासाठी त्याला पाच वर्षांपेक्षा कमी नसेल,
परंतु
जे दहा वर्षांपर्यंत वाढू शकेल अशी सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही
पात्र ठरेल.
स्पष्टीकरण
-१: या
कलमाच्या प्रयोजनार्थ:
‘लैंगिक
समागम’ म्हणजे कलम ६३(ए) ते (डी)
मध्ये
नमूद केलेली कोणतीही कृती.
स्पष्टीकरण
- २: या
कलमाच्या प्रयोजनार्थ:
कलम
६३ चे स्पष्टीकरण-१ देखील लागू होईल.
स्पष्टीकरण
– ३: तुरूंग,
सुधारगृह, कारागृहाची इतर जागा यांच्या संबंधातील ‘अधिक्षक’
या संज्ञेत, तुरूंगात, सुधारगृहात, कारागृहाच्या
इतर जागेत किंवा संस्थेत एखादी व्यक्ती इतर कोणतेही पद धारण करणाऱ्या आणि कोणताही
अधिकार किंवा नियंत्रण करणार्या व्यक्तीचा समावेश होतो.
स्पष्टीकरण
- ४: ‘रुग्णालय’ आणि ‘महिला किंवा मुलांची संस्था’ या
अभिव्यक्तींना कलम ६४(२), स्पष्टीकरणातील
खंड (ए)
आणि
(डी)
प्रमाणेच
अर्थ असेल.
जो
कोणी,
फसव्या
मार्गाने महिलेला लग्नाचे, बढतीचे, अमिष
दाखवून, ते अमिष/वचन पूर्ण करण्याच्या कोणताही इरादा नसतांना, तिच्याशी लैंगिक
समागम करेल तर असे लैंगिक समागम बलात्काराच्या गुन्ह्यासारखे नसतात. तथापि, उक्त
कृत्य करणार्याला, दहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी
कारागृहाची शिक्षा आणि द्रव्यदंड अशी शिक्षा होऊ शकेल.
(१) जर
एखाद्या महिलेवर एक किंवा अधिक व्यक्तींनी, समान हेतूने सामूहिक बलात्कार केला
असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीने बलात्काराचा गुन्हा केला आहे असे मानले जाईल आणि
त्यांना प्रत्येकाला वीस वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंतची
शिक्षा दिली जाईल. ज्याचा अर्थ त्याचे उर्वरित आयुष्य कारावासात जाईल आणि तो
द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
परंतु असा द्रव्यदंड
पीडित महिलेच्या वैद्यकीय खर्च आणि पुनर्वसनासाठी न्याय्य आणि वाजवी असेल आणि असा आकारण्यात
आलेला कोणताही द्रव्यदंड पीडित महिलेला दिला जाईल.
परंतु असा द्रव्यदंड
पीडित महिलेच्या वैद्यकीय खर्च आणि पुनर्वसनासाठी न्याय्य आणि वाजवी असेल आणि असा आकारण्यात
आलेला कोणताही द्रव्यदंड पीडित महिलेला दिला जाईल.
ज्या
कोणाला कलम ६४ किंवा कलम ६५ किंवा कलम ६६ किंवा कलम ७० अन्वये शिक्षापात्र
गुन्ह्यासाठी यापूर्वी दोषी ठरवला असेल आणि त्यानंतर त्याला वरीलपैकी कोणत्याही
कलमांखाली शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवला असेल तर त्याला जन्मठेपेची शिक्षा
होईल ज्याचा अर्थ त्याचे उर्वरित आयुष्य कारावासात जाईल किंवा देहान्ताची शिक्षा
होईल.
(१) जो
कोणी, ज्यायोगे, अशा कोणत्याही व्यक्तीची ओळख, ज्यावर कलम ६४ किंवा कलम ६५ किंवा
कलम ६६ किंवा कलम ६७ अन्वये अपराधांचे आरोप केलेले असतील किंवा त्याने असे गुन्हे
केल्याचे उघड झाले असेल अशा व्यक्तींची नावे छापतो किंवा प्रकाशित करतो किंवा अशा
कोणत्याही व्यक्तीची ओळख कळू शकेल अशी कोणतीही बाब करतो, तो दोन वर्षांपर्यंत वाढू
शकणाऱ्या मुदतीच्या कारावासासाठी आणि द्रव्यदंडास पात्र ठरेल.
(२) उक्त
पोट-कलम (१) मध्ये माहिती अंतर्भूत असेल तरी, ज्याव्दारे पीडित महिलेची ओळख उघड
होऊ शकेल अशी कोणतीही बाब छापली किंवा प्रकाशित केली असेल तर,
(ए) पोलीस
स्टेशनचा प्रभारी अधिकारी किंवा जो पोलीस अधिकारी अशा गुन्ह्याचा तपास सद्भावनेने तपास
करीत असेल त्याच्या लेखी आदेशान्वये किंवा
(बी) पीडितेद्वारे
लेखी अधिकारपत्रासह किंवा
(सी) जेथे
पीडित व्यक्ती मृत झाली असेल किंवा लहान मूल किंवा मानसिक आजारी असेल तर त्याच्या
जवळच्या नातलगाच्या लिखित अधिकारपत्रासह,
परंतु, असे
लेखी अधिकारपत्र, जवळचे नातलग किंवा इतर कोणालाही न देता, कोणत्याही
मान्यताप्राप्त कल्याणकारी संस्था किंवा अशा संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिवांना देता
येईल.
स्पष्टीकरण: या पोटकलमच्या
प्रयोजनार्थ, ‘मान्यताप्राप्त कल्याणकारी
संस्था किंवा संस्था’ म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार
यांच्या वतीने मान्यताप्राप्त सामाजिक कल्याण संस्था किंवा संस्था.
(३) पोट-कलम (१) मध्ये नमूद
केलेल्या कोणत्याही अपराधाबाबत, जो कोणी न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय न्यायालयात
चालू असलेली कार्यवाही छापेल किंवा प्रकाशित करेल तो दोन वर्षांपर्यंत वाढू
शकणाऱ्या मुदतीच्या कारावासाचीसाठी आणि द्रव्यदंडास पात्र ठरेल.
स्पष्टीकरण: सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे निकाल छापणे किंवा प्रकाशित करणे हा या कलमाच्या अर्थान्वये अपराध नाही.
n महिलेवर गुन्हेगारी हल्ला
जो
कोणी कोणत्याही महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने बलप्रयोग किंवा प्राणघातक हल्ला
करतो, तो एक ते पाच वर्षांपर्यंत वाढू शकणाऱ्या मुदतीच्या कारावासासाठी आणि द्रव्यदंडास
पात्र ठरेल.
(१) खालीलपैकी
कोणतेही कृत्य करणारा पुरूष लैंगिक छळासाठी दोषी ठरेल:
(i) शारीरिक
जवळीक आणि नको असलेली आणि स्पष्ट लैंगिक गोष्टीची मागणी करणारी मैत्री, किंवा
(ii) लैंगिक
संबंधाची मागणी किंवा विनंती करणे. किंवा
(iii) महिलेच्या
इच्छेविरुद्ध अश्लिल देखावे (पोर्नोग्राफी) दाखवणे; किंवा
(iv) लैंगिक
टिप्पणी करणे शेरे मारणे.
(२) उप-कलम
(१), खंड (i)
किंवा
खंड (ii)
किंवा
खंड (iii)
मध्ये
निर्दिष्ट केलेला गुन्हा करणाऱ्या कोणत्याही पुरुषास तीन वर्षांपर्यंत असू शकेल
अशा सश्रम कारावासाची शिक्षा दिली जाईल, किंवा द्रव्यदंडाची
किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.
(३) पोट-कलम
(१), खंड (iv)
मध्ये
विनिर्दिष्ट केलेला गुन्हा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस एक वर्षांपर्यंत असू शकेल
अशा कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
जो
कोणी, कोणत्याही महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने तिच्यावर
हल्ला करतो किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करतो, त्याला
तीन वर्षांपेक्षा कमी नसलेल्या आणि सात वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा कारावासाची
शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडास देखील पात्र असेल.
जो
कोणी, एखादी महिला, सर्वसाधारणपणे कोणी पाहू नये अशा एखाद्या एकांतवासातील कृती
करण्यात गुंतलेली असतांना तिला, तिच्या ईच्छेविरूध्द पाहील किंवा तिचे चित्रण
करेल किंवा असे चित्रण प्रसारीत करेल त्याला, तो प्रथमत: दोषी आढळल्यास,
एक
वर्षांपेक्षा कमी नसलेल्या आणि तीन वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा कारावासाची शिक्षेस
आणि द्रव्यदंडास देखील पात्र ठरेल. दुसर्यांदा उक्त कृत्य करतांना दोषी
आढळल्यास,
तीन
वर्षांपेक्षा कमी नसलेल्या आणि सात वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा कारावासाची शिक्षेस
आणि द्रव्यदंडास देखील पात्र ठरेल.
स्पष्टीकरण -
२: जेव्हा
कोणतीही छायाचित्रण घेण्यास किंवा कोणत्याही कृतीचे चित्रण करण्यास त्या महिलेने
संमती दिली असेल परंतु त्याचे त्रयस्थ व्यक्तींना प्रसारण करण्यास संमती दिली
नसेल आणि असे छायाचित्रण किंवा कृतीचे चित्रण प्रसारित करण्यात आले असेल तेव्हा
असे प्रसारण हे या कलमान्वये अपराध मानण्यात येईल.
(१) कोणताही
पुरूष, जो:
(i) एखाद्या
महिलेचा चोरून पाठलाग करेल अशा महिलेने परस्पर संवाद वाढवण्यासाठी, जवळीक साधावी
म्हणून तिला उत्तेजन देण्यासाठी, त्या महिलेने इच्छा नसल्याचे स्पष्टपणे दर्शवले
असूनही वारंवार तिच्याजवळ जाईल किंवा जवळ जाण्याचा, संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल
किंवा,
(ii) त्या
महिलेच्या इंटरनेट ई-मेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापरावर
बारीक लक्ष ठेवेल, तो चोरून पाठलाग करण्याचा अपराध करतो असे मानण्यात येईल.
परंतु, असे
की, जर त्याने पाठलाग केला होता तो,
(i) एखाद्या
गुन्ह्याला प्रतिबंध करण्याच्या किंवा गुन्ह्याचा तपास करण्याच्या उद्देशाने
पाठलाग केला होता आणि त्याच्यावर राज्याद्वारे गुन्हे शोधण्याची जबाबदारी
सोपविण्यात आली होती; किंवा
(ii) कोणत्याही
कायद्यांतर्गत किंवा कोणत्याही कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीने लादलेल्या जबाबदारीचे
पालन करण्यासाठी त्याचा पाठलाग केला होता; किंवा
(iii) विशिष्ट
परिस्थितीत असे वर्तन वाजवी आणि न्याय्य होते असे सिध्द केले तर अशी वर्तणूक ‘चोरून
पाठलाग करणे’ या सदरात येणार नाही.
जो
कोणी,
कोणत्याही
महिलेचा विनयभंग करण्याच्या इराद्याने, एखादा शब्द
किंवा आवाज, त्या महिलेच्या कानावर पडावा अथवा एखादा हावभाव किंवा वस्तू कोणत्याही रूपात, तिच्या नजरेला पडावी या
उद्देशाने असे शब्द उच्चारेल किंवा असा आवाज किंवा हावभाव किंवा अशी वस्तू प्रदर्शित करेल अगर अशा
महिलेच्या एकांतपणाचा भंग करील त्याला तीन वर्षे
पर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची आणि द्रव्य दंडाची ही
शिक्षा होईल.
l कलम ८०: हुंडा बळी:
(१) यावेळेस
एखाद्या विवाहित स्त्रीचा मृत्यू तिच्या विवाहापासून सात वर्षाच्या आत घडून आला
आहे आणि तो, तिला जाळपोळ करून, दुखापती करून अगर नेहमीपेक्षा इतर परिस्थितीत घडून
आलेला आहे, आणि असे दाखवून देण्यात आले की, तिच्या मृत्यूपूर्वी तिला क्रूरपणे
वागविले जात होते अगर जाच, छळवणूक होत होती आणि असे कृत्य तिचा पती अगर नातेवाईक
करत होते आणि त्यामागे हुंड्याची मागणी होती तर अशा मृत्यू ‘हुंडाबळी’ म्हटला जाईल
आणि पतीने आणि नातेवाईकांनीच तो मृत्यू घडवून आणला आहे असे मानले जाईल.
स्पष्टीकरण: या
पोट कलमाच्या प्रयोजनार्थ, ‘हुंडा’ चा अर्थ हुंडा
प्रतिबंध कायदा,
१९६१,
कलम
२ प्रमाणेच असेल.
(२) जो
कोणी हुंडाबळी घडवून आणेल त्याला सात वर्षांपेक्षा कमी नसलेल्या मुदतीच्या
कारावासाची शिक्षा होईल, जी जन्मठेपेपर्यंत वाढू शकेल.
जी महिला आपल्याशी कायदेशीरपणे विवाहबद्ध
झालेली नाही, तिचा, ती आपल्याशी
कायदेशीरपणे विवाहबद्ध झालेली आहे असा लबाडीचा समज करून देऊन, तशा समजुतीत तिला
आपल्यासोबत दांपत्यभावाने राहण्यास किंवा लैंगिक संभोग करण्यास जो पुरुष भाग
पाडतो, अशा प्रत्येक पुरुषाला दहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची
आणि द्रव्य दंडाची शिक्षा होईल.
l कलम ८२: पती किंवा पत्नीच्या हयातीत पुन्हा लग्न करणे:
(१) ज्या
कोणाची पती किंवा पत्नी हयात असेल आणि अशा पती किंवा पत्नीच्या हयातीत झालेल्या
कारणामुळे असा विवाह रद्दबातल ठरेल असाल तर त्याला सात वर्षांपर्यंत वाढवता येईल
अशा मुदतीसाठी कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
अप्रामाणिकपणाने
किंवा कणपूर्ण उद्देशाने जर कोणी स्वतःच्या बाबतीत विवाहबद्ध होण्याचा संस्कार
करून घेतला आहे आणि त्याद्वारे आपण कायदेशीरपणे विवाहबद्ध होत नाही याची त्याला
जाणीव असेल तर त्याला सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची आणि प्रद्रव्यदंडाची शिक्षा होईल.
जी
महिला, अन्य कोणत्याही पुरुषाची पत्नी असून, ते स्वतःला माहीत असून किंवा तसे
समजण्यास कारण असेल तरीही अशा कोणत्याही महिलेला जर कोणी, तिचा कोणत्याही
व्यक्तीबरोबर विधीनिषिध्द संभोग घडावा या उद्देशाने तिला दूर पळवून किंवा भुरळ
पाडून नेले किंवा त्या उद्देशाने अशा कोणत्याही महिलेस लपवून किंवा अडकवून ठेवले
तर त्याला दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची किंवा द्रव्य
दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
जो
कोणी,
एखाद्या
महिलेच्या पती असून किंवा पतीचा नातेवाईक असून, अशा महिलेला क्रूर वागणूक देईल,
त्याला
तीन वर्ष मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडालाही पात्र असेल.
l कलम ८६: क्रूरतेची व्याख्या:
कलम
८५ च्या प्रयोजनार्थ, ‘क्रूरता’
म्हणजे:
(अ) ज्यामुळे
त्या महिलेला आत्महत्या करणे क्रमप्राप्त होईल अथवा तिला दुखापत होईल अथवा तिच्या
जीविताला, शरीराला किंवा स्वास्थ्याला (मानसिक किंवा शारीरिक) धोका निर्माण होईल
अशा स्तराचे कोणतेही बुद्धीपुरस्सर वर्तन.
कोणत्याही
महिलेला, तिच्या इच्छेविरुद्ध, कोणत्याही व्यक्तीशी विवाह करण्याची सक्ती करता
यावी या उद्देशाने किंवा तिच्यावर तशी शक्ती होईल असा संभव असल्याची स्वतःला जाणीव
असताना अथवा विधीनिषिध्द संभोगाकरीता तिच्यावर बळजबरी करता यावी किंवा तिला तशी फूस
लावता यावी या उद्देशाने अगर विधीनिषिध्द संमोगाकरीता तिच्यावर बळजबरी होईल किंवा तिला
तशी फूस लावण्यात येईल असा संभव असल्याची स्वतःला जाणीव असताना, जो कोणी तिचे
अपनयन किंवा अपहरण करेल त्याला दहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि द्रव्य दंडाची शिक्षा होईल.
आणि
या संहितेमध्ये व्याख्या करण्यात आल्यानुसार फौजदारी पात्र धाक धपाटशाच्या
मार्गाने किंवा सत्तेचा दुरुपयोग करून किंवा सक्तीच्या अन्य कोणत्याही उपायाने जो
कोणी एखाद्या महिलेला दुसऱ्या व्यक्तीशी विधीनिषिध्द संभोग करण्याची तिच्यावर
बळजबरी करता यावी किंवा तिला फूस लावता यावी या उद्देशाने अथवा त्याकरिता तिच्यावर
बळजबरी होईल किंवा तिला फूस लावण्यात येईल याची जाणीव असताना, तिला एखाद्या ठिकाणाहून
दूर जाण्यास प्रवृत्त करील, तो देखील वरील प्रमाणे शिक्षेस पात्र असेल.
जो
कोणी, इच्छापूर्वक, एखाद्या गर्भवती महिलेचा गर्भपात घडवून आणील, त्याला जर असा
गर्भ गर्भपात त्या महिलेचा जीव वाचवण्यासाठी सद्भावपूर्वक घडवून आणलेला असेल नसेल
तर, त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची किंवा द्रव्य
दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
आणि
जर ती महिला स्पंदितगर्भा (गर्भवती महिलेला गर्भात बाळाची हालचाल जाणवणे) असेल तर,
सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा आणि द्रव्य दंडाची शिक्षा
होईल.
स्पष्टीकरण: जी महिला
स्वतःचा गर्भपात घडवून आणते, ती या कलमाच्या अर्थकक्षेत येते.
जो
कोणी, महिलेच्या संमतीशिवाय, कलम ८८ अन्वये गुन्हा करेल, मग
ती महिला स्पंदितगर्भा असो किंवा नसो, त्याला जन्मठेपेची किंवा दहा वर्षांपर्यंत
वाढू शकेल अशी कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्य दंडास देखील पात्र असेल.
(१) जो कोणी,
एखाद्या
महिलेचा गर्भपात घडवून आणण्याच्या उद्देशाने कोणतीही कृती करेल जी अशा महिलेच्या
मृत्यूस कारणीभूत ठरेल, त्याला दहा वर्षांपर्यंत कारावासाची आणि द्रव्य दंडाची शिक्षा
होईल.
(२) पोट-कलम
(१) मध्ये नमूद केलेले कृत्य त्या महिलेच्या संमतीशिवाय केले गेले असेल तर,
तो
जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र ठरेल.
स्पष्टीकरण: या अपराधासाठी,
त्या कृतीमुळे मृत्यू येणे हे संभवनिय आहे, याची जाणीव अपराध्याला असली पाहिजे हे आवश्यक नाही.
एखाद्या
मुलाच्या जन्मापूर्वी, जो कोणी, ते मूल जीवंत जन्माला येण्यापासून प्रतिबंध करण्याचा
किंवा त्याच्या जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने कोणतेही
कृत्य करतो आणि अशा कृत्यामुळे त्या मुलाला जीवंत जन्माला येण्यापासून रोखतो किंवा
जन्मानंतर त्याला मृत्यू घडवून आणतो त्याला, जर असे कृत्य आईचे प्राण
वाचविण्याच्या उद्देशाने सद्भावनेने केले नसल्यास, त्याला
दहा वर्षांपर्यंत मुदतीसाठी कारावासाची किंवा द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा
होऊ शकतात.
जर कोणी अशा परिस्थितीत एखादी कृती करील की, त्यामुळे तो मृत्यू कारण झाला
तर तो सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी होऊ शकेल आणि अशा कृतीमुळे स्पंदन पावणाऱ्या गर्भ
जीवाचा मृत्यू घडून आला तर त्याला दहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि द्रव्य दंडाची शिक्षा होईल
गर्भवती महिलेच्या मृत्यूस
कारणीभूत असण्याची शक्यता आहे हे जाणून, असे कृत्य केले आणि जर यामुळे त्या
महिलेचा मृत्यू झाला तर तो सदोष मनुष्यवध ठरेल.
तथापि, त्या महिलेला इजा होते
परंतु तिचा मृत्यू होत नाही; परंतु त्यामुळे तिच्या गर्भात
स्पंदन पावणार्या अजात गर्भजीवाचा मृत्यू होतो तर अशी व्यक्ती या कलमात
परिभाषित केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी ठरेल.
(१) जो कोणी, एखाद्या
व्यक्तीवर अॅसिड फेकून किंवा अॅसिड देऊन किंवा तिला इजा किंवा दुखापत करण्याच्या उद्देशाने
किंवा अशी इजा किंवा दुखापत होईल हे माहीत असताना त्या व्यक्तीला कायमस्वरुपी दुखापत
किंवा जबर इजा पोहोचवील त्याला, दहा वर्षेपेक्षा कमी नसेल आणि आजीवन
कारावासापर्यंत असू शकेल कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
परंतु असे की, असा दंड हा, पीडित
व्यक्तीच्या उपचारांचा वैद्यकीय खर्च भागविण्यास पुरेसा आणि वाजवी असेल.
परंतु आणखी असे की, या
कलमान्वये आकारलेला दंड पीडित व्यक्तीला देण्यात येईल.
(२) जो कोणी, एखाद्या
व्यक्तीला कायमस्वरुपी किंवा अंशिक हानी पोहोचविण्याच्या, व्यंग
निर्माण करण्याच्या किंवा भाजण्याच्या किंवा पंगू करण्याच्या किंवा त्या व्यक्तीला
विद्रुप करण्याच्या, अपंग करण्याच्या किंवा कायमस्वरूपी मृतवत करण्याचा
किंवा जबर हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीवर अॅसिड फेकील किंवा
फेकण्याचा प्रयत्न करील किंवा एखाद्या व्यक्तिला अॅसिड देईल किंवा अन्य कोणत्याही साधनाचा
वापर करील, त्याला, पाच
वर्षांपेक्षा कमी नसेल आणि सात वर्षांपर्यंत असू शकेल अशी कारावासाची
शिक्षा तसेच तो द्रव्य दंडाची शिक्षा होईल.
स्पष्टीकरण -१: या
कलमाच्या प्रयोजनार्थ, 'अॅसिड' यामध्ये, जे
आम्लधर्मी किंवा क्षारक पदार्थ आहेत ज्यामुळे विद्रुपता किंवा तात्पुरते किंवा
कायमस्वरुपी अपंगत्व निर्माण करण्यास सक्षम आहेत अशा पदार्थांचा समावेश
होतो.
स्पष्टीकरण -२: या
कलमाच्या प्रयोजनार्थ, कायमस्वरुपी किंवा आंशिक हानी किंवा कायमस्वरूपी मृतवत किंवा
पुन्हा मूळ स्वरुप प्राप्त न होणारेच असले पाहिजे असे नाही.
भारतीय न्याय संहितेमध्ये कलम १०१ अन्वये
‘खून’ या गुन्ह्याची व्याख्या नमूद आहे.
‘‘शरीराचा किंवा मालमत्तेचा खाजगीरीत्या बचाव
करण्याचा हक्क सद्भावपूर्वक बजावत असताना जर अपराध्याने आपल्याला कायद्याने
दिलेल्या अधिकाराचा अतिक्रम केला व जिच्याविरुध्द तो असा बचावाचा हक्क बजावत आहे
तिच्या मृत्यूस तो, तसे पूर्वनियोजित नसताना व अशा बचावासाठी
आवश्यक असेल त्याहून अधिक अपाय करण्याचा उद्देश नसताना कारणीभूत झाला तर, तो सदोष
मनष्यवध हा खून होत नाही’’.
म्हणजेच,
शरीराचा किंवा मालमत्तेचा खाजगीरीत्या बचाव
करण्याचा हक्क सद्भावपूर्वक बजावत असताना, तसे पूर्वनियोजित नसताना व अशा
बचावासाठी आवश्यक असेल त्याहून अधिक अपाय करण्याचा उद्देश नसताना जर अपराध्याचा
खून झाला तर, तो सदोष
मनष्यवध हा ‘खून’ ठरणार नाही.
n महिलांसाठीचे काही इतर महत्वाचे कायदे:
P अनैतिक
मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, १९५६
P हुंडा
प्रथा बंदी कायदा, १९६१
P बेकायदा
गर्भपात प्रतिबंध कायदा, १९७१
P बाल
विवाह प्रतिबंध कायदा, १९७६
P महिलांच्या
अश्लिल प्रदर्शनास प्रतिबंध कायदा, १९८६
P सती
प्रथा बंदी कायदा, १९८७
P महिला
गर्भ निदान प्रतिबंध कायदा, १९९४
P कौटुंबिक
हिंसाचारापासून महिलांचा संरक्षण कायदा, २००५
P नोकरी/कामाच्या
ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, तक्रार निवारण) कायदा, २०१२
l महिलांचे काही अन्य अधिकार:
महिला आपल्या
जोडीदाराला शारीरिक संबंधांसाठी नकार देऊ शकते.
एखाद्या
बलात्कार पीडित महिलेलाही मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार असतो. अशा
प्रकरणांमध्ये लीगल सर्व्हिस अॅथॉरिटीला महिलेसाठी वकिलाची व्यवस्था करावी लागते.
एखाद्या
प्रकरणात जर महिला आरोपी असेल तर तिची जी काही वैद्यकीय तपासणी केली जाईल ती
एखाद्या महिलेद्वारेच केली गेली पाहिजे.
वडिलोपार्जित
संपत्तीवरही महिला आणि पुरुषाचा हिंदू उत्तराधिकार अधिनियमांतर्गत समान हक्क आहे.
कामाच्या ठिकाणी
जर एखाद्या महिलेचे लैंगिक शोषण होत असेल तर ती लैंगिक शोषण अधिनियमांतर्गत
याविरुद्ध तक्रार दाखल करू शकते.
कोणत्याही महिलेला सुर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी, दंडाधिकाऱ्याची
विशेष परवानगीशिवाय अटक करता येत नाही.
खाजगी किंवा शासकीय नोकरीत असलेल्या महिलेला, तिच्या
प्रसुतीनंतर सहा महिन्यांची रजा मिळण्याचा अधिकार आहे. या काळात त्या महिलेला पूर्ण
पगार मिळण्याचा अधिकार आहे.
भारतीय
राज्यघटनेत महिलांना मोफत कायदेशीर मदतीचा अधिकारही देण्यात आला आहे. गरीब महिलेला
तिची केस लढण्यासाठी न्यायालयाकडून मोफत वकील उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
बलात्कार किंवा
लैंगिक शोषणासारख्या जघन्य गुन्ह्यांना बळी पडलेल्या महिलेला तिचे नाव लपविण्याचा
अधिकार देण्यात आला आहे.
b|b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महिलांसंबंधीत गुन्हे - भारतीय न्याय संहितेमधील नवीन तरतुदी. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !