महसुली नोंदी २१ ते ३०
WATCH VIDEO on MAHSULGURU YouTube Chanel
२१. शेतकरी पुरावा:
एका व्यक्तीने नोंदणीकृत दस्ताने शेतजमीन खरेदी केली त्यावेळी त्याच्या शेतजमिनीचा सात-बारा जोडला होता. त्याआधारे फेरफार नोंद नोंदविण्यात आली आहे. नोंद प्रमाणित करण्याआधी त्या व्यक्तीने त्याची ती शेतजमीन विकली. तर आता त्याला शेतकरी मानता येईल काय?
तरतूद: सदर व्यक्ती शेतजमीन खरेदी करतांना (दस्त नोंदणी दिनांकास) शेतकरी होती हे पुरेसे आहे. नोंद प्रमाणित करण्याआधी त्या व्यक्तीने त्याची ती शेतजमीन विकली तरी त्याला शेतकरी मानता येईल.
b|b
२२. संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या विभाजनानंतर:
संयुक्त कुटुंबाच्या
मालमत्तेच्या विभाजनानंतर, प्रत्येक सदस्याला वाटप केलेला हिस्सा कोणत्या
प्रकारचा असतो?
तरतूद: संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या विभाजनानंतर, प्रत्येक सदस्याला वाटप केलेला हिस्सा हा त्याची स्वतंत्र
मालमत्ता बनते आणि अशी मालमत्ता धारण करणाऱ्या व्यक्तीला ती विक्री करण्याचा, हस्तांतरित करण्याचा किंवा त्याचे मृत्युपत्र करण्याचा
अधिकार आहे.
(मा. सर्वोच्च
न्यायालय- दिवाणी अपील क्रमांक ५४०१/२०२२ (एसएलपी (सी) क्रमांक ६७९९ मधून
उद्भवणारी)- अंगादी चंद्रन वि. शंकर आणि इतर- निकाल दिनांक: २२.४.२०२५)
b|b
२३. वसुली अधिकार्यामार्फत पारित जप्ती आदेशाविरुध्द तक्रार :
खातेदाराने
एका सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर अदा केले नाहीत त्यामुळे सदर
सहकारी संस्थेने त्याची मालमत्ता जप्त केली. जप्ती आदेशाची फेरफार नोंद नोंदविण्यात
आली आहे. संबंधित खातेदाराने सदर फेरफार नोंदीवर आक्षेप दाखल केला आहे.
तरतूद: महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०, कलम १३८(१) अन्वये
निबंधक थकबाकी
असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी प्रमाणपत्र देतात, जे थकबाकी असलेल्या व्यक्तीला
पाठवले जाते.
कलम १३८(२) अन्वये
निबंधकाने दिलेले प्रमाणपत्र थकबाकीच्या वसुलीसाठी अंतिम आणि निर्णायक असते. हे प्रमाणपत्र जिल्हाधिकार्यांकडे पाठवले जाते, जे
मालमत्ता हस्तांतरण कायदा
१८८२, कलम १०२ आणि १०३ च्या तरतुदी आणि कलम १०४
अन्वये असलेल्या नियमांनुसार थकबाकी वसूल करतात. अशी थकबाकी जमीन महसुलाची
थकबाकी म्हणून वसूल केली जाते.
सक्षम अधिकार्याच्या आदेशान्वये नोंदविलेल्या
फेरफार नोंदी विरूध्द तक्रार करता येत नाही, जरूर तर अशा खातेदाराने जप्ती आदेशाविरूध्द
सक्षम न्यायालयात अपील दाखल करावे. अशी तक्रार फेटाळून सदर फेरफार नोंद प्रमाणित
करावी.
b|b
२४. वसुली अधिकार्यामार्फत पारित जप्ती आदेशाची नोंद:
खातेदाराने एका सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर अदा केले नाहीत त्यामुळे सदर सहकारी संस्थेने त्याची मालमत्ता जप्त केली. अशा जप्ती आदेशाची नोंद गाव नमुना सात-बाराच्या ‘कब्जेदार सदरी’ संबंधित सहकारी संस्थेच्या/ बँकेच्या नावे नोंदवावी काय?
तरतूद: नाही. सदर जप्ती आदेशान्वये संबंधित सहकारी संस्थेचा/ बँकेचा कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही. त्यामुळे गाव नमुना सात-बारा सदरी कब्जेदाराचे नाव कायम ठेऊन जप्ती आदेशाची नोंद ‘इतर हक्कात’ नोंदवावी.
सदर मिळकतीचा लिलाव झाल्यानंतर प्राप्त विक्री
प्रमाणपत्रानुसार, लिलाव घेणार्या व्यक्तीचे नाव कब्जेदार सदरी दाखल करता
येईल.
b|b
२५. कुळाच्या संमतीपत्राच्या आधारे विक्री:
इतर
अधिकारात कुळाचे नाव दाखल असलेल्या जमिनीच्या मालकाने त्रयस्थ व्यक्तीला जमीन
विकली आहे. सदर व्यवहाराला कुळाने संमती दिली आहे. सदर खरेदीखत आणि कुळाची संमती
या आधारे कुळाचे नाव अधिकार अभिलेखातून कमी करता येईल काय?
तरतूद: नाही, प्रथम कुळाने त्याचा कुळ हक्क समर्पित न करता, मूळ मालकाने तहसिलदारच्या (शेतजमीन न्यायाधिकरण) परवानगीशिवाय जमिनीचा व्यवहार करणे बेकायदेशीर आहे.
सदर खरेदीखत आणि कुळाची संमती या आधारे कुळाचे नाव अधिकार अभिलेखातून
कमी करता येणार नाही. त्यासाठी तहसिलदारचा आदेश अनिवार्य आहे.
b|b
२६. इकरार नोंद :
सहकारी
बँकेमार्फत कोणतेही नोंदणीकृत गहाणखत न करता कर्ज घेऊन, फक्त बँकेने पाठविलेल्या
एका फॉर्मच्या आधारे अशा कर्जाची नोंद सात-बारा सदरी ‘इतर हक्कात’ नोंदविता येते
काय?
तरतूद: होय, ‘इकरार’ या शब्दाचा अर्थ ‘संमती’ (Consent/declaration) असा आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१,
नियम
४८(५) अन्वये,
सहकारी संस्थेचा सभासद असलेला कोणताही खातेदार,
शेतजमिनीतील त्याच्या क्षेत्रावर सहकारी विकास सोसायटी किंवा सहकारी बँकेकडून शेतीच्या
विकासासाठी कर्ज घेतो, अशा व्यवहाराची
नोंद उक्त नियमान्वये सहकारी विकास सोसायटी किंवा सहकारी बँकेच्या फॉर्म ‘एम’ स्वरूपातील
नोंदवहीमध्ये केली जाते.कर्जाबाबत फॉर्म ‘एल’ दिला जातो आणि अशा फॉर्म ‘एल’ अन्वये
अशा कर्जाची नोंद खातेदाराच्या नावे गाव नमुना सात-बाराच्या ‘इतर अधिकारात’
‘इकरार’ म्हणून नोंदवली जाते. सहकारी विकास संस्था किंवा सहकारी बँकेकडून घेतलेल्या
ठराविक रकमेच्या कर्जासाठी नोंदणीकृत दस्तऐवज आवश्यक नाही.
b|b
२७. स्वकष्टार्जित मिळकतीची विक्री :
एखाद्या व्यक्तीला त्याची स्वकष्टार्जित मिळकत, स्वत:च्या हयातीत विकण्यासाठी त्याच्या पत्नी, मुले, मुली यांची परवानगी आवश्यक आहे काय?
तरतूद: नाही, कोणत्याही व्यक्तीला त्याची स्वकष्टार्जित मिळकत, स्वत:च्या हयातीत विकण्यासाठी त्याच्या पत्नी, मुले, मुली यांची परवानगी आवश्यक नाही.
जीवंत व्यक्तीला वारस नसतो. हिंदू कायद्यानुसार, एखाद्या पुरुषाच्या
मुलांना, पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर त्याची वर्ग-१ ची वारस म्हणून, त्याच्या
वडिलोपार्जित तसेच स्वकष्टार्जित मालमत्तेत हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे, त्याच्या
हयातीत असा अधिकार त्यांना नाही.
तथापि, जर पतीने, पत्नी आणि मुलांचे नाव
वगळून त्याच्या स्व-संपादित मालमत्तेचे मृत्युपत्र केले असेल तर मृत्युपत्राला
प्राधान्य मिळेल.
b|b
२८. प्रोबेटची अनिवार्यता:
प्रत्येक मृत्युपत्राचे प्रोबेट अनिवार्य आहे
काय?
तरतूद: नाही, भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५
अन्वये, बंगालच्या तत्कालीन लेफ्टनंट-गव्हर्नरच्या अधिपत्याखाली असलेल्या ठिकाणी
किंवा मद्रास आणि मुंबई येथील न्यायपालिकेच्या सामान्य मूळ नागरी
अधिकारक्षेत्राच्या स्थानिक हद्दीत मृत्युपत्र केले जाते तेव्हा प्रोबेट अनिवार्य
आहे. याचा अर्थ पश्चिम बंगाल राज्य आणि सध्याच्या काळात अनुक्रमे चेन्नई आणि मुंबई
या महानगरपालिका हद्दी असा समजला जाऊ शकतो. एखादे मृत्युपत्र या ठिकाणांच्या
भौगोलिक मर्यादेत असल्यास, मृत्युपत्र कोणत्याही स्थावर मालमत्तेशी
संबंधित नसले तरीही, प्रोबेट अनिवार्य आहे. उक्त तीनही नगरांच्या हद्दीत
मालमत्ता समाविष्ट नसल्यास,
मृत्युपत्राचे प्रोबेट अनिवार्य नाही.
b|b
२९. एकाच वेळी ताबा साठेखत आणि खरेदीखत :
एका खातेदाराने त्याच्या मालकी हक्काच्या शेतजमिनीचे नोंदणीकृत ताबा साठेखत आधी ‘अ’ ला करून दिले. त्यानंतर त्याच महिन्यात त्याने तीच शेतजमीन ‘ब’ ला नोंदणीकृत दस्ताने विकली. या व्यवहारांच्या नोंदी अधिकार अभिलेखात कशा होतील?
तरतूद: सदर मिळकतीचे नोंदणीकृत ताबा साठेखत आधी आणि खरेदीखत नंतर झाले आहे. मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५३-अ अन्वये ‘अ’ ला सदर मिळकत ताब्यात ठेवण्याचा हक्क प्राप्त होतो परंतु मालकी हक्क प्राप्त होत नाही.
त्यामुळे ‘अ’ चे नाव इतर हक्कात दाखल करण्यात
येईल आणि त्यानंतर केलेल्या नोंदणीकृत खरेदी दस्तानुसार, ‘ब’ चे नाव कब्जेदार
सदरी दाखल करण्यात येईल.
जरूर तर ‘ब’ ने ताब्यासाठी दिवाणी न्यायालयात
दाद मागणे आवश्यक आहे.
b|b
एक खातेदार मयत झाला असून त्याला पत्नी व तीन मुले असे एकूण चार वारस आहेत असा अर्ज प्राप्त झाला आहे. त्याआधारे वारस नोंद नोंदविण्यात आली आहे. मयत खातेदारास एक मुलगी असून ती मयत खातेदाराचे थोरले बंधू यांना दत्तक दिली आहे असे स्थानिक चौकशीत कळले. परंतु तिच्या दत्तक ग्रहणासंबंधीत कोणत्याही प्रकारचे कायदेशीर लेखी कागदपत्र उपलब्ध नाहीत. तसेच त्या दत्तक गेलेल्या मुलीची सदर उक्त वारस नोंदीबाबत कोणतीही हरकत नाही.
तरतूद: भारतीय साक्ष अधिनियम २०२३, कलम १०४, १०५ अन्वये, जो जे म्हणतो ते त्याने सिद्ध करणे आवश्यक आहे. दत्तक ग्रहणाचा पुरावा नसेल तर दत्तक ग्रहण मान्य करता येणार नाही. वारस दाखल करतांना दत्तक गेलेल्या मुलीसह पाच वारस दाखल करावी. दत्तक गेलेल्या मुलीला जर वारस हक्क नको असेल तर तिने वारस नोंद झाल्यानंतर कायदेशीरपणे बक्षीसपत्र / हक्कसोडपत्र करून द्यावे.
b|bRate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महसुली नोंदी २१ ते ३०. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !