आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

प्रतिबंधीत सत्ताप्रकार जमिनी – FAQs

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

प्रतिबंधीत सत्ताप्रकार जमिनी – FAQs

प्र. १. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१, कलम २७ अन्वये देण्यात आलेल्या किंवा कलम २८ अन्वये प्रदान केलेल्‍या जमिनीचा शर्तभंग नियमानुकुल करता येईल काय?

 उ. होय. महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) अधिनियम, २०१८, दिनांक १५.१२.२०१८ अन्‍वये, कलम २९ मध्ये सुधारणा करून, उक्‍त अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकानंतर सदर तरतुदींच्या उल्लंघनाकरिता जिल्‍हाधिकार्‍यांमार्फत कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात येणार नाही, अशी कोणतीही जमीन सरकारजमा करता येणार नाही.

आणि अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, जर कार्यवाही आधीच सुरू करण्यात आलेली असेल तर, अशी कार्यवाही रद्दबातल होईल आणि जिल्हाधिकारी तशा आशयाचा आदेश पारीत करतील.

उक्‍त अधिनियम, २०१८ याच्या प्रारंभानंतर, जर हस्तांतरकर्ता, हस्तांतरिती किंवा अशा जमिनीत हितसंबंधित असलेली इतर कोणतीही व्यक्ती ही, प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार अशा जमिनीच्या निश्चित केलेल्या बाजार मूल्याच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशी रक्कम प्रदान करील तर सदर कायद्‍यातील तरतुदींचे उल्लंघन करून केलेला व्‍यवहार नियमानुकुल करता येईल.

 प्र. २. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१, कलम २७ अन्वये प्रदान केलेल्‍या जमिनी धारणाधिकार वर्ग-एक मध्‍ये रूपांतरीत करता येतील काय?

 उ. नाही. तथापि, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ मधील कलम २८- १ अअ मधील पोट कलम (३) मधील तरतूदीनुसार ज्या व्यक्तीनीं (खंडकरी शेतकऱ्यांनी) औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या जमिनी पट्टयाने (खंडाने) दिलेल्या होत्‍या अशा माजी खंडकरी शेतकरी यांना वाटप करण्यात आलेल्या जमीनी भोगवटादार वर्ग-२ वरून भोगवटादार वर्ग-१ करण्यासंदर्भात तरतूद आहे.

 प्र. ३. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१, कलम २९ अन्वये प्रदान केलेल्‍या जमिनींची अदलाबदल करता येईल काय?

 उ. होय. महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा कमी करणे) (अतिरिक्त जमिनीची वाटणी) व (सुधारणा) नियम, १९७५,  नियम १२ (ई) मधील दिनांक १ जानेवारी १९७६ रोजीच्‍या सुधारणेनुसार, जर धारकाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या मालकीच्या आणि तो जातीने कसत असलेल्या जमिनीच्या मूल्याच्या किंवा जवळजवळ तेवढ्याच मूल्याच्या जमिनीशी किंवा आपल्या धारण जमिनीचा एक सलग गट बनविण्याचा किंवा तीच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एखाद्या जमीन मालकाद्वारे त्याच गावातील त्याच्या मालकीच्या किंवा तो जातीने कसत असलेल्या जमिनीच्या मूल्याच्या किंवा जवळजवळ तेवढयाच मूल्याच्या जमिनीशी अदलाबदल करण्यात येत असेल तर जिल्हाधिकार्‍यांना, जमिनीच्या अशा हस्तांतरणास मंजुरी देता येईल. तथापि, सीलिंगधारकाकडे अदलाबदलीनंतर येणारी जमीन धारणाधिकार वर्ग २ ची असेल.

परंतु, धारकापैकी कोणीही मालक म्हणून किंवा कूळ म्हणून किंवा अंशतः मालक व अंशतः कूळ म्हणून धारण केलेली किंवा तो जातीने कसत असलेली एकूण जमीन ही अशा अदलाबदलीच्या परिणामी कमाल मर्यादा क्षेत्रापेक्षा जास्त होणार नाही.

 प्र. ४. सीलिंग जमिनीची कोणत्‍या कारणांसाठी विक्री परवानगी देण्‍यास जिल्‍हाधिकारी सक्षम आहेत?

 उ. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ मधील कलम २९ मधील तरतुदीनुसार व अधिनियमातील शक्तीप्रदानाद्वारे करण्यात आलेल्या महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा कमी करणे) (अतिरिक्त जमिनीचे वाटप ) आणि (सुधारणा) नियम १९७५ विहीत करण्यात आलेले आहेत.

सदर नियम १९७५ यातील नियम १२ अन्‍वये, भूमिहीनांना वाटप केलेल्या जमिनीची विक्री करण्यास परवानगी देण्यास जिल्हाधिकारी यांना अधिकार प्रदान केलेले होते. सदर प्रयोजनामध्ये जमिनीचे शेतीसाठी विक्रीचे प्रयोजन नसल्याने त्याकरीता परवानगी देण्यास जिल्हाधिकारी सक्षम नाहीत अशा प्रकारच्या सूचना शासन पत्र क्र. १३८७/२६७७७/प्र.क्र. ३६६/ल-७, दि. २२.८.८८ अन्वये दिलेल्या आहेत.

 नियम १९७५ यातील नियम १२ अन्‍वये जिल्हाधिकार्‍यांना पुढीलपैकी कोणत्याही परिस्थितीत जमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी देता येईल.---

(अ) एखाद्या औद्योगिक उपक्रमाला त्या उपक्रमाद्वारे चालविले जात असलेल्या किंवा चालवले जाईल अशा कोणत्याही खर्‍याखुर्‍या औद्योगिक कामासाठी जमीन आवश्यक असेल तर;

(ब) एखाद्या खर्‍याखुर्‍या कृषीतर प्रयोजनासाठी जमीन आवश्यक असेल तर,

(क) कोणत्याही शैक्षणिक किंवा धर्मादाय संस्थेच्या लाभासाठी जमीन आवश्यक असेल तर,

(ड) एखाद्या सहकारी संस्थेस जमीन आवश्यक असेल तर,

(इ-१) जर जमीन धारक, ६५ किंवा अधिक वर्षे वयाचा किंवा इतर कोणत्याही आजा स्वतः शेती व्यवसाय चालू ठेवण्यास असमर्थ असल्याचे सिव्हील सर्जनचे प्रमाणपत्र सादर केल्यास,

(ई) जर जमिनीची --- (अदलाबदल)

(एक) धारकाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या भालकीच्‍या आणि तो जातीने कसत असलेल्‍या जमिनीच्या मुल्‍याच्‍या किंवा जवळजवळ तेवढ्‍याच मूल्याच्या जमिनीशी किंवा

(दोन) आपल्या धारण जमिनीचा एक सलग गट बनविण्‍याचा किंवा तीच्या अधिक चांगल्या

व्यवस्थापनाच्या एखाद्या जमीन मालकाद्वारे त्याच गावातील त्याच्या मालकीच्या किंवा ती जातीने कसत असलेल्या जमिनीच्या मूल्याच्या किंवा जवळजवळ तेवढयाच मूल्याच्या जमिनींची अदलाबदल करण्यात येत असेल तर,

परंतु धारकापैकी कोणीही मालक म्हणून किंवा कूळ म्हणून किंवा अंशतः मालक व अंशत: कूळ म्हणून धारण केलेली किंवा तो जातीने कसत असलेली एकूण जमीन ही जमिनीच्‍या अदलाबदलीच्या परिणामी कमाल मर्यादा क्षेत्रापेक्षा जास्त होणार नाही;

(फ) अपंग असणारा पट्टाकार जमीन भाडेपट्ट्याने देत असेल तर,

 (ग) जमिनीच्या मयत अनुदानग्राहीचे वारस किंवा उत्तरजीवी यांच्यात जमिनीची वाटणी करण्यात येत असेल आणि वाटणीत भाग निश्चित केल्यानंतर तो भाग असलेली जमीन कोणत्याही व्यक्तीस मिळाली नसेल तर,

परंतु खंड (अ) आणि (ब) खाली मोडणाऱ्या जमिनीच्या बाबतीत नावावर करून देणाऱ्याने अनार्जित प्राप्तीच्या ७५ टक्क्यांऐवढी रक्कम, म्हणजेच चालू बाजारभाव आणि अर्जदारास मूळतः ज्या भोगवटा किंमतीत जमीन देण्यात आलेली होती ती किंमत यामधील फरकाच्या ७५ टक्के एवढी रक्कम आणि खंड (क), (ड). (ड-१) खाली मोडणार्‍या जमीनीच्या हस्तांतरणाबाबतीत अनार्जित प्राप्तीच्या ५० टक्के एवढी रक्कम शासनास देण्याचे मान्य केल्याखेरीज जमिनीच्या कोणत्याही हस्तांतरणास मान्याता देता येणार नाही.

 प्र. ५. सीलिंग जमिनीची कृषि व्यवसायांसाठी विक्री परवानगी देता येते काय?

 उ. महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. आयसीएच/१३८७/२६७७७ /प्रक्र. ३६६-ल-७, दिनांक २२ ऑगस्ट १९८८ अन्‍वये, महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ मधील कलम २९ मधील तरतुदीनुसार व त्या कायद्‍याखाली अतिरिक्त जमिनीच्या वाटपासाठी केलेल्या नियम, १९७५ यातील नियम १२ अन्वये नमूद केलेल्या परिस्थितीत योग्य त्याकारणांसाठी [उदा. औद्योगिक प्रयोजनासाठी, शैक्षणिक संस्थांच्या उपयोगासाठी, अकृषिक कामासाठी] भूमिहिनांना वाटप केलेल्या जमिनी जमिनीच्या शेतसार्‍याच्या ४० पट नजराणा घेऊन विक्री करण्याला परवानगी देण्याला जिल्हाधिकारी सक्षम आहेत. मात्र भूमिहिनाना वाटप केलेल्या जमिनी कृषि व्यवसायांसाठी विक्री करण्याला परवानगी देण्याला जिल्हाधिकारी सक्षम नाहीत.

 प्र. ६. वक्फ मालमत्तेची विक्री, बक्षीस, अदालाबदल, गहाण, भाडेपट्टा किंवा तिचे हस्तांतरण करता येते काय?

 उ. नाही. केंद्र शासनाच्‍या वक्फ अधिनियम १९९५, कलम ५१ अन्‍वये वक्फ मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय  कोणत्याही वक्फ मालमत्तेचा भाडेपट्टा निष्‍प्रभ असेल. तसेच, कलम ५१(-) अन्वये वक्फ मालमत्तेची कोणतीही विक्री, अशी मालमत्ता बक्षीस म्हणून देणे, त्‍यांची अदालाबदल करणे, ती गहाण ठेवणे, किंवा तिचे हस्तांतरण करणे असे व्यवहार अवैध आणि निष्‍प्रभ ठरतात.

वक्फ अधिनियम १९९५, कलम ५२ आणि ५२-ए अन्‍वये वक्फ मालमत्तेचे असे व्‍यवहार झाल्‍यास ती मालमत्ता पूर्वववत वक्फ मंडळाच्या ताब्यात देण्याची तरतूद आहे.

 प्र. ७. कुळाला मालक म्‍हणून मिळालेली, धारणाधिकार वर्ग दोन ची जमीन वर्ग एक मध्‍ये रुपांतरीत करता येईल काय?

 उ. होय, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ४३; हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९५०, कलम-५०(ब); मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग) अधिनियम १९५८,  कलम-५७ मध्ये कुळ हक्काने मिळालेल्या जमीनी विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेण्याची असलेली तरतूद, सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक  १, दिनांक ७.२.२०१४ अन्वये सुधारीत करण्यात आली आहे.

ज्या जमिनी कुळकायद्यातील तरतुदीनुसार कुळहक्क मान्य होऊन कुळांनी खरेदी केलेल्या आहेत, अशा खरेदीच्या दिनांकापासून (खरेदी प्रमाणपत्र मिळाल्‍याच्‍या तारखेपासून) १० वर्षे पूर्ण झालेल्या जमीनींची खरेदी-विक्री करताना जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही.

 अशा जमिनींची खरेदी/ विक्री/ देणगी/ अदलाबदल/ गहाण/ पट्टा/ अभिहस्तांतरण करण्यासाठी किंवा भविष्‍यातील सोय म्‍हणून, अशा मालक झालेल्‍या कुळाने, तहसिल कार्यालयास लेखी अर्ज करावा. असा अर्ज मिळाल्यानंतर दोन दिवसात तहसिल कार्यालय, त्‍या अर्जदारास, तो विक्री करणार असलेल्या शेतजमिनीची महसूल आकारणीच्या चाळीस पट नजराणा रकमेचे, लेखाशिर्ष नमूद असलेले चलन तयार करुन देते. ही चाळीस पट नजराणा रक्कम संबंधीत शेतकर्‍याने, चलनाव्दारे शासकीय कोषागारात जमा करावी. त्यानंतर त्‍याच्‍या सात-बारावर असलेला 'प्रतिबंधीत सत्ताप्रकार’ हा शेरा कमी होऊन त्‍याची जमीन धारणाधिकार वर्ग एक मध्‍ये रुपांतरीत होऊन त्‍याच्‍या जमिनीवरील सर्व प्रतिबंध संपुष्‍टात येतील.

तथापि, अशी जमीन विक्री करतांना,

() खरेदीदार शेतकरी असावा;

() खरेदीदाराकडे महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण नसावी. आणि

() मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ याच्या तरतुदींचे उल्लंघन केले जाणार नाही.

 परंतु, जर खरेदी प्रमाणपत्र मिळाल्‍याच्‍या तारखेपासून १० वर्षे पूर्ण झाली नसतील  तर त्‍याला सक्षम अधिकार्‍याकडून जमीन विक्रीची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल.

 प्र. ८. एखाद्‍या जमीनमालकाने, शेतजमीन न्‍यायाधिकरणाच्‍या (तहसिलदारच्‍या) परवानगीशिवाय, त्‍याची जमीन त्‍याच्‍या कुळाला विकत दिली असेल तर काय कार्यवाही करता येते?

 उ. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ८४ क(२) अन्‍वये,

शेतजमीन न्‍यायाधिकरण, उक्‍त प्रकरणात चौकशी केल्यानंतर, जमीनमालकाने, जमिनीच्या कुळाकडे जमिनीचे हस्तांतरण केले असेल आणि कुळ स्वतः जी कोणतीही इतर जमीन व्यक्तिशः कसत असेल त्या जमिनीचे क्षेत्रफळ धरून अशा रीतीने हस्तांतरित केलेल्‍या जमिनीचे क्षेत्रफळ हे जमीन धारणेच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक होत नसेल त्याबाबतीत,

(एक) जर जमिनीची किंमत म्हणून जमीनमालकास मिळालेली रक्कम ही कलम ६३-अ अन्वये निर्धारित करण्यात आलेल्या वाजवी किंमती इतकी किंवा तिच्यापेक्षा कमी असेल आणि हस्तांतरितीने राज्य शासनाला, शेतजमीन न्‍यायाधिकरण निश्चित करील अशा तीन महिन्यांपेक्षा जास्त नसलेल्या कालावधीत एक रुपया शास्ती दिली असेल;

(दोन) जर जमिनीची किंमत म्हणून जमीन मालकास मिळालेली रक्कम ही कलम ६३-अ अन्वये निर्धारित करण्यात आलेल्या वाजवी किंमतीपेक्षा जास्त असेल आणि हस्तांतरकाने व त्याचप्रमाणे हस्तांतरितीने राज्य शासनाला, शेतजमीन न्‍यायाधिकरण निर्धारित करील त्या कालावधीत, प्रत्येकी वाजवी किंमतीच्या एक-दशांश इतकी शास्ती दिली असेल तर, मामलेदार असे हस्तांतरण विधिअग्राह्य आहे असे घोषित करणार नाही.

 प्र. ९. कुळ कायद्‍याच्‍या तरतुदीविरूध्‍द झालेल्‍या व्‍यवहाराविरूध्‍द काय कार्यवाही करता येते?

 उ. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्‍या तरतुदींविरूध्‍द झालेले हस्‍तांतरण किंवा संपादन कलम ८४ क, पोट-कलमे (१) ते (५) अन्‍वये विधिअग्राह्‍य ठरविण्‍याची तरतूद कायद्‍यात होती.

तथापि, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक २९, भाग चार, दिनांक ७.५.२०१६ अन्‍वये, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१६ पारीत करून कलम ८४ क पोटकलम (६) समाविष्‍ठ करून निर्देशीत केले आहे की,

 (६) पोट-कलमे (१) ते (५) यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी,

(एक) जर अशा जमिनीच्या हस्तांतरणाच्या किंवा संपादनाच्या बाबतीत पोट-कलम (१) खालील कार्यवाही ही, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन, हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१६ याच्या प्रारंभाच्या दिनांकानंतर (७.५.२०१६) सुरू झाली असेल किंवा ती प्रारंभाच्या दिनांकापूर्वी सुरू करण्यात आलेली असेल, परंतु, प्रारंभाच्या दिनांकास किंवा दिनांकाच्या पूर्वी पोट-कलम (२) अन्वये कोणताही आदेश पारीत करण्‍यात आला नसेल; आणि

(दोन) जर शेतकरी असलेल्या हस्तांतरितीने धारण केलेल्या, इतर जमिनीचे, कोणत्याही असल्यास, क्षेत्र धरून अशा जमिनीचे क्षेत्र हे, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या जमीन धारणेच्या कमाल क्षेत्राहून अधिक होत नसेल; आणि

(तीन) जर अशी हस्तांतरित किंवा संपादित केलेली जमीन ही,

(अ) केवळ शेतीविषयक प्रयोजनांसाठीच वापरण्यात येत असेल, आणि हस्तांतरितीने (कुळ वगळून) वार्षिक दर विवरणपत्रानुसार, अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पन्नास टक्के एवढी रक्कम प्रदान केली असेल; किंवा

(ब) शेतीविषयक प्रयोजनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी वापरण्यात येत असेल व हस्तांतरितीने वार्षिक दर विवरणपत्रानुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पंचाहत्तर टक्के एवढी रक्कम प्रदान केली असेल,

तर, मामलेदार अशा कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा संपादन विधिअग्राह्य आहे असे घोषित करणार नाही.

 प्र. १०. दिनांक ६.७.१९७४ पूर्वी एखाद्‍या आदिवासी व्‍यक्‍तीने, त्‍याची जमीन बिगर आदिवासी व्‍यक्‍तीला हस्‍तांतरीत केली असेल तर ती परत मिळवता येते काय?

 उ. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम ३६(२) अन्‍वये, कलम ३६(१) अन्‍वयेच्‍या तरतुदी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि कुळवहिवाट कायदा (सुधारणा) अधिनियम, १९७४ याच्या प्रारंभी किंवा प्रारंभानंतर जमातीतील व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या नावे केलेल्या वहिवाटींच्या हस्तांतरणास लागू होणार नाही.

(Notwithstanding anything contained in the foregoing sub-section occupancies of persons belonging to the Scheduled Tribes (hereinafter referred to as the ‘Tribals’) (being occupancies wherever situated in the State), shall not be transferred except with the previous sanction of the Collector :

Provided that, nothing in this sub-section shall apply to transfer of occupancies made in favour of persons other than the Tribals (hereinafter referred to as the ‘non-Tribals’) on or after the commencement of the Maharashtra Land Revenue Code and Tenancy Laws (Amendment) Act, 1974)

 प्र. ११. एखाद्‍या आदिवासी व्‍यक्‍तीची जमीन, शासन/जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या पूर्व परवानगीशिवाय बिगर आदिवासी व्‍यक्‍तीकडे हस्‍तांतरित करण्‍यात आली असेल तर अशी जमीन परत मिळविण्‍यासाठी ती आदिवासी व्‍यक्‍ती कधीपर्यंत अर्ज करू शकते?

 उ.  एखाद्‍या आदिवासी व्‍यक्‍तीची जमीन, शासन/जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या पूर्व परवानगीशिवाय बिगर आदिवासी व्‍यक्‍तीकडे हस्‍तांतरित करण्‍यात आली असेल तर अशी जमीन परत मिळविण्‍यासाठी ती आदिवासी व्‍यक्‍ती दिनांक ६ जुलै २००४ पासून तीस वर्षाच्‍या आत अर्ज करू शकेल.

जमीन हस्‍तांतरण केलेला मूळ आदिवासी मयत झाला असेल तर त्‍याचे वारस याबाबत अर्ज करू शकतील.

 बिगर आदिवासी व्‍यक्‍तीची जमीन आदिवासी व्‍यक्‍तीने विकत घेतल्‍यानंतर तिचे पुन्‍हा बिगर आदिवासी व्‍यक्‍तीकडे हस्‍तांतरण करतांना शासनाची पूर्व परवानगी आवश्‍यक आहे.

 प्र. १२. आदिवासीच्या बिनशेती परवानगी मिळालेल्या जमिनीवरील वहिवाटीस कलम ३६ व ३६ अ च्या तरतुदी लागू आहेत काय?

 उ. मा. आयुक्त, नाशिक यांना, महसूल व वन विभाग, पत्र क्र. आदिवासी ३२९६/प्र.क्र.२२२२/-ल-९ दि. ५.२.१९९७ अन्वये मा. उप सचिव यांनी दिलेल्‍या उत्तरानुसार,

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३६ व ३६ अ अन्वये आदिवासीच्या जमीन हस्तांतरणावर निर्बंध आहेत. तसेच उक्त कलमात "जमिनीवरील वहिवाट" हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्यातशेतीची जमीन' अथवा 'बिनशेती परवानगी मिळालेली जमीन' असा स्पष्ट फरक करण्यात आलेला नाही. म्हणजेच आदिवासीच्या शेतजमिनी व बिनशेती परवानगी मिळालेल्या जमिनीवरील वहिवाटीस उक्त कलम ३६ व ३६ अ च्या तरतुदी लागू आहेत.

परंतु, अशी बिनशेती परवानगी मिळालेली जमीन, जोपर्यंत जमिनीच्या स्वरूपात राहील तोपर्यंतच त्या जमिनींना उक्त कलमाच्या तरतूदी लागू राहतील. जर तिच्यावर बांधकाम करून तिचे स्वरूप बदलून (उदा. घरांचे बांधकाम करून) तिचा वापर आदिवासी जरी करीत असेल तर त्या जमिनीला उक्त कलमाच्या तरतूदी लागू होणार नाहीत.

 प्र. १३. प्रतिबंधीत सत्ताप्रकारच्‍या जमिनीबाबत केलेले मृत्‍युपत्र वैध ठरेल काय?

 उ. मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या, मा. श्री. उदय उमेश ललित, मा. श्रीमती इंदू मल्होत्रा आणि मा. श्री. ए.एस. बोपण्णा या न्‍यामुर्तींच्‍या तीन सदस्‍सीय विभागीय खंडपीठाने, दिनांक १५.६.२०२० रोजी, दिवाणी अपील क्रमांक २५७३/ २०२० व इतर (SLP (C) क्रमांक १८५२५/२००९ मधून उद्भवलेले इ.) विनोदचंद्र सक्रलाल कपाडिया इ. विरुद्ध गुजरात राज्य आणि इतर या प्रकरणात निकाल देऊन स्‍पष्‍ट केले आहे की, प्रतिबंधित सत्ताप्रकारच्‍या जमिनीबाबत केलेले मृत्‍युपत्र अवैध ठरेल.

मृत्‍युपत्राद्‍वारे मालमत्ता देणे हे जरी ʻहस्तांतरणʼ या संज्ञेमध्‍ये समाविष्ट होत नसले तरीही, अंमलात असलेल्‍या कोणत्‍याही कायद्याचे उल्लंघन करून मृत्युपत्र केले असल्यास, अशा इच्छेकडे दुर्लक्ष करण्याची सक्षम प्राधिकरणाला नेहमीच सूट असते आणि अशा इच्छेच्या आधारावर फेरफार नोंदवून नाव बदलण्यास नकार देता येतो.

 प्र. १४. हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५४, मदतमाश जमिनी धारणाधिकार वर्ग एक मध्‍ये रूपांतरीत करता येतात काय?

 उ. हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५, दिनांक १४ ऑगस्ट २०१५ अन्‍वये सुधारणा करण्‍यात आल्‍याप्रमाणे, उक्‍त अधिनियम, १९५४ च्‍या कलम ६ मध्ये, पोट-कलम (३) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात आले.

" (३) (अ) हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५ याच्या प्रारंभाच्या दिनांकास (दिनांक १४ ऑगस्ट २०१५) किंवा त्यानंतर, भोगवटादारास नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग दोन ) धारण केलेल्या मदत माश इनाम जमिनींचा भोगवटा, कृषीसंबंधी प्रयोजनासाठी हस्तांतरित करता येईल आणि अशा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी किंवा इतर कोणताही सक्षम प्राधिकारी याच्याकडून कोणतीही पूर्वमंजुरी किंवा कोणतेही ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता असणार नाही, अशा हस्तांतरणानंतर असा हस्तांतरिती भोगवटादार अशा जमिनीचा भोगवटा, नवीन व अविभाज्य शतीवर (भोगवटादार वर्ग दोन ) धारण करणे चालू ठेवील.

 परंतु प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यानंतर, भोगवटादारास नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग दोन) धारण केलेला असा कोणताही भोगवटा, अशा जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या पाच टक्के इतकी रक्कम नजराणा म्हणून शासनाला प्रदान करून, भोगवटादार वर्ग एक मध्ये रुपांतरित करता येईल, आणि अशा रुपांतरणानंतर भोगवटादार, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ याच्या तरतुदींनुसार अशी जमीन भोगवटादार वर्ग एक म्हणून धारण करील.

परंतु, प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यानंतर जर भोगवटादाराकडून नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग दोन ) धारण केलेला कोणताही भोगवटा, जिल्हाधिकार्‍यांच्या किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि अशा जमिनीच्या चालू बाजार मूल्यांच्या पाच टक्के इतकी रक्कम प्रदान करण्यात आल्याशिवाय कृषीतर उपयोगासाठी हस्तांतरित करण्यात आला असेल तर, अशा जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या पाच टक्के इतकी रक्कम नजराणा म्हणून आणि अशा रकमेच्या पाच टक्के इतकी रक्कम दंड म्हणून प्रदान करण्यात आल्यावर असे हस्तांतरण नियमित करता येईल आणि अशी रक्कम प्रदान करण्यात आल्यावर भोगवटादार वर्ग एक म्हणून धारण करील.

 (ब) प्रारंभाच्या दिनांकापूर्वी जर भोगवटादाराने नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग दोन ) धारण केलेल्या मदद मश इनाम जमिनींच्या कोणत्याही भोगवट्याचे जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकान्याच्या पूर्वमंजुरीशिवाय किंवा ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय कृषीसंबंधी प्रयोजनासाठी, आधीच हस्तांतरण केले असेल तर अशा हस्तांतरणाचा पुरावा म्हणून, त्याचे विक्री खत, बक्षीसपत्र, इत्यादींसारखे नोंदणीकृत संलेख सादर केल्यानंतर, नजराणा म्हणून कोणतीही रक्कम प्रदान न करता, असे हस्तांतरण नियमित करता येईल. असे हस्तांतरण नियमित करण्यात आल्यानंतर, अशा जमिनीचा भोगवटा अशा हस्तांतरिती भोगवटादाराने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ याच्या तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग दोन म्हणून धारण केला असल्याचे मानण्यात येईल.

परंतु, प्रारंभाच्या दिनांकापूर्वी जर भोगवटादाराकडून नवीन आणि अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार- वर्ग दोन) धारण केलेल्या मदत माश इनाम जमिनींचा असा कोणताही भोगवटा, जिल्हाधिकार्‍यांच्या किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वमंजुरीशिवाय कृषीतर उपयोगासाठी आधीच हस्तांतरित करण्यात आला असेल तर, अशा नियमितीकरणाच्या आदेशाच्या दिनांकास अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पाच टक्के इतकी रक्कम नजराणा म्हणून आणि अशा रकमेच्या दहा टक्के इतकी रक्कम दंड म्हणून प्रदान केल्यानंतर असे हस्तांतरण नियमित करता येईल आणि अशी रक्कम प्रदान करण्यात आल्यावर, भोगवटादाराने, ती जमीन अशा आदेशाच्या दिनांकापासून भोगवटादार- वर्ग एक म्हणून धारण केली असल्याचे मानण्यात येईल.

सदर तरतुदी, वक्फ अधिनियम, १९९५ याच्या तरतुदींखाली जी प्रशासित केली जाते अशी वक्फ म्हणून कायमस्वरूपी समर्पित केलेली मालमत्ता, खिदमत माश (सेवा इनाम ) जमिनी, ज्यांचा काही भाग हा मुंतखब (सनद) याच्या अटी व शर्तीस अधीन राहून देवस्थानाच्या खिदमतीकरिता (सेवेकरिता) दिलेला असेल अशा मदत माश इनाम जमिनी आणि त्या वेळेच्या शासनाने दिलेल्या मूळ सरकारी जमिनी यांना लागू होणार नाही.

 प्र. १५. इनामवर्ग ६ ब - महार वतनाच्‍या जमिनीबाबत काय तरतुदी आहेत?

 उ. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, परिपत्रक क्र. बीआयडब्ल्यू / ३०७७-२०३२८-एल- ५ दिनांक ७.९.१९७७ अन्वये, इनामवर्ग ६ ब - महार वतनाच्‍या जमिनी, एकाच वतन कुटुंबातील रक्‍तसंबंधी व्यक्तींना खरेदी विक्री व्यवहार करताना शासनाची परवानगी घेण्‍याची आवश्यकता नसलेबाबतच्या सूचना आहेत.

सद्यःस्थितीत महार वतन जमिनीची कृषि प्रयोजनार्थ विक्री परवानगी देण्यासाठी, आकाराच्या दहापट रक्कम अदा करून तर अकृषिक (बिनशेती) प्रयोजनार्थ, चालू बाजारभावाच्या ५० टक्के रक्कम शासनाला प्रदान केल्यानंतरही भोगवटादार वर्ग २ म्हणजेच नवीन शर्तीवर परवानगी देण्यात येते.

महार वतन जमीन अकृषिक प्रयोजन विक्री परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. तथापि, अकृषिक (बिनशेती) प्रयोजनार्थ परवानगीनंतर अशी जमीन भोगवटादार वर्ग १ करण्‍याची तरतूद सध्‍या उपलब्‍ध नाही.

महार वतन जमिनीचा शर्तभंग नियमानुकूल करण्‍याची तरतूद सध्‍या उपलब्‍ध नाही.

 प्र. १६. आकारी पड जमिनीबाबत काय तरतुदी आहेत?

 उ. दिनांक २७ मार्च, २०२५ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ यात आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अधिनियम, २०२५ पारीत करण्‍यात आला. त्‍यानुसार, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ याच्या कलम २२० मधील, दुसऱ्या परंतुकानंतर, पुढील परंतुक व स्पष्टीकरण जादा दाखल करण्यात येईल.

परंतु तसेच, जर कलम २२० अन्‍वये असणारी आकारी पड जमीन विकली गेली नसेल अथवा राज्य शासनाच्या वतीने ती खरेदी केल्याच्या तारखेपासून बारा वर्षे मुदतीच्या आत कसूर करणाऱ्या इसमास, ती परत केली नसेल तर किंवा सत्ताप्रकारावर दिली नसेल तर, जिल्हाधिकारी, कसूर करणाऱ्या इसमास किंवा त्याच्या कायदेशीर वारसास नोटीस देऊन, त्याला जमीन परत घेण्याची त्याची इच्छा असल्याची खात्री करून घेऊ शकतील, आणि जर कसूर करणाऱ्या इसमाने किंवा त्याच्या कायदेशीर वारसाने, अशी जमीन परत घेण्याची त्याची इच्छा व्यक्त केली असेल आणि याबाबतीत पारित केलेल्या नोटीशीमध्ये जिल्हाधिकार्‍यांकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे नव्वद दिवसांपेक्षा कमी नसेल अशा कालावधीत कसूर करणाऱ्या इसमाला किंवा त्याच्या कायदेशीर वारसाला ज्यावर्षी जमीन परत केली असेल किंवा दिली असेल त्या वर्षाच्या अशा जमिनीच्या बाजारमूल्याच्या पाच टक्के इतकी रक्कम प्रदान केली तर, राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधांच्या अधीन राहून, कसूर करणाऱ्या इसमास किंवा त्याच्या कायदेशीर वारसास, ती जमीन परत करण्यात येईल व देण्यात येईल.

दिनांक २७ मार्च, २०२५, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अधिनियम, २०२५ अन्वये मूळ जमीन मालकाला किंवा त्याच्या वारसाला परत द्यायची जमीन ही राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास निर्बंध या अटीवर असल्याने, सदर जमिनीची भोगवटादार सदरी धारणाधिकार वर्ग दोन अशी नोंद घेण्यात यावी.

मूळ जमीन मालकाला किंवा त्याच्या वारसाला परत द्यावयाच्या जमिनीच्या बाजारमूल्याच्या पाच टक्के रक्कम ही रुपये पाच लक्षपेक्षा अधिक असेल तर अशी प्रकरणे जिल्हाधिकारी यांनी शासन पूर्वमान्यतेस्तव सादर करावीत.

सदर जमिनींच्या प्रदानानंतर १० वर्षापर्यंत हस्तांतरण / विक्री करण्यास परवानगी देता येणार नाही.

१० वर्षांच्या कालावधीनंतर शासनाच्या पूर्वमान्यतेने सदर जमिनी विनामूल्य भोगवटादार वर्ग- २ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करण्यात येतील.

मूळ जमीन मालकाला किंवा त्याच्या वारसाला परत करण्यात येणारी जमीन ही शेती/कृषी प्रयोजनासाठी परत करण्यात येत असल्याने पाच वर्षांपर्यंत प्रयोजनात बदल/अकृषिक वापर करता येणार नाही.

 प्र. १७. इनाम/वतन जमीनी भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये करण्यासंबंधात काय तरतुदी आहेत?

 उ. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक कमांक:वर्तन- १०९९/प्र.क्र.२२३/ल-४,

दिनांक ९ जुलै, २००२ अन्‍वये, महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१/२००२ राज्य शासनाच्या दिनांक ६ मे २००२ च्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आला आहे. या अधिनियमान्वये पुढील एकूण पाच अधिनियमात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत:-

१) मुंबई परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५०

२) मुंबई (समाजास उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत अधिनियम, १९५३

३) मुंबई विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत अधिनियम, १९५५

४) मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५८

(५) महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) अधिनियम, १९६२

सदर सुधारणांद्वारे, महार वतनी जमीनीव्यतिरिक्त नवीन व अविभाज्य शर्तीने दिलेल्या इनाम/वतन जमीनी भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये करण्यासंबंधात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे:-

अ) नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीची शेतीसाठी विक्री करण्यासाठी शासनाच्या किंवा सक्षम प्राधिकार्‍याच्या परवानगीची/ना-हरकतीची आवश्यकता राहणार नाही. मात्र अशी विक्री होत असतांना उक्त जमिनीवरील भोगवटादार वर्ग-२ ही अट कमी होणार नाही.

 ब) नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या वर्ग-२ च्या भोगवटादारांना सदर जमीन जुन्याशर्तीने (भोगवटादार वर्ग-१) करण्यासाठी सदर जमिनीच्या चालू बाजारभावाच्या किंमतीच्या ५० टक्के रक्कम शासनास अदा करावी लागेल.

 क) भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी सक्षम प्राधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीने अकृषिक वापरासाठी हस्तांतरीत झालेल्या असतील व त्यासाठी धारकाकडून योग्य ती रक्कम घेण्यात आली असेल तर अशा व्यवहारातील भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी पूर्वलक्षी प्रभावाने भोगवटादार वर्ग-१ च्या संबोधण्यात येतील.

 ड) भोगवटदार वर्ग-२ ची जमीन बिगर शेतीसाठी चालू बाजारभावाच्या ५० टक्के नजराणा रक्कम अदा न करता विकली गेली असल्यास असे हस्तांतरण चालू बाजारभावाच्या ५० टक्के नजराणा व नजराणा रक्कमेच्या ५० टक्के दंड भरुन नियमित करता येईल व नंतर सदर जमीन भोगवटादार वर्ग-१ होईल.

 महार वतनी जमीनीव्यतिरिक्त इतर भोगवटादार वर्ग-२ च्या वतनी / इनामी जमींनी बाबत पुढील कार्यपध्दती अमलात येईल:-

१) भोगवटादार वर्ग-२ च्या इनामी /बतनी जमीनीच्या हस्तांतरणाकरीता कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. तथापि, अशा हस्तांतरणानंतर संबंधित जमीन भोगवटादार वर्ग-२ चीच राहील.

२) भोगवटादार वर्ग-२ च्या धारकास संबंधित जमीन भोगवटादार वर्ग-१ ची करावयाची असल्यास संबंधीत धारक शीघ्रसिध्दगणकानुसार येणा-या चालू बाजार भावाच्या किंमतीच्या ५० टक्के रक्कम तहसिल कार्यालयाकडून चलन मंजूर करन घेऊन शासनास अदा करील. सदरच्या चलनाद्वारे नजराणाच्या रक्कमेचा भरणा केल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी चलन पाहून नवीन शर्त (भोगवटादार वर्ग-२) कमी करुन जुनी शर्त (भोगवटादार वर्ग-१) म्हणून दाखल करील. त्यानुसार सदरची जमीन भोगवटादार वर्ग-१ म्हणून होईल.

 ३) यापूर्वी अशा भोगवटादार वर्ग-२ च्या जमीनी बाबतीत सक्षम अधिकार्‍याच्या पूर्वपरवानगीने विहीत नजराणा अदा करुन कृषीत्तर प्रयोजनासाठी हस्तांतरीत झाल्या असतील तर संबंधित जमीनी अशा परवानगी आदेशाच्या दिनांकापासून भोगवटादार वर्ग-१ च्या होतील.

 ४) भोगवटादार वर्ग-२ च्या जमीनी कृषीत्तर प्रयोजनासाठी पूर्व परवानगी शिवाय व विहीत नजराण्याची रक्कम भरल्याशिवाय हस्तांतरीत झाल्या असतील तर अशी हस्तांतरणे जमीनीच्या चालू बाजार भावाच्या ५० टक्के रक्कम नजराणा म्हणून व नजराणा रक्कमेच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरुन घेऊन जिल्हाधिकारी यांना नियमीत करता येतील. अशा प्रकारे हस्तांतरणे नियमानुकूल झाल्यानंतर संबंधित जमीनी भोगवटादार वर्ग-१ च्या होतील.

 प्र. १८. महाराष्ट्र अधिनियम क्र. २१/२००२ हा अमलात येण्याच्या दिनांकापूर्वी ज्या वतन/ ईनाम जमिनीची सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय कृषिक प्रयोजनासाठी हस्तांतरणे झाली आहेत त्‍याबाबत काय करता येईल?

 उ. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक वतन २००२/प्र.क्र.१००/ल-४,

दिनांक १७ जुलै, २००८ अन्‍वये, महाराष्ट्र अधिनियम क्र. २१/२००२ हा अमलात येण्याच्या दिनांकापूर्वी ज्या वतन/ ईनाम जमिनीची (महार वतन जमिनी व देवस्थान इनाम जमिनी वगळता) सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय कृषिक प्रयोजनासाठी हस्तांतरणे झाली आहेत व अशा हस्तांतरणाच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेण्यात आलेल्या नाहीत, अशा जमिनींच्या नोंदणीकृत हस्तांतरणाबाबतचा पुरावा (नोंदणीकृत खरेदीखत, नोंदणीकृत बक्षीसपत्र इ.) खरेदीदाराने सादर केल्यास असे व्यवहार नियमानुकूल करण्यात यावेत. असे करताना अशा जमिनींचे यापूर्वी झालेले कृषिक प्रयोजनासाठीचे सर्व विनापरवानगी व्यवहार एक खास बाब म्हणून दुर्लक्षित करण्यात यावे.

अशी हस्तांतरणे नियमानुकूल करुन दिल्यानंतरही या जमिनी भोगवटादार वर्ग-२ या सत्ता प्रकारानेच धारण करण्यात येतील व या जमिनीच्या त्यापुढील हस्तांतरणास महाराष्ट्र अधिनियम क्र. २१/२००२ च्या तरतुदी लागू होतील.

वरील सुधारणा महार वतन जमिनी व देवस्थान इनाम जमिनींना लागू होणार नाहीत.

 प्र. १९.  मुंबई कनिष्ठ गाव वतन निर्मूलन अधिनियम, १९५८ अन्‍वये ईनाम व वतन जमिनींबाबतचे अधिकार कोणाचे आहेत?

 उ. महसूल विभाग, सचिवालय, मुंबई, शासन निर्णय क्रमांक बीआयडब्ल्यू. १०६१-IV-५७४७४-एल, दिनांक ८ जून १९६३ अन्‍वये, मुंबई कनिष्ठ गाव वतन निर्मूलन अधिनियम, १९५८ च्या कलम २ उप-कलम (१) च्या खंड (iv) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने सर्व मामलेदार, महालकरी आणि तहसीलदार यांना उक्त अधिनियमाच्या कलम ५, ६ आणि ९ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी आणि अधिकार वापरण्यासाठी नियुक्‍ती केली आहे.

 प्र. २०.  प्रकल्पबाधित व्यक्तींना भोगवटादार वर्ग-२ म्‍हणून मिळेलेली जमीन भोगवटादार वर्ग-१ मध्‍ये रूपांतरीत करता येते काय?

 उ. पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तींना भोगर्टादार वर्ग-२ म्‍हणून पर्यायी  जमिनीचे वाटप केल्याच्या दिनाांकापासून दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानातर अशा जमिनीचे रुपाांतर भोगवटादार वर्ग १ मध्ये करण्याबाबत ४.६.२०१९ रोजी शासन परिपत्रकाव्‍दारे आदेशीत करण्‍यात आले आहे. यासाठी असे रूपांतरण करण्‍याच्‍या दिनांकास, प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्‍या किंमतीच्‍या १०% शासकीय तिजोरीत अदा करावयाची आहे.

l

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला प्रतिबंधीत सत्ताप्रकार जमिनी – FAQs. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.