आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

अर्धन्यायीक प्रकरणे कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी "मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure-SOP)

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

अर्धन्यायीक प्रकरणे कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी "मानक कार्यपध्दती

(Standard Operating Procedure-SOP)

 संदर्भ: महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक : जमीन- २०२५/प्र.क्र. १३२ / जमीन- १-अ, दिनांक १४ मे २०२६

 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ आणि इतर भूसुधार किंवा जमीन विषयक कायद्यांतर्गत तसेच महसूल व वन विभागामार्फत हाताळण्यात येणाच्या विविध कायद्यांतर्गत क्षेत्रीय महसूल अधिकारी / प्राधिकारी यांच्याकडून पारित करण्यात येणाच्या आदेशांच्या अनुषंगाने नागरिकांकडून महसूल अधिकारी / प्राधिकारी तसेच शासनाकडे अपील किंवा पुनरिक्षण / पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्यात येतात. सदर प्रकरणे अर्धन्यायीक (Quasi-Judicial) प्रकरणे म्हणून हाताळण्यात येतात. यासंदर्भात संबंधित कायद्‍यांमध्‍ये स्वयंस्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत.

 तथापि, अर्धन्यायीक कामकाजामधील पीठासीन अधिकारी यांना,

w कर्तव्य व जबाबदान्या यांची जाणीव नसणे,

w नैसर्गिक न्यायतत्वांचे पालन न करणे,

w प्रकरणातील वस्तुस्थिती / तथ्ये व सांविधिक तरतुदी यांचा विचार न करता व यथायोग्य कार्यासक्ती न करता (without application of mind) स्वच्छंद निर्णय पारित करणे,

w अर्ज/ अपील दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत पुरेसे कारण नसताना विलंब माफ करणे,

w संबंधित अधिनियमाचे सखोल ज्ञान नसणे,

w अर्धन्यायीक अर्ज/ अपील दाखल करून घेताना त्याची छाननी न करणे,

w अधिकारिता नसताना निर्णय पारित करणे इत्यादी सारख्या अर्धन्यायीक कार्यपध्दतीविषयक गंभीर त्रुटी शासनाच्‍या निर्दशनास आल्या आहेत.

 यापूर्वी विविध शासन निर्णयाव्दारे अर्धन्यायीक कामकाजाबाबत दिशा निर्देश देण्यात आलेले आहेत. महसूल अधिकार्‍यांच्या अर्धन्यायीक कामकाजामध्ये सुधारणा करून गतीमान कार्यप्रणाली करून निकालांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

 w महसूल विभागातील, मंडळ अधिकारी ते विभागीय आयुक्त दर्जाच्‍या अधिकार्‍यांना विविध अधिनियमांखाली अर्धन्यायीक प्रकरणे हाताळावी लागतात. तथापि, अर्धन्यायीक प्रक्रिया तसेच बदलत्या परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाबाबत पुरेसे आकलन नसल्यामुळे अर्धन्यायीक प्रकरणांचा निपटारा हा जलद गतीने होत नाही. बऱ्याच अर्धन्यायीक प्रक्रियेतील निर्णयाविरूध्द मा. उच्च न्यायालयात रिट याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिले जाते.

मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी उक्‍त अधिकार्‍यांमार्फत पारित होणार्‍या अर्धन्यायीक निर्णयांच्‍या गुणवत्तेबाबत वेळोवेळी असमाधान व्यक्त केले आहे. 

 w महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ५ अन्वये, राज्य शासनाचे महसुलाशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण आहे.

अर्धन्यायीक कामकाजामध्ये उपरोक्त नमूद प्रस्तावनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम ५ अन्वये, अर्धन्यायीक प्रकरणांबाबत कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी खालील "मानक कार्यपध्दती’’ (Standard Operating Procedure-SOP) वापरण्‍याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

 4नैसर्गिक न्यायतत्‍वांचे पालन:

अर्धन्यायीक प्रक्रिया ही नैसर्गिक न्यायतत्वावर आधारित आहे. नैसर्गिक न्याय म्हणजे मानवी नैतिकता, स्वभाव आणि सामान्य हक्कांवर आधारित न्यायप्रक्रिया, जी कोणत्याही पक्षकाराला पूर्वग्रह, मनमानी किंवा अन्यायापासून संरक्षण देते व कायद्याच्या जटीलतेपलीकडे जाऊन निष्पक्ष सुनावणीची हमी देते. नैसर्गिक न्यायाची मुख्य तत्त्वे खालील प्रमाणे आहेत.

ए. निष्पक्षपातीपणा, किंवा पूर्वग्रह नसणे.

बी. पक्षपात, हितसंबंध किंवा पूर्वग्रह दुषित मनोवृत्ती यांचा अभाव.

सी. प्रतिपक्षाला त्‍याची बाजू मांडण्‍याची संधी देणे.

डी. दोन्हीं बाजूच्‍या पक्षकारांचे म्हणणे ऐकणे.

इ. कारणांसह तर्कसंगत आदेश पारित करणे.

 १) अर्ज / अपील दाखल करणे व त्याची छाननी:

 अर्धन्यायीक प्रकरणातील मूळ अर्ज, पुनरिक्षण, पुनर्विलोकन अर्ज किंवा अपील अर्ज संबंधित अर्धन्यायीक प्राधिकार्‍याकडे अथवा त्याच्या कार्यालयीन अधीक्षकाकडे कार्यालयीन कामकाजाच्‍या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत समक्ष दाखल करण्यात यावेत.

 १.१) दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांची छाननी त्याच दिवशी खालील जोडपत्र-एक मध्‍ये नमूद  मुद्दयांच्या आधारे, कार्यालयीन अधीक्षकांनी पूर्ण करावी. जी प्रकरणे परिपूर्ण असतील त्या प्रकरणांची नोंद e-QJ Court प्रणालीत घेण्यात यावी. जी अर्धन्यायीक प्रकरणे छाननी जोडपत्रातील निकषाप्रमाणे परिपूर्ण नसतील त्याबाबत संबंधितांना आवश्यक ते त्रुटीपत्र देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण अर्ज/ अपील दाखल करून घेऊ नयेत.

जोडपत्र - एक

छाननी पत्रक

अ.क्र.

मुद्‍दा

शेरा

अर्ज/अपील/ पुनरिक्षण, पुनर्विलोकन अर्ज यासमवेत सादर केलेल्या कागदपत्रांची यादी-अनुक्रमणिका व सर्व कागदपत्रांना पृष्‍ठांकन केले आहे काय ?

 

अर्जदार/अपिलार्थी यांनी त्यांचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक

e-qj court फॉर्म दिला आहे काय?

 

अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज कोणत्या कायद्या व कलमान्‍वये दाखल केले याचा उल्लेख आहे काय ?

 

ज्या निकालाविरूध्द अर्ज/ अपील / पुनरिक्षण / पुनर्विलोकन अर्ज आहे त्यातील सर्व पक्षकारांचा समावेश केला आहे काय ?

 

अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्जाच्या शेवटी ‘जोडपत्र नमुना दोन’ मधील नमुन्यात सत्यापन करण्यात आलेले आहे काय ?

 

गैरअर्जदार/जाबदेणार यांना देण्यासाठी अर्जाच्या/अपील मेमोच्या पुरेशा प्रती आणि दोन जादा प्रती सोबत दाखल करण्‍यात आल्‍या आहेत काय ?

 

कुलमुखत्यारपत्र धारक यांनी दाखल केलेल्या, अर्ज/अपिलासोबत

कुलमुखत्यारपत्राची मूळ प्रत दाखल केली आहे काय ?

 

अर्ज/ अपील मेमोवर महाराष्ट्र कोर्ट फी अधिनियम, कलम ५ सह कलम ३६ सह अनुसूची २ प्रमाणे योग्य कोर्ट फी स्‍टँप लावले आहेत काय ?

 

अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्जासमवेत ‘जोडपत्र-तीन’ मधील नमुन्यात ‘शपथपत्र’ जोडले आहे काय ?

 

१०

प्रकरणातील आव्हानित आदेशाची ‘प्रमाणित प्रत’ तसेच अन्य निम्नस्तरीय महसूल अधिकाऱ्यांनी निर्णय पारित केले असल्यास त्या आदेशांच्या ‘प्रमाणित प्रती’ सादर केलेल्या आहेत काय ?

 

११

वाद मिळकती संबंधित अद्ययावत अधिकार अभिलेख पत्रक (७/१२), फेरफार नोदी, मालमत्ता पत्रक, मोजणी नकाशा यांच्या वाचनीय प्रती तसेच ‘जोडपत्र- चार’ मधील नमुन्यात फेरफार नोंदींचा कालक्रमानुसार तपशिल सादर केला आहे काय ?

 

१२

अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज मुदतीत सादर केला आहे काय?

 

१३

अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज, मुदतीत सादर केला नसल्यास विलंब माफीचा ‘स्वतंत्र अर्ज’ सादर केला आहे काय ?

 

१४

स्थगिती आदेशाची मागणी असल्‍यास, त्‍यासाठी स्वतंत्र अर्ज सादर केला आहे काय ?

 

१५

जाब देणार / प्रतिवादी यांना सुनावणीची नोटीस व अर्ज/अपील मेमोची प्रत डाकेने पाठवण्यासाठी योग्य आकाराचा लिफाफा व टपाल खर्च (टपाल मुद्रांक) दिले आहेत काय ?

 

१६

सर्व पक्षकारांचे खरे पत्ते दिलेले आहेत काय ?

 

-- 

जोडपत्र - दोन

सत्यापन नमुना

मी. ...........................................  (सत्यापन करणाराचे पूर्ण नाव, वय व पत्ता)

मी यापुढे जाहीर करतो की, मी सादर केलेल्‍या अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज यामध्ये नमूद केलेले तथ्ये, वस्तुस्थिती अथवा माहिती ही माझ्या समजुतीप्रमाणे खरी व बरोबर आहे. सदर अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज यामध्ये नमूद केलेली कोणतेही तथ्ये, वस्तुस्थिती अथवा माहिती लपवण्यात आलेली नाही अथवा दडपण्‍यात आलेली नाही.

या कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यावर मी उद्देशपूर्वक खोटा पुरावा देणार नाही/ दिलेला नाही किंवा खोटा पुरावा रचणार नाही. मी कोणतेही अधिकथन खोटे आहे अथवा खोटे असल्याचे मला स्वत:ला माहित असूनही अथवा तसे खोटे असल्याचे मी स्वत: समजतो किंवा खरे आहे असे मी स्वत: समजत नाही, असे अधिकथन मी करणार नाही अथवा केलेले नाही. तसेच या कार्यवाहीत पीठासीन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्व अपमान करणार नाही किंवा त्यांच्या कामात व्यत्यय आणणार नाही.

मला जाणीव आहे की, उपरोक्त बाबींचा भंग झाल्यास मी भारतीय न्याय संहिता २०२३, ची कलमे २२९ २३३, २३६ व २६७ अन्वये होणाऱ्या शिक्षेस पात्र राहीन.

ठिकाण:-                                                                                         स्वाक्षरी

दिनांक:-                                                                     सत्यापन करणाऱ्या व्यक्तीचे नाव

वकीलाचे नाव व स्वाक्षरी

-- 

जोडपत्र - तीन

अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज समवेतचे शपथपत्र

मी. ...........................................  (पूर्ण नाव, वय व पत्ता) दृढपूर्वक खालीलप्रमाणे कथन करतो की,

१. मी या प्रकरणातील अर्जदार / अपिलार्थी/प्राधिकृत प्रतिनिधी असून मी सादर केलेल्‍या अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज मधील सर्व तथ्ये, कथने अथवा वस्तुस्थिती याबाबत मला पूर्ण माहिती आहे.

२. सोबत सादर केलेल्‍या अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज यातील, परिच्छेद क्र. ... ते ... मधील वस्तुस्थिती, तथ्ये व कथने हे माझ्या माहितीप्रमाणे व वैयक्तिक ज्ञानाप्रमाणे, खरी व बरोबर आहेत.

३. सोबत सादर केलेल्‍या अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज यातील परिच्छेद क्र... ते ... मधील वस्तुस्थिती, तथ्ये व कथने हे माझ्या ताब्यात असलेल्या कागदपत्रांवरून खरे असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे.

४. अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज यातील वस्तुस्थिती, तथ्ये व कथने याच्याशी संबंधित सर्व अभिलेख मी उघड केलेले आहेत व सोबत जोडलेले आहेत. याव्यतिरिक्त माझ्याकडे कोणतीही कागदपत्रे/अभिलेख अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज यावर परिणाम करू शकतील असे नाहीत.

५. अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज यामध्ये नमूद केलेले तथ्ये, वस्तुस्थिती अथवा माहिती ही माझ्या समजुतीप्रमाणे खरी व बरोबर आहे.

उपरोक्त अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज यामध्‍ये केलेली कोणतीही तथ्ये, वस्तुस्थिती अथवा माहिती लपवण्यात आलेली नाही अथवा दडपून टाकलेली नाही.

६. या कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यावर मी उद्देशपूर्वक खोटा पुरावा देणार नाही/ दिलेला नाही किंवा खोटा पुरावा रचनार नाही. मी कोणतेही अधिकथन खोटे आहे अथवा खोटे असल्याचे मला स्वतःला माहित असूनही अथवा तसे खोटे असल्याचे मी स्वतः समजतो किंवा खरे आहे असे मी स्वत: समजत नाही, असे अधिकथन मी करणार नाही अथवा केलेली नाही. तसेच या कार्यवाहीत पीठासीन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्व अपमान करणार नाही किंवा त्यांच्या कामात व्यत्यय आणणार नाही.

७. मी या शपथपत्राव्दारे हमी देतो की, इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे केलेला पत्रव्यवहार / पाठवलेली

नोटीस, ही वैधरित्या मला करण्यात आलेला पत्रव्यवहार / नोटीस बजावणी असल्याचे समजले जाईल.

८. अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज समवेत वादमिळकतीशी संदर्भातील हस्तांतरणाचा / व्यवहारांचा / फेरफार नोंदींचा तपशिल ‘जोडपत्र-चार’ मधील नमुन्यात कालक्रमानुसार नमूद करण्यात आलेला आहे व तो बरोबर व खरा आहे.

९. अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज समवेत सर्व आवश्यक अभिलेख तसेच फेरफार नोंदीच्या प्रमाणित व वाचनीय प्रती सादर करण्यात आल्या आहेत.

१०. जाबदेणार/प्रतिवादी  यांना नोटीस बजावण्यासाठी आवश्यक ते डाकेचे पाकीट व डाक मुद्रांकासह सोबत जोडलेले आहे.

११. अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्जामध्ये नमूद करण्यात आलेले, अर्जदार/जाबदेणार / प्रतिवादी /

यांचे पत्ते हे खरे व बरोबर असल्याची मी खात्री केलेली आहे.

१२. प्रस्तुत प्रकरणात, उपरोक्त काम माझ्यावतीने पाहण्यासाठी विधीज्ञ/ कुलमुख्‍यारपत्र धारक  श्री...........यांना प्राधिकृत केले  आहे. त्याबाबतचे वकीलपत्र / प्राधिकार पत्र सोबत जोडलेले आहे.

१३. सदर प्रकरणी या न्यायपीठाशिवाय अन्य महसूल कोणत्‍याही न्यायपीठाकडे / मा. दिवाणी न्यायालयाकडे / अन्य अर्धन्यायीक प्राधिकाऱ्याकडे / मा. उच्च न्यायालयामध्ये कोणताही अर्ज / अपील / रिट याचिका / विशेष अनुमती याचिका प्रलंबित नाही. (प्रलंबित असल्यास त्याचा तपशिल नमूद करावा.) १४. माझ्या संपर्कासाठी माझा व माझ्या कुलमुख्‍यारपत्र धारकाचा/विधीतज्ञांचा भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी खालीलप्रमाणे आहे.

भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी:-

१. अर्जदार/अपिलार्थी - भ्रमणध्वनी क्रमांक                                    ई-मेल आयडी

२. विधीतज्ञ -             भ्रमणध्वनी क्रमांक                                    ईमेल आयडी

३. कुलमुख्‍यारपत्र धारक-  भ्रमणध्वनी क्रमांक                                    ईमेल आयडी

 

उपरोक्‍त शपथपत्र श्री .............. यांनी माझ्यासमोर स्वाक्षरीकृत केलेले आहे.

कार्यकारी दंडाधिकारी/नोटरी

 

जोडपत्र – चार

फेरफार नोंदींचा कालक्रमानुसार तपशिल

अ. क्र.

फेरफार नोंद क्रमांक व प्रमाणन दिनांक

फेरफार नोंदीचा तपशिल

 

 

 

 

 

 

 

 

 

 २) सत्यापन व शपथपत्र:

 प्रत्येक अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्जाच्या शेवटी सोबत दिलेल्या ‘जोडपत्र- दोन’ नमुन्‍यानुसार ‘सत्यापन’ करण्यात यावे. तसेच सत्यापन करणाऱ्या व्यक्तीने आपल्या कथनाच्या पृष्ठ्यर्थ, सोबत दिलेल्या ‘जोडपत्र-तीन’ नुसार ‘स्वतंत्र शपथपत्र’ प्रत्येक अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज व अपील अर्जासमवेत सादर करण्यात यावे.

 ३) नोटीस बजावणे:

 ज्या अधिनियमान्‍वये अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज दाखल केले आहे त्या संबंधित अधिनियमामध्ये नोटीस बजावणीबाबतची कार्यपध्दती दिलेली असते. त्याप्रमाणे संबंधितांवर नोटीस बजावण्याची कार्यवाही करावी. मात्र ज्या अधिनियमामध्ये नोटीस बजावण्याबाबत कोणतीही तरतूद नमूद नसेल त्या ठिकाणी महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, कलम २३० अन्‍वये नोटीस बजावण्याची कार्यवाही करावी.

 ३.१) महाराष्ट्र सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम १९०४, कलम २८ च्या अर्थानुसार, डाकेने पाठवावयाची नोटीस म्हणजे नोंदणीकृत पोहोच देय डाक - (Registered Post Acknowledgement Delivery - RPAD) याव्दारे पाठवणे. तथापि, डाक विभागाने दिनांक १.९.२०२५ पासून नोंदणीकृत पोहोच देय डाक सेवा बंद केली असून त्याचे विलीनीकरण स्पीड पोस्ट (Speed Post) मध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी नोंदणीकृत पोहोच देय डाक (RPAD) असा उल्लेख आलेला असेल त्या-त्या ठिकाणी स्पीड पोस्ट (Speed Post) असे समजण्यात येऊन त्याप्रमाणे नोटीस - स्पीड पोस्टव्दारे पाठवण्यात यावी.

 याशिवाय, अर्धन्यायीक प्राधिकार्‍याने जाबदेणार / प्रतिवादी यांच्या उपस्थितीसाठी बजावलेल्‍यानोटीस व्यतिरिक्त, अर्जदार/अपिलार्थी यांच्या विनंतीनुसार, त्‍यांनाही नोटीस बजावण्याची परवानगी देता येईल. अशी नोटीस बजावणीसाठी, अर्धन्यायीक प्राधिकाऱ्याच्या सही व मोहर लावलेली/ शिक्का असलेली नोटीसची प्रत, अर्जदार/अपिलार्थी यांच्याकडे बजावणीसाठी देण्यात येईल.

 अर्जदार/अपिलार्थी यांनी नोटीस बजावणी केल्यावर त्याबाबतचे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील. प्रत्येक अर्ज/अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्जावर पक्षकारांचे पत्ते देण्याची जबाबदारी ही अर्जदार/अपिलार्थी यांची राहील. अन्य कोणत्याही कारणास्तव नेहमीच्या पध्दतीने जाबदेणार / प्रतिवादी यांचे पत्ते उपलब्ध होत नसल्याने, नोटीस बजावणे शक्य नाही अशी खात्री पटल्यावर पर्यायी नोटीस बजावणी, दिवाणी प्रक्रिया अधिनियम, १९०८ आदेश पाचवा नियम २० (१अ) अन्वये, जाबदेणार / प्रतिवादी हे लगतपूर्वी जेथे प्रत्यक्षपणे व स्वेच्छेने राहत होते किंवा धंदा/व्‍यवसाय करीत होते अशा स्थानिक भागात खप असणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रात प्रसिध्द करून बजावण्यात यावी.

 ४) विलंबमाफी अर्जावर कार्यवाही:

  अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्यास विहीत केलेल्‍या कालमर्यादेपेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास, मूळ अपील/पुनरिक्षण/पुनर्विलोकन अर्जासोबतच विलंब माफीचा स्वतंत्र अर्ज संबंधित पक्षकाराने दाखल करणे आवश्यक आहे.

 पीठासीन अधिकारी यांनी प्रथम विलंबमाफीबाबत निर्णय घेणे बंधनकारक आहे. विलंब माफीच्या निर्णयाची सविस्तर कारणमीमांसा स्वतंत्र निकालपत्रात नमूद करणे आवश्यक आहे. विलंब माफीचे निकालपत्र रोजनाम्यावर नमूद करण्यात येऊ नये, त्यासाठी स्वतंत्र आदेश पारित करावेत.

 मुदत अधिनियम, १९६३ (Limitation Act, 1963) हा अर्धन्यायीक कामकाजासाठी लागू नाही. विलंबमाफीबाबत अर्धन्यायीक प्राधिकारी अथवा अर्धन्यायीक न्यायासने यांना दिवाणी न्यायालयाप्रमाणे विलंब माफ करण्याबाबतचे अंगभूत अधिकार नाहीत. संबंधित अधिनियमामध्ये जर विलंब माफीबाबत उपबंध दिलेले असतील किंवा मुदत अधिनियम, १९६३ च्या तरतुदी लागू केल्या असतील तरच विलंब माफीबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ:

अ. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २५१ अन्‍वये विलंब माफीबाबतच्‍या तरतुदी आहेत.

ब. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ७९ अन्‍वये, मुदत अधिनियम, १९६३ चे उपबंध विलंब माफीसाठी लागू करण्यात आले आहेत.

क. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्‍ये विलंब माफीबाबत उपबंध नाहीत. तसेच मुदत अधिनियम १९६३ लागू केलेला नाही. त्यामुळे विहीत मुदतीतच अर्ज / अपील दाखल करणे क्रमप्राप्त आहे.

 संबंधित अधिनियमान्‍वये अर्ज किंवा अपील दाखल करण्यास विलंब माफीबाबत तरतूद करण्यात आली आहे काय याची शहानिशा करूनच अर्ज / अपील याबाबत निर्णय घ्यावा.

 ५) हस्तक्षेप अर्जावरील कार्यवाही / पक्षकारांची नावे काढून टाकणे किंवा दाखल करणे:

 त्रयस्थ पक्षकार/व्यक्ती यांनी सादर केलेल्‍या अर्जावरून किंवा स्वाधिकारे, महसूल

अधिकारी यांना एखाद्या पक्षकाराचे/व्यक्तीचे नाव अयोग्यपणे, अर्ज/ अपील प्रकरणामध्ये समाविष्ट केलेले असेल तर ते काढून टाकता येईल.

अर्ज/ अपील प्रकरणामध्ये गुंतलेल्या सर्व प्रश्नांचा परिणामकारकरित्या व पूर्णपणे अभिनिर्णय करण्यासाठी एखाद्या हितसंबंधित व्यक्तीला पक्षकार म्हणून दाखल करून घेणे आवश्यक असल्यास त्याप्रमाणे अशा व्यक्तीस पक्षकार म्हणून समाविष्ट करावे.

एखाद्या व्यक्तीला पक्षकार म्हणून दाखल करून घेण्यात आले असेल तर त्याप्रमाणे अर्ज / अपीलामध्ये दुरूस्ती करून नोटीस व अर्ज/अपीलाची प्रत जाबदेणार / प्रतिवादी यांच्यावर बजावण्यात यावी.

 ६) प्रकरणांची सुनावणी:

  सर्व महसूल अधिकारी यांनी अर्धन्यायीक प्रकरणांची सुनावणी ही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा घेणे आवश्यक आहे. मंगळवार व शुक्रवार किंवा आठवडी बाजार दिवस निश्चित करावेत. तहसिलनिहाय, उपविभागनिहाय निश्चित करण्यात आलेल्या सुनावणी दिवस निश्चित करण्यात आलेले आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित करून जिल्हा संकेतस्थळावर प्रसिध्द करावेत.

 यापुढे, क्षेत्रीय महसूल अधिकारी यांनी अर्धन्यायीक प्रकरणांमध्ये सुनावणीची कार्यवाही तहकूब करतांना, पक्षकाराने पुरेसे लेखी कारण दाखवून विनंती केली असेल तरच सुनावणीची प्रक्रिया जास्तीत जास्त एकवेळा तहकूब करता येईल.

 पक्षकाराच्या आटोक्याबाहेरील / नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे जसे की, पक्षकार गंभीररित्या आजारी आहे, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळेच सुनावणी घेणे शक्य नाही, अशा वेळीच सुनावणी तहकूब करता येईल. तसेच अशा प्रकरणी तहकूब करण्यात आलेल्या प्रकरणाची सुनावणी पुढील पहिल्या आठवड्यात अथवा जास्तीत जास्त दुसर्‍या आठवड्यात ठेवण्यात यावी.

तसेच सुनावणी कार्यवाही कालक्रमानुसारच घेण्यात यावी.

 ७) रचना व कार्यपध्दती विभागाचा शासन निर्णय क्रमांक- एस-३०/२०१५/प्र.क्र.२९९/ज-१, दि.१७.१२.२०१५ मधील निर्देश आणि मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या श्रीमती सावित्री चंद्राकेश पाल विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर रिट याचिका क्र. ४१०१/२००७, भाग । दि.२४०३.२००९ मधील परिच्छेद क्र. १७ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक निर्देश:

 उक्‍त निर्देशांनुसार, अर्धन्यायीक कार्यपध्दतीची अंमलबजावणी खालील प्रमाणे करणे आवश्यक आहे.

(१) प्रत्‍येक अर्ज, अपील, पुनर्विलोकन / पुनरिक्षण अर्ज व इतर कोणताही अर्ज कोणत्या अधिनियमान्‍वये व कोणत्या तरतुदींन्‍वये दाखल केला आहे, याचा स्पष्ट उल्लेख केला पाहिजे.

 (२) अर्जदार/अपिलार्थी यांनी प्रत्‍येक अर्ज/अपील, पुनर्विलोकन/ पुनरिक्षण अर्ज व इतर

कोणत्याही अर्जासमवेत संक्षिप्त तारखा आणि घटनांचा सारांश सादर करावा.

 (३) अर्ज/अपील, पुनर्विलोकन / पुनरिक्षण अर्ज व इतर कोणताही अर्ज, ज्या आदेशाला/निर्णयाला आव्हानित केले आहे, तो मिळाल्याच्या तारखेपासून/वादाचे कारण, संबंधित विषयावर लागू असलेल्या कायद्यानुसार विहीत केलेल्या मुदतीत दाखल केला पाहिजे. विलंब झाल्यास, तो केवळ विलंब माफीच्या अर्जासोबतच स्वीकारला जाईल.

 (४) अर्ज/अपील, पुनर्विलोकन/पुनरिक्षण अर्ज व इतर कोणताही अर्ज सादर करताना, अर्जदार स्वतः अर्ज करत असेल तर आवश्यक कागदपत्रांद्वारे त्‍याने स्वत:ची ओळख सिद्ध करावी किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी किंवा वकिलामार्फत अर्ज / अपील दाखल करावे.

 (५) अर्ज/अपीलासोबत प्रत्येक जाबदेणार / प्रतिवादी यांचेसाठी अर्ज/अपिलाच्‍या पुरेशा प्रती असाव्यात आणि प्राधिकाच्यासाठी/पीठासीन अधिकाऱ्यासाठी दोन अतिरिक्त प्रती देखील पुरवाव्यात.

 (६) जाबदेणार / प्रतिवादी यांना नोटीस बजावण्यासाठी, प्रकरणानुसार अर्ज/अपील अर्जासमवेत डाक शुल्क अथवा डाक मुद्रांक स्वतंत्र लिफाफ्यासह देणे आवश्यक आहे.

(७) प्राधिकाऱ्यामार्फत/पीठासीन अधिकाऱ्यामार्फत नोटीस बजावण्याव्यतिरिक्त,

अर्जदार/अपिलार्थी स्पीड पोस्ट टपालाद्वारे अतिरिक्त प्रती स्वतंत्रपणे पाठवू शकतो आणि पाठवल्याच्या पुराव्यासह सेवा बजावल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करू शकतो. टपाल प्राधिकरणाद्वारे सेवा बजावल्यास, केवळ टपाल पावती आणि पोहोच पावती हाच सेवा बजावल्याचा पुरावा मानला जाईल.

 

(८) स्थगिती, मनाई हुकुम / इतर अंतरिम आदेश किंवा निर्देश इत्यादींसारखा अंतरिम दिलासा मिळवण्याची तातडीची गरज असल्यास, अर्जामध्ये तातडीचे विशिष्ट कारण नमूद केले पाहिजे.

पीठासीन अधिकारी यांनी तातडीच्या परिस्थितीत प्रतिपक्षाला म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्याबाबतची नोटीस स्‍पीड पोस्‍ट (Speed Post) द्वारे तात्काळ कळविले जाईल.

 (९) जर खरोखरच तातडीची गरज असेल, तर संबंधित प्राधिकरण/पीठासीन अधिकारी यांनी नोंदवलेल्या कारणांसाठी केवळ एका विशिष्ट कालावधीसाठी एकतर्फी अंतरिम / तात्पुरता आदेश / दिलासा देऊ शकते. अर्ज करणाऱ्यांना तातडीने अंतरिम आदेश/स्थगिती आदेश याची आवश्यकता होती का याबाबतचे विवेचन व कारणमीमांसा आदेशात नमूद करणे आवश्यक आहे.

सदरचा अंतरिम आदेश हा केवळ विशिष्ट काळासाठी असेल व या आदेशातच, अंतरिम आदेश पुढे चालू ठेवण्यासाठी आवश्यकता आहे किंवा नाही याबाबत प्रतिपक्षाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणीची वेळ नमूद केली जाईल. जर अशा पक्षकाराला लवकर सुनावणीची किंवा अंतरिम दिलासा किंवा अपील, पुनरिक्षण किंवा पुनर्विलोकन सुरू ठेवण्याची आवश्यकता असेल, तर अर्जदार/अपिलार्थी सेवा बजावल्याचे प्रतिज्ञापत्र/पोस्टल ट्रॅक रिपोर्ट दाखल केले पाहिजे.

सदरचा एकतर्फी विशिष्ट कालावधीचा आदेश प्रतिपक्षाला नोंदणीकृत स्‍पीड पोस्‍ट (Speed Post) व्दारे कळवण्यात येईल.

 (१०) सक्षम प्राधिकारी अर्जदार/अपिलार्थी यांना सुनावणीची पुढील तारीख, वेळ आणि ठिकाण कळवेल आणि शक्यतोवर, सुनावणीच्या त्या तारखेला व वेळेलाच सुनावणी घेईल.

 

(११) प्रत्येक विभागातील संबंधित अधिकाऱ्याला सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्यास सांगितले जावे आणि त्याने संबंधित प्राधिकरण/पीठासीन अधिकारी यांना प्रकरणात मदत करावी.

 (१२) नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून आणि प्रत्यक्ष सुनावणीच्या तारखेपर्यंत वाजवी पुरेसा वेळ दिला जावा. जर कोणताही पक्ष पुरेशा कारणामुळे सुनावणीच्या वेळी उपस्थित राहू शकत नसेल, तर अशा पक्षाला सुनावणीसाठी आणखी एक संधी दिली जावी.

 (मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक ३९७३/२०२३ (देवीदास आनंदराव पिंगळे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर) मध्ये दिनांक २९ मार्च २०२३ रोजी दिलेल्या आदेशान्वये, महाराष्ट्र शासनाला असे निर्देश दिले आहेत की, ‘‘ज्या सर्व प्रकरणांमध्ये वैयक्तिक सुनावणी देणे आवश्यक आहे, अशा प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांनी सर्व संबंधित पक्षांना किमान पाच कामकाजाच्या दिवसांची नोटीस द्यावी; आणि हा निर्देश प्रस्तुत प्रकरणालाही लागू असेल. हा असा निर्देश आहे जो कोणत्याही प्राधिकरणासमोर होणाऱ्या वैयक्तिक सुनावणीसाठी लागू राहील.")

 (१३) अर्धन्यायीक प्रकरणांची सुनावणी करणारे प्राधिकरण/पीठासीन अधिकारी अशा सुनावणीसाठी योग्य ती तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित करेल. असा प्राधिकारी सुनावणीच्या दरम्यान कोणत्याही त्रयस्‍थ पक्षाशी प्रत्यक्ष किंवा फोनवर संवाद साधणार नाही किंवा असे कोणतेही कृत्य करणार नाही ज्यामुळे निष्पक्ष सुनावणीवर परिणाम होईल किंवा त्यात बाधा येईल.

 (महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, परिपत्रक क्रमांक - ०/३६०५/सं.क्र. ४३२/ल-६,

दिनांक २५.५.२००५ अन्‍वये, अर्धन्यायीक अधिकारात विविध दावे क्षेत्रीय महसूल अधिकाऱ्यांपुढे चालविले जातात. सदर दावे चालविले जात 'असतांना अपिलार्थी वा गैरअपिलार्थी यांच्‍या विधीज्ञाचा युक्तीवाद सुरु असतांना अनेक क्षेत्रीय अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी वा पदाधिकारी यांचे दुरध्वनी घेतात. त्यामुळे विधीज्ञाच्या युक्तीवादात खंड येतो. व संबंधित महसूल अधिकारीही एकाग्र चित्ताने या दाव्यामध्ये संबंधिताची बाजू ऐकून घेऊ शकत नाही. त्यामुळे बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांनी याबाबत ठराव करुन असे दुरध्वनी घेण्यास प्रतिबंध करण्याची विनंती शासनास केली आहे. त्यामुळे न्याय प्रक्रियेचे वातावरण सुयोग्य राहण्यासाठी व जलदगतीने प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी खालील सूचना देण्यात येत आहेत.

१) अर्ध न्यायिक अधिकारात दाव्याची सुनावणी सुरु असतांना संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी दुरध्वनी घेण्याचे टाळावे.

२) महसूल अधिकाऱ्यांसमोर सुरु असणाऱ्या दाव्यात अपिलार्थी वा गैरअपिलार्थी यांना योग्य वागणूक देण्यात यावी. तसेच त्यांचा युक्तीवाद शांतपणे ऐकून घेण्यात यावा.

या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व महसूल अधिकाऱ्यांना कळवाव्यात.)

 (१४) सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर आणि शक्यतोवर सुनावणी पूर्ण झाल्यापासून जास्तीत जास्त आठ आठवड्यांच्या आत प्राधिकरणासमोर असलेल्या नोंदींच्या तसेच सुनावणीत केलेल्या निवेदनांच्या आधारावर, प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या प्राधिकरण/ पीठासीन अधिकारी सकारण आदेश पारित करेल. आदेशात आदेशाच्या समर्थनार्थ कारणे नमूद केलेली असली पाहिजेत.

 (१५) प्राधिकारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे स्वीकारणार नाहीत किंवा अशा कागदपत्रांच्या किंवा माहितीच्या आधारावर सकारण आदेश पारित करणार नाही, जोपर्यंत

नैसर्गिक न्यायाच्या नियमांनुसार अशी सामग्री कार्यवाहीतील पक्षांच्या निदर्शनास आणली जात नाही.

 (१६) अर्धन्यायीक प्राधिकरणाने सुनावणीवर दिलेला आदेश सर्व पक्षांना तात्काळ स्‍पीड पोस्‍ट (Speed Post) व्दारे कळवला जाईल.

 (१७) अर्धन्यायीक प्राधिकरणाने सुनावणीवर दिलेला आदेश डिजीटल स्वाक्षरीने eqj-court या संकेतस्थळावर अपलोड करावा.

 (१८) राजकीय कार्यकर्ता, विधानसभा सदस्य, संसद सदस्य किंवा त्रयस्‍थ पक्षाकडून आलेला कोणताही अर्ज, विनंती किंवा प्रार्थना अर्धन्यायीक कार्यवाहीमध्ये स्वीकारली जाणार नाही, जोपर्यंत ती व्यक्ती कार्यवाहीमध्ये पक्षकार, प्रतिवादी किंवा हस्तक्षेप अर्जदार (Intervention Applicant) नसेल.

 (१९) सुनावणीचा तपशील एका ‘स्वतंत्र रोजनामा’ मध्ये काळजीपूर्वक ठेवला जाईल.

 (२०) प्राधिकरणाला मदत करणाऱ्या संबंधित अधिकारी/विधी सहाय्यकांच्या नोंदींमध्ये केवळ तथ्यांचा आणि कायदेशिर तरतुदींचा तसेच न्यायनिवाड्यांचाच समावेश असेल.

 (२१) विधी अधिकारी / संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदी आदेशाच्या स्वरूपात नसाव्यात.

 ८) आदेश/निर्णयाची संरचना:

 अर्धन्यायीक प्रकरणांतील पारित होणाऱ्या निर्णयांची/ आदेशांची, संरचना संकल्पना यामध्ये समानता असणे आवश्यक आहे. त्याकरिता महसूल अधिकारी यांच्या निकालपत्रांचे संरचना संकल्पन पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे:-

 १) अर्ज/ अपील यांची माहिती यामध्ये पीठासीन अधिकारी यांचे नाव व पदनाम, प्रकरण क्रमांक, अर्जदार व जाबदेणार यांची नावे / अपिलार्थी/प्रतिवादी यांची नावे, प्रकरण दाखल झाल्याचा दिनांक व निकाल जाहीर केल्याचा दिनांक, प्रकरण कोणत्या कायद्याखाली व कलमान्वये निर्णित केले आहे याचा तपशिल नमूद करण्यात यावा.

२) प्रकरणाची संक्षिप्त पार्श्वभूमी

 ३) अर्जदार/अपिलार्थी यांचे संक्षिप्त लेखी म्हणणे / युक्तीवाद

 ४) जाबदेणार / प्रतिवादी यांचे संक्षिप्त लेखी म्हणणे / युक्तीवाद

अर्जदार/अपिलार्थी तसेच जाबदेणार / प्रतिवादी यांचे म्हणणे / लेखी युक्तीवाद निकालपत्रात शब्दश: / जसाच्या तसा नमूद न करता, संक्षिप्त व लेखी म्हणण्याचे/युक्तीवादाचे, सार व्यक्त करणारे असावे.

 ५) अर्जाच्या / अपिलाच्या निर्णयासाठी निश्चित करण्यात आलेले तथ्यविषयक आणि कायदेविषयक वाद मुद्दे

प्रकरणाच्या निर्णयासाठीचे वाद मुद्दे उभय पक्षकारांनी सादर केलेले लेखी म्हणणे / शपथपत्र, दोन्हीं पक्षकाराने सादर केलेले दस्ताऐवज यावरून तयार करण्यात यावेत. तथ्य विषयक अथवा कायदेविषयक म्हणून एखाद्या महत्वाच्या विधानाचे एखाद्या पक्षकाराचे दृढ कथन दुसऱ्या पक्षकाराने नाकबूल केले की वादमुद्दे उपस्थित होतात. महत्वाचे विधान म्हणजे, अर्जदार/अपिलार्थी याला अर्ज / अपील करण्याचा हक्क आहे हे दर्शवण्यासाठी केलेले अभिकथन किंवा जाबदेणार / प्रतिवादी याने बचावासाठी केलेले अभिकथन व त्यावरून कायदेविषयक व तथ्यविषयक विधाने. एका पक्षकाराने दृढ कथन केलेले व दुसऱ्या पक्षकाराने ना कबूल केलेले प्रत्येक महत्वाचे विधान हा स्वतंत्र वादमुद्दा होतो. त्याचप्रमाणे कोणत्या मुद्दयावर मतभेद आहे याची खातरजमा करून तो मुद्दा ठरवून घेणे किंवा ठरविणे.

 ६) निश्चित करण्यात आलेल्या वाद-मुद्द्याच्या अनुषंगाने देण्यात आलेली कारणमीमांसा/विवेचन.

प्रकरणाच्या अभिनिर्णयासाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रत्येक वादमुद्दयांवर एकत्रित किंवा संयुक्तीक कारणमीमांसा देणे आवश्यक आहे. सादर केलेल्या पुराव्याच्या/लेखी म्हणण्याच्या अनुषंगाने, निश्चित करण्यात आलेल्या वादमुद्दयावर कारणमीमांसेसह निष्कर्ष नोंदवणे आवश्यक आहे. वादमुद्दयावरील कारणमीमांसा ही सुसंगत व तर्कसंगत असावी. उभय पक्षकारांकडून त्यांच्या दाव्याच्या / मागणीच्यासंदर्भात विविध न्यायालयांचे निकालपत्र सादर केलेले असतील तर तेवढीच निकालपत्रे जी अर्धन्यायीक प्रकरणांशी समरूप आहेत व त्यामधीलच न्यायतत्व निकालपत्रात नमूद करावेत.

 ७) कार्यात्मक आदेश (Operative order)

 ८) कार्यात्मक आदेशात, आदेश आव्हानित करण्याची विहीत मुदत व अपिलीय न्यायासनाचे पदनाम.

 

९) डिजीटल स्वाक्षरीने आदेश निर्गमित करणे:

अर्धन्यायीक प्रकरणातील अंतिम निर्णय, विलंबमाफीबाबतचे निर्णय स्थगिती अर्जाबाबतचे निर्णय व इतर सर्व निर्णय हे डिजीटल स्वाक्षरीने निर्गमीत करावेत.

माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० आणि माहिती तंत्रज्ञान (दुरूस्ती) अधिनियम, २००८ च्या कलमे २ (१) (प), , ३-अ आणि ५ सह भारतीय साक्ष अधिनियम २०२३, कलम ७३ अन्‍वये डिजीटल स्वाक्षरीव्दारे प्रमाणित केलेला अभिलेख / दस्त हा पुरावा म्हणून स्वीकारला जातो, त्यामुळे प्रत्येक निर्णय हा डिजीटल स्वाक्षरीनेच निर्गमित करावा.

 १०) अंतरिम आदेश / स्थगिती आदेश:

ज्या अधिनियमान्‍वये अर्ज/ अपील दाखल केलेले आहे त्या अधिनियमाखाली अंतरिम आदेश / स्थगिती आदेश देण्याबाबतचे उपबंध / तरतूद असणे आवश्यक आहे. जर अधिनियमाखाली अंतरिम आदेश / स्थगिती आदेश देण्याबाबत उपबंध नसतील तर खालील प्राधिकाऱ्याच्या / पीठासीन अधिकाऱ्याच्या निर्णयाला स्थगिती देता येत नाही अथवा अशा प्रकरणात कोणतेही अंतरिम आदेश पारित करता येत नाहीत.

 श्रीमती इंदिरा देवी विरूध्द पश्चिम बंगाल सरकार या प्रकरणात मा. उच्च न्यायालय, कलकत्ता यांनी न्यायतत्व स्पष्ट केले आहे की, अर्धन्यायीक न्यायासनांना दिवाणी न्यायालयाप्रमाणे दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम १५१ प्रमाणे अंगभूत अधिकार नाहीत. मॉरगन स्टॅनले म्युच्यल फंड विरूध्द कार्तिक दास (१९९४) ४ एससीसी २२५ या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, अर्धन्यायीक प्राधिकरणे उदा. ग्राहक मंच इत्यादी यांना दिवाणी न्यायालयासारखे अंगभूत अधिकार नसतात. अर्धन्यायीक प्राधिकरणांना मिळणारे अधिकार हे त्या संबंधित अधिनियमाखाली प्रदान केलेले असतात. जर संबंधित अधिनियमातंर्गत व्यक्तपणे अंगभूत अधिकार दिले असतील तरच ते वापरता येतील.

त्यामुळे ज्या अधिनियमान्‍वये अर्धन्यायीक कार्यवाही चालू आहे त्या अधिनियमाखाली अंतरिम आदेश / स्थगिती आदेश देण्याचे उपबंध आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ: महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २५६(३)अन्‍वये,

 महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ७४ (२) अन्वये कनिष्‍ठ अर्धन्यायीक प्राधिकाऱ्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचे अधिकाराबाबत तरतुदी आहेत.

 w अंतरिम स्थगिती आदेश देताना विशिष्ट निकष: मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी, लोकमान्य नगर प्रियदर्शनी आणि इतर विरूध्द महाराष्ट्र शासन व इतर रिट याचिका क्र. ६१५८/२००६ दि.२४.११.२००६ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार, अंतरिम स्थगिती आदेश देताना कोणते विशिष्ट निकष पाळावे याबाबत निकष दिलेले आहेत.

अ. प्रथमदर्शनी प्रकरण: प्रथमदर्शनी प्रकरण हा महत्त्वाचा प्रश्न असून त्याबाबत पूर्ण

सुनावणी होणे आवश्यक आहे व सादर पुराव्याच्या आधारे सुनावणीच्या अंती अर्जदाराला अनुतोष (Relief) मिळण्याची शक्यता आहे. एक महत्त्वाचा/ सारभूत प्रश्न असून जो प्रामाणिकपणे उपस्थित केलेला असून ज्याबाबतची तपासणी होणे आवश्यक आहे. अर्जदाराने केलेली मागणी ही क्षुल्लक व तापदायक नाही. पक्षकाराने त्याचा दावा सिध्द करणेसाठी सुरुवातीलाच तितका पुरावा सादर केला आहे की, ज्यामुळे प्रकरणाची चौकशी करणे अत्यावश्यक ठरते.

 ब. सोईचा / सुविधेचा समतोल: जर मनाई आदेश / स्थगिती आदेश मंजूर झाला किंवा नाकारला गेला तर कोणत्या पक्षाचे जास्त नुकसान होईल, याचे मूल्यमापन करणे म्हणजे सोईचा/सुविधेचा समतोल निश्चित करणे होय. जर मनाई हुकूम / स्थायी आदेश दिला नाही तर अर्जदार/अपिलार्थी याला किती नुकसान पोहोचेल व जर मनाई हुकूम / स्थायी आदेश दिला तर जाबदेणार / प्रतिवादी यांचे किती नुकसान होईल याचा तौलनीक अभ्यास म्हणजे सुविधेचा समतोल निश्चित करणे होय. स्थगिती नाकारल्यास अर्जदाराचे होणारे नुकसान पैशाने भरून काढता येणार नाही. उदा. मालमत्ता. तर स्थगिती आदेश दिला तर जाबदेणार  याचे होणारे नुकसान पैशाने सहजपणे भरून काढता येईल.

 क. कधीही भरून न येणारे नुकसान/ अपरिमित नुकसान: म्हणजे, सुनावणी झाल्यानंतर पैशाच्या स्वरूपात नुकसानीची भरपाई होणार नाही. न्यायालयाच्या तात्काळ हस्तक्षेपाशिवाय होणारे नुकसान थांबवता येणार नाही व जे पैशाने भरून काढता येणार नाही. सदरचे नुकसान आर्थिकदृष्ट्या मोजता येत नाही. झालेले नुकसान पूर्ववत करता येत नाही. उदा. ऐतिहासिक इमारतीचा नाश, व्यापार गुपितांचा खुलासा, व्यावसायिक प्रतिष्ठेचे नुकसान, तृतीय पक्षाला मालमत्तेची विक्री.

 ११) फेरचौकशी (Remand):

सर्व अधिनियमांमध्ये अपील प्राधिकाऱ्याला ज्या आदेशाविरूध्द अपील केले असेल तो आदेश रद्द करता येतो, कायम करता येतो, बदलता येतो किंवा फिरवता येतो. तसेच अधिकची चौकशी करण्यासाठी किंवा असा आणखी पुरावा घेण्यासाठी कनिष्ठ प्राधिकाऱ्याला / ज्या प्राधिकाऱ्याच्या आदेशाविरूध्द अपील / फेरतपासणी अर्ज सादर केलेला आहे त्याला निर्देश देता येतात किंवा योग्य वाटेल असे निर्देश देऊन ते प्रकरण निकालात काढण्यासाठी परत पाठवता येते. (प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठी).

प्रकरण निकालात काढण्यासाठी परत पाठवताना / फेरचौकशीसाठी पाठवताना, जो आदेश आव्हानित आहे तो आदेश प्रथम रद्द करणे आवश्यक आहे. आव्हानित आदेश रद्द केल्याशिवाय प्रकरण चौकशीला परत पाठवण्यात येऊ नये. ज्या मुद्दयांवर मूळ कार्यवाहीमध्ये विचार झालेला नाही त्याबाबत अधिकचा पुरावा घेणे / विचार करणे आवश्यक आहे ते मुद्दे प्रकरण परत पाठवताना त्यात नमूद करणे आवश्यक आहे. उदा. नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन न करता आदेश पारित करणे, अपील/अर्ज दाखल करण्यास झालेला विलंब माफ न करता प्रकरणाचा गुणवत्तेवर निर्णय देणे इत्यादी.

 १२) अधिकारिता (Jurisdiction):

अर्धन्यायीक प्रकरणावर निर्णय घेण्यास संबंधित महसूल अधिकारी यांना अधिकार असल्याबाबत संबंधित अधिनियमाचे उपबंध अथवा अधिकार प्रदान (Delegate) केलेले असतील तर अधिकार प्रत्यायुक्त अधिसूचना / नियम / शासन निर्णय/ आदेश / परिपत्रक यांचा स्पष्ट उल्लेख निकालपत्राच्या सुरुवातीला करण्यात यावा.

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १३ (१) च्या परंतुकानुसार, जर राज्य शासनाने सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाव्दारे जिल्हाधिकारी यांचे अधिकार तहसिलदार यांना प्रदान केलेले  असतील तेवढेच जिल्हाधिकारी यांचे अधिकार तहसिलदार यांना वापरता येतील. तसेच अन्य महसूल अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे अन्य अधिनियमाखालील प्रदान केले असतील तर त्या अधिसूचनेचा/शासन निर्णयाचा/परिपत्रकाचा इत्यादी उल्लेख करण्यात यावा.

 w महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २५२ अन्वये, कलम २५१ खाली विहीत मुदतीनंतर प्रकरण दाखल करून घेतले असेल; पुनरिक्षणासाठी किंवा पुनर्विलोकनासाठी दाखल केलेला अर्ज नाकारला असेल; किंवा कार्यवाही स्थगित करण्यासाठी केलेला अर्ज मंजूर करणाऱ्या किंवा नाकारणाच्या आदेशाविरूध्द कोणतेही अपील करता येत नाही. कलम २५७ सह २५९ नुसार फेरतपासणी करण्याची शासनाचे अधिकार आहेत.

 १३) गौणखनिज प्रकरणे:

गौणखनिजाच्या अनाधिकृत उत्खननासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ४८ अन्वये, पारित होणारे दंडात्मक आदेश हे गौणखनिज परिमाण मोजमाप व पंचनामा यावर आधारित असतात.  मात्र गौणखनिज परिमाण मोजमाप व पंचनामा हे सदोष पध्दतीने करण्यात येतात व त्यामुळे पारित केलेले दंडात्मक आदेश वरिष्ठ प्राधिकाऱ्यांकडे व न्यायालयात टिकत नाहीत. या बाबी टाळण्यासाठी पुढील कार्यपध्दती अवलंबणे आवश्यक आहे.

 १) खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ च्या कलम २३ - ब सह महाराष्ट्र गौणखनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ च्या नियम ८० (१) अन्‍वये, सक्षम अधिकाऱ्यांनीच अनाधिकृत गौणखनिजाचा शोध व त्याबाबतचा पंचनामा करणे आवश्यक आहे. तसेच अनाधिकृत गौणखनिजाचे मोजमाप शक्यतो ड्रोनव्दारे करण्यात यावे.

 २) महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: गौखनि १०/०३१६/प्र.क्र.२०४/ख दिनांक १४.६.२०१७ रोजी दिलेल्या परिपत्रकानुसार, गौणखनिज शोध, परिमाण मोजमाप व पंचनामा हा संबंधित उत्खनन करणाऱ्या व्यक्ती / प्रतिनिधीच्या उपस्थितीत करण्यात यावा. उपस्थितीबाबतची नोटीस संबंधितांना आगाऊ देण्यात यावी.

 ३) परिमाण मोजमाप विवरण पत्र व पंचनामा यावर संबंधित उत्खनन करणारी व्यक्ती / प्रतिनिधी यांची स्वाक्षरी घेण्यात यावी.

 ४) प्रकरण निर्णयीत करताना नैसर्गिक न्यायतत्वानुसार हितसंबंधितांना लेखी म्हणणे / युक्तीवाद दिल्यानंतरच अंतिम आदेश पारित करावेत.

 १४) महसूल संहितेच्या कलम २० (२) अन्‍वये हक्काबाबतची चौकशी:  

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २० (२) अन्‍वये, कोणत्याही मालमत्तेबाबत किंवा कोणत्याही मालमत्तेतील किंवा त्यावरील कोणत्याही हक्काबाबत शासनाने किंवा त्यांच्या वतीने किंवा शासनाविरूध्द किंवा कोणत्याही व्यक्तीने दावा सांगितला असेल तेव्हा, जिल्हाधिकार्‍यांनी संबंधीतास योग्य नोटीस देऊन कलम २३४ अन्वये रितसर चौकशी करून त्याबाबत निर्णय देणे अभिप्रेत आहे.

एखाद्या मालमत्तेतील हक्काबाबत दोन व्यक्तीमध्ये वाद असेल तर त्याबाबत कलम २० (२) अन्‍वये चौकशी करता येत नाही. कलम २० (२) अन्‍वये व्यक्ती व शासन यांच्यादरम्यान हक्काबाबत वाद असेल तरच चौकशी करता येते.

कलम २० (२) अन्‍वये जमीन महसूलाची आकारणी किंवा जमाबंदी करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या हक्काच्या नोंदणीसाठी व ते जतन करण्यासाठी, किंवा तशाच इतर प्रयोजनासाठी मालमत्तेतील हक्काबाबत चौकशी करणे अभिप्रेत आहे. या चौकशी अंतर्गत व्यक्तीच्या, मालकी हक्काची / स्वामित्वहक्काची चौकशी केली जात नाही.

 १५) महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्‍वये कार्यवाही:

कलम १५५ अन्वये, लेखनप्रमाद किंवा हितसंबंधित पक्षकारांनी कबूल केल्या असतील अशा चुका दुरूस्त करण्याचे जिल्हाधिकारी यांचे अधिकार तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत.

मात्र कलम १५५ अन्‍वये अपील प्रक्रियेमध्ये अभिप्रेत असलेले दोन पक्षकारांमधील वादांवर तहसिलदार यांच्‍या मार्फत निर्णय देण्यात येतात.

मा. न्यायालयीन न्यायनिर्णयानुसार, लेखनप्रमाद म्हणजे नजरचुकीने झालेली चूक, जी करण्यापाठीमागे कोणताही हेतू नाही.

प्रथमदर्शनी दिसून येणारी चूक जी तपासण्याची किंवा शोधण्याची आवश्यकता नाही.

लेखनप्रमाद चूक म्हणजे अशी चूक, जी लेखनाने दुरुस्त करता येते व ज्यासाठी अभिनिर्णय करण्याची आवश्यकता नाही.

लेखनप्रमाद चूक म्हणजे अपघाती चूक व जी अभिलेख पाहता प्रथमदर्शनी दिसून येते, अशी

चुक शोधण्याची आवश्यकता नसते.

लेखनप्रमाद चुक म्हणजे, निष्काळजीपणाने झालेली लिहिण्याची किंवा टंकलेखनाची चुक, त्याबाबतची काही उदाहरणे खालीलप्रमाणे.

अ) कब्जेदाराचे नाव चुकीचे लिहीणे.

ब) भूमापन क्रमांक चुकीचा नमूद करणे.

क) जमिनीचे क्षेत्र चुकीचे नमूद करणे.

ड) चुकीच्या पध्दतीने लिहिणे,

इ) भूखंड क्रमांक नकाशामध्ये नजरचुकीने लिहिण्याचे राहून जाणे इत्यादी.

 महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१४९/ई-१ दि.२५.७.२०२३ व जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांनी यासंदर्भात निर्गमित केलेले परिपत्रक क्र.रा.भू.२/इ हक्क / बंधनकारक / २०२५ दि.०७.५.२०२५ अन्‍वये महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्‍वये, लेखनप्रमाद दुरूस्ती करण्यासाठी इ-हक्क या फेरफार प्रणालीचा वापर बंधनकारक असलेबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. त्यानुसारही कार्यवाही होणे बंधनकारक आहे.

कलम १५५ अन्‍वयेचे मूळ अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. सदरचे अधिकार त्‍यांनी तहसिलदार यांना प्रदान (delegate) केलेले आहेत. त्यामुळे तहसिलदार यांच्या कलम १५५ अन्‍वये पारित  आदेशाविरूध्द अपर आयुक्त यांचेकडे अपील / पुनरिक्षण अर्ज दाखल करता येईल.

 वास्‍तविक, (१) तुलसीदास खिमीजी आणि इतर विरुद्ध अब्दुल गफ्फार अब्दुल करीम, १९९१(१)  मह. एल.आर. ५००.

(२) खाजाभाई अब्दुल्ला साहेब लुकडे विरुद्ध मोहम्मद इशाक अब्दुल्ला साहेब लुकडे,या प्रकरणात

 मा. उच्च न्यायालय,  मुंबई, रिट याचिका क्र. ६७०/१९८४, निकाल दिनांक १२.७.१९९१, माननीय न्यायमूर्ती श्री. एन.पी. चपळगावकर यांनी  निकालपत्रात जे नमूद केले आहे त्‍याचा मतितार्थ असा की,

‘‘ महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अन्‍वये दिलेल्‍या अनुसूची ‘ई’ च्या स्तंभ १ मध्ये निर्दिष्ट केलेल्या महसूल किंवा सर्वेक्षण अधिकार्‍याने दिलेल्या कोणत्याही निर्णयाच्‍या किंवा आदेशाच्या संदर्भात अनुसूची ‘ई’ च्‍या स्‍तंभ २ मध्‍ये निर्दिष्ट केलेल्या अधिकार्‍यांकडे सध्या लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या बाबतीत अपील करण्याचा अधिकार देते. दिवाणी प्रक्रिया कलम ५४ अन्‍वये विभाजन डिक्री अंमलात आणणारे तहसिलदार किंवा इतर महसूल अधिकारी हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २४७ (१) अन्‍वये  सामान्य अधिकारांना अपवाद केले गेले नाहीत. अशा प्रकरणातही कलम २४७ सह वाचलेल्या अनुसूची ‘ई’ नुसार अपील करण्याचा अधिकार आहे.

तहसिलदार हे उपविभागीय अधिकार्‍यांच्या अधिनस्‍त अधिकारी असल्याने, त्‍यांच्‍या आदेशाविरूध्‍दचे अपील हे उपविभागीय अधिकारी यांच्‍याकडेच दाखल केले गेले पाहिजे. उपविभागीय अधिकारी यांनी, त्‍यांना अशा अपिलाच्‍या सुनावणीचे अधिकार नाहीत असे म्‍हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.’’

उक्‍त दोन्‍ही निकालातून स्‍पष्‍ट होते की,

जरी मा. जिल्‍हाधिकारी यांच्‍या अधिनस्त एखाद्‍या महसूल अधिकार्‍याने, मा. जिल्हाधिकारी यांनी त्‍याला प्रदान केलेल्या अधिकारान्वये एखादा आदेश पारित केला असेल तरीही अशा आदेशाविरूध्‍दच्‍या अपिलाची सुनावणी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २४७ अन्‍वये दिलेल्‍या अनुसूची ‘ई’ नुसारच, अनुसूची ‘ई’, स्‍तंभ दोन मध्‍ये नमूद अधिकार्‍यांसमोरच होईल.

माझ्‍यामते, मागील काळात कलम १५५ चा स्‍वैर वापर करून अनेक चुकीचे, बेकायदेशीर आदेश प्रदान करण्‍रयात आले आहेत, त्‍यामुळे, ‘‘तहसिलदार यांच्या कलम १५५ अन्‍वये पारित  आदेशाविरूध्द अपर आयुक्त यांचेकडे अपील / पुनरिक्षण अर्ज दाखल करता येईल’’ ही तरतूद करण्‍यात आली असावी.

 १६) शेतरस्ता उपलब्ध करून देणे:

भू-मापन क्रमाकांत जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीला शेतीसाठी रस्ता उपलब्ध नसेल तर इतर भू-मापन क्रमाकांच्या सीमावरून रस्ता देणेबाबत अधिकार तहसिलदार यांना महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये आहेत. तर मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ च्या कलम ५ नुसार, शेतीच्या कारणासाठी रस्त्यांचा किंवा जाण्याच्या वहिवाटीच्या रस्‍त्‍यामध्ये कोणी अडथळा निर्माण केला असेल किंवा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करित असेल तर तो दूर करून देण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत.

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये, नवीन शेतरस्ता मागण्याबाबतचे उपबंध आहेत तर मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६, कलम ५ अन्‍वये, प्रचलित/परंपरागत अस्तित्वात असलेल्या रस्त्यामध्ये अडथळा आणल्यास दूर करण्याबाबतचे उपबंध आहेत. यानुसारच प्रकरण दाखल  करून निर्णयीत करण्यात यावेत. बहुतांशीवेळी परंपरागत वहिवाटीचा रस्ता खुला करून मिळणेबाबत अर्ज केलेला असतो. परंतु अशी प्रकरणे मामलतदार न्यायालय अधिनियमाखाली अभिनिर्णित न करता महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्‍वये नवीन शेतरस्त्याची मागणी आहे असे समजून त्याप्रमाणे बांधावरून रस्ता देणेबाबत कार्यवाही केली जाते. त्यामुळे प्राप्त  झालेल्या अर्जामधील मागणी व उपरोक्त दोन अधिनियमाची कार्यकक्षा यांचा विचार करूनच निर्णय घेण्यात यावा.

शासन निर्णय क्रमांक जमीन- २०२५/प्र.क्र.४७/ज - १अ, दिनांक २२.५.२०२५ अन्‍वये, शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कसदरी नोंद घेणेबाबत दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच, मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६, कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम १४३ अन्वये दाखल दाव्यांमध्ये आदेशाच्या अंमलबजावणीची खात्री करण्याकरीता स्थळपहाणी पंचनामा व जिओ टॅग फोटो घेणेबाबत सर्व क्षेत्रीय अधिकारी/प्राधिकारी यांना महसूल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक २९.१०.२०२५ अन्वये दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यात यावे. तसेच, रस्त्यांचे जिओ टॅगींग करून त्याचे अक्षांश रेखांश नमूद करावे.

 १७) वाटप दरखास्त प्रकरणे:

दिवाणी प्रक्रिया संहिता, कलम ५४ अन्‍वये, महसूल देण्यास पात्र म्हणून निर्धारित झालेल्या अविभक्त (undivided) मालमत्तेची वाटणी करण्याकरिता किंवा अशा मालमत्तेतील  हिस्सा तोडून त्याचा अलग कब्जा देण्याकरिता

मा. दिवाणी न्यायालयाकडून प्राथमिक हुकूमनामा पारित केला जातो.

  प्राथमिक हुकूमनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी मा. दिवाणी न्यायालयाकडून जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले जाते.

  जिल्हाधिकारी यांच्‍याकडून मा. दिवाणी न्यायालयाच्या प्राथमिक हुकूमनाम्यानुसार प्रत्यक्ष सरस- निरस वाटप करण्यासाठी प्रकरण तहसिलदार यांचेकडे वर्ग केले जाते.

  मालमत्तेतील सरस-निरस वाटप महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ सह महाराष्ट्र जमीन महसूल (धारण शेतजमिनीचे विभाजन) नियम, १९६७ अन्‍वये करावयाचे असते.

  उक्‍त विभाजन हे महाराष्ट्राचा जमिनीचा तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ च्या तरतुदींना अधिन राहून करावयाचे असते.

 परंतु असे निर्दशनास आलेले आहे की, धारण जमिनीचे विभाजन करताना, स्थानिक क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी विस्तार असलेली धारण जमीन निर्माण होत आहे किंवा कसे याबाबतचा विचार न करता विभाजन करण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्राचा जमिनीचा तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ च्या तरतुदींचा भंग होतो.

  ज्‍या प्रकरणात विभाजनामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी विस्तार असलेली धारण जमीन निर्माण होत असेल व प्राथमिक हुकूमनाम्याची अंमलबजावणी उपरोक्त कलम ८अअ (१) नुसार करता येऊ शकत नसेल तर महाराष्ट्राचा जमिनीचा तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ८ अअ (२) नुसार विभाजन करण्याचे आहे. तसेच ज्या प्रकरणात ८अअ (२) नुसारही कार्यवाही करता येऊ शकत नसेल तर प्राथमिक हुकूमनामा ज्या न्यायालयाने पारित केला आहे त्या न्यायालयाकडे सुधारित प्राथमिक हुकूमनाम्यासाठी पाठवणे आवश्यक आहे.

वाटप दरखास्त प्रकरण / प्राथमिक हुकूमनामा जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्यापासून सात दिवसाच्या आत संबंधित तहसिलदार यांचेकडे, प्राथमिक हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाठवावा. मात्र असे निर्दशनास आलेले आहे की, दरखास्त प्रकरणे कार्यवाहीसाठी वर्षानुवर्ष विनाकार्यवाही प्रलंबित आहेत. तसेच दरखास्त प्रकरण कामाचा आढावाही जिल्हाधिकारी स्तरावर प्रतिमाह होणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये होत नाही. दरखास्त प्रकरणांची अंमलबजावणी मोहीम स्तरावर करण्यात यावी. तसेच जिल्हाधिकारी यांनी प्रतिमाह होणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत दरखास्त प्रकरणांचा आढावा घ्यावा. तसेच विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांचा प्रतिमाह आढावा विभागीय स्तरावर घ्यावा. याबाबत वेळोवेळी मा. उच्च न्यायालयाने कोर्ट वाटप प्रकरणातील (दिवाणी प्रक्रिया अधिनियम, कलम ५४) प्राथमिक हुकुमनामा अंमलबजावणीला जिल्हाधिकारी स्तरावर होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. तसेच भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक तसेच महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता यांच्या कामगिरी लेखा परिक्षण अहवालामध्ये (Performance Audit) तीव्र शब्दांत दरखास्त प्रकरणातील होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे.

 वाटप दरखास्‍त प्रकरणात, जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून न्‍यायालयीन प्राथमिक हुकुमनामा प्राप्त झाल्यानंतर तहसिलदार यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे:-

१. प्राथमिक हुकुमनामा प्राप्त झाल्यानंतर, हुकूमनाम्यातील पक्षकारांना तहसिलदार यांनी

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २३० अन्वये नोटीस बजवावी व प्राथमिक हुकुमनामा मधील पक्षकार हयात आहेत का याबाबतची खात्री करावी.

 १.१. जर पक्षकार मयत असल्याचे आढळून आल्यास, त्‍याच्‍या वारसांची नावे अधिकार अभिलेखात दाखल केलेली आहेत काय याचीही पडताळणी करावी. जर मयत पक्षकारांच्या वारसांची नावे अधिकार अभिलेख पत्रकाला दाखल करण्यात आलेली नसतील तर ती दाखल करणेबाबत महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ अन्वये संबंधित मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार कडून निर्देश प्राप्त झाल्यापासून तीन आठवड्यांत वारस दाखल करण्याची कार्यवाही करावी.

 २. महाराष्ट्राचा तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबतचा अधिनियमाच्या कलम ८अअ (१) नुसार, संबंधित स्थानिक क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी विस्तार असलेली धारण जमीन निर्माण होत नाही याबाबतची प्रथम खात्री करण्यात यावी. जर प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी विस्तार असलेली धारण जमीन निर्माण होत नसेल तरच प्रकरण उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्‍याकडे सरसनिरस वाटपासाठी वर्ग करण्यात यावे.

 ३. ज्या प्रकरणात कलम ८अअ (१) नुसार, जमिनीचे विभाजन करणे आवश्यक आहे, असे प्रकरण संबंधित उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेकडे सरसनिरस वाटपासाठी प्राथमिक हुकूमनामा प्राप्त झाल्यापासून चार (४) आठवड्याच्या आत पाठवावे. सरसनिरस वाटप / धारण जमिनीचे विभाजन, महाराष्ट्र जमीन महसूल ( धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ च्या नियम ५ अन्वये, संबंधित उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांनी करावे. दरखास्त वाटप प्रकरणातील भू-मापन हे जलद मोजणीचे शुल्क आकारून, प्राथम्याने भू-मापन करून सरसनिरस वाटप कार्यवाही दरखास्त प्रकरण प्राप्त झाल्यापासून तीन महिन्याच्या आत पूर्ण करावी व संबंधित तहसिलदार यांचेकडे प्रकरण पाठवण्यात यावे. तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी सरसनिरस वाटपानुसार आकारणीचे संविभाजन, महाराष्ट्र जमीन महसूल ( धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ च्या नियम ६ अन्वये करावे.

 ४. उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेकडून सरसनिरस वाटप कार्यवाहीचे प्रकरण प्राप्त झाल्यानंतर, संबंधितांचे म्हणणे ऐकून तहसिलदार यांनी, महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ च्या नियम ७ अन्वये अंतीम वाटप आदेश तीन आठवड्याच्या आत पारित करावेत.

 ५. तहसिलदार यांच्या अंतीम आदेशाच्या अनुषंगाने संबंधित मंडळ अधिकारी यांनी जागेचा ताबा संबंधित धारकांना देऊन अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याची कार्यवाही सात दिवसात पूर्ण करावी.

 १८) गाव नमुना ७- ब मध्ये नोंदी घेणे:

भू-मापन क्रमांक किंवा भू-मापन क्रमांकाचा उपविभाग हा अधिकार अभिलेखानुसार ज्या व्यक्तीच्या कब्जात असणे आवश्यक आहे, त्या व्यक्तीव्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या कब्जात आहे त्यावेळी अशा व्यक्तीची नोंद, गाव नमुना ७-ब मध्ये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ च्या नियम ३१ मध्ये दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच करण्यात यावी.

 मात्र दुसऱ्या व्यक्तीचा असणारा कब्जा कायदेशीर असावा.

 मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी, किसन पुंजाजी विरुध्द यशोदाबाई महादेव या प्रकरणात स्पष्ट केले आहे की, दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या कसणे अथवा कब्जात असणे म्हणजे, अशा दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर असणारा कब्जा / करण्यात येणारी लागवड याला कायदेशीर आधार आहे. असा दुसऱ्या व्यक्तीचा कब्जा खर्‍या मालकाला, कायदेशीरर प्रक्रिया पार पाडल्याशिवाय दूर करता येत नाही.

 दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीवरील कब्जा हा कायदेशीरर नसेल तर त्याआधारे अशी दुसरी व्यक्ती कायदेशिररित्या जमीन कसत आहे असे म्हणता येणार नाही.

 गाव नमुना क्रमांक ७-ब मध्ये नोंदी करण्यापूर्वी, जमीन मालकाने लेखी कराराने अथवा अन्य अभिलेखाव्दारे दुसऱ्या व्यक्तीला जमीन कसण्याची परवानगी दिलेली आहे याची शहानिशा करणे आवश्यक आहे.

 जर लेखी दस्त अथवा अभिलेख नसेल तर महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २३४ अन्‍वये, रीतसर चौकशी करून मूळ जमीन मालकाची दुसऱ्या व्यक्तीच्या कब्जाला / लागवड करण्याला संमती आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. अशी खात्री करूनच गाव नमुना ७-ब ला नोंदी घेण्यात याव्या व त्याबाबतच्या हरकतीबाबत संबंधित महसूली वर्षातच अनिनिर्णित कराव्यात.

 मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी नारायण लक्ष्मण पाटील विरूध्द गाला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. व इतर या प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार, त्रयस्थ व्यक्तीचा ताबा / कब्जा आहे व या कब्जाला जमीन मालकाने आक्षेप घेतला नाही म्हणून केवळ अशा ताबा / कब्जाच्या आधारे त्रयस्थ व्यक्तीचे नाव दाखल करता येणार नाही. ताबा / कब्जा असणाऱ्या व्यक्तीला कायदेशिर अधिकार प्राप्त आहे काय याबाबतची शहानिशा होणे आवश्यक आहे.

 १९) लवाद प्रकरणे:

राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६, कलम ३- ग (५) व (६) अन्वये, सक्षम प्राधिकारी भूमीसंपादन (CALA) यांनी भूसंपादनापोटी निश्चित करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम उभय पक्षकारांना मान्य नसल्यास, एका पक्षकाराच्या अर्जावरून केंद्र सरकार नियुक्त लवादामार्फत निर्धारित करण्याची आहे. तसेच लवाद प्रक्रिया ही लवाद व समेट कायदा, १९९६ अन्वये पार पाडण्याची आहे.

  राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी लवाद म्हणून संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५, कलम १९-ब (८) अन्वये, भूसंपादन अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या भरपाईची रक्कम दोहोंपैकी कोणत्याही पक्षकाराला मंजूर नसेल तर, दोहोंपैकी कोणत्याही पक्षकाराने अर्ज केल्यास, ही रक्कम, राज्य शासन नियुक्त विभाग आयुक्त यांनी निश्चित करावयाची आहे. लवाद प्रक्रिया ही अर्धन्यायीक प्रक्रिया आहे. मात्र असे निर्दशनास आले आहे की, अपर जिल्हाधिकारी / जिल्हाधिकारी स्तरावर तसेच विभागीय आयुक्त स्तरावर लवाद प्रकरणे मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाईची रक्कम निर्धारण करण्यासाठी प्रलंबित आहेत. जेवढ्या जास्त कालावधीसाठी लवाद प्रकरणांवर निर्णय होणार नाही तेवढ्या कालावधीचे ९ टक्के दराने व्याज संबंधित जमीन गमावणाऱ्या व्यक्तीला द्यावे लागते. त्यामुळे प्रलंबित लवाद प्रकरणांचा निपटारा हा जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या आत करण्यात यावा. लवाद प्रकरणे कामकाज याबाबतचा आढावा महसूल व वन विभाग स्तरावरून दरमहा घेण्यात यावा.

 २०) वतन / इनाम अधिनियमाखालील कामकाज:

वंशपरंपरागत पद, वतनी मालमत्ता, वतनदार तसेच वहिवाटदार, वतन व वतनावरील हक्क दुमाला करून देण्यास/हस्तांतरण करून देण्यास प्रतिबंध, वतनी मालमत्तेचे संरक्षण, वतन चाकरीबद्दलचा मोबदला तसेच वंशपरंपरागत पदाचे उत्तराधिकारी इत्यादी बाबत महाराष्ट्र वंशपरंपरागत पद अधिनियम, १८७४ अन्‍वये निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच विविध अधिनियमान्‍वये वतन/इनाम नष्ट करणे व धारण केलेली जमीन अधिकृत धारकाला परत करणे याबाबतची कार्यवाही संबंधित अधिनियमातंर्गत जिल्हाधिकारी अथवा जिल्हाधिकाऱ्याची कामे करण्यासाठी व त्याच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्याला अधिकार आहेत.

 वतन/इनाम अधिनियमान्‍वये जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवलेले असतील तर त्याबाबत संबंधित नियमाचा / अधिसूचनेचा स्पष्ट उल्लेख अर्धन्यायीक आदेश पारित करताना नमूद करणे आवश्यक आहे. जेणेकरून संबंधित वतन / इनाम अधिनियमातंर्गत निर्णय घेण्याची अधिकारिता याबाबत स्पष्टता दिसून येईल.

 तसेच बहुतांशी वतन/इनाम अधिनियमातंर्गत जिल्हाधिकारी यांच्या विवक्षित वतने त्या पदावरील हक्क आणि अनुषंगिक गोष्टी नाहीशी करणे व धारकाला परत करणे या आदेशाविरूध्द अपील करता येत नाही. केवळ जिल्हाधिकाच्यांनी निश्चित केलेल्या नुकसान भरपाईविरूध्द मा. महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरणाकडे अपील करण्याची तरतूद आहे, ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

 मराठवाडा विभागातील, हैद्रराबाद अतियात चौकशी अधिनियम, १८५२ मध्ये, पूर्वाश्रमीच्या हैद्राबाद संस्थानातंर्गत जहागिर, इनाम, रोख पेन्शन इत्यादी संबंधी वारसाहक्क आणि अतियात प्रदानामधील अधिकार, हक्क व हितसंबंध याबाबतच्या चौकशीबाबतच्या तरतुदी या अधिनियमाच्या कलम ३-अ मध्ये दिलेल्या आहेत. मात्र या अधिनियमाखाली अर्ज मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी स्तरावर अभिनिर्णयासाठी प्रलंबित आहेत. याबाबत सदर प्रकरणे विहीत कालमर्यादेत निर्गत होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी / विभागीय आयुक्त यांनी या अधिनियमाखाली प्रलंबित प्रकरणांचा प्रतिमाह होणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात यावा.

 २१) शासन स्तरावर दाखल होणाच्या अर्धन्यायीक प्रकरणाबाबत:

शासन स्तरावरील फेरतपासणी/अपील प्रकरणात, तहसिलदार यांनी समक्ष सुनावणीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. जर शासन स्तरावरील सुनावणी व तहसिलदार स्तरावरील सुनावणी एकाच दिवशी असेल तर त्याच दिवशी हक्क नोंदीचे काम पाहणाऱ्या नायब तहसिलदार यांनी उपस्थित राहावयाचे आहे.

 वाद-मिळकतीसंदर्भातील सुरूवातीपासून झालेल्‍या फेरफार नोंदी/ हस्तांतरणे याबाबतचा कालक्रमानुसार तपशिल तक्ता स्वरूपात सुनावणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. तसेच हस्तांतरणाबाबत फेरफार पत्रकाच्या / अधिकार अभिलेख पत्रकाच्या जमाबंदी पासूनच्या प्रमाणित वाचनीय प्रती हजर राहणाऱ्या तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी सादर करणे आवश्यक आहे.

 मूळ फेरफार पत्रक जीर्ण/अति जुने झाले असेल तर त्याची यांत्रिक पध्दतीने तयार करण्यात येणारी छायाप्रत / प्रतीरूप प्रतीमा ही अवाचनीय असते. त्यामुळे अशा फेरफार पत्रकाचे, अधिकार अभिलेख पत्रकाचे व इतर अभिलेखाची प्रतिरूप प्रतिमा ही हस्तलिखित करून प्रमाणित प्रत सादर करावी. तसेच दाखल अर्ज/ अपील प्रकरणाच्या अनुषंगाने, ज्या महसूल अधिकाऱ्यांचा निर्णय आव्हानित केलेला आहे त्यांनी मान्य केलेला / स्वाक्षरीचा परिच्छेदनिहाय अहवाल सादर करावा.

 परिच्छेदनिहाय अहवालामध्ये निम्नस्तरीय महसूल अधिकारी यांच्‍या स्तरावर झालेल्या अर्धन्यायीक कार्यवाहीचा केवळ तपशिल नमूद न करता, अर्ज/ अपीलामधील मागणीच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अभिप्राय नमूद करण्यात यावेत.

 शासन स्तरावरील सुनावणीच्या नोटीस पक्षकारांना सुनावणीपूर्वी कमीत कमी ७ दिवस अगोदर बजावली जाईल याबाबत संबंधित मंत्रालयीन कार्यासन व संबंधित तहसिलदार यांनी खात्री करावी. शासन स्तरावरील सुनावणीला तहसिलदार यांनी उपस्थित राहताना नोटीस बजावणी अहवाल, त्याबाबतची पोहोच व प्रकरणाची परिपूर्ण माहिती व कागदपत्रे तसेच अर्जदार यांच्या अर्जाची प्रत जाबदार यांना बजावलीची पोहोच सादर करायची आहे.

 शासन परिपत्रक  अन्याप्र- २०२३/प्र.क्र.८०/- १-अ, दिनांक ७ ऑगस्ट, २०२३ अन्‍वये, अपर आयुक्त, उपसंचालक (भूमी अभिलेख) अथवा सक्षम अधिकारी यांनी पारित केलेल्या अर्धन्यायीक आदेशाची अंमलबजावणी केली नसल्यास आणि असे अर्धन्यायीक आदेश संबंधितांनी, शासन स्तरावर संबंधितांनी आव्हानित केल्यामुळे त्याबाबतची सुनावणीची नोटीस क्षेत्रीय स्तरावर प्राप्त झाल्यानंतर अशा सुनावणीचे अंतरिम अथवा अंतिम आदेश पारित होईपर्यंत, अपर आयुक्त / उपसंचालक, भूमी अभिलेख अथवा सक्षम प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशास अंमल देण्यात येऊ नये. तसेच या आदेशाची अधिकार अभिलेखात नोंद घेऊ नये.

अशा वेळी शासन स्तरावरून मा.मंत्री (महसूल) / मा.राज्यमंत्री (महसूल) यांचे न्यायालयाकडून पारित होणाच्या अर्धन्यायीक आदेशाची प्रतिक्षा क्षेत्रीय महसूल प्राधिकारी यांनी करावी.

 २२) अर्धन्यायीक कामाचे मूल्यमापन:

जिल्हाधिकारी यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या दरमहा होणाऱ्या बैठकीमध्ये अर्धन्यायीक कामकाजाचा सविस्तर आढावा घ्यावा. आठवड्यातील दोन दिवशी सुनावणी घेण्यात येते किंवा कसे व विहीत मुदतीत प्रकरणांची निर्गती होत आहे किंवा कसे याबाबतचा आढावा घ्यावा. तसेच विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत महसूल अधिकारी निहाय उपरोक्त बाबींचा आढावा घेण्यात यावा.

 प्रत्येक महसूल अधिकाऱ्याच्या (तहसिलदार/ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी ) विविध

अधिनियमाखाली पारित केलेल्या कमीत कमी ५ टक्के आदेशांच्या कायदेशिरपणाबद्दल किंवा औचित्याबद्दल आणि कार्यवाहीची नियमानुसारितेबद्दल जिल्हाधिकारी यांनी तपासणी करावी.

 तर प्रत्येक अपर जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या ३ टक्के आदेशाची तपासणी विभागीय आयुक्त यांनी करावी. अपर विभागीय आयुक्त यांच्या ५ टक्के निर्णयांची तपासणी अपर मुख्य सचिव तथा विशेष कार्य अधिकारी (अवरि) यांनी करावी.

 तपासणी कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी स्तरावर महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात यावा. तसेच विभागीय आयुक्त स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या बैठकीमध्येही आढावा घेण्यात यावा.

विभागीय आयुक्त यांनी प्रत्येक तीन महिन्यानंतर अर्धन्यायीक प्रकरणांचे निर्गतीकरण प्रमाण व निर्णयांची गुणवत्ता याबाबत विभागातील अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची एकत्रित बैठक (एक दिवसाची) घ्यावी व अर्धन्यायीक कामकाजाचा आढावा घेण्यात यावा व आवश्यकतेप्रमाणे मार्गदर्शन करावे. अर्धन्यायीक कामकाजाची गुणवत्ता व विहीत कालमर्यादेतील निर्गती, वार्षिक गोपनीय अहवालाचा मूल्यमापन संदर्भ असेल.

 ज्या प्रकरणात महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २५७ अन्वये फेरतपासणी कार्यवाही करणे आवश्यक आहे त्या प्रकरणात अधिकारितेनुसार फेरतपासणीची कार्यवाही करावी. तहसिलदार/ उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात सजानिहाय फेरफार नोंद मंजुरी कार्यवाही विहीत कार्यपध्दतीने पार पाडण्यात येत आहे काय याची तपासणी करण्यात यावी.

 २३) प्रकरणे वर्ग करणे:

विभागीय आयुक्त यांनी प्रत्येक महसूल अधिकारी निहाय कार्यभार विश्लेषण, मागील तीन वर्षात दाखल झालेली प्रकरणे, व प्रकरण निकाली काढण्याचा कालावधी याचा विचार करून, प्रत्येक महिन्यात किती प्रकरणे प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने निर्गमित करणे आवश्यक आहे हे निश्चित करावे.

 प्रतिमाह प्राप्त होणारी प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे याचा विचार करून महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २२६ अन्वये, ज्यादा कार्यभार परिमाण असलेल्या महसूल अधिकाऱ्यांची प्रकरणे अन्य महसूल अधिकाऱ्यांकडे वर्ग करणेबाबत विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा.

मात्र कमीत कमी ३० अर्धन्यायीक प्रकरणे प्रतिमाह निर्गमित करणे आवश्यक आहे.

ज्या महसूल अधिकाऱ्यांना प्रतिमाह ३० पेक्षा जास्त प्रकरणे निर्गमित करावी लागणार आहेत त्यांची अतिरिक्त प्रकरणे इतर महसूल अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी / विभागीय आयुक्त स्तरावरून करण्यात यावी.

 २४) प्रशिक्षण व क्षमता वाढ:

अर्धन्यायीक प्रकरणांचे कामकाज पाहणारे, पीठासीन अधिकारी/ अपीलीय प्राधिकारी यांच्या क्षमता, कौशल्य, विविध अधिनियमांचे सखोल ज्ञान यामध्ये वृध्दी होण्यासाठी नियमित प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक आहे.

 पहिल्या प्रशिक्षणासाठी (माहे मार्च / एप्रिल २०२६) विभागीय स्तरावरती एक-दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी मा.मंत्री (महसूल) यांच्या आस्थापनेवरील अर्धन्यायीक कक्षाची मदत घ्यावी.

 तद्नंतर प्रत्येक वर्षी माहे मे महिन्याच्या अखेरीस उजळणी प्रशिक्षण वर्ग विभागीय स्तरावरती, विभागीय आयुक्त यांनी आयोजित करावेत. प्रशिक्षणाअंती महसूल अधिकाऱ्यांची परीक्षा घेण्यात यावी. या प्रशिक्षण वर्गात अर्धन्यायीक कामकाज, नैसर्गिक न्यायतत्वे, महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, प्रकरण १२ व प्रकरण १३ मधील उपबंध तसेच विविध अधिनियमाखाली चालणाऱ्या अर्धन्यायीक कामकाजाची कार्यपध्दती, संबंधित अधिनियमाखाली मा. सर्वोच्च न्यायालय तसेच विविध मा. उच्च न्यायालय यांचे महत्वपूर्ण न्यायनिर्णय, शासन निर्णय / परिपत्रके इत्यादी बाबींचा समाविष्ट करण्यात यावा.

तसेच विभागीय आयुक्त स्तरावर अर्धन्यायीक प्रकरणातील कलमानुसार दाखल दाव्याच्या कामकाज कार्यपध्दतीबाबत प्रशिक्षण मॉड्युल तयार करून i-Got प्रणालीवर अपलोड करावे. कृत्रिम बुध्दीमत्ता माध्यमांचा (Al tools) वापर अर्धन्यायीक कामकाजात कशा पध्दतीने करता येईल याबाबतचे अनुभवी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात यावे.

 २५) प्रशासकीय बाबी:

प्रत्येक स्तरावरील न्यायपीठांना संबंधित जिल्हाधिकारी यांनी अर्धन्यायीक कामकाजासाठी व सुनावणीसाठी येणारे वकील, पक्षकार व इतर यांचेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था (फर्निचर) व अन्य आवश्यक सुविधा जसे की, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह इ. जिल्हाधिकारी यांनी निर्माण करावे.

 २६) निष्पक्षता, वस्तुनिष्ठता व जबाबदारी:

अर्धन्यायीक कामकाजावर निर्णय घेण्याचे अधिकार हे ज्या व्यक्तीला / प्राधिकाऱ्याला प्रदान / निहीत करण्यात आलेले आहेत त्याच व्यक्तीने / प्राधिकाऱ्याने निर्णय घेणे आवश्यक आहे. अर्धन्यायीक निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित अधिनियमात तशी तरतूद असल्याशिवाय प्रत्यायोजन करता येणार नाही.

 अर्धन्यायीक निर्णय घेताना प्रकरणातील तथ्ये, वस्तुस्थिती, संबंधित कायद्याच्या तरतुदी यांचा वस्तुनिष्ठ विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. (Application of mind).

कोणत्याही परिस्थितीत यांत्रिक पध्दतीने तसेच अन्य व्यक्तीं/संस्था यांच्या सूचनेनुसार / मार्गदर्शनानुसार, अर्धन्यायीक निर्णय घेण्यात येऊ नयेत.

 निकालपत्र संबंधित पीठासीन अधिकारी यांनी स्वतः तयार करणे आवश्यक आहे. बाह्य यंत्रणा/दुय्यम अधिकारी यांचेकडून निकालपत्र तयार करून घेण्यात येऊ नये.

बहुतांश अधिनियमांमध्ये, अर्धन्यायीक कार्यवाही ही भारतीय दंड अधिनियम, / भारतीय न्याय अधिनियम, २०२३ नुसार, न्यायीक कार्यवाही म्हणून मानली गेली आहे. त्यामुळे अर्धन्यायीक कार्यवाही ही सचोटीने, भेदभाव विरहीत / निष्पक्षपणे व योग्य ती प्रतिष्ठा ठेऊन पार पाडणे आवश्यक आहे. अर्धन्यायीक कामकाज करणाऱ्या लोकसेवकाला स्वतंत्र्य आणि निर्भयरित्या काम करण्यासाठी, सामान्यतः शिस्तभंग कारवाई केली जात नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये पीठासीन अधिकाऱ्याचे वर्तन दुष्कृत्य दर्शवित असेल तर शिस्तभंग विषयक कारवाई होऊ शकते.

 न्यायीक कार्यवाहीमध्ये खोटा पुरावा देणे अथवा पीठासीन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्वक अपमान करणे अथवा कामात अडथळा आणणे तसेच अर्धन्यायीक कामकाज पाहणाऱ्या लोकसेवकाने भ्रष्टतापूर्वक अहवाल देणे/निर्णय देणे हा दंडनीय अपराध आहे.

 २७) राजभाषा मराठीचा वापर अर्धन्यायीक कामकाजात करणे:

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ अन्वये दि.२६ जानेवारी १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा अंगीकार करण्यात आला आहे.

सदर अधिनियमातंर्गत महाराष्ट्र राजभाषा (वर्जितप्रयोजने) नियम १९६६, दि.३०.०४.१९६६ रोजीच्या अधिसूचनेन्चये अंमलात आले आहेत. या संदर्भात मराठी भाषा विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक मभावा- २०१८/प्र.क्र.४७/भाषा-२, दिनांक ७ मे, २०१८ अन्वये, शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करणेबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत.

 महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४, कलम ४ अन्‍वये, संविधानाच्या अनुच्छेद क्र. ३४५ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, सर्व शासकीय प्रयोजनांकरिता / शासन व्यवहारात मराठी ही महाराष्ट्र राज्याच्या संबंधात देवनागरी लिपीतील मराठी भाषा ही उपयोगात आणावयाची भाषा आहे.

त्यामुळे अर्धन्यायीक प्रकरणातील पारित होणारे निर्णय हे देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असणे बंधनकारक आहे.

त्याअनुषंगाने अर्धन्यायीक कामकाजातील, अर्ज / अपील देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असणे बंधनकारक आहे.

 शासनाकडे आव्हानित झालेल्या निम्नस्तरीय महसूल अधिकायांच्या अर्धन्यायीक कामकाज निर्णयामध्ये अर्जदार व जाबदेणार यांचे म्हणणे तसेच न्यायनिर्णयातील सार / न्यायतत्व हे इंग्रजी भाषेमध्ये नमूद करण्यात येते. त्यामुळे यापुढे महसूल अधिकाऱ्यांनी अर्धन्यायीक आदेश पारित करताना ते देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असावेत याची खबरदारी घ्यावी.

 सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक मभावा- १०८६/४३२/प्र.क्र.१६१/८६/२०-ब, दिनांक १८ जुलै, १९८६ अन्वये, शासन व्यवहारात संयुक्तीक कारण नसताना मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यावी.

 २८) महसूल न्यायासन प्रकरण व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे (RCCMS) व तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे:

विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने या विषयाच्या अनुषंगाने शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने तसेच भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या प्रणालीच्या अनुषंगाने, जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमिअभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे, यांनी राज्यासाठी महसूल प्रकरणे व्यवस्थापन प्रणाली विकसित करावी. तसेच अर्धन्यायीक कामकाजामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा व कृत्रिम बुध्दीमत्ता माध्यमांचा वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे.

nœ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला अर्धन्यायीक प्रकरणे कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी "मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure-SOP). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.