आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

महसूल प्रश्‍नोत्तरे 1 to 25

"महसूल प्रश्‍नोत्तरे" 1 to 25

  • • प्रश्‍न १: शेत जमिनीत, कायदेशीर दस्ताद्वारे कोणत्याही प्रकारचा हक्क संपादन करणार्‍या व्यक्तीने, त्या बाबतची माहिती (वारस इत्यादी), तीन महिन्याच्या आत तलाठ्‍यांना कळविली नाही तर काय करता येईल?
    उत्तर: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५४ अन्वये, नोंदणी अधिकार्‍याने पाठविलेली जमीन हस्तांतरणाची माहिती वगळता, कोणत्‍याही शेत जमिनीत, कायदेशीर दस्ताद्वारे कोणत्याही प्रकारचा हक्क संपादन करणार्‍या व्यक्तीने, त्या बाबतची माहिती (वारस इत्यादी), तीन महिन्याच्या आत तलाठ्‍यांना कळविणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ अन्‍वये बंधनकारक आहे. अन्यथा हक्क संपादन करणारा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५२ अन्‍वये दंडास पात्र ठरतो.
  • • प्रश्‍न २: कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत कोणत्‍या तीन गोष्‍टींमुळे बदल होऊ शकतो?
    उत्तर: १. नोंदणीकृत दस्ताने, २. वारस तरतुदींन्वये आणि ३. न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकार्‍याच्या आदेशानेच कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत बदल होऊ शकतो. इतर अन्य प्रकारे किंवा अनोंदणीकृत दस्त किंवा अर्जाव्दारे जमिनीच्या मालकी हक्कांत कधीही बदल होत नाही.
  • प्रश्‍न ३: सात-बारा सदरी कोणताही बदल करण्‍यासाठी फेरफार आवश्‍यकच आहे काय?
    उत्तर: होय, फेरफार नोंदविल्‍याशिवाय आणि फेरफार प्रमाणित झाल्‍याशिवाय सात-बारा सदरी कोणताही बदल करता येत नाही. फक्‍त अज्ञान व्‍यक्‍ती सज्ञान झाल्‍यावर फेरफार नोंद न घालता, वर्दीवरून अज्ञानाच्‍या पालकाचे नाव कमी करता येते तथापि, यासाठीही फेरफार घालणे सुरक्षीत असेल.
  • प्रश्‍न ४: स्‍थानिक चौकशी म्‍हणजे काय?
    उत्तर: वर्दी/माहिती मिळाल्‍यानंतर, त्‍या वर्दीची खातरजमा करण्‍यासाठी सरपंच, पोलीस पाटील आणि गावातील अन्‍य प्रतिष्‍ठित व्‍यक्‍तींकडे करण्‍यात येणारी चौकशी म्‍हणजे स्‍थानिक चौकशी.
  • • प्रश्‍न ५: पूर्वी मंजूर केलेल्या नोंदीत खातेदाराचे नाव चुकले असल्‍यास ते तलाठी स्‍तरावर दुरुस्त करता येईल?
    उत्तर: नाही. अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नव्याने नोंद घालू नये. लेखन प्रमादाची चूक दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्‍वये तहसिलदार यांचेकडे अर्ज करण्‍यास सांगावे.
  • • प्रश्‍न ६: कोणत्‍याही कायदेशीर दस्‍तावरुन गाव नमुना सहामध्‍ये नोंद घेतांना तलाठी यांनी काय खबरदारी घ्‍यावी?
    उत्तर: कोणत्‍याही दस्‍तावरुन गाव नमुना सहामध्‍ये नोंद घेतांना, संबंधीत मिळकतीबाबत झालेला जुना फेरफार जरूर बघावा. उदा. 'अ' ने 'क' ला मिळकत विकली. 'क' ने नोंदीसाठी अर्ज केल्‍यावर 'अ' चे नाव सदर मिळकतीवर कोणत्‍या फेरफारने आले ते जरूर बघावे. यामुळे सदर मिळकत विकण्‍याचा हक्‍क फक्‍त 'अ' ला होता की या व्‍यवहाराला इतरही सहधारकाच्‍या परवानगीची आवश्‍यकता होती ते समजेल. अशीच दक्षता इतर सर्व नोंदीं (विशेषत: वारस नोंदी) करतांनाही घ्‍यावी.
  • • प्रश्‍न ७: एखाद्या व्यक्तीने नोंदणीकृत खरेदी दस्ताची प्रत तलाठी यांच्‍याकडे हजर केल्‍यास कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी? तसेच काय खबरदारी घ्‍यावी?
    उत्तर: ñ कोणताही हक्‍क धारण केल्‍याची माहिती कायदेशीरपणे प्राप्‍त झाल्‍यावर तलाठी यांनी त्‍याची नोंद गाव नमुना सहा मध्‍ये नोंदविणे आवश्‍यक आहे. ñ तलाठी यांनी खरेदी घेणार किंवा खरेदी देणार यांनी समक्ष हजर केलेली नोंदणीकृत दस्ताची प्रत साक्षांकीत असावी याची खात्री करावी. ñ कोणताही हक्‍क संपादन झाल्‍यावर तलाठ्‍यांना लेखी अथवा तोंडी कळविले जाते याला 'वर्दी' म्‍हणतात. अशा वर्दीची पोहोच नमुना ७ मध्‍ये द्‍यायची असते. ñ सदर व्‍यवहाराची नोंद गाव नमुना ६ मध्ये (हक्काचे पत्रक किंवा फेरफार रजिस्टर) करावी. म.ज.म.अ.१९६६, कलम १५० (१) ñ गाव नमुना सहामध्‍ये नोंद घेतल्‍यावर गाव नमुना सहाची एक प्रत सर्व हितसंबंधितांच्‍या माहितीसाठी गाव चावडीच्‍या नोटीस बोर्डवर लावणे आवश्‍यक आहे. ñ नोंदणीकृत दस्त/अ पत्रक/इंडेक्स-२ मध्ये तसेच खरेदी देणार याच्या ७/१२ उतार्‍यावर नमूद सर्व हितसंबंधीतांना नमुना ९ मध्ये, १५ दिवसाच्या मुदतीत समक्ष हजर राहण्याची सूचना देणारी नोटीस बजवावी. ñ या नोटीसीची एक प्रत तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करावी. म.ज.म.अ.१९६६, कलम १५० (२) ñ नोटीसीनुसार सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यास त्या सर्वांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घ्यावी. जमीन शेतीची आणि शेती क्षेत्रात असल्यास, खरेदी घेणार हे शेतकरी असल्याची पुराव्यासह खात्री करावी. ñ फेरफार नोंदीबाबत कोणी लेखी अथवा तोंडी आक्षेप/हरकत घेतल्‍यास त्‍यास द्‍यावयाची पोहोच नमुना १० मध्‍ये द्‍यावी. म.ज.म.अ.१९६६, कलम १५० (३) आणि हरकतीची नोंद विवादग्रस्‍त प्रकरणांची नोंदवहीत (गाव नमुना सहा-अ मध्‍ये) करावी. ñ विवादास्पद नोंदीवर निर्णय घेण्याचे अधिकार अव्वल कारकुनच्या हुद्द्यापेक्षा कमी नाही अशा महसुली किंवा भूमापन अधिकार्‍यांना आहेत. म.ज.म.अ. १९६६, कलम १५० (६) ñ कोणत्‍याही फेरफार नोंदीवर घेतल्‍या गेलेल्‍या हरकतीची माहिती मंडलअधिकारी/प्रमाणन अधिकारी यांना द्‍यावी. ñ कोणत्‍याही फेरफार नोंदीवर निर्णय घेण्‍यासाठी प्रमाणन अधिकार्‍याच्‍या भेटीची सूचना नमुना ११ मध्‍ये तलाठ्‍यास प्राप्‍त होते. ñ फेरफार नोंदीबाबत निर्णय घेण्‍यासाठी मंडलअधिकारी/प्रमाणन अधिकारी यांच्‍या भेटीची सूचना नमुना ११ मध्‍ये प्राप्‍त झाल्‍यानंतर, तलाठ्‍याने त्‍या नोंदीशी संबंधीत सर्व हितसंबंधीतांना सुनावणीसाठी हजर राहण्‍याची नोटीस नमुना १२ मध्‍ये बजवायची असते. ñ प्रमाणन अधिकार्‍यांनी विवादास्पद प्रकरणे शक्यतो एका वर्षाच्या आत निकालात काढावी. म.ज.म.अ.१९६६, कलम १५० (४) ñ गाव नमुना सहा मधील कोणतीही फेरफार नोंद सक्षम अधिकार्‍याने प्रमाणीत केल्‍याशिवाय त्‍याची नोंद अधिकार अभिलेखात नोंदविता येत नाही.
  • • प्रश्‍न ८: मंडलअधिकारी यांनी फेरफार प्रमाणीत करतांना काय खात्री करावी?
    उत्तर: सर्व हितसंबंधीतांना नमुना ९ ची नोटीस बजावली गेली आहे. ñ संबंधीत फेरफार आणि सादर केलेली कागदपत्रे यांतील मजकूर तंतोतंत जुळत आहे. ñ गाव नमुना सहामधील नोंदीबाबत कोणाची हरकत आहे किंवा कसे. ñ गाव नमुना सहामध्‍ये नोंद नोंदविल्‍यानंतर कायद्‍यात नमूद केलेला विशिष्‍ठ काळ लोटला आहे. ñ यथास्‍थिती खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा सादर केला आहे.
  • • प्रश्‍न ९: 'अमुक दस्‍त हजर करवून घेऊन फेरनोंद करावी, सबब नोंद रद्‍द' असा शेरा प्रमाणन अधिकार्‍याने लिहिणे योग्‍य आहे काय?
    उत्तर: प्रमाणन अधिकार्‍यास फेरफार नोंद एकतर प्रमाणित करता येते किंवा रद्‍द करता येते. फेरनोंद करण्‍याचा आदेश देणे बेकायदेशीर आहे. फेरनोंद घेण्‍याच्‍या तरतुदीबाबत कायद्‍यात कुठेही उल्‍लेख नाही. फेरफार प्रकरणात एखादा दस्‍त कमी असल्‍यास, तो सादर करर्‍यासाठी मुदत द्‍यावी. जरुर तर तसा उल्‍लेख शेरा स्‍तंभात करावा. अशा नोंदीबाबत तात्‍काळ निर्णय घेणे अत्‍यावश्‍यक असल्‍यास ती नोंद कागदपत्र अपूर्ण असल्‍यामुळे रद्‍द करावी आणि संबंधिताला त्‍याबाबत सक्षम अधिकार्‍याकडे अपिल दाखल करण्‍याचा सल्‍ला द्‍यावा.
  • • प्रश्‍न १०: गाव नमुना सहामध्‍ये मालकी हक्‍क बदलाच्‍या नोंदीबाबतच्‍या कागदपत्रांसाठी चेक-लिस्‍ट आहे काय?
    • प्रश्‍न १०: गाव नमुना सहामध्‍ये मालकी हक्‍क बदलाच्‍या नोंदीबाबतच्‍या कागदपत्रांसाठी चेक-लिस्‍ट आहे काय?  उत्तर: मालकी हक्‍क बदलाची नोंद गाव नमुना सहामध्‍ये नोंदवितांना तलाठी यांनी खालील बाबींची खात्री करावी. ñ नोंदणीकृत दस्‍ताशिवाय व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP) ñ नोंदीसाठी दिलेली कागदपत्रे प्रमाणीत व योग्‍य आहेत काय? (होयP / नाही) ñ तुकडेजोड-तुकडेबंदी कायद्‍याविरुध्‍द व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP) ñ परवानगीशिवाय बिगर शेतकरी व्‍यक्‍तीने जमीन खरेदी केली आहे काय? (होय / नाहीP) ñ कुळकायदा कलम ४३ चा भंग करुन व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP) ñ कमाल जमीन धारणा कायद्‍याचा भंग करुन व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP) ñ भूसंपादन कायद्‍याचा भंग करुन व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP) ñ विविध निरसीत कायद्‍यांविरुध्‍द व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP) ñ इतर हक्‍कातील बँक/सोसायटी बोजे असतांना ना हरकत दाखल्‍याशिवाय व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP) ñ जमीनीचा धारणा प्रकार सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगीशिवाय व्‍यवहाराला संमती देतो काय? (होयP / नाही) ñ विविध कायद्‍यातील तरतुदींविरूध्‍द व्‍यवहार झाला आहे काय? (होय / नाहीP) ñ जमिनीच्‍या क्षेत्राचा मेळ बसतो काय? (होयP / नाही)
  • • प्रश्‍न ११: गाव नमुना सहामधील नोंद प्रमाणित झाल्‍यानंतर तलाठी यांनी काय कार्यवाही करावी?
    उत्तर: प्रमाणन अधिकारी यांनी गाव नमुना सहामधील नोंद प्रमाणित केल्‍यानंतर तलाठी यांनी गाव नमुना सात-बारा, गाव नमुना आठ-अ (खातेदारांची नोंदवही) तसेच जरुर त्‍या इतर सर्व संबंधीत गाव नमुन्‍यांवर सदर प्रमाणित गाव नमुना सहानुसार अंमल देऊन अभिलेख अद्‍ययावत करावा. असा अंमल देतांना संबंधीत गाव नमुना सहाचा अनुक्रमांक वर्तूळात नोंदवावा.
  • • प्रश्‍न १२: जमिनीचे वाटप झालेले नाही. खरेदी देणार याने सामाईक जमिनीतील क्षेत्र आमची परवानगी न घेता विकले आहे अशी तक्रार असल्‍यास मंडलअधिकारी यांनी काय निर्णय घ्‍यावा?
    उत्तर: मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिश्श्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे खरेदी घेणार्‍यास सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो. त्‍यामुळे अशी तक्रार फेटाळून लावावी व फेरफार प्रमाणित करावा.
  • • प्रश्‍न १३: व्यवहारातील काही हितसंबंधी व्यक्ती गावी राहत नसतील व त्यांचे पत्ते उपलब्ध होत नसतील तर काय करावे?
    उत्तर: मूळ दस्तावरुन व ज्याचे नाव या नोंदीमुळे लागणार आहे त्याच्याकडून हितसंबंधीतांचे पत्ते घ्यावेत व नोटीस बजवावी. हक्क नोंदणीची मागणी करणाऱ्या व्यक्तीवर कागदपत्रे व माहिती पुरविण्याची पूर्ण जबाबदारी आहे. हितसंबंधी व्यक्ती गावी राहत नसतील तर संबंधीत इसमाच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर, त्‍याच्‍या घरातील सज्ञान व्‍यक्‍तीकडे देऊन व त्‍याची पोहोच घेऊन नोटीस बजावता येते अथवा पंचनाम्याने, घराच्या मुख्‍य दरवाज्याला किंवा जमिनीला डकवून (चिकटवून) बजावावी. अशाप्रकारे पंचनाम्याने डकवलेली नोटीस बजावली गेली असे गृहीत धरले जाते. काही प्रकरणात वर्तमानपत्रात प्रसिध्‍द करून नोटीस बजावता येते.
  • • प्रश्‍न १४: 'जुडी' आणि 'नुकसान' म्‍हणजे काय?
    उत्तर: या शब्‍दांचा प्रयोग वतन जमिनींसंबंधात होतो. शेतजमिनीसाठी आकारण्‍यात येणार्‍या महसूलाच्‍या रक्‍कमेखाली 'जुडी किंवा विशेष' या प्रकारच्‍या रकमेचा उल्‍लेख असतो. इनामदाराकडून वसूल केलेल्‍या जमीन महसूलापैकी जो भाग सरकार जमा केला जातो त्‍या भागाला 'जुडी' म्‍हणतात आणि इनामदाराने वसूल केलेल्‍या जमीन महसुलापैकी जो भाग इनामदार स्‍वत:कडे ठेवतो त्‍या भागाला 'नुकसान' म्‍हणतात.
  • • प्रश्‍न १५: सारा माफी म्‍हणजे काय?
    उत्तर: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ४७, ७८ इत्‍यादीन्वये, विविध कारणांसाठी महसूल आकारणी माफ करण्‍याचा अधिकार शासनास आहे. अशी आकारणी माफ करणे म्‍हणजे सारा माफी.
  • • प्रश्‍न १६: स्वातंत्र्यपूर्व काळात कोणती सात प्रकारची इनामे/वतने अस्तित्वात होती?
    उत्तर: वर्ग-१: सरंजाम, जहागीर व इतर तत्सम राजकीय कामाच्या मोबदला म्हणून दिलेली जमीन. वर्ग-२: जात इनाम-एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूषणावह कामगिरीबद्दल दिलेली जमीन. वर्ग-३: देवस्थान इनाम- देवदेवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन. इनाम वर्ग- ४: देशपांडे/देशमुख/कुलकर्णी इनाम इनाम वर्ग- ५: परगाणा किंवा गावची जमाबंदी, हिशेब, वसूल, शासकीय कामकाज व व्यवस्था पाहणेच्या कामगिरीचा मोबदला म्हणून दिलेले इनाम इनाम वर्ग ६-अ: रयत उपयोगी सेवेचा मोबदला म्हणून दिलेले इनाम इनाम वर्ग ६-ब: सरकार उपयोगी सेवेचा मोबदला म्हणून दिलेले इनाम (महार, रामोशी) संकीर्ण इनाम-(इनाम वर्ग-७): सार्वजनिक कारणांसाठी सारा माफीने, कब्जेहक्काची किंमत न घेता दिलेल्या जमिनी. इनाम जमिनी या सरंजाम व इनाम कायद्यातील तरतूदीं व सनदेतील अटींनाअधीन राहून उपभोगण्याचा हक्क होता.
  • • प्रश्‍न १७: सध्या किती प्रकारची इनाम/वतन अस्तित्वात आहेत?
    उत्तर: स्वातंत्र्यपूर्व काळात ७ प्रकारची इनामे असली तरी सध्या खालील तीन प्रकारची इनामे अस्तित्वात आहेत. १. संकीर्ण इनाम- (इनाम वर्ग-७): सार्वजनिक कारणांसाठी महसूल कायद्यातील तरतुदींन्वये विशिष्ठ अट आणि सारा माफीने, कब्जेहक्काची किंमत न घेता दिलेल्या जमिनी. या जमिनी काही ठराविक कामांकरिता महसूल माफीने दिल्या जातात त्यांचा समावेश इनाम वर्ग-७ मध्ये होतो. उदा. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, क्रिडांगणे इत्‍यादींना काही अटींवर दिलेल्‍या जमीनी. अशा जमिनींची नोंद गाव नमुना २ व ३ मध्ये असते. २. देवस्थान इनाम-(इनाम वर्ग- ३): देवस्थान इनाम म्‍हणजे देवदेवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन. ३. सरंजाम इनाम-(इनाम वर्ग-१): महाराष्ट्रात फक्त सातारा जिल्ह्यात सरंजाम इनाम अस्तित्वात आहे.
  • • प्रश्‍न १८: इनाम/वतन जमिनींची विक्री शक्‍य आहे काय?
    उत्तर: होय, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियम क्रमांक- २१/२००२, दिनांक ०६/०५/२००२ अन्वये महार वतनी जमिनींव्यतिरिक्त, नवीन व अविभाज्य शर्तीने दिलेल्या भोगवटादार वर्ग-२ च्या इनामी/वतनी जमीनी भोगवटादार वर्ग-१ च्या करण्याबाबतची सुधारणा शासन परिपत्रक क‘मांक वतन-१००९/प्र.क्र. २२३/ल-४, दिनांक ०९/०७/२००२ अन्वये केली आहे. यामुळे मुंबई परगाणा व कुलकर्णी वतन (निरास) कायदा, १९५०, मुंबई नोकर इनामे (लोकोपयोगी) नष्ट कायदा, १९५३, मुंबई विलीन मुलखातील किरकोळ इनामे नष्ट कायदा, १९५५, मुंबई कनिष्ठ गाव नोकर वतने निर्मूलन कायदा, १९५८ आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पदनिरास) कायदा, १९६२ या पाच अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेन्वये:æ नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या भोगवटादार वर्ग-२ च्या इनामी/वतनी जमिनींची शेतीच्या प्रयोजनासाठी विक्री करण्यासाठी कोणत्याही सक्षम अधिकार्‍याच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. परंतु अशा विक्रीनंतर भोगवटादार वर्ग-२/ नवीन व अविभाज्य शर्तीने ही अट/शेरा कमी होणार नाही. æ अशा जमिनीवरील भोगवटादार वर्ग-२/ नवीन व अविभाज्य शर्तीने हा शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग-१ मध्ये (जुन्या शर्तीने करण्यासाठी) तबदील करण्यासाठी सदर जमिनीच्या चालू बाजारभावाच्या किंमतीच्या पन्नास टक्के नजराणा रक्कम संबंधीताने चलनाव्दारे शासकीय कोषागारात जमा करावी लागेल. æ जर यापूर्वीच अशा जमिनीवरील भोगवटादार वर्ग-२/ नवीन व अविभाज्य शर्तीने असलेल्या जमिनींचा अकृषीक वापर, सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगीने, योग्य ती रक्कम शासकीय कोषागारात जमा करुन करण्यात आला असेल तर अशा भोगवटादार वर्ग-२ च्या जमीनी पूर्वलक्षी प्रभावाने भोगवटादार वर्ग-१ ची संबोधण्यात येईल. æ जर, भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनींचा अकृषीक वापर करण्यासाठी, पन्नास टक्के नजराणा रक्कम न भरता विकली असल्यास किंवा विनापरवानगी अकृषीक वापर केला असल्यास, चालू बाजारभावाच्या किंमतीच्या पन्नास टक्के नजराणा रक्कम आणि नजराणा रकमेच्या पन्नास टक्के दंड भरुन अशी जमीन भोगवटादार वर्ग-१ ची करण्यात येईल.
  • • प्रश्‍न १९: रिग्रॅन्‍ट रक्‍कम म्‍हणजे काय?
    उत्तर: वतन कायद्‍यान्‍वये देवस्थान इनाम वर्ग तीन आणि इनामवर्ग सात (महसूल माफीच्या जमिनी) सोडून बाकी सर्व इनामे विविध तारखांना खालसा/नष्ट करण्यात आलेली आहेत. या सर्व जमिनी शासनाकडे वर्ग झाल्यानंतर अशा जमिनींची आकारणीच्या पटीतील ठराविक रक्‍कम आणि मुदत ठरवून या जमिनी वतनदारांना पुन्‍हा नवीन शर्तीवर प्रदान (रिग्रॅन्‍ट) करण्‍यात आल्‍या. ज्‍या वतनदारांनी मुदतीत रक्‍कम भरली त्‍यांच्‍याकडून सहापट आणि मुदतीनंतर बारापट रक्‍कम वसूल करण्‍यात आली. अशी रक्‍कम म्‍हणजे रिग्रॅन्‍ट रक्‍कम.
  • • प्रश्‍न २०: देवस्‍थान इनाम म्‍हणजे काय?
    उत्तर: देवस्‍थानाचे दोन प्रकार आहेत. (१) सरकारी देवस्‍थान: यांची नोंद गाव नमुना १(क) (७) आणि गाव नमुना तीन मध्‍ये केली जाते. (२) खाजगी देवस्‍थान: यांचा महसूल दप्‍तराशी संबंध नसल्‍याने त्‍यांची नोंद गाव दप्‍तरी नसते. देवस्‍थान इनाम जमिनीतून येणार्‍या उत्‍पन्‍नातून, संबंधित मंदिर/मशिदीसाठी पुजा, दिवाबत्ती, साफसफाई, उत्‍सव यांचा खर्च भागवला जातो. ñ देवस्‍थान इनाम जमिनीच्‍या ७/१२ सदरी भोगवटादार (मालक) म्‍हणून देवाचे/देवस्‍थानचे नाव लिहावे. त्‍याखाली रेषा ओढून वहिवाटदार/व्‍यवस्‍थापकाचे नाव लिहिण्‍याची प्रथा आहे. परंतु या प्रथेमुळे कालांतराने, ७/१२ चे पुनर्लेखन करतांना, चुकून देवाचे नाव लिहिणे राहून जाते किंवा मुद्‍दाम लिहिले जात नाही. त्‍यामुळे पुढे अनेक वाद निर्माण होतात. त्‍यामुळे ७/१२ सदरी भोगवटादार (मालक) म्‍हणून फक्‍त देवाचे/देवस्‍थानचे नाव लिहावे, वहिवाटदार/व्‍यवस्‍थापकाचे नाव इतर हक्‍कात लिहावे. ñ देवस्‍थान इनाम जमिनीचा भोगवटादार (मालक) म्‍हणून ७/१२ सदरी पुजारी, महंत, मठाधिपती, ट्रस्‍टी, मुतावली, काझी यांची नावे कुळ म्‍हणून दाखल करु नये. ñ देवस्‍थान इनाम जमिनीचे हस्‍तांतरण, विक्री किंवा वाटप करता येत नाही. असे झाल्‍यास अशी जमीन सरकार जमा केली जाऊ शकते. असा अनधिकृत प्रकार तलाठी यांना आढळल्‍यास त्‍यांनी तात्‍काळ तहसिलदारला कळवावे. ñ अत्‍यंत अपवादात्‍मक परिस्‍थितीत शासनाची पूर्व परवानगी आणि धर्मदाय आयुक्‍तांच्‍या मान्‍यतेने असे हस्‍तांतरण किंवा विक्री करता येते. ñ देवस्थान इनाम वर्ग ३ ची जमीन खरेदी करण्यापूर्वी शासनाची आणि धर्मदाय आयुक्त अशा दोघांची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा दोन्ही परवानगी नसेल तर नोंद रद्द करावी.
  • • प्रश्‍न २१: देवस्‍थान इनाम जमिनीवर कुळाची नोंद घेता येते काय?
    उत्तर: होय, देवस्‍थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल होऊ शकते परंतु जर देवस्‍थानच्‍या ट्रस्‍टने कुळ वहिवाट अधिनियम कलम ८८ ची सुट घेतली असेल तर अशा कुळास कुळ वहिवाट अधिनियम ३२ ग प्रमाणे जमीन विकत घेण्‍याचा अधिकार नसतो.
  • • प्रश्‍न २२: देवस्‍थान इनाम जमिनीवरील कुळ मयत झाल्‍यास त्‍याच्‍या वारसाची नोंद करता येते काय?
    उत्तर: होय, देवस्‍थान इनाम जमिनीला वारसांची नोंद होऊ शकते, परंतु येथे जन्‍माने वारस ठरण्‍याऐवजी मयतानंतर प्रत्‍यक्ष पुजाअर्चा करणारा वारस ठरतो. म्‍हणजेच पदामुळे मिळणारा उत्तराधिकार हे तत्‍व येथे लागू होते. एखाद्‍या मयत पुजार्‍याला चार मुले वारस असतील तर पुजाअर्चा व वहिवाटीसाठी पाळी पध्‍दत ठरवून द्‍यावी असे अनेक न्‍यायालयीन निर्णयात म्‍हटले आहे. मठाचा प्रमुख/पुजारी, अविवाहीत असला किंवा त्‍याला वारस नसल्‍यास तो त्‍याच्‍या मृत्‍यूच्‍या आधी शिष्‍य निवडून त्‍याला उत्तराधिकार देऊन जातो. परंतु या जमिनीचे वारसांमध्‍ये वाटप होत नाही तसेच एका कुटुंबाकडून दुसर्‍या कुटुंबाकडे हस्‍तांतरण होत नाही.
  • • प्रश्‍न २३: संकीर्ण जमीन महसुलाची उदाहरणे कोणती?
    उत्तर: महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अन्वये आकारण्यात येणारे विविध प्रकारचे दंड, भाडे, फी, मोजणी फी, अतिक्रमण दंड व खर्च. ñ बिनशेती जमिनीच्या बाबतचा रुपांतरीत कर. ñ वर्ग दोनच्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रुपांतर करतांना आकारण्यात येणारी नजराणा रक्कम. ñ भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनीचे भाडे. ñ शासकीय जमिनीवरील गवत, लाकूड, फळे इत्यादी वस्तुंच्या लिलावातून मिळणारी रक्कम. ñ ताडीच्या झाडांचे उत्‍पन्‍न. ñ सरकारी जमिनीची किंमत इत्यादी.
  • • प्रश्‍न २४: संकीर्ण जमीन महसुलाचे किती प्रकार आहेत?
    उत्तर: संकीर्ण जमीन महसुलाचे दोन प्रकार आहेत. (१) स्‍थानिक उपकरांसह पात्र संकीर्ण जमीन महसूल : ज्‍या संकीर्ण जमीन महसुलाचा संबंध जमिनीच्‍या उपयोगाशी असतो अशा संकीर्ण जमीन महसुलावर सर्व साधारण जमीन महसूलाच्‍याच दराने स्‍थानिक उपकर बसतो. (उदा. जमीन भाडे) (२) स्‍थानिक उपकरांसह अपात्र संकीर्ण जमीन महसूल : ज्‍या संकीर्ण जमीन महसुलाचा संबंध जमिनीच्‍या उपयोगाशी नसतो त्‍यावर स्‍थानिक उपकर बसत नाही. (उदा. दंडाची रक्‍कम) संकीर्ण महसूल आकारणीचे अधिकार तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना असल्याने तलाठी यांनी संकीर्ण महसूल आकारणी स्वत: ठरवू नये. त्याबाबतचे प्रस्ताव तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना सादर करून योग्य ते आदेश घ्यावेत.
  • • प्रश्‍न २५: संकीर्ण महसूल आकारणीच्या आदेशावर कार्यवाही कशी करावी?
    उत्तर: सक्षम अधिकार्‍याच्या संकीर्ण महसूल आकारणीच्या आदेशाच्या दोन प्रती तहसिल कार्यालयाकडे पाठविल्या जातात. ñ तहसिल कार्यालयातील जमाबंदी लिपीकाने या आदेशाची नोंद तालुका नमुना चार मध्ये संबंधीत गावाच्या पानावर घ्‍यावी व आदेशाची दुसरी प्रत संबंधीत तलाठी यांचेकडे पाठवावी. ñ जमाबंदी लिपीकाकडून प्राप्त झालेल्या या आदेशाच्या प्रतीच्या माहितीवरून तलाठी यांनी गाव नमुना नंबर चार मध्ये याची नोंद घ्यावी. ñ संकीर्ण जमीन महसुलाची वसूली झाल्यानंतर वसूलीची सविस्तर माहिती, चलन नंबरसह वसुली करणार्‍या अधिकारी / कर्मचार्‍याने जमाबंदी लिपीकास व संबंधीत तलाठी यांना कळवावी. ñ अशा वसुलीची नोंद जमाबंदी लिपीकाने तालुका नमुना सात मध्ये घ्यावी व संबंधीत तलाठी यांनी अशा वसुलीची नोंद गाव नमुना नंबर आठ ब मध्ये घ्यावी. ñ दरवर्षी जुलै/ऑगस्ट महिन्यात गाव आणि तालुका पातळीवर या हिशोबांचा मेळ घेण्यात यावा. ñ वाढीव शेतसारा हा एका वर्षासाठी निश्‍चित केला जात असल्याने त्याला ‘संकीर्ण जमीन महसूल’ म्हणण्यात येते, त्यामुळे वाढीव शेतसार्‍याची नोंद गाव नमुना नंबर चार मध्ये घ्यावी. वाढीव शेतसारा स्‍थानिक उपकरांतुन मुक्‍त असतो. ñ शेतीसाठी उपयोगात येणार्‍या जमिनीवरील महसुलाची नोंद (गाव नमुना नंबर एक, दोन, तीन, चार आणि आठ ब मध्ये करावी.

Comments

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel