आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

बंधपत्राचे उल्लंघन आणि कारावास - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

बंधपत्राचे उल्लंघन आणि कारावास

 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६ (शांतता राखण्‍यासाठी जामीन) अन्‍वये दिलेल्‍या बंधपत्राचे उल्लंघन केले आहे त्यामुळे कलम १४१ (जामीन देण्‍यास कसूर झाल्‍यास कारावास) अन्वये कार्यवाही कशी करावी.

बंधपत्राचा भंग झाला म्‍हणून सामनेवाला याला तुरूंगात ठेवणे ही वाटते तितकी सोपी बाब नाही. घटनेने नागरिकांना दिलेले स्‍वातंत्र्य काही काळासाठी हिरावून घेणे ही गंभीर बाब आहे. अनेक वरिष्‍ठ अधिकार्‍यांसमोर याबाबत खुलासे सादर करावे लागतात. राजकीय दबावाला सामारे जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. सदर आदेश अभ्‍यासपूर्ण नसेल तर न्‍यायालयीन कारवाईलाही सामोरे जावे लागते. त्‍यामुळे उक्‍त आदेश अभ्‍यासपूर्वक आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून पारित करणे  अनिवार्य ठरते.

 भा.ना.सु.सं. कलम १२६ अन्वये एखाद्या व्यक्तीकडून शांतता राखण्यासाठी बंधपत्र (Bond for Keeping Peace) घेण्यात आले असेल आणि त्या व्यक्तीने बंधपत्राच्या कालावधीत त्याचे उल्लंघन केले असेल, तर संबंधित व्यक्तीविरुद्ध बंधपत्र जप्तीची व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया तपासावी.

 w संबंधित कायदेशीर तरतुदी

∙ कलम १२६ - शांतता राखण्यासाठी बंधपत्र का घेऊ नये अशी नोटीस/आदेश

∙ कलम १३५ - खबरीच्‍या सत्‍यतेची चौकशी

∙ कलम १३६ - जामीन देण्याचा आदेश व बंधपत्र निष्पादित करणे

∙ कलम १३९ - बंधपत्रातील मजकूर

∙ कलम १४१(१)(ब)  - शांतता राखण्याच्या बंधपत्राचे उल्लंघन केल्यास कारावास

∙ कलम ४९१ बंधपत्र दंडपात्र झाल्यास दंड वसुलीची प्रक्रिया

 महत्त्वाचे: कलम १२६ हे स्वतः बंधपत्र निष्पादित करण्याचे कलम नाही. कलम १२६ अन्वये सुरू झालेल्या कार्यवाहीत कलम १३५ व १३६ नुसार जामीन देण्याचा आदेश होऊन बंधपत्र निष्पादित केले जाते. कलम १४१(१)(ब) मध्ये कलम १३६ च्या आदेशानुसार निष्पादित बंधपत्राच्या उल्लंघनाची तरतूद आहे.

 w कलम १४१(१)(ब) अन्वये कार्यवाही कशी करावी?

∙ या तरतुदीनुसार, प्रथम उल्लंघनाची माहिती प्राप्त करावी, पोलीस ठाण्याकडून लेखी अहवाल प्राप्त करून घ्‍यावा, उल्लंघनाची तारीख, वेळ व ठिकाण तपासावे, कोणत्या कृतीमुळे शांततेचा भंग झाला हे निश्चित करावे, बंधपत्राच्या नेमक्‍या कोणत्‍या अटीचा भंग कसा झाला हे तपासावे.

 ∙ मूळ अभिलेखातील कलम १२६ अन्वये केलेला मूळ आदेश, कलम १३५ अन्वये झालेल्या चौकशीचा अभिलेख, कलम १३६ अन्वये पारित केलेला अंतिम आदेश, संबंधित व्यक्तीने निष्पादित केलेले बंधपत्र,

बंधपत्राची वैधता व समाप्तीची तारीख, बंधपत्राच्या उल्लंघनाबाबतचा पोलीस अहवाल, पंचनामे, साक्षीदारांचे जबाब, CCTV फुटेज, FIR किंवा इतर उपलब्ध पुरावे तपासावे.

 ∙ सुनावणी: सामनेवाला याला उल्लंघनाबाबतचे स्पष्टीकरण व पुरावे सादर करण्याची वाजवी संधी देण्‍यासाठी नोटीस बजावणे.

 l बंधपत्राचा भंग केल्याबाबत सामनेवाला याला कारणे दाखवा नोटीस.

तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तालुका....., जिल्‍हा..... यांचे न्‍यायालय

प्रकरण क्रमांक : फौजदारी/ कावि.... / २०२६                                 दिनांक:

प्रति,

१. .............                                                                         .....सामनेवाला

 

वाचा:
१. या न्‍यायालयाचा भा.ना.सु.सं. २०२३, कलम १३६ अन्वये दिनांक.........रोजीचा आदेश.
२. आपण निष्पादित केलेले शांतता राखण्याचे बंधपत्र दिनांक.....
३. पोलीस ठाणे, ता...... जि.... यांचा अहवाल दिनांक........

महाशय,

आपणाविरुद्ध या कार्यालयात भा.ना.सु.सं. २०२३, कलम १२६ अन्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. सदर कार्यवाहीअंती दिनांक ........रोजी भा.ना.सु.सं. २०२३, कलम १३६ अन्वये आदेश पारित करून आपणास रुपये .......रकमेचे व .......... या कालावधीचे शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आपण दिनांक........रोजी सदर बंधपत्र निष्पादित केले आहे.

 तथापि, बंधपत्राची मुदत सुरू असताना दिनांक ..... रोजी वेळ.......वाजता, ठिकाण .......येथे आपण

श्री. ........यांच्याशी भांडण करून मारहाण केल्याची बाब पोलीस स्टेशन, ता....., जि.... यांच्या दिनांक ....... रोजीच्‍या अहवालातून निदर्शनास आली आहे.

 सदर घटनेबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक ........अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे / नाही.

 आपली उक्‍त कृती आपण निष्पादित केलेल्या शांतता राखण्याच्या बंधपत्रातील अटींचा भंग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १४१(१)(ब) अन्वये आपल्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये आणि बंधपत्राची उर्वरित मुदत संपेपर्यंत आपणास कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश का पारित करण्यात येऊ नये, याबाबत आपले लेखी स्पष्टीकरण आपण दिनांक......रोजी वेळ ....... वाजता या कार्यालयात स्वतः उपस्थित राहून सादर करावे.

 आपणास पोलीस अहवाल व त्यासोबतची संबंधित कागदपत्रे पाहण्याची, आवश्यक प्रती मिळविण्याची आणि आपल्या बचावासाठी पुरावे सादर करण्याची संधी देण्यात येत आहे.

 आपणास निर्धारित दिनांकास व वेळेत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करण्‍याची पुरेशी संधी दिल्यानंतर उपलब्ध अभिलेखाच्या आधारे कायद्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.

दिनांक:                                                             तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी

 सामनेवाला हजर झाल्‍यानंतर सुनावणी घ्‍यावी. अशा सर्व प्रकरणांत रोजनामा काटेकोरपणे तयार करावा व उपस्थितांच्‍या सह्‍या न चुकता घ्‍याव्‍यात.

सुनावणीत, सामनेवाला याने खरोखरच बंधपत्र निष्पादित केले आहे काय?

बंधपत्राची मुदत सुरू होती काय? उल्लंघनाची घटना बंधपत्राच्या मुदतीत घडली काय? सामनेवालाच्या कृतीमुळे बंधपत्रातील शांतता राखण्याच्या अटीचा भंग झाला काय? उल्लंघन सिद्ध करणारे विश्वासार्ह पुरावे आहेत काय? हे मुद्दे विशेषत: निश्चित करावेत.

 ∙ निष्‍कर्ष: सुनावणी अंती सामनेवालाचे म्हणणे आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन उल्लंघन सिद्ध झाले किंवा झाले नाही, याबाबत स्पष्ट आणि सकारण निष्कर्ष नोंदवावा.

उल्लंघन सिद्ध झाल्याचे समाधान झाल्यास BNSS कलम १४१(१)(ब) अन्वये उल्लंघन सिद्ध झाल्याची कारणे लेखी नोंदवावीत. संबंधित व्यक्तीस अटक करण्याचा आदेश द्यावा. बंधपत्राची उर्वरित मुदत संपेपर्यंत कारागृहात ठेवण्याचा आदेश देता येतो.

कलम १४१(१)(ब) अन्वये कारावासाचा आदेश देण्यासाठी उल्लंघन सिद्ध झाल्याबाबत दंडाधिकाऱ्याने कारणे लेखी नोंदविणे आवश्यक आहे. केवळ पोलीस अहवाल प्राप्त झाला म्हणून यांत्रिकपणे कारावासाचा आदेश देता येणार नाही.

 ही कार्यवाही अन्य कायदेशीर शिक्षा किंवा बंधपत्र जप्तीच्या कार्यवाहीला बाधा आणत नाही.

 l कलम १४१(१)(ब) अन्वये आदेशाचा नमुना

 तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तालुका....., जिल्‍हा..... यांच्‍या न्‍यायालयातील कामकाज

प्रकरण क्रमांक : फौजदारी/ कावि.... / २०२६                                           दिनांक:

पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, तालुका....., जिल्‍हा.....                     .....अर्जदार

विरुद्ध

१. .............                                                                         .....सामनेवाला

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १४१(१)(ब) अन्वये कामकाज

आदेश

प्रस्तुत प्रकरणात दिनांक रोजी अर्जदारांनी सादर केलेल्‍या अहवालाची पडताळणीकरून, सामनेवाला याला याला त्‍याचे म्‍हणणे मांडण्‍याची पुरेशी संधी देऊन, दिनांक .... रोजी अंतिम आदेश पारित करून सामनेवाला यांच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १२६ अन्वये कार्यवाही करण्यात आली होती.

सदर कार्यवाहीअंती या न्‍यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १३६ अन्वये सामनेवाला यांच्याकडून दिनांक .......रोजी  रक्‍कम रूपये ....... (शब्‍दात रक्‍कम रुपये......) इतक्‍या रकमेचे व .......... इतक्‍या कालावधीचे शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित करून घेतले होते.

 तथापि, बंधपत्राची मुदत सुरू असताना दिनांक ......रोजी सामनेवाला यांनी ........अशी कृती करून बंधपत्रातील अटींचा भंग केल्याबाबत अर्जदार यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे.

सदर अहवालासोबत सादर केलेले दस्तऐवज, साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध पुरावे तसेच सामनेवाला यांचे म्हणणे विचारात घेण्यात आले आहे.

 उपलब्ध पुराव्यांच्या आधारे खालील मुद्‍दे आणि त्‍यांचे निष्‍कर्ष माझ्‍या विचारार्थ होते.

मुद्देनिहाय विचार व निष्कर्ष

मुद्दा क्रमांक १ : सामनेवाला यांनी शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित केले होते काय?

निष्कर्ष : होय. अभिलेखावरील दिनांक.....रोजीचे बंधपत्र आणि कलम १३६ अन्वये पारित आदेश तपासता सामनेवाला यांनी रुपये .......रकमेचे व ..... कालावधीचे शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित केल्याचे सिद्ध होते.

 मुद्दा क्रमांक २ : बंधपत्राची मुदत सुरू असताना उल्लंघनाची घटना घडली काय?

निष्कर्ष : होय. बंधपत्राची मुदत दिनांक .... ते दिनांक ..... अशी आहे. पोलीस अहवालानुसार संबंधित घटना दिनांक ..... रोजी घडली आहे. त्यामुळे संबंधित घटना बंधपत्राच्या वैध कालावधीत घडल्याचे सिद्ध होते.

 मुद्दा क्रमांक ३ : सामनेवाला यांनी .......... (उदा. भांडण व मारहाण) करून बंधपत्राचा भंग केला काय?

निष्कर्ष : होय. सादर पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय कागदपत्रे व इतर उपलब्ध अभिलेख यांचे परीक्षण केले असता ........(घटनेचा नेमका तपशील व सामनेवालाचा सहभाग नमूद करावा).

यावरून सामनेवाला यांचा संबंधित घटनेतील सहभाग सिद्ध होत आहे.

 सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यात ........ असा बचाव घेतला आहे. मात्र, सदर बचाव ........... या कारणांमुळे स्वीकारता येत नाही / पुराव्यांच्या अभावामुळे फेटाळण्‍यात येत आहे.

 उपलब्ध पुराव्यांचा एकत्रित विचार करता सामनेवाला यांनी निष्पादित केलेल्या शांतता राखण्याच्या बंधपत्रातील अटींचा भंग केल्याबाबत या न्‍यायालयाचे समाधान झाले आहे. तसेच उपलब्ध पुराव्यांवरून बंधपत्राचा भंग सिद्ध झाला आहे.

 उक्‍त निष्‍कर्षांवरून सामनेवाला यांनी निष्पादित केलेल्या बंधपत्रातील शांतता राखण्याच्या अटीचा भंग केल्याचे निर्विवाद सिद्ध होत आहे.

 सबब, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३, कलम १४१(१)(ब) अन्वये मला असलेल्‍या अधिकारांचा वापर करून मी, ....... (नाव), तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तालुका....., जिल्‍हा..... खालील आदेश पारित करीत आहे.

आदेश

१. सामनेवाला यांनी निष्पादित केलेल्या शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग केल्याचे निर्विवाद सिद्ध झाले आहे.

२. सामनेवाला यांना अटक करून बंधपत्राची उर्वरित मुदत (....महिने, ... दिवस) संपेपर्यंत त्‍यांना तालुका कारागृहात ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

३. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, तालुका....., जिल्‍हा.....  यांना आदेश देण्‍यात येत आहेत.

४. सदर कारवाई अन्य लागू कायद्यानुसार होणाऱ्या स्वतंत्र कार्यवाहीस बाधा आणणार नाही.

 

हे आदेश माझ्‍या सही आणि शिक्‍क्‍यासह निर्गमित केले आहेत.

 

ठिकाण :                                                                                         दिनांक :

 

शिक्‍का                               (स्वाक्षरी)

तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तालुका....., जिल्‍हा.....

 w अटक वॉरंट / अंमलबजावणी आदेशात अनिवार्य बाबी

कलम १४१(१)(ब) चा अंतिम आदेश पारित झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र लेखी आदेशात खालील तपशील स्पष्ट असावा:

∙ सामनेवालाचे पूर्ण नाव व पत्ता.

∙ मूळ कलम १३६ आदेशाचा क्रमांक व दिनांक.

∙ बंधपत्र निष्पादित केल्याची तारीख व त्याचा कालावधी.

∙ बंधपत्रभंग सिद्ध झाल्याचा अंतिम आदेश क्रमांक व दिनांक.

∙ कलम १४१(१)(ब) अंतर्गत अटक व स्थानबद्धतेचा स्पष्ट निर्देश.

∙ बंधपत्राची उर्वरित मुदत संपण्याची तारीख.

∙ आदेशाची प्रत व आवश्यक कागदपत्रे कारागृह अधिकाऱ्यांना देण्याचा निर्देश.

∙ विशेषतः सामनेवाला याला किती काळ स्थानबद्ध ठेवायचे हे स्पष्ट असावे.

∙ बंधपत्राची उर्वरित मुदत विचारात घ्यावी.

 w अंतिम आदेश पारित केल्यानंतर अटक व कारागृहात दाखल करण्यासाठी स्वतंत्र पत्र निर्गमित करावे.

तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तालुका....., जिल्‍हा..... यांचे न्‍यायालय

जा.क्र. : .....
दिनांक : .......

प्रति,
पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, तालुका....., जिल्‍हा.....
विषय : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १४१(१)(ब) अन्वये पारित आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत.

संदर्भ : या न्‍यायालयाचा आदेश क्रमांक...... दिनांक.......मधील अंतिम आदेश.

महोदय,

उपरोक्त संदर्भीय प्रकरणात सामनेवाला श्री.........यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १३६ अन्वये निष्पादित केलेल्या शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग केल्याचे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे समाधानकारकरित्‍या सिद्ध झाले आहे.

त्यामुळे या न्‍यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १४१(१)(ब) अन्वये दिनांक .........रोजी अंतिम आदेश पारित केलेला आहे.

त्यानुसार संबंधित आदेशाची अंमलबजावणी करून सामनेवाला यांना अटक करावी व बंधपत्राची उर्वरित मुदत ......... महिने, ......... दिवस संपेपर्यंत त्‍याला तालुका कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी कायद्यानुसार कार्यवाही करावी.

सदर आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल या न्‍यायालयास सादर करावा.

तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी

 w महत्त्वाच्‍या कायदेशीर तरतुदी:

∙ बंधपत्र न देणे किंवा जामीन सादर न करणे - कलम १४१(१)(अ)

∙ शांतता राखण्याच्या बंधपत्राचा प्रत्यक्ष भंग - कलम १४१(१)(ब)

∙ बंधपत्रातील आर्थिक दंडाची रक्कम जप्त करून वसूल करणे - कलम ४९१

∙ कलम १४१(१)(ब) अन्वये व्यक्तीला कारागृहात ठेवण्याचा आदेश हा बंधपत्राची उर्वरित मुदत संपेपर्यंतच असतो. ही मारहाणीच्या गुन्ह्यातील शिक्षा नाही.

∙ कलम ४९१ अन्वये बंधपत्राची रक्कम जप्त करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करता येते.

त्यासाठी सामनेवाला व जामीनदार यांना लागू तरतुदीनुसार नोटीस व संधी द्यावी.

 w उदाहरणे:

उदा. १. बंधपत्र कालावधीत सामनेवाला याने पुन्‍हा भांडण करणे:

मूळ प्रतिबंधक कार्यवाही तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी केली आहे. त्याच अधिकाऱ्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, कलम १३६ अन्वये शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित करून घेतले आहे. त्यानंतर सामनेवाला याने पुन्हा भांडण करून मारहाण केली आहे.

 ∙ अशा परिस्थितीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, कलम १४१(१)(ब) अन्वये कार्यवाही करताना मूळ बंधपत्र घेणारा तहसिलदार किंवा त्याचा पदावरील उत्तराधिकारी कार्यवाही करू शकतो.

 उदा. २. सामनेवाला याने बंधपत्र दिल्यानंतर पुन्हा मारहाण केली असे नाही; तर शांततेचा भंग होण्याची शक्यता निर्माण करणारे कृत्य केले आहे:

∙ अशा प्रकरणात तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी-

उदाहाणार्थ: समोरच्या व्यक्तीस धमकी दिली असेल तर धमकीचे स्वरूप व संदर्भ तपासावा, सार्वजनिक ठिकाणी वाद घालून जमाव गोळा केला असेल तर, प्रत्यक्ष शांतता भंगाची परिस्थिती तपासावी, दोन गटांमध्ये वाद निर्माण केला असेल तर, सामनेवालाची त्‍यातील भूमिका तपासावी, शस्त्र किंवा घातक वस्तू घेऊन फिरला असेल तर, त्याचा वापर, धमकी किंवा दहशत निर्माण करण्याचा हेतू तपासावा, पुन्हा वाद उकरून काढला असेल तर बंधपत्रातील अटींचा प्रत्यक्ष भंग झाला का हे तपासावे, सार्वजनिक ठिकाणी अशांतता निर्माण केला असेल तर, साक्षीदार व प्रत्यक्ष घटनाक्रम तपासावा.

वरील प्रत्येक कृती आपोआप कलम १४१(१)(ब) चा भंग ठरत नाही. संबंधित कृतीमुळे बंधपत्रातील शांतता राखण्याच्या बंधनाचा प्रत्यक्ष भंग झाला आहे, हे पुराव्यांवरून सिद्ध करावे लागेल.

केवळ भविष्यात शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे एवढ्याच आधारावर कलम १४१(१)(ब) लागू होत नाही. आधी निष्पादित केलेल्या बंधपत्राचा प्रत्यक्ष भंग झाल्याचे सिद्ध होणे आवश्यक आहे.

नवीन प्रतिबंधक परिस्थिती निर्माण झाल्यास कलम १२६ अन्वये स्वतंत्र कार्यवाही करण्याचाही विचार करता येईल.

 उदा. ३: बंधपत्र दिल्यानंतर सामनेवाला विरूध्‍द दुसरा फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.

∙ बंधपत्र दिल्यानंतर दुसरा फौजदारी गुन्हा दाखल झाला, एवढ्याच कारणावरून कलम १४१(१)(ब) अन्‍वये सामनेवाला यास आपोआप अटक करून कारागृहात पाठविता येत नाही.

सामनेवाला याने कलम १३६ अन्वये शांतता राखण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार निष्पादित केलेल्या बंधपत्राचा प्रत्यक्ष भंग केला आहे, हे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समाधानापर्यंत पुराव्याने सिद्ध होणे आवश्यक आहे.

त्यामुळे नवीन गुन्हा दाखल झाल्याची बाब ही चौकशी सुरू करण्यासाठी महत्त्वाची असली, तरी ती स्वतःहून बंधपत्रभंगाचा अंतिम पुरावा नाही. मूळ बंधपत्रातील अटी, नव्या घटनेचे स्वरूप, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तीचे म्हणणे यांचा विचार करून कारणयुक्त निष्कर्ष नोंदवावा.

 w बंधपत्राचा प्रकार तपासणे महत्‍वाचे

∙ मूळ बंधपत्र शांतता राखण्यासाठी (For keeping the peace) असेल, तर कलम १४१(१)(ब) विचारात घेता येईल.

∙ मूळ बंधपत्र चांगल्या वर्तणुकीसाठी (For good behaviour) असेल, तर कलम १४१(१)(ब) सरसकट लागू करू नये. कलम १४१(१)(ब) च्या शब्दरचनेत कलम १३६ अंतर्गत शांतता राखण्याच्या बंधपत्राचा स्पष्ट उल्लेख आहे.

∙ कलम १३९ मध्ये चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राच्या बाबतीत कारावासपात्र गुन्हा करणे/ करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यास साहाय्य करणे हा भंग असल्याचे नमूद आहे. मात्र त्यावरून कलम १४१(१)(ब) चा विस्तार आपोआप करता येत नाही.

 l बंधपत्राचे उल्‍लंघन शाबीत करण्‍यासाठी संबंधित  पोलीस निरीक्षकांना अहवाल सादर करण्‍याविषयी पत्र

 तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तालुका....., जिल्‍हा..... यांचे न्‍यायालय

जा.क्र. : .....
दिनांक : .......

प्रति,
पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, तालुका....., जिल्‍हा.....
विषय : सामनेवाला .... याने शांतता राखण्याच्या बंधपत्राचे उल्लंघन केल्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्‍याबाबत.

संदर्भ : प्रकरण क्रमांक........../ २०.....

महाशय,

 संदर्भिय प्रकरणात सामनेवाला श्री. ....... यांच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १२६ अन्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. सदर कार्यवाहीअंती कलम १३६ अन्वये दिनांक ........ रोजी आदेश पारित करून सामनेवालाकडून शांतता राखण्याचे बंधपत्र निष्पादित करून घेण्यात आले होते.

तथापि, बंधपत्र निष्पादित केल्यानंतर सामनेवाला याने दिनांक ...... रोजी .....येथे .......... असे कृत्य करून पुन्हा शांततेचा भंग होण्यास कारणीभूत परिस्थिती निर्माण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 त्याअनुषंगाने खालील बाबींचा समावेश असलेला वस्तुनिष्ठ व सविस्तर अहवाल सादर करावा.

१. घटनेची तारीख, वेळ व ठिकाण.

२. सामनेवालाने केलेल्या कृत्याचे नेमके स्वरूप.

३. सदर घटनेमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे.

४. घटनेमुळे प्रत्यक्ष शांततेचा भंग झाला काय किंवा त्याचे स्वरूप काय होते?

५. घटनास्थळावरील साक्षीदारांचे जबाब.

६. उपलब्ध CCTV / ऑडिओ / व्हिडिओ पुरावे.

७. यापूर्वीच्या बंधपत्रातील अटींचा संदर्भ.

८. संबंधित घटनेबाबत दाखल गुन्ह्याची माहिती, असल्यास.

९ सामनेवालाच्या कृत्यामुळे बंधपत्रातील शांतता राखण्याच्या अटीचा भंग झाल्याबाबत उपलब्ध पुराव्यांचा तपशील.

सदर अहवालासोबत संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती सादर कराव्यात.

तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी

w कलम १४१ की कलम १२६?

आधीचे बंधपत्र निष्पादित केले असून  

त्यातील शांतता राखण्याच्या अटीचा भंग झाला आहे.

कलम १४१(१)(ब) - बंधपत्राचा प्रत्यक्ष भंग

केवळ नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे; परंतु आधीच्या बंधपत्राचा भंग सिद्ध नाही.

कलम १२६ अन्वये नवीन प्रतिबंधक कार्यवाही

नवीन धमकी, जमाव किंवा अशांतताकारक कृत्यामुळे

नवीन प्रतिबंधक परिस्थिती निर्माण झाली आहे

कलम १२६ चा स्वतंत्र विचार

 

बंधपत्राचा भंग सिद्ध झाला आणि स्वतंत्र गुन्हाही घडला आहे

कलम १४१(१)(ब) आणि स्वतंत्र फौजदारी कार्यवाही

कलम १३९ मध्ये बंधपत्रातील अटींचे स्वरूप स्पष्ट केले आहे.

चांगले वर्तन राखण्याच्या बंधपत्राच्या (कलम १२७,१२८, १२९) बाबतीत कारावासपात्र गुन्हा करणे, करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे हे उल्लंघन ठरते.

तथापि, शांतता राखण्याच्या (कलम १२६) बंधपत्राच्या बाबतीत बंधपत्रातील नेमकी अट आणि तिचा भंग सिद्ध करणे आवश्यक आहे.

wअंतिम आदेशापूर्वी तपासण्‍याच्‍या बाबी:

∙ मूळ कलम १३६ चा (जामीन देण्‍याचा आदेश) आदेश अभिलेखावर आहे.

∙ सामनेवालाकडून बंधपत्र प्रत्यक्ष निष्पादित झालेले आहे.

∙ बंधपत्राची मुदत अद्याप सुरू आहे.

∙ कथित कृतीचा स्पष्ट तपशील उपलब्ध आहे.

∙ कृतीमुळे शांतता राखण्याच्या बंधनाचा प्रत्यक्ष भंग झाल्याचे पुरावे आहेत.

∙ सामनेवाला यास अहवाल व पुराव्यांवर उत्तर देण्याची संधी दिली आहे.

∙ सामनेवालाच्या बचावाचे परीक्षण केले आहे.

∙ उल्लंघन सिद्ध झाल्याची कारणे स्वतंत्रपणे नोंदवली आहेत.

∙ कारागृहात स्थानबद्धतेची उर्वरित मुदत निश्चित केली आहे.

या बाबींचा सखोल आणि समाधानकारक विचार केल्‍याशिवाय कलम १४१(१)(ब) चा अंतिम आदेश पारित करू नये. केवळ शांतताभंगाची शक्यता आणि आधी निष्पादित केलेल्या बंधपत्राचा सिद्ध झालेला भंग या दोन भिन्‍न कायदेशीर बाबी आहेत.

∙ बंधपत्रातील “अन्य अटी” म्हणजे नेमक्या कोणत्या अटी आहेत, हे तपासल्याशिवाय कलम १४१(१)(ब) लागू करता येणार नाही.

कलम १४१(१)(ब) हे विशेषतः कलम १३६ अन्वये दिलेल्या आदेशानुसार शांतता राखण्यासाठी निष्पादित केलेल्या बंधपत्राचा भंग झाल्यास लागू होते. त्यामुळे बंधपत्रातील अट ही शांतता राखण्याच्या मुख्य बंधनाशी संबंधित आहे काय की ती केवळ प्रशासकीय/प्रक्रियात्मक स्वरूपाची आहे, हे तपासणे निर्णायक ठरते.

उदाहरणार्थ, बंधपत्रात पुन्हा भांडण न करणे, धमकी न देणे, मारामारी न करणे किंवा सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे कृत्य न करणे अशी अट असल्यास तिचे उल्लंघन कलम १४१(१)(ब) च्या चौकटीत येऊ शकते. मात्र, केवळ कार्यालयात हजेरी लावण्याची अट, पत्ता कळविण्याची अट किंवा अन्य प्रक्रियात्मक अट मोडली म्हणून त्याच कलमाखाली कारागृहात स्थानबद्धतेचा आदेश देता येईल, असे गृहीत धरू नये.

∙ बंधपत्रातच “वाद घालणार नाही, धमकी देणार नाही, मारहाण करणार नाही, शांततेचा भंग करणार नाही” अशी विशिष्ट अट असेल आणि तिचे उल्लंघन झाले असेल, तर कलम १४१(१)(ब) विचारात घेता येईल.

बंधपत्रात केवळ “दर महिन्याला पोलीस ठाण्यात हजेरी लावणे”, “पत्ता बदलल्यास कळविणे” किंवा तत्सम प्रक्रियात्मक अट असेल, तर तिचे उल्लंघन म्हणजे शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंगच आहे असे सरसकट म्हणता येणार नाही.

 w न्यायालयीन संदर्भ:

∙ इनाला मनोज विरुद्ध तेलंगणा राज्य (२५मे २०१७) या प्रकरणात फौ.प्र.सं. कलम १२२ (भा.ना.सु.सं कलम १४१) अन्‍वये बंधपत्रभंगाच्या कार्यवाहीच्या संदर्भात केवळ गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव असणे आणि बंधपत्राचा भंग सिद्ध होणे या भिन्‍न बाबी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

 ∙ मा. उच्च न्यायालय, मुंबई, फौजदारी रिट याचिका क्र. २६८२/२००८

प्रवीण विजयकुमार तावरे विरुद्ध विशेष कार्यकारी दंडाधिकारी, दिनांक १८ जून, २००९

बेंच: मा. न्‍यायमूर्ती श्री. बिलाल नाझकी आणि मा. न्‍यायमूर्ती श्री. एफ. एम. रेईस

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदींचा गैरवापर आणि दुरुपयोग केला जात आहे, कधीकधी हेतुपुरस्सर, तर अनेकदा कायद्याच्या अज्ञानामुळे नकळतपणे.

कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी २४ मार्च, २००८ रोजी पारित केलेल्या आदेशांवर एक नजर टाकणे आवश्यक आहे. त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १११ (भा.ना.सु.सं. कलम १३०) अन्वये एक आदेश पारित केला, त्यात दोन प्रकरणांचा संदर्भ दिला आणि पुढे म्हटले, "मी याची खात्री केली आहे की भविष्यात प्रतिवादींच्या (येथील याचिकाकर्त्यांच्या) वर्तनात कोणतीही सुधारणा होणार नाही". पुढे ते म्हणतात, "म्हणून, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ११०(इ)(ग) नुसार तुमच्याविरुद्ध कारवाई करणे योग्य आहे, तर तुमच्याकडून चांगल्या वर्तनासाठी १ वर्षाकरिता रु. १,००,०००/- च्या आर्थिक सुस्थिती प्रमाणपत्रासह एक जामीनदार आणि या वादात सामील नसलेल्या दुसऱ्या म्हणजेच प्रतिवादी राहत असलेल्या भागातून दोन जामीनदार का घेऊ नयेत? याची कारणे तोंडी किंवा लेखी द्यावीत. तुम्हाला या कामासाठी ६ एप्रिल २००८ ही तारीख देण्यात आली आहे."

 वास्तविक पाहता ही कारणे दाखवा नोटीस नव्हती, तर याचिकाकर्ते राहत असलेल्या भागातून दोन जामीनदार सादर करण्याचा आदेश होता. आम्हाला हे कळत नाही आणि जर ती विशिष्ट व्यक्ती जामीन देण्यास तयार नसेल, तर याचा अंतिम अर्थ असा होईल की त्या माणसाला तुरुंगात जावे लागेल. हा आदेश २४ मार्च, २००८ रोजी पारित करण्यात आला, वास्तविक पाहता त्याची सुनावणी ६ एप्रिल, २००८ रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतु याचिकाकर्त्यांना कदाचित अटक केल्यानंतर त्याच दिवशी न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले आणि त्याच दिवशी त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ११६(३) अंतर्गत दुसरा आदेश पारित केला, ज्यात त्यांनी निर्लज्जपणे नमूद केले की चौकशी पूर्ण होईपर्यंतच्या अंतरिम कालावधीसाठी प्रतिवादींनी (या रिट याचिकेतील याचिकाकर्त्यांनी) खालील अटींवर जामीन द्यावा:

(१) प्रतिवादी राहत असलेल्या क्षेत्रातील ऐपत प्रमाणपत्र असलेला एक जामीनदार.

(२) एक जामीनदार जो प्रतिवादी राहत असलेल्या क्षेत्रातील जो या विवादात सामील नाही.

मग त्याच दिवशी त्यांनी याचिकाकर्त्यांना अंतरिम जामीनाबद्दल काही सांगायचे आहे का, असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर 'नाही' असे नोंदवले गेले आणि त्यानंतर एक आदेश पारित करण्यात आला.

याचिकाकर्त्यांना बंधपत्र सादर करण्याविरोधात कारण दाखवण्याची संधी कोणत्याही टप्प्यावर देण्यात आली नाही आणि त्यांना बंधपत्राची व्यवस्था करण्याची संधीही कोणत्याही टप्प्यावर देण्यात आली नाही.

 फौजदारी प्रक्रिया संहितेच्या आठव्या अध्यायाची योजना अशी आहे की, जेव्हा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०७ , १०८ , १०९ किंवा ११० अन्वये कारवाई करताना दंडाधिकाऱ्याला , अशा कलमांनुसार कोणत्याही व्यक्तीला कारण दाखवण्यास सांगणे आवश्यक वाटते, तेव्हा तो लेखी आदेश देईल. त्यामुळे, जेव्हा दंडाधिकारी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १११ अन्वये कारवाई करतो  तेव्हा त्याला एखाद्या व्यक्तीला अटक करून ताब्यात घेण्याचा अधिकार नसतो. त्याचा अधिकार केवळ कारण दाखवण्यास सांगणे आणि आवश्यक असल्यास चौकशी सुरू करणे हा असतो.

कलम ११६ नुसार चौकशी करणे आवश्यक आहे आणि जर त्या टप्प्यावर दंडाधिकाऱ्यांना असे वाटले की चौकशी दरम्यान एखाद्या व्यक्तीला जामीन देण्यास सांगावे आणि त्याने जामीन देण्यास नकार दिला तर चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या व्यक्तीला कोठडीत पाठवले जाऊ शकते आणि फौजदारी प्रक्रिया संहितेअन्‍वये अंतिम आदेश पारित केला जाऊ शकतो.

 आता या कलमातही एक अट आहे. त्यापैकी एक अट अशी आहे की, "ज्या व्यक्तीविरुद्ध कलम १०८ , कलम १०९ किंवा कलम ११० अन्वये कार्यवाही केली जात नाही, अशा कोणत्याही व्यक्तीला चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र देण्याचा निर्देश दिला जाणार नाही". त्यानंतर दुसरी अट अशी आहे की, "अशा बंधपत्राच्या अटी, मग त्या त्याच्या रकमेबाबत असोत, जामीनदारांच्या तरतुदीबाबत असोत, त्यांच्या संख्येबाबत असोत किंवा त्यांच्या आर्थिक दायित्वाच्या व्याप्तीबाबत असोत, त्या कलम १११ अन्वये दिलेल्या आदेशात नमूद केलेल्या अटींपेक्षा अधिक जाचक असणार नाहीत ".

माहितीच्या सत्यतेबाबत काही प्रकारची चौकशी केल्याशिवाय, एखाद्या व्यक्तीला जामीन देण्याचे निर्देश देणे आणि तसे न केल्यास त्याला तुरुंगात पाठवणे, हे अंतरिम टप्प्यावरसुद्धा करता येत नाही.

 हा प्रश्न १९९१ साली ' मधू लिमये विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी , मुंगेर आणि इतर' (AIR 1971 SC 2486) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयासमोर आला होता आणि घटनापीठाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ११७ चे मापदंड निश्चित केले. त्या निकालातील परिच्छेद ४३ खालीलप्रमाणे आहे:

४३. आमच्या मते, कलमातील शब्द अगदी स्पष्ट आहेत. एम्प्रेस विरुद्ध बबुआ , (१८८३) आयएलआर ६ अलाहाबाद १३२ या खटल्यात न्यायमूर्ती स्ट्रेट यांनी म्हटल्याप्रमाणे, कलम ११२ अन्वये दिलेला आदेश हा ऐकीव माहितीवर आधारित असतो, परंतु कलम ११७ अन्वये होणारी चौकशी ही आवश्यक माहितीचे सत्यत्व पडताळण्यासाठी असते. पोट-कलम (१) मध्ये माहितीच्या सत्यत्वाविषयी तात्काळ चौकशीची तरतूद आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत, जर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असेल, तर अंतरिम जामीन मागितला जाऊ शकतो आणि जामीन न दिल्यास त्या व्यक्तीला ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असतो आणि त्या व्यक्तीवर माहिती व संशयाच्या आधारावर कारवाई केली जात असते, तेव्हा दंडाधिकाऱ्यांच्या अधिकारांचा कठोर अर्थ लावणे आवश्यक आहे. तथ्ये निश्चित स्वरूपाची असली पाहिजेत.

 आज ज्या स्वरूपात हे कलम तयार केले आहे, त्यामध्येही योग्य सुरक्षा उपाययोजना आहेत आणि जर असा दृष्टिकोन प्रचलित झाला की, प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेशा माहितीच्या सत्यतेची कोणतीही चौकशी न करता एखाद्या व्यक्तीला अटकेच्या धोक्यात टाकावे, तर ते स्वातंत्र्याच्या हमीपासून खूप दूर जाण्यासारखे होईल.

 तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे, असा निश्चित निष्कर्ष काढणे गरजेचे आहे. जोपर्यंत याच्या विरुद्ध काही सिद्ध होत नाही, तोपर्यंत हा आदेश अंतिम आदेश मानला जाऊ शकतो. त्यामुळे, जर एखादी व्यक्ती जामीनपत्र देण्यास अयशस्वी ठरली, तर खटला स्थगित करून त्यादरम्यान तिला तुरुंगात पाठवण्याचा अधिकार दंडाधिकाऱ्याला नाही. जर हाच कायदा असता, तर चौकशी सुरू होण्यापूर्वीच जामीनपत्राचा आग्रह धरता आला असता आणि तो कायद्याचा अर्थ नाही, तसेच आधी नमूद केलेल्या कलमांची शब्दरचना किंवा मांडणीही नाही.

 या प्रकरणात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयाची माफी मागण्यासाठी एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्याने आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि प्रतिज्ञापत्रात नमूद केले की, त्याने कोणत्याही द्वेषबुद्धीने अधिकाराचा वापर केला नव्हता.

 विद्वान सरकारी वकील आणि न्यायालयात उपस्थित असलेले कार्यकारी दंडाधिकारी यांचे म्हणणे ऐकल्यानंतर, आम्ही दंडाधिकाऱ्यांना संशयाचा फायदा देत आहोत, कारण कदाचित या दंडाधिकाऱ्यांना कायद्याची माहिती नसेल. त्यांना दंडाधिकारी म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. आमच्या असे लक्षात आले आहे की, त्यांना दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्यापूर्वी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीची सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती किंवा पदस्थापना केली जाते, तेव्हा त्याची जवळजवळ यांत्रिकपणे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते आणि त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या प्रकरण ८ अन्वये अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार दिला जातो . सरकारला हे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांकडून काढून घेऊन ते न्यायपालिकेला किंवा महसूल अधिकाऱ्यांना सोपवण्यात रस नसल्यामुळे, आम्ही खालील निर्देश देण्यास प्रवृत्त झालो आहोत:

 (१) राज्य शासन आपल्या प्रशिक्षणासाठी तात्काळ उपाययोजना करेल सर्व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना जेणेकरून त्यांना समजेल की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अध्याय VIII मधील तरतुदी कशा लागू करायच्या आहेत.

(२) आम्हाला समजले आहे की राज्यात एक पोलीस अकादमी आहे. सर्व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी एक जलद प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. शक्यतो सत्र न्यायाधीशांना आमंत्रित करून या दंडाधिकाऱ्यांना कायद्यातील बारकावे शिकवावेत, जेणेकरून कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून अधिकारांचा गैरवापर किंवा दुरुपयोग होणार नाही.

 (३) जेव्हा कधी, दंडाधिकाऱ्याकडून अंतरिम किंवा अंतिम टप्प्यावर एखाद्या व्यक्तीला बंधपत्र देण्यास सांगणारा आदेश पारित केला जातो, तेव्हा त्याला बंधपत्र आणि जामीनदार सादर करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल.

 (४) चौकशीच्या टप्प्यावर, जामीन मागण्यासाठी प्रकरण सिद्ध करण्याइतपत माहितीच्या सत्यतेबद्दल दंडाधिकारी यांची स्वतःची खात्री झाल्याशिवाय, दंडाधिकारी चौकशी प्रलंबित असताना अंतरिम जामीन मागणार नाहीत.

 (५) जेव्हा कधी, कार्यकारी दंडाधिकारी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अध्याय VIII च्या कलम ११६ च्या पोट-कलम (३) अन्वये एखाद्या व्यक्तीला तुरुंगात पाठवण्याचा आदेश पारित करतात, तेव्हा त्या आदेशाची एक प्रत माननीय प्रधान सत्र न्यायाधीशांना तात्काळ पाठवली जाईल.

 (६) आदेशाची प्रत मिळाल्यावर, माननीय प्रधान सत्र न्यायाधीश आदेशाचे अवलोकन करतील आणि त्यांना पुनरीक्षणाचे प्रकरण आढळल्यास, ते फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३९७ अन्वये हस्तक्षेप करू शकतील.

 फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अध्याय VIII अन्वये एखाद्या व्यक्तीला तुरुंगात पाठवण्याचे निर्देश देणाऱ्या आदेशाची एक प्रत दंडाधिकाऱ्याच्या विभागातील तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील पाठवली जाईल.

वरील निरीक्षणे आणि मार्गदर्शक तत्त्वांसह, दोन्ही रिट याचिका निकाली काढण्यात येत आहेत.

या आदेशाची प्रत महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रधान सत्र न्यायाधीशांना तसेच राज्य, कायदा व न्यायपालिका आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात यावी.

lœ

 

 

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला बंधपत्राचे उल्लंघन आणि कारावास - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.