आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

मदतमाश-खिदमतमाश इनाम


मदतमाश-खिदमतमाश इनाम

मराठवाडा विभागात काम करतांना हैद्राबाद इनाम व वतन कायद्‍यान्‍वये काम करतांना मदतमाश-खिदमतमाश हे शब्‍द वाचण्‍यात येतात.

मराठवाडा विभागात ब्रिटीश राजवट नव्‍हती. या विभागावर निजामाचे राज्‍य होते. त्‍यामुळे येथील इनाम-वतन कायद्‍यांबाबत हैद्राबाद अतियात चौकशी कायदा १९५२, हैद्राबाद अतियात चौकशी नियम १९५४, हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, हैद्राबाद इनामे नष्‍ट करणे (दुरुस्‍ती) कायदा १९६०, हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे (सुधारणा) कायदा २०१५ इत्‍यादी कायद्‍यान्‍वये कामकाज केले जाते.

उपरोक्‍त कायद्‍यात वारंवार वाचनात येणारे काही शब्‍द आणि त्‍यांचा अर्थ खालीलप्रमाणे:
Ü "अतियात" या शब्‍दाचा अर्थ इनाम जमिनीचे वारस असा आहे. 
Ü "फसली" या शब्‍दाचा अर्थ इसवी सन (वर्ष). "फसली" इसवी सनच्‍या अंदाजे ५५० ते ६०० वर्ष मागे आहे.
Ü "बलदिया सरकार" या शब्‍दाचा अर्थ राजाने स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेला बहाल केलेली जमीन.
Ü "मुंतखंब" या शब्‍दाचा अर्थ इनामाची "सनद" असा आहे.
Ü "काबीज-ए-कदीम" या शब्‍दाचा अर्थ इनामदाराव्‍यतिरिक्‍त इनाम जमीन धारण करणारी अशी व्‍यक्‍ती, ज्‍याच्‍या ताब्‍यात जमीन इनाम जमीन इनाम मंजूर झाल्‍यापासून आहे.
Ü "कायम कुळ" या शब्‍दाचा अर्थ १० जुन १९५० पूर्वीपासून इनामदाराची जमीन भाडेपट्‍ट्‍यावर कसणारी व्‍यक्‍ती
Ü "जूडी" किंवा "भाडे-सोड" इनामदारामार्फत शासनास देय असणारा निश्‍चित जमीन महसूल.

हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, कलम ३ अन्‍वये सर्व प्रकारची हैद्राबाद इनामे नष्‍ट झाल्‍याची तरतुद करण्‍यात आली आहे तसेच सर्व रोख अनुदाने थांबविण्‍यात येऊन इनाम जमिनींना जमीन महसूल लागू करण्‍यात आला आहे.

हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, कलम ६ अन्‍वये इनामदार किंवा काबीज-ए-कदीम यांच्‍याकडून जमिनीच्‍या मुल्‍यांकनाच्‍या सहापट, कायम कुळाकडून जमिनीच्‍या मुल्‍यांकनाच्‍या आठपट आणि कुळाकडून जमिनीच्‍या मुल्‍यांकनाच्‍या बारापट भोगवटा रक्‍कम वसूल करण्‍यात आली आणि त्‍यांना नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणून जमीन पुर्नप्रदान करण्‍यात आली.

हैद्राबाद इनाम-वतन कायद्‍यात इनामाचे दोन प्रकार नमुद आहेत.
१) खिदमतमाश इनाम
२) मदतमाश इनाम

१) खिदमतमाश (Service) किंवा सेवाधारी इनाम म्‍हणजे देवस्‍थान, मंदिर, मस्‍जिद, इत्‍यादिंना प्रदान करण्‍यात आलेली जमीन. अशी जमीन फक्‍त पुजा-अर्चा व देवाची सेवा करण्‍यासाठी मुंतखंबच्‍या आधारे प्रदान करण्‍यात आली आहे. खिदमतमाश इनाम जमीन कोणत्‍याही परिस्‍थितीत खालसा करता येत नाही किंवा अशा जमिनीची विक्री, हस्‍तांतरण करता येत नाही.

२) मदतमाश (Community) इनाम म्‍हणजे सहाय्‍य म्‍हणून किंवा उपजिविकेसाठी प्रदान केलेली जमीन. हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, कलम २-ए अन्‍वये मदतमाश जमीन खालसा करण्‍यात येऊ शकते. कलम ६(१) अन्‍वये सक्षम अधिकार्‍याकडून चौकशी होऊन आणि वरील प्रमाणे भोगवटा रक्‍कम वसूल केल्‍याची खात्री करून मदतमाश इनाम जमीन, नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणून पुर्नप्रदान करण्‍यात येऊ शकते. हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४, कलम ६(३) अन्‍वये अशा जमिनीच्‍या हस्‍तांतरणास सक्षम अधिकार्‍याची संमती आवश्‍यक होती.

हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे (सुधारणा) कायदा २०१५ अन्‍वये उपरोक्‍त १९५४ च्‍या कायद्‍यातील कलम ६(३) ऐवजी नवीन कलम ६(३-अ) समाविष्‍ट करण्‍यात आले आहे.

नवीन कलम ६(३-अ) अन्‍वये, हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे (सुधारणा) कायदा २०१५ च्‍या प्रारंभाच्‍या दिनांकास (३० जुलै २०१५) किंवा त्‍या नंतर नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणून धारण केलेल्‍या मदतमाश जमिनीचे कृषिक प्रयोजनासाठी हस्‍तांतरण करण्‍यास जिल्‍हाधिकारी किंवा अन्‍य सक्षम अधिकार्‍याकडून परवानगी, ना हरकत किंवा संमतीची आवश्‍यकता असणार नाही परंतु अशा हस्‍तांतरणानंतरही सदर जमीन नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणूनच राहील.

उपरोक्‍त प्रारंभाच्‍या दिनांकास किंवा त्‍या नंतर नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणून धारण केलेल्‍या मदतमाश जमिनीच्‍या चालू बाजारमुल्‍याच्‍या ५०% रक्‍कम नजराणा म्‍हणून शासनाला प्रदान करून अशा जमिनीचा  भोगवटा वर्ग-१ करता येईल.

उपरोक्‍त प्रारंभाच्‍या दिनांकापूर्वी नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणून धारण केलेल्‍या मदतमाश जमिनीचे विना परवानगी हस्‍तांतरण कृषिक प्रयोजनासाठी करण्‍यात आले असेल तर अशा हस्‍तांतरणाचा पुरावा (खरेदी खत, बक्षीसपत्र ई.) सादर केल्‍यानंतर असे विनापरवाना झालेले हस्‍तांतरण कोणतीही रक्‍कम भरून न घेता नियमित करता येईल आणि सदर जमीन भोगवटा वर्ग-२ म्‍हणून धारण करता येईल.

उपरोक्‍त प्रारंभाच्‍या दिनांकापूर्वी नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणून धारण केलेल्‍या मदतमाश जमिनीचे विना परवानगी हस्‍तांतरण अकृषिक प्रयोजनासाठी करण्‍यात आले असेल तर नियमितीकरणाच्‍या दिनांकास अशा जमिनीच्‍या असलेल्‍या बाजारमुल्‍याच्‍या ५०% रक्‍कम नजराणा म्‍हणून आणि या ५०% रक्‍कमेच्‍या १०% रक्‍कम दंड म्‍हणून शासनाला प्रदान करून अशा जमिनीचे विनापरवाना झालेले हस्‍तांतरण नियमित करता येईल आणि सदर जमीन भोगवटा वर्ग-१ म्‍हणून धारण करता येईल.

उपरोक्‍त प्रारंभाच्‍या दिनांकास किंवा त्‍या नंतर नवीन अविभाज्‍य शर्तीवर, भोगवटादार-वर्ग २ म्‍हणून धारण केलेल्‍या मदतमाश जमिनीचे विना परवानगी आणि वरील प्रमाणे चालू बाजारमुल्‍याच्‍या ५०% रक्‍कम शासनाला प्रदान न करता अकृषिक प्रयोजनासाठी हस्‍तांतरण करून शर्तभंग करण्‍यात आला असेल तर अशा जमिनीच्‍या चालू बाजारमुल्‍याच्‍या ५०% रक्‍कम नजराणा म्‍हणून आणि या ५०% रक्‍कमेच्‍या ५०% रक्‍कम दंड म्‍हणून शासनाला प्रदान करून अशा जमिनीचे विनापरवाना झालेले हस्‍तांतरण नियमित करता येईल आणि सदर जमीन भोगवटा वर्ग-१ म्‍हणून धारण करता येईल.
        
bžb


Comments

  1. सुंदर माहिती आहे कुंडेतकर साहेब .

    ReplyDelete
  2. किरण पाणबुडे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel